Thursday 25 November 2021

गाणं मनातलं !

प्रार्थना आणि मानवी जीवनाचं अतूट नातं आहे. श्रद्धा आहे तिथे प्रार्थना अर्थ आहे.  प्रार्थनेतील आर्ततता आपल्या भावना पोहचतात. माणसाचे विचार हे त्याच्या कर्माचे मुळ आहे. प्रार्थना हा देखील एक विचार आहे तो कार्यप्रवण करणारा आहे. तो इप्सित साधणारा विचार आहे. माझ्या आवडीचं आणि मनातलं गाणं यावेळी एक प्रार्थना आहे. रामराज्याची कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी येथील प्रत्येक मानवाने हि प्रार्थना केवळ म्हणुन उपयोग नाही तर ती आर्ततेने म्हटली पाहिजे. आपण तसे वागत असलो तर आर्तता आपोआप येते. 

मागील कोरोनाच्या संपुर्ण कालखंडात अनेकांना सेवेचं आणि जगण्याचं बळ या प्रार्थनेनं दिलं. समुपदेशनात / व्याख्यानात / प्रशिक्षणात या प्रार्थनेचा वारंवार वापर करतो. माणसाने प्रथम माणुस होणे अत्यावश्यक आहे तर जगणे सुलभ होते. भौतिक आकर्षणांना बळी न पडता नैसर्गिक जीवनशैलीचा स्वीकार करीत माणुसकीचे जगणे अर्थपूर्ण ठरते. एवढी प्रस्तावना पुरेशी आहे. 

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

सहज सोप्या भाषेत कवीने मागणी केली. सामाजिक परिस्थितीतून संवेदनशील मनाने उत्कटतेने प्रकट झालेली हि भावना आहे.

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

निराशा, नकारात्मकता, उदासीनता यासारख्या दुःखाचा अंधार सर्वत्र असला तरी उद्या सत्याचा सुर्य उगवणार आहे अशी आशा कवीने व्यक्त केली आहे. मात्र सत्याचा सुर्य उगविण्याची वाट पहात न बसता आपण काजव्यांप्रमाणे जगले पाहिजे. त्या मंद प्रकाशातुनच सुरु असलेली वाटचालीने उद्याचा सुर्य पहाता येणार आहे. काजव्यासारखे जागणे म्हणजेच माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे.
 
धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

आज ज्या गोष्टींमुळे माणुस माणसाला पारखा होत आहे ते द्वेष संपु दे. मिळालेले जन्म कुठल्याही भेदात अडकू नये. परस्परांमधील साहचर्याच्या भावनेने सर्वांना एकरुप होऊ दे. निष्ठा व आशेतुनच नितळ, निरागस माणसेच शुद्ध व सात्विकता निर्माण करु शकणार आहे. यासाठीच माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. 

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।

मिळालेले आयुष्य चांगले जगावे. एक एक पाऊल पुढे टाकत हा प्रवास सुरु ठेवला पाहिजे अन्यथा बाहेरील आव्हानांमुळे / मनातील हतबलतेने जेथे थांबाल तेथेच संपला. आता घेतलेला श्वास, मिळालेले क्षण, संधी अगदी आयुष्य पुन्हा लाभणार नाही त्यामुळे छान जगा अर्थात माणसाने माणसाशी माणसासारखेच वागा. हि मागणी आहे, प्रार्थना आहे. यात वैश्विक कल्याण आहे.  

कवी समीर सामंत यांनी लिहिलेली हि प्रार्थना रोज सकाळी एकदा तरी ऐका...

गिरीश कुळकर्णी 
९८२३३३४०८४

2 comments:

  1. माणसाने माणसाशी माणसासम वागणे ।।
    सगळ्या संतांनी ह्या साध्या शब्दात अध्यात्म सांगितला आहे.सर्व स्तरावर वाढत चाललेल्या असामानतेच्या वातावरणात कुठलेही कर्मकांड़ न करता मन:शांती ह्या एका ओळीने मिळू शकेल.नेहमी प्रमाणे आपले विश्लेषण हे गाण सगळ्यांना परत एकदा वाचुन ,गाऊन आचरणात आणण्यास उद्युक्त करेल ही अपेक्षा.

    ReplyDelete
  2. जीवनाला नवी ऊर्जा देणारा संदेश खुप छान विवेचन

    ReplyDelete