Sunday 30 April 2023

सामाजिक व धार्मिक एकतेचे प्रतीक असलेला अमळनेरचा रथोत्सव

प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेली अमळनेर नगरी श्री संत सखाराम महाराज यांच्या वास्तव्याने पावन  झाली आहे. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुद्ध एकादशीला अर्थात मोहिनी एकादशीला श्री संत सखाराम महाराजांच्या उत्सवात अमळनेरचा रथोत्सव साजरा केला जातो. श्री संत सखाराम महाराज यांच्या परंपरेतील ११ वे विद्यमान सत्पुरुष संत श्री प्रसाद महाराज यांच्या नेतृत्वाखाली संस्थानची हि परंपरा सुरु आहे. दोनशेहून अधिक वर्षांची समृद्ध परंपरा असलेला हा रथोत्सव सामाजिक समरसतेचा व धार्मिक एकतेचा संदेश देतो. सामाजिक सद्भाव व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेला हा रथोत्सव म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते. उत्सवाच्या काळात अमळनेरात यात्रोत्सव होत असतो. खान्देशातील हि शेवटची यात्रा असते त्यामुळे तिला विशेष असे महत्व आहे. संपूर्ण उत्सवाच्या कालावधीत सुमारे ३ लाख भाविक सहभागी होतात.  

संत श्री सखाराम महाराज संस्थानचे विद्यमान गादीपती सद्गुरु ह.भ.प.संत श्री प्रसाद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३६ वर्षे हा उत्सव साजरा केला जातो. यात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा व त्यासाठी घालून देण्यात आलेले नित्यनेम पाळले जातात. वैशाख उत्सवात येणाऱ्या प्रतिष्ठित मंडळींची श्री गुरु महाराज अगत्याने व आस्थेने विचारपूस करतात. संस्थानच्या उत्सवात येथील पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. श्री गुरु महाराजांच्या शिष्यगणांसह खान्देशातील अनेक जातिधर्मचे लोक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होऊन श्री गुरु महाराजांचा आशीर्वाद घेऊन पारमार्थिक आनंद घेतात. 

वैशाख शु. तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला या उत्सवाला सुरुवात होते. या दिवशी बोरी नदीच्या वाळवंटात श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर स्तंभारोहण केले जाते व यात्रेला सुरुवात होते. वैशाख शु ११ या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो. सायंकाळी ७ वाजता वाडी मंदिरापासून रथोत्सवास सुरुवात होते. दोन लाकडी घोडे व सारथ्य करणारा अर्जुन यांची लाकडी प्रतिमा असेलेले रथ उत्तम प्रकारे सजविला जातो. भरजरी पोशाखात व सुवर्ण अलंकार घातलेली, हाती चांदीचा धनुष्य धारण केलेली श्री. लालजींची मूर्ती रथात ठेवतात. पुजारी दाम्पत्याकडून रथाची विधिवत पूजा होते. रथाच्या पुढे मान्यवर मंडळी, बेलापूरकर महाराजांची दिंडी तसेच श्री गुरु महाराज व त्यांची दिंडी आल्याशिवाय रथ हालत नाही. रथास ओटी लावण्याचा मान आहे. सर्व धर्मांना व जातींना एकत्र करुन हा श्री पांडुरंगाचा रथोत्सव टाळ मृदंगाच्या गजरात, सनई चौघडे यांच्या वाद्यात मार्गक्रमण करतो. प्रदक्षिणा रस्त्यावर भाविक भक्त आरत्या घेऊन बाहेर थांबतात. रथाच्या पाठीमागे मेणा असतो. त्यामध्ये श्री संत सखाराम महाराज यांच्या पादुका असतात व त्यामागे संत श्री प्रसाद महाराज पायी असतात. हि मिरवणूक मारुती मंदिराच्यापुढे  पुलावर थांबते. त्या ठिकाणी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिरणारी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. नंतर रथ पैलाड मार्गे वाळवंटातून सकाळच्या वेळी पुन्हा वाडी चौकात पोहोचतो. तेथे पांडुरंची आरती होऊन रथोत्सवाची सांगता होते. 

