Tuesday 28 December 2021

माणूस व्हायचंय मला !

 माणूस व्हायचंय मला ! 

भडगाव येथील केशवसुत ज्ञानप्रबोधिनीच्यावतीने रविवार दि. २६ डिसेंबर २०२१ रोजी केशवसुत व्याख्यानमालेंतर्गत "माणूस व्हायचंय मला !" या विषयावर व्याख्यान देण्याची संधी मिळाली. अनेकांनी या व्याख्यानाच्या रेकॉर्डिंगबाबत विचारणा केली. मात्र रेकॉर्डिंग केलेले नसल्याने व्याख्यानाच्या नोटसच्या रूपाने केलेले लिखाण येथे देत आहे. 

कृष्णाजी केशव दामले अर्थात केशवसुत. आधुनिक मराठी काव्याचे जनक यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! भडगावच्या पवित्र भूमीत अध्यापनाची चार वर्षे केशवसुत यांनी कार्य केले. त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना जपत गेली २५ वर्षे ज्यांनी त्यांच्या नावाने हि व्याख्यानमाला अखंडपणे सुरु ठेवली त्या केशवसुत ज्ञानप्रबोधिनीला व त्यांच्या समस्त कार्यकारिणीला व भडगावकरांनाही मनापासून अभिवादन ! 

यावर्षीच्या व्याख्यानमालेत दुसरे पुष्प ज्यांच्या स्मरणार्थ होत आहे त्या मातोश्री स्व. साधनाताई प्रतापराव पाटील यांनाही अभिवादन ! ताईसाहेब सौ. पूनम प्रशांत पाटील यांचे अभिनंदन ! कविवर्य ना. धो. महानोरदादांची यानिमित्ताने विशेष आठवण कारण त्यांच्या सूचनेनुसार हि व्याख्यानमाला सुरु आहे. 

मित्रहो आजच्या व्याख्यानाचा विषय आहे "माणूस व्हायचंय मला !" खरं तर आपण सर्वच इतकी चांगली माणसे आहोत मग असा विषय का ? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर आपण सर्व प्रवासी आहोत... चांगला माणूस बनण्याचा आपला सर्वांचा हा प्रवास अखंडपणे सुरु आहे आणि सुरु राहणार आहे अंतिम श्वासापर्यंत . अधिक चांगला, अधिक चांगला, संवेदनशील माणूस बनण्याचा हा प्रवास. त्यासाठी आपली सर्वांची खटपट अव्याहतपणे सुरु असते. जशी तुमची तशी माझीही... त्यामुळे आज मी जो विषय आपल्यासमोर मांडणार आहे ते एक प्रकारचे स्वगत आहे. माझेच... माझ्याशी ! 

विषयाची तयारी करीत असतांना वारंवार एक कविता समोर येत होती. खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता 

मानूस मानूस मतलबी रे मानसा,

तुले फार हाव 

तुझी हाकाकेल आशा 

मानसा मानसा,.. 

शेवटी त्या म्हणतात 


कधीं व्हशीन मानूस 

लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस ! त्याचबरोबर दलाई लामा यांचीही अशीच एक कविता आठवते 



आपल्या काळात इमारतींची उंची वाढली पण 

माणुसकीची कमी झाली..का ?

रस्ते रुंद झाले; पण दृष्टी अरुंद झाली.. का ?

खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली

घरं मोठी पण कुटुंबं छोटी....

सुखसोयी पुष्कळ, पण वेळ दुर्मिळ झाला.

पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग

माहितीचे डोंगर जमले, पण नेमकेपणाचे झरे आटले.

तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या

औषधं भरपूर, पण आरोग्य कमी झालं.

मालकीची भाषा वाढली, मूल्यांची कमी

आपण बोलतो फार....प्रेम क्वचित करतो....

आणि तिरस्कार सहज करतो....

राहणीमान उंचावल; पण जगणं दळभद्री झालं.

आपल्या जगण्यात वर्षाची भर पडली; पण आपल्या वर्षामध्ये जगण्याची नाही

आपण भले चंद्रावर गेलो-आलो; पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणे काही होत नाही.

बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत, पण आतल्या हरण्याचं काय

हवा शुध्द करण्यासाठी आटापिटा; पण आत्माच्या गुदमरण्यांच काय?

आपली आवक वाढली; पण नीयत कमी झाली

संख्या वाढली-गुणवत्ता घसरली.

हा काळ उंच माणसांचा; पण खुज्या व्यक्तीमत्वांचा

उदंड फायद्यांचा पण उथळ नात्यांचा.

