Saturday 2 January 2021

समस्या सरत्या वर्षाची का मानवाची ?


देशदूत संवाद कट्ट्यावर "सरत्या वर्षाने काय दिलं ?" अन रोटरी क्लब जळगावच्या "नव्या वर्षाला सामोरे जाऊ या !" या दोन विषयावरील चर्चासत्रात सहभागाने सरत्या वर्षाकडे पाहण्याच्या दृष्टीला पुष्टी मिळाली. बहुतांश वेळेस आपण सर्वच एका बाजूने वा गृहितकावर विचार करतो. त्यातूनच लिहिलेला हा लेख "समस्या सरत्या वर्षाची का मानवाची ?" 

थांबा, विचार करा, कृती करा आणि आढावा घ्या ! मानवी जीवनाचे, व्यवसायाच्या प्रगतीचे हे साधे सोपे सूत्र. वर्ष इंग्रजी असो वा भारतीय, आर्थिक असो वा शैक्षणिक. साधारणपणे मागील वर्षातील घटनांचा आढावा आपण शेवटच्या महिन्यात घेतो. त्यात काय मिळविले आणि काय गमावले याचाच हिशेब प्राधान्याने मांडतो. यात जे मिळाले त्याचा आनंद कमी आणि गमावले त्याबद्दलचे दुःख अधिक दिसते. त्यामुळे पुन्हा नवीन उभारीने नव्या वर्षात मिळवायची यादी वाढते. पुन्हा संकल्प, पुन्हा ते संकल्प  सिद्धीस जाण्यासाठीची धडपड, तगमग आणि तडफड... हे जीवनाचे अव्याहत सुरु असणारे चक्र ! काही वेळेस सकारात्मक विचार करतांना अनुभवातून आलेले शहाणपण वा शिकवण हे समाधान. 

२०२० ! अकल्पित आलेली कोरोना महामारी, त्यातील मृत्यू, निर्माण होणारी अनामिक भीती, लॉकडाऊन, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टनसिंग, बेरोजगारी, उपासमारीची वेळ, जेवणाचे वांधे, उदरनिर्वाहाचा प्रश्न, जगण्याची आस, स्थलांतराचे जत्थे, मानसिक ताणतणाव, नैराश्य, वाढलेला स्क्रीन टाइम, त्यातून निर्माण झालेले डोळ्यांचे विकार, पाठदुखी, मानदुखी, लठ्ठपणा, मूळव्याध, घरगुती हिंसाचार, महिला व बालकांचे शोषण, माणसांचा परस्परांमधील संशय किती समस्या अन प्रश्न ? 

अर्थात सर्वच प्रश्न आणि समस्याच नव्हे तर संवेदना, माणुसकी, कृतज्ञता, संधी, जगण्याचे मार्ग, स्वच्छतेचे महत्व, आव्हानाला सामोरे जाण्यासाठी लागणारी एकता, निर्णय क्षमता, स्वतःसाठी व कुटुंबासाठी दिलेला वेळ, घरातील पुरुषांनी बनविलेली नवनवीन व्यंजने, दीर्घ काळापासून राहिलेली कामे पूर्ण, मिळालेली जगण्याची नवीन परिभाषा, स्वतःत घडविलेला आवश्यक बदल, स्वीकारलेली जीवनशैली, वास्तवाचे भान, तंत्रज्ञानाचा वापर, शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्व, योगा व प्राणायाम, अहोरात्र कार्यरत असलेली शासकीय, वैद्यकीय व प्रशासकीय यंत्रणा या जमेच्या बाजू आहेतच. 

लेखात मांडलेला हा जमाखर्च वा हिशेब सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित व त्याच्यावर परिणाम करणारा आहे. राज्यात, देशात व जगात या सोबतच अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत होत्या. आपणा सर्वांचा लॉक डाऊनचा बहुतांश वेळ समाज माध्यमातील त्यावरील चर्चांवर गेला आहे. कोरोनाच्या या आव्हानासमोर त्या सर्व गोष्टी कुठेतरी झाकोळल्या गेल्या म्हणून त्याचा आढावा येथे घेतलेला नाही. तसे  प्रस्तुत लेखाशी त्याचा तसा फारसा संबंधही नाही. तरी नवे शैक्षणिक धोरण, राम जन्मभूमीचा निकाल, सुशांतसिंग व समाजसेवी डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या यांचा वानगीदाखल उल्लेख करता येईल. असो.

वाचकांना नेमकेपणाने असा प्रश्न विचारायचा आहे कि, २०२० वर्षातील किती समस्या व प्रश्न निसर्गनिर्मित होते ? या समस्या त्या वर्षाच्या होत्या का मानवाच्या ? अनेकांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतांना मागील वर्ष अतिशय वाईट होते. माझ्या आयुष्यात असे वर्षच आले नाही असे म्हटले. मुळात जीवनात चढ-उतार, ऊन-सावली, आनंद-दुःख आहेच असे आपण नेहमी म्हणतो. तेच तर खरे जीवन ! मागील वर्षातील समस्यांची तीव्रता अधिक होती, काही हृदयस्थ व्यक्तींना आपण गमावले हे नाकारता येणार नाही. मात्र या अशा आव्हानांपासून वा संकटांपासून आपण वाचलो काय कारण असेल ? 