महाराष्ट्रात थोर संत परंपरेचा पाया रचणाऱ्या संत सखाराम महाराजांचा रथोत्सव म्हणजे सामाजिक समरसता व सद्भावाचे प्रतीक आहे. रथोत्सवात सर्व जाती बांधवांचा समावेश असतो. गेल्या २००  वर्षांपासून अखंडपणे साजऱ्या होणाऱ्या या रथोत्सवात एकतेचे दर्शन घडत असते. गुण्यागोविंदाने राहण्याचा संदेश रथोत्सवातून दिला जातो.  या रथोत्सवाच्या निमित्ताने सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येतात. वर्षानुवर्षे परंपरेप्रमाणे प्रत्येक समाजातील व्यक्ती आपापली जबाबदारी पार पाडतो.  त्यामुळेचं हा सोहोळा सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवतो. हा सोहळा पार पाडण्यासाठी शहरातील प्रत्येक समाजावर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. अक्षय्यतृतीयेला स्तंभ व ध्वजारोहण आणि सभामंडप उभारण्यासाठी लाकडी खांबाची आवश्यकता असते. ते वाडीतून बोरी नदीच्या वाळवंटातील श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर आणून टाकण्याची जबाबदारी महाजन-माळी समाजावर आहे. 

हे साहित्य आणल्यावर मांडव उभारण्याचे काम पाटील समाजाकडे आहे. मांडव उभारल्यावर त्यावर गोणपाट टाकण्याचे काम वाणी समाजाकडे, तर कनात लावण्याचे काम शिंपी समाजाकडे आहे.  रथ सजावटीचे काम धनगर बांधव, तसेच भालदार-चोपदार करीत असतात. रथावर देव ठेवण्याची व देव पूजेची जबाबदारी देव घराण्याकडे आहे. रथावर दक्षिणा घेण्याची जबाबदारी ब्राह्मण बंगाली समाजाकडे आहे, रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लीम समाजाला दिला जातो. त्यानंतर शहरातून मार्गस्थ होत असलेल्या रथाला ठिकठिकाणी दिशा देण्याचे काम धनगर समाज बांधव करीत असतात. वाटेतच रथाला आक लागला, रस्त्यात रथाचे चाक अडकले तर ते घणाद्वारे यशस्वीपणे काढण्याची जबाबदारी बेलदार समाज पार पाडतो. रथोत्सवाचा मार्ग मशालीद्वारे प्रकाशमान करण्याची जबाबदारी न्हावी बांधवांची असते. लहान रथाची सेवा भोई समाजाकडे आहे. अशा रीतीने सर्व जातीधर्माचा सहभाग असलेला हा सोहळा मोठय़ा हर्षोल्हासात पार पाडला जातो. बारा बलुतेदारांच्या सहभागामुळे सर्वधर्मसमभाव, सामाजिक एकोपा वृद्धिंगत होत असतो. हा उत्सव सर्वसमावेशक असल्याने दरवर्षी मोठय़ा उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 

रथोत्सवातील रथ अतिशय उंच असून, तो मलबार सागाच्या लाकडापासून बनविलेला आहे. संस्थानचे दुसरे गादी पुरुष संत श्री गोविंद महाराज यांनी १८१९ मध्ये रथोत्सवाची परंपरा सुरू केली. त्यावेळी पहिला रथ तयार करण्यात आला होता. त्यानंतर वाडी संस्थानचे गादी पुरुष संत श्री बाळकृष्ण महाराज यांनी नवीन रथ तयार केला. हा रथ मलबार सागाच्या लाकडापासून तयार केलेला आहे. दोन चाकांच्या मधील आख अंजनाच्या लाकडापासून बनविलेले आहे. रथावर श्री गणेश, मारुती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. रथ निघण्याच्या काही दिवस अगोदरच रथाची दुरुस्ती केली जाते. हे काम दरवर्षी होत असते.  या रथाला पूर्वीपासूनच नाड्याने ओढण्याची परंपरा आहे.  गेल्या दोनशे वर्षात रथाच्या  मार्गात एकदाही बदल झालेला नाही. रस्त्यावर दुतर्फा भाविकांना श्रीफळ, केळी, खडीसाखरेचा प्रसाद देण्यात येतो. रस्त्यावर ठिकठिकाणी गुरु श्री प्रसाद महाराजांवर व रथावर पुष्पवृष्टी करण्यात येते. ठिकठिकाणी आरत्याही होतात. वाडी संस्थानातून निघणारा रथ सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशीपूल पैलाडमार्गे वाडीत येतो. पूर्वी पहाटे अडीच-तीन वाजताच रथ वाडीत यायचा. मात्र आता आरत्या वाढल्याने, रथ संस्थानात पोहचण्यास सकाळ उजाडत असते.