जागतिक शांतीच्या गप्पांचा पण घरातल्या युध्दांचा

मोकळा वेळ हाताशी पण त्यातली गंमत गलेली.

विविध खाद्यप्रकार पण त्यात सत्व काही नाही

दोन मिळवती माणसं पण त्यांचे घटस्फोट वाढलेले.

घरं नटली पण घरकुल दुभंगली

दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेल पण कोठीची खोली रिकामीच.

या दोनही कवितांनी माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आणि त्यासाठीच मी ठरवलंय मला माणूस व्हायचंय ! गेली पावणे दोन वर्षे आपण कोरोना महामारीच्या आव्हानाला सामोरे जात आहोत. या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे 'करेल कोण आणि भरेल कोण' आवश्यक काळजी न घेणाऱ्या एखाद्या तरुणामुळे व्याधिग्रस्त ज्येष्ठांना संसर्ग झाला तर त्याला जीव गमावण्याची वेळ येऊ शकते. मित्रानो सद्यस्थितीत आपण अनेक गोष्टी करीत आहोत आणि भविष्यात त्याचा त्रास येणाऱ्या पिढयांना होणार आहे आणि त्यासाठीच आपण माणूस होण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता भासते. काही उदाहरणे पाहू या ! 

- पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढत आहे आणि २०५० पर्यंत माणसाच्या अस्तित्वालाच आव्हान निर्माण होण्याचा धोका आहे. 

- काही दिवसांपूर्वी दक्षिणेतील एका गावात काही लोकांनी एका गरोदर हत्तीणीला फटाके असलेले अननस खायला दिले. दुर्दैवाने तिने तिचे बाळ तर गमावलेच पण तीन दिवसांनी स्वतःचाही जीव गमावला.

- मागील ८-१५ दिवसात आपल्या बहिणीचा प्रेमविवाह मान्य नसलेल्या भावाने आपल्या बहिणीचे शीर धडापासून वेगळे केले आणि मुंडक्यासोबत सेल्फी काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. 

- टीईटी परीक्षेचा घोटाळा  आणि त्यातील सहभागी आरोपी सध्या आपण त्यांच्याबद्दल ऐकतो आहोत. 

- शेतीमध्ये आवश्यक असलेल्या पाण्यासाठी ७०० फूट बोअर केले जात आहेत. 

- परवा आमच्या गल्लीत घराच्या भिंतीवरील धूळ घालविण्यासाठी भिंती धुणाऱ्या ताईंना म्हटले 'अहो, लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि आपण चक्क भिंती धूत आहात ?' त्यांचे उत्तर होते 'आम्ही नगरपालिकेचे नाही तर आमच्या बोअरचे पाणी वापरत आहोत, तुम्हाला काय अडचण आहे ?'

आपण सजगपणे डोळे उघडे ठेऊन आपल्या आजूबाजूला पहिले तर अशा कितीतरी गोष्टी, घटना आपल्याला अंतर्मुख करतील व तिथेच माणूस होण्याची प्रेरणा आहे. सध्या गांधी रिसर्च फाउंडेशनमध्ये कार्यरत आहे. माझ्या ५२ वर्षाच्या कालखंडात जेव्हढे गांधी बद्दल वाचले होते त्याच्या अनेक पॅट मागील अडीच महिन्यात वाचले. त्यांनी सांगितलेल्या एकादश व्रताच्या अक्षरश: प्रेमात पडलो. मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या व्रतांचा अंगीकार करणं म्हणजे माणूस होण्याकडे वाटचाल सुरु करणे असे मला वाटते. सध्याच्या भौतिकतावादी जगात नीतिमूल्यांचा झपाट्याने होणार ऱ्हास आपणास काय सांगतो. आपण या पृथ्वीवर उपरे आहोत, पाहुणे आहोत हे आपणास कधी समजेल ? आपण पाहुण्यासारखेच राहिले पाहिजे. संवेदनशील माणसासारखीच आपली वागणूक असली पाहिजे. 

मानवाशी संबंधित प्रकृती, विकृती व संस्कृतीशी आपण सुपरिचित आहोत. 'अति तिथे माती' हे पण आपण


लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आपले पालक, कुटुंबीय, समाज, देश आपल्याला समृद्ध अशा जीवनाचा संस्कार देतात. ज्या महाराष्ट्रात आपण राहतो. ती संतांची भूमी आहे. सर्व धर्मांचा मूळ पाया असलेली माणुसकी आणि भूतदयेचा अंगीकार करून ते समाजात रुजविण्याचे अखंड प्रयत्न त्यांनी केले. "ज्ञानेश्वर माऊलींपासून ते निळोबारायांपर्यंत" या भूमीत अठरापगड जातीची मांदियाळी उदयास आली. या सर्व संतांनी सत्य, अहिंसा, संत, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव आणि विश्वबंधुत्व या नीतिमूल्यांना विठ्ठल भक्तीची जोड देत माणसाला माणूस बनविण्याचं, समाज घडविण्याचंअमूल्य कार्य त्यांनी केले. जीवनातील संघर्ष, समाज परिवर्तनास लावलेला हातभार, प्रस्थापित चौकटीला केलेले आव्हान... हे करीत असतांना समाज व्यवस्थेची घडी जातीय वा धार्मिक विद्वेषाने विस्कळीत होऊ नये यासाठीही संतांनी केलेले प्रयत्न समाजासमोर आहेत. अलीकडच्या काळात आपण त्यापासून दूर जात आहोत का ? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. त्यासाठीच आपण माणूस होण्याची आवश्यकता आहे. 

संतांबरोबरच आदर्श जीवनपद्धती ठरवून जगणारे अनेक आदर्श आपल्यासमोर आहेत. जे आपणास माणूस म्हणून कसं जगता येतं याचा वस्तुपाठ आपल्या जीवनातून देतात. हि आदर्श मंडळी तुमच्या माझ्यासारखी हाडामासाचीच माणसे आहेत वा होती. ज्यांची जीवने आजही आम्हाला कसं जगावं हे सांगतात. उणेपुरे चार दशकांचे आयुष्य लाभलेले कवी केशवसुत असो वा स्वामी विवेकानंद. संत ज्ञानेश्वर असो वा संत रामदास, डॉ. राधाकृष्णन असो वा डॉ. एपीजे कलाम असो, साने गुरुजी असो वा विनोबा भावे, महात्मा गांधी असो वा डॉ. आंबेडकर, भगतसिंग असो वा शिरीषकुमार, डॉ. आचार्य असो वा पद्मश्री डॉ. भवरलाल जैन असो, स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी असो वा समतोलचे विजय जाधव, , कुडाळचे दिलीप कुलकर्णी असो वा कोल्हापूरच्या नसीमाताई, स्व, बाबा आमटे असो वा महर्षी कर्वे... खूप मोठी यादी आहे हि.. संपता संपणार नाही. आपण तसे होणे म्हणजेच माणूस होणे नाही का ? जे त्यांना शक्य झाले ते आम्हाला का जमणार नाही ? परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि आपण त्याचे एक घटक आहोत. माणूस होणे म्हणजे माणुसकीने जगणे. भारतासारख्या संस्कृतीयुक्त देशात आपल्या आईवडिलांना मुलांनी सांभाळले पाहिजे यासाठी कायदा करावा लागतो, हे नक्कीच दुर्दैवी नाही का ? 

'माणूस व्हायचंय मला !' या विषयाचे गांभीर्य आपल्या लक्षात आले असेल. नैसर्गिक साधन संपत्ती, मिळालेले आयुष्य किती गांभीर्याने व सजगतेने जगले पाहिजे. अगदी छोट्या छोट्या व दैनंदिन गोष्टीतून आपण आपलं माणूसपण जपू शकतो. एक कागद तयार करण्यासाठी करावी लागणारी वृक्षतोड नजरेआड करून चालणार नाही. गरज आणि चैन यातील फरक नक्कीच ध्यानात घेण्यासारखा आहे. गरज किती मर्यादित ठेवल्या पाहिजे आणि मर्यादित साधनांमध्येही माणूस कसा सुखी, समाधानी जगू शकतो हे शिकणे म्हणजे माणूस होणे होय. कोरोनाने आपल्याला हे शिकविलं, दुर्दैवाने आपण त्यापासून काही शिकलोच नाही. विजेचा वापर, वाहनांचा वापर,, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वा गॅजेटसचा अतिरेकी वापर याकडेही जाणीवपूर्वक लक्ष देण्याची हि वेळ आहे. आपला आनंद शोधता आला पाहिजे. मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो मिळण्यापेक्षा देण्यात अधिक आनंद आहे. द्यायला शिका...

संत सेना महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात 'जाता पंढरीसी सुख वाटे जीव, आनंदे केशवा भेटताची... आम्हाला चार पाऊले चालतांना त्रास होतो मात्र पंढरीची आस लागलेले हजारो वारकरी शेकडो किमीचे अंतर सहज पार करतात. मित्रांनो 'उठा ! जागे व्हा !.. आणि ध्येयसिद्धीशिवाय थांबू नका.' या धरतीचा स्वर्ग बनविण्याचा संकल्प करा. परिस्थिती बदलण्याची क्षमता तुमच्या माझ्यात आहे. कविवर्य केशवसुतांची ';"तुतारी'' कविता हेच तर सांगते... 


