Friday 19 May 2023

आपण सर्व 'जीवरक्षक' !

रोटरी क्लब जळगावच्या कालच्या साप्ताहिक सभेत एका आगळ्यावेगळ्या विषयावर मार्गदर्शन / प्रशिक्षण देण्यात आले. दैनंदिन जीवनात येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत आपण कोणाचा तरी जीव वाचवू शकतो यासाठी हे प्रशिक्षण होते. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुपरिचित व अलीकडच्या काळात सामान्य माणसासाठी परवलीचा शब्द म्हणजे CPR अर्थात Cardiopulmonary resuscitation कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन ! हा शब्द अर्थात हे तंत्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि प्रत्येकाने आपल्या जीवनात आलेल्या आपत्कालीन परिस्थितीत या तंत्राचा आत्मविश्वासाने वापर करावा यासाठी हा लेख... आपण वाचा व इतरांनाही वाचण्यासाठी पाठवा !

एखाद्या आपत्कालीन परिस्थितीचा शिकार झालेल्या व्यक्तीला पुनर्जीवन मिळवून देणारे हे तंत्र असल्याने त्याला बेसिक लाईफ सपोर्ट असेही म्हणतात. एखादा व्यक्तीची जर श्वसन क्रिया आणि हृदयक्रिया बंद पडून तो बेशुद्ध झाला असेल तर त्याला देण्यात येणारा अतिमहत्वाचा प्राथमिक उपचार म्हणजेच बेसिक लाईफ सपोर्ट... यालाच CPR किंवा जीवन संजीवनी क्रिया असे म्हणतात. रामायणात हनुमानाने संजीवनी वनस्पती आणून लक्ष्मणाला जीवनदान दिले होते. तशाच प्रकारची आपत्कालीन परिस्थितील व्यक्तीला जीवनदान देणारे हे तंत्र आहे. १० पैकी ३ व्यक्तींना त्याचा फायदा होतो अर्थात त्यांना जीवनदान मिळते. 

एखादी घटना अनपेक्षितपणे घडल्यास माणसाला बऱ्याचदा काही सुचत नाही. मन शांत ठवून आपण काही प्राथमिक गोष्टी करू शकल्यास आपण त्या माणसाचा जीव वाचवू शकतो. बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा दवाखान्यात पोहचेपर्यंत, आहे त्याच ठिकाणी सामान्य नागरिकांनी मदत करणे अति आवश्यक आहे. या उपचाराने आपण त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. हृदय बंद पडलेल्या व्यक्तीमध्ये, ह्रदयातून मेंदू व इतर अवयवांकडे होणारा रक्तपुरवठा जर का ४ मिनिटात प्रस्थापित झाला नाही तर मेंदू कायमचा निष्क्रीय होतो. या अवघ्या ४ मिनिटात  बंद पडलेले हृदय किंवां त्याची स्पंदने कृत्रिमरीत्या का होईना सुरु ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी CPR सुरु ठेवणे गरजेचे आहे. 

CPR कोणीही करू शकतो. त्याला फारशा कौशल्याची आवश्यकता नसते. कोणीही जाणकार अर्थात CPR कसे द्यायचे हे माहित असलेला व्यक्ती छातीवर दाब व कृत्रिम श्वास देऊ शकतो. पुढील वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्या व्यक्तीची भूमिका महत्वपूर्ण ठरते. CPR केव्हा करावे ? याचे सोपे उत्तर आहे एखादी व्यक्ती बेशुद्ध आहे, तिची हृदयक्रिया व श्वसन क्रिया बंद आहे. अशा व्यक्तीला CPR करावे. जेव्हा परिस्थिती फारशी सुरक्षित न वाटल्यास किंवा माणूस प्रतिसाद देत असल्यास व शरीर थंड व कडक झाले असल्यास CPR करू नये. आपण CPR आहे त्याच जागी सुरक्षितता लक्षात घेऊन देण्यास सुरुवात करावी. जीवन संजीवनी क्रिया अर्थात CPR हि माणसाला जिवंत ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्रियांची शृंखला आहे. आठ वर्षावरील स्त्री-पुरुष यांच्यासाठी आपण हि क्रिया करू शकतो. 


