Friday 14 July 2023

...तेथे कर माझे जुळती !

मानवी जीवनात अनेक माणसे येतात. काही माणसे नाते संबंधाने आपली असतात, काही ऋणानुबंधाने आपली होतात तर काही त्यांच्या विचित्रपणाने विसरली जात नाहीत तर काही येतात आणि जातात. या प्रत्येकाचे एक स्वभाववैशिष्ट्य असते. समसमान विचारांची माणसे अधिक जवळ येतात आणि जीवलग होतात. अर्थात या सर्वांचेच जीवनात एक वेगळे स्थान आणि महत्त्व असते. मानवी जीवन माणसांनी अधिक समृद्ध होते. त्यातही सामाजिक जाणिवेचे व प्रतिभेचे धनी असलेली माणसे जवळ आली कि जीवनाला अर्थ मिळवून देणे आणि जीवनाची इतिकर्तव्यता समजणे सोपे जाते. 

काही व्यक्ती पद, प्रतिष्ठा, अनुभव यासर्वांनी सिद्ध असूनही साधी असतात. त्यांच्या जगावेगळ्या कार्यकर्तृत्वाने ती प्रेरणादायी ठरतात. या माणसांची असामान्य चिकाटी, मेहनत, धडाडी आणि प्रतिकूल परिस्थितीत एखाद्या वटवृक्षाप्रमाणे कडक उन्हात निश्चल उभे राहून दुसऱ्यांना मात्र सावली देण्याची उदार वृत्ती बाळगून असतात. या व्यक्ती पाहिल्या, अनुभवल्या आणि आठवल्या तरी कविवर्य बा. भ. बोरकरांच्या कवितेतील या काव्यपंक्ती सहज मनी येतात.

यज्ञी ज्यानी देउनि निजशीर, घडिले मानवतेचे मंदिर

परी जयांच्या दहनभूमिवर, नाही चिरा नाही पणती ॥

 

हे सर्व आठविण्याचे कारण म्हणजे जीवनात अनुभवलेले आदरणीय डॉ. प्रताप जाधव ! मागच्या शुक्रवारी (दि. ७ जुलै) पंढरपूर येथे असतांना रात्री उशिरा त्यांचे निधन झाल्याचे कळले. अस्वस्थ झालो. सकाळी उठल्यापासून सोबतच्या सहकाऱ्याजवळ त्यांच्या आठवणी जागवतच दिवस घालवला. मागील ८ दिवसात एक दिवस असा गेला नाही कि डॉक्टर साहेबांची आठवण आली नाही.  'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' म्हणजे काय आणि कसे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टरसाहेब. या देव माणसाशी चांगला संपर्क होता. कधीही भेट झाली कि परिवारातील एक सदस्य या नात्याने सहज भावाने बोलत. बोलणंही अघळपघळ असायचे. त्यात विषय वा अन्य कसलेही बंधन नसायचे. कायम हसतमुख. पेशंट कितीही तणावात असला तरी त्याचा ताण सहज दूर करायचे. मागील २५ वर्षात किमान १० वेळा तरी मी हा अनुभव घेतला आहे. कधी वैयक्तिक उपचारासाठी तर कधी नातेवाईकांसाठी. एका बाजूला उपचार, ऑपरेशन सुरु तर दुसऱ्या बाजूला हसतहसत बोलणे... एक शब्द सहज यायचा होईल ना ! बघू... काही विचारलं कि हा शब्द ठरलेला. 

पूर्वीच्या दवाखान्यात वा आत्ताच्या दवाखान्यातील एक पाटी मला प्रचंड आवडायची. उक्ती ला कृतीची जोड दिल्यावर माणसाची प्रतिमा उजळून निघते. ती पाटी होती... 'खोटी बिले मागून सरकारी तिजोरी लुटू नये.' समाजातील चुकीच्या गोष्टींबद्दल चीड होती व त्यावर प्रखर, सडेतोड प्रतिक्रिया द्यायचे. स्पष्टवक्ता तर होतेच पण त्याला कृतिशीलतेची जोडही होती. यात कुठल्याही प्रकारचा 'अहं' भाव नसायचा. डॉक्टरांचा व्यवहार निर्व्याज होता. 'देगा उसका भी भला न देगा उसका भी भला' अशी वृत्ती होती. मानवी जीवनाचे नीतिनियम व व्यवहार इतक्या सहजपणे पाळत अर्थात त्यामागे त्यांची तपस्या होती. सकाळी एकदा दवाखान्यात आल्यानंतर संध्याकाळी उशिरापर्यंत ओपीडी व ऑपरेशन्स चालत. मी कधीही त्यांना थकलेले पाहिले नाही. रात्री १०.३० वाजता पण तोच उत्साह असायचा. आपल्या आजाराबद्दल वा दुखण्याबद्दल कधीही बोलत नसत. विषय काढला तरी टाळत. आईच्या 'नी' रिप्लेसमेंट्च्या वेळी व काकूंच्या हिप जॉईन्टच्या वेळी या शस्त्रक्रिया आपण लवकरच सुरु करीत आहोत असे म्हणालेत. मात्र त्यासाठी त्यांना वेळच मिळाला नाही.


जळगाव जनता बँकेचे संचालक झाल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीला येणे शक्य होत नसे. त्यावेळी दादा अर्थात डॉ. आचार्य नेहमी म्हणायचे त्यांना फोन करु नका. त्यांना त्यांचे काम सोडून बैठकीला बोलावणे हा सामाजिक अपराध आहे. 'सेवा परमो धर्म:' हे कार्यकर्त्याला आपल्या आचरणातून त्यांनी दाखवून दिले. जळगावकरांची त्यांनी निस्सीम सेवा केली. कधी कोणी त्यांना मसीहा म्हटले तर कधी देवदूत... वेळ, काळ याचे त्यांनी कधीही भान बाळगले नाही. केवळ सेवा हाच त्यांचा जीवनमंत्र होता. काळाने त्यांना फार लवकर बोलावले. समाजाचा संसार केला परंतु आपल्या पाखरांचा संसार मात्र राहिला. डॉक्टर तुम्ही आम्हाला हवे होतात ! 'सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले' या उक्तीनुसार डॉक्टर साहेबांनी आपले बलिदान दिले. जळगावकरांना हा 'देव' माणूस कायम लक्षात राहील मात्र त्यांच्या नावाने स्थायी स्वरुपात काही कार्य उभारल्यास तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे वाटते. डॉक्टर साहेबांच्या पवित्र आत्म्यास सद्गती लाभेलच, परंतु परमेश्वराने वहिनी व परिवारास हे दुःख सहन करण्याचे बळ देवो. आम्हा सर्वांना डॉक्टरांच्या प्रेरणेने समाजसेवेची सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना ! 

कविवर्य बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे परी जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती... आणि म्हणून मला म्हणावे वाटते ...तेथे कर माझे जुळती, दिव्यत्वाची जेथ प्रचिती !  


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४