Monday 2 May 2022

खान्देशाची आखाजी : एक समृद्ध परंपरा !

भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांची परंपरा आहे. या सर्व सण-उत्सवांचे महत्व हे मानवी संबंध दृढ करणारे असून त्यामागे कुटुंब व्यवस्था बळकट करणे हा मुख्य उद्देश आहे. हे सण केवळ उत्सव नव्हे तर त्यात जीवन समृद्ध करणाऱ्या प्रत्येकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची धारणा आहे. समाजातील प्रत्येक घटकाची हे सण उत्सव गाव, भाषा, प्रांतानुसार साजरे करण्याची आगळीवेगळी परंपरा आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही या गोष्टींचे महत्व अबाधित आहे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. हळव्या व संवेदनशील मनाच्या मातृशक्तीसाठी मानसिक व भावनिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा अक्षय्य तृतीया अर्थात खान्देशातील आखाजी या सणाबद्दल जाणून घेऊ या ! 

आखाजीचा आखाजीचा 
मोलाचा सन देखा जी 
निंबावरी निंबावरी
बांधला छान झोका जी ।

खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या या गीतांमधून खान्देशातील आखाजी या सणाची महती सहजपणाने मांडली आहे. खान्देशची बोली, सण, उत्सव, चालीरीती या बाबी आपले स्वतंत्र सांस्कृतिक वैशिष्टय़ जपून आहे असे आपल्या या सणावरून नक्कीच लक्षात येईल. वैशाख शु. तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया या दिवशी हा सण साजरा केला जातो. अंगाची काहिली व जीवाची लाही लाही होत असणाऱ्या या कालखंडात हा सण स्त्रिया मोठ्या उत्साहानं साजरा करतात. खान्देशात हा सण आखाजी या नावाने विशेषत्वाने साजरा केला जातो. सासरी गेलेल्या स्त्रीया या सणाच्या निमित्ताने आपल्या माहेराला येत असतात. माहेरवाशिणीचं गाव शिवारातील प्रत्येक कुटुंबाला विशेष कौतुक असतं. पारिवारिक संबंधातील नातेवाईकांसह तिच्या शालेय जीवनातील सख्या यानिमित्ताने भेटत असतात. मानवाला आपल्या भूतकाळातील जीवनाबद्दल कायम ओढ असते. भूतकाळातील जीवन समृद्ध करणाऱ्या आठवणींमध्ये रमायला त्याला आवडते. जीवनाची आशा कायम जिवंत ठेवणाऱ्या या आठवणी असतात. बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे या सणाच्या निमित्ताने शेतात वा शिवारातील निंबाच्या झाडाला झोके बांधलेले असतात. स्त्रीच्या भावनिक आंदोलनाचे प्रतीक असलेल्या झोक्याच्या माध्यमातून बहिणाबाईंनी हा सण कसा साजरा केला जातो याचे चित्र उभे केले आहे. 
खान्देशातील ग्रामीण भागात साजरा केला जाणारा हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून समजला जातो. दूर देशी गेलेल्या मुलं-मुली आपल्या संपूर्ण परिवारासह आवर्जून या दिवशी गावाकडे येत असतात. बहुतांश वेळेस मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागलेली असल्याने सर्वच जण या सणाची मजा लुटण्यासाठी आलेले असतात. शहरी व ग्रामीण भागाची नाळ कायम जुळवून ठेवण्याची ताकद या सणांमध्ये आपल्याला दिसते. तसेच आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी "आगारी" (घास) टाकण्याची प्रथा आहे. या सणाच्या दिवशी शंकर व गौराईचे पूजन केले जाते. साधारणपणे मराठी कुटुंबामध्ये चैत्र गौरीची एक वेगळी परंपरा आहे. सुवासिनींचा असलेला हा सण आहे. ग्रामीण भागात अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने या गौरीची मांडणी केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी कोणतेही शुभ कार्य सुरु करता येते. त्याला स्वतंत्र मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. अशा या पवित्र दिवशी केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, देवांच्या आणि पितरांच्या नावाने केलेले कोणतेही कर्म अक्षय किंवा अविनाशी होते, असे मानले जाते.

आखाजीला खान्देशात घरोघरी घागर भरली जाते. एका मोठ्या माठात (केशरी रंगाची घागर) पाणी भरून त्यावर छोटेसं मातीचे (लोटा) भांडं ठेवले जाते. त्यावर खरबुज, सांजोऱ्या, दोन आंबे ठेवतात. सण झाल्यानंतर नवीन माठ घरामध्ये वापरला जातो. पितरांचे श्राद्ध/ तर्पणविधी केला जातो. पुर्वजांचं स्मरण करुन एकेकाचे नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिलं जातं. दुपारी त्यांना घास टाकला जातो याला आगारी टाकणे असेही म्हटले जाते. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई याचा नैवेद्य दाखविला जातो तसेच पित्तर म्हणून एका व्यक्तीला जेवणासाठी आमंत्रित केले जाते त्यांच्या जेवणानंतर घरातील सर्वं लोग जेवण करतात. पितरांना आखाजीच्या दिवशी आमरसाचा नैवेद्य दिल्यानंतरच बऱ्याच परिवारामध्ये आंबे खायला सुरूवात करतात आजही अशी अनेक परिवारांमध्ये ही पद्धत सुरू आहे.  