CPR सुरु करण्यापूर्वी तो माणूस मूर्च्छित (बेशुद्ध) आहे का जागा (Cautious) आहे याची खात्री करा. सदर व्यक्ती श्वास घेते आहे किंवा नाही हे जाणून घ्या व तिसरी गोष्ट नाडीची ठोके किंवा हृदयाची धडधड सुरु आहे का याची खात्री करून घ्या. मगच CPR चा निर्णय घ्यावा. पिडीत व्यक्ती निश्चल आहे वा प्रतिक्रिया देऊ शकते का ते पहा. त्यासाठी त्याला खांदा हलवून आवाज द्या. “काका डोळे उघडा”.  प्रतिक्रिया नसल्यास, श्वास नसल्यास, हृदयाची स्पंदनं चालू नसल्यास सी पी आर सुरू करणे गरजेचे आहे हे लक्षात घ्या. नाडी बघण्यासाठी, मानेजवळ श्वासनलिकेच्या बाजूला कॅरोटीड (carotid) या धमनीला (रक्तवाहिनीला) हात लावून नाडी बघायला हवी... मदतीसाठी आवाज द्या. संबंधित व्यक्तीला जवळच्या हॉस्पिटलला किंवा १०८ ला फोन करण्यास सांगा. जवळपास कोणी डॉक्टर असल्यास त्यांना बोलवा.  

जीवन संजीवनी क्रियेत ३ महत्वाच्या पायऱ्या आहेत. त्याला CAB म्हणतात. म्हणजे Circulation  (रक्ताभिसरण), Airway (श्वसनमार्ग) आणि Breathing (श्वासोच्छवास). रक्ताभिसरणासाठी छातीवर दाब द्यावा. यासाठी व्यक्ती जमिनीवर असावी किंवा एखाद्या कडक – सपाट पृष्ठभागावर असावी. रक्ताभिसरण अखंडीत सुरु राहण्यासाठी छातीवर दाब देणे आवश्यक आहे. छातीच्या (बरगडीच्या) सर्वात खालच्या हाडाच्या दोन बोटे वरती हा दान देणे आवश्यक आहे. हाताची दोन्ही बोटे एकात एक गुंफून, कोपर सरळ ठेवून दोन्ही खांदे दाब द्यावयाच्या व्यक्तीच्या छातीवर असावेत. साधारणपणे एका मिनिटात १००-१२० वेळा दाब दिला पाहिजे. प्रत्येक ३० दाबानंतर छोटा पॉझ घेऊन CPR सुरु ठेवणे. साधारणपणे २  मिनिटात १५० वेळा दाब दिला गेला पाहिजे. छातीवरील दाबाचा भाग ५ सेंटीमीटर दाबला गेला पाहिजे. दाब सोडल्यानंतर छाती पूर्ववत झाली पाहिजे. दाब देण्याची क्रिया व्यक्ती शुद्धीवर येई पर्यंत वा तसा प्रतिसाद देईपर्यंत सुरु ठेवणे अपेक्षित आहे अन्यथा अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता कमी असते. दाब देत असतांना तो मोजला पाहिजे. आपण काही वेळात आपण थकणार असल्याने आजूबाजूच्या कोणा व्यक्तीला CPR देण्यासाठी तयार करणे. संबंधित व्यक्तीचा कोणताही प्रतिसाद मिळाल्यास त्याला एका कुशीवर करावे.

श्वसनमार्ग मोकळा करणे - श्वसनमार्ग किंवा श्वासनलिकेमध्ये अडथळा निर्माण झाला तर पुरेसा श्वास घेता येत नाही.  बरेचदा व्यक्ती बेशुद्ध पडल्याने जीभ सैल होऊन मागे पडते व श्वसन मार्गाला अडथळा निर्माण करते. यासाठी डोक्याला कपाळावर हलकासा जोर द्या. मान सरळ करा. हनुवटी वर करा.  कृत्रिम श्वासोच्छवास देण्यासाठी पिडीत व्यक्तीच्या तोंडावर रुमाल टाकणे. नाक चिमटीत घेऊन बंद करणे. स्वत: नेहमीप्रमाणे श्वास घेणे. ओठ पिडीत व्यक्तीच्या तोंडावर ठेवून आपला उच्छवास त्याच्या छातीत भरणे. हे करत असताना छाती फुगते त्याकडे लक्ष द्यावे. 

साधारणपणे CPR केव्हा दिला जातो त्याची उदाहरणे -

१. एखाद्या व्यक्तीला जर विजेचा शॉक लागत असेल तर त्याचा श्वास अडकतो. तेव्हा CPR देऊन आपण त्या व्यक्तीला कदाचित वाचवू शकतो.

