Friday 24 July 2020

अभिमानी बापाचे हृदगत !

जीवनाच्या एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात असतांना आपल्याला आशा व विश्वास देणाऱ्या गोष्टी आजूबाजूला घडल्या तर एक वेगळी उभारी येते. परिस्थितीला उत्तरे सापडतात, आव्हानेच संधी देतात, गरज असते काही आवश्यक धोके स्वीकारण्याची व त्यावर प्रत्यक्ष कृती करण्याची... हे सगळं का सांगतोय ? आमच्या कुटुंबाच्यादृष्टीने विशेषतः पालक म्हणून एक आनंदाची गोष्ट घडली. सकाळची घरपोच भाजीपाल्याची गडबड आटोपून घरी गेलो तर " फॉर्च्युन " या ब्रँडचे काही वेगळे प्रॉडक्ट मांडून ठेवले होते. (रवा, मैदा, बासमती व खिचडीचा तांदूळ, साबण अन्य) घरात विचारले कंपनीने पाठवले का ? हो, आणि एक सत्काराचे पत्रही ! - इति सौ... सर्वप्रथम उत्सुकतेने ते पत्र वाचले आणि अतिशय आनंद झाला. अदानी विल्मर कंपनीच्या मानव संसाधन विकास विभागाचे प्रमुख श्री. सिद्धार्थ घोष यांचे ते पत्र होते आणि चि. प्रथमेशच्या निवडीबद्दल पालक म्हणून अभिनंदन करणारे ते पत्र आहे. (सोबत जोडले आहे) त्यामुळेच हे एका अभिमानी बापाचे हृदगत अर्थात हृदयाचे मनोगत !
तसं नेहमी मोकळेपणाने व्यक्त होणारा, इतरांबद्दल लिहिणारा मी मात्र बाप म्हणून व्यक्त होतांना कचरायचो. मात्र अलीकडे मला तसेही व्यक्त होतांना विशेष भावते. चि. प्रथमेशच्या वाढदिवशी "बाप २२ वर्षाचा होत असतांना..." असा ब्लॉग लिहिला होता आणि आज पुन्हा त्याअनुषंगाने लिहितोय... पत्रात म्हटल्याप्रमाणे त्याच्या बालपणापासूनचा अनेक गोष्टी डोळ्यासमोर काल परवा झाल्यासारख्याच भासल्या. ह. भ. प. सद्गुरु सखाराम महाराज यांच्या कृपाशिर्वादाने त्याची प्रगती सुरु आहे. आमच्या एकत्रित परिवारातील लहानमोठ्यांचे आशिर्वाद व सहजीवनाने तो समृद्ध झाला. गुरुजनांमुळे त्याला ज्ञानाबरोबरच जीवन कौशल्याचे धडे मिळालेत. विवेकानंद प्रतिष्ठानच्या काशिनाथ पलोड पब्लिक स्कुलचा विद्यार्थी असलेल्या प्रथमेशच्या आयुष्यात खूप चांगली माणसे आली. त्याच्या मेहनतीला या सर्वांचे मिळालेले आशिर्वाद व सदिच्छा मला खरोखर महत्वाच्या वाटतात. पालकाला आनंद व अभिमान वाटाव्या अशा काही प्रातिनिधिक गोष्टी आपल्यासोबत शेअर करीत आहे.
शालेय जीवनाचा मनमुराद आनंद त्याने घेतला. तसा खोडकर, मस्तीखोर होता. विज्ञानाचे प्रयोग, फुटबॉल, सहली या सर्व गोष्टीत त्याला सहभाग घेता आला याचा आनंद आहे. सर्वच क्षेत्रात आवश्यक असलेला वावर त्याला शाळेने उपलब्ध करुन दिला. त्या त्या काळातील शिक्षक वृंदाने खूप सारे त्याला दिले. त्यांनीही ते घेतले. महाविद्यालयीन जीवनातही समरसून , एक प्रामाणिक विद्यार्थी म्हणून तो वागला. कुठलाही अवास्तव गोष्टीसाठी हट्ट केला नाही. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासारख्या शैक्षणिक संकुलात तो समृद्ध झाला. तेथे त्याला उच्च शिक्षणासाठी विषयक मार्गदर्शन मिळाले. या सर्वांचा परिपाक म्हणजे एक जबाबदार व संवेदनशील नागरिक झाला. (बापासाठी अजून मुलगाच आहे आणि त्याला अजून समज यावी असेच मला वाटते ! )
आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करावा असे त्याने कळत्या वयात ठरविले आणि वयाच्या १८ व्या वर्षी पहिले रक्तदान केले. त्यानंतरच्या वर्षी त्याने आपल्या शाळेतील ९ वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रथमेश खूप चांगल्या प्रगल्भतेने बोलला. कागदावरील सर्व मुद्द्यांचा समावेश करतांना एकदाही कागद उघडून पाहिला नाही. तसा अंतर्मुख स्वरूपाचे व्यक्तिमत्व असलेला प्रथमेश इतकं छान समजावून सांगू शकतो असे वाटले नव्हते. त्याने केलेल्या चुका, शाळेत आलेलं अनुभव, वेगवेगळ्या शिक्षकांच्या वैशिष्ट्यांसह विषयांचा अभ्यास कसा करावा हे समजावून सांगतांना चांगल्या टिप्सही दिल्या.
मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेने स्व. रामभाऊ म्हाळगी यांच्या जयंती निमित्ताने " आर्य चाणक्य " यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वय वर्षे १४ ते ३० या गटातील युवकांनी आर्य चाणक्याच्या जीवनाचा अभ्यास करावा हा स्पर्धेचा उद्देश होता. स्पर्धेसाठी आर्य चाणक्य यांची राष्ट्र उभारणीची संकल्पना, आर्य चाणक्य एक व्यवस्थापन गुरु व आर्यचाणक्यांची लोककल्याण (योगक्षेम) विषयीची संकल्पना असे तीन विषय देण्यात आले होते. सदर स्पर्धेत प्रथमेशने आर्य चाणक्य एक व्यवस्थापन गुरु या विषयावर मराठीतून निबंध लिहिला होता. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत सुमारे २८०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत चि. प्रथमेशला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. प्रथमेशने स्वतः निबंध लिहिला. विशेष कौतुक यामुळे कि प्रथमेशचे शिक्षण सीबीएसई मधून अर्थात इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी त्याने मराठीतून निबंध लिहून हे यश मिळविले आहे. मला आठवते प्रथमेशला " आर्य चाणक्यांच्या " जीवनाबद्दल विशेष आकर्षण आहे. त्यातील अनेक गोष्टी वाचून तो त्याच्या आईला काही गोष्टी सांगत असे.
बी. टेकच्या अंतिम वर्षात प्रोजेक्ट करण्यासाठी त्याने जळगावातील मेरिको कंपनीत विनंती अर्ज केला. येथील व्यवस्थापनाने प्रथमच अशा पद्धतीने संधी दिली. तीन शिफ्टमध्ये प्रामाणिकपणे सर्व प्रकारच्या व्यावसायिक ज्ञान मिळविण्यासाठी आवश्यक ते सर्व केले. कंपनीतील एक सहकारी म्हणून ज्या पद्धतीने काम करावयास हवे तो ते शिकला. कमानीत प्रोजेक्टद्वारे काही नवीन करावयाचे असते आणि ते त्याच्या संघाने खूप छान केले अर्थात तेथील वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार... त्यांनी सुचविलेल्या गोष्टीने कंपनीच्या खर्च मोठी बचत झाली व तीच गोष्ट त्याला "अदानीत" निवडीसाठी उपयुक्त ठरली.
आपल्याच विश्वात मग्न असणारा प्रथमेश, नवीन माणसाशी बोलताना थोडा संकोचणारा, विज्ञान विषयात विशेष रुची असणारा, एकदा मैत्री झाली कि वेळ-काळाचे भान विसरणारा, क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा, गाड्यांचे विशेष आकर्षण असलेला, खाण्यापिण्याची फारशी तक्रार नसलेला, पनीर मसाला व चॉकलेट आनंदाने बनवणारा, तंत्रज्ञानाला सहज आत्मसात करणारा, आपल्या कामाशी काम ठेवणारा, समर्पित, वचनबद्ध व कामावर श्रद्धा ठेवणारा, सर्वांवर प्रेम करणारा, मातृमुखी असलेला, आईला विशेष जीव लावणारा प्रथमेशला आपल्या सर्वांच्या आशिर्वादाची व शुभेच्छांची गरज आहे.
प्रथमेशच्या वाटचालीत ज्यांचे ज्यांचे योगदान आहे, आशिर्वाद आहेत व सदिच्छा आहेत त्यांच्याप्रती मी पालक म्हणून कृतज्ञ आहे. प्रत्येक बापाच्या आपल्या मुलाकडून खूप साऱ्या अपेक्षा असतात. माझ्या नाहीत. मला मात्र त्याने आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे असे वाटते. आपल्या आरोग्याच्याबाबतीत विशेष सजग असले पाहिजे. कारण जीवनात त्याला जे ही मिळवायचे आहे त्यासाठी उत्तम आरोग्य हि महत्वाची गोष्ट आहे.


Monday 20 July 2020

बिमारी अच्छी भी होती है !

बिमारी अच्छी भी होती है ! 

चमकलात ना ! कोरोनाच्या महामारीत हे असे काय बोलतोय मी ? पण हा ब्लॉग शेवटपर्यंत जरुर वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल मी असं का म्हणतो ते. मित्रहो, बिमारी हा शब्द कायम माणसाच्या मनात धस्स करणारा आहे. सध्याच्या स्थितीत सर्वच माध्यमांवर आपण जे काय पाहतोय, ऐकतोय आणि वाचतोय सुद्धा त्यामुळे अशी भावना निर्माण होणं नैसर्गिक व स्वाभाविकच आहे. या काळात कोणीही आजारी पडू नये हीच त्या जगनियंत्याकडे प्रार्थना आहे... पण प्राप्त परिस्थितीत काही " बिमारी " जडवून घेतलेलीच बरी कारण बिमारी अच्छी भी होती है ! 

बिमारी भी अच्छी होती है ! हे समजून घेण्यापूर्वी आपण नक्की बिमारी म्हणजे काय ते समजून घेऊ. माणसाच्या नैसर्गिक जीवनक्रमावर बाधा आणणारी गोष्ट म्हणजे बिमारी. याची काही लक्षणे असतात जी सजीवाच्या नैमित्तिक कार्यपद्धतीतील फरक स्पष्ट करतात. यामुळे माणसाला वा सजीवाला अस्वस्थ वाटते. त्याची कारणे प्रथम माणूस स्वतःच शोधून काढण्याचा प्रयत्न करतो व उपायही ! मात्र काही वेळेस  त्याला तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. हे सामान्य बिमारीच्या बाबतीत झाले. अच्छी बिमारी यापेक्षा थोडी वेगळी असते आणि म्हणून तर बिमारी अच्छी भी होती है ! 

वर सांगितलेली बिमारी आणि अच्छी बिमारी यात सर्वात महत्वाचा फरक आहे आणि तो म्हणजे अच्छी बिमारीत संबंधित व्यक्तीला त्याचा फायदा होतो. ती त्याची ओळख असते. अच्छी बिमारी माणसाचं व्यक्तिमत्व खुलवते, त्याची प्रगती करते, त्याला जगण्याचा आनंद तर देतेच पण जीवनाला अर्थ प्राप्त करुन देते.  समाजातील इतर घटकांना असे वाटते कि त्याला बिमारी आहे कारण त्यांना या बिमारीचा  त्रास होतो. अच्छी बिमारीला उपाय नाही आणि त्याची गरजही नाही. याकरिताच बिमारी अच्छी भी होती है ! 


वैतागलात ? रागावलात ? काय लावलं हे असे वाटतेय ? जाऊ द्या ! मला सांगा तुम्हाला अशी काही बिमारी आहे का ज्यामुळे इतरांना अडचण होते किंवा त्रास होतो ? नक्कीच असणार नसेल तर लावून घ्या. माझी अपेक्षा आहे आपल्याला मला काय म्हणायचे हे लक्षात आले कि आपण यावरील कमेंटमध्ये आपली एखादी "बिमारी" जरुर सांगा अच्छी बरं का ? हे सर्व कुठून सुचलं ते सांगतो. आमचे एक सहकारी आहे त्यांचे नाव मधुकर पाटील अर्थात मामा ! गेली १२ वर्षे आम्ही आशा फौंडेशन या संस्थेत सोबत काम करतो. अतिशय वक्तशीर, स्वच्छता, टापटीप, व्यवस्थितपणा त्यांच्या अंगात रोमारोमात भरलेला. कामाशी प्रामाणिक, संपूर्ण समर्पण आणि वचनबद्धता हि त्यांची विशेषता. अलीकडच्या काळात दुर्मिळ असणारी हि गोष्ट नक्कीच अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे आणि हीच त्यांची "बिमारी" आहे. म्हणूनच म्हटले बिमारी अच्छी भी होती है ! 

हि बिमारी कशी असे ना ? तर कोणी एखादी गोष्ट झाडली, स्वच्छ केली तरी आमच्या मामांना त्यांच्या पद्धतीनेच आणि त्यांच्या हाताने केल्यावर त्याचे समाधान होते. परवा असेच झाले कार्यालयात नव्याने सुरु केलेल्या घरपोच भाजीपाला सुविधा झाल्यावर सर्व स्वच्छता झाली. मामा आल्यावर त्यांनी पुन्हा ती केली. आपण केव्हाही कार्यालयात या तुम्हाला हि गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. मग आम्हाला हि बिमारी का वाटते ? तिचा काय त्रास होतो ? तर आम्हाला ते कारणे बाध्य होते आम्ही सर्वच जण त्यांच्या या "अछ्या बिमारीला" घाबरतो आणि सर्व व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतो. अनेकांच्या स्वभावाचा भाग बनलेल्या या "अछ्या बिमारीला" समाज वेडेपणा म्हणतो आणि त्या व्यक्तीला पागल ! पण हेच लोक इतिहास घडवतात. दिशा देतात. समाजाला समृद्ध करतात. आपल्या आजूबाजूला अशा "वेड्यांची" नक्कीच कमी नाही आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आम्हा सारख्या कार्यकर्त्यांचे तेच तर प्रेरणास्थान असतात. म्हणून म्हटले बिमारी अच्छी भी होती है ! 

मित्रहो, पटतंय का मी काय म्हणतो आहे ते ? तर मग आपण जरुर सांगा आपली अशी अच्छी बिमारी आणि हो त्यासोबत आपल्या या बिमारी मागची प्रेरणा असलेली व्यक्तीही... सांगताय ना ? मी उत्सुक आहे जाणून घ्यायला अशा बिमारी व्यक्तीला आणि त्यांच्या बिमारीलाही ! कारण बिमारी अच्छी भी होती है ! 

गिरीश कुळकर्णी 
९८२३३३४०८४ 

Saturday 4 July 2020

कृतज्ञता व्यक्त करणारी गुरुपौर्णिमा !



ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम्। 
मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोःकृपा॥
गुरूरादिरनादिश्च गुरूः परम दैवतम्। 
गुरोः परतंर नास्ति तस्मै श्री गुरवे नमः॥

मानवी जीवनात गुरुंचे महत्व अनन्यसाधारण आहे. मानवाला माणूस बनविणारे, समाजाला अपेक्षित असलेला एक चांगला व्यक्ती घडविणारे, स्वतःसोबत इतरांचा विचार करणारे, संवेदनशीलतेतून माणुसकी जपणारे, भौतिक सुखाची अभिलाषा पूर्ण करण्यासाठी तयार करणारे आणि त्यालाच पारमार्थिक ज्ञानाद्वारे भोगवादापलीकडची आत्मिक समाधान, शांती व आनंद देणारे हे सर्वच गुरु होत. प्रत्येक वेळी हे सर्व अपेक्षित सध्या करण्यासाठी दृष्टी देणारे, करवून घेणाऱ्या व्यक्तीच असेल असे नाही तर प्रसंगी परिस्थिती, निसर्गातील प्राणी, पक्षी, वृक्षवल्ली काहीही असू शकते. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! खरं तर या सर्व गुरुंचे आपण कायम कृतज्ञ असले पाहिजे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण आपल्यासह आपल्या परिसराचा, समाजाचा उद्धार करीत असतो. अशा या गुरुंना वंदन करणे, त्यांच्याप्रती आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले प्रथम कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत. यासाठीच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. त्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा दिवस आहे. त्यांच्यासारखे श्रेष्ठ आचार्य वा गुरु आजपर्यंत झाले नाही असे आपण मानतो. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात म्हटले आहे. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. अशा महर्षी व्यासांना वंदन करतो.

प्रथम आपण ‘गुरु’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊ या. ‘गु’ म्हणजे अंधकार आणि ‘रु’ म्हणजे नाहीसा करणे.’ गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे, ते आपल्याला शिकवतात. अशा सर्व गुरुंना साष्टांग नमस्कार ! आपल्या आयुष्यात प्रथम गुरु हे आईवडील असतात. ते आपल्यावर आपल्या आचरणातून संस्कार करतात. अगदी छोटया छोटया गोष्टीतून ते जीवन कसं जगायचं, जीवनात कसं वागायचं हे शिकवत असतात. आईवडील हेच तर आपले प्राथमिक अवस्थेतले प्रथम आणि महत्वाचे गुरु असतात. त्यांना वंदन करतो. त्यानंतर आपल्याला योग्य शिक्षण देऊन व्यावहारिक जीवनासाठी अत्यावश्यक तयारी करुन घेतात, अपेक्षित कौशल्ये विकसित करण्यासाठी साहाय्यभूत होतात ते म्हणजे आपले शिक्षक. मातापित्यांनी व शालेय शिक्षकांनी मुलांना दिलेली शिकवण ही दीर्घकाळ टिकणारी असते. स्वत:च्या आचरणाने त्यांच्यात चांगले गुण परोपकार, त्याग, शौर्य, इतरांशी वागण्याची पध्दत, मोठ्यांविषयी आदर, सर्वांसाठी प्रेमाची भावना इत्यादी ते रुजवत असतात. शिक्षक आपल्याला जीवनातील अनेक मूल्ये शिकवतात आणि ती कृतीत यावीत, यासाठी आवश्यक त्या वेळी शिक्षासुद्धा करतात. त्यामागे आपण आदर्श जीवन जगावे, असा त्यांचा शुद्ध हेतू असतो.अशा सर्व शिक्षकांना वंदन ! 

भौतिक जगासंदर्भात मार्गदर्शन करणारे गुरु पाहिले. त्यानंतर अध्यात्मिक गुरु. आध्यात्मिक गुरु आपल्याला आपली खरी ओळख करून देतात. मुळात आपण एक व्यक्ती नसून आत्मा आहोत. अहंकाररूपी अज्ञानामुळे आपल्याला असे वाटते कि आपण जें करतो ते मीच करतो. मुळात आपल्यात स्थित असलेला तो परमेश्वर सर्व करीत असतो. त्याची तीव्र जाणीव गुरु आपल्याला करून देतात. यासाठी अध्यात्मिक गुरु जीवनात यायला हवेत. आपल्या जीवनाला प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप यांची जोड द्यायला हवी. आपल्यातील दोष निवारण करुन आनंद निर्माण होण्यासाठी अध्यात्मिक गुरु आवश्यक ठरतात. अशा सद्गुरुंना साष्टांग दंडवत ! जीवनातील या सर्व गुरुंना विनम्र भावाने वंदन करतो. त्यांनी दिलेली जीवनसूत्रे कृतीत आणण्याची प्रार्थना करतो. 

आपल्या आसपासच्या पर्यावरणातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यातील कुणापासून काय घ्यायचे, काय घ्यायचे नाही याचे विवेचन अवधूतोपाख्यानात आढळते. श्री गुरु दत्तात्रेयांच्या २४ गुरुंची माहिती आपल्याला यात मिळते. हे आपण वाचले आहे, माहिती आहे. पुनरावृत्तीचा दोष पत्करून मी येथे त्याची विशेष नोंद घेणार आहे कारण आजच्या पिढीला ते माहिती व्हावे, तशी दृष्टी विकसित व्हावी. पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कपोल, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मधुहा (भ्रमर), हरिण, मासा, पिंगळा (वेश्या), टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा, सर्प, कोळी, कुंभारमाशी ह्या साऱ्यांच्या आचरणावरून विविध प्रकारची शिकवण आत्मसात केलेली आहे. जीवनात काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे हे शिकविणारे व त्याद्वारे ज्ञानप्राप्ती करुन देणारे हे सर्व गुरु आहेत. 

पृथ्वी - पृथ्वीपासून क्षमाशीलतेचे ज्ञान प्राप्त केले कारण तुम्ही पृथ्वीवर काहीही केले तरी ती ते सहन करते. वायू - वायूचा सर्वत्र संचार असूनही सुगंध वा दुर्गंध यामुळे लिप्त होत नाही. त्याच्यापासून अलिप्त व समदर्शन हे ज्ञान प्राप्त झाले. आकाश - आकाशापासून अमर्याद मृदुत्व व सर्वसमावेशत्वाचे ज्ञान प्राप्त झाले. पाणी - पाण्यापासून शुद्धता, पावित्र्य व अभेदवृत्तीचे ज्ञान प्राप्त झाले. अग्नी - अग्नीपासून तेजस्विता, अपरिग्रह, रसनेन्द्रियावरही विजय ज्ञान प्राप्त झाले. चंद्र - चंद्र कलेकलेने वाढतो व कमीही होतो असे आपल्याला दिसते. प्रत्यक्षात चंद्राला काहीच फरक होत नसतो. तारुण्य व वार्धक्य ज्ञान शरीराच्या अवस्था आहेत आत्म्याच्या नाहीत. हे ज्ञान चंद्राकडून प्राप्त झाले. सूर्य - सूर्याकडून अनासक्त परोपकार व उपाधीमुळे होणारी भेदप्रतीती हे ज्ञान प्राप्त झाले. उपाधीमुळे भेदप्रतीती म्हणजे सूर्याची विविध ठिकाणी विविध प्रतिबिंब त्या उपाधीमुळे वेगवेगळी दिसतात. तव्दतच आत्मतत्त्व एकच असून गुणसंगाने म्हणजेच उपाधीमुळे भेदमय दिसते. कपोल (कबूतर) - कपोलाचे घरटे ज्या झाडावर होते त्याच झाडाखाली पारध्यांनी जाळे त्याच्या पिल्लांना पकडले. त्यांची आई व कालांतराने कपोल त्यांना सोडविण्याच्या आसक्तीने त्या जाळ्यात अडकतात. आसक्तीमुळे आपला घात होऊ नये म्हणून मी अनासक्तीचे ज्ञान कपोलापासून घेतले व अनासक्त झालो. अजगर - कोणत्याही चवीच्या आहारी न जाता विविध शात्मिकेत त्यात समाधान मानण्याचे ज्ञान मला अजगराकडून प्राप्त झाले. समुद्र - बाहेर अथांग व आत गंभीर, बाह्य संगाने क्षोभणारा. आपणही बाह्य विषयांती क्षोभ न होता परमात्माच्या चिंतनात गंभीर रहावे, हे समुद्राकडून शिकता आले. पतंग - दीपाच्या सौंदर्यावर मोहित होऊन दीपावर झेप घेऊन आपला प्राण गमावतो. तसे फसव्यामध्ये मायेच्या सौंदर्यावर आसक्त न होण्याचे ज्ञान मला पतंगाकडून मिळाले. मधुहा (मधुकुंद) - फुलांना जराही न दुखावता मध गोळा करतो. तद्वत् एकावरच भार न टाकता कल्पा माधुकरी मागून उपजिविका करण्याचे ज्ञान मला भ्रमराकडून प्राप्त झाले.

हत्ती - लाकडाच्या तीणीवर भुलून खडय़ात पडून पराधीन होतो तव्दत् स्त्री मोहाने येणारी पराधीनता टाळावी हे ज्ञान मला हत्तीकडून मिळाले. मधमाशी - संग्रह न करण्याचे ज्ञान मला प्राप्त झाले. कारण मधमाश्या मधाचा संग्रह करतात. मधमाश्यांना मारून शेवटी तो मध भिल्लच लुटून नेतात. हरिण - पारध्याच्या नादलुब्ध तालाला भुलून हरिण पकडले जाते. म्हणून विकारो जनक गोष्टीपासून दूर रहाण्याचे ज्ञान मला प्राप्त झाले. मासा - आमिषाच्या लोभाने गळाला अडकून प्राण गमावतो. म्हणून रसना जिंकून आत्मोन्नती साधण्याचे ज्ञान मला प्राप्त झाले. पिंगळा - वेश्या देहविक्रीस तयार झाली पण गिऱ्हाईक न मिळाल्याने वैफल्य ग्रस्तेत तिला निवैद्य बुद्धी प्राप्त झाली. त्यात तिला जे गीत सुचले त्याचा अर्थ असा की अमंगल देहाचे विकार जरी क्षणोक्षणी बदलत असले तरी आत्मा मात्र सदास्थिर मंगलमय असतो आणि तोच खरा नियंता पती आहे. त्यामुळे परपुरुषापासून मी सौख्याची अभिलाषा करणे किती मूर्खपणाचे आहे. त्यामुळे आता मला विधीवशात जे प्राप्त होईल त्यात मी समाधानी राहील. अशा दृढ निश्चयाने शांत झोपी गेली. त्यामुळे तिच्यापासून मी आत्मतत्त्वात स्थिर राहण्याचा बोध घेतला. कुरार पक्षी - आवडत्या वस्तूच्या साठ्यांमुळे मनुष्याला दु:ख प्राप्त होते हे मी कुरार पक्षाकडून शिकलो. कुरार पक्षाच्या चोचीत मासाचा तुकडा होता. तोवर इतर पक्षी त्याच्यावर तुटून पडत होते. पण तो तुकडा टाकून देताच तोच सुखी झाला. बालक - बालकाला कसलीच काळजी नसलेल्या व आपल्यातच रममाण झालेल्या त्याच्याकडून मी आत्म्यानंदात राहण्यास शिकलो. एक कुमारी - तिच्यापासून एकांत सेवनाचा बोध मी घेतला. मागणी घालायला आलेल्या पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था करतांना कंकणाचा आवाज होऊ नये यासाठी एकच कंकण हातात ठेवले त्यापासून मी बोध घेतला की अनेकजण असले तर गडबड गोंधळ होतो व दोघे असले तर गप्पा-गोष्टी होतातच. म्हणूनच साधकाने एकांत सेवन करावा. शरकृत (बाण तयार करणारा कारागीर) - बाण तयार करीत असताना त्यात तो इतका तल्लीन झाला होता की, त्याच्या समोरून वाजतगाजत राजाची मिरवणूक गेली तरी जराही विचलित न होता आपल्या कार्यात व्यस्त राहिला. त्याच्याकडून मी आत्मनंदात तल्लीन राहण्याचा बोध घेतला. सर्प - स्वत:चे घर नसलेला अनिकेत पण सदैव सावध राहून गुप्तपणे वावर करणारा प्राणी. त्याच्यापासून देहाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव ठेवून गृहादी संग्रहाच्या फंदात न पडता सदैवनाम स्मरणात सावध राहून साधना करावी हा बोध मी घेतला. कोळी (उर्णनाभी) - स्वत:च्या बेंबीतून तंतू काढून स्वत:चे विश्व निर्माण करतो. त्यात इतरांना अडकवतो पण स्वत: मात्र अडकत नाही. परमेश्वरही याच मायेपासून विश्व निर्माण करतो. अज्ञानी जिवांना अडकवतो. पण स्वत: कधीच अडकत नाही हे ज्ञान मी त्यांच्याकडून घेतले. कुंभारमाशी - आपल्या घरात कीटक आणून बंदिस्त करून ठेवते. कीटक भयाने कुंभारणीच्या चिंतनात मग्न होतो. त्यामुळे तो स्वत:च कुंभारमाशी बनतो. त्याच्यापासून हे ज्ञान प्राप्त झाले की सतत ईश चिंतनात केल्यास आपणही ईश्वराला मिळणार. 

ज्या गुरूंकडून मी जे शिकलो ते मी तुला सांगितले, पण स्वदेहाकडूनही खूप काही शिकलो. अनेक स्त्रिया असलेल्या पुरुषांची जशी ओढाताण होते तशीच ओढाताण माझा देह म्हणणाऱ्यांची इंद्रियांच्या विविध प्रकारच्या विषयांच्या ओढीमुळे होते. ते ध्यानात घेऊन मी विवेकवैराग्य धारण करण्याचे स्वदेहाकडून शिकलो. स्वत:ला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडण्याचा हा एकमेव मार्ग आहे, असे श्री दत्तात्रय म्हणतात. 

सर्व संतांनी व महानुभावांनी गुरुंची माहिती सांगितली आहे. आपल्या जीवनातील अशा सर्व गुरुंना खालील श्लोकाने वंदन करु या !   

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । 
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ॥ 

सियावर रामचंद्र कि जय ! गोपालकृष्ण भगवान कि जय ! 
सद्गुरु सखाराम महाराज कि जय ! 

विश्वाची चिंता करणारे समर्थ रामदास स्वामी !


जगी सर्व सूखी असा कोण आहे
विचारे मना तूचि शोधून पाहे
मना त्वाची रे पूर्वसंचीत केले
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ||


जय जय रघुवीर समर्थ ! 

श्री समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्राला लाभलेले सद्गुरु होत. आजही त्यांचा उपदेश इतर सर्व संतांप्रमाणे महाराष्ट्राला जागृतीचे धडे देत आहे. जो गुरु आत्मज्ञानाचे दर्शन घडवून देतो तोच खरा गुरु  असे शास्त्र सांगते. सर्व काही नष्ट झाल्यावर जे उरते तोच आत्मा. त्या आत्म्यालाच ब्रह्म असे म्हणतात. त्याच परब्रह्माचे दर्शन श्री समर्थांनी महाराष्ट्राला करून दिले आहे. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयात ते ठायीठायी दिसते. त्यांनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टींची अनुभूती घेतली त्या सर्व गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्या आहेत. मानवी जीवन व मन अद्भुत आहे. या दोन्हीसाठी लागणाऱ्या गोष्टी त्यांनी आपल्या वाङ्मयातून लिहिले आहे. आपल्या स्वयं उद्धारासाठी या गोष्टी नक्कीच लाभदायक ठरतील असा विश्वास आहे. कारण त्यांनी मांडलेल्या गोष्टी स्वतःवर केलेल्या प्रयोगांवर आधारित आहे. त्यांची बुद्धी सूक्ष्म होती व प्रतिभा जागृत होती म्हणूनच त्यांचे अनुभवविश्व व्यापक, रसाळ, कालातीत आहे. त्यांचे जीवन दर्शन आपल्याला त्यांच्या श्रेष्ठतम असलेल्या दासबोध ग्रंथात दिसते. 

समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च . १६०८, जांब, महाराष्ट्र - १३ जानेवारी. १६८१ , सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते.  त्यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी व राम जन्माच्याच वेळेस झाला आहे. समर्थ रामदास स्वामी रामाची आणि हनुमंताची उपासना करणारे होते. सूर्योपासक घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांची शिकवण देणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करीत महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. रामदास स्वामी आणि संत तुकाराम हे समकालीन होते. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. समाजाला उपदेश करण्यासाठी समर्थांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. श्रवण, मनन व चिंतन केल्याने ज्ञानाची वृद्धी होते. अज्ञानाचा अंधार दूर होतो. त्यातूनच मनू ब्रह्मज्ञानी होतो. या ज्ञानदृष्टीचा लाभ होण्यासाठी दासबोध आणि त्याद्वारेच संसाराची फलश्रुती होऊ शकते. मात्र याचा अनुभव प्रत्येकाला स्वतःलाच घ्यावा लागेल असे समर्थ रामदास सांगतात.  'मानवी जीवनातील नैराश्य घालवून चैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ्य दासबोधात आहे. सूर्यनमस्काराचे महत्व सांगत आरोग्याचा गुरुमंत्र त्यांनी दिला आहे. यातून रामदास स्वामींनी सर्व जाती-पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना, संसारी साधकांना, सर्वसामान्यांना, प्रौढांना, बालकांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. दासबोध ग्रंथाची अनेक ठिकाणी आजही पारायणे केली जातात. दासबोधात सर्व अध्यात्मिक ग्रंथांचे सार आहे, असेही म्हटले जाते. यासाठीच त्याला ग्रंथराज म्हटले जाते. पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे.

लहानपणी खोडकर वृत्ती असलेल्या नारायणाला साहसी खेळांची विशेष आवड होती. झाडावरून उद्या मारणे, पूर्ण पोहणे, गोडे सवारी या गोष्टींमध्ये ते तरबेज होते. समर्थ निसर्गप्रेमी होते. नद्यांचा उगम अथवा संगम ही त्यांची आवडीची ठिकाणे होती. विविध प्रकारचे मित्र जोडण्याची कला होती. त्यांच्या सहवासात या मित्रांच्या कुटुंबांच्या व्यवसायाचे निरीक्षणे व अनुभवाने त्यांनी सर्व गोष्टीं लहानवयातच आत्मसात केल्या. आईने त्यांच्या या खोदकारपणामुळे रागविल्याने ते एकदा लपून बसले. काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडल्यावर आईने विचारले  "काय करीत होतास ?" त्यावर त्यांनी दिलेले उत्तर होते  "आई, चिंता करितो विश्वाची". आईला दिलेला शब्द पळत विवाहाच्या बोहल्यावरुन पळून गेलेल्या समर्थांनी त्यानंतर पायी चालत पंचवटीस येऊन रामाचे दर्शन घेतले. त्यानांतर टाकळी येथे १२ वर्षे तपश्चर्या केली. येथील शांत व प्रसन्न वातावरण यासाठी त्यांना योग्य वाटले असावे.  या काळात ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार त्यानंतर सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहू दोन तास गायत्री मंत्राचा जप तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत. रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर आपल्या कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले असे मानले जाते. दुपारी केवळ ५ घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत,  त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच 'करुणाष्टके' होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्वाचे स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. स्वयंप्रेरणेने त्यांनी स्वतःचा विकास या कालखंडात करवून घेतला. तेथेच त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता.

समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले व आत्मसाक्षात्कार झाला. ‘ भारत-भ्रमण करीत असता श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरु हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. हरगोविंदसिंगांबरोबर १००० सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारले - " आपण धर्मगुरू आहात. या दोन-दोन तलवारी आपण का बाळगता ?" तेव्हा गुरु हरगोविंद म्हणाले - " एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी". समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले - "आणि हा सारा फौजफाटा ?" त्यावर हरगोविंद म्हणाले - " धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे , केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे. या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे.'समान-शीले-व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने दोघांत सख्य झाले. समर्थ गुरु हरगोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले. तिथे ते दोन महिने राहिले.तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले.... त्याला ते गुप्ती म्हणत. बाहेरून दिसायला कुबडी. जप करतांना या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे. कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे.समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पहायला मिळते. भारत प्रवास करीत असतांना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत."समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती. त्यापाठोपाठ गुरु हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली.

समर्थांनी ११ मारुतींची स्थापना केली. गावोगाव मारुतीची देवळे बांधली. मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींची देवळे याच परिसरात आहेत. भारत प्रवास करतांना शेवटी समर्थ पैठणला आले. पैठणला ते एकनाथांच्या वाड्यातच उतरले. त्यानंतर आपल्या जन्मगावीही ते गेले. तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही. आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. तेथे  समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले. नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला. २४ वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले, असे मानले जाते.

मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगूळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपाची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, काखेस झोळी, अशा थाटात समर्थांची रुबाबदार आणि दुसऱ्यावर छाप पाडणारी मूर्ती संचार करीत असे. “शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठापरी ज्ञान योगेश्र्वराचे। कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।” हा श्लोक वामन पंडितांनी समर्थ रामदासांना उद्देशून लिहिला आहे.  समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्‌मय निर्मिती केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र,अनेक आरत्या उदाहरणार्थ 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची', 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा', 'दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी' , 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी' ही मारुतीची आरती म्हणताना तर अंगात वीरश्रीचा संचार होतो. या त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या आरत्यांनी घरांघरांत स्थान मिळवले आहे. 

एका दृष्टीने समर्थांच्या शिकवणुकीचे सार केवळ काही शव्दांत सांगता येते - कर्म ,उपासना, ज्ञान, विवेक. भक्ती, प्रयत्‍न व सावधानता. समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला; कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची, वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनांत ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले - जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।। प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल. 

समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा संप्रदाय आहे.[१०] समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवाजीच्या काळात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या कवींनी व कवयित्रींनी विपुल लेखन केले आहे. या संप्रदायाची बहुतेक हस्तलिखिते धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात ठेवली आहेत. त्यांचा शोध घेऊन संग्रह करण्यासाठी समर्थ भक्त शंकरराव देव यांनी अपार परिश्रम केले. त्यामुळे हा मौलिक संग्रह आजवर टिकून राहिला.

समर्थांनी त्या काळी ११०० मठ स्थापन केले आणि सुमारे १४०० तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांचे काही शिष्य गृहस्थाश्रमी होते, तर काही शिष्य ब्रम्हचारी होते. कल्याणस्वामी रामदासांचे पट्टशिष्य होते. ज्या वेळी एखाद्या शिष्याची महंतपदी नियुक्ती होत असे त्या वेळी त्या शिष्याची कसून परीक्षा घेतली जाई. समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा असे. दासबोधाचे नुसते पारायण करून भागत नव्हते, दासबोध समजावून घेण्यावर समर्थांचा भर होता. अनेक महंतांचा दासबोध कंठस्थ होता. शिष्याची परीक्षा घेण्याची समर्थांची पद्धत मोठी विलक्षण होती. त्यावेळी ग्रंथ छापले जात नसत. हाताने लिहून ग्रंथांचा नकला केल्या जात. छापील नसल्यामुळे ग्रंथ बांधलेले (बाइंडिंग केलेले) नसत. पानांवर पृष्ठांक देखील नसायचे. अशा वेळी समर्थ त्या शिष्याकडून त्याने लिहिलेली दासबोधाची पोथी मागवून घेत. पत्त्याप्रमाणे पिसून पोथीची सर्व पाने विस्कळीत करत आणि मग शिष्याला सगळा दासबोध पुन्हा व्यवस्थित लावून ठेवायला सांगत. ज्या शिष्यांचा दासबोध कंठस्थ नसे त्यांना पोथी जुळवायला फार वेळ लागे. अशा शिष्याला महंत म्हणून किंवा मठपती पदी नियुक्त केले जात नसे. ज्याला पोथी लावायला विलंब झाला त्यांची निर्भत्सना करताना समर्थ म्हणत," याने दासबोध वाचला नाही केवळ गंधफुले वाहून पूजला."त्या वेळी समर्थांचे शिष्यांना सांगणे होते की, जो कोणी दासबोध ग्रंथाचे वाचन करील, तो ग्रंथ नीट समजावून घेईल आणि त्यानुसार आचरण करेल, अशा माणसाला मोक्ष मिळेल. त्यासाठी वेगळा गुरू करण्याची गरज नाही. ग्रंथ हेच गुरू होत.

जय जय रघुवीर समर्थ ! 

Thursday 2 July 2020

नामयाची दासी संत जनाबाई !


रामकृष्ण हरि ! 

विठु माझा लेकुरवाळा
संगे गोपाळांचा मेळा

निवृत्ती हा खांद्यावरी
सोपानाचा हात धरी
पुढे चाले ज्ञानेश्वर
मागे मुक्ताबाई सुंदर

गोराकुंभार मांडीवरी
चोखा जीवा बरोबरी
बंका कडेवरी
नामा करांगुली धरी

जनी ह्मणे गोपाळा
करी भक्तांचा सोहळा

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या निस्सीम भक्तांच्या पंक्तीत अग्रक्रमाने नाव घ्यावे लागेल अशा संत म्हणजे संत जनाबाई ! सामान्य कुटुंबात जन्मलेल्या व आयुष्यभर मोलकरणीचे काम करणाऱ्या मराठवाड्यातील गंगाखेडच्या जनीने आपली ओळख संत जनाबाई केली. संत ज्ञानदेव - विसोबा खेचर - संत नामदेव यांच्या गुरु परंपरेतील संत जनाबाई ! पारमार्थिक गुरु  ­संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सायंकाळी सर्व संतांनी त्यांनी प्रत्यक्ष पहिले. ‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा त्यांचा सुप्रसिद्ध अभंग. संत नामदेवांमुळे त्या कायम संतांच्याच सहवासात होत्या. संत जनाबाईंच्या नावावर सुमारे ३५० अभंग सकल संत गाथेत समाविष्ट आहेत.  त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यान रचना पण त्यांच्या नावावर आहे. घरातील कामे करतांना त्या कायम पांडुरंचेच नामस्मरण करीत असत.

त्यांचे अभंग हें भगवंतांच्या प्रेमाने ओतप्रोत भारलेले आहेत. लौकिक आणि ऐहिक सुखाच्या पलीकडे जाऊन त्या पांडुरंगाला शरण गेल्या आहेत. त्यांच्या जीवनातील प्रत्यक्ष आलेले अनुभव व त्याचे भव त्यांच्या विविध रचनांमधून पाहावयास मिळतात. संत नामदेवांवरील प्रेम व भक्तिभाव यासह तात्कालिक विविध संतांच्या भावविश्वासह विठ्ठलाचं भक्तिभाव त्यांच्या अभंग वा ओव्यात दिसून येतो. अन्य संतांप्रमाणे अतिशय अधिकारवाणीने त्या आपल्या पांडुरंगशी भांडतात. ‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. तत्कालीन संत व सत्पुरुषांच्या जीवनावर व गुणांवर आधारावर रचना त्यांनी साकारल्या व त्या आजच्या पिढीला मार्गदर्शक आहेत. त्यांची साधी, सोपी व सरळ भाषा सामान्यजनांच्या हृदयाला भिडते व आपलीच वाटते. त्याचे अनेक अभंग नामदेवांच्या गाथेत आहेत. 

विठ्ठल भक्त व दरवर्षी पंढरीची वारी न चुकता करणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला.  समाजाच्या खालच्या वर्गातून आलेल्या व भागवद्भक्तीने आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या संत जनाबाई संत नामदेवांच्या कुटुंबातील एक घटक होत्या. संत जनाबाईंच्या आयुष्यात पंढरपूर, पांडुरंग व संत नामदेव यांचे विशेष महत्व आहे. पंढरपुरात वास्तव्य असल्याने त्यांना विठुरायाचे रोज दर्शन घडायचे. नामदेवांच्या घरी पांडुरंगाचा सातत्याने गजर होत असे.  नामदेवांच्या सहवासात त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास घेतला त्यांनाच आपले पारमार्थिक गुरु बनले. गुरुंवरील श्रेष्ठ भव हि त्यांची शक्ती होती. संत नामदेवांच्या भक्तीच्या मार्गावर आयुष्यभर मार्गक्रमण करणाऱ्या व श्रेष्ठ गुरुभाव जपणाऱ्या संत जनाबाईंना नामयाची दासी म्हणूनही ओळखलं जातं. अखेरच्या क्षणापर्यंत त्या आपल्या गुरूंची सावली बनून राहिल्या. नामयाच्या पायरीवर विसावून त्या पांडुरंगात विलीन झाल्या. अभंग, गवळणी, ओव्यांच्या रुपात अजूनही संत जनाबाई खेडोपाड्यांतील घराघरांत जागती आहे. लाडक्या जनाईच्या आठवणी तिच्या भक्तांनी जीवापाड जपून ठेवल्या आहेत.

संत बनलेल्या जनाबाईची गंगाखेडमधील गावकऱ्यांनी समाधी बांधलीय. जनाबाईला जातं ओढू लागणार्‍या देवाची मूर्ती इथं दिसते त्याचप्रमाणे तिच्या सर्व घरकामांत मदत करणारा विठूराया भिंतीवरच्या चित्रांमध्ये दिसतो. दासी जनीचं संत कबिरांनी केलेल्या कौतुकाचा प्रसंगही इथं चितारण्यात आलाय. दासी म्हणून राहिलेल्या जनाबाईंच्या वाट्याला खूप काबाडकष्ट आले. पण तिला या कामांमध्ये मदत केली प्रत्यक्ष विठूरायानं. जातं, मडकी, गोवर्‍या असा सगळा जनीचा संसारच पंढरपूरकरांनी इथं जपून ठेवलाय. तिचा हा संसार पाहिल्याशिवाय वारकरी पंढरपुरातून परतत नाहीत. तिच्या लोकप्रिय अभंगामुळे त्या ख्याती प्राप्त झाल्यात आणि संत कबीरांना तिला भेटायची इच्छा झाली व ते पंढरपुरात आले. गोवऱ्यांवरून भांडतांना त्यांनी पाहिले व गोवऱ्या नक्की कोणाच्या याचा न्यायनिवाडा करायची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यावेळेस जनाबाईंनी माझ्या गोवऱ्यांमध्ये आपणास विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल सांगितले व त्याची प्रत्यक्ष अनुभूती संत कबीरांना आली  व संत जाणाईची माहिती कळाली. पांडुरंगाच्या मंदिरातील दागिने चोरल्याचा आळ घेण्यात आला त्यावेळेस तिला शिक्षा देण्यात आली त्यावेळेस प्रत्यक्ष पांडुरंग तेथे प्रकट झाले.  या दोन्ही गोष्टींतील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन आहे. नामस्मरणाने आपल्याला सर्वत्र परमेश्वराची अनुभूती येते हेच यावरून लक्षात येईल. 

ज्ञानबोधकार संत मुक्ताबाई !


संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव यांची धाकटी बहीण आणि मराठी संत कवयित्री म्हणजे संत मुक्ताबाई. ज्ञानदेवांच्या भेटीस आलेल्या अहंमन्य नामदेवांचे उघडे केलेले अज्ञानाविषयी एक गोष्ट सांगितली जाते तिचे त्या प्रसंगी जाणवलेले प्रभावी व्यक्तिमत्त्व पाहूनच नामदेवांनी तिच्याविषयी 'लहानशी मुक्ताबाई जैसी सणकांडी । केले देशोधडी महान संत' असे उद्‌गार काढले. चांगदेवांना संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या चांगदेव पासष्टी या पत्राचा अर्थ त्यांनी समजावून सांगितला. चांगदेव पुढे तिचा शिष्य झाला व दोघांतील हा गुरु-शिष्य-संबध दोघांनीही आपापल्या अभंगातून व्यक्त केला आहे. नामदेव-चांगदेव ह्या दोघांनी त्यांचा गौरव केला. संत मुक्ताबाईंचा अध्यात्मिक अधिकार खूप मोठा आहे. संत नामदेवांनी त्यांचा उल्लेख मूळमाया तर संत जनाबाईंनी त्यांना आदिशक्ती संबोधले आहे. 

संत मुक्ताबाई म्हटले कि आठवतात ते ताटीचे अभंग. संत ज्ञानेश्वरांना कुणी मनाला लागेल असे बोल बोलल्याने त्यांनी स्वतःला खोलीचे दार बंद करुन कोंडून घेतले. रुसून बसलेल्या ज्ञानेश्वरांना मुक्ताईने "ताटी उघड ज्ञानेश्वरा"  म्हणून आळविले. त्यांच्या या अभंगांचा आशय असामान्यच ! ताटी म्हणतांना झोपडीचे दार नव्हे तर मनाचे , बुद्धीचे दार म्हणते. ज्ञानदेवांची समजून काढण्याचे काम त्या अतिशय तळमळीने करतात. "योगी पाव मनाचा | साही अपराध जनांचा || विश्वारंगे झाले वन्ही | संत सुखे व्हावे पाणी || अशी त्या सुरवात करतात आणि शेवटी म्हणतात लडिवाळ मुक्ताबाई | जीव मुद्दल ठायीचे ठायी | तुम्ही वारुणी विश्वातर | ताटी उघडा उघडा ज्ञानेश्वरा ||. त्यांचे कूट अभंगही प्रसिद्ध आहेत. वारकरी पंथातील संत मुक्ताबाई योगमार्गावरील आपला अधिकार सिद्ध करतात. मुक्ताईच्या काव्यात तिच्या जीवनाचे व प्रतिभेचे अनेक पैलू उठून दिसतात. अंधपणामुळे वाया जात असलेल्या या मुक्ताईला निवृत्तिराजाने सावध केले व त्यामुळे 'मुक्तपणे मुक्त । मुक्ताई पैं रत । हरिनाम स्मरत । सर्वकाळ ।' अशी आपली अवस्था होऊन गेल्याचे ती सांगते. तिच्या अभंगात योगाच्या खुणा आहेत, अध्यात्माची उंची आहे, साक्षात्काराचे पडसाद आहेत, हे सर्व खरे; पण त्याबरोबरच त्यांत हृदयाचे मार्दव आणि भावनेची हळुवारताही आहे. तसे पाहिल्यास तिचा स्वभाव सोपानदेवाप्रमाणे थोडा परखड दिसतो. मुंगी उडाली आकाशी । तिने गिळिले सूर्यासी ।  असे तिचे एक वचन आहे. हे तिला स्वतःलाही लागू पडते. खानदेशात तापीच्या काठचे मेहुण येथे त्यांची समाधी आहे. नामदेवांच्या म्हटल्या जाणाऱ्या काही आत्मचरित्रपर अभंगांवरून असे मानले जाते. 

(संकलनावर आधारित) 

रामकृष्ण हरि ! 

Wednesday 1 July 2020

संत शिरोमणी नामदेव महाराज !