एक तुतारी द्या मज आणुनी !

फुंकीन मी जी प्राणपणाने, 

भेदून टाकीन सगळी गगने , 

दीर्घ तिच्या त्या किंकाळीने,

अशी तुतारी द्या मज लागुनी !

पुढे याच कवितेत कवी म्हणतात 

प्राप्तकाल हा विशाल भूधर

सुंदर लेणी तयात खोदा

नावे आपुली त्यावर नोंदा, 

बसुनी का वाढविता मेदा ?

विक्रम काही करा, चला तर...!  

आपल्या विषयाशी संबंधित आणखी एक कडवे आहे. 

पडली छाया मनुजाची जर, 

विटाळ होतो तर मनुजाला 

व्हावे स्नानची सचैल त्याला,

काय म्हणावे या मुर्खाला ?

नरेच केला हीन किती नर ! 

शेवटचं वाक्य माणसानेच माणसाला किती खालच्या पातळीवर आणून ठेवले तर... एका बाजूला परिस्थितीची चीड व्यक्त करणारे केशवसुत. सतारीचे बोल या कवितेत आश्वासक वाटतात. 

स्कंधीं माझ्या हात ठेवुनी

आश्वासी मज गमले कोणी 

म्हणे - "खेद इतुका" का करिसी ?

जीवास कां ब असा त्रासासी ?

धीर धरी रे धीरापोटी

असती मोठी फळे गोमटी !

ऐक मनीच्या हरित गदा

ध्वनी हे दिड दा, दिड दा...  दिड दा !

काय प्रतिभा आणि ताकद आहे शब्दांची... सतारीचे बोल जीवनाकडे पाहण्याची कशी दृष्टी देतात. स्वर्ग, पृथ्वी आणि मनुष्य या कवितेत कल्पित कथेद्वारे स्वर्ग आणि पृथ्वी या दोघांच्या प्रेमाची आणि ताटातुटीची कहाणी वर्णिली आहे. त्या ताटातुटीला पृथ्वीपुत्र मानवाची कृतघ्नता कारणीभूत झाली असे म्हणून मानवाच्यावतीने केशवसुतांनी पृथ्वी आणि स्वर्ग यांची क्षमा मागितली आहे. आपण सर्व जागरूक व संवेदनशील माणूस म्हणून आपला प्रवास सुरु करू या !  


गिरीश कुलकर्णी

९८२३३३४०८४ 

Monday 6 December 2021

तेथे कर माझे जुळती !


वृत्तिशून्य योगेश्वर डॉ. किशन काबरा


महाराष्ट्राला थोर अशी संत परंपरा लाभली आहे. संतांनी समाजोद्धाराचे कार्य आपल्या साहित्यातून केले आहे. या सर्वांचा उद्देश मानवी जीवनाचे कल्याण हेच होय. मानवी जीवनाचे कल्याण हे त्याच्या आत्मोन्नतीतच आहे. हि आत्मोन्नती कशी करावी याचा मार्ग दाखविणारे हे संत साहित्य. अशा परंपरेतील एक संत म्हणजे समर्थ रामदास. त्यांनी आपल्या दासबोधातून व मनाच्या श्लोकातून समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे. हे कार्य कालातीत असून ते आजही मानवी जीवांच्या कल्याणासाठी मार्गदर्शक आहेत असे वाटते. समर्थांनी दासबोधात "वृत्तिशून्य योगेश्वरा"ची संकल्पना मांडली आहे. जळगावातील ज्येष्ठ उद्योजक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजकांचे आदरस्तंभ असलेले डॉ. किशन काबरा अर्थात काकाजी यांचे नुकतेच निधन झाले. काकाजींचे जीवन मला वृत्तिशून्य योगेश्वराचे प्रतीक आहे असे  वाटते. त्यासाठीच हा श्रद्धांजलीपर लेख.

