Friday 15 May 2020

कुटुंब व्यवस्थेतूनच आत्मनिर्भरता !

कुटुंब व्यवस्थेतूनच आत्मनिर्भरता ! 




१५ मे अर्थात जागतिक कुटुंब दिन ! १९९४ पासून दरवर्षी १५ मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाचे उद्दीष्ट लोकांपर्यंत कौटुंबिक व्यवस्थेच्या फायद्यांविषयी जनजागृती करणे आहे. तसेच जगभरातील समाज आणि संस्कृतींचे महत्त्व साजरा करण्यासाठी देखील हा दिवस पाळला जातो. पाश्चात्यांच्या अंधानुकरणामुळे आपल्यालाही असे दिवस साजरे करावे लागतात.

जागतिक कुटुंब दिनाच्यानिमित्ताने आयोजित आजच्या या व्याख्यानाला व्हर्च्युअली उपस्थित असलेल्या सर्वांचे मी गिरीश कुळकर्णी, आशा फौंडेशनच्यावतीने मनापासून स्वागत करतो.  वेळेची मर्यादा असल्याने विषयाला सुरुवात करतो. स्वविकासासाठी नेहमी चांगलं ते मिळविणारे आपण सर्व विद्यार्थी आहोत. अशा सर्व विद्यार्थ्यांचा मित्र व संवादक अशी ओळख गेल्या १२ वर्षात आशाच्या कार्यातून मिळविली आहे आणि त्याअनुषंगानेच आपल्याशी संवाद साधतोय. विषयाची मांडणी करण्यापूर्वी ३ उदाहरणे मी आपल्याला देऊ इच्छितो.

उदा. १. हे अगदीच कौटुंबिक आहे. आम्ही तसे मूळ धानोरा या एका खेडेगावातील... मोठे कुटुंब व शेती हा व्यवसाय. त्यातील अनिश्चितता लक्षात घेऊन तात्कालिक परिस्थितीत वडिलांचे माध्यमिक शिक्षण झाल्याबरोबर नोकरी लागली व ते धुळे जिल्ह्यात आले. कुटुंब सदस्यांना विशेषतः माझ्या आईला  शिक्षणाचे महत्व असल्याने आपल्या लहान दिरांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी धुळे येथे आपल्यासोबत ठेवले. शिक्षण पूर्ण होऊन ते अगदी चांगल्या पद्धतीने आयुष्यात स्थिरस्थावर झाले. आज तेच काका पुढील पिढ्यांच्या शिक्षणासह अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या आपले कर्तव्य म्हणून करतात. हा वसा पुढे सुरु आहे अर्थात काळानुरुप त्यात मर्यादा आल्यात हे निश्चित...

उदा. २ नुकतेच आमच्या एका मित्राशी बोलत असतांना त्याने एक गोष्ट सांगितली. लहान असतांना त्यांच्या दादांनी एका पारिवारिक संबंध असलेल्या कुटुंबातील महिलेला बहीण मानले. दुर्दैवाने त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले. दोन मुलींचे विवाह झालेले असले तरी मुलगा लहान होता. आर्थिक परिस्थिती बेताचीच ! मित्राच्या वडिलांनी "मामाची" भूमिका पार पाडत असतांना मानलेल्या भाच्याच्या गरजेच्यावेळेस आर्थिक सहकार्य केले. या घटनेला आज ३० वर्षे होऊन गेली. दोन दिवसांपूर्वी मुंबईत राहणाऱ्या मानलेल्या भाच्याचा मामांना फोन आला. मामांनी केलेल्या मदतीचा कृतज्ञता पूर्वक उल्लेख करुन त्याने आजच्या काळात ज्यांना मदतीची गरज आहे अशा २५-३० कुटुंबाची नावे कळवा त्यांच्या  खात्यात मला काही रक्कम मदत म्हणून द्यायची आहे आणि ती केली देखील.

उदा. ३ सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. समाजातील अनेक जण आपापल्या परीने या आपल्या बांधवांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यात भोजन वाटप असेल, किंवा किराणा वाटप असेल. मुंबई, पुणे, सुरत आदी ठिकाणांहून स्थलांतरितांचे जत्थेच्या जत्थे रस्त्यांनी जातांना दिसत आहेत, मिळेल त्या वाहनाने, अतिशय विपरीत व प्रतिकूल परिस्थिती आपल्या घरी जाण्यासाठी हि मंडळी अस्वस्थ आहे.   काही जण रस्त्यावरून तर काही रेल्वे रुळावरून पायी जात आहेत. या मंडळींना चहा, नाश्ता, बिस्किटेम पाणी, भोजन इ. चे वाटप केले जात आहे. संख्या अगणित आहे. वेगवेगळ्या संस्था संघटनांच्या माध्यमातून हे कार्य अव्याहतपणे सुरु आहे. काही ठिकाणी मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन केले जात आहे.

वरील तीनही उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल कि याच्या मुळाशी आहे ते म्हणजे कुटुंब व्यवस्था... भारतीय संस्कृती "वसुधैव कुटुंबकम" मानणारी आहे, आपल्या प्रतिज्ञेत म्हणतो त्याप्रमाणे भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. पहिल्या उदाहरणात एका कुटुंबातील सदस्याची  घेतलेली काळजी आहे तर दुसऱ्या उदाहरणात आपल्या परिचयातील व्यक्तीची घेतलेली काळजी आहे आणि तिसऱ्या उदाहरणात एक भारतीय नागरिक या अदृश्य नात्यातून काळजी घेतली जात आहे. हि अशी काळजी घ्यावी असे व्यक्तीला, समाज घटकाला वा समाजाला का वाटते तर त्याचे कारण आहे "आत्मनिर्भरता" "स्वयंपूर्णता". प्रत्येक व्यक्ती जीवनात आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी झटत असतो. त्याच्या आत्मनिर्भर वा स्वयंपूर्ण होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ लागते ते कुटुंब सदस्यांचे !  यासाठीच आपण आजचा विषय घेतला आहे "कुटुंब व्यवस्थेतून आत्मनिर्भरता"

