Wednesday, 14 October 2026

नवरात्र : मानवतेचा जागर

घटस्थापनेपासून गुणस्थापनेपर्यंत…
मातृरूपेण संस्थिता : मायेचा संस्कार, कर्तृत्वाचा जागर!

“या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः॥”

नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या विविध रूपांची आराधना! देवीची ही रूपे केवळ पूजेपुरती मर्यादित नसून, ती मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या गुणांचे प्रतीक आहेत. या नवरात्रीत देवीच्या रूपांचे स्मरण करताना, तिच्यातील गुणांचा आपल्या जगण्यातही जागर करूया. घटस्थापनेबरोबरच मनात सद्गुणांची स्थापना करून, विचारांतून आणि कृतींतून मानवतेची उपासना करूया.

आई म्हणजे मायेची ऊब, प्रेमाचा आधार आणि संस्कारांची शिदोरी! मुलाच्या सुखासाठी झटणारी आई त्याला केवळ जपत नाही, तर जगण्याची दिशा देते. मातृत्वाचे खरे सामर्थ्य मुलाला प्रेम देण्यात आहेच; पण त्या प्रेमातून त्याला स्वावलंबी, संवेदनशील आणि जबाबदार बनवण्यातही आहे. मुलाच्या प्रत्येक अडचणीवर स्वतः उत्तर बनण्यापेक्षा, त्याला अडचणींवर मात करण्याचे बळ देणे; प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यापेक्षा योग्य-अयोग्याची जाणीव करून देणे, हीदेखील मातृत्वाचीच शिकवण आहे.

जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवताना याच संस्कारांचे दर्शन घडवले. त्यांनी शिवरायांना केवळ प्रेमाने जपले नाही, तर स्वराज्याचे स्वप्न, अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य आणि प्रजेच्या कल्याणाची जाणीव दिली. स्वतःच्या मुलाला कर्तृत्ववान बनवतानाच त्याचे कर्तृत्व समाजासाठी समर्पित व्हावे, अशी शिकवण दिली. कारण खरे मातृत्व केवळ चांगले अपत्य घडवत नाही, तर समाजाच्या हिताचा विचार करणारा जबाबदार नागरिक घडवते.

मातृभाव हा केवळ स्त्रीपुरता मर्यादित नाही. स्त्री असो वा पुरुष, दुसऱ्याला समजून घेणे, त्याची काळजी घेणे आणि त्याच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हा मातृभावाचा आविष्कार आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील “भूतां परस्परे पडो, मैत्र जीवांचे” ही प्रार्थना आपल्याला स्वतःच्या कुटुंबापुरते प्रेम मर्यादित न ठेवता, सर्व जीवांप्रती मैत्री आणि सद्भाव जपण्याची प्रेरणा देते.

धरणीमाता आपली जननी, तर भारतमाता आपली मायभूमी! त्यांच्याप्रती आपल्या मनात भक्ती आणि प्रेम आहे. पण या प्रेमाची खरी अभिव्यक्ती कृतीतूनच होते—धरणीमातेची लेकरे म्हणून निसर्गाचे रक्षण करणे आणि भारतमातेची मुले म्हणून देशाप्रती कर्तव्य निभावणे. मातृभावाची जाणीव जेव्हा जबाबदारीत उतरते, तेव्हाच ती सार्थ ठरते.

या नवरात्रीत देवीच्या मातृरूपाला वंदन करताना संकल्प करूया—मुलांना केवळ यशस्वी नव्हे, तर कर्तव्यदक्ष, संवेदनशील आणि समाजहिताची जाणीव असलेले नागरिक घडवूया. त्यांना उपदेश करण्यापेक्षा स्वतःच्या आचरणातून संस्कार देऊया; प्रेमासोबत जबाबदारी आणि स्वप्नांसोबत समाजाप्रती बांधिलकीही शिकवूया.

माता भगवतीच्या चरणी प्रार्थना करूया—हे माते, तुझ्या मायेची ऊब आमच्या मनात जागव. पुढच्या पिढीला प्रेमाने घडवण्याची, त्यांच्यात योग्य जाणिवा रुजवण्याची आणि त्यांना कर्तृत्ववान, जबाबदार नागरिक बनवण्याची शक्ती दे.

कारण मातृरूपाला खरे वंदन तेव्हाच घडते, जेव्हा माया संस्कार बनते, संस्कारांतून कर्तृत्व घडते आणि कर्तृत्वातून समाजाचे कल्याण साधले जाते.

हाच नवरात्रीचा खरा जागर—मायेच्या संस्कारांतून माणूस घडवण्याचा आणि माणसातून जबाबदार समाज निर्माण करण्याचा!

गिरीश कुळकर्णी

Tuesday, 13 October 2026

नवरात्र : मानवतेचा जागर

घटस्थापनेपासून गुणस्थापनेपर्यंत…

बुद्धिरूपेण संस्थिता : उपासना बुद्धीची, जागर विवेकाचा!

नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा उत्सव आणि तिच्या विविध रूपांच्या आराधनेचा सोहळा! ‘या देवी सर्वभूतेषु…’ हा मंत्र देवीच्या सर्वव्यापी स्वरूपाची जाणीव करून देतो. देवीची ही रूपे केवळ पूजेपुरती मर्यादित नसून, ती मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या गुणांचे प्रतीक आहेत. या नवरात्रीत देवीच्या रूपांचे स्मरण करताना, तिच्यातील गुणांचा आपल्या जगण्यातही जागर करूया. घटस्थापनेबरोबरच मनात सद्गुणांची स्थापना करून, विचारांतून आणि कृतींतून मानवतेची उपासना करूया.

“या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः॥”

नवरात्रीत आपण आदिशक्तीच्या विविध रूपांची आराधना करतो. या मंत्रातून आपण सर्व प्राणिमात्रांमध्ये बुद्धिरूपाने स्थित असलेल्या देवीला वंदन करतो. पण या वंदनेचा अर्थ केवळ मंत्र म्हणणे एवढाच आहे का? ज्या बुद्धिरूप शक्तीला आपण वंदन करतो, तिचा उपयोग आपल्या विचारांत आणि आचरणात दिसतो का? हा प्रश्न स्वतःला विचारणे, हीच उपासनेला जीवनाशी जोडण्याची पहिली पायरी आहे.

बुद्धी म्हणजे योग्य-अयोग्य ओळखण्याची आणि योग्य ते आचरणात आणण्याची क्षमता. एखादी समस्या सोडवणे ही हुशारी; पण आपल्या कृतींचे परिणाम समजून योग्य निर्णय घेणे, हा बुद्धीचा खरा कस आहे.

आपल्या आजूबाजूला अनेकदा काही गोष्टी पाहून प्रश्न पडतो, “एवढंही समजत नाही का? कॉमन सेन्स आहे की नाही?” रस्त्यावर कचरा टाकणे, पाण्याचा अपव्यय करणे किंवा स्वतःच्या सोयीसाठी इतरांना त्रास देणे—या गोष्टींचे परिणाम समजण्यासाठी फार मोठ्या ज्ञानाची गरज नसते. तरीही आपण असे वागत असू, तर योग्य-अयोग्य समजणे आणि त्यानुसार वागणे यांत अंतर आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

याचे एक गंभीर उदाहरण म्हणजे पाण्याची परिस्थिती. बालपणी सुमारे १३० फुटांवर विहिरीचे पाणी मिळत असे; आज अनेक ठिकाणी ५०० ते ७०० फुटांपर्यंत बोअर घ्यावे लागतात. हा बदल आपल्याला अंतर्मुख करायला हवा. पाण्याचे महत्त्व माहीत असूनही त्याचा अपव्यय होत असेल, तर आपल्या बुद्धीचा योग्य वापर कुठे कमी पडतो आहे, याचा विचार करायला नको का?

भोगवादी जीवनशैलीत ‘मला काय हवे?’ याला महत्त्व मिळते; पण ‘माझ्या गरजांचा निसर्गावर काय परिणाम होतो?’ हा प्रश्न मागे पडतो. आजच्या सोयीसाठी आपण उद्याच्या पिढ्यांचे नुकसान तर करत नाही ना? पाणी जपणे, वीज वाचवणे, कचरा कमी करणे आणि पर्यावरणपूरक सवयी स्वीकारणे, हे केवळ सामाजिक कर्तव्य नाही; आपल्या बुद्धीला विवेकाची जोड देऊन केलेली कृती आहे.

नवरात्र आपल्याला देवीच्या शक्तीचे स्मरण करून देते. त्या शक्तीचे खरे सामर्थ्य आपल्या जीवनात उतरवायचे असेल, तर प्रत्येक दिवस हा आत्मपरीक्षणाची संधी मानूया. रागाच्या भरात बोलण्याआधी थांबणे, ऐकीव माहितीची खात्री करणे, मतभेद असतानाही दुसऱ्याचे म्हणणे ऐकणे, चूक मान्य करणे आणि आपल्या कृतींचा इतरांवर होणारा परिणाम लक्षात घेणे—या छोट्या कृतींतून बुद्धीचा विवेकपूर्ण वापर घडतो.

या नवरात्रीत घटस्थापनेबरोबरच मनात एक संकल्पही रुजवूया—केवळ देवीसमोर नतमस्तक व्हायचे नाही, तर तिच्या बुद्धिरूपातून प्रेरणा घेऊन आपल्या वागण्यातही सकारात्मक बदल घडवायचा. रोज पाणी वाचवायचे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखायची, गरजेपुरताच उपभोग घ्यायचा आणि स्वतःच्या निर्णयांत इतरांचे व निसर्गाचे हितही जपायचे.