जय हरी ! रामकृष्ण हरि !!

Sunday 16 April 2023

उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा : आत्मिक समाधान देणारा अनुभव !

नर्मदे हर हर |

त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे,,,

शनिवार, दि. ८ एप्रिल २०२३ ! या दिवशी नर्मदा मैय्याने उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करवून घेतली. जानेवारी महिन्यात सौ. आदितीने १५ दिवसांची बसने नर्मदा परिक्रमा केली. तेव्हापासून मनात इच्छा होती आपणही नर्मदा परिक्रमा करावी. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ऐकून होतो. त्याबद्दलची माहिती गोळा केली आणि सहकारी डॉ. अश्विन झाला, डॉ. निर्मला झाला व नीर झाला या झाला परिवारासह दि. ८ एप्रिल रोजी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्याचे निश्चित झाले. हभप दादा महाराज जोशी व हभप मंगेश महाराज जोशी यांच्या आशीर्वादाने योजल्याप्रमाणे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली आणि पुढील वर्षीही करण्याचे मनात ठरविले. 

शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता तयारी करून प्रथम चोपडा तालुक्यातील खाऱ्यापाडाव या आदिवासी पाड्यावर गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित मुलींसाठीच्या व्यक्तिमत्व शिबिराचे उदघाटन केले, मूल्यशिक्षण विषयावरील एक सत्र घेतले. त्यानंतर भोजन आटोपून दुपारी ३ वाजेच्या सुमारास उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी गुजराथेतील तिलकवाडाकडे मार्गस्थ झालो. मध्यप्रदेशातील बडवानी मार्गे रात्री १० वाजता तिलकवाडा येथील वासुदेव कुटीर आश्रमात पोहोचलो. महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही अनेक भाविक आलेले असल्याने निवासासाठी सोय होणे शक्य होणार नाही याची जाणीव असल्याने सोबत आणलेला तंबू नर्मदा मैय्याच्या किनारी ठोकला आणि त्यात राहिलो. साधारण तासाभरानंतर आकाशात ढग गोळा झाले. त्यांचा गडगडाट सुरु झाला आणि मागोमाग पाऊसही...
एका बाजूला मनात भीती आणि दुसऱ्या बाजूला नर्मदा मैय्या सर्व व्यवस्थित करेल हि आशा ! पाऊस केव्हा थांबला आणि झोप केव्हा लागली काही कळले नाही. सकाळी उठून परत वासुदेव कुटीर आश्रमात आलो. सकाळचे विधी व आंघोळ वगैरे आटोपले. समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मारुतीचे दर्शन घेतले. वासुदेवानंद टेंबे स्वामींनी ज्या ठिकाणी परिक्रमेदरम्यान दोन वेळेस ज्या ठिकाणी चातुर्मास पाळला त्या आश्रमाला भेट दिली. तेथे जळगावातील सेवाव्रती श्री. योगेश्वर जोशी यांची भेट झाली. त्यांनी परिक्रमेचा संकल्प सांगितला तसेच माहिती दिली. सकाळी ७.३० वाजता सुरु केलेली परिक्रमा दुपारी ३.३० वाजता संपन्न झाली.मार्गावरील प्रत्येक महादेव मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मारुती व श्री गणेशाच्या मूर्ती लक्ष वेधून घेत होत्या. त्यानंतर आम्ही गरुडेश्वर येथे पोहोचलो. तेथे पुन्हा एकदा नर्मदा स्नान केले. त्यानंतर दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. वासुदेवानंद टेंबे स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले. तेथे आलेल्या भाविकांसोबत दत्ताची भजने व आरती म्हटली. त्यानंतर प्रसाद घेतला. पुन्हा एकदा मंदिर परिसरात नर्मदेच्या बाजूच्या भागात तंबू टाकला आणि झोपी गेलो. सकाळी लवकर उठून सर्व आवरुन अल्पोपहार वगैरे करून ९ च्या सुमारास राजपिपला येथून परतीचा प्रवास सुरु झाला. डेडियापाडा, अक्कलकुवा, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा व अमळनेर मार्गे सायंकाळी ५.४० वाजता सुखरूप घरी पोहोचलो. 