मात्र वर दिलेल्या पहिल्या उदाहरणाप्रमाणे आज कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आहे का असा आपला प्रश्न असेल. पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धती आपल्याला अभावानेच पाहायला मिळते जेथे कुटुंब सदस्यांची संख्या २५ - ३० वा त्यापेक्षा अधिक असते. नोकरी व्यवसाय वा उदरनिर्वाहाच्या निमित्ताने अनेकांना आपली गवे सोडली. ते एकाच गावात आलीत असेही नाही आणि अपत्य संख्याही १ किंवा २ वर मर्यादित झाली. यासाठीच आपण विस्तारित कुटुंबाची संकल्पना समजून घेतली पाहिजे व स्वीकारली पाहिजे. यासाठी आपल्या वसाहतीतील वा कॉलनीतील वा कार्यालयातील वा मित्र परिवाराचे एक गट बनवावा. महिन्यातून किमान एक दिवस सर्वांनी एकत्र जमावे. हळूहळू सर्व सदस्यांचे स्वभाव जुळले कि एक कुटुंब तयार होते.

मित्रहो, गेली दोन हजार वर्षे आपला देश अत्यंत खडतर अशा काळातून जात आहे. कितीतरी आक्रमक आले. आपण या सर्वांशी निरंतर व निकराने संघर्ष केला. काळाच्या ओघात आपल्या संस्कृतीला पोषक असलेले स्वतःचे शासन लुप्त झाले. त्यानंतर आपल्या संस्कृतीचे रक्षण, पोषण व संवर्धन करणाऱ्या गुरुकुल परंपरेचाही लोप झाला. दीर्घकाळ अत्यंत कठीण परिस्थितून जाऊनही आपली संस्कृती आजही जिवंत आहे याचे एकमेव कारण म्हणजे आपली परिवार विशेषता ! आपले कुटुंब हे भारतीय संस्कृतीचे प्राथमिक शाळा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपली परिवार व्यवस्था टिकली आणि म्हणूनच हा देश आजही 'भारत" आहे.

भारताने यशस्वीपणे आपल्या संस्कृतीचे रक्षण केले आहे. भारताचा मानव कल्याणकारक संदेश दूरदूरच्या देशांमध्ये निनादत आहे. जगासमोरच्या अनेक समस्यांची उत्तरे भारतीय चिंतन व अध्यात्मात आहे. योग्य, ध्यान व प्रकृतीला अनुसरून जीवन आता वैचारिक जगतात स्थान मिळवू लागले आहे. जागतिक पातळीवरील या परिस्थितीत आपली जबाबदारी अधिक वाढते कारण आपली परिवार वा कुटुंब संकल्पना हिच आपल्या भारतीय संस्कृतीची वाहक आहे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या अतिरेकामुळे आज व्यक्ती ताणतणावात आहे. एकटेपणामुळे सुन्न आहार. याचा परिणाम कौटुंबिक हिंसा व मादक पदार्थांचे सेवन यासारख्या विकृती समोर येत आहेत. या वातावरणात कुटुंब व्यवस्थेचे महत्व निश्चितच मोठे आहे. आत्मकल्याण व जगत कल्याण परस्परपूरक असे या व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. वरील तीनही उदाहरणात तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

आपला विषय कुटुंब व्यवस्थेतून आत्मनिर्भरता असा आहे. पहिल्या टप्प्यात आपण कुटुंब व्यवस्था आणि तिचे महत्व समजून घेतले. आत्मनिर्भरता म्हणजे जो दुसऱ्यावर अवलंबून नाही. याचे अनेक फायदे आहेत. व्यक्ती स्वतःच्या अडी-अडचणी स्वतःच सोडवू शकतो व निर्णय घेऊ शकतो. आपण एखादी गोष्ट स्वतंत्रपणे केली तर त्याचा विशेष आनंद होतो. आत्मनिर्भरतेमुळे आत्मस्वीकृती(self Acceptance) वाढते. यामुळे माणसाची ज्ञान मिळविण्याची इच्छा जागृत होते. आत्मनिर्भरता जीवनाला दिशा देते व दृष्टिकोन विकसित करते.

कुटुंब सदस्यांना आत्मनिर्भरतेचे महत्त्व समजणे आपल्यासाठी महत्वाचे आहे कारण यामुळे कुटुंबातील विविध कार्ये कार्यक्षमतेने हाताळण्यास, एक व्यक्ती म्हणून वाढण्यास आणि स्वतंत्रपणे गोष्टी कशा हाताळायच्या हे जाणून घेण्यास मदत होते. सुरूवातीस हे कठिण असू शकते, मात्र आत्मनिर्भरतेसाठी गरजेचे आहे. कुटुंबातील

सदस्यांमधील आत्मनिर्भरता वाढावी / विकसित व्हावी यासाठी खालील दहा गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे.

१. आत्मनिर्भर होण्यासाठी सर्वप्रथम संयम शिकला पाहिजे - कारण एखदी गोष्ट करीत असतांना ती प्रथम केल्यावर लगेच येईल असे नाही. एखाद्या वेळेस ती वारंवारही करावी लागेल. अशा वेळेस संयम हा गुण महत्वाचा ठरतो.

२. स्वतंत्रपणे काम करु या - कुटुंबातील एखादी गोष्ट करण्यासाठी ती त्याला स्वतंत्रपणे करु द्या. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. काम करीत असतांनाच खऱ्या अर्थाने शिकण्याची / विकासाची खरी प्रक्रिया होत असते. अलीकडे पालक आपल्या पाल्याला केवळ अभ्यास करायला लावतात. अशा वेळी मुलगा कितीही हुशार झाला तरी त्याला व्यावहारिक ज्ञान नसेल तर हुशारी कामात कशी येणार ?

३. स्वतःचे निर्णय घेऊ द्या.- काय करावे, काय खावे, काय प्यावे, कोणत्या रंगाचा शर्ट घालावा, कुठे फिरायला जायचे अशा सर्व प्रकारच्या निर्णय प्रक्रियेत सर्वांचा सहभाग घ्या. त्यामुळे प्रत्येकाचा आत्मसन्मान वाढेल.