२. जेवताना कधी कधी अन्न अडकल्यानंतर CPR देता येतो.

३. गोळ्यांचा आकार मोठा असेल तर ते देखील अडकण्याची शक्यता असते. तेव्हा CPR देता येतो.

४. विषबाधा झाल्यानंतर ते विष बाहेर काढण्यासाठी CPR देतात.

५. पाण्यात जर कोणी बुडत असेल तर त्याला वर काढल्यानंतर छातीवर दाब देऊन पाणी बाहेर काढल्यानंतर तोंडातून श्वास देऊन CPR दिला जातो.

६. अपघातात जास्त रक्त वाहून बेशुद्ध झाल्यास CPR देता येतो.

७. एखाद्याच्या डोक्याला मार लागून बेशुद्ध झाल्यास CPR देता येतो.

८. चक्कर येऊन पडल्यास CPR देता येतो. 

यासह अनेक परिस्थतीत वरील तीनही लक्षणे आढळून आल्यास CPR देत येतो. 

रोटरी क्लब सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, के. डी. पाटील मल्टीस्पेशॅलिटीच्या डॉ. लीना पाटील, पार्ष क्लिनिकचे डॉ. कल्पेश गांधी व भूलतज्ज्ञ डॉ. धीरज चौधरी यांनी प्रत्यक्षिकाद्वारे संपूर्ण प्रक्रिया , तसेच वेगवेगळया परिस्थितीत घ्यावयाची काळजी आदींबाबत मार्गदर्शन केले. तसेच अनेकांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. एका खेळाडूला सलग ६ तास CPR देऊन त्याला जीवनदान देण्यात आले. तसेच काश्मीरमध्ये झालेल्या एका अपघातातील ४ व्यक्तींना CPR देऊन जीवदान देण्यात आळायचे अनुभव उपस्थित डॉक्टरांनी कथन केले. चला तर मग आपणही आपल्या परिसरातील डॉक्टरांकडून माहिती घेऊन जीवनरक्षक होऊ या व इतरांना त्यासाठी प्रेरित करू या ! 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Saturday 13 May 2023

रत्नांच्या खाणीचा निर्माता : 'रत्नाकर' !

शालेय जीवनातील एका शिक्षकाचं जाणं परिवारातील एका सदस्याच्या जाण्यासारखं भावनिक असतं याचा अनुभव रात्रभर घेतोय. पुस्तकी ज्ञानापेक्षाही विद्यार्थ्याला संवेदनशील माणूस म्हणून घडविणाऱ्या, धुळे शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या आमच्या रत्नाकर गोविंद रानडे अर्थात र. गो. रानडे सरांचे दुःखद निधन झाल्याची बातमी रात्री उशिराने कळाली. अन एक चित्रपट डोळ्यासमोरून गेला अर्थात त्याला जोड समाज माध्यमाची होती. आपल्या जीवनात मिळालेल्या आठ दशके आयुष्य लाभलेल्या सरांनी धुळे शहरात एक आगळावेगळा ठसा उमटवीत आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन दिला आणि कसं जगावं याचा कृतीरुप वस्तुपाठ आपल्या जीवनातून दिला. बा. भ. बोरकरांच्या 'असे देखणे होऊ या !' या कवितेतील देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे या उक्ती सारखेच सरांचे जीवन उजळून निघाले होते. याच कवितेतील देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती | वाळवंटातूनी स्वस्तिपद्मे रेखिती || असे त्यांचे जीवन होते. आपल्या शिक्षकी पेशात त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यांनी आपल्या नावाप्रमाणेच रत्नांच्या खाणीचा समुद्र निर्माण केला असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. 

आमची शाळा - न्यू सिटी हायस्कुल, धुळे

जुन १९७९ मध्ये धुळ्याच्या न्यू सिटी हायस्कुलमध्ये इ. ५ वीला प्रवेश घेतला. धुळे एज्युकेशन सोसायटी या ध्येयवेड्या संस्थेच्या शाळेत शिकायला मिळणं हे मागच्या जन्मीचे पुण्य असे आज म्हणता येईल.   सहा वर्षाच्या कालखंडात या शाळेने एका समृद्ध करणाऱ्या जीवनाची बीजे रोवली गेली. ५ वीला बी. एन. जोशी, ६ वीला एस. एस. मुसळे, ७ वीला ह. म. भंडारी, ८ वीला नं. ना. शहा, ९ वीला आर. एस. जहागीरदार आणि १० वीला शा. रा. नाईक या वर्गशिक्षकांच्या तालमीत त्यांना सहकार्य करणाऱ्या रत्नाकर रानडे, व्ही. वाय. दाबके, आर. एस. पाटील, ग. स. पाठक, सु. र. राव, सौ. पाठक-शुक्ल बाई, यु. आर. कुळकर्णी, एस. आर. धामणे आदी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना माणूस  म्हणून घडविण्याचे प्रामाणिक काम केले. या सर्वांचे नेतृत्व करणारे शाळेचे मुख्याध्यापक होते मुकुंद कृष्णाजी पाध्ये सर...

