Tuesday 21 March 2023

हे जीवन सुंदर आहे ! जीवनाचा आनंद घेऊ या...



मित्रांनो, आपणा सर्वांना नूतन संवत्सराच्या मनापासून शुभेच्छा ! हे नवीन वर्ष आपणा सर्वांना व आपल्या परिवारजनांना सुखसमृद्धीचे, भरभराटीचे, आरोग्यसंपन्न जावो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना...

हे जीवन खूप सुंदर आहे. आपण सर्वजण त्याचा आनंद घेऊ या. नवीन वर्षाची सुरुवात आपण मनोमन एखादा संकल्प घेऊन करीत असतो. आज आपण जीवनाचा आनंद घेण्याचा संकल्प करु या. त्यासाठी काही गोष्टी नक्की करता येतील. जीवनात चढ-उतार, सुख-दुःख असतात हे वास्तव स्वीकारु या. प्रत्येक गोष्ट नेहमी आपल्या मनासारखी घडतेच असे नाही. आपल्या गत आयुष्याच्या अनुभवातून आपण या दोनही गोष्टींचा अनुभव घेतला असणार. आपली कर्मे आपल्याला फळ देत असतात. चांगली कर्मे चांगली फळे देतात. त्यामुळे सत्कर्माचा मार्ग स्वीकारु या. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याकडेही लक्ष देऊ या.

भारतीय संस्कृती व परंपरा आपल्याला मनःशांतीचे महत्व सांगते. ती मिळविण्यासाठी निसर्गपूरक जीवनशैलीचा स्वीकार केला पाहिजे. जीवन जगतांना मिळलेले ज्ञान व अनुभवातून आलेले शहाणपण या दोघांचा सुयोग्य पद्धतीने वापर करु या. कोणतीही गोष्ट करीत असतांना आपल्या अंतर्मनाचा कौल घेऊ या म्हणजे त्यात नक्कीच सात्विकता येईल जी समाधान देऊन जाईल. तंत्रज्ञानाचा वापर करीत असतांना त्याच्या मर्यादा आखून घेऊ या. तंत्रज्ञान व त्यावर आधारित माध्यमे माणसासाठीच आहेत त्यामुळे त्यांचा किती, कसा व केव्हा वापर करायचा हे संपूर्णतः आपल्या हातात आहे. मानवी जीवनातील शांती हरविण्याचे मुख्य कारण संपलेला संवाद, आत्मकेंद्रित वृत्ती, भौतिकतेचा 'अतिरेक' आहे असे मला वाटते. 

समाधानी राहणं, सकारात्मक बोलणं, दुसऱ्याच्या उपयोगी पडणं, आपल्याजवळील गोष्टी इतरांसोबत वाटून घेणं, इतरांची काळजी घेणं, आपली जबाबदारी पूर्ण करणं, आपल्या प्रगतीचा आलेख तपासणं, स्वतः केलेल्या चांगल्या गोष्टींचं स्वतःच कौतुक करणं या गोष्टी आपल्याला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे जे आहे ते आपले नसून 'नियतीने' ते आपल्याला सांभाळण्यासाठी व त्याचा योग्य वापर करण्यासाठी दिलं आहे. आपण कुणाच्या उपयोगी पडलं तर ते 'मी' केलं असं नव्हे तर 'जगन्नियंत्याने' ते करण्यासाठी आपली निवड केली वा आपल्याकडून करवून घेतलं असे म्हटले तर अहंकाराचा भाव कमी होईल. त्यातून आत्मिक समाधान मिळेल. 

