Thursday 25 November 2021

गाणं मनातलं !

प्रार्थना आणि मानवी जीवनाचं अतूट नातं आहे. श्रद्धा आहे तिथे प्रार्थना अर्थ आहे.  प्रार्थनेतील आर्ततता आपल्या भावना पोहचतात. माणसाचे विचार हे त्याच्या कर्माचे मुळ आहे. प्रार्थना हा देखील एक विचार आहे तो कार्यप्रवण करणारा आहे. तो इप्सित साधणारा विचार आहे. माझ्या आवडीचं आणि मनातलं गाणं यावेळी एक प्रार्थना आहे. रामराज्याची कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी येथील प्रत्येक मानवाने हि प्रार्थना केवळ म्हणुन उपयोग नाही तर ती आर्ततेने म्हटली पाहिजे. आपण तसे वागत असलो तर आर्तता आपोआप येते. 

मागील कोरोनाच्या संपुर्ण कालखंडात अनेकांना सेवेचं आणि जगण्याचं बळ या प्रार्थनेनं दिलं. समुपदेशनात / व्याख्यानात / प्रशिक्षणात या प्रार्थनेचा वारंवार वापर करतो. माणसाने प्रथम माणुस होणे अत्यावश्यक आहे तर जगणे सुलभ होते. भौतिक आकर्षणांना बळी न पडता नैसर्गिक जीवनशैलीचा स्वीकार करीत माणुसकीचे जगणे अर्थपूर्ण ठरते. एवढी प्रस्तावना पुरेशी आहे. 

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

सहज सोप्या भाषेत कवीने मागणी केली. सामाजिक परिस्थितीतून संवेदनशील मनाने उत्कटतेने प्रकट झालेली हि भावना आहे.

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

निराशा, नकारात्मकता, उदासीनता यासारख्या दुःखाचा अंधार सर्वत्र असला तरी उद्या सत्याचा सुर्य उगवणार आहे अशी आशा कवीने व्यक्त केली आहे. मात्र सत्याचा सुर्य उगविण्याची वाट पहात न बसता आपण काजव्यांप्रमाणे जगले पाहिजे. त्या मंद प्रकाशातुनच सुरु असलेली वाटचालीने उद्याचा सुर्य पहाता येणार आहे. काजव्यासारखे जागणे म्हणजेच माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे.
 
धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

आज ज्या गोष्टींमुळे माणुस माणसाला पारखा होत आहे ते द्वेष संपु दे. मिळालेले जन्म कुठल्याही भेदात अडकू नये. परस्परांमधील साहचर्याच्या भावनेने सर्वांना एकरुप होऊ दे. निष्ठा व आशेतुनच नितळ, निरागस माणसेच शुद्ध व सात्विकता निर्माण करु शकणार आहे. यासाठीच माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. 

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

मिळालेले आयुष्य चांगले जगावे. एक एक पाऊल पुढे टाकत हा प्रवास सुरु ठेवला पाहिजे अन्यथा बाहेरील आव्हानांमुळे / मनातील हतबलतेने जेथे थांबाल तेथेच संपला. आता घेतलेला श्वास, मिळालेले क्षण, संधी अगदी आयुष्य पुन्हा लाभणार नाही त्यामुळे छान जगा अर्थात माणसाने माणसाशी माणसासारखेच वागा. हि मागणी आहे, प्रार्थना आहे. यात वैश्विक कल्याण आहे.  

कवी समीर सामंत यांनी लिहिलेली हि प्रार्थना रोज सकाळी एकदा तरी ऐका...

गिरीश कुळकर्णी 
९८२३३३४०८४

Thursday 18 November 2021

गाणं मनातलं !

आकाशी झेप घे रे पाखरा...



माझ्या आवडत्या गाण्यांमधील एक म्हणजे "आराम हराम आहे" चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले, मा. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी गायलेले व संगीतबद्ध केलेले आकाशी झेप घे रे पाखरा...! अतिशय अर्थपूर्ण व जीवनाला दिशा देणारे हे गीत आहे असे मला वाटते. प्रत्येकाला यशस्वी जीवनाच्यादृष्टीने मार्गदर्शन करणाऱ्या गीतातील प्रत्येक कडवे प्रेरणादायी आहे. जन्मदिनाच्या निमित्ताने त्या गाण्याबद्दल लिहिणे हा सुयोग...