४. घरगुती कामाचा परिचय करुन द्या - घरातील कामांचा सर्वांना परिचय व्हायला पाहिजे. ते काम करीत असतांना ते कसे करावे याचे स्वातंत्र्यही दिले पाहिजे. अनेकदा दुसऱ्याने काम केल्याची पद्धत वेगळी असली तरी त्यातून आपल्यालाही अनेक गोष्टी शिकता येतात.

५. साफसफाई व स्वच्छतेला वेळ द्या - काम झाल्यानंतरच्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करा. खेळणी खेळून झाल्यावर उचलायला लावा. जेवण झाल्यावर आपली ताट वाटी उचलण्याला लावा. कचरा व स्वच्छतेचे महत्व समजावून सांगा.

६. पैशांचे मोल समजून घ्या - पैशांबद्दल बोला. पैशाचे महत्व समजावून सांगा.

७. सदस्यांना वाचा व त्यांना स्वतःला एकट्याला वाचण्यासाठी प्रोत्साहित करा -काम करतांना सुरु असलेली विचार प्रक्रिया समजून घ्या. ती चुकीची असली तरी करुन पाहू द्या.  एकटेच वाचन असतील तर ते आकलन व स्वातंत्र्य कार्य व्यवस्थित व सुरळीतपणे होण्यास मदत होईल.


८. त्यांनी प्रामाणिकपणे केले प्रयत्न लक्षात आले याची जाणीव करुन द्या - आपण त्यांना अधिक स्वावलंबी कसे व्हावे हे शिकवत आहात, परंतु त्यांना नेहमीच हे माहित असले पाहिजे की ते किती प्रेम करतात. हे केवळ त्यांना अधिक परिश्रम करण्यासाठी प्रेरणा देईल.

९.त्यांना परिस्थितीबाबत बोलत करा - त्यांनी काहीतरी का केले, त्यांनी चांगले काय केले आणि पुढील वेळी ते काय करतील याबद्दल. समस्या असो किंवा काहीतरी सकारात्मक, चर्चा करणे खूप चांगले आहे कारण मुले जेव्हा गोष्टींबद्दल बोलू शकतात तेव्हा चांगले शिकतात.

१०. वास्तवाचे भान द्या - काम करणाऱ्याला वास्तव समजणे. त्यांना दररोजच्या वास्तविकतेबद्दल विचार करायला लावा. लहान मुले कधीकधी प्रौढांपेक्षा चांगले आणि चुकीचे फरक सांगू शकतात आणि यामुळे ते नेहमीच एकमेकांशी चांगले वागतात. चांगल्या नैतिकतेची जाणीव असणे आणि निर्णय न घेणे ही अधिक स्वावलंबी होण्याची एक मोठी पायरी आहे.

कुटुंबातील सदस्य आत्मनिर्भर होण्यासाठी वरील गोष्टींचा विचार व वापर करणे हितकारक ठरते. आजच्या विषयाला पूरक असलेली विमल लिमये यांच्या घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती... या कवितेने समारोप केला. 

कुटुंब हेच आपल्या प्रगती व आनंदाचा खरा आधार आहे. कुटुंब आपल्या संस्कृतीची पाठशाळा आहे. कुटुंब हेच आपले व आपल्या राष्ट्राचे संरक्षक कवच आहे.
कुटुंब रक्षति रक्षित: |

वेबिनारला उपस्थित सर्वांचे मनापासून आभार मानले व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साहाय्य करणारे मल्टी मिडीया फीचर्स प्रा. लि.चे सुशील नवाल व पारितोष नवाल यांचे विशेष आभार.

Sunday 10 May 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग १४

नाविन्यता व सृजनशीलता अस्तित्वाच्या लढाईसाठी संजीवनी ! 


समर्थ भारताच्या उभारणीसाठी या लेखमालेच्या शेवटच्या टप्प्यात आपण "कोरोना" पश्चातच्या समस्यांना उत्तर / उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. येथून पुढे एक दिवसाआड विषय मांडून साधारणपणे लेखमालेला पूर्ण विराम देण्याचा मानस आहे. लेख लिहिण्याचा एक फायदा नक्की झाला खूप सारे विचार ऐकायला मिळाले व सुचलेही. बांधकाम क्षेत्रातील एका मित्राने तंत्रज्ञानाबद्दल मत मांडतांना आधुनिक काळातील तंत्रज्ञानाबद्दल काही लिहावे असे सुचविले तसेच कामगारवर्गासाठी एखाद तंत्रज्ञान हे त्यांच्या रोजगारालाच पर्याय असतो, हि समस्या कशी हाताळता येईल याबाबत लिहावे असेही सुचविले आहे. शेवटच्या भागात अशा सर्व सूचनांवर लिहीन.  मागील दोन भागात आपण सर्वार्थाने बदल व तंत्रज्ञान हे दोन उपाय पाहिले. हि लेखमाला माझ्यासारख्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्यांसाठी आहे. त्यामुळे वरील दोन उपायांसोबत संस्था वा व्यक्तीच्या अस्तित्वाला संजीवनी देणारी गोष्ट म्हणजे नाविन्यता व सृजनशीलता !


तसं पाहायला गेलं तर इनोव्हेशन व क्रिएटिव्हिटी हे तसे गुळगुळीत होत असलेले शब्द. कारण भारतीयांच्या मूळ स्वभावात आपल्याला ते पाहायला मिळतात आणि ज्याच्याजवळ असते त्यालाच किंमत नसते. व्यक्ती व संस्थांच्या उन्नतीसाठी या दोनही गोष्टी अपरिहार्य आहेत. ज्यांनी याची कास धरली ते नेहमीच आपली नौका पार करतात अगदी सामान्य माणसेही ! लेखाची मांडणी करतांना एक संकल्पना वाचण्यात आली ती आवर्जून सांगावीशी वाटते. सद्यस्थिती हि "इनोव्हेशन" साठी अतिशय पूरक आहे नव्हे त्यावरच पुढील सर्व अवलंबून आहे. त्या संकल्पनेचे नाव आहे "ब्लॅक स्वान इव्हेन्ट" !  याचा अर्थ हि एक अशी घटना असते जी अनपेक्षित असते, ती कोणाच्याही आकलनापलीकडची असते आणि तिचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. या घटनेचे वैशिट्य म्हणजे ती अतिशय दुर्मिळ असते, ती सर्वव्यापी असते आणि सर्वांनाच तिच्यामुळे क्षती पोहोचते. महामारी वा मंदीच्या अशा घटना क्रांती घडवून आणतात असा इतिहास आहे.