आमच्या शाळेचे वैभव - गुरुजनवर्ग


श्री. रानडे सरांच्या निधनाची बातमी कळली आणि मन भर्र्कन त्या सुवर्ण काळात गेले. सर्व कसे कालच घडले इतके ते आजही ताजे वाटते. जीवन घडविण्यात आई-वडील व शिक्षकांची भूमिका नक्कीच महत्वपूर्ण असते. संस्कार देणारी आई आणि शिस्त लावणारे वडील याप्रमाणेच शिक्षकांचेही होते. काही शिक्षक मातृहृदयी तर काही पितृहृदयी होते. आदरणीय रानडे सर तसे कोमल हृदयाचे... कलेचा उपासक असलेला माणूस संवेदनशील असतोच मात्र साधनेच्या बाबतीत तडजोड कुठेही चालत नाही. समूहगान स्पर्धेत शाळेचा सहभाग आणि त्यातील 'मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा...' हे महाराष्ट्र गीताची तयारी करुन घेणारे रानडे सर डोळ्यासमोरुन हालत नाही. गाण्यातील लय, सूर आणि ताल सांभाळत असतांना एका विद्यार्थ्यांची चूक त्यांच्या सहज लक्षात येत असे. शिस्त हा शाळेचाच स्वभाव असल्याने खेळ, अभ्यास, गाणं, नाटक सर्व ठिकाणी त्याला विशेष महत्व होते. 

विक्षिप्तपूरची चित्तरसेना नाटकातील कलाकार 


विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अशा शिक्षकांचे असणे किती महत्वाचे असते हे आजच्या शैक्षणिक जीवनाकडे पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवते. अशा या महत्वाच्या वर्षांतील सुवर्ण काळाची नेहमीच अलीकडच्या काळाशी स्वाभाविकपणे तुलना होते. मी ती करणार नाही पण रानडे सरांसारख्या गुरुजनांनी अनेक पिढ्या आपल्या कर्तव्य कठोरतेने घडविल्या असे नक्की म्हणता येईल. कधी शिक्षाही केली असेल मात्र तक्रार नाही कारण त्या काळातील शाळेचा विद्यार्थी आज जो काही आहे त्यामागे या सर्व गुरुजनांचा वाटा महत्वाचा आहे. शाळेच्या प्रत्येक घटकावर त्यांचे  नेहमीच नियंत्रण होते. शाळेतील विद्यार्थ्याला आपल्या पोटाच्या मुलांप्रमाणे वाढविणारी हि पिढी होती आणि म्हणूनच त्यांनी शिक्षा केली तरी पालकांची कधीही तक्रार नव्हती. आम्ही सर्व भाग्यवान आहोत, आम्ही न्यू सिटीचे विद्यार्थी आहोत, अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी आहोत. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभिमान असणे हीच खऱ्या अर्थाने शिक्षणाची पावती म्हटली पाहिजे.

आमची १९८५ ची बॅच

सेवानिवृत्ती नंतरही सर कार्यरत होते. संस्थेचे काही काळ सचिव म्हणून त्यांनी दायित्व सांभाळले. संस्कार भारतीसारख्या कलासाधकांच्या संस्थेचे ते प्रदेश कार्यकारिणी सदस्य होते. नाट्य लेखन, दिग्दर्शन हे त्यांचे विशेष आवडीचे विषय होते. इ. ८ वी मध्ये असतांना श्री. रानडे सर, नित्सुरे सर व यु. आर. कुलकर्णी सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे नाटक बसविले. कोकणासारख्या दूरवर प्रदेशात बाल नाट्य स्पर्धेत शाळेचा सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक पटकविण्याची कामगिरी सरांनी केलेली आजही आठवते. गीता पठाण स्पर्धा, मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा यासारख्या उपक्रमातही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी ते प्रोत्साहन देत असत. वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन स्वतःचा वैयक्तिक वेळ देऊन सर्व शिक्षक मंडळी करीत असत त्यात श्री. रानडे सरांचा वाटा मोलाचा होता. विद्यार्थ्यांकडून मेहनत करुन घेत असतांना वेळ आणि पदरचे पैसे खर्च करतांना हे शिक्षक कधीही मागेपुढे पाहत नसत.