संपूर्ण प्रवासात अनेक गोष्टींचा अनुभव आला. आत्मिकदृष्ट्या समाधान देणारी हि परिक्रमा अनेक गोष्टी शिकवून गेली. रात्री वासुदेव कुटीर आश्रमात मराठी बोलणारी एक व्यक्ती भेटली. चौकशी केली असता जळगावातील भुसावळ जवळील खंडाळा-मोंढाळा येथील असल्याचे कळले. आमच्या धानोरा या गावाजवळील सुमारे ३५ माताभगिनींना उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी ते घेऊन आले होते. महाराष्ट्रातील भाविकांची संख्या लक्षणीय होती. संपूर्ण रात्रभर दक्षिण तटावरून उत्तर तटावर येण्यासाठीची बोट सुरु होती. परिक्रमावासी अखंडपणे चालत होते. ज्यांच्या परिक्रमा पूर्ण झाली त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आमचा उत्साह वाढविणारे होते. मार्गात प्रत्येक ठिकाणी चहा, अल्पोपहार, प्रसाद, ताक, फळे यांची व्यवस्था होती. हि सेवा स्थानिकांकडून निःशुल्क व आग्रहाने पुरविली जात होती. नर्मदे हर हरचा जयघोष अखंडपणे सुरु होता. परिक्रमावासीयांचे वयाचे बंधन नव्हते. अगदी ३-४ वर्षांच्या बालकांपासून ८० वर्षांच्या आजी-आजोबांचा यात सहभाग होता. कोणी विना चपलेने परिक्रमा करीत होते तर कोणाचे सलग १५ वे वर्ष होते. कोणी सलग ३ दिवस परिक्रमा करण्याचा संकल्प केला होता. मानवी जीवनात श्रद्धेला किती महत्त्व आहे याचा अनुभव पदोपदी येत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे समाधान दिसत होते. संपूर्ण नर्मदा परिक्रमेत खटकणारी एकमेव गोष्ट म्हणजे वाढता प्लास्टिकचा वापर आणि त्यामुळे सर्वत्र असलेला कचरा अगदी नर्मदा मैय्याच्या किनारीही ! अनेकदा सांगूनही मंडळी त्याला टाळू शकत नव्हते हि दुर्दैवाने शोकांतिका म्हणावी लागेल. 

सकाळी साडेसात वाजता वासुदेव कुटीर आश्रम येथून उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेस सुरुवात केली.  तेथून पुढे गेल्यावर नर्मदा माता मंदिरात जाऊन नर्मदा मातेचे दर्शन घेतले. नर्मदे हरचा गजर करीत मार्गक्रमण सुरू केले जवळच रामेश्वर महादेव मंदिर, गौतमेश्वर महादेव मंदिर, तिळकेश्वर महादेव मंदिरांमध्ये दर्शन करून पुढील प्रवास सुरु झाला. काही अंतरावर आल्यावर मणीनागेश्वर मंदिर लागले येथे सर्व परिक्रमावासी साठी श्रमपरिहारार्थ थंड पाणी, चहा या अल्पोपहार यांची सेवा चालू होती. काही भक्त मंडळी गीतांवर ठेका धरून नाचत होती. नागेश्वर मंदिर खूपच सुंदर पुरातन आहे येथे दर्शन घेऊन पुन्हा मार्गक्रमण सुरू झाले. सकाळचे रम्य वातावरण परिक्रमेची ओढ या सर्वांमध्ये उत्साहाने मार्गक्रमण सुरू होते. वाटेत कपिलेश्वर मंदिरात दर्शन घेऊन नर्मदा मैयाच्या अगदी जवळ पात्रात उतरून रामपुरा येथे जाण्यासाठी वाटचाल सुरू केली. एका बाजूने वाहणारी नर्मदा मैया , दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी केळी व कापसाचे शेती काही ठिकाणी पुढे गेल्यावर घनदाट झाडी आणि त्याच्या मधून जाणारा अरुंद खडकाळ रस्ता अशी आमची मार्गक्रमणा चालू होती. मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे लागली जागोजागी नर्मदे हर नर्मदे हर असे म्हणून परिक्रमावासींचे स्वागत होत होते त्यांचे प्रेमपूर्वक स्वागत बघून आनंदाने प्रसन्न वाटत होते तसेच त्यांची परिक्रमावासींसाठीची सेवा बघून मन भारावून जात होते. नर्मदा मैंयेच्या पात्रातून जात असताना अनेक छोटी छोटी मुले , मुली नर्मदे हर म्हणून आपल्याला प्रोत्साहन देतच असतात त्या छोट्या मुलांना खाऊ किंवा पैसे दिल्यास ते आणखी उत्साहाने नर्मदे हर चा गजर करतात. तेथे बसलेल्या मुलींना दान देण्याची प्रथा आहे. छोट्या मुली या नर्मदेचे स्वरूप मानल्या जातात.