ज्या गोष्टी केल्याने आपल्याला आनंद मिळतो त्याची यादी करा व या वर्षभरात त्या गोष्टी अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करा. स्वतःसाठी वेळ काढा. दिवसातून किमान अर्धा तास स्वतःशी बोला. चांगलं वाचन करा. असामान्य कर्तृत्वाचे धनी असलेल्या सामान्यांच्या गोष्टी वाचा. त्यातून आपणास प्रेरणा मिळेल. आवडीची गाणी वेळ काढून ऐका. तल्लीन-एकरुप होणं, तादात्म्य पावणं, देहभान विसरणं, याची अनुभूती घ्या, शांती मिळेल. हलका व्यायाम करा. संवाद साधा. सहकारी, मित्र, कुटुंबीय, समाजातील घटक यांच्याशी बोला. संवाद साधतांना परस्परांना आनंद होईल असे विषय निवडा. महिना दोन महिन्यातून एकदा एकत्र या. घरातील कामे सर्वांनी मिळून करा. एकत्रित भोजनाचा व भजनाचा आनंद घ्या. विश्व कल्याणाची प्रार्थना करा.

आव्हाने व संकटे हा जीवनाचा भाग आहे. त्यामुळे त्याला आपल्या क्षमतेनुसार सामोरे जाणे एव्हढंच आपल्या हातात आहे. काळ हेच त्याला योग्य उत्तर आहे. श्रद्धा ठेवा, परमेश्वराची व सद्गुरुंची कृपा, कुटुंबातील ज्येष्ठांचा आशीर्वाद, आपली पुण्यकर्मे या सर्वातून मार्ग दाखवतील. कोणत्याही गोष्टींची चिंता न करता आपले कार्य करीत राहा. आव्हानांचा सर्व बाजूने विचार करा. मदत घ्या. पर्यायांचा विचार करा व आपल्याला वाटणाऱ्या योग्य पर्यायावर कार्यरत राहा. गुणवत्ता पूर्ण काम करा, यश, आनंद व समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. या विषयावर आपण बोलत राहू. आपणही मला सांगत राहा. आनंद घेऊ या, आनंद वाटू या ! पटतंय ना ?

पुन्हा एकदा सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा ! 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Sunday 19 March 2023

आनंदाचे डोही आनंद तरंग...

निमित्त जागतिक आनंदी दिवसाचे ! 



२० मार्च हा दिवस जागतिक आनंदी दिवस अर्थात International Day of Happiness म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब जळगावच्या साप्ताहिक सभेत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांनी "आनंदाचे डोही आनंद तरंग..." या विषयाची मांडणी केली. सारांश स्वरुपात भाषणाचा गोषवारा आपल्या सर्वांसाठी देत आहे.

आनंदाचे डोही आनंद तरंग । 

आनंदची अंग आनंदाचें ॥१॥

काय सांगो जाले काहीचियाबाही । 

पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । 

तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । 

अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥

संत तुकारामांचा हा अभंग अवीट अशा आनंदाचा अनुभूती सांगणारा आहे. हा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही आणि केला तरी ज्याला अनुभवाची जाण नाही त्याला समजणारही नाही. आता आयुष्यात यापुढे मिळवायचे काहीही उरले नाही. तुकाराम महाराज यांनी अशी स्थिती गाठली आहे कि ज्या करिता योगी अनेक आयुष्ये तप करीत आले आहेत. अनेक ज्ञानी अथक प्रयत्न करून थकले आहेत.  त्यामुळे त्यांना झालेला आनंद हा परमानंद आहे. 

आनंद म्हणजे काय असा आपण विचार केला तर मानसशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट क्षणी चांगली गोष्ट घडल्यावर होतो तो किंवा अधिक व्यापकपणे विचार केल्यास एखाद्याच्या जीवनाचे किंवा कर्तृत्वाचे सकारात्मक मूल्यमापन करून जे मिळते ते म्हणजे आनंद. अर्थात हा आनंद व्यक्ती सापेक्ष असतो. तो कधी बक्षिसाने होतो तर कधी आवडीचा पदार्थ मिळाल्याने होतो तर कधी शारीरिक भूक भागविल्याने होतो. आनंदाचा मानवी मनाशी व मेंदूशी संबंध आहे. मुळात हि एक भावना आहे.  मास्लो या शास्त्रज्ञाने मांडलेल्या पिरॅमिडनुसार हि मानवी मनाची मूलभूत गरज आहे. भौतिक प्रगतीनुसार हा आनंद अधिक उच्च पातळी गाठण्याचा प्रयत्न करीत असतो. 