समर्थांनी दासबोधात प्रपंचाच्या मर्यादा न सोडता परमार्थ करावा याचे उत्तम असे मार्गदर्शन केले आहे. काकाजींनी आपल्या जीवनात असा परमार्थ केला म्हणूनच ते म्हणू शकतात "स्वर्ग हवाय कुणाला ?". कारण जीवनात जे जे पाहिजे ते सर्व येथे भूतलावरच मिळाले आहे. हा भूतलच माझ्यासाठी स्वर्ग आहे. त्यामुळे मृत्यूपश्चात स्वर्ग मिळावा यासाठीची सामान्य माणसाची अपेक्षा त्यांच्या जिवंतपणीच पूर्ण झालेली आहे. जीवनातील प्रलोभनांपासून दूर राहून आवश्यक त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करुन जे हवे ते प्राप्त करता येते हेच त्यांच्या जीवनातून कळते. अर्थात हे साध्य झाले ते समर्थांनी मांडलेल्या प्रयत्नवादाद्वारेच शक्य झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात एका लहानशा खेड्यात जन्म झालेल्या काकाजींचे मातृछत्र फारच लवकर हरविले.  पत्नीवियोगाचे दुःख असलेल्या वडिलांचे प्रेमही फारसे मिळाले नाही. नानींनी (आईच्या आई) आईवडिलांची माया दिली आणि त्याच जीवनाच्या आदर्श ठरल्या. विपरीत परिस्थितीवर मत करीत उच्च विद्याविभूषित झाल्यानंतर आपल्या मातृभूमीतच कार्य करायचे त्यांनी ठरविले. आपल्या परिश्रमाच्या व द्रष्टेपणाच्या जोरावर बिर्ला उद्योग समूहात नोकरी मिळाली.

नोकरी करीत असतानांच आपल्यातील उपजत अशा उद्यमशील वृत्तीची त्यांना जाणीव झाली. या उद्यमशील वृत्तीला आपल्या कर्तृत्वाद्वारे फुलवीत त्यांनी आपल्यातील उद्योजक विकसित केला. तांत्रिक कौशल्य, माणसे जोडण्याची कला, व्यवसायातील गुणवत्ता व ग्राहकाचे समाधान, उद्योगासाठी लागणारी व्यावहारिक दृष्टी यामुळेच ते यशस्वी उद्योजक होऊ शकले. या सर्व प्रवासात समर्थांनी मांडलेला विवेक काकाजींच्या ठायी ओतप्रोत दिसतो. माणसातील विवेक जीवनातील दुःख उगाळत न बसता मनातल्या जाणिवा विकसित करतो. विवेकाच्या ज्ञान असते. हेच ज्ञान सामान्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी उपयोगी पडले तर लोक सन्मान करतात व त्यांच्यातल्या संतत्वाला परिणामही ! येथेच विवेक बहरतो. अशा प्रकारची ज्ञानदृष्टी संपादन करण्यासाठी श्रवण व मनन हा विवेकाचा मार्ग आहे. श्रवण आणि मनन केल्याने मिळविलेल्या ज्ञानाचे उन्मन होऊन ज्ञानाचे विज्ञान बनते. काकाजी आपल्या निवृत्तीच्या वयात हेच विज्ञान आम्हासारख्या तरुणांना सांगत होते.

जीवनातील प्रलोभनांना व आकर्षणांना समर्थांनी मूळमाया म्हटले आहे. या मूळमायेला नदीचे रुपक दिले आहे. नदी हि वृत्तीने चंचल असते. तिला फक्त प्रवाहित राहणे माहिती असते. धावणे आणि पुढे जाणे एव्हढेच तिचे उद्दिष्ट. धावत असतांना कोणता मार्ग श्रेयस्कर आहे याचे भान तिला नसते. डोंगर, पठार, वाळवंट काहीही असो वाहने हेच तिचे कार्य. वाहत असतांना काय वाहून नेते हे पण तिला माहित नसते. नदीचे हे गुण मानवी वृत्तीत आढळतात. यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर हे षडरिपू असतात. यामुळे माणूस स्थूलरुपाकडे अनाहूतपणे जात राहतो. मात्र काकाजींसारखे काही व्यक्ती आपल्या वृत्ती बदलतात. सूक्ष्मात जातात. अभ्यासाने, चांगल्या व्यक्तींच्या सहवासाने त्यांना जीवनाचा अर्थ कळतो आणि त्यातील आनंद ते उपभोगतात आणि तो आनंद स्वर्गसुखाचा असतो. अशी वृत्ती म्हणजे माणसाला नदीच्या उगमापलीकडे घेऊन जाणारी असते आणि त्यांना त्यापलीकडे नदीही दिसत नाही. आजच्या भौतिक जगात माणूस या नदीरूपी मूळमायेच्या मागे धावत असल्याने त्यांना जीवनाचा आनंद सापडत नाही. कायम समाधानी, आनंदी, उत्साही व चिरतरुण असलेल्या काकाजींना आपल्या जीवनाचे इप्सित कळले होते आणि त्यासाठीच जगत होते. अशा व्यक्तींना समर्थ "वृत्तिशून्य योगेश्वर" म्हणतात.

काकाजींच्या पवित्र आत्म्यास सद्गती प्राप्त होवो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ परमेश्वर देवो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४

Saturday 4 December 2021

अभिव्यक्ती

ब्रीदवाक्य जीवनाचे ! 