अलीकडे धुळ्याचा संपर्क कमी झाला असला तरी अधूनमधून सरांची भेट होत असे. एकदा तर सरांच्या घराजवळच भेट झालेली आठवते. शिष्य फाउंडेशनच्या माध्यमातून २०११ मध्ये झालेल्या स्नेहमेळाव्याप्रसंगी सर्व शिक्षकांची झालेली भेट आजही स्मरणात आहे. श्री. दाबके सरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमातही रानडे सरांची भेट झाली होती. अजिबात थकलेले वाटले नाही. तीच शरीर यष्टी, चेहऱ्यावरील तेज, जिवंतपणा बोलण्यातील सहज मिश्कीलता. सरांकडे पाहिल्यावर ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्तजींची आठवण येत असे. शिक्षकांमधील परस्पर संवाद - संबंध व विद्यार्थ्यांची त्याच्या प्रति असलेली निष्ठा कृतार्थतेचा आनंद देणारे होते. अशा संस्थेच्या व तेथील शिक्षक वृंदांच्या ऋणातून उतराई होणे केवळ अशक्य मात्र त्यांना जीवन जगण्याचे धडे आत्मसात करुन त्याप्रमाणे जगणे हीच त्या महानुभावांनी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असे मला वाटते.

र. गो. रानडे सरांच्या पवित्र आत्म्यास सद्गती लाभेलच व त्यांच्या परिवाराला त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो. ॐ शांती शांती शांती !!


Thursday 11 May 2023

"ती" आणि एका लग्नाची पुढची गोष्ट !

पुणे येथील सोहन वाचन कट्टाने मध्यंतरी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका वाचन कट्ट्याचे आयोजन केले होते. अर्थात महिलांच्या जीवनात आलेल्या "ती" चे महत्व वाचन कट्ट्यात अपेक्षित होते. आपल्या जीवनातील तिचे स्थान, तिचे महत्व सांगावयाचे वा त्याबद्दल वाचवायचे होते. जीवनावर प्रभाव पडणारी "ती" कोण हे ज्याने त्याने ठरवायचे होते. माझी पत्नी सौ. आदितीने या वाचन कट्ट्यात तिच्या आयुष्यातील "ती"चे वाचन केले. तिच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या "ती" बद्दल तिनेच लिहिले होते. अर्थात "ती" कोणी व्यक्ती नसून ती होती स्त्री जीवनातील "मासिक पाळी" ! वयाच्या चाळिशीनंतर "ती" हळूहळू त्यांच्या जीवनातून संपते, बाहेर पडते, जाते. मला हे समाजापर्यंत पोहोचवायचे होते मात्र त्यासाठी वेळ शोधात होतो. आज ते लिहिण्यामागचे कारण म्हणजे प्रशांत दामले यांचे एका लग्नाची पुढची गोष्ट ! हे नाटक. हे नाटकही "ती" वरच आधारित आहे त्याबद्दल पुढे लिहिले आहे. मात्र प्रथम सौ. आदितीने जे लिहिले/वाचले ते देत आहे. आपण ते वाचा, समजून घ्या... आपला अभिप्राय आपण सौ. आदितीस तिच्या ७५८८४०६१९५ या मोबाईलवर देऊ शकता.... 

सोहन वाचन कट्टा ( मंगळवार १४ - ३ -२०२३) विषय - माझ्या आयुष्यातील "ती"


