Monday 28 February 2022

आव्हान नैसर्गिकतेचा वारसा देण्याचे !

तुम्ही आम्ही पालक - मार्च २०२२ 
माणूस हा भूतलावरील इतर प्राण्यांप्रमाणेच एक सजीव प्राणी आहे. माणसाव्यतिरिक्त अन्य सजीव प्राण्यांची जीवनपद्धती बहुतांश सारखीच आहे. उदरनिर्वाह वा जगण्यासाठी खाणे आणि स्वसंरक्षण करणे हि प्रत्येक सजीवाची प्राथमिकता आहे. यासाठी लागणारी कौशल्ये त्या-त्या सजीवांमध्ये उपजत असतात. काही उन्नत सजीवांमध्ये स्वतःसाठी निवारा बनविण्याचे कौशल्यही उपजत दिसून येते. माणसामध्येही हि कौशल्ये उपजत आढळतात. मात्र माणूस हा आपल्या बुद्धी कौशल्याच्या आधारे इतरांपेक्षाही अधिक विकसित होतांना दिसतो. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्या मूलभूत गरजांमध्ये वाढच झालेली आपल्याला दिसते. माणसाच्या गरजा जेव्हढ्या जास्त तेव्हढे त्याचे जीवन आधुनिक व उच्च मानले जाते. मात्र ज्या व्यक्तीच्या मूलभूत गरजा कमी त्या व्यक्तीचे जीवन अधिक साधे व नैसर्गिक असते.  

माणसाच्या मूलभूत गरजांमधील वाढ अनुकरणप्रियतेतून आणि नित्य नूतनतेच्या ध्यासातून झालेली दिसते. स्वप्नांच्या दुनियेत रमणाऱ्या माणसाला जिज्ञासा, कल्पकता याचे वरदान बुद्धीद्वारे प्राप्त झाले आहे. माणसाच्या वैयक्तिक जीवनातील अमर्याद भौतिक गरजांच्या पाठलागांमुळे जागतिक पातळीवर अनेक व्यापक परिवर्तने अनुभवास येतात. भौतिक गरजांसोबतच माणसाला अभौतिक गरजांची कायम आस राहिली आहे. यात प्रेम, आधार, सोबत  यांचा समावेश करता येईल. मानवी मनाची भावनिक तृप्ती करण्यासाठी तो अनेक मार्गाने प्रेम, भीतीच्या चिंतेतून मुक्त होण्यासाठी आधार व जीवनविषयक समस्या सोडविण्यासाठी सोबत याच्या मागे आजन्म धावत राहतो. याला स्वातंत्र्य, समता आणि सहकार्य यांचीही जोड मिळाली.

तुम्ही आम्ही पालक - मार्च २०२२ 
व्यापारी  बाजारपेठांनी मानवी स्वप्नांना व त्याच्या मूलभूत गरजांची धडपड ओळखून आपल्या नाविन्यपूर्ण मार्केटिंगच्या आधारावर त्याला अधिकाधिक भोगवादी बनविण्यास बाध्य केले आहे. आपल्या भोवताली अशा स्वप्नांच्या मार्केटिंगचा सध्या सुकाळ दिसतो. माणसाच्या या भोगवादाने माणसाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलेले दिसते. त्यामुळेच या अंकासाठी हा विषय निवडला असावा असे मला वाटते. आगामी काळात माणसाला मिळालेल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करुन हि पृथ्वी येणाऱ्या पिढ्यांना व अन्य सजीवांना जगण्यासाठी उपयुक्त राहील यासाठीच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच मानवाने आपल्या गरजा मर्यादित ठेवत नैसर्गिक जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा वारसा पुढे देण्याचे मोठे आव्हान आजच्या सामाजिक स्थितीवरुन लक्षात येते,

सध्याच्या काळातही सुशिक्षित महिलेच्या सोन्याच्या बांगड्यांना पॉलिश करुन चाकाकण्याचे आमिष दाखवून लुटले अशा बातम्या वाचनात येतात. जास्तीचे व्याज मिळण्याच्या आशेने केलेल्या गुंतवणुकीची मूळ रक्कमही मिळत नाही. भांडवली बाजारात केलेल्या गुंतवणुकीने देशोधडीला लागलेली अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. नोकरी लावून देण्याचे सांगत अनेकांना गंडा यासारख्या अनेक घटना आपल्या दैनंदिन जीवनात घडत असतात. असे घडते असे माहित असूनही लोकं तो मार्ग का स्वीकारतात ? हा माझ्यासारख्या माणसाला प्रश्न पडतो. माणसाला मिळालेल्या बुद्धी या दैवी देणगीचा वापर करतो का ? असाही प्रश्न मनात येतो.