मागील सुमारे ७ आठवड्यांचा काळ आपण आठवून पहा. प्राप्त परिस्थितीला स्वीकारून त्याप्रमाणे आपल्या स्वतःत बदल करुन कित्येक गोष्टी आपण वेगळ्या पद्धतीने करतोय. आपल्या सामान्य दिनचर्येलाही आपण मोल्ड केले. काही मार्ग आपल्याला सुचले, काही इतरांचे पाहून अनुकरण केले तर काही आपल्याला कोणीतरी सुचविले. अर्थात "कर के देखो" हा त्यासाठीचा मंत्र ठरला. एखाद्या विषाणूचा सामना करण्यासाठी घरात बसून राहणे हाही एक वेगळाच पर्याय आपल्या समोर आला. प्रत्येकालाच काही ना काही सुचत असते मात्र ते कल्पना या पातळीवरच संपते. कारण असं शक्य आहे का ? हि अनिश्चितताच त्या कल्पनेला मारक ठरते. स्व. पदमश्री भवरलाल जैन यांनी शेतात नळी अंथरून झाडाला जेव्हढं आवश्यक आहे तेव्हढं पाणी दिल पाहिजे अशी कल्पना मांडतांना कोणालाही कसं शक्य आहे ", असेच वाटले असणार मात्र त्यांनी ते प्रत्यक्ष करून दाखवले आणि ठिबक सिंचनाच्या क्षेत्रातील जगातील पहिल्या पाचात स्थान मिळविले.


लॉक डाऊनच्या स्थितीत अनेक अशा गोष्टी आपण अनुभवल्या असतील ज्यांची आपण कल्पनाही केली  नसेल. घराबाहेर न पडता आपला दिवस वेगळ्या पद्धतीने जगता येतो हे अनेकांच्या समाज माध्यमातून वाचनात आले असेल. पुढील काळात अस्तित्व टिकविण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण व सृजनशील मार्गांची प्रत्येकालाच कास धरावी लागेल. कोरोना पश्चात व्यवसायांना टिकण्यासाठी आमूलाग्र बदल करावे लागतील. यामुळे अनेक नवीन व्यावसायिक मॉडेल निर्माण होतील. त्यांना गती मिळेल. ज्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण विविध इनोव्हेशन पाहतो आहोत, अनुभवतो आहोत, वापरात आहोत, त्याच पद्धतीने आगामी काळात आपण अपेक्षाही केल्या नसतील अशा गोष्टी करू. हा मूळ विचार लक्षात घेतला तर काही उदाहरणे ते सिद्ध करतील.

अन्नधान्याचा पुरवठा करणाऱ्या व्यवसायाने टाकलेली कात आणि त्यातून गरजू माणसापर्यंत आवश्यक वस्तू पोहोचविण्याचे काम हे इनोव्हेशनच म्हणता येईल. अतिशय मर्यादित कालावधीत उभे राहिलेले कोविद साथीच्या रुग्णालयाचे उदाहरणंही नावीन्यतेचे मापदंड ठरलेत. व्यवसायांमध्ये काळानुरुप घडणारे बदल, त्याचा मानसिक स्वास्थ्यावर होणार परिणाम, त्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना हा कल्पतेचे उदाहरण ठरतील. शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षणाची भूमिका महत्वपूर्ण ठरेल. समस्येची गंभीरता आणि प्राधान्याने त्यावर उपाय शोधण्याची इच्छा इनोव्हेशनला चालना देईल.

Tuesday 5 May 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग १३

तंत्रज्ञान हा परवलीचा शब्द !



समर्थ भारताच्या उभारणीसाठी... लेखमालेत आतापर्यंत साधलेले सातत्य, विषयांची विविधता, त्यासंबंधातील विचार व अनुषंगिक मजकूर हे सहज व ओघाने येत होते आणि आपल्यासमोर मांडत होतो. लिखाणाच्या बाबतीत असे होणे हे माझ्यासाठी अत्यावश्यक व महत्वाची बाब आहे. थोड्या ब्रेक नंतर पुन्हा ५ - ८ भागांमध्ये मांडणी पूर्ण होईल. अर्थात सर्वच गोष्टी पूर्ण होतील असे नाही कारण जीवन प्रवास हि सुरु राहणारी गोष्ट आहे. प्राप्त परिस्थितीनुसार चित्र जसे जसे स्पष्ट होईल तसे तसे त्यातील सखोलतेकडे पाहणे गरजेचे ठरेल. लेखमालेचा उद्देश हा आशा फौंडेशनच्या अस्तित्वाच्या लढाईचा मार्ग शोधणे असल्याने आता त्या टप्प्याच्या जवळ पोहोचल्याचे जाणवते आहे. मागच्या व या लेखाच्या शीर्षकावरून आपल्याला लक्षात आलॆ असेल. सर्वार्थाने बदल आणि तो स्वीकारत असतांना तंत्रज्ञानाचा अंगीकार या गोष्टी इप्सित स्थळी पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्याला चाकोरीबाहेर विचार करण्याची, सृजनशीलता, सहकार, स्थानिक गरज, जीवनशैलीतील बदल, सर्व स्तरावरचे नियोजन व अध्यात्म  यांची सुयोग्य जोड दिली पाहिजे. खरोखर हे सर्व माझ्यासह अस्तित्वाचा प्रश्न असलेल्या सर्वांना मार्ग शोधण्यासाठी उपयुक्त ठरले तर "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।" याची प्रचिती येईल व तीच माझ्यासाठी कृतार्थता असेल. 