माता भगवतीच्या चरणी हीच प्रार्थना करूया—हे माते, आम्हाला योग्य-अयोग्य ओळखण्याची दृष्टी दे, योग्य ते आचरणात आणण्याचे बळ दे आणि आमच्या बुद्धीला विवेकाची जोड दे. आमची उपासना केवळ पूजेपुरती न राहता, ती मानवतेची सेवा, निसर्गाचे संवर्धन आणि जबाबदार जीवनशैली यातून व्यक्त होऊ दे.

कारण ‘या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता’ या मंत्राला खरे वंदन तेव्हाच घडते, जेव्हा देवीच्या बुद्धिरूपाचे स्मरण आपल्या विचारांत उतरते, विवेक आपल्या कृतींना दिशा देतो आणि आपल्या जीवनशैलीतून मानवतेचे व निसर्गाचे रक्षण होते. हाच नवरात्रीचा खरा जागर—देवीच्या उपासनेतून स्वतःमध्ये सद्गुणांची स्थापना करण्याचा!

गिरीश कुळकर्णी

Monday, 12 October 2026

नवरात्र : मानवतेचा जागर

घटस्थापनेपासून गुणस्थापनेपर्यंत…

विद्यारूपेण संस्थिता : शिकण्याचा जागर, मानवतेचा आधार

नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा उत्सव आणि तिच्या विविध रूपांच्या आराधनेचा सोहळा! ‘या देवी सर्वभूतेषु…’ हा मंत्र देवीच्या सर्वव्यापी स्वरूपाची जाणीव करून देतो. देवीची ही रूपे पूजेपुरती मर्यादित नसून, ती मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या गुणांचे प्रतीक आहेत. या नवरात्रीत देवीच्या रूपांचे स्मरण करताना, तिच्यातील गुणांचा आपल्या जगण्यातही जागर करू या. घटस्थापनेबरोबरच मनात सद्गुणांची स्थापना करून, विचारांतून आणि कृतींतून मानवतेची उपासना करू या.

“या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता। नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः॥”

या मंत्रात एक सुंदर विचार दडलेला आहे—देवी विद्यारूपाने सर्वभूतांमध्ये स्थित आहे. म्हणजेच, शिकण्याची क्षमता आणि अनुभवातून समृद्ध होण्याची शक्यता एखाद्या व्यक्तीपुरती, वर्गापुरती किंवा वयापुरती मर्यादित नाही. प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही शिकण्यासारखे असते आणि प्रत्येक अनुभव आपल्याला नवी जाणीव देऊ शकतो. या विद्यारूप शक्तीला ओळखणे, तिचा आदर करणे आणि तिला आपल्या जीवनात जागा देणे, हीच या मंत्राची व्यावहारिक अनुभूती आहे.

विद्या म्हटले की आपल्याला शाळा, पुस्तके, परीक्षा, गुण आणि पदव्या आठवतात. शिक्षणाच्या या साधनांचे महत्त्व नक्कीच आहे; पण शिकणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. आई-वडिलांकडून आपण नात्यांची जपणूक शिकतो, शिक्षकांकडून विषय समजून घेतो, समाजात राहून सहजीवनाचे धडे घेतो आणि निसर्गाकडून निरीक्षणाची दृष्टी मिळवतो. बालपणापासून वृद्धत्वापर्यंत आयुष्य आपल्याला काही ना काही शिकवत असते. प्रश्न एवढाच की, आपण शिकण्यासाठी मन खुले ठेवतो का?

आपली पाच ज्ञानेंद्रिये या शिकण्याच्या प्रवासातील महत्त्वाची साधने आहेत. डोळ्यांनी बारकाईने पाहणे, कानांनी लक्षपूर्वक ऐकणे, गंध आणि चव यांतील फरक जाणणे, स्पर्शातून अनुभव घेणे—या प्रत्येक कृतीतून आपण जग समजून घेत असतो. मात्र केवळ पाहणे किंवा ऐकणे म्हणजे शिकणे नव्हे. त्या अनुभवातून काय समजले, काय बदलले आणि पुढे काय करता येईल, याचा विचार केला की अनुभवाचे रूपांतर शिकण्यात होते.

एखादा शेतकरी ढग, वाऱ्याची दिशा, जमिनीतील ओल आणि पिकांची स्थिती पाहून निर्णय घेतो. एखादी आजी पदार्थाचा रंग, सुगंध आणि चव यांवरून स्वयंपाकातील बदल ओळखते. एखादा तरुण अनुभवी कारागिराचे काम पाहून नवे कौशल्य आत्मसात करतो. त्यांच्या शिकण्याची पद्धत वेगळी असली, तरी प्रत्येकाच्या अनुभवात विद्यारूप शक्तीची अभिव्यक्ती दिसते. म्हणूनच शिकण्याची संधी केवळ वर्गात नसते; ती आपल्या आजूबाजूला सर्वत्र असते.