या सर्वांचा आनंद घेत आम्ही पुढे पुढे जात होतो .वाटेत नंदीची दगडी भव्य मूर्ती पहावयास मिळाली. या प्रतिकृती चे पितळी नंदी मध्ये रूपांतर करण्यात येणार असून त्यासाठी 51 हजार किलो पितळेचा वापर करण्यात येणार आहे. पुढे रामपुरा येथे जाण्यासाठी होडीतून नर्मदा ओलांडून रामपुरा घाटावर गेलो. रामपुरा घाट स्वच्छ असून तेथे स्नानासाठी नदीमध्ये दोरी बांधून व्यवस्था केली आहे. येथे आम्ही सर्वांनी नर्मदा मैयाला नमस्कार करून तिच्या स्वच्छ पाण्यात स्नान करण्याचा आनंद घेतला , सर्वजण आनंदाने  डुंबत होते . काही वेळानंतर स्नान आटोपून आम्ही पुढे निघालो. रामपुरा घाटावर तीर्थेश्वर महादेव मंदिर तसेच श्रीकृष्ण मंदिर व हरसिद्धी माता मंदिर येथे दर्शन घेतले. दुपारचा महाप्रसाद येथेच घेतला, थोडी विश्रांती घेतली. नंतर दक्षिण  तटाचा प्रवास सुरू झाला. दक्षिण तट मार्ग बहुतांश डांबरी सडक आहे. वाटेत मांगरोल नावाचे एक छोटे गाव लागले. गावातील लोकानी मिळून  मोठ्या मंडपात परिक्रमावासींच्या विश्रामासाठी खुर्च्या व गाद्यांची व्यवस्था केली होती.  येथे देखील महादेवाचे सुंदर मंदिर आहे. तिथून पुढे आम्ही नर्मदे हर चा गजर वाटचाल करत होतो. येथे तपोवन आश्रम लागला या आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी अत्यंत मधुर थंडगार ताक सेवा देतात. येथे पोहोचेपर्यंत ऊन्हाची सुरुवात झाली असल्यामुळे ही सेवा घेताना खूप चांगले वाटत होते. तपोवन आश्रमाचा परिसर अत्यंत सुंदर रमणीय असा आहे येथून नर्मदा मैयाचे खूप छान दर्शन झाले. येथून पुढे वाटचाल करत असताना सर्वात शेवटी लागल तो श्रीसिताराम बाबांचा आश्रम. या आश्रमाचा परिसर देखील फार सुंदर व रमणीय आहे. येथे देखील प्रसाद घेण्याचा खूप आग्रह चालू होता. प्रसाद म्हणून तेथे देण्यात आलेले ताक घेऊन नदीच्या पात्रात उतरून पुढील वाटचाल सुरू केली. परिक्रमेस सुरुवात केल्यापासून रामपूरा पर्यंत सहज वाटणारी परिक्रमा आता खडतर वाटेवरून सुरू होते. नदीच्या पात्रातील गोटे , मैयाचा कमी झालेला प्रवाह आणि वरून तापणारे ऊन यासह आम्ही पुढील वाटचाल सुरू केली. दुपारचे अडीच वाजले असून देखील रणरणतं उन जाणवत होते.  