खरं तर जीवनात सुखी व आनंदी व्हावे असे प्रत्येक माणसाला वाटत असते. अर्थात जो श्रीमंत (पैशाने) असून ज्याच्या घरात भौतिकतेच्या सर्व वस्तू आहेत, घरातील सदस्याने केलेली मागणी पूर्ण करण्याची,  पाल्यांना उत्कृष्ट शाळा (जास्त फी घेणारी), चांगला क्लास, चांगले कपडे, चांगले शैक्षणिक साहित्य, चांगले वाहन, चांगला व आधुनिक मोबाईल यासर्व गोष्टी देण्याची आर्थिक क्षमता कुटुंब प्रमुखाकडे असावी त्यासाठी लागणारा पैसा निर्माण केला पाहिजे किंवा असलेला पैसा यासाठी खर्च केला पाहिजे अशी आपल्याकडील माणसांची धारणा आहे. त्यासाठी कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त पैसे मिळविण्याच्या शोधात तो असतो. त्या आशेनेच तो अनेकदा अनेक गोष्टींना बळी पडलेला आपल्याला दिसतो. प्रसंगी स्वतःचा जीव गमावून बसतो.

शेजारच्या घरात आलेली प्रत्येक गोष्ट माझ्या घरात असली पाहिजे अशी स्पर्धा सर्वत्र निर्माण झालेली दिसते. या स्पर्धेतूनच इप्सित सध्या करण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची वा तडजोड करण्याची आजच्या माणसाची दिसून येते. समाजात रूढ व प्रस्थापित असलेल्या अनेक चुकीच्या गोष्टींना, धारणांना तसेच स्वतःच्या गृहीतकांना चिकटून राहण्याची वृत्ती माणसाला भोगवादासाठी प्रवृत्त करते. त्यात समाजाच्या प्रतिष्ठेसंदर्भातील संकल्पना भर घालतांना दिसतात. माणसाची सारासार विचार करण्याची पद्धत व विवेकवादी दृष्टिकोन कुठेतरी हरविलेला दिसतो.

समाज जीवनातील सर्वच क्षेत्रे मार्केटिंगच्या भुलभुलैयांनी ढवळून निघाली आहेत. मानवतेच्या नात्याने सुरु करण्यात आलेल्या सामाजिक संस्थांनाही याची लागण मोठ्या प्रमाणावर झालेली दिसते अन  त्यामुळेच सामाजिक संस्थांची व त्यातील कार्यरत कार्यकर्त्यांबद्दलच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले दिसते. पर्यायाने या क्षेत्रातील शुद्ध, सात्विक व अस्सल कार्यकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असलेले आपणास दिसते.

व्यापारी बाजारपेठेला माणसाच्या या अपरिहार्यतेची व मानवी स्वभावाची जाण असल्याने त्यांच्या भाव-भावनांना हात घालत आपले उद्दिष्ट साध्य करण्याची कोणतीही संधी घालविली जात नाही. त्यातही गरीब-श्रीमंतामधील वाढती दरी अर्थात आर्थिक विषमता या सर्व गोष्टींना खतपाणी घालण्याचे काम इमाने इतबारे करीत असते. माणसाला स्वत्वाची ओळख होणे यानिमित्ताने अगत्याचे वाटते. तसेच आपल्या जीवनविषयक संकल्पना स्पष्ट होण्याची आवश्यकता वाटते. पालकांनी आपला भूतकाळ न विसरता त्यातील योग्य वस्तुनिष्ठ गोष्टींचा, तत्वांचा, मूल्यांचा वारसा पुढील पिढीकडे संक्रमित करण्याची आवश्यकता आहे. योग्य ठिकाणी "नाही" म्हणण्याची सवय केली पाहिजे व पाल्यांना नकार पचविण्याचीही ! बाजारपेठेतील स्वप्नांच्या मार्केटिंगचा कितीही सुकाळ झाला तरी आपल्या भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या मूलभूत तत्वांचा अवलंब करीत भौतिक गरजा मर्यादित ठेवून नैसर्गिक जीवनशैलीचा स्वीकार करीत पुढील पिढीला कृतिशील संदेश या प्रश्नाचे उत्तर ठरेल असे वाटते.