मग विद्या आणि ज्ञान यात फरक काय? हे दोन्ही शब्द परस्परांशी जोडलेले आहेत. विद्या आपल्याला विषय शिकण्याची साधने आणि कौशल्ये देते; ज्ञान त्या शिकण्याचा अर्थ समजून घेऊन योग्य निर्णय घेण्यास मदत करते. शेतीची आधुनिक तंत्रे शिकणे ही विद्या; पण जमिनीचा पोत, हवामान आणि पिकांची गरज लक्षात घेऊन त्यांचा योग्य वापर करणे, हे ज्ञानाचे उदाहरण आहे. शिकलेली गोष्ट समजून घेणे आणि ती परिस्थितीनुसार वापरता येणे, यांतूनच शिक्षणाला अर्थ प्राप्त होतो.

आपण मंत्रात ‘विद्यारूपेण संस्थिता’ असे म्हणतो, तेव्हा या विद्येचा आदर करण्याची भावना व्यक्त करतो. हा आदर केवळ पुस्तकांना नमस्कार करण्यात किंवा परीक्षेत चांगले गुण मिळवण्यात नाही. तो प्रश्न विचारण्याच्या धैर्यात, चूक मान्य करण्याच्या प्रामाणिकपणात, नव्याने शिकण्याच्या तयारीत आणि दुसऱ्याच्या अनुभवाचा आदर करण्यातही दिसतो. ‘सर्वभूतेषु’ हा शब्द आपल्याला आणखी एक महत्त्वाची जाणीव करून देतो—आपल्याला प्रत्येकाकडून काहीतरी शिकता येऊ शकते. वय, पद, संपत्ती किंवा सामाजिक स्थान यांवरून एखाद्याच्या अनुभवाचे मोल ठरत नाही.

पण शिकणे आणि समजून घेणे यांचा अंतिम उपयोग काय? तो केवळ स्वतःची प्रगती साधण्यात संपत नाही. डॉक्टरचे ज्ञान रुग्णाला उपचार देताना, शिक्षकाचे ज्ञान विद्यार्थ्यांचे भविष्य घडवताना आणि एखाद्या कुशल व्यक्तीचे मार्गदर्शन दुसऱ्याला स्वावलंबी बनवताना समाजाच्या उपयोगी पडते. दुसऱ्याची अडचण समजून घेणे, त्याला सन्मानाने मदत करणे आणि आपल्या कौशल्याचा उपयोग इतरांचे जीवन सुलभ करण्यासाठी करणे, ही ज्ञानाची मानवतापूर्ण अभिव्यक्ती आहे.

विद्या आपल्याला शिकायला शिकवते, ज्ञान आपल्याला समजायला मदत करते आणि मानवता त्या समजेचा उपयोग दुसऱ्याच्या भल्यासाठी करायला शिकवते. ज्ञानाचा उपयोग माणसांना कमी लेखण्यासाठी नव्हे, तर त्यांना समजून घेण्यासाठी; भेद वाढवण्यासाठी नव्हे, तर परस्परांना जोडण्यासाठी झाला, तरच त्या ज्ञानाला व्यापक अर्थ प्राप्त होतो. अशा वेळी मंत्रातील वंदना केवळ शब्दांत राहत नाही; ती आपल्या वर्तनातून व्यक्त होते.

नवरात्रीची सांगता विजयादशमी अर्थात दसऱ्याने होते. बालपणी दसऱ्याच्या दिवशी आम्ही दगडी पाटी कोळशाने घासून स्वच्छ करायचो. त्या पाटीवर सरस्वतीची चित्रे काढून पाटीपूजन करायचो आणि विद्येच्या देवतेला वंदन करायचो. त्या वेळी या परंपरेचा अर्थ कितपत समजत होता, हे सांगता येणार नाही; पण आज जाणवते की, त्या कृतीतून विद्येविषयीचा आदर आणि शिकण्याची ओढ मनात रुजत होती. सरस्वतीचे रूप हे विद्येच्या या पूजनीय भावनेचे परिचित प्रतीक आहे; मात्र ‘विद्यारूपेण संस्थिता’ या मंत्राचा आशय त्याहून व्यापक आहे—विद्या जिथे शिकण्याची जिज्ञासा जागवते, समज वाढवते आणि जीवनाला दिशा देते, तिथे त्या शक्तीचा अनुभव घेता येतो.

या नवरात्रीत सरस्वतीच्या पूजनाबरोबरच एक संकल्प करू या—दररोज काहीतरी नवे शिकूया, दुसऱ्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकू या, अनुभवांतून स्वतःला घडवू या आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करू या. आपल्याला जे माहीत आहे ते इतरांपर्यंत पोहोचवू या; जे माहीत नाही ते शिकण्याची नम्रता ठेवू या. प्रत्येक व्यक्तीकडे शिकण्यासारखे काहीतरी आहे, ही जाणीव जपू या.