सध्या व्यावसायिक जीवनात ब्रिदवाक्याला विशेष महत्व आहे. काही कंपन्या वा संस्था त्यांच्या ब्रिदवाक्याने ओळखल्या जातात. या ब्रिदवाक्याद्वारे संस्था / कंपनी आपले धोरण जाहीर करीत असते. कंपनीची वा संस्थेची दिशा, उद्देश या ब्रिदवाक्यातून सांगितली जाते. ती संस्थेच्या सर्व घटकांसाठी प्रेरणा देखील असते. व्यक्तिगत जीवनासाठी पण असे ब्रीदवाक्य घेऊन जगणारे काही असतील असा विचार करून समाज माध्यमाद्वारे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या जीवनाबाबत विचार करून जगणाऱ्या व ते व्यक्त करणाऱ्यांची संख्या मर्यादित असली तरी प्रत्येक जण आपले जीवन एका उद्दिष्टांनी जगत असतो कारण जीवन जगण्याचा एक हेतू असतो असा मला विश्वास आहे. या लेखातून सर्वांच्या ब्रिदवाक्यांना ढोबळमानाने  जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मागील उद्देश आपणा सर्वांना त्यातून प्रेरणा मिळावी व आपणही आपले एक ब्रीदवाक्य घेऊन जीवनाचरण करीत आहोत ते व्यक्त करावे आहे. 

सर्वसाधारणपणे या ब्रिदवाक्यांची तीन प्रकारे विभागणी करता येईल. ती अध्यात्मिक, व्यक्तिगत विकास व नरसेवा अशी आहे. आपल्याला जीवनात काय करायचे आहे, कसे कार्याचे आहे, जीवन कसे जगायचे आहे याची स्पष्ट कल्पना येते. येथे व्यक्तींच्या भावना शब्दबद्ध करण्याचा किंवा त्यांच्याच शब्दात देत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपला देश, राष्ट्राप्रतीची आपल्या राष्ट्राच्या वारसांबद्दल आपली समर्पित भूमिका असलेली ब्रिदवाक्ये तीन व्यक्तींनी मांडली आहे. ती अशी समर्थ भारत , सुरक्षित भारत ।, ऐतिहासिक वास्तू / वस्तूना भेटी देणे, समजावून घेणे आणि लोकांपर्यंत पोहोचवणे , माझ्यामुळे राष्ट्र व धर्म मजबूत व्हायला मदत व्हावी 

व्यक्तिगत जीवनात प्रत्यक्ष कृतीला प्राधान्ये देणारी ब्रिदवाक्ये सर्वात जास्त आली आहेत. प्रामुख्याने हि वाक्ये शालेय जीवनात पालकांनी वा शिक्षकांनी आपल्या कृतिशील आचरणातून व शिकवणीतून दिलेली दिसतात. अनेकांनी व्यक्त होत असतांना त्याचा आवर्जून उल्लेख केला आहे. यात जीवन, यश, सुख-दुःख, समाधान, समस्या, स्वप्न, मेहनत, शिक्षण, हुशारी, श्रम, कर्तव्य, प्रामाणिकपणा, विचार, प्रयत्न, सत्य, खरे-खोटे,  अपेक्षा, संकल्प, संयम, सार्थकता, सर्वोत्कृष्टता, चुका, कृती, पैसे या शब्दांचा अंतर्भाव आलेला आहे. अनुभवातून आलेली हि वाक्ये माणसाची प्रगल्भता दाखवितात. Nothing is impossible | आणि केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे... हि वाक्ये प्रत्येकी दोघांनी सांगितली आहेत. इतर काही वाक्ये अशी To admit you were wrong is to declare you are wiser now than before, नेहमीच करू या सत्य तीच बात... खोट्याच्या पाठी घालू या लात..., Focus on Solutions, सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना... जीवन हे खूप सुंदर व अनंत सुख व दुःखाच्या विचारांचा महासागर आहे, Train your mind to see good in every situation. Whatever happens is always for good. Honest efforts are always rewarded. Education and hard work never go waste. We must continue to do our deeds and duties honestly. (आपण आपले कर्म व कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहावे.), Thus far and no further । , The best is yet to come... , दाम करी काम ।, श्रम संकल्प संयम... , कुठल्याही क्षेत्रात जा पण त्या क्षेत्रातील उत्तुंग यश मिळवा... जीवन सौहार्दपुर्ण जगा, त्यातच जीवनाचा खरा सार आहे , १) जीवनाची मर्यादा नक्की ठरवा , २) आहे त्यात समाधान मानावे , ३)  नाही त्याचे दुःख मानू नये