चर्चासत्रांमधून अधोरेखित झालेली गोष्ट म्हणजे भारतीय कुटुंबव्यवस्था, संस्कृती व अध्यात्म यांचा अंगीकार करणाऱ्या व्यक्तींना व कुटुंबांना याची झळ पोहोचली नाही किंवा त्यांना त्याला सामोरे जातांना सुसह्य झाले. या वर्षाने आपण स्वीकारलेल्या जीवनशैलीचा पुनर्विचार करावा असा संदेश दिला आहे असे मला वाटते. भारतीय तत्वज्ञानात या गोष्टींचा अंतर्भाव आहे.  आर्थिक उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरणाचा स्वीकार करीत असतांना नकळतपणे आपण आपल्या भारतीय मूळ विचारधारेपासून दूर जाऊ लागलो होतो. महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे खेडी समृद्ध होण्याऐवजी शहरीकरणाला प्राधान्य अधिक मिळाले. सुखाची कल्पना ही केवळ शारीरिक सुखाचा विचार करणारी झाली. त्यामुळे एक गरज पूर्ण झाल्यावर दुसरी उत्पन्न झाली. त्याचा हव्यास वाढला त्यातून गळेकापू व खिसेकापू स्पर्धा निर्माण झाली. पैसा आला तरी आनंदाबरोबर मानसिक ताणाची एक किनारही सोबत आली. या सर्वांचा परिणाम म्हणून सर्वत्र भोगवाद पसरला. त्यामुळे शोषण वाढले, निसर्गाचे ओरबाडणे वाढले आणि " सर्वे भवन्तु सुखिनः " चा आम्हाला विसर पडला. स्वार्थी व आत्मकेंद्रित समाज निर्माण झाला. त्यामुळे कोणीही सुखी समाधानी होऊ शकले नाही.

दै. देशदूत शब्दगंध पुरवणी. दि. ३ जानेवारी २०२१ 

ज्या स्वदेशीचा अंगीकार करीत आम्ही स्वातंत्र्य मिळविले, खुल्या अर्थव्यवस्थेमुळे आम्ही स्वतःहून त्या स्वदेशीला दूर लोटले. उत्पादनाचा दर्जा आणि किंमत याचा अधिक विचार न करता आम्ही चिनी वस्तूंकडे, ऑनलाईन शॉपिंग, मॉल यासारख्या गोष्टीकडे अधिक आकर्षित झालो. पैसे कमविणे, संपत्ती निर्माण करण्यासाठीच्या साधनांचा शोध लावणे, निर्माण केलेल्या साधनांचे संरक्षण करण्यासाठी सत्ता मिळविणे यात वावगे असे काहीही नाही. मात्र त्याचा अतिरेक झाला कि सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचा धोका निर्माण होतो. अमर्याद संपत्ती निर्मिती, तिचा उपभोग व त्यातून निर्माण झालेली सत्ता शोषितच असते. त्यामुळे सोबत असणाऱ्या समाज बांधवांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येतातच. भांडवलदारांना पूरक वर्तनाने आम्हीच पं. दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलेल्या एकात्म मानववादाला हरताळ फासला.

योगी अरविंदानी म्हटल्याप्रमाणे समाजातील प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे सुख मिळावे, त्याच्या कामाचा आनंद मिळावा, मिळविले ते उपभोगण्यासाठी फुरसतीचा वेळ मिळावा आणि साधे, सोपे , समृद्ध व सुंदर जीवन जगता यावे हे उद्दिष्ट आहे. भारतीय विचारात भौतिक सुख आवश्यक मानतांनाच ते अपुरे आहे हे अधोरेखित केले आहे. त्यातच अडकून पडणे म्हणजे संपूर्ण सुखापासून वंचित राहणे आहे. सुख वस्तुनिष्ठ नसून त्याचा माणसाच्या भावभावनांशी जवळचा संबंध आहे. माणसाच्या शरीराबरोबरच मन, बुद्धी व आत्मा याचीही भूक असते. या सर्वांच्या एकत्रित सुखातूनच माणूस विकसित होतो. "आहार निद्रा भय मैथुनं च, सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् । धर्मो हि तेषामधिको विशेष:, धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥ " अर्थात आहार, निद्रा, मैथुन आदींमुळे जी सुखानुभूती होते ती मनुष्यप्राणी व पशुपक्षी या दोहोंमध्ये सारखीच असते. मानवी जीवनातील विशेषतः आहे ती म्हणजे धर्म. धर्माशिवाय वागणारी व्यक्ती पशुसमान असते. माणूस आणि प्राणी यांच्यात मूलभूत फरक आहे तो म्हणजे माणसासमोर काही ना काही ध्येय असते. ते ध्येय साकारणे हे माणसाचे मनुष्यत्व होय.

जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडणार नाही व वास्तव स्वीकारणे एव्हढेच आपल्या हातात आहे याची खूणगाठ मनाशी पक्की केली कि अशा परिस्थितीतून पुढे जाणे अधिक सुखकर होते. मर्यादीत साधनांमध्ये जगणे सहज शक्य असतांना हव्यास, भोग त्यातून होत असलेला अतिरेक यामुळे मागील वर्षातील समस्यांची तीव्रता आपल्या सर्वांना अधिक जाणवली असे मला वाटते. आपण सर्वांनी समस्यांचे मूळ काळात नसून मानवात आहे हे समजून घेतले तर येणारी सर्व वर्षे अधिक चांगली जातील असा मला विश्वास आहे. 

 "सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । 

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग्भवेत् ॥" 

सर्वजण सुखी होवोत, सर्वजण निरोगी राहो, सर्वजण मंगल व आनंददायी घटनांचे साक्षीदार होवोत आणि कोणालाही कोणतेही दुःख लाभू नये हिच नवीन वर्षासाठी शुभेच्छा ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ .