Sunday 13 February 2022

मनीचा 'मृण्मयी' प्रवास समजून घेतांना !

माझी मुलगी मृण्मयीचा अर्थात मनीचा काल जन्मदिवस होता. १९ वर्षांपूर्वी आमच्या घरात तिचा जन्म झाला. आमच्या संपूर्ण परिवारात तशी मुलींची संख्या कमीच आहे. आम्हा तिघा भावांमध्ये मला एकट्यालाच मुलगी आहे. मुलं लहान असतांना त्यांना लाडाने वा प्रेमाने काही नावाने बोलावतो. आम्ही मृण्मयीला 'मनी' म्हणतो. जन्मदिवसाच्या निमित्ताने आपल्या पिल्लांचा प्रवास झर्रकन डोळ्यासमोरून जात असतो. कधी तरी आपल्या गत आयुष्याशीही त्याची स्वाभाविकपणे तुलना होते. मुलांना पालकांच्या गत आयुष्याची माहिती एव्हढ्या मर्यादित उद्देशाने हि तुलना योग्य आहे असे वाटते. मात्र मोठ्यांनी त्यातून अनेक बोध घेत आपली पुढची पिढी किती भाग्यवान आहे या दृष्टीने सकारात्मक शोध घेतला पाहिजे असे मला तिच्या प्रवासावरून वाटते. आमच्या मनीचा मृण्मयी प्रवास समजून घेतांना आलेले विचार मांडत आहे... 

मनीचा मृण्मयी प्रवास दोन अर्थाने मला समजावून घ्यावासा वाटतो. एक म्हणजे जबाबदार मुलगी आणि दुसरा अर्थ म्हणजे आनंदी (मृण्मयी) प्रवास. आमची मृण्मयी आता पुण्यात एकटी राहते (त्यात काय कौतुक असे वाटू शकते!) आणि एक जबाबदार मुलगी म्हणून राहते याचा विशेष आनंद आहे. प्रथमेश २२ वर्षांचा झाला त्यावेळेस "बाप २२ वर्षांचा होतांना..." असा एक लेख लिहिला होता कारण त्यावेळी तो घरापासून पहिल्यांदा नोकरीच्या निमित्ताने दूर गेला. मृण्मयीला शिक्षणाच्या निमित्ताने ३ वर्षे अगोदर दूर जावे लागले. हे पहिले वर्ष आहे कि तिने आईबाबांशिवाय आपला जन्मदिवस साजरा केला आणि म्हणूनच मला मनीच्या 'मृण्मयी' प्रवासाबद्दल थोडे लिहावे असे वाटले. 

आपण पालक वा व्यावसायिक म्हणून सुद्धा आपली जबाबदारी पार पडतांना चुका करतो, कोणाच्या तरी मार्गदर्शनाने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तसेच मुलंही चुका करतील, त्यांना हवे असेल त्यावेळेस आपण मार्गदर्शन करावे. अर्थात जबाबदार होण्यासाठी व तसा विश्वास आपल्याला वाटावा यासाठी मुलांच्या लहानपणापासून आपण अनेक गोष्टी केल्या पाहिजेत. त्यातील मला काही सुचतात त्या अशा...

१. जसे कधी तरी काका, मामा, मावशी वा आजी-आजोबा यांच्याकडे एखादा दिवस राहायला पाठविणे. 

२. घराजवळ असलेल्या दुकानातून वस्तू / भाजी आणण्यासाठी पाठविणे. यात व्यवहारासोबतच स्वतंत्रतेची सवय लागते. 

३. शाळेत शिकत असतांना सहलीला पाठविणे. परिस्थितीशी, व्यक्तींशी जुळवून घेण्याची शिकवण मिळते. सामाजिक जाणीव निर्माण होते. 