गिरीश कुळकर्णी
9823334084

Sunday 13 February 2022

मनीचा 'मृण्मयी' प्रवास समजून घेतांना !

माझी मुलगी मृण्मयीचा अर्थात मनीचा काल जन्मदिवस होता. १९ वर्षांपूर्वी आमच्या घरात तिचा जन्म झाला. आमच्या संपूर्ण परिवारात तशी मुलींची संख्या कमीच आहे. आम्हा तिघा भावांमध्ये मला एकट्यालाच मुलगी आहे. मुलं लहान असतांना त्यांना लाडाने वा प्रेमाने काही नावाने बोलावतो. आम्ही मृण्मयीला 'मनी' म्हणतो. जन्मदिवसाच्या निमित्ताने आपल्या पिल्लांचा प्रवास झर्रकन डोळ्यासमोरून जात असतो. कधी तरी आपल्या गत आयुष्याशीही त्याची स्वाभाविकपणे तुलना होते. मुलांना पालकांच्या गत आयुष्याची माहिती एव्हढ्या मर्यादित उद्देशाने हि तुलना योग्य आहे असे वाटते. मात्र मोठ्यांनी त्यातून अनेक बोध घेत आपली पुढची पिढी किती भाग्यवान आहे या दृष्टीने सकारात्मक शोध घेतला पाहिजे असे मला तिच्या प्रवासावरून वाटते. आमच्या मनीचा मृण्मयी प्रवास समजून घेतांना आलेले विचार मांडत आहे... 

मनीचा मृण्मयी प्रवास दोन अर्थाने मला समजावून घ्यावासा वाटतो. एक म्हणजे जबाबदार मुलगी आणि दुसरा अर्थ म्हणजे आनंदी (मृण्मयी) प्रवास. आमची मृण्मयी आता पुण्यात एकटी राहते (त्यात काय कौतुक असे वाटू शकते!) आणि एक जबाबदार मुलगी म्हणून राहते याचा विशेष आनंद आहे. प्रथमेश २२ वर्षांचा झाला त्यावेळेस "बाप २२ वर्षांचा होतांना..." असा एक लेख लिहिला होता कारण त्यावेळी तो घरापासून पहिल्यांदा नोकरीच्या निमित्ताने दूर गेला. मृण्मयीला शिक्षणाच्या निमित्ताने ३ वर्षे अगोदर दूर जावे लागले. हे पहिले वर्ष आहे कि तिने आईबाबांशिवाय आपला जन्मदिवस साजरा केला आणि म्हणूनच मला मनीच्या 'मृण्मयी' प्रवासाबद्दल थोडे लिहावे असे वाटले. 

आपण पालक वा व्यावसायिक म्हणून सुद्धा आपली जबाबदारी पार पडतांना चुका करतो, कोणाच्या तरी मार्गदर्शनाने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तसेच मुलंही चुका करतील, त्यांना हवे असेल त्यावेळेस आपण मार्गदर्शन करावे. अर्थात जबाबदार होण्यासाठी व तसा विश्वास आपल्याला वाटावा यासाठी मुलांच्या लहानपणापासून आपण अनेक गोष्टी केल्या पाहिजेत. त्यातील मला काही सुचतात त्या अशा...

१. जसे कधी तरी काका, मामा, मावशी वा आजी-आजोबा यांच्याकडे एखादा दिवस राहायला पाठविणे. 

२. घराजवळ असलेल्या दुकानातून वस्तू / भाजी आणण्यासाठी पाठविणे. यात व्यवहारासोबतच स्वतंत्रतेची सवय लागते. 

३. शाळेत शिकत असतांना सहलीला पाठविणे. परिस्थितीशी, व्यक्तींशी जुळवून घेण्याची शिकवण मिळते. सामाजिक जाणीव निर्माण होते. 

४. शाळेतील विविध स्पर्धा / उपक्रम यात सहभाग घेणे. यात क्षमता जाणून घेणे या शिवाय अन्य उद्देश नसावा. त्याचा उपयोग करिअर निश्चितीसाठी अधिक होतो

५. घरातील कामे करतांना त्यांचा सहभाग घेणे. स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लावणे. आरोग्याच्यादृष्टीने व्यायाम, आहार याकडे लक्ष देणे. 

