Friday 5 February 2021

परेड कमांडरचा प्रवास "वर्दी"वर प्रेम निर्माण करणारा : समृद्धी संत

एनसीसीची कॅडेट ते प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात मुलींच्या ग्रुपची परेड कमांडर म्हणून मिळालेली संधी हा प्रवास "वर्दी"बद्दल विशेष प्रेम व आयुष्यात सैन्यदलात वेगळं काही तरी करुन दाखविण्याची जिद्द निर्माण करणारा ठरला, असे समृद्धी अतिशय अभिमानाने सांगत होती. २६ जानेवारी २०२१च्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात एनसीसीच्या मुलींच्या ग्रुपची परेड कमांडर म्हणून महाराष्ट्राला प्रथमच संधी मिळवून देणारी जळगावची सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी संत हिचेशी संवाद साधला असता ती बोलत होती. आरडी परेडमध्ये सहभागी होण्याचे माझे स्वप्न जरी पूर्ण झाले असले तरी आता मला आर्मीत कमिशन होण्याची इच्छा आहे. त्यासाठी मला एनसीसीमधील हा प्रवास खूप उपयुक्त ठरणार आहे. 

महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर एनसीसी घेऊन सलग दोन वर्षे प्रचंड मेहनत घेऊन समृद्धीने आपले स्वप्न साकारले आहे. मागील वर्षीही तिला हि संधी होती मात्र तिची निवड झाली नाही. त्यामुळे थोडीशी नाराज झाली तरी आणखी एक वर्ष आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपल्यातील कमींवर विशेषतः "ड्रिल"वर फोकस केला. त्यासाठी सकाळी लवकर व रात्री उशिरापर्यंत सराव केला. प्रत्येक वर्षी "बेस्ट कॅडेट"ला आरडी परेडसाठी संधी मिळते. तशी ती समृद्धीलाही मिळाली. प्रथम अमरावती, नंतर पुणे येथे निवड चाचणी होऊन त्यानंतर पुन्हा दिल्ली येथे निवड केली जाते. दिल्लीसाठी निवड झालेल्या सर्वांनाच आरडी परेडची संधी मिळत नाही. काहींना दि. २८ जानेवारी रोजी होणाऱ्या पीएम रॅलीत संधी मिळते. यावर्षी महाराष्ट्रातून एकूण २६ कॅडेटची (१६ मुले व १० मुली) निवड झाली होती. संपूर्ण भारतातून आलेल्या सर्व कॅडेटचा कसून सराव करुन घेतला जातो. 'ड्रिल' व 'कमांड' पाहून परेड कमांडर म्हणून निवड करण्यात आलेल्या तीन कॅडेटमध्ये समृद्धीचा समावेश होता. आपले स्वप्न साकार होत असतांना मुलींच्या पथकाचे नेतृत्वाची संधी तिला ऊर्जा देणारी ठरली. त्यातही तिने बेस्ट देऊन आपला निवडीचा मार्ग मोकळा केला. दि. २३ जानेवारीला तिला सांगण्यात आले तसे सांगण्यात आले. दि. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी आपल्या देशाच्या राष्ट्रपती व पंतप्रधानांना दिल्लीच्या राजपथावर मानवंदना देतांना आपला हा प्रवास सर्र्कन डोळ्यासमोर आला हे सांगतांना समृद्धी रोमांचित होते आणि तोच या सर्व प्रवासातला आनंदाचा क्षण सांगण्यास ती विसरत नाही.  