४. शाळेतील विविध स्पर्धा / उपक्रम यात सहभाग घेणे. यात क्षमता जाणून घेणे या शिवाय अन्य उद्देश नसावा. त्याचा उपयोग करिअर निश्चितीसाठी अधिक होतो

५. घरातील कामे करतांना त्यांचा सहभाग घेणे. स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लावणे. आरोग्याच्यादृष्टीने व्यायाम, आहार याकडे लक्ष देणे. 

६. योग्य वयात योग्य वस्तू देणे. आपली आर्थिक परिस्थिती असली तरी मोबाईल, वाहन यासारख्या वस्तू देतांना त्यांना त्या वापरण्यायोग्य तयारी करून देणे. येथे वयापेक्षा वस्तू हाताळण्याची क्षमता वाढविण्यावर भर असावा. 

७. वाचन, समाजात मिसळणे, छंद जोपासणे, स्पर्धांमध्ये भाग घेणे यासारख्या गोष्टी आपल्या हट्टासाठी नव्हे तर त्यांच्यातील सामाजिक गुण विकसित होण्याचा व पाल्य अधिक वैचारिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ व्हावा हा उद्देश असावा. 

८. आपल्याकडील वस्तू इतरांसोबत वाटून घ्यायला प्रोत्साहित करणे. समूहात राहत असतांना सोबतच्या व्यक्तींना माणुसकीच्या नात्याने वागविण्याची सवय लागते.

९. परिवारातील निर्णय घेत असतांना त्यांची मते विचारात घेणे.त्यांचा योग्य तो सन्मान राखणे. त्यांना काय समजते असे न मानता खुलेपणाने काही गोष्टींमध्ये त्यांची समज आपल्यापेक्षा जास्त आहे हे स्वीकारणे. 

१०. निर्णय घेण्यासाठी तयार करणे. चुकलेल्या निर्णयाची शिक्षा करण्याऐवजी काय चुकले याकडे विशेष लक्ष देणे. पुन्हा निर्णय घेऊन ती गोष्ट करण्यासाठी उद्यक्त करणे. एखादा गोष्ट जमलीच नाही तर पालकांनी अट्टाहास करू नये. 

मुलामुलींमध्ये भेद नको असे म्हणत असतांना मुलगी म्हणून थोडी अधिक काळजी पालकांना वाटते तशी मलाही वाटत असे. बापाच्या तर मुली विशेष लाडक्या असतात आणि त्यामुळे त्यांचे कोडकौतुक जरा अधिक होते हे नाकारण्याचे कारण नाही. अलीकडच्या काळात तांत्रिक व भौतिक संपदेचा विस्फोट झालेला आपल्याला दिसतो. या गोष्टी अंगिकारतांना त्याच्या फायद्यासोबत काही वैगुण्ये(दोष) येतातच. त्यातही त्यांचा अतिरेकी वापराने पालक अगतिक होतात. कोरोना व ऑनलाइनच्या काळात हि समस्या अधिक उग्र रूप धारण केलेली आहे. त्यासाठीच मुलाच्या वाढीच्या मूलभूत गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आपल्या पाल्यांच्या या प्रवासाकडे पाहतांना आपण 'प्रगती' आणि 'बदल' यातील फरक समजण्यासाठी वापर करावा. त्याबद्दलची आपली मते स्पष्ट आणि सहजरित्या मुलांना सांगितली पाहिजेत. मात्र योग्य ठिकाणी नकार द्यायला व नकार पचवायलाही शिकविले पाहिजेच. 