माझी "ती" मैत्रिण माझ्या आयुष्यात अगदी अचानक आली आणि सायकल रेग्युलर सुरू झाली. तो काळ बदलाचा होता. आधीच्या पिढीतील सगळ्या बाजुला बसत असत, आम्हाला मात्र अपवादात्मक परिस्थितीत तो अनुभव आला. पण मोठ्या सगळ्याच बाजुला बसत असल्याने फार ऑकवर्ड झाले नाही. दर महिन्याला मग तारीख बघायची, तेव्हा काही सणवार असले की फार वैताग यायचा. आतासारखे या विषयावर कोणीच मोकळेपणाने बोलत नसत. घरातील भावाशी सुध्दा नाही. पण सासरी  मोकळे वातावरण होते. दोन्ही मुलांच्या वेळेस ९ - ९ महिने तिने ब्रेकअप केलं. पण आता आतापर्यंत "ती"ने खुप छान साथ दिली. सुरूवातीला "ती"च्याशी जुळवून घेण्याचा त्रास सोडला तर नंतरचे "ती"च्याबरोबरचे संबंध खुपच सलोख्याचे होते. दर महिन्याला रेग्युलर असल्याने कोणताही कार्यक्रम, समारंभ, ट्रीप सगळे "ती"ला विचारात घेऊनच करावे/आखावे लागत, इतकं "ती"च महत्त्व अनन्यसाधारण झालं. पण एकदाही "ती"ला मागेपुढे करण्यासाठी औषधं घेतली नाही, इतकी रेग्युलर होती "ती". त्यामुळे "ती"च्या विचाराने सगळे करता आले. "ती"नेपण इमानेइतबारे माझे हार्मोन्स, कॅल्शियम, आयर्न, त्वचा काय न काय व्यवस्थित ठेवले. पण संसारीक गडबडीत माझेच "ती"च्याकडे जरा दुर्लक्ष झाले. मग मला "ती"चा थोडा त्रास होऊ लागला. "ती" तिचं काम व्यवस्थित करत होती, पण माझ्याकडूनच "ती" आली असता आराम झाला नाही. मग "ती" आली की कंपलसरी आराम करावाच लागायचा. काय चुकलं याचा विचार करता त्या चार दिवसांत आराम न केल्याचा परिणाम असाच निष्कर्ष येतो. आता आयुष्यातील असा टप्प्या होता की "ती" आली तशी अचानक निघून गेली आणी मला एकदम रिकामं रिकामं वाटायला लागलं.

वय वर्ष १५ ते ४५ या माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या काळात "ती" माझ्या आयुष्यात होती. याच काळात तारुण्य, करिअर, लग्न, मुलं, संसार असतो. आयुष्यातील अजुन अनेक महत्त्वाच्या सुखदुःखाच्या गोष्टी याच काळात घडतात. खुपच धावपळ व धकाधकीचा हा काळ असतो. पण माझ्या अनुभवावरून मला असे वाटते की प्रत्येकीने त्या चार दिवसात जसा जमेल तसा आराम नक्कीच केला पाहिजे. कारण आधीच्या पिढीतील स्रियांना सक्तीची विश्रांती मिळत होती. आपले पुर्वज खरोखरच खुप हुशार होते. त्यांना शास्र, आरोग्य या सगळ्यांचा सखोल अभ्यास होता असे मला वाटते. आधीच्या पिढीच्या तुलनेत आम्ही या मैत्रिणीचे महत्त्व कमी केले असे वाटतेय. त्यामुळे आम्हाला व आमच्या पुढील पिढीला "ती"चा थोडा त्रास होतोय. पण खरे तर "ती"च्याभोवतीच स्रिचे आरोग्य बांधले गेलंय. तब्येत चांगली असेल तर "ती"चे येणे नियमीत होते. आपले मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम असेल तर "ती"चे येणे कधीच वेदनादायी होत नाही. आयुर्वेदात खुप बारकाईने हिचा विचार व अभ्यास केलाय, तो पण आपण विचारात घेतला पाहिजे. पुर्वीच्या काळात आरोग्यासह इतर सर्वच गोष्टींसाठी देवधर्माच्या भीतीचा आधार घेतला जायचा पण आताच्या काळात आपल्या मुलांना सर्व सायंटिफिक गोष्टींचा पुरावा द्यावा लागतो. आपण पण सगळ्या गोष्टींमागचे शास्र स्वतः समजुन घेऊन त्यांना सांगितले पाहिजे असे मला वाटते. तरच सगळ्याचा प्रवास सुखकर व आनंददायी होईल. "ती" सगळ्याच सखींची सखी आहे फक्त तिला थोडं अटेन्शन देण्याची गरज आहे. आपण सर्वजणी ते करूया. खरंच "ती" माझ्या आयुष्यात नसती तर खुप गोष्टी मला मिळाल्या नसत्या असे मला वाटते. त्यामुळे "ती" च्या बद्दल खुप खुप कृतज्ञता व्यक्त करते.