कोरोना पश्चात जीवनात तंत्रज्ञानाचा अंगीकार अधिकाधिक झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्याला मुख्य कारण असणार आहे ते म्हणजे साथीच्या व महामारीच्या या आजाराने आगामी काळात किमान वर्षभर तरी दोन गोष्टींची सर्वांनाच विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, अनिवार्यता असणार आहे. १) म्हणजे मास्कचा वापर आणि दुसरे म्हणजे सोशल डिस्टनसिंग. म्हणजेच लोकांच्या संपर्काशिवाय आपल्याला आपल्या गोष्टी साध्या करता आल्या पाहिजेत, याला समर्थ पर्याय म्हणजे तंत्रज्ञानाचा अंगीकार ! लॉक डाऊनच्या या संपूर्ण कालखंडात त्याची जाणीव झाली नव्हे त्यावरच सर्व सुरु होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ९० च्या दशकानंतर आपण तंत्रज्ञानाचा जो अंगीकार केला आहे त्याला तोड नाही. सर्वच तंत्र आत्मसात केले आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही किंवा उपलध तंत्रज्ञानाचा ज्या पद्धतीने वापर केला पाहिजे तोही आपण फारसा केला नाही. स्वतः संगणकशास्त्र विषयाचा पदवीधर असूनही माझी तंत्रज्ञान स्वीकारण्याची गती कमी आहे असे मला जाणवते आणि लॉक डाऊनच्या काळात ती वाढविण्याचा सर्वांनीच प्रयत्न केला असेल. त्याची काही उदाहरणे ही आपल्याला देऊ इच्छितो. 

कोणे एकेकाळी तंत्रज्ञनाला विरोध करणारी बहुतांश मंडळी आज त्याच तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे त्याचे लाभ घेत आहे. ९० च्या दशकात संगणकीकरणामुळे बेरोजगारी वाढेल या गृहीतकावरच अनेक संस्थांमध्ये व्यवस्थापन विरोधात मोर्चे, आंदोलने झाली होती. कोणत्याही शाखेच्या ज्या मंडळींनी तंत्रज्ञानाला आत्मसात केले ते आज नक्कीच आपल्या नोकरी व्यवसायात एक उंची गाठून आहेत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वा वाजवीपेक्षा अधिक वापर हा माणसाच्या मानवतेला आव्हान ठरतो हे आपण अनुभवत आहोत. पुढील काळात "अतिरेकी वापर वा वाजवीपेक्षा अधिक" वापर हे गृहितकही बदलणार आहे. कारण केवळ आणि केवळ तंत्रज्ञानचं माणसाला त्याच्या गरजांचे उत्तर देण्यातही उपयोगी ठरणार आहे. तंत्रज्ञान स्वीकारणे आणि ते आत्मसात करणे हे जसे आवाहन आहे तसेच ती एक संधीही आहे. लॉक डाऊन मध्ये घरात बसूनही सर्वकाही करता येऊ शकते हा विश्वासही मिळला. एखाद्या गोष्टीची अपरिहार्यता / अनिवार्यता हीच त्याची स्वीकारार्हता वाढविण्यास उपयुक्त ठरते. ही स्वीकारार्हताच कालांतराने क्रांती ठरते. अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रातील डिजिटायझेशन हे त्याचे उदाहरण होय. 



तंत्रज्ञानाची स्वीकारार्हताच माणसाचे वैयक्तिक जीवनमान व व्यवसायाच्या बदलाचे कारण ठरते. "कोरोना" पश्चातच्या युगात परस्परांमधील अंतर राखण्याचे काम तंत्रज्ञान करेल आणि त्यावर आधारित व्यावसायिक मॉडेल (प्रतिकृती) निर्माण करेल. अशा व्यवसायांची निर्मिती झाल्यानंतर मंडळी पारंपरिक गोष्टींपासून दूर जातील हा इतिहास आहे, त्याची पुनरावृत्ती होईल आणि आपण त्यासाठी अग्रणी ठरले पाहिजे.  आज लॉक डाऊनच्या या स्थितीतही जागतिक पातळीवरचे व्यवहार तंत्रज्ञानाने सुकर झालेले आपण पाहतोय. पाककलेत निपुणता नसलेल्यांसाठी "फूड टेक" म्हणजे " भोजन पाकिटे " सहाय्य्यभुत ठरत आहे तर घरी करु इच्छिणाऱ्यांसाठी "रेडी टू इट" सारख्या वस्तू साधन ठरत आहे. डॉक्टर मंडळी टेलिमेडिसिनद्वारे आपल्या रुग्णांवर उपचार करीत आहेत तर शिक्षक आपले शिकविण्याचे कामही ऑनलाईन करीत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या मिटिंगसाठी, प्रशिक्षणासाठी " झूम " ऍपचा वाढलेला वापर हे त्याचेच प्रतीक नाही तर काय ? सध्या स्वयंचलित कार्यपद्धतीची नेतृत्वाकडे मक्तेदारीला आगामी काळात व्यापक स्वीकृती मिळेल व त्यातील गुंतवणूकही वाढेल. म्हणूनच स्वयंचलित स्वायत्त गोदामे, रोबोटिक्स, थ्री - डी, मॅन्युफॅक्चरिंग यासारख्या गोष्टींची चालती असेल आगामी काळात त्यांनाच व्यापक स्वीकृती लाभेल. 