माणूस जेव्हा आनंदी होतो तेव्हा त्याच्या मेंदूचा फ्रंटल लॉबीची डावी बाजू ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असे म्हणतात तो अधिक सक्रिय होतो. मानवी जीवनात घडणाऱ्या चांगल्या - वाईट घटनेमुळे वा परिस्थितीमुळे त्याचा मुड प्रभावित होत असतो. हा मुड मेंदूमध्ये घडणाऱ्या विविध रासायनिक क्रियांचे प्रतिबिंब असतो. मेंदूला आपण काय अनुभवत आहोत याची जाणीव करून देण्याचे व त्या प्रमाणे प्रतिसाद देण्याचे काम शरीरातील रसायने करीत असतात. (न्यूरोट्रान्समीटर आणि हार्मोन्स) या हार्मोन्सची काही विशिष्ट कार्ये असतात, ती विशिष्ट प्रकारे सक्रिय केली जातात, ते विशिष्ट भावनांचे संकेत देतात व मेंदूच्या काही भागांना उत्तेजीतही करतात. जेव्हा आपण आनंदाचा विचार करतो त्यावेळी प्रामुख्याने ज्या रसायनांचा समावेश असतो ती म्हणजे एंडोर्फिन, डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन. आनंदी मनुष्य निरोगी व दीर्घायुषी असतो. 

संत तुकाराम महाराजांनी अभंगातून मांडलेला आनंद कसा झाला असेल ? त्यांच्या आयुष्यात अनेक विपरीत व आव्हानात्मक घटना पाहावयास मिळतात. दुकानाचे दिवाळे निघालेले, बायकोचा स्वभाव, समाजाकडून त्रास इ. शहीद भगतसिंग आनंदाने व हसत हसत देशासाठी शहीद झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या कोठडीत सहन केलेले अत्याचार यासर्व गोष्टींमध्ये त्यांना आनंद कसा झाला असेल याचा आपण विचार केल्यास काही गोष्टी आपल्या लक्षात येतील. आपल्याला आवडणारी गोष्ट करणे, आपण करीत असलेल्या कामात आपल्याला रस असणे आणि त्यासाठी इतरांशी संपर्कात राहणे, आपण जे करतो त्याद्वारे आपल्याला ओळख मिळणे, आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होणे.  

माणसाला आनंद ३ प्रकारे होतो. १. मेंदूतील रसायनांमुळे २. मेंदूतील प्रीफ्रंटल कोर्टेक्समुळे - यात लहानपणापासूनच्या शिकवणीचा समावेश असतो. तसेच भावनिक जाण व अनुभवही महत्त्वाचा ठरतो. ३. सामाजिक वातावरण - आपण ज्यांच्या सोबत राहतो त्या माणसांची सकारात्मक व आनंदी वृत्ती मनाला आनंद राहण्यासाठी सहाय्य्यभुत ठरते. 

आज जगातील सर्वात आनंदी देश फिनलँड मानला जातो. सलग ५ वर्षे या देशाला आनंदी देश होण्याचा बहुमान मिळाला आहे. वर्षातील ४ महिने प्रचंड थंडी असूनही हा देश आनंदी असतो याची आकाराने आपण नक्कीच जाणून घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील निसर्ग समृद्ध आहे. त्यामुळे पर्यावरणाची गुणवत्ता अधिक आहे. कौटुंबिक व व्यावसायिक कामाचा योग्य समतोल सांभाळला गेला आहे, सामाजिक सौहार्द, निवडीचे व निर्णयाचे स्वातंत्र्य आहे, समाज कल्याणकारी पद्धती विकसित आहेत, स्वातंत्र्यासोबतच येथे समानता आहे, नागरी सेवा विनामूल्य उपलब्ध आहेत मात्र येथील करही सर्वात जास्त आहे. सामाजिक स्तरावर असलेले परस्पर सहकार्य व पाठबळ हि या देशाची जमेची बाजू म्हणता येईल. 