सीताराम बाबांच्या आश्रमापासून मैयेच्या पात्रात उतरून वासुदेव कुटीर पर्यंत जाणारा हा छोटा प्रवास मोठी परिक्रमा करतात ती किती खडतर असेल याचा अनुभव देऊन गेला. नर्मदे हर म्हणत, मैयाचे नाव घेत घेत हा खडतर प्रवास करत आम्ही नदीचे पात्र ओलांडून पुढे एका छोट्या डोंगराजवळ पोहोचलो. डोंगराचा मार्ग हा उंच खड्या पायऱ्या असलेला होता हा डोंगर चढणे ही एक परीक्षा होती. ही परीक्षा पास झाल्यावर मात्र आम्ही आनंदाच्या परमोच्च शिखरावर पोहोचलो. आम्ही वासुदेव कुटीर येथे पोहोचलो होतो याचाच अर्थ नर्मदा मैय्येने आमची परिक्रमा पूर्ण करून घेतली होती. अशी ही साधारण २१ किलोमीटरची परिक्रमा आहे.  काही ठिकाणी वाट बिकट आहे. पण कसलाही त्रास न होता आम्ही परिक्रमा पूर्ण
केली. परिक्रमा मार्गात प्रत्येक ठिकाणी सेवाधारी "नर्मदे हर बाबाजी चाय पिओ, माताजी भोजनप्रसादी पाओ' असे आग्रहपूर्वक विनंती करतात. परिक्रमावासीबद्दलचा आदर पाहून आपण आश्‍चर्यचकित होतो. किनाऱ्यावरून सकाळी परिक्रमेला जाताना मंदिरात होणारा घंटानाद, जागोजागी आश्रमात होणारे स्वागत, छोट्या गावांतून जाताना तटावरची संस्कृती पाहता नर्मदामैयाच्या सान्निध्यात आपली परिक्रमा कधी पूर्ण झाली समजलेच नाही. या परिक्रमेत पवित्र नर्मदामैयाचे स्नान घडले. 

चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केल्यास आपल्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमेचे पुण्य लाभते असे म्हणतात. हे खरे असेलही परंत मला या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेमुळे एकदा आपण संपूर्ण नर्मदा परिक्रमा पायी करावी अशी इच्छा झाली. आता हि इच्छाही नर्मदा मैय्या पूर्ण करेल अशी खात्री वाटते. नर्मदा काठावरील परिसर अतिशय समृद्ध असून येथील लोकांना त्याची कृतज्ञतापूर्वक जाणीव असल्याचे लक्षात येते. अनेक गोष्टी सहजपणाने येथे शिकावयास मिळाल्या याचा मनापासून आनंद आहे. 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Tuesday 11 April 2023

प्रभू रे खेळ तुझा न्यारा !


मागील शुक्रवारी ( दि. ७ एप्रिल ) सकाळी ५.१५ ला बाबांचा (सुनील) फोन आला होता. मी उठल्यावर पाहिला आणि त्यांना फोन लावला. "काय म्हणता बाबा ?" 

"... गिरीशभाऊ भेट राहून गेली !" 

"कोणाची ?"

"भाऊ... दादा गेले !"

मी मोठ्याने ओरडलोच "काय ?"

"रात्री दादांना अडीच वाजता सीव्हीयर हार्ट अटॅक आला... आणि संपलं."

पुढे काहीही न बोलता फोन कट केला. घरात आई व सौ. आदितीला सांगितले. त्यांनाही धक्काच बसला. आदल्या दिवशी पौर्णिमेच्या कुळधर्माच्या निमित्ताने सौ. ना याज्ञीकांकडे सवाष्ण म्हणून बोलावले होते. छान बोलणे झालेलं. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशीच चि. प्रथमेशचा वाढदिवस असल्याने त्याची आठवणही याज्ञीक दादांनी काढली. फोन लावला मात्र बोलणे झाले नाही. जे नंतर रात्री झाले होते. दादांनी सौंना निरोप दिला होता संक्रांतीपासून गिरीशभाऊंची भेट नाही. बोलवले आहे सांगशील. त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत बाबांच्या घरी आम्ही बसलो होतो. तेथेही सर्व गप्पा झाल्या. आणि सकाळी असा निरोप... बलीयसी केवलमीश्वरेच्छा॥ अर्थात प्रभू रे खेळ तुझा न्यारा...

... ती भेट राहिली !