रब्बी पिकाचा हंगाम शेतकऱ्यांच्या घरात आलेला असतो. खरिपाच्या पेरणीच्या दृष्टीने शेतं तयार करण्याची लगबग लगेचच सुरु होणार असल्याने त्याची पूर्व तयारी करण्याचा हा दिवस असतो. शेत जमीनाचा पोत चांगला रहावा म्हणून नांगरणी केलेली असते कारण उन्हामुळे जमिन चांगलीच भाजलेली असते त्यातील काडी कचरा वेचून जाळला जातो, शेतांची बांध-बंदिस्ती केली जाते. थोडक्यात शेतीची मशागतीची कामे लवकरच सुरु होणार असतात. वर्षभर घरच्या दूध-दुभत्यांसह, जनावरे व शेती कामांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सालदारांचा हिशोब या दिवशी केला जातो व नवीन वर्षासाठीच्या आगाऊ सालदाराची निश्चितीही याच दिवशी केली जाते. त्याला नवीन कपडे दिले जातात. नवीन वर्षासाठी काही आगाऊ रक्कमही दिली जाते. एक प्रकारे शेतमजुरांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणता येईल. सालदाराने आपल्या पूर्वीच्या मालकाकडे काम सुरु ठेवायचे का अन्य कोणाकडे जायचे याचे स्वातंत्र्य त्याला असते. त्यांचा वर्षभर द्यावयाचा मेहनतांना अन्य गोष्टी या दिवशीच ठरविल्या जातात. रोख रकमेसह शेतीतून येणाऱ्या शेतमालाचा काही वाटा त्याला देण्याचे यात निश्चित होत असते.या दिवशी शेतीची कामे बंद असली तरी आगामी काळातील शेती कामाच्या नियोजनाची तयारी सुरु असते. अलीकडच्या काळात खेड्यांमध्ये पत्ते व जुगार खेळण्याचे प्रमाणही वाढलेले आपल्याला दिसते. 

सण म्हटल्यानंतर खानपानाची एक विशेष रेलचेल आपल्याला अनुभवास येते. आखाजीच्या सणाच्या निमित्ताने माहेरवाशीण व पै-पाहुणे घरी येणार असल्याने दिवाळीप्रमाणेच फराळाचे पदार्थ बनविले जातात. त्यामुळे काही ठिकाणी आखाजीला खान्देशातील दिवाळी असेही म्हटले जाते. खापरावरची पुरणपोळी, सांजोरी, करंजी, आंब्याचा रस, कुरडया, पापड यांचा विशेष बेत केला जातो. सहभोजनाचा व ग्रामीण पद्धतीने घरातीलच महिला वर्गाने बनविलेल्या या पदार्थांची चव खासच असते. 

झाडाला बांधलेल्या झोक्यांसह विविध पारंपरिक खेळ आणि गाण्यांच्या माध्यमातून माहेरवाशिणी आपलं मन रिझवत असतात. प्रत्येक विवाहित स्त्री या दिवशी सणानिमित्ताने माहेरी आलेली असल्याने ती झोके खेळायला, गाणी गायला, झिम्मा-फुगडी खेळायला पूर्ण मुक्त असतात. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरु असतो. खान्देशी लहेजामध्ये विशेष गाणी गायली जातात. त्यांना विशेष असा गोडवा असतो. त्या नरम विनोद असतो, मार्मिक टिपण्णी असते. सासरचे सुखदुःख, आलेले अनुभव व पारंपारीक गाण्यांचा यात समावेश असतो. अलीकडच्या काळात या सणातील काही अनिष्ट रूढी व परंपरा बंद झालेल्या आपण पाहू शकतो. विशेषतः गौराई विसर्जनासाठी आलेल्या माता भगिनी नदीच्या पलीकडच्या तीरावरील महिलांना दगड मारतात किंवा शिव्या देतात या गोष्टी आता फारशा कुठे दिसत नाहीत. शिक्षण, यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण, संगणक, दूरदर्शन, मोबाइल यामुळे मानवी जीवन पार बदलून गेले आहे. त्यात बाराही महिने खाण्याचे सर्व पदार्थ रेडिमेड मिळत असल्याने या सर्व पदार्थांचे आकर्षण आता कमी होऊ लागले आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला आखाजी या सणात दिसून येतो मात्र अजूनही काही घरांमध्ये (विशेषत: खेडे गावात) हि परंपरा अखंडित सुरु आहे हे महत्त्वाचेच !

आनंद व उत्साहाचा हा सण झाल्यानंतर माहेरवाशिणींना सासरी जावे लागते. त्यावेळी त्यांच्या मनाची घालमेल होत असते. मात्र पुढच्या वर्षीच्या आखाजीची आताशा (प्रतिक्षा) बाळगून ती जड अंतःकरणाने सासरी जायला निघते. कवयित्री बहिणाबाई हा प्रसंग आपल्या कवितेतून फार सुंदर पद्धतीने मांडतात. 

चार दिस चार दिस
इसावल्या घरात जी
आहे पुढे आहे पुढे
शेतीची मशागत जी ।
सण सरे आस उरे
आखजी गेली व्हय जी
सांग सई सांग सई
आखजी आता कही जी?

सर्व वाचकांना आखाजीच्या (अक्षय्य तृतीये) मनापासून शुभेच्छा !

गिरीश कुळकर्णी, जळगाव 
९८२३३३४०८४

3 comments:

  1. अक्षय्य तृतीये बाबत नव्या पिढीच्या मंडळी साठी अत्यंत उपयुक्त माहिती. अभिनंदन आणि धन्यवाद

    ReplyDelete
  2. खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद

    ReplyDelete