रामकृष्ण हरि ! 

विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो । 
तुटला हा संदेहो । भवमूळ व्याधीचा ॥१॥ 
म्हणा नरहरि उच्चार । कृष्ण हरि श्रीधर । 
हेचि नाम आम्हां सार । संसार तरावया ॥२॥ 
एकतत्त्व त्रिभुवनीं । हेंचि आम्हां हरिपर्वणी । 
गाइली जे पुराणीं । वेदशास्त्रांसहित ॥३॥ 
नेघों नामेंविण कांहीं । विठ्ठल कृष्ण लवलाही । 
नामा म्हणे तरलों पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणतांचि ॥४॥

संत शिरोमणी नामदेव महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक होते. मराठी भाषेतील सर्वाधिक जुन्या काळातील एक श्रेष्ठ कवी. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. संत नामदेवांना प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारा श्रीविठ्ठलाच्या जवळचा सखा मानले जाते. समाजातील भावनिक एकात्मता साधण्यासाठी संत नामदेवांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी केले. त्यामुळेच पंजाबी बांधवांना ते आपले वाटतात. आजही शीख बांधव त्यांचे 'नामदेव बाबा' म्हणून गुणगान करतात. पंजाब व महाराष्ट्रातील कीर्तनात आपल्याला साम्य दिसते. पंजाबातील घुमान (अलीकडेच या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले आहे)  येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. त्यांचे अनेक शिष्य पंजाबात होते. राजस्थानातील शीख बांधवांनीही संत नामदेवांची मंदिरे उभारलेली आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे त्यांनी भागवत धर्माचा प्रचार केला व प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड कार्य समर्थपणे केले. यासाठीच त्यांना `संत शिरोमणी' म्हटले जाते. 

८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या संत नामदेवांचा जन्म मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी (आज हे गाव नरसी-नामदेव नावाने प्रसिद्ध आहे) येथे झाला. त्यांचे बालपण पंढरपुरात गेले. त्यांना लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीची गोडी होती. विसोबा खेचर हे संत नामदेवांना आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले. त्यांनी मराठी सोबतच हिंदी व पंजाबी भाषेतही रचना केल्या आहेत. संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) , हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) व त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी विविध गाथांतील अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी त्यांच्या नावाने "पायरीचा दगड' आहे. मंदिरात येणाऱ्या भगवंतांच्या भक्तांचा व साधू संतांच्या चरणधुळीचा स्पर्श व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती. 

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समाजाला समता आणि परमेश्वराच्या भक्तिची शिकवण दिली. संत नामदेवांनी संतांचा महिमा अतिशय रसाळ पद्धतीने वर्णन केला आहे आणि तो एकमेवाद्वितियच आहे. त्याच्या गंगामाहात्म्यातून गंगेचे छान वर्णन केले आहे आणि भक्तांना गंगास्नानच झाल्यासारखे वाटते. पांडुरंगाशी सलगी असलेल्या या संताने समाजातील दैन्य दुःखाप्रसंगी, अन्याय अत्याचारप्रसंगी पांडुरंगाने काही केले नाही तर त्याला अनेक प्रश्न विचारले आहेत. प्रसंगी त्याच्यावर रागावलेले आहेत. असेच एकदा मावळ प्रांतात दुष्काळ पडला त्यावेळेस ते त्याला विचारतात. 

काय तुज देवा आले थोरपण । दाविशी कृपण उणें पुरें ॥
पुरे आतां सांगों नको बा श्रीहरी । गोकुळा भीतरीं खेळ मांडी ॥
हलाहल शांत करी तत्क्षण । अमृत जीवन नाम तुझें ॥
तुझें नाम सर्व सदा गोपाळासी । नामा म्हणे यासी काय जालें ॥

दुष्काळ संपेना आणि माणसांचे कष्ट सुद्धा वाढतच चालले, तेव्हा नामदेव आणखी चिडले आणि म्हंटले... 

निर्गुणपणाच्या घेसी अभिमाना । तुजनारायणा सोडीना मी ॥
काय तुझी भीड धरावी म्यां आतां। कृपाळू अनंता म्हणें नामीं ॥

ज्या भगवंताची आपण निस्सीम सेवा करतो, भक्ती करतो त्याच्यावर प्रेम करतो त्यावरच आपला हक्क असतो आणि प्रसंगी असे बोल लावता येतात हे आपल्या लक्षात येईल. हातात एक तारी आणि चिपळ्या घेऊन फिरतानाचे नामदेवांचे चित्र आपण नेहमीच पाहतो. पण या शांत दिसणाऱ्या चेहऱ्याच्या मागे एक माणूसही आहे. परमेश्वराने आपल्या प्रश्नाला उत्तर दिले नाही किंवा समाजातील अप्रिय गोष्टींना अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिला नाही तर त्याला जाब त्यांनी विचारला आहे. त्यांना समाजातील पीडितांची दुःखे ठाऊक होती आणि म्हणूनच त्या संवेदनशीलतेतूनच अशा रचना तयार झालेल्या आपल्याला पाहता येईल. समाजातील विविध समस्यांना उपाय त्यांनी सुचविला आहे. अनेक रचनांमधून त्यांनी समाजाला कर्मयोगाची शिकवण दिलेली आपल्याला दिसते. एका बाजूला चीड व्यक्त करणारे संत नामदेव दुसऱ्या बाजूला याच परमेश्वरावर भरवसा असल्याचेही म्हणतात. 

संसारी गांजलों म्हणोनि शरण आलों | पाठिसी रिघालों देवराया ||
कळिकाळा वास पाहूं तूं न देसी | भरंवसा मानसीं आहे मज ||
नामा म्हणे देवा स्वामिया तूं एक | आवडता सेवक करीं मज || 

गुरु ग्रंथसाहेबातील एका रचनेतील चरणात ते म्हणतात...

प्रणवै नामा ऐसो हरी ॥
जासु जपत भै अपदा टरी ॥

अशा हरीला नामा विनंती करतो ज्याचे नाम जप करता संकट टळते. संतांचे चरित्र वाचणे हे खरोखर एक वेगळी अनुभूती देणारे आहे. आपले संकट / समस्या सहज पळवून लावण्याची शक्ती व विश्वास ते देतात. काही काळ आपण एका भावविश्वात नक्की जातो. त्यांना एका लेखात बंधने फार कठीण काम आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आपल्याला त्याबाबत गोडी निर्माण करणारे नक्की आहे. आपणही या निमित्ताने त्याचा लाभ घ्यावा यासाठीच हे लेखन.... उद्याच्या लेखात आपण संत मुक्ताबाई, संत जनाबाई आदींबद्दल पाहू या !  (आमचे मित्र श्री. अनिल जोशी यांच्या सूचनेनुसार लेखाची सुरवात अभंगाने केली आहे. त्यांच्या सूचनेबद्दल धन्यवाद )

काल आषाढी एकादशीच्या निमित्ताने माझी कन्या कु. मृण्मयी कुळकर्णी हिने "सुखाचें हें सुख चंद्रभागे तटी..." या अभंगावर कथक नृत्य केले आहे. त्याची लिंक सोबत देत आहे अवश्य पहा, लाईक करा...


रामकृष्ण हरि !