समारोपाकडे जात असतांना डॉ. प्रदीप जोशी यांनी २ धक्कादायक गोष्टी सांगितल्या. त्यातील एक म्हणजे आज जगातील ३० कोटी लोक नैराश्यग्रस्त वा वैफल्यग्रस्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशात हि संख्या सुमारे ९ कोटी आहे. या मागील कारणे अनेक आहेत. आपण या समस्यचे बाली ठरू नये व आनंदी राहावे यासाठी खालील गोष्टी कराव्यात.

- नातेसंबंध समृद्ध करा 

- काहीतरी स्वप्न ठेवा , उद्दिष्ट ठेवा

- इतरांना केलेले सहाय्य तुम्हाला सर्वात जास्त आनंद देतील. 

- शरीर प्रकृती उत्तम ठेवा.

- योग्य आर्थिक नियोजन करा.

- कुटुंबात आनंद ठेवा व मित्रांचा जास्तीत जास्त सहवास ठेवा.

- कामाचा आनंद घ्या

या गोष्टी करीत असतांना जीवनातील ताणतणावांचे नियंत्रण करा. त्याकडेही लक्ष असू द्या. त्यासाठी हसा, खेळ खेळ, योग्य व्यायाम व आहार घ्या. पुरेशी झोप घ्या. व्यसनांपासून दूर राहा. निसर्गाचा आनंद घ्या. योगा, प्राणायाम करा. सुटीचा आनंद घ्या. त्यादिवशी आराम करा. प्राणी पाळा. ताण ओळख व त्यावर नियंत्रण मिळावा. रात्री  झोपायला जाण्यापूर्वी दिवसभरात केलेल्या ३ चांगल्या गोष्टी आठवा. 

आईन्स्टाईन यांनी सांगितल्याप्रमाणे जीवन २ प्रकारे जगा

१. जणू काही चमत्कार नाही (as though nothing is miracle)

२. सर्व काही चमत्कार आहे (as though everything is miracle)


यावर्षीच्या जागतिक आनंदी दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे Be mindful (सजग राहा), Be grateful (कृतज्ञ राहा) Be kind (दया करा)

समारोप करतांना आनंदी राहण्यासाठी 

Sing like no one listening कोणी ऐकत नाही असे समजून गा 

Love like you've never been hurt आपल्याला कोणी दुखावले नाही असे समजून प्रेम करा 

Dance like nobody is watching आपल्याला कोणी पाहात नाही असे समजून नाचा 

Live like its heaven on earth पृथ्वीला स्वर्ग समजून जगा 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Wednesday 15 March 2023

हृद्य संस्कार सोहोळा विवाहाचा... आप्तस्वकीयांच्या स्नेहबंधाचा !

मागच्या आठवड्यात आमच्या धानोरकर परिवारातील एका बहिणीचा पुणे येथे विवाह झाला. खरं तर मोठ्या कुटुंबातील विवाह सोहोळा हि तशी फार मोठी गोष्ट नाही मात्र एका खडतर आव्हानानंतरचा हा विवाह संस्कार काका-काकूंसह आम्हा सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट होती. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात एका मोठ्या कालावधीनंतर पुतण्याचा विवाह झाला. तोही असाच सर्वांच्या लक्षात राहील असाच झाला. त्यामुळे उत्सवप्रिय पिढीला एकत्र कुटुंबाचा 'नजारा' आणि 'मजा' अनुभवता आली. हा विवाह सोहोळा हि एक संधी होती. हा विवाह सोहोळा म्हणजे धानोरकर व देशपांडे या दोन परिवाराचे मिलन आणि त्यासोबतच दोन्ही परिवारांतर्गत स्नेहमंडळींचे आनंददायी पुनर्मिलन होते. अलीकडे निमित्ताने होणाऱ्या भेटीही कमी झाल्या तरी 'आपलेपण' असले कि सर्व कारणे बाजूला पडतात व  'आपली' माणसे आवर्जून उपस्थिती देतात व सहभागी होतात याचे उदाहरण म्हणजे हा विवाह संस्कार  सोहोळा होय.