लॉक डाऊनमुळे व्यावसायिक कार्यात आलेल्या शिथिलतेला संजीवनी देण्याचे काम तंत्रज्ञानाने केली असे म्हणता येईल. फेसबुक लाईव्ह, यु-ट्यूब चॅनल, झूम, एचडी कॉल्स, वेबिनार यांचा लॉक डाऊनमध्ये प्रचंड प्रमाणात सुळसुळाट होता. रोज किमान १० वेगवेगळ्या विनामूल्य कार्यक्रमांचे  व ४ सशुल्क कार्यक्रमांचे निमंत्रण येत आहेत. किराणा मुलासह आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तुचे ऑनलाईन बुकिंग करुन ती घरपोच मिळण्याचे अनुभवही आहेत. तंत्रज्ञानाची कास धरणारी इ-स्वरूपातील वर्तमानपत्रे आज जिवंत असल्याची खात्री देत आहेत. कुटुंबियांसमवेत सलग ६५ दिवस संपूर्ण देशाची भ्रमंती केलेल्या व व्यवसायाने डीजे चालविणाऱ्या किशोर पाटील या उमद्या व्यक्तीने "लॉक डाऊन रेडिओ" सारखी संकल्पना तंत्रज्ञानाच्या सहकार्याने राबवित समाजाच्या करमणुकीची नामी शक्कल शोधून काढली आहे. ऑनलाईन सर्वेक्षणासारखे काम तंत्रज्ञानाने शक्य होत आहे. आजची परिस्थिती  "जेथे जातो तेथे तु माझा सांगाती" अर्थात जेथे माणूस तेथे तंत्रज्ञान अशी झालेली दिसत आहे. तंत्रज्ञानाचे इतका चांगला सकारात्मक वापर करता येऊ शकतो हे नक्कीच शिकायला मिळाले आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते आगामी काळात यशाचा पासवर्ड म्हणजेच परवलीचा शब्द असेल "तंत्रज्ञान'... 

तंत्रज्ञानाचा अशा पद्धतीने केलेला स्वीकार भविष्यात कोणत्याही प्रकारचा साथीचा रोग आला तरी तो व्यवसायावर फारसा परिणाम करणार नाही. याचाच अर्थ असाही आहे कि सायबर सुरक्षा, गोपनीयता, देता सुरक्षितता यासारख्या गोष्टींमध्ये व्यापक संधी उपलब्ध होतील. चला, तर मग समर्थ भारत उभारणीचे आपले ध्येय साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा अंगीकार करु या ! 

Sunday 3 May 2020

श्री संत सखाराम महाराजांचा वैशाख उत्सव

२५० वर्षांची समृद्ध परंपरा असलेला सामाजिक
समरसतेचा संदेश देणारा अमळनेरचा यात्रोत्सव


प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेली अमळनेर नागरी श्री संत सखाराम महाराज यांच्या वास्तव्याने पावन  झाली आहे. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुद्ध एकादशीला अर्थात मोहिनी एकादशीला श्री संत सखाराम महाराजांच्या उत्सवात अमळनेरचा रथोत्सव साजरा केला जातो. श्री संत सखाराम महाराज यांच्या परंपरेतील ११ वे विद्यमान सत्पुरुष संत श्री प्रसाद महाराज यांच्या नेतृत्वाखाली संस्थानची हि परंपरा सुरु आहे. दोनशे वर्षांची समृद्ध परंपरा असलेला हा रथोत्सव सामाजिक समरसतेचा संदेश देतो. सामाजिक सद्भाव व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेला हा रथोत्सव म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते. उत्सवाच्या काळात अमळनेरात यात्रोत्सव होत असतो. खान्देशातील हि शेवटची यात्रा असते त्यामुळे तिला विशेष असे महत्व आहे. संपूर्ण उत्सवाच्या कालावधीत सुमारे ३ लाख भाविक सहभागी होतात. यावर्षी कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा होत आहे. 

विद्यमान ११ वे सत्पुरुष ह. भ. प. संत श्री प्रसाद महाराज

संत श्री सखाराम महाराज संस्थानचे विद्यमान गादीपती गुरु संत श्री प्रसाद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३२ वर्षे हा उत्सव साजरा केला जातो. या काळात त्यांनी आपल्या कार्यात, परंपरेत पांडुरंगाची एकनिष्ठ सेवा केली असून भाविक भक्तांना आशिर्वादरुपी मायेची उब दिली आहे. त्यांनी आपल्या जीवनात अनेक उत्सव व नवीन रूढी यात अलौकिक भर घातली आहे. श्रीगुरु महाराजांनी वैशाखातील प्रमुख उत्सवातही मौलिक भर घातली असून या उत्सवास आगळेवेगळे प्रसन्नतेचे रुप दिलेले आहे. संस्थानचे नित्यनेम अतिशय काटेकोरपणे पाळणाऱ्या गुरु संत श्री प्रसाद महाराज यांच्या चेहऱ्यावरील शुद्ध , सात्विक भाव व तेज त्यांच्या पांडुरंच्या निस्सीम सेवेचे, तपश्चर्येचे व साधनेचे फळ आहे. वैशाख उत्सवात येणाऱ्या प्रतिष्ठित मंडळींची श्री गुरु महाराज अगत्याने व आस्थेने विचारपूस करतात. संस्थांच्या उत्सवात येथील पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. श्री गुरु महाराजांच्या शिष्यगणांसह खान्देशातील अनेक जातिधर्मचे लोक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होऊन श्री गुरूंचा आशिर्वाद घेऊन पारमार्थिक आनंद घेतात. 

श्री संत सखाराम महाराजांचा वैशाख उत्सव

वैशाख शु. तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला या उत्सवाला सुरुवात होते. या दिवशी बोरी नदीच्या वाळवंटात श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर स्तंभारोहण केले जाते व यात्रेला सुरुवात होते. चतुर्थी ते नवमी या काळात मंडप उभारणे, यात्रेसाठी लागणारे धान्य, सामान इ. ची व्यवस्था केली जाते. वैशाख शु. दशमीला पंढरपूर येथून बेलापूरकर महाराजांच्या दिंडीचे आगमन होते. त्यांच्यासोबत प्रत्यक्ष पांडुरंग अमळनेरात येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. दिंडीचे आगमन होताच स्वतः गुरु माऊली आपल्या शिष्यास आणण्यासाठी जातात. हरि नामाच्या गजरात व श्री संत सखाराम महाराज यांच्या जय घोषात दिंडीचे आगमन होते. गुरु आपल्या शिष्यासह मेण्यात बसून समाधीस्थळी येतात. येथे श्रीसखाराम महाराज, श्री बाळकृष्ण महाराज, श्री प्रल्हाद महाराज व श्री कृष्णा महाराज यांच्या समाधीपुढे अभंग होतात. दिंडी पुढे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येते. तेथे श्री बेलापूरकर सेवेचा अभंग होऊन आरती होते. दिंडी मुक्कामास "पैलाड" येथे श्री संत सखाराम महाराज यांच्या मळ्यात जाते. दिंडीचा सात दिवस येथेच मुक्काम असतो. रात्री श्री विठ्ठल मंदिरात श्री बेलापूरकर महाराजांचे कीर्तन सेवा होते. 