बहुतांश मित्रांनी नरसेवा हीच नारायण सेवा अर्थात सेवा, इतरांसाठी काही तरी करण्याची भूमिका आपल्या ब्रिदवाक्यातून मांडली आहे. आपल्याला जे मिळालं आहे, ज्यांच्यामुळे मिळालं आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून समाज ऋण फेडण्याची वृत्ती दिसते. आपल्याकडे जे अतिरिक्त आहे ते देण्याची वृत्ती या ब्रिदवाक्यातून दिसून येते. यात समाज, सामाजिक कार्य, मदत, आनंद, हित, सेवा, सहकार्य या शब्दांचा अधिक वापर दिसून येतो. काही ब्रिदवाक्ये अशी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे | घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ||, मी सगळ्यांना मदत करेन पण मी शक्यतो कुणाची मदत घेणार नाही , सामाजिक कार्य व मदतीसाठी कायम पुढे , प्रत्येकाला सहकार्य करणे प्रसंगी स्वतःची गैरसोय कितीही गैरसोय होवो , Live life and make others Happy |, यश हे कष्टात आहे, सेवेत आहे, पैशात नव्हे |

Always be helpful to others ।, आपल्या आजूबाजूला आनंद पसरविण्याचा प्रयत्न ।, सर्वांसाठी वेळ पण वेळेत सर्व..।, जे जे आपणासी ठावें , ते इतरासी सांगावे ।, हे जीवन एकदाच मिळते, स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगा, गंजून जाण्यापेक्षा झिजुन गेलेले कधीही चांगले..., सब समाज को लिए साथ आगे जाना है । एका मित्राने आपण जे पण कार्य करू त्यापूर्वी स्वतःला चार प्रश्न विचार ते काम करायचे कि नाही हे ठरवतो आणि तीच ब्रिदवाक्ये असल्याचे सांगितले आहे. खरं तर रोटरी या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते सदस्य असल्याने त्या संस्थेची कार्य करण्यासाठीची ती प्रमुख चाचणी आहे. ते चार प्रश्न Is it the TRUTH ? Is it FAIR for the all concerned ? Will it build GOODWILL and BETTER FRIENDSHIP ? Will it be Beneficial for all concerned ?

भारतीय तत्वज्ञान ज्यावर आधारित आहेत त्या अध्यात्मिक चिंतनातून मांडलेली काही वाक्ये आली आहेत. अंतिम सत्य, शाश्वत शांती, सफलता, कर्म, परमात्मा, गुरु, नामस्मरण, देव, परमेश्वर, भगवंत यांचा वापर यात दिसून येतो. काही ब्रिदवाक्ये असे. Persistence for eternal Peace , कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |, परमात्मा जे काही आहे ते मीच आहे, परमेश्वर माझ्यातून माझ्यामार्फत प्रकट होत आहे आणि सर्व काही परमेश्वराकडून येऊन परमेश्वराकडे समर्पित होत आहे. हा लेख वाचल्यानंतर आपल्यालाही आपली ब्रिदवाक्ये सुचतील. त्यावर जरुर विचार करा आणि मला कळवायला विसरू नका. 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Thursday 2 December 2021

गाणं मनातलं !

मन वढाय वढाय...

मानवी जीवनात गीत - संगीताचं स्थान अतूट आहे. खरं ते औषध आहे. गाणं मनातलं लिहायला सुरुवात केल्यापासून इतकी गाणी आठवतात आणि त्यावर लिहावेसे वाटते. असंच काहीसे आज झाले. पण खान्देश कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शालेय जीवनापासून मनात रुंजी घालणारं एक आशय संपन्न गीतावर लिहावे असं ठरवलं. 

मानवी जीवनात मनाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. यापूर्वीच्या दोन्ही गीतांमधून आपले मानसिक स्वास्थ्य सुदृढ होण्याचे  दृष्टीने आपण दोन गीते पाहिलीत. यावेळेचं कवयित्री बहिणाबाईंची कविता मुळात या मनाचं वर्णन करणारी घेतली आहे. अलीकडच्या कालखंडात मानवी मनाचे अनेक प्रकार आपण अनुभवले. मात्र "माझी माय सरसोती" म्हणणाऱ्या या प्रत्यक्ष शारदेने त्याचे वर्णन अतिशय चपखल पद्धतीने आपल्या प्रगल्भ जाणिवेतून फार पूर्वीच करून ठेवले आहे. मनाच्या अस्वस्थतेमुळे व परिस्थितीशी समायोजन करण्यास असमर्थ ठरणाऱ्या व्यक्तींच्या आत्महत्यांमुळे मन अनेकदा व्यथित होते व त्यासाठी काहीतरी करावे असे नेहमीच वाटते. त्यासाठी या कवितेचा अभ्यास नक्कीच लाभदायक ठरतो. पाहू या तर मग कसं आहे हे मन... मन वढाय वढाय या कवितेतून...