मनीच्या मृण्मयी प्रवासात पालक व परिवारजनासह,  शाळा, आचार्य व दीदी यांचा खूप महत्वाचा वाटा आहे. शाळेच्या बाबतीतही आजकालची मुले त्रुटींबद्दल स्पष्टपणे बोलतात त्यावेळी आपण चांगल्या गोष्टीकडे मुलांचे लक्ष वेधले पाहिजे. सार्वजनिकरित्या टिपण्णी करतांना प्रथम पालकांनी काही भान ठेवले पाहिजे. काही गोष्टी वास्तव असल्या तरी पाल्याच्या वयाच्यादृष्टीने बोलणे योग्य नसते. त्याबद्दल जाणीव करून देऊन बदल घडवून आणण्यात पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्रुटींबद्दल पालक सभांमधून वा वैयक्तिक भेटीद्वारे उपाय करण्याचा प्रयत्न करावा. वर्गातील मुलांमधील गोष्टींकडे पूर्वग्रहाने न पाहता  समस्या समजण्याकडे कल असावा. भांडण वा वादविवादाकडे अजिबात नसावा. ज्याची चूक असेल त्याला (आपला पाल्य असला तरी)  योग्य अशी समज द्यावी व यापुढे असे घडणार नाही वा करणार नाही असे आश्वासन घ्यावे.  विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षा (मार्क) त्याच्या क्षमता विकासाकडे अधिक लक्ष द्यावे. त्याच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्यावे. चाकोरीबाहेरची करिअर निवडतांना पालकांनी पाल्याच्या पाठीशी उभे राहावे. अनेकदा पालकांनाच बऱ्याच गोष्टी माहिती नसतात आणि त्यांच्या काळातील परिस्थितीनुसार निर्णय घेतला जातो वा त्याचा आग्रह असतो. (मृण्मयी पुण्यात कथ्थक विषयाचे पदव्युत्तर पदवी संपादनासाठी गेली आहे) 

मनीच्या मृण्मयी प्रवासातील पालक, शाळा, गुरुजन यांच्या इतकाच वाटा तिच्या जळगावातील गुरु प्रभाकर कला संगीत अकादमीच्या डॉ. अपर्णा भट-कासार यांचा आहे किंवा थोडा अधिक म्हटले तरी हरकत नाही. अभ्यास, सराव, शिस्त, संधी, कौतुक प्रसंगी वास्तवाची कठोरपणे जाणीव करून देण्याचे काम त्यांनी केले. त्याबद्दल आम्ही कधीही तक्रार केली नाही आणि त्याचा नक्की फायदा झाल्याचा आमचा अनुभव आहे. पालकांच्या परिघातील व्यक्ती, संस्था यांचाही मुलांच्या घडणीत खूप फायदा होतो. मुळात पाल्य जबाबदार होण्यासाठी पालकांनी जबाबदार झाले पाहिजे. त्यासाठी पालकांच्या बालपणीच्या वा त्यांच्या संगोपनाच्या गोष्टी आजच्या काळात तशाच लागू पडत नाही. त्यासाठी पालकांनी पालकत्वाचे धडे / प्रशिक्षण / कार्यशाळा यांचा जरूर लाभ घेतला पाहिजे. 

सर्वात महत्वाचे पालक म्हणून आई-बाबांमधील सुसंवाद अपेक्षित गोष्टी घडण्यासाठी उपयुक्त ठरतो. मुले जसजशी मोठी होतात तसतसा निर्णय प्रक्रियेत सगळ्यांचाच सहभाग असावा मात्र निर्णयाची जबाबदारी निश्चित करून घेतली पाहिजे. मुलांशी पालकांनी बोलतांना आपल्या जोडीदाराबद्दल मुलांच्या मनात अढी निर्माण होणार नाही याचीही काळजी दोघांनी घेतली पाहिजे. सर्वांनी एकत्र बसून विस्तृत चर्चा करून त्याद्वारे विसंवादाचे विषय हाताळले पाहिजे. विशेषतः पालकांनी वा मुलांनी केलेल्या चुका, वयात येत असतांनाचे विषय यावेळी हमखास खुली चर्चा फलद्रुप ठरते, वास्तव आणि आभासी जग, मूल्ये-तत्व आणि व्यावहारिक जगातील गोष्टी ज्यात तफावत दिसते त्यावेळी त्यातील फरक, मते व विचार सांगितले पाहिजे. त्यावर आधारित निर्णय सर्वथा पाल्यावर सोपविल्यास अनेक गोष्टी सुकर होतात. अर्थात पाल्याचा प्रवास जबाबदार व्यक्तीकडे होत राहतो. हि अखंड चालणारी प्रक्रिया आहे आणि कोणीही परिपूर्ण नाही याची जाणीव पालकांसह मुलांना व्हावी याउद्देशानेच मृण्मयीच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा लेख लिहिला आहे. आपल्या प्रतिक्रिया लाखमोलाच्याच...