वैशाख शु ११ या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो. वैशाख शु.द्वादशीला सायंकाळी संत श्री प्रसाद महाराजांच्यासमोर खिरापतीचा अभंग होतो व सर्वांना श्री गुरुंच्या हातून खिरापत वाटली जाते. त्रयोदशीच्या दिवशी श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधीला नवस बोलणारी व फेडणारी मंडळी वाजत गाजत येतात. महाराजांच्या समाधीला तोरण बांधतात. नारळ फोडतात. वैशाख शु. चतुर्दशी हा श्री संत सखाराम महाराज यांच्या पुण्यतिथीचा दिवस. या दिवशी गोरगरीब सर्वांना प्रसाद दिला जातो. अन्नछत्र खुले असते. कोणीही उपाशी जाते नाही. भोजन झाल्यावर सर्वांना पुरण व तळलेल्या वड्यांचा प्रसाद वाटला जातो. हा प्रसाद भाविक धन धान्यात ठेवतात. वर्षभर धनधान्याची कमतरता जाणवत अशी भावना आजही दिसून येते. वैशाख शु. पौर्णिमा या दिवशी पालखी सोहोळा असतो. खान्देशातील भाविक भक्त यात सहभागी होतात. सकाळी ७ वाजता मिरवणूक वाडीतून निघते. टाळ, मृदंग यांच्या गजरात बेलापूरकर महाराजांची दिंडी येते. अनेक सेवाधारी ढोल ताशे, भुसावळचा प्रसिद्ध रेल्वे बँड सहभागी होतो. श्रींचे पालखीत श्री लालजींची भरजरी पोशाख व अलंकाराने नटलेली, हातात चांदीची ढाल, तलवार घेतलेली मूर्ती विराजमान असते. "श्री संत सखाराम महाराज कि जय " असा जयघोष करत हि मिरवणूक निघते. पालखीच्या मागे मेणा असतो. त्यात श्री संत सखाराम महाराजांच्या पादुका विराजमान असतात व त्यामागे संत श्री प्रसाद महाराज आपल्या भालदार व चोपदारांसह पायी असतात. वैशाख महिन्यातील भर उन्हाळ्यात, रस्त्यावरील डांबर पाघळलेले असते. श्री गुरुंच्या चरणांकडे पाहिले तर त्यांच्या पायात खडावाही नसतात. दुपारी मिरवणूक वेशीच्या बाहेर पडते. मारुती मंदिरासमोर श्री गुरु येतात अभंग होतो व पालखी पुढे प्रस्थान करते. पुलावरून पळत पळत जावे लागते. पालखी पैलाड पोहोचते व पुढे बोरी नदीच्या पात्रात वाळवंटात येते. येथे हजारो भाविक असतात. सर्वत्र महाराजांचा जयघोष असतो. पालखी समाधी स्थानासमोर येते. तेथे धरणगावकर यांचे अभंगावर निरूपण होते. नंतर श्री सखाराम महाराजांची आरती होऊन मिरवणुकीची सांगता होते. येथे गुलाल उधळला जातो. सर्व मानकऱ्यांना महाराजांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद वाटला जातो व श्री लालजींची मूर्ती वाजत गाजत वाडी मंदिरात आणतात. 

दशमी ते पौर्णिमा या कालावधीत वाडीत व समाधीपुढे भागवत वाचन, भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम अखंडपणे सुरु असतात. त्यासाठी परंपरागत मानकरी ठरलेले असतात. त्यांचे कार्यक्रम त्यांच्या ठरलेल्या वेळीच होतात. वैशाख वाद्य प्रतिपदा हा उत्सवाचा सांगता दिवस. सकाळी १० ते १२ वेळात समाधी मंदिरात श्री बेलापूरकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होते. श्री गुरुंच्या उपस्थितीत सर्वांना काला वाटला जातो व यात्रोत्सवाची सांगता होते. यात्रोत्सवाच्या १५ दिवसाच्या काळात नदीपात्रात विविध पाळणे, खेळण्यांची दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली जातात. यात्रोत्सवाच्या काळात डोळ्यांचे शिबिर, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. शहरातील सर्व डॉक्टर मोफत सेवा देतात. औषधीही मोफत देत असतात,

२०० वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव

वैशाख शु ११ या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो. सायंकाळी ७ वाजता वाडी मंदिरापासून रथोत्सवास सुरुवात होते. दोन लाकडी घोडे व सारथ्य करणारा अर्जुन यांची लाकडी प्रतिमा असेलेले रथ उत्तम प्रकारे सजविला जातो. भरजरी पोशाखात व सुवर्ण अलंकार घातलेली, हाती चांदीचा धनुष्य धारण केलेली श्री. लालजींची मूर्ती रथात ठेवतात. पुजारी दाम्पत्याकडून रथाची विधिवत पूजा होते. रथाच्या पुढे मान्यवर मंडळी, बेलापूरकर महाराजांची दिंडी तसेच श्री गुरु महाराज व त्यांची दिंडी आल्याशिवाय रथ हालत नाही. रथास ओटी लावण्याचा मान आहे. सर्व धर्मांना व जातींना एकत्र करुन हा श्री पांडुरंगाचा रथोत्सव टाळ मृदंगाच्या गजरात, सनई चौघडे यांच्या वाद्यात मार्गक्रमण करतो. प्रदक्षिणा रस्त्यावर भाविक भक्त आरत्या घेऊन बाहेर थांबतात. रथाच्या पाठीमागे मेणा असतो. त्यामध्ये श्री संत सखाराम महाराज यांच्या पादुका असतात व त्यामागे संत श्री प्रसाद महाराज पायी असतात. हि मिरवणूक मारुती मंदिराच्यापुढे  पुलावर थांबते. त्या ठिकाणी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिरणारी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. नंतर रथ पैलाड मार्गे वाळवंटातून सकाळच्या वेळी पुन्हा वाडी चौकात पोहोचतो. तेथे पांडुरंची आरती होऊन रथोत्सवाची सांगता होते. 