‘नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः’—ही वंदना मग केवळ मुखातून उच्चारलेला मंत्र न राहता, शिकण्याप्रती आदर, ज्ञानाप्रती नम्रता आणि माणसांप्रती संवेदनशीलता व्यक्त करणारे जीवनमूल्य बनेल. कारण विद्यारूपातील देवीला खरे वंदन तेव्हाच घडते, जेव्हा आपण शिकतो, समजून घेतो आणि त्या समजेचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी करतो. हाच ‘घटस्थापनेपासून गुणस्थापनेपर्यंत’च्या प्रवासातील विद्यारूपाचा जागर!

Sunday, 11 October 2026

नवरात्र : मानवतेचा जागर


घटस्थापनेपासून गुणस्थापनेपर्यंत…
भक्ती : मन जोडण्याची शक्ती

नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा उत्सव आणि तिच्या विविध रूपांच्या आराधनेचा सोहळा! “या देवी सर्वभूतेषु…” हा मंत्र देवीच्या सर्वव्यापी स्वरूपाची जाणीव करून देतो. देवीची ही रूपे केवळ पूजेपुरती मर्यादित नसून, ती मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या गुणांचे प्रतीक आहेत. या नवरात्रीत देवीच्या रूपांचे स्मरण करताना, तिच्यातील गुणांचा आपल्या जगण्यातही जागर करू या. घटस्थापनेबरोबरच मनात सद्गुणांची स्थापना करून, विचारांतून आणि कृतींतून मानवतेची उपासना करू या.

आज आपण देवीच्या भक्तिरूपातून प्रकट होणारी भक्ती आणि तिचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व जाणून घेणार आहोत. भक्ती म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर मंदिर, पूजा, आरती आणि जप येतो. पण भक्तीचा अर्थ एवढाच आहे का? भक्ती म्हणजे मनापासून जोडले जाणे. आपल्या श्रद्धेशी, आपल्या कर्तव्याशी आणि आपल्या माणसांशी प्रामाणिक राहणे, हेदेखील भक्तीचेच रूप आहे.

आई आपल्या मुलाची काळजी घेते, तेव्हा ती केवळ कर्तव्य पार पाडत नसते; तिच्या कृतीत प्रेम आणि समर्पण असते. एखादा शिक्षक विद्यार्थ्याला पुन्हा पुन्हा समजावून सांगतो, कारण त्याला त्या मुलाने शिकावे असे मनापासून वाटते. एखादी व्यक्ती कोणतीही प्रसिद्धी किंवा परतावा न मागता गरजू माणसाला मदत करते, तेव्हाही भक्तीच व्यक्त होत असते.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

“जे का रंजले गांजले।
त्यासी म्हणे जो आपुले॥”

दुःखी माणसाला आपले मानणे, त्याच्या वेदना समजून घेणे आणि त्याला आधार देणे, ही भक्तीचीच अनुभूती आहे. वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीची वाट चालतात; त्या प्रवासात एकमेकांना मदत करणे, अनोळखी व्यक्तीशीही आपुलकीने वागणे आणि सर्वांना समान मानणे, यांतूनही भक्ती प्रकट होते.

देवापुढे दिवा लावणे सुंदर आहेच; पण आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा दिवा लागणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपण देवाची पूजा करतो, पण आपल्या घरातील ज्येष्ठांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो का? देवाला फुले वाहतो, पण दुःखी माणसाचे अश्रू पुसण्यासाठी थांबतो का? हे प्रश्न स्वतःला विचारणे म्हणजेच भक्तीच्या खऱ्या अर्थाकडे वाटचाल करणे.

या नवरात्रीत एक छोटासा संकल्प करू या—आपल्या कृतीतून कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू फुलवू या, कोणाचे तरी दुःख हलके करू या आणि आपले कर्तव्य अधिक प्रेमाने पार पाडूया. कारण खरी भक्ती देवापुढे नतमस्तक होण्यात आहेच; पण माणसाने माणसाशी माणसासम वागण्यातही आहे.

बोला अंबा माता की जय !

गिरीश कुळकर्णी

Sunday, 10 August 2025

"अलख" : भाव-लय-तालांची अविस्मरणीय मैफल

प्रभाकर कला संगीत अकादमीच्या अलख ही मैफल रविवार, दि. १० ऑगस्ट रोजी भैय्कयासाहेब गंधे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मैफिलीची सुरुवात गुरुवंदनेने झाली आणि त्यानंतर सलग अर्धा तास कथक नृत्यातून या नृत्यप्रकाराची गती, रचना आणि अभिव्यक्तीचे वैभव खुलून आले. त्यानंतर रामभजनातील भक्तीरस मनात शांतता व समाधानाची अनुभूती देणारा ठरला. देवीवरील शक्ती-नृत्य अप्रतिम उर्जा व सामर्थ्याने भारावून टाकणारे होते. तर श्रृंगार रस व्यक्त करणारी ‘कान्हा मै तोसे हारी’ ही ठुमरी लय, भाव आणि नजाकतीने रंगून गेली. चैती नृत्य वसंताच्या रंगांची आणि लोकभावनांची झुळूक घेऊन आले. प्रत्येक सादरीकरणात अंगभूत भाव, नृत्याची बारीकसारीक नजाकत, ताल-लय आणि मुद्राभिनय यांचे अप्रतिम मिश्रण पाहायला मिळाले.