तशी माझी आणि दादांची वरचेवर भेट होत असे. फोनवर बोलणेही होत असे. दसरा आणि संक्रांतीचा नमस्कार चुकला नाही. दादांचा रात्री उशिरा आशीर्वाद घेणारा मी आणि माझी वाट पाहणारे दादा !  कधी वाट पाहून दादा त्यांच्या खोलीत गेलेले असायचे. यावेळी संक्रांतीनंतर दादांचे दोन वेळा फोन आलेला... २२ मार्चचा शेवटचा फोन... विषय तसे सामान्यच पण आपलेपणाचे... परिवार, करिअर, व्यवसाय चौकशी... केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक... कधी वारीचे प्रकाशित केलेले पुस्तक तर कधी रोटरीचे इतिहास सांगणारे पुस्तक... आई, घर, गाव, शेती, मुले, बंधू, धुळे येथील हालहवाल इ. यांची चौकशी... कधी ऋषीच्या करिअरबद्दल तर कधी त्याच्या अल्लडपणाबद्दल... मनमोकळ्या गप्पा... त्यातून काही मार्गदर्शन तर काही जाणून घेण्याची इच्छा ! 

मोकळं होण्याची हमखास जागा म्हणजे दादा... वैयक्तिक, सार्वजनिक सर्वच विषय सहज बोलले जात. एका बाजूला काळजी तर दुसऱ्या बाजूला अभिमान ! तास - दीड तास कुठे निघून जायचा कळायचे नाही. आता केवळ आठवणी आणि राहिलेल्या त्या भेटीबद्दलची मनातील खंत. मला, माझ्या कामाच्या स्वरुपाला समजून घेणारे दादा... यावेळी समजून घेतील का ? मनातील घालमेल आणि तळमळ कशी शांत करावी हा माझा मलाच पडलेला प्रश्न... उत्तर नसलेला ! 

नातेसंबंधापलीकडील नाते जपणारे दादा ! 

अलीकडे कुटुंबाशिवाय अन्य ठिकाणी फारसे बाहेर न जाणाऱ्या दादांनी आपला गोतावळा आणि त्यांचे संबंध इतक्या अफलातून आणि पवित्र अश्या नात्याने बांधून ठेवले होते कि त्याला कोणतीही उपमा वा अलंकार देता येणार नाही. कुटुंब, परिवार आणि समाजामधील स्नेहीजनांसाठीचा एक सेतुबंध त्यांनी निर्माण केला होता. त्याला त्यांनी कधी तडा जाऊ दिला नाही वा ओरखडाही पडू दिला नाही. शुभेच्छारुपी आशीर्वादाच्या धाग्याने त्यांनी ऋणानुबंधाचे वस्त्र घट्ट विणले होते. ते कधी जीर्ण होऊ दिले नाही वा फाटूही दिले नाही. त्यामुळे दादांच्या संपर्कात आलेला प्रत्येक व्यक्ती त्यांच्या स्नेहबंधनात अडकल्याशिवाय राहिला नाही. 

आधारवड दादा ! 

याच शीर्षकाचा एक लेख ११ सप्टेम्बर २०२२ रोजी लिहिला होता. त्याची लिंक येथे देत आहे. https://rb.gy/u7jmc विषयाची पुनरावृत्ती टाळून ते कसे आधारवड ठरले हे समजून घेऊ. दादांचा अमृत महोत्सव, सहस्रचंद्र दर्शन व अंतिम यात्रा मानवी श्रीमंतीचा आदर्श नमुनाच ! माणसे त्यांच्या भेटीसाठी आतुर असायचे. ७५ वर्षांचे मैत्रीसंबंध त्यांनी जपले. यासर्वांच्या मुळाशी असलेली संवेदना समजून घेतली पाहिजे. निर्हेतुक, निर्व्याज, निरपेक्ष, निरलस प्रेम कसं करावं याचा वस्तुपाठ त्यांनी आपल्या कृतिशील जीवनातून घालून दिला. हि सर्व आपली माणसे आहेत, आपण त्यांचे पालकत्व स्वीकारले पाहिजे, आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना समजावलं पाहिजे, आपण त्यांना मार्ग दाखवला पाहिजे हि नैतिक जबाबदारी त्यांनी स्वतःहून स्वीकारली होती आणि ती आयुष्यभर जपली. कधी कोणावर रागावले नाही, चिडले नाही, ओरडले नाही, अबोला नाही... जीवनाचा एकच उद्देश बंधुत्वाचा फिरवित चरखा, एकत्वाचे सूत्र धरु या, धागा धागा अखंड विणूया... या उक्ती सार्थ करणारा स्वभाव त्यांनी शेवटपर्यंत जोपासला. स्वाभाविकपणे त्यांनी जोडलेल्या या माणसांसाठी ते आधारवड ठरले. 