प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन देत असतांना कृतार्थता अनुभवायची असते. सुख, समाधान, आनंद आणि यश यामागे तो धावत असतो. परक्षित गोष्ट साध्य झाली नाही तर अनेकदा निराश होतो. आपल्या प्रश्नांची, आव्हानांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो मात्र बहुतांश वेळेस पदरी निराशाच पडते. या गीतातील "तुज कळते परी ना वळते" हे वाख्या बरंच काही सांगते. कवी आपल्या प्रतिभेने एक वेगळाच विचार व दिशा या गीतातून देतो. थोडक्यात सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षाने ज्याप्रमाणे आपल्या पंखांच्या जोरावर भरारी घेतली पाहिजे त्याप्रमाणे प्रत्येक मानवाने आपल्या क्षमता, कर्तृत्व व श्रमाने आपले घर प्रसन्न केले पाहिजे असा संदेश या गीतातून मिळतो.

आयुष्यच सर्व तत्वज्ञान अतिशय सोप्या पद्धतीने कवी सांगतो...

आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा

माणूस स्वप्ने मोठी पाहतो मात्र त्यासाठी आपला नित्यक्रम सोडण्याची, कष्ट करण्याची, वेगळी वाट निवडण्याची तयारी नसते. आपली इप्सित साध्य करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे बदल स्वीकारण्याची तयारी हवी. सध्याची वरकरणी आरामदायी व सुखकारक जीवनशैली बदलण्यासाठी तो फारसा उत्सुक नसतो. मात्र याच सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची हाक कवी आपल्याला देतो. 

तुज भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते  खाया

सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा

युवकांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. पालकांनी निर्माण केलेल्या वैभवावर किती दिवस अवलंबून राहणार? शरीराला कोणतीही झीज पोहोचू न देता असं किती दिवस चालणार ?

घर कसले ही तर कारा, विषसमान मोती चारा

मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा जैसा उंबरा

घरात सहजतेने मिळणाऱ्या गोष्टींच्या मोहात अडकू नका. अशा घरात मिळणारे अन्न हे विषसमान आहेत आ ते घर हे खऱ्या अर्थाने तुरुंग आहे असे कवी मांडतो. अशा परिस्थितीतून  बाहेर पडण्याची कास धर.

‘तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने

दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा’

माणूस अनेकदा स्वतःला कमी लेखतो. आपल्याला जमणार नाही अशीच त्याची मनस्थिती असते. निसर्गात मानवामध्ये प्रचंड सामर्थ्य असते. त्याची जाणीव झाली कि त्याला कोणीही रोखू शकत नाही. जीवनातील वास्तव व आभासी कल्पनांवर मात कर आणि त्यासाठी तुझ्याकडे सर्व काही आहे. तू केलेल्या अपेक्षांपेक्षाही अधिक करता येऊ शकेल.

कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते

हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गेले... या उक्तीप्रमाणे श्रमाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. सर्व कळूनही अपेक्षित बदल स्वतःमध्ये घडवून आणू न शकल्याने तू अस्वस्थ आहेस का ? असे कवी विचारतो. 

घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले

घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा

आपल्या क्षमतांना श्रमाची व सकारात्मक कृतीची जोड दिल्याने मिळालेले साध्य अधिक आनंददायी ठरते. जीवनाला श्रम मूल्याची जोड दिल्यास घरातील वातावरण प्रसन्न होते. अशा प्रकारची प्रसन्नता दैवी व सात्विक असते. जीवनाचं क्लिष्ट असलेलं तंत्रज्ञात सर्वांना सहज समजेल अशा सोप्या शब्दात सांगणे हि अवघड कला आहे. बाबूजींच्या स्वरांनी त्या संपूर्ण गाण्याला दिलेली चाल सोपी आहे आणि म्हणूनच आजही सामान्यजनांच्या हृदयावर हि अशी गाणे राज्य करतात. 