मन वढाय वढाय

उभ्या पीकांतलं ढोर,

किती हांकला हांकला

फिरी येतं पिकांवर.

मनाची विशेषता व लक्षणे बहिणाबाईंनी या कवितेतून मांडली आहेत. डवरलेले पीक ज्याप्रमाणे जनावराला आकर्षित करतं त्याला कितीही वेळा हाकललं तरी ते पुन्हा पुन्हा फिरून तिथेच येणार तसंच मनाचं पण आहे. एखादा विषय आपण मनातून काढून टाकायचा प्रयत्न केला तरी ते पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीकडे जातं. 

मन मोकाट मोकाट

त्याले ठायीं ठायीं वाटा,

जशा वार्‍यानं चालल्या

पान्यावर्‍हल्यारे लाटा.

मन मुक्त आहे, स्वच्छंदी आहे. त्यामुळे त्याला वाटाच वाटा आहेत. वाऱ्यामुळे ज्याप्रमाणे पाण्यावरती लाटा निर्माण होतात तसेच अनेकविध विचारांचे तरंग मनात निर्माण होतात. 

मन लहरी लहरी

त्याले हातीं धरे कोन?

उंडारल उंडारलं

जसं वारा वाहादन.

मन लहरी आहे. ते वाऱ्या वादळासारखं कुठेही फिरतं. त्याला हातात कोण धरू शकेल ? असा प्रश्न बहिणाबाई विचारतात.

मन जह्यरी जह्यरी

याचं न्यारं रे तंतर,

आरे इचू, साप बरा

त्याले उतारे मंतर !

मन जहरी(विषारी) पण असतं. त्याच तंत्र कोणालाही समजू शकलेलं नाही. विंचू किंवा सापाने चावलं तर  किमान मंत्राने विष उतरवता येत मात्र मनाचे तसे नाही. 

मन पांखरू पांखरूं

त्याची काय सांगूं मात ?

आतां व्हतं भुईवर

गेलं गेलं आभायांत.

मन अतिशय चंचल आहे. ते एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. एखाद्या पाखरासारखं ते एका क्षणात जमिनीवर तर दुसऱ्या क्षणाला आभाळात असतं. 

मन चप्पय चप्पय

त्याले नहीं जरा धीर,

तठे व्हयीसनी ईज

आलं आलं धर्तीवर.

मन चपळही आहे. त्याला धीर नाही नाही संयम नाही. आकाशात चमकणाऱ्या एखाद्या विजेसारखं वेगाने ते जमिनीवर येतं.

मन एवढं एवढं

जसा खाकसचा दाना,

मन केवढं केवढं ?

त्यांत आभाय मायेना.

मनाचा आकार सांगतांना त्याला बहिणाबाईंनी खसखस आणि आभाळाची उपमा दिली आहे. मन खसखशीच्या दाण्या एव्हढं छोटं असतं तर कधी आभाळापेक्षाही मोठं असतं.. क्षुद्र आणि उदार असे दोन्हीही रूप सांगितली आहेत.

देवा, कसं देलं मन

आसं नहीं दुनियांत !

आसा कसा रे यवगी

काय तुझी करामत !

या कडव्यात बहिणाबाई देवालाच म्हणतात देवा असं कसं मन दिल आहेस. सगळ्या दुनियेत असं काही नाही. तू असा कसा योगी आहेस आणि काय तुझी करामत आहे. 

देवा, आसं कसं मन ?

आसं कसं रे घडलं

कुठे जागेपनीं तुले

आसं सपन पडलं !

शेवटच्या कडव्यात त्या देवाला प्रश्न विचारतात देवा जागेपणी स्वप्नातच हे मन घडवलं का ? असं कसं घडवलं ? कसं बनवलस ? 

निसर्गकन्या म्हणून सर्वश्रुत असलेल्या बहिणाबाईंनी खान्देशी बोलीतून माणसाला सहज समजेल अशा पद्धतीने हि कविता साकारली आहे. सामाजिक परिस्थितीतील माणसाच्या वर्तनावरून हि कविता स्फुरली असावी असे वाटते. शालेय अभ्यासक्रमात शिकलेली हि कविता आजही मनात घर करून आहे. त्यावर नियंत्रण मिळविणे, त्याला कह्यात घेणं, यासाठी तर लिहिली नसेल ना असेही वाटून जाते. या थोर कवयित्रीला विनम्र अभिवादन !