कर्तव्याने घडतो माणूस...

प्रत्येक माणसामध्ये उपजत अशी सेवावृत्ती असते. इतरांच्या विकासात आपलाही हातभार लागावा, त्यासाठी आवश्यक असलेली मदत मग ती आर्थिक असो अथवा नसो, समस्याग्रस्त व्यक्तीला दिलेला मानसिक, बौद्धिक व भावनिक आधार हि देखील सेवाच होय. याज्ञीक दादांनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजातील विविध घटकांची सेवा केली असे आपल्याला नक्की म्हणता येईल. नोकरी मध्ये नोकरदारांची संघटना असो वा ब्राह्मण सभा, दादांनी समर्थ असे नेतृत्व दिले. इतरांना आपलेसे करून त्याला सेवेसाठी प्रवृत्त करण्यात त्यांचा हातखंडा होता. अगदी समाजातील बांधवांना त्यांच्या कुटुंबातील विवाह जुळवत असतांना अनेकदा धोका पत्करत त्यांनी आश्वासक शब्द दिला आणि अनेकांच्या घरात मंगल कार्ये घडवून आणली. आमच्या परिवारातही (आमच्या चुलत बहिणीच्या विवाहासाठी) असेच मंगल कार्यात त्यांनी घेतलेला पुढाकार कधीही विसरता येणार नाही. नेतृत्वाची / मानाची पदे भूषवित असतांना त्याचा लोभ न करता कुठे थांबायचे याची त्यांना जाणीव होती. ब्राह्मण सभेतील पदाधिकाऱ्यांच्या व सहकाऱ्यांच्या आग्रहाला बळी न पडत त्यांनी दुसरी टर्म न घेता इतरांनाही संधी दिली पाहिजे असा आग्रह धरला. त्यामुळेच दादांना अनेक सन्मित्र लाभलेले व त्यांच्या सोबत अनेक कार्ये पूर्णत्वास नेलीत. कर्तृत्वाला कृतज्ञतेची जोड देत केलेले कार्य माणसाला कृतार्थतेचा अनुभव देतात आणि त्यातूनच माणूस समाधानी व आनंदी होत असतो. याज्ञीक दादांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात असे समाधान लाभल्याचे आपण अनुभवले असेल.  

याज्ञीक दादा असो वा आमचे पिताश्री दादा असो... ते पुण्यात्माच होते असे मला वाटते. त्यांना आलेलं मरण हे शोक करण्यासाठी नाही तर त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन कार्य करण्याचा संदेश देणारे आहे. असं चटकन आलेलं मरण धक्का देणारं असतं मात्र त्याला स्वीकारणं हे आपलं काम आहे. कारण प्रत्येकाला एक दिवस जायचे आहे हे नक्की... वेळ हि नक्की... माहिती नसलेली ! दवाखाना नाही, अंथरुणात खिळून पडणं नाही, इतरांना आपल्यामुळे त्रास नाही, इतरांवर अवलंबून राहणं नाही यासारखं दुसरं चांगलं मरण असू शकत नाही. याज्ञीक दादांच्या निधनातून आपण एक संदेश नक्की घेतला पाहिजे. आजचा दिवस आनंदाने जगा. त्यासाठी भौतिक साधनांपेक्षाही माणूस अधिक महत्वाचा ठरतो. माणसे जोडली पाहिजेत, सांभाळली पाहिजेत, उभी केली पाहिजेत आणि असं करुनही आपल्या बोलण्यात "मी केलं" येऊ देऊ नये. ज्यांना जोडलं, सांभाळलं वा उभं केलं त्यांनी ते म्हटलं तर म्हणू दे... नाही तर नाही ! कारण हि सर्व त्या जगनियंत्याची रचना आहे. मीच घडवितो मीच मोडितो उमज आता परमार्था... कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था !

ति. याज्ञीक दादांच्या पवित्र आत्म्यास परमेश्वर सद्गती देईलच, त्यानेच हे दुःख सहन करण्याचे बळ याज्ञीक परिवारासह दादांच्या गोतावळ्यातील स्नेहीजनांना देवो हीच प्रार्थना ! ति. याज्ञीक दादांचा समृद्ध असा वारसा आपण पुढे नेऊ या हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.  ॐ शांती, शांती, शांती !


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४