प्रशांत दामले, कविता लाड आणि त्यांच्या टीमने उत्कृष्ट सादरीकरणाद्वारे साकारलेले नाटक एका लग्नाची पुढची गोष्ट पाहण्याचा योग आला. वैवाहिक जीवनातील पत्नीच्या चाळीशीचा (मेनोपॉज) काळ, शरीरात होणारे हार्मोन बदल, त्यामुळे होणारी चिडचिड, संबंधात येणारी नीरसता या विषयाला अतिशय समर्थपणे या नाटकाने हाताळले आहे. सर्वांनी नाटक प्रवाही ठेवले आहे. संपूर्ण नाटक हलके - फुलके असले तरी त्यात हाताळलेला विषय अतिशय गंभीर आहे आणि त्याची गंभीरता पोहोचविण्यात नाटक यशस्वी झाले आहे.

अलीकडच्या काळात या विषयावर मोकळेपणाने बोललं जातंय हि अतिशय सुखावह गोष्ट आहे. त्यामुळे या विषयाबाबतची जागरुकता वाढत आहे. पती-पत्नी नात्यात निर्माण होणारे ताण-तणाव यामुळे सुटण्यास नक्कीच मदत होते. नाटकाच्या सुरुवातीला आयुष्यातील सर्वच प्रश्नांना गुगल उत्तर देऊ शकत नाही आणि त्यांच्या आयुष्यात शोधलेले उत्तर प्रत्येकाच्याच आयुष्यात कामी येईल असे नाही. त्यासंबंधातील धोका मोकळेपणाने सांगितला आहे. वैवाहिक जीवनातील आनंद हिरावलेल्या नवऱ्याला त्या आनंदाकडे नेण्यासाठी बायको मुलाच्या सांगण्यावरुन मानसशास्त्रावरील गिल्ट थिअरीवर आधारित नाटक घडवून आणते आणि तिला त्यात अपेक्षित परिणाम मिळतो. या रचित नाटकात कार्यालयातील एका मुलीला आपल्या बॉसची गर्लफ्रेंड बनविले जाते. त्यातील वेगवेगळे टप्पे गाठत गोष्ट 'डेट' पर्यंत जाते. मात्र सामान्य कुटुंबातील नवऱ्याला आपण काहीतरी चूक करीत आहोत असे नेहमी वाटत राहते. त्या मुलीशी केलेल्या नकली प्रेमातून त्याला आपल्या असली प्रेमाची आठवण होते. मेमरी फुल झाली आणि त्यात आणखी काही नवीन भर घालायची असल्यास जुन्या आठवणी डिलीट मारणारा (विसरणारा) हा नवरा मात्र आपल्या आयुष्यातील त्या नाजूक क्षणांना विसरू शकत नाही आणि त्याला आपली चूक उमगते आणि आनंद पुन्हा मिळतो अशी साधारण कथा आहे. 

नाही म्हणायला नवऱ्यावर बायकोने दाखविलेल्या अविश्वासाने त्याचा अहंकार दुखावतो मात्र त्यामागची भूमिका समजून घेतल्यावर ते नाते अधिक दृढ झालेले पाहावयास मिळते. नाटक प्रवाही असल्याने पुढे काय घडते हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहते. अंतिम चरणात मात्र धक्क्यावर धक्के बसत राहतात जरी बायको आपल्याला पडद्यामागचे भूमिका सांगत असली तरीही... नेहमीच आपल्या नाटकातून मानवी आयुष्यातील विषय हाताळत त्यावर काही तरी संदेश देण्याचा प्रयत्न प्रशांत दामलेंच्या नाटकातून अनुभवास येतो. एक संवेदनशील माणसाचे ते प्रतीक आहे. मराठी नाट्य सृष्टीत १२६१६ वा नाट्यप्रयोग व एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचा ५९४ वा प्रयोग प्रशांत दामले यांनी जळगावच्या संभाजीराजे नाट्यगृहात साकारला. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांचे सादरीकरण तेव्हढेच सहज आणि त्यामुळे परिणामकारक वाटते. जळगावात नव्याने सुरु करण्यात आलेला एसडी - इव्हेन्ट चा प्रयोग यशस्वी होतोय कारण नाटक हाऊसफुल झाले. मित्रवर्य दिनेश थोरात व टीमचे मनापासून अभिनंदन ! जळगावला सांस्कृतिक वातावरणाचे पुनर्वैभव देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा !  

गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४