(जाता जाता : निसर्गातील प्राणी, पक्षी आपल्या पिल्लांना कसे वाढवितात, त्यांना कसे सक्षम बनवितात याकडे डोळसपणे पाहिल्यास खूप गोष्टी शिकायला मिळतात हा माझा स्वानुभव आहे व त्यामुळे पालकांनाही निर्णय घेणे त्याबरहुकूम कृती करणे सोपे जाते.)


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 


24 comments:

  1. छान लेख .
    मृण्मयी व तिच्या आई बाबांचे अभिनंदन .!!!

    विजय कुळकर्णी .

    ReplyDelete
  2. अप्रतिम लेख! हा लेख माझ्या वाचनात किमान ७/८ वर्ष आधीच आला असता तर... असा विचार मनात येतोय.
    कु. मृण्मयी ला भावी वाटचालीस शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद

    ReplyDelete
  3. लेख खूप छान लिहीला आहे.
    श्री. गिरीश व सौ. आदिती वहिनींचे अभिनंदन!!
    मृण्मयीस भावी आयुष्याबद्दल व तिच्या करीअरबद्दल मनस्वी शुभेच्छा!
    राजेश कुळकर्णी

    ReplyDelete
  4. खूप छान लेख गिरीश, खूप अभ्यासपूर्ण आणि वास्तव लेखन केलेस, लहान मुलांच्या पालकांनी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी हा लेख वाचून काही चांगल्या गोष्टी अमलात आणता येतील असे मला वाटते.

    ReplyDelete
  5. व्वाह... खुपच छान लिहिलंय..
    प्रत्येक पालकाने जरुर वाचावा असा लेख.
    - प्रशांत मोराणकर

    ReplyDelete
  6. खरंच खूप छान लेख! या लेखातील मार्गदर्शक तत्त्वं पालकवर्गांसाठी उपयुक्त आहेत. छान लेख!
    - विवेक घाटे

    ReplyDelete
  7. श्री व सौ तुमचे दोघांचे अभिनंदन.
    मृण्मयीच्या भावी आयुष्याबद्दल व तिच्या करिअर बद्दल खूप खूप शुभेच्छा.लेख खूप छान आहे!

    ReplyDelete
  8. आपल्या संपूर्ण परिवाराचे खूप खूप अभिनंदन.... वास्तव व काल सुसंगत, मागदर्शन वजा लेख वाचायचे भाग्य आम्हाला आपल्या मुळे लाभले... आपल्या सारखे पालक व आपण दिलेले संस्कार या मुळे मृण्मयी भविष्यात खूप पुढे जाऊन नक्कीच यशस्वी होईल.. दिदिस खूप खूप शभेच्छा,🙏🙏💐💐

    ReplyDelete
  9. गिरीषराव छानच आणि पालकांसाठी खूपच मार्गदर्शक.

    ReplyDelete
  10. अगदी महत्वपूर्ण बाबी आपण लक्षात आणून दिल्या .
    पालक म्हणून प्रत्येकाने वाचायला हवा असा हा लेख आहे.
    मृण्मयीला वाढदिवसाच्या खूप - खूप शुभेच्छा !

    - आरिफ़ आसिफ शेख, जळगाव

    ReplyDelete
  11. एक परीपूर्ण पालक होण्यासाठी व पाल्यासाठी आपले अनुभव नक्कीच प्रेरणादायी ठरतील.