मित्रांनो आपल्याला वाटते तेव्हढी हि गोष्ट सोपी व छोटी नाही.यापूर्वी अनेक कॅडेट महाराष्ट्रातून आरडी परेडला जाऊन आले आहेत. मात्र समृद्धीचे विशेष कौतुक व अभिनंदन एव्हढ्यासाठीच कि तिने "परेड कमांडर' म्हणून प्रथमच महाराष्ट्राला हा बहुमान मिळवून दिला आहे. त्यातही फर्स्ट इयरला असतांना डोक्यात असा कोणताही विचार नसतांना केवळ एनसीसीतील प्रवेश तिला येथपर्यंत घेऊन जातो. यावर्षी तर  'कोरोना' महामारीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या पथसंचलनात निवड होणे विशेष म्हटले पाहिजे. पालकांनी दिलेली संमती व समृद्धीने पालकांचा विश्वास संपादन करुन आपले स्वप्न साकार करण्यासाठी एकनिष्ठेने केलेले समर्पण आजच्या तरुणांसाठी आदर्श आहे. दिल्लीच्या थंडीत मध्यरात्री १ वाजता सुरु होणार सराव सकाळी आठ वाजेपर्यंत चालायचा. त्यानंतर थोडी विश्रांती आणि पुन्हा ड्रिल व कमांडचे सराव एव्हढाच नेम... दिवसभरात केवळ ३-४ तासांची झोप, वातावरणातील बदल. खाण्यापिण्यावर मर्यादा, गरम पाण्याच्या गुळण्या, कितीही थकवा आला, पाय दुखले तरी सरावासाठी तयार, कधी तरी वैताग यायचा, स्वतःवरच चिडचिड व्हायची याचा त्रास वाटायचा... मात्र राजपथावरील पथसंचालनाने यासाठीच तर हे सर्व होते हे कळले.  

समृद्धीचे पालक हर्षल व सौ. अर्चना २६ जानेवारीच्या त्या क्षणाचे साक्षीदार आहेत. आपल्या लेकीच्या कौतुकाने त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू थांबायला तयार नव्हते. समृद्धीला "परेड कमांडर" म्हणून पाहतांना खूप अभिमान वाटला. तिने तिची जिद्द पूर्ण केली असे म्हणताना वडील हर्षल संत यांनी काही वेळेला विरोध केल्याचे प्रांजळपणे कबुल करतात. मात्र सकाळी लवकर व रात्री उशिरापर्यंत करावा लागणारा सराव या काळजीपोटी हा विरोध असायचा. आम्ही तिला कायम पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिलं, एक मुलगी म्हणून कधी भेदभाव केला नाही. अडचणी आल्या तर मदत केली, कधी नाउमेद झाली तर उभारी दिली. आई सौ. अर्चना म्हणतात तिचे थोडे शैक्षणिक नुकसान होईल हे आम्ही स्वीकारले आणि कायम सपोर्ट केला. प्रत्येक वेळी तिच्यावर विश्वास ठेवून तिला सर्व गोष्टींना परवानगी दिली. " तू तुझे १०० टक्के दे, शेवटी परमेश्वरी इच्छा ! आणि निवड झाली नाही तरी कधी नाउमेद होऊ नको " असा सल्ला त्या देत असत. दोघांनाही समृद्धीचे कौतुक करण्यासाठी शब्द सुचत नव्हते.

समृद्धी आणि तिचे पालक तिच्या बटालियनचे CO. कर्नल प्रवीण धीमन,सुभेदार मेजर कोमलसिंह, महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर लेफ्ट. वाय. एस बोरसे, CTO ज्योती मोरे व PI staff, पुणे येथील ब्रिगेडियर सुनील लिमये , कर्नल अनुराग सुद, काँटिंजन्ट कमांडर कर्नल प्रशांत नायर, नायक सुभेदार किरण माने, मेजर अरुषा शेटे, लेफ्ट. विवेक बाले  यांच्याप्रती वारंवार कृतज्ञता व्यक्त करतात. समृद्धीचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी असून देशाच्या सैन्यदलात प्रवेश करुन देशाची सेवा करण्याची इच्छा पूर्ण होवो यासाठी मनापासून शुभेच्छा ! आशा फाऊंडेशनच्या ६ ते १२ मे २०१३च्या क्षमता शोधन व कौशल्य विकसन या उद्देशाने आयोजित आशा बाल विकास उन्हाळी शिबिराची शिबिरार्थी असलेल्या समृद्धीने मिळविलेले यश आम्हा सर्वांसाठी आनंददायी आहे. गत १३ वर्षात संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमातील विद्यार्थी आज आपल्या व्यक्तिगत जीवनात काहीतरी वेगळं करुन दाखविण्याची जिद्द बाळगून आहेत यातच आमचे समाधान आहे. समृद्धी, तिचे पालक व तिच्या या प्रवासाचे सर्व शिल्पकार यांचे मनापासून अभिनंदन ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४