आपणही डोळसपणे या गीताचा अभ्यास करावा म्हणजे आपणास सर्व काही प्राप्त होईल. मंडळी आपल्याला या गीताबद्दल काय वाटते ते प्रतिसादाच्यारुपात जरूर मांडा...

गिरीश कुळकर्णी

९८२३३ ३४०८४ 


Tuesday 9 November 2021

गरज मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याची !



मनुष्य हा समूह प्रिय प्राणी आहे. त्याला लोकांसमवेत मग ते नातेवाईक असो वा सहकारी असो वा शेजारी वा समाज घटक त्याच्याशी संवाद साधायला आवडते. कुटुंब संस्था हे त्याचे प्रतीक असून भारतीय संस्कृतीचे बलस्थान आहे. यात परस्पर सहकार्य, संवाद याला विशेष महत्व आहे. यातूनच नात्यांची घट्ट वीण बांधली जाते. जेथे मानवाचा संबंध येतो तेथे मन येतेच. जेथे मन आहे तेथे विचार आहे. माणूस या एकमेव प्राण्याकडे विचार करण्याची, विचारांचे आदानप्रदान करण्याची नैसर्गिक व उपजत शक्ती आहे. विचारांचा प्रभाव माणसाच्या जीवनावर पडतो. सुदृढ शरीरासारखे मनही सुदृढ असले पाहिजे म्हणजे मानवी जीवन आनंदी व सुखकर होत असते. दिवसभरात माणसाच्या मनात हजारो विचार येतात. हे विचार संस्कारातून, जाणिवेतून, अनुभवातुन, आपल्या विचारसरणीतून येत असतात. काही विचार हे शिक्षण व सहवासातूनही येत असतात. माणूस रिकामा बसला असला तरी मनात विचार सुरुच असतात. सकाळी उठल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत विचार सुरु असतात. काम सुरु असतांनाही अंतर्मनात (बॅक ऑफ द माईंड) विचार सुरु असतात आणि या विचारातूनच जीवन घडत असते.

'कोरोना' या जागतिक महामारीने माणसाच्या मनात विचारांचे प्रचंड काहूर माजले होते. आता आपण पूर्वपदावर येत असून भीती कमी होत आहे. 'कोरोना'सारख्या घटनांना "ब्लॅक स्वान इव्हेन्ट" म्हणतात. हि अशी घटना असते कि ज्यामुळे सर्व जग प्रभावित होते. अनपेक्षित, अकल्पित व अनाकलनीय अशा या घटनेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यातील एक समस्या म्हणजे मानसिक स्वास्थ्य राखण्याची !  कोरोनापूर्वीही हि समस्या होतीच मात्र कोरोनामुळे त्यात अधिकच भर पडली, असे म्हणता येईल आणि म्हणूनच आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

मानसिक स्वास्थ्य म्हणजे जीवनात / आयुष्यात येणाऱ्या, होणाऱ्या, घडणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट घटना / अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाणे. कुटुंबातील व समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे. यात माणसाच्या भावना, विचार, परस्परसंबंध व दैनंदिन जीवनातील गोष्टी यांचा समावेश होतो. आपले मानसिक स्वास्थ्य तपासून पाहण्याकरता खालील गोष्टींचा विचार केला पाहिजे.

- इतरांशी विशेषतः निकटवर्तीयांशी आधारदायी व स्थिर नाते जुळविण्याची क्षमता

- आप्तेष्टांच्या व समाजाच्या कल्याणाशी बांधिलकी

- समस्या, दडपणे व संकटे यांना तोंड देण्याची तयारी

- आपल्यासह इतरांच्या व्यक्तिमत्वाचा योग्य आदर राखून महत्व देण्याची तयारी

- जीवनात वाटचाल करण्यासाठी लागणारी समर्पक वृत्ती व जोपासलेली मूल्ये

- आत्मप्रतिमा उंचावलेली नसली तरी डागाळलेली नसणे. स्वतःच्या उणिवा मान्य करुन त्या दुरुस्त करण्याची स्वतःची क्षमता वाढवून पूर्णत्वाला न्यायची तयारी.

मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी काही महत्वपूर्ण गोष्टी

- मोकळा संवाद

- सकारात्मक विचार (नकारात्मक गोष्टींपासून दूर राहणे)

- कुटुंबात निरोगी व पोषक वातावरण असावे.

- परस्परांविषयी प्रेम, आदर असावा

- आपले छंद जोपासले पाहिजेत जसे वाचन, लेखन, पोहणे, फिरणे, खेळणे इ.

- तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर

- वास्तवात जगायला शिकले पाहिजे

- जीवनात सर्वच गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत याची खूणगाठ बांधली पाहिजे.

- पुरेशी झोप / झोपे पूर्वी व उठल्यावर सकारात्मक विचार यासाठी आपण सकाळी उठल्यावर माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची ५ वाक्ये स्वत:शी बोलली पाहिजेत - १. मी चांगला व्यक्ती आहे. २. मी हे करु शकतो. ३. मी जिंकणारा आहे. ४. परमेश्वर माझ्यासोबत आहे. ५. आजचा दिवस माझा दिवस आहे.

- नैसर्गिक जीवनशैली - आहार, विहार व आचार

- नियोजनपूर्वक जीवन

- चांगल्या सवयी

- कामातला आनंद (आस्था / श्रद्धा / निष्ठा )

- स्वतःची वैचारिक बैठक

- गांधीजींनी सांगितलेली एकादश व्रत पालन सत्य, अहिंसा, अस्तेय, असंग्रह, स्वदेशी, सर्वधर्मसमभाव, स्पर्श भावना, अभय, ब्रह्मचर्य, शरीरश्रम, आस्वाद

- योग, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार

- शरीर - मन - मेंदू यात योग्य संतुलन

मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची कारणे

- अनुवंशिकता 

- आजची गतिमान व स्पर्धात्मक जीवनशैली

- हवी असलेली गोष्ट लगेच हवी हि वृत्ती

- विभक्त कुटुंबपद्धती

- सामाजिक व्यक्तिमत्त्वाकडे दुर्लक्ष

- संवादाचा अभाव / ताणतणाव

उपाय व उपचार

- मानसिक स्वास्थ्यात Prevention is Better than Cure अर्थात उपचारांपेक्षा प्रतिबंध जास्त प्रभावी हा नियम मानसिक आरोग्य संवर्धनासाठी जास्त लागू पडतो.

- तातडीचे उपचार

- मानसोपचार

- औषधे

- पुनर्वसन इ.

संवादातून संबंध दृढ होतात. या संवादातून होणारे समाज-गैरसमज मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. कसे तो थोडक्यात समजून घेऊ या !

- कोणी व्यक्ती मनाला लागेल असे बोलल्याने त्या माणसाबद्दलची अढी निर्माण होते. त्याचे बोलणे प्रत्येक वेळी मनावर घेतले जाते. त्यातून नकारात्मक विचार येतात. माणूस कोषात जाणे पसंत करतो. शेवटी संबंध तुटतात.

- घनिष्ट नात्यात क्षुल्लक गोष्टही मनाला लागते. अशा गोष्टी विसरता येत नाही. खुलेपणाने संवाद झाल्यास गैरसमज दूर होऊ शकतो अन्यथा संबंध खुंटण्याचा संभव असतो.

- नात्यात ओलावा नसल्यास गैरसमज लवकर होतात. नात्यात घर्षण निर्माण होते व कटुता निर्माण होऊन संबंध ताणले जातात.

- स्वाभिमानी माणसाच्या संवादात गरज नसतांना स्वाभिमान संवादात आल्यास गैरसमज वाढतात.

व्यक्ती संबंधातील स्वास्थ्य दृढ करुन मानसिक स्वास्थ्य लाभण्यासाठी खालील गोष्टी अवश्य कराव्यात...

- गप्पा / खेळ / आनंद

- मोबाईल / टीव्ही व त्यावरील नकारात्मक गोष्टी व चर्चांपासून लांब राहावे.

- वास्तव व आभासी जगावर लहान-मोठ्यांची चर्चा

- ज्यांच्याशी बऱ्याच दिवसात संवाद झाला नाही त्यांच्याशी संवाद साधावा.