६. योग्य वयात योग्य वस्तू देणे. आपली आर्थिक परिस्थिती असली तरी मोबाईल, वाहन यासारख्या वस्तू देतांना त्यांना त्या वापरण्यायोग्य तयारी करून देणे. येथे वयापेक्षा वस्तू हाताळण्याची क्षमता वाढविण्यावर भर असावा. 

७. वाचन, समाजात मिसळणे, छंद जोपासणे, स्पर्धांमध्ये भाग घेणे यासारख्या गोष्टी आपल्या हट्टासाठी नव्हे तर त्यांच्यातील सामाजिक गुण विकसित होण्याचा व पाल्य अधिक वैचारिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ व्हावा हा उद्देश असावा. 

८. आपल्याकडील वस्तू इतरांसोबत वाटून घ्यायला प्रोत्साहित करणे. समूहात राहत असतांना सोबतच्या व्यक्तींना माणुसकीच्या नात्याने वागविण्याची सवय लागते.

९. परिवारातील निर्णय घेत असतांना त्यांची मते विचारात घेणे.त्यांचा योग्य तो सन्मान राखणे. त्यांना काय समजते असे न मानता खुलेपणाने काही गोष्टींमध्ये त्यांची समज आपल्यापेक्षा जास्त आहे हे स्वीकारणे. 

१०. निर्णय घेण्यासाठी तयार करणे. चुकलेल्या निर्णयाची शिक्षा करण्याऐवजी काय चुकले याकडे विशेष लक्ष देणे. पुन्हा निर्णय घेऊन ती गोष्ट करण्यासाठी उद्यक्त करणे. एखादा गोष्ट जमलीच नाही तर पालकांनी अट्टाहास करू नये. 

मुलामुलींमध्ये भेद नको असे म्हणत असतांना मुलगी म्हणून थोडी अधिक काळजी पालकांना वाटते तशी मलाही वाटत असे. बापाच्या तर मुली विशेष लाडक्या असतात आणि त्यामुळे त्यांचे कोडकौतुक जरा अधिक होते हे नाकारण्याचे कारण नाही. अलीकडच्या काळात तांत्रिक व भौतिक संपदेचा विस्फोट झालेला आपल्याला दिसतो. या गोष्टी अंगिकारतांना त्याच्या फायद्यासोबत काही वैगुण्ये(दोष) येतातच. त्यातही त्यांचा अतिरेकी वापराने पालक अगतिक होतात. कोरोना व ऑनलाइनच्या काळात हि समस्या अधिक उग्र रूप धारण केलेली आहे. त्यासाठीच मुलाच्या वाढीच्या मूलभूत गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आपल्या पाल्यांच्या या प्रवासाकडे पाहतांना आपण 'प्रगती' आणि 'बदल' यातील फरक समजण्यासाठी वापर करावा. त्याबद्दलची आपली मते स्पष्ट आणि सहजरित्या मुलांना सांगितली पाहिजेत. मात्र योग्य ठिकाणी नकार द्यायला व नकार पचवायलाही शिकविले पाहिजेच. 

मनीच्या मृण्मयी प्रवासात पालक व परिवारजनासह,  शाळा, आचार्य व दीदी यांचा खूप महत्वाचा वाटा आहे. शाळेच्या बाबतीतही आजकालची मुले त्रुटींबद्दल स्पष्टपणे बोलतात त्यावेळी आपण चांगल्या गोष्टीकडे मुलांचे लक्ष वेधले पाहिजे. सार्वजनिकरित्या टिपण्णी करतांना प्रथम पालकांनी काही भान ठेवले पाहिजे. काही गोष्टी वास्तव असल्या तरी पाल्याच्या वयाच्यादृष्टीने बोलणे योग्य नसते. त्याबद्दल जाणीव करून देऊन बदल घडवून आणण्यात पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्रुटींबद्दल पालक सभांमधून वा वैयक्तिक भेटीद्वारे उपाय करण्याचा प्रयत्न करावा. वर्गातील मुलांमधील गोष्टींकडे पूर्वग्रहाने न पाहता  समस्या समजण्याकडे कल असावा. भांडण वा वादविवादाकडे अजिबात नसावा. ज्याची चूक असेल त्याला (आपला पाल्य असला तरी)  योग्य अशी समज द्यावी व यापुढे असे घडणार नाही वा करणार नाही असे आश्वासन घ्यावे.  विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षा (मार्क) त्याच्या क्षमता विकासाकडे अधिक लक्ष द्यावे. त्याच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्यावे. चाकोरीबाहेरची करिअर निवडतांना पालकांनी पाल्याच्या पाठीशी उभे राहावे. अनेकदा पालकांनाच बऱ्याच गोष्टी माहिती नसतात आणि त्यांच्या काळातील परिस्थितीनुसार निर्णय घेतला जातो वा त्याचा आग्रह असतो. (मृण्मयी पुण्यात कथ्थक विषयाचे पदव्युत्तर पदवी संपादनासाठी गेली आहे) 