विवाह पुण्यात म्हटल्यानंतर त्याचे योग्य नियोजन केले होते. अगदी आदल्या दिवशी सीमंती पासून ते झाली पर्यंतची सर्व व्यवस्था उत्तमप्रकारे लावली होती. तत्पूर्वीचे विधी व अन्य कार्यक्रम घरी पार पडले. त्यासाठी मुलीची आजी, मावशी आजी, काका-काकू आशीर्वादासाठी तर सख्खा, चुलत व मावस भाऊ-बहीण, वहिनी अगदी कंबर कसून सर्व गोष्टींसाठी तयार होते. ज्येष्ठांना आवश्यक असणारी एक आश्वासकता त्यातून निर्माण झाली होती त्यामुळेच सर्वांसाठी हा संस्कार सोहोळा संस्मरणीय ठरला असे नक्की म्हणता येईल. विवाहासाठी असलेले उपाध्ये खांडेकर व त्यांचे सहकारीही संस्कारांना महत्व देणारे त्यामुळे प्रत्येक गोष्टीमागचा अर्थ समजावून सांगणारे होते. वेळ मिळेल तेव्हा अलीकडच्या काळातील विवाहामधील आधुनिकता स्वीकारत असतांना संस्कारांचा वारसा जपण्याची आवश्यकता उभय पक्षांना सांगत होते. दोन्ही दिवसांचे भोजन व अल्पोपहार चविष्ट व रुचकर होते. प्रसंगी पैसे मोजूनही अपेक्षित सेवा मिळत नाही मात्र येथे आलेला अनुभव खूप चांगला व वेगळा होता. 

धानोरकर परिवारातील काकांच्या कुटुंबाचा आणि आमच्या कुटुंबाचा भावबंध अनेक वर्षांचा आणि तितकाच एकमेकांच्या हक्काचा व अधिकाराचा. कारण काका लहानपणापासूनच आमच्या आई-वडिलांसोबत राहत होते. ते अगदी लग्न झाल्यानंतरही अनेक वर्षे. दोघं भावांनी धुळ्यात प्लॉट घेऊन आपले स्वतःचे हक्काचे घर बांधले. अनेक सोहोळे, संस्कार, जीवनातील सुख-दुःखाच्या घडामोडी दोन्ही परिवारातील सदस्यांनी सोबत अनुभवलेल्या होत्या. स्वाभाविकपणे आम्हा भावा-बहिणींमध्ये सख्खा - चुलत असा भाव नव्हता आणि नाही. त्यामुळे लग्नाच्या ६-७ दिवस अगोदरच आमच्या कुटुंबातील सदस्य तयारीसाठी गेले होते अर्थात त्यांना हक्काने बोलवलेही होते.  एकत्र कुटुंबाच्या अनेक चांगल्या बाजूंचा अनुभव गेली सुमारे ६ दशकांहून अधिक काळ आम्ही सर्वच अनुभवत आहोत. काळ कितीही बदलला तरी नात्याच्या या स्नेहबंधात फारसा फरक पडला नाही. विवाह सोहोळ्याला कुळकर्णी-देशपांडे परिवारांनी संख्येचे बंधन घालून घेतल्याने स्वाभाविकपणे काही मर्यादा आल्यात मात्र त्या सोहोळ्यात अडचण ठरल्या नाहीत अर्थात तेव्हढी समज अलीकडे विकसित झाली आहे. 

या लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास ६० वर्षांची मैत्री असलेली काकांची दोस्त मंडळी व आमच्या बहिणींच्या मैत्रिणींची आवर्जून विवाह सोहोळ्याला उपस्थिती ! त्यातील एका मित्रानेच मुलीच्या मामांची भूमिका पार पाडली. या मित्रांमध्ये आमच्या सर्वांचे काका-मामा होते. ऐनवेळी तब्येतीच्या कारणामुळे एका काकांना येता आले नाही मात्र ग्रहमुखाच्या दिवशीची भोजनाची व्यवस्था त्यांनी करुन दिली होती. आमच्या काकांना त्यांची अनुपस्थिती पचविणे अवघड गेले अर्थात ते कुणाच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते.