- वादविवाद व टीकाटिप्पणी असावी मात्र त्यामागील कार्यकारणभाव स्पष्ट करावा.

- कौतुक व कृतज्ञता याचा नियमित वापर

- संपर्कातील व्यक्तीच्या गुणांकडे विशेष लक्ष

- इतरांना द्या (वेळ, पैसे, मदत इ.)

- हीच आमुची प्रार्थना / तू बुद्धी दे यासारख्या प्रार्थना एकत्रित म्हणा

- आनंद / सुख / प्रेम / यश / जीवन / सकारात्मकता / पैसा / तंत्रज्ञान / जगायचं का ? यासारख्या विषयांवर गप्पा

मानसिक स्वास्थ्यासाठी आपल्या विचारांकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे व ते नेहमी सकारात्मकच असतील याची काळजी घ्यावी.


Monday 1 November 2021

महासुखाची दिवाळी



"अहो, ऐकलंत का ?" 

"हं "

"मी काय म्हणते ? दिवाळी ८ दिवसांवर आलीय. बऱ्याच दिवसांनी पोरगं येणार आहे. यावर्षी लेक आणि जावईबापू पण येणार आहेत. साफ-सफाई तर केली आहे मी, पण खरेदी बाकी आहे आणि ती तुमच्याशिवाय पूर्ण होणार नाही. परमेश्वरी कृपेने यावर्षी सर्व व्यवस्थित आहे. बऱ्याच दिवसांनी सर्व गोतावळा एकत्र येणार आहे. यावर्षी मला सुखाची दिवाळी अनुभवायची आहे." 

"सुखाची दिवाळी ? कशी असते ती ?"

"अहो, म्हणजे सर्व एकत्र येणार. त्यामुळे मी दिवाळीचा सर्व फराळ घरीच करणार आहे. छान तीन दिवसांचे मेनूही ठरवले आहेत. सर्व घरीच करणार आहे मी. मात्र ज्याला जे पाहिजे ते तुम्ही नक्की द्या म्हणजे झाली माझी दिवाळी सुखाची..."

"अच्छा, म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग !"

"बरोबर"

"हि तुझी सुखाच्या दिवाळीची कल्पना तर"

"म्हणजे ?"

"अगं, तुझी जशी सुखाच्या दिवाळीची कल्पना तशी मुलांची पण काही तरी असेलंच कि ! मग त्यांनाही विचारायला नको का ?"

"तेही खरंच ! आणि तुमची पण असेल..."

"हे काय विचारणं झालं ?"

"त्यांचं पाहू नंतर पहिल्यांदा तुमची सुखाच्या दिवाळीची कल्पना सांगा बरं"


"तुला माहिती आहे मी वर्तमानात जगणारा माणूस ! माझ्यासाठी कालची, आजची आणि उद्याची दिवाळी सुखाचीच... मात्र त्यात एकच गोष्ट सारखी आणि ती म्हणजे आनंद ! हा आनंद फराळ, कपडे यात फार नाही. आमच्या काळी वगैरे भानगड नाही. कालाय तस्मै नमः अशी नकारात्मक भावनाही नाही. सर्वांचा आनंद हा माझा आनंद..."

"तुमची कल्पना चांगलीच आहे पण... कपडे घ्यायला नको का ? पोरगं नवीन मोबाईल मागतोय आणि कमावतोही पण तुमचा होकार मिळाल्याशिवाय घेणार नाही. मुलगी आणि जावई २ वर्षांनी येणार त्यांना काही द्यायला नको का ?"

"यामुळे त्यांना आनंद मिळणार असेल तर नक्कीच देऊ या !"

"हे कसं ठरवणार ?"

"मी करतो बरोबर... दोघांना लगेच व्हाट्सअपवर मेसेज टाकतो. आपण सर्वांनी दिवाळीचा आनंद घ्यावा यासाठी तुमची सुखाच्या दिवाळीची कल्पना सांगा ?"

"चालेल... पण मग फराळ, कपडे, मोबाईल आणि जावईबापूंच्या भेटवस्तुंचे काय ?"

"ते आपण घेऊच कारण ते तुझ्या सुखाच्या दिवाळीसाठी !"