महाराष्ट्रात थोर संत परंपरेचा पाया रचणाऱ्या संत सखाराम महाराजांचा रथोत्सव म्हणजे सामाजिक समरसता व सद्भावाचे प्रतीक आहे. रथोत्सवात सर्व जाती बांधवांचा समावेश असतो. गेल्या २००  वर्षांपासून अखंडपणे साजऱ्या होणाऱ्या या रथोत्सवात एकतेचे दर्शन घडत असते. गुण्यागोविंदाने राहण्याचा संदेश रथोत्सवातून दिला जातो.  या रथोत्सवाच्या निमित्ताने सर्व सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येतात. वर्षानुवर्षे परंपरेप्रमाणे प्रत्येक समाजातील व्यक्ती आपापली जबाबदारी पार पाडतो.  त्यामुळेचं हा सोहोळा सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवतो. हा सोहळा पार पाडण्यासाठी शहरातील प्रत्येक समाजावर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. अक्षय्यतृतीयेला स्तंभ व ध्वजारोहण आणि सभामंडप उभारण्यासाठी लाकडी खांबाची आवश्यकता असते. ते वाडीतून बोरी नदीच्या वाळवंटातील श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर आणून टाकण्याची जबाबदारी महाजन-माळी समाजावर आहे. हे साहित्य आणल्यावर मांडव उभारण्याचे काम पाटील समाजाकडे आहे. मांडव उभारल्यावर त्यावर गोणपाट टाकण्याचे काम वाणी समाजाकडे, तर कनात लावण्याचे काम शिंपी समाजाकडे आहे. रथ सजावट - रथ सजावटीचे काम धनगर बांधव, तसेच भालदार-चोपदार करीत असतात. रथावर देव ठेवण्याची व देव पूजेची जबाबदारी देव घराण्याकडे आहे. रथावर दक्षिणा घेण्याची जबाबदारी ब्राह्मण बंगाली समाजाकडे आहे, रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लीम समाजाला दिला जातो. त्यानंतर शहरातून मार्गस्थ होत असलेल्या रथाला ठिकठिकाणी दिशा देण्याचे काम धनगर समाज बांधव करीत असतात. वाटेतच रथाला आक लागला, रस्त्यात रथाचे चाक अडकले तर ते घणाद्वारे यशस्वीपणे काढण्याची जबाबदारी बेलदार समाज पार पाडतो. रथोत्सवाचा मार्ग मशालीद्वारे प्रकाशमान करण्याची जबाबदारी न्हावी बांधवांची असते. लहान रथाची सेवा भोई समाजाकडे आहे. अशा रीतीने सर्व जातीधर्माचा सहभाग असलेला हा सोहळा मोठय़ा हर्षोल्हासात पार पाडला जातो. बारा बलुतेदारांच्या सहभागामुळे सर्वधर्मसमभाव, सामाजिक एकोपा वृद्धिंगत होत असतो. हा उत्सव सर्वसमावेशक असल्याने दरवर्षी मोठय़ा उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 

श्री संत सखाराम महाराजांच्या वैशाख उत्सवाला २५० वर्षांची परंपरा असून रथोत्सवाला २०० वर्षांची वर्षांची परंपरा आहे. हा रथ अतिशय उंच असून, तो मलबार सागाच्या लाकडापासून बनविलेला आहे. संस्थानचे दुसरे गादी पुरुष संत श्री गोविंद महाराज यांनी १८१९ मध्ये रथोत्सवाची परंपरा सुरू केली. त्यावेळी पहिला रथ तयार करण्यात आला होता. त्यानंतर वाडी संस्थानचे गादी पुरुष संत श्री बाळकृष्ण महाराज यांनी नवीन रथ तयार केला. हा रथ मलबार सागाच्या लाकडापासून तयार केलेला आहे. दोन चाकांच्या मधील आख अंजनाच्या लाकडापासून बनविलेले आहे. रथावर श्री गणेश, मारुती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. रथ निघण्याच्या काही दिवस अगोदरच रथाची दुरुस्ती केली जाते. हे काम दरवर्षी होत असते.  या रथाला पूर्वीपासूनच नाड्याने ओढण्याची परंपरा आहे.  गेल्या दोनशे वर्षात रथाच्या  मार्गात एकदाही बदल झालेला नाही. रस्त्यावर दुतर्फा भाविकांना श्रीफळ,केळी, खडीसाखरेचा प्रसाद देण्यात येतो. रस्त्यावर ठिकठिकाणी गुरु श्री प्रसाद महाराजांवर व रथावर पुष्पवृष्टी करण्यात येते. ठिकठिकाणी आरत्याही होतात. वाडी संस्थानातून निघणारा रथ सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशीपूल पैलाडमार्गे वाडीत येतो. पूर्वी पहाटे अडीच-तीन वाजताच रथ वाडीत यायचा. मात्र आता आरत्या वाढल्याने, रथ संस्थानात पोहचण्यास सकाळ उजाडत असते.

विश्व संवाद केंद्राने श्री संत सखाराम महाराजांचा वैशाख उत्सवाची माहिती लेख स्वरुपात लिहिण्याची संधी देऊन संत श्री सखाराम महाराजांची सेवा करण्याचे भाग्य मला दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद !

जय हरी ! रामकृष्ण हरि !!