 त्यातील एका वरिष्ठ सहकाऱ्याची पत्नी म्हणजे आमच्या आईची जिवलग मैत्रीण ! आज ती मावशी नसली तरी काका, त्यांची कन्या आणि जावईबुवा यांची भेट डोळ्यांच्या कडा ओलावणारी होती. अनेक हृद्य भेटींचा आनंद शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. काकांचे मामेभाऊ आपल्या घरी पाहुणे मंडळी असतांनाही पत्नीसह आले होते आणि वेळ काढून प्रत्येकाची आस्थेवाईकपणे चौकशी करीत होते. अनेक वर्षांनी भेटल्यामुळे नवीन पिढीतील अनेकांना ते प्रथमच पाहत होते मात्र त्यांचा व्यवहार अनेक वर्षांच्या सहवासाचा होता. बोलता बोलता सहज म्हणून गेले मला एकदा धानोरा येथे यावयाचे आहे. अलीकडे दुर्मिळ होत चाललेला गोतावळा त्यात अपेक्षित असलेला प्रेमभाव पुढच्या पिढीकडे नक्कीच यानिमित्ताने पोहोचला असे म्हणता येईल. 

आदल्या दिवशी अर्थात ८ मार्चला जागतिक महिला दिन होता. दोन्ही कुटुंबांनी आपापल्या घरी तो साजरा केलाच पण मंगल कार्यालयातही केक भरवून साजरा करण्याची व्यवस्था केली होती. विधी आणि भोजने आटोपली. त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या एका खास शैलीत परिवारातील माता-भगिनी-पत्नी यांना तो भरविला अर्थात त्याची आठवण कॅमेऱ्यात बंद केली हे सांगणे नको. कन्या सध्या पुण्यात असते आणि तिला गुरुंनी लग्नाच्या दिवशी सुट्टी दिली याचा आनंद तिने सर्वांसोबत नृत्याविष्काराने साजरा केला. शास्त्रीय नृत्य बाजूला ठेवून नाचण्याचा मनसोक्त आनंद घेतला आणि इतरांनाही त्यात सामावून घेतले. झोपलेली मंडळी उठून त्यात सहभागी झाली. नवरीही त्यात मागे नव्हती. मात्र मग आग्रहाखातर दोन गाण्यांवर कथक नृत्यही सादर करीत वाहवा मिळविली. अचानकपणे karaoke वर गाणे गाण्याचा सिलसिला सुरु झाला आणि सर्व जुन्या-नव्या पिढीतील मंडळींना आपल्या काळात घेऊन गेला. दोन तासांचा वेळ कुठे निघून गेला लक्षातच आले नाही. त्यानंतर वेळेवर आलेल्या मंडळींचा मेहेंदी कार्यक्रम झाला. काही मंडळी झोपण्यासाठी इतरत्र निघून गेल्याने त्यांना याचा आनंद घेता आला नाही. 

अलीकडच्या स्मार्टफोनच्या युगात फोटोचं वाढलेले महत्व असले तरी एक हृद्य व कायमस्वरूपी लागणारी आठवण म्हणजे वधू-वरांसोबतचा तो क्षण ! प्रयत्नपूर्वक प्रत्येकाचा फोटो यावा यासाठी जो-तो काळजी वाहत होता आणि छायाचित्रकारासह मोबाईलचे फ्लॅशही चमकत होते. लग्न समारंभासाठी पाहुणे मंडळींसह सर्वांची योग्य खातिरदारी व व्यवस्था व्हावी यासाठीची सर्व व्यवस्था वधू-वर पक्षाच्या ज्येष्ठांनी समर्थपणे सांभाळली होती. त्यांना परिवार सदस्यांची तेव्हढीच मोलाची साथ होती. ऋणानुबंध घट्ट करणारा हा सोहोळा सर्वार्थाने पुढच्या पिढीसाठी 'संस्कार' सोहोळा ठरला. वधू-वरांच्या आनंदी व समृद्ध सहजीवनाची कामना करीत असतांनाच त्यांच्या माता-पित्यांची एक जबाबदारी समर्थपणे पूर्ण केल्याबद्दल मनापासून अभिनंदन ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४