"मग ठीक आहे, बाकी तुम्हाला काय करायचे ते करा. खरेदीसाठी मात्र आपण आजच जाऊ या ! म्हणजे मला नंतर फराळाकडे लक्ष देता येईल."

"चालेल"

उत्साह, चैतन्य आणि सुखाच्या सोहोळ्याचा सण असलेल्या दिवाळीच्या सणाची तयारी घराघरात सुरु असते. प्रकाशाचा हा उत्सव साजरा करीत असतांना आपल्या पुढच्या पिढीला भारतीय संस्कृतीचा हा वारसा सहजपणे दिला जातो. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हा प्रातिनिधिक संवाद... प्रेम, माया व आपुलकीने नात्यातील ऋणानुबंध घट्ट करण्यासाठीची, कुटुंब संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठीची हि धडपड... 

"अहो, तुम्हाला 'थँक्यू' म्हणायचे आहे."

"का ?"

"अहो अगदी मनासारखी खरेदी झाली आज. पोरगं आल्यावर त्याला त्याच्या आवडीचा मोबाईल तेव्हढा घेऊन द्या म्हणजे झाली बाई माझी सुखाची दिवाळी... अगं बाई, मी बोलत काय बसली. तुम्हाला पहिल्यांदा चहा देते..."

"नको, तू बैस. सकाळी चादरी-उशा धुणं, डब्बे घासून वाळवणं याची गडबड आणि नंतर हि खरेदी... यात दमली असशील... मी करतो चहा..." 

"अहो तुमचंही काही ना काही काम सुरु होतंच. तुमच्या मदतीशिवाय वरची कामं आणि खरेदी झालीच नसती." 

"हा मोबाईल घे आणि पोरांच्या सुखाच्या दिवाळीच्या कल्पना काय ते वाच... तोपर्यंत मी आपल्यासाठी चहा घेऊन आलोच."

"अरे हो... मी विसरलेच."

"पहा तर काय म्हणताय पोरं..."

"अहो, चहा छानच झालाय..."

"ते जाऊ दे ! पोरांची सुखाची दिवाळी काय म्हणते ?'

"अहो, मुलं मोठी झाली आणि समजदारही !"

"याच श्रेय तुझंच बरं ! त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांची काळजी घेणं, हवं-नको ते पाहणं हि काम तुझीच. मी दिवसभर नोकरीच्या निमित्ताने गावोगाव भटकलो. अगदी ठरवून कधीतरी पालक सभेला आलो. पैसे देणं तेही ओढाताण करीतच... एव्हढंच माझं काम !"

"अहो, असं काय म्हणता ? पोरांना योग्य वयात द्यावयाचे स्वातंत्र्य, त्यांनी घेतलेल्या निर्णयाची बांधिलकी, त्यांच्यावर टाकलेला विश्वास, करियर आणि जीवनविषयक सांगितलेली स्पष्ट मते, स्नेहसंमेलनाला हजर राहणे, दोन-चार वर्षातून एकदा ट्रीपला नेणे, त्यांना कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे यामुळेच हे शक्य आहे."

"हे खरं असलं तरी तुझा वाटा माझ्यापेक्षा नक्कीच जास्त. बरं ते जाऊ दे... काय म्हणताय मुलं ?"

"तुम्हीच वाचा ! मला खूप भरुन येतंय वाचतांना... किती छान कल्पना मांडल्या आहेत दोघांनी !"

"असं ! पहिल्यांदा पोरीचे वाचतो. तुमच्यासह आजी-आजोबांसोबत दिवाळी साजरी करायला मिळणं हीच