चतुरंग नृत्यातून कथकातील विविध पैलू — तालबद्ध पायांच्या टाळ्या, मुद्राभिनय, भावमुद्रा — यांचा अप्रतिम संगम ‘छन छन वाजे मोहन पग पैंजरी’ या सादरीकरणातून अनुभवायला मिळाला. यानंतर कजरी नृत्यप्रकारात राधा-कृष्णाच्या विरहातील आर्तता, वेदना आणि प्रेमाची गोड वेदना ‘भीर आयी है काहे कजरीया’ या भावस्पर्शी सादरीकरणातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. बंदिश मध्ये आईचे प्रेम, तसेच राधेच्या हृदयातील प्रेम या कृष्णावरील दोन प्रेमाचे स्वरूप ‘बस कर रे तुम शाम मोरा मन’ या भावपूर्ण नृत्यातून उमटले.

उत्साह आणि रंगांची उधळण घेऊन आलेल्या होरी नृत्यात ‘आज मोहन खेलत होली’ या सादरीकरणाने रंगत आणि आनंदाचा शिखर गाठला. शेवटच्या तरानाने स्वर, ताल आणि लयांचा झंकार निर्माण करत संपूर्ण कार्यक्रमाला भव्य आणि उत्साही पूर्णविराम दिला.

प्रत्येक सादरीकरणात नृत्याची बारकाई, लयबद्धता, भावपूर्ण अभिव्यक्ती आणि मंचावरील सौंदर्य यांचा समन्वय विलक्षण होता. "अलख" कथक नृत्यावरील कार्यक्रम खरोखरच मनाला भिडणारा ठरला. दिसण्यात नाही तर भावनेतून व्यक्त होणारी कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात कलाकारांनी यश मिळवले. "अलख" ने खऱ्या अर्थाने कथक नृत्याची विविध रसांतील समृद्धी आणि भावविश्व रसिकांसमोर खुलवून मांडले.

कार्यक्रमात कला सादर करण्यासाठी अपार मेहनत घेणाऱ्या सर्व कलासाधकांचे व त्यांच्या पालकांचे मनापासून अभिनंदन! या कार्यक्रमाच्या माध्यमातून जळगावच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणाऱ्या प्रभाकर कला संगीत अकादमीच्या सर्वेसर्वा डाॅ. अपर्णा भट-कासार तसेच  सह-प्रयोजकाच्या भुमिकेत असलेल्या वल्लभदास वालजी वाचनालयाच्या सर्व पदाधिकारी यांचे जळगावकरांच्यावतीने मनापासून आभार...

गिरीश कुळकर्णी, जळगाव
९८२३३३४०८४

Sunday, 15 September 2024

तुम्ही आम्ही सर्व इंजिनिअर...

दि. १५ सप्टेंबर ! भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस... भारतवर्षात अभियंता दिन म्हणुन साजरा केला जातो. आपणा सर्वांना अभियंता दिनाच्या मनापासून हार्दीक शुभेच्छा !

आपणास प्रश्न पडला असेल की आपण तर इंजिनिअर नाही तरी पण आपल्याला शुभेच्छा का ? या लेखाचे प्रयोजनच ते आहे की प्रत्येक मनुष्य प्राणी हा जन्मत: इंजिनिअर असतो. दुर्दैवाने आपण केवळ व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या किंवा इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीलाच इंजिनिअर समजतो. माझ्या दृष्टीने विद्यार्थी, शेतकरी, गृहिणी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक जण हा इंजिनिअर आहे आणि या सर्वांना आपण इंजिनिअर म्हणून स्वीकारले पाहिजे. पालकांनी तर त्याच्यामधील या इंजिनिअर गुण वैशिष्ट्यांचा विकास केला पाहिजे त्यासाठी पूरक वातावरण दिले पाहिजे. 

अभियांत्रिकी हा केवळ एक व्यवसाय नाही, तर एक मानसिकता, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि समस्या सोडवण्याचा एक मार्ग आहे. याचा अर्थ असा होतो की अभियंते जगाला एक जटिल प्रणाली म्हणून पाहतात, ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यावर उत्तर शोधण्याची संधी म्हणून पाहतात. 

मानवी जीवनपद्धतीचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल. यासंदर्भातील काही बिंदू :

१. कुतूहल: का आणि कसे हे प्रश्न मानवी मनाला कायम पडतात. 

२. सर्जनशीलता: नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची आवड.

३. विश्लेषणात्मक विचार: समस्यांचे विश्लेषण करण्याची आणि घडणार्‍या गोष्टींना समजून घेण्याची सवय.

