Tuesday 21 November 2023

प्रत्येक दिवस असाच असावा !

१८ नोव्हेंबर रोजी मातोश्री श्रीमती सुनंदा विष्णू कुळकर्णी हिच्या आशीर्वादाने, ह.भ.प. सद्गुरु श्री. प्रसाद महाराज अमळनेरकर (११ वे गादीपती, संत श्री सखाराम महाराज संस्थान अमळनेर-पंढरपूर), ह.भ.प. श्री. दादा महाराज जोशी (चिमुकले राम मंदिर), ह.भ.प. श्री. मंगेश महाराज जोशी (५ वे गादीपती, श्रीराम मंदिर संस्थान, जळगाव) यांच्या कृपाशिर्वादाने, ज्येष्ठांच्या आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी ५५ व्या वर्षात पदार्पण केले. यावर्षी हा दिवस आगळावेगळा ठरला आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते आयुष्यातील प्रत्येक दिवस असाच असावा.

सकाळी लवकर उठून भाऊंच्या उद्यानात फिरायला गेलो. तेथे नेहमीप्रमाणे व्यायाम करुन घरी आलो. स्नान, आन्हिक, जप व सकाळचा नाश्ता करुन वेळेवर कार्यालयात पोहोचलो. सकाळी ९ ते ९॥ दररोजची प्रार्थना व सूत कताई केली. पहिला आशीर्वादाचा फोन नेहमीप्रमाणे आईचा व दोन मिनिटांच्या अंतराने श्री. उदय महाजन यांचा आला. त्यानंतर सर्व माध्यमातून शुभेच्छांचा दिवसभर वर्षाव सुरु होता. सकाळी १० ते १२॥ कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या पदविका अभ्यासक्रमात पहिले प्रशिक्षण सत्र घेतले. वर्षभरात असे आठ सत्र घ्यावयाचे आहेत. व्यक्तीमत्व विकास फोकस असला तरी प्रशिक्षणार्थींच्या व्यवसाय वृद्धीवरील शंकासमाधानाने त्याचे महत्त्व अधोरेखित केले. काही नाविन्यपूर्ण मार्ग सुचविल्याने त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान एक वेगळाच आनंद देऊन गेला. 

भोजनोत्तर सत्रात गांधीतीर्थला भेट देण्यासाठी आलेल्या हेमंत क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी २० मिनिटे प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम कस्तुरबा सभागृहात घेतला. आपला इतिहास पुढच्या पिढीपर्यंत नेत असताना एक वेगळे समाधान होते. सलग ३ प्रश्नांना उत्तरे देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना महात्मा गांधींच्या जीवनावरील पुस्तके भेट देण्यात आली. संचालक हेमंत पाटील व हा उपक्रम घडवून आणणारे सहकारी ॲड. दुर्वास नलगे यांच्या उपस्थितीत व उत्साहपूर्ण वातावरणात प्रश्नमंजुषा झाली.

यानंतर लगेचच फैजपूर येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई या संस्थेच्या ६२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी विचार संस्कार परीक्षा व गांधीतीर्थ संग्रहालयास सहल भेट करावी या संदर्भात माहिती देण्यासाठी सहकारी चंद्रशेखर पाटील यांचेसह सायंकाळी ४ वाजता पोहोचलो. दहा मिनिटात उपस्थितांना माहिती दिली. तसेच संस्थेचे माहितीपत्रक वितरित करुन रात्री ७.३० वाजता घरी पोहोचलो.
 
घरी आल्यावर फ्रेश होऊन श्रीराम मंदिर संस्थानच्या रथोत्सवातील सरस्वती वहनाचे दर्शन व हभप श्री मंगेश महाराजांच्या दर्शनासाठी जुने जळगावातील मंदिरात पोहोचलो. आशीर्वाद घेऊन हभप श्री दादा महाराज जोशी यांच्या आशीर्वादासाठी चिमुकले राम मंदिरात पोहोचलो. दोन्ही ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचे आशीर्वादपर प्रसाद मिळाला.

घरी मुलांनी वाढदिवस साजरा करण्याची तयारी केली होती. खरंतर यावर्षीची दिवाळी भाऊबीजेच्या दुसर्‍या दिवशी सुरु झाली कारण दिवाळीत मुलीला सुट्टीच नव्हती. त्यामुळेच वाढदिवसाच्या दिवशीच दिवाळीचे औक्षणही करण्यात आले. असा अतिशय व्यस्त, केलेल्या कामाचे आनंद व समाधान देणारा असा होता. या वर्षात प्रत्येक दिवस असाच यावा हिच पांडुरंग चरणी प्रार्थना... रामकृष्ण हरि !


Ⓒगिरीश कुळकर्णी
९८२३३ ३४०८४