माझ्यासाठी सुखाची दिवाळी. आम्ही यावर्षी कोणत्याही भौतिक गोष्टींवर खर्च करायचा नाही असे ठरविले आहे. कारण आईला कितीही नाही म्हटले तरी ती माझं माहेरपण करणार ! आम्ही तीन दिवस येणार आहोत. तेथे तुम्ही ठरवाल त्यात आम्ही आनंदाने सहभागी होणार आहोत. तीन दिवस घरातील टीव्ही १०० टक्के बंद ठेवावा असे मला वाटते. मी स्वयंपाकात मदत करणार आहे. संध्याकाळची रांगोळी मीच काढणार. खूप गप्पा आणि खेळ खेळणार आहे. आमच्यासोबत कोरोना काळात आई-वडील गमावलेली एक मुलगी असणार आहे. तिचे पालकत्व आम्ही स्वीकारले आहे. आमच्याकडे धुणे-भांडी करण्यासाठी येणाऱ्या मावशी, आमची भाजीवाली आजी, सफाई कामगार, बिल्डिंगचा पहारेकरी, शाळेचे रिक्षावाले काका यांना घरी केलेला दिवाळीचा फराळ आणि कपडे देणार आहोत. माझ्यासाठी हीच सुखाची दिवाळी"

"काहो, एव्हढं शहाणपण कुठून आलं असेल ताईला ?"

"अगं, एका वाक्यात सांगतो. घरात पालकांच्या उक्तीला कृतीची जोड असली कि सहज संस्कार होतात आणि परिस्थिती माणसाला खूप काही शिकविते. मागील वर्षभरात तिने मुंबईत जे अनुभवले त्यातून तिची सामाजिक जाणीव प्रगल्भ झाली असे मला वाटते."

"खरंय... आता माझ्या लेकराचं पण वाचा..."


"हो, हो तू मध्येच प्रश्न विचारला म्हणून बोललो. काय म्हणतो दादा ? हं... माझ्या मते सुखाची दिवाळी आपल्या मानण्यावर असते. आजपर्यंत दरवर्षीची माझी दिवाळी तुमच्यामुळे सुखाचीच झाली आहे. मी ८ दिवस सुट्टी घेऊन येणार आहे. फराळ मी आल्यावरच करायचा. फक्त अनारसे करून ठेवले तर चालतील. यावर्षी आईला अपेक्षित असलेली खरेदी मीच करणार आणि ती स्वदेशीच असणार. मला दिवाळी निमित्ताने कंपनीनेच नवीन मोबाईल दिला आहे. माझे दोन ड्रेस नवीन कोरे आहेत तेच वापरणार आहे. ताईशी माझे बोलणे झाले आहे. ती तीन दिवस येणार आहे. दिवाळीतील एक दिवस सकाळी आपण सर्व वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत आणि भाऊबीजेला संध्याकाळी अनाथालयात जाणार आहोत. एक दिवस माझ्या शाळेतील मुलांसाठी किल्ला बनविण्याची कार्यशाळा घेणार आहे. बाबांना माहिती असलेल्या वस्तीतील मुलांना फराळ वाटप करावा असे मला वाटते. आपल्यासोबत गरजवंतांना दिवाळीचा आनंद देणे हीच माझी सुखाची दिवाळी !"

"मला तर बाई हे पोरगं म्हणजे तुमची कॉपीच वाटते"

"हं, असेल... पण खरंच या दोन्ही मुलांच्या कल्पनांनी माझी दिवाळी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तशी महासुखाची होणार तर !"

"हे काय नवीन ?"

"अगं माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहे...


तैसी होय तिये मेळी ।

मग सामरस्याचिया राऊळी ।।

महासुखाचि दिवाळी ।

जगेसि दिसे ।।


आपल्या मुलांनी सामाजिक समरसतेतून समाजाचा जो विचार केला आहे तोच सर्वत्र दिसावा अशी अपेक्षा माऊलींनी व्यक्त केली आहे."


मी अविवेकाची काजळी ।

फेडुनि विवेकदीप उजळी ।

तैं योगिया पाहे दिवाळी । निरंतर ।।


या ओवीतून संत ज्ञानेश्‍वरांनी दिवाळीचा खराखुरा आनंद मांडला आहे. सामाजिक जीवनात साजरी होणारी दिवाळी ही आनंदाचेच प्रतीक आहे मात्र ज्ञानरुपी जाणिवेतून दिवाळीचा आनंद घेतला जातो तेव्हा ती महासुखाची दिवाळी ठरते. आपणही समाजातील अज्ञानरुपी अंधःकार आपल्या सामाजिक जाणिवेरुपी ज्ञानदीपाने दूर सारु या ! शुभ दिपावली ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४