४. साधनसंपत्ती: अडथळ्यांवर मात करण्याचे मार्ग शोधण्याची प्रतिभा.

५. चिकाटी: हाती घेतलेले काम कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा निर्धार.

६. तपशीलाकडे लक्ष: गोष्टी योग्य करण्यावर भर असतो. चुक झाल्यास त्या दुरुस्त करण्याची तयारी असते.

७. सहयोग: टीमवर्क आणि संवाद आवश्यक आहे याची जाणीव.

८. सतत शिकणे: नवीन तंत्रज्ञान आणि कल्पनांसह अद्ययावत राहण्याची वचनबद्धता.

माणूस आपल्या जीवनातील दैनंदिन आव्हानावर मानसिक, बौद्धिक व तार्किक क्षमतेने मात करण्याचा प्रयत्न करतो. हे प्रयत्न व्यावहारिक भाषेत अभियांत्रिकीच आहे असे मला ठामपणे नमूद करावेसे वाटते. ते जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये सुधारणा आणि नाविन्यपूर्णतेच्या संधी शोधत असतात.

प्रत्येक व्यक्ती अभियांत्रिकी मानसिकतेचा अवलंब करून, आपण अधिक चांगले समस्या सोडवणारे, नवोन्मेषक आणि नागरिक बनतात, ज्यामुळे आपल्या समाजामध्ये आणि जगावर सकारात्मक प्रभाव पाडतात.

काय पटतय ना? थोड विस्ताराने समजून घेऊ या... प्रत्येक मानवाकडे अंतर्निहित (जन्मजात) समस्या सोडवण्याची कौशल्ये, सर्जनशीलता आणि संसाधने असतात, जे इंजिनिअरचे मूलभूत गुण आहेत.

प्रत्येक माणूस एक अभियंता आहे या कल्पनेचे समर्थन करण्यासाठी येथे काही मुद्दे आहेत:

१. समस्या सोडवणे: मानव नैसर्गिकरित्या आव्हानांशी जुळवून घेतात, अडथळ्यांवर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधतात.

२. संसाधने: लोक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संसाधनांचा पुनर्प्रयोग, पुनर्वापर आणि पुरेपूर वापर करतात.

३. सर्जनशीलता: मानव कला, संगीत, लेखन आणि सादरीकरणाच्या इतर प्रकारांद्वारे सर्जनशीलता व्यक्त करतो.

४. सर्वंकष विचार: मानव माहितीचे विश्लेषण करतात, पर्यायांचे मूल्यांकन करतात आणि माहितीवर आधारीत निर्णय घेतात.

५. प्रयोग: लोक कल्पनांची चाचणी घेतात, अपयशातून शिकतात आणि दृष्टिकोन सुधारतात.

६. सुधारणा: मानव अनपेक्षित परिस्थितींशी जुळवून घेतात, नावीन्यपूर्ण उपाय शोधतात.

७. सहयोग: लोक एकत्र काम करतात, सामान्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य सामायिक करतात.

८. शिकणे आणि पुनरावृत्ती: मानव अनुभवांमधून शिकतात, कौशल्ये सुधारतात आणि प्रक्रिया सुधारतात.

९. नवोपक्रम: लोक नवीन कल्पना, उत्पादने आणि सेवा विकसित करतात, प्रगती करतात.

१०. लवचिकता: मानव आव्हानांवर टिकून राहतात, इंजिनिअरसारखा दृढनिश्चय दाखवून देतात.

प्रत्येक माणसामध्ये हे अभियांत्रिकी गुण ओळखून आपण काही गोष्टी करु शकतो. जसे 

- व्यक्तींना त्यांच्या जन्मजात समस्या सोडवण्याच्या क्षमतेचा वापर करण्यास सक्षम करा

- सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण वातावरण देऊन अशा गोष्टींना प्रोत्साहित करा. 

- आंतरविद्याशाखीय सहकार्यास प्रोत्साहित करा

- अधिक समावेशक आणि वैविध्यपूर्ण अभियांत्रिकी समुदाय विकसित करा

या कल्पनेचे समर्थन करण्यासाठी, जीवनातील या समान धाग्यांचा विचार करावा:

- जीवन हा एक प्रकल्प आहे आणि आम्ही सर्व त्या प्रकल्पाला यशस्वी करणारे इंजिनिअर आहोत.

- प्रत्येक व्यक्ती एक इंजिनिअर आहे, जो सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय समस्यांना उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. 

- माणूस जैविक इंजिनिअर असून तो आपले स्वतःचे शरीर आणि मन स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करतो.

माझा युक्तिवाद वास्तवात अनुभवायचा असल्यास आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील त्या...

- मानवी क्षमता म्हणून इंजिनिअरची व्याख्या नव्याने मांडावी लागेल.

- तांत्रिक आणि गैर-तांत्रिक असा भेदभाव मिटवावा लागेल. 

- लोकांना त्यांची स्वतःची सर्जनशील क्षमता ओळखण्यास प्रेरित करावे लागेल. 