    ReplyDelete
  12. आपला लेख खुपच छान आहे. काल सुसंगत , मार्गदर्शक व वास्तव विचार आपण मांडले आहेत. सर्व पालकांना नक्कीच यातून काही शिकवण मिळेल.
    मृण्मयीच्या भावी आयुष्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.
    धन्यवाद..

    ReplyDelete
  13. "मनीचा मृण्मयी प्रवास समजून घेतांना" , हा लेख अत्यंत छान आहे . भाषा तर चांगलीच आहे परंतु संस्काराच्या दृष्टीनेही अतिशय छान आहे. पालकत्व कसे असावे याचे अतिशय छान उदाहरण श्री गिरीश गिरीश कुलकर्णी यांनी आपल्याद्वारे दिलेले आहे . मुलांचे पालन-पोषण करतांना , त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करवून घेताना , आवश्यक असणाऱ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत . त्या निश्चितच वाचकांना उपयोगी पडतील .
    प्राचार्य व्ही. आर. पाटील ,
    मुक्ताईनगर.

    ReplyDelete
  14. छान लेख, पालकांच्या दृष्टीने काही नवीन गोष्टी लक्षात घेण्यास उपयुक्त. खुप वेळा पालकत्व निभावताना आम्हाला स्वतःमध्ये बदल करावे लागतात, आदर्श उदाहरणे पाल्यांसमोर ठेवावी लागतात.
    श्री गिरीशजी मनःपूर्वक शुभेच्छांसह...💐

    ReplyDelete
  15. हेवा वाटावा असे छान मृण्मयीचे पप्पा आणि त्याचा लेख ...!👌👍 मृण्मयीस साऱ्या जगाला हेवा वाटवे असे यश,समृद्ध,प्रसन्न जीवन लाभावे या शुभेच्छा..!💐🎂

    ReplyDelete
  16. सर्वप्रथम मृण्मयी ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! माझी मुले सुद्धा 6-12 वर्ष वयोगटातील आहेत आपण लेखांत समाविष्ट केलेल्या गोष्टी नक्कीच मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी मला उपयोगी ठरतील व निश्चितच मी आचरणात आणेल. आपण पालकत्व म्हणजे काय हे आपल्या लेखाद्वारे आम्हांस अत्यंत सोप्या भाषेद्वारे कृतीत कशी आणावीत हे सांगितले आहे. धन्यवाद सर

    ReplyDelete
    Replies
    1. अशोक चौधरी, गांधी रिसर्च फाऊंडेशन, गांधी तीर्थ, जळगाव

      Delete
  17. सुंदर लेख.
    चि. मृण्मयी हीचे हार्दिक अभिष्ट चिंतितो

    ReplyDelete
  18. सुंदर लेख
    चि. मृण्मयी हीचे हार्दिक अभिष्ट चिंतितो

    ReplyDelete
  19. प्रत्येक पालकाला आणि पाल्यालाही बहुमोल मार्गदर्शन करणारा लेख.'मनी'ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि शुभाशीर्वादही 💐
    -अनिल रामभाऊ पाटील

    ReplyDelete
  20. सर्वप्रथम मृण्मयीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🌷🌷🌷
    सर अतिशय सुंदर लेख लिहिला आहे. मुलांना समजून घेण्यासाठी पालकांना त्यांंच्या सारखे होणे आवश्यक असते... खुपच सुंदर

    ReplyDelete
  21. नेहमीप्रमाणे खूप सुंदरपणे अनुभव शब्दबद्ध करताना सहजपणे पालकवर्गालाही मार्गदर्शन केले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. लेख तर उत्तम आहे पण पालकत्व विषयी मांडलेले विचार सुस्पष्ट व प्रत्येक पालकाला सखोल विचार करायला लावणारे आहे

      Delete
  22. वाचनीय लेख
    सुंदर मार्गदर्शन

    ReplyDelete