मनीच्या मृण्मयी प्रवासातील पालक, शाळा, गुरुजन यांच्या इतकाच वाटा तिच्या जळगावातील गुरु प्रभाकर कला संगीत अकादमीच्या डॉ. अपर्णा भट-कासार यांचा आहे किंवा थोडा अधिक म्हटले तरी हरकत नाही. अभ्यास, सराव, शिस्त, संधी, कौतुक प्रसंगी वास्तवाची कठोरपणे जाणीव करून देण्याचे काम त्यांनी केले. त्याबद्दल आम्ही कधीही तक्रार केली नाही आणि त्याचा नक्की फायदा झाल्याचा आमचा अनुभव आहे. पालकांच्या परिघातील व्यक्ती, संस्था यांचाही मुलांच्या घडणीत खूप फायदा होतो. मुळात पाल्य जबाबदार होण्यासाठी पालकांनी जबाबदार झाले पाहिजे. त्यासाठी पालकांच्या बालपणीच्या वा त्यांच्या संगोपनाच्या गोष्टी आजच्या काळात तशाच लागू पडत नाही. त्यासाठी पालकांनी पालकत्वाचे धडे / प्रशिक्षण / कार्यशाळा यांचा जरूर लाभ घेतला पाहिजे. 

सर्वात महत्वाचे पालक म्हणून आई-बाबांमधील सुसंवाद अपेक्षित गोष्टी घडण्यासाठी उपयुक्त ठरतो. मुले जसजशी मोठी होतात तसतसा निर्णय प्रक्रियेत सगळ्यांचाच सहभाग असावा मात्र निर्णयाची जबाबदारी निश्चित करून घेतली पाहिजे. मुलांशी पालकांनी बोलतांना आपल्या जोडीदाराबद्दल मुलांच्या मनात अढी निर्माण होणार नाही याचीही काळजी दोघांनी घेतली पाहिजे. सर्वांनी एकत्र बसून विस्तृत चर्चा करून त्याद्वारे विसंवादाचे विषय हाताळले पाहिजे. विशेषतः पालकांनी वा मुलांनी केलेल्या चुका, वयात येत असतांनाचे विषय यावेळी हमखास खुली चर्चा फलद्रुप ठरते, वास्तव आणि आभासी जग, मूल्ये-तत्व आणि व्यावहारिक जगातील गोष्टी ज्यात तफावत दिसते त्यावेळी त्यातील फरक, मते व विचार सांगितले पाहिजे. त्यावर आधारित निर्णय सर्वथा पाल्यावर सोपविल्यास अनेक गोष्टी सुकर होतात. अर्थात पाल्याचा प्रवास जबाबदार व्यक्तीकडे होत राहतो. हि अखंड चालणारी प्रक्रिया आहे आणि कोणीही परिपूर्ण नाही याची जाणीव पालकांसह मुलांना व्हावी याउद्देशानेच मृण्मयीच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा लेख लिहिला आहे. आपल्या प्रतिक्रिया लाखमोलाच्याच...

(जाता जाता : निसर्गातील प्राणी, पक्षी आपल्या पिल्लांना कसे वाढवितात, त्यांना कसे सक्षम बनवितात याकडे डोळसपणे पाहिल्यास खूप गोष्टी शिकायला मिळतात हा माझा स्वानुभव आहे व त्यामुळे पालकांनाही निर्णय घेणे त्याबरहुकूम कृती करणे सोपे जाते.)


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४