जळगावातील क्रिएटीव्ह गृप ही संस्था समाजाचे इंजिनियरिंग विषयी  प्रबोधन करण्याचे काम अभियंता दिनाच्या निमित्ताने व्याख्यान आयोजित करुन करीत असते. यावर्षीही दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता रोटरी भवन, मायादेवी नगर येथे नाशिक येथील के. के. वाघ इंजिनियरिंग कॉलेजचे विभाग प्रमुख मा. श्री. सुनीलजी कुटे यांचे दैनंदिन जीवनात डॉ. विश्वेश्वरय्या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे. 

गिरीश कुळकर्णी

9823334084 

Wednesday, 24 January 2024

प्रभु श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा निमित्ताने...

अतिशय मंगलमय व पवित्र वातावरणात रामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत झाली. भारतासह अनेक देशात या निमित्ताने दिवाळी साजरी करण्यात आली. पाचशे वर्षाच्या संयमित संघर्षानंतर, अगणित रामभक्तांच्या बलिदानानंतर, हिंदुस्थानात हिंदूंच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या प्रभु श्रीरामचंद्रांची प्रतिष्ठापना याची देही याची डोळा अनुभवता आली हि त्याचीच कृपा...

ह. भ. प. सद्गुरु संत श्री सखाराम महाराज यांच्या आज्ञेनुसार दि. २५ डिसेंबर ते २२ जानेवारी (२९ दिवसात) या काळात श्री रामरक्षा स्तोत्राचे १९७ वेळा पठण केले...

याच काळात गोंदवले व सज्जनगड येथे जाण्याचा व रामरक्षा पठणाचा योग आला...

संत गजानन महाराज (शेगाव), दिक्षाभुमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय (नागपूर), एकविरा देवी, सिद्धेश्वर गणपती (धुळे), जोगेश्वरी माता (अंबेजोगाई), तुळजाभवानी (तुळजापूर), पांडुरंग (पंढरपूर), ढोल्या गणपती (सातारा ग्रामदैवत), नरसोबाची वाडी या पवित्र स्थानी देवदर्शन झाले...

अमरावती, नागपूर, नंदुरबार, शिरपूर, पिंपळगाव बसवंत, अंबेजोगाई, पंढरपूर, सातारा, विसापूर व शिरोळ येथे महात्मा गांधींनी मांडलेल्या रामराज्याच्या संकल्पनेच्या अनुषंगाने विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेशी संवाद...

धानोरा जन्मगावी रोटरी क्लब, जळगावच्या माध्यमातून आरोग्य शिबीराचे आयोजन, ६३० मुले, महिला व नागरीकांची विनामूल्य तपासणी, २४० लोकांना विनामूल्य चष्मे, ८० रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड...

प्राणप्रतिष्ठा दिनाच्या पूर्वसंध्येला कुटुंब प्रबोधन गतिविधीच्या एकादशी व्याख्यानमालेंतर्गत कुटुंबातील राम या विषयावर व्याख्यान...
ह.भ.प. सद्गुरु श्री प्रसाद महाराज यांचे छत्रपती संभाजीनगर येथे दर्शन आशीर्वाद...

माझे आदर्श माजी कुलगुरु अण्णासाहेब डाॅ. के. बी. पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने प्रकाशित आत्मकथनावर व त्यांच्या जीवनावर लेखन व अभिष्टचिंतन सोहळ्यात परिवारजनांसह सहकारी शिक्षक व मित्रांची एका मोठ्या कालखंडानंतर सहवास-भेट...

या सर्वांवरील कळस म्हणजे प्राणप्रतिष्ठा दिनी अनुभवलेली हिंदु धर्माची पवित्रता, सात्विकता, अध्यात्मिकता, संयमितता, उत्सवप्रियता, एकसंघता, भावविभोरता अशा अनेक भावनांची स्पंदने... जळगावकरांचे अयोध्येतील कार्यक्रमात प्रतिनिधित्व करणारे आदरणीय अशोकभाऊंचे जळगावातील स्वागत आनंददायी, उत्साहवर्धक व देशाच्या रामराज्याकडील वाटचालीचे प्रतिक वाटले. 

प्रभु श्रीरामचंद्रांच्या चैतन्यदायी ऊर्जास्रोतामुळे जीवनात एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मकता अनुभवता आली.

आपण सर्व मिळून माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केलेल्या आवाहनानुसार रामराज्यासाठी मतभेद संपवून एकदिलाने, स्व-अनुशासनाने, देशभक्तीने, एकात्मतेने, वाणी, मन आणि वचनाने एक होऊ या... नवीन समर्थ, संपन्न  व  संपूर्ण जगाला येणाऱ्या संकटातून दिलासा देणारा भारत घडविण्यासाठी वचनबद्ध होऊ या !

सियावर रामचंद्र भगवान की जय ! जय श्रीराम ! जय जय श्रीराम !

गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४