Tuesday 9 November 2021

गरज मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याची !



मनुष्य हा समूह प्रिय प्राणी आहे. त्याला लोकांसमवेत मग ते नातेवाईक असो वा सहकारी असो वा शेजारी वा समाज घटक त्याच्याशी संवाद साधायला आवडते. कुटुंब संस्था हे त्याचे प्रतीक असून भारतीय संस्कृतीचे बलस्थान आहे. यात परस्पर सहकार्य, संवाद याला विशेष महत्व आहे. यातूनच नात्यांची घट्ट वीण बांधली जाते. जेथे मानवाचा संबंध येतो तेथे मन येतेच. जेथे मन आहे तेथे विचार आहे. माणूस या एकमेव प्राण्याकडे विचार करण्याची, विचारांचे आदानप्रदान करण्याची नैसर्गिक व उपजत शक्ती आहे. विचारांचा प्रभाव माणसाच्या जीवनावर पडतो. सुदृढ शरीरासारखे मनही सुदृढ असले पाहिजे म्हणजे मानवी जीवन आनंदी व सुखकर होत असते. दिवसभरात माणसाच्या मनात हजारो विचार येतात. हे विचार संस्कारातून, जाणिवेतून, अनुभवातुन, आपल्या विचारसरणीतून येत असतात. काही विचार हे शिक्षण व सहवासातूनही येत असतात. माणूस रिकामा बसला असला तरी मनात विचार सुरुच असतात. सकाळी उठल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत विचार सुरु असतात. काम सुरु असतांनाही अंतर्मनात (बॅक ऑफ द माईंड) विचार सुरु असतात आणि या विचारातूनच जीवन घडत असते.

'कोरोना' या जागतिक महामारीने माणसाच्या मनात विचारांचे प्रचंड काहूर माजले होते. आता आपण पूर्वपदावर येत असून भीती कमी होत आहे. 'कोरोना'सारख्या घटनांना "ब्लॅक स्वान इव्हेन्ट" म्हणतात. हि अशी घटना असते कि ज्यामुळे सर्व जग प्रभावित होते. अनपेक्षित, अकल्पित व अनाकलनीय अशा या घटनेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यातील एक समस्या म्हणजे मानसिक स्वास्थ्य राखण्याची !  कोरोनापूर्वीही हि समस्या होतीच मात्र कोरोनामुळे त्यात अधिकच भर पडली, असे म्हणता येईल आणि म्हणूनच आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

मानसिक स्वास्थ्य म्हणजे जीवनात / आयुष्यात येणाऱ्या, होणाऱ्या, घडणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट घटना / अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाणे. कुटुंबातील व समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे. यात माणसाच्या भावना, विचार, परस्परसंबंध व दैनंदिन जीवनातील गोष्टी यांचा समावेश होतो. आपले मानसिक स्वास्थ्य तपासून पाहण्याकरता खालील गोष्टींचा विचार केला पाहिजे.

- इतरांशी विशेषतः निकटवर्तीयांशी आधारदायी व स्थिर नाते जुळविण्याची क्षमता

- आप्तेष्टांच्या व समाजाच्या कल्याणाशी बांधिलकी

- समस्या, दडपणे व संकटे यांना तोंड देण्याची तयारी

- आपल्यासह इतरांच्या व्यक्तिमत्वाचा योग्य आदर राखून महत्व देण्याची तयारी

- जीवनात वाटचाल करण्यासाठी लागणारी समर्पक वृत्ती व जोपासलेली मूल्ये

- आत्मप्रतिमा उंचावलेली नसली तरी डागाळलेली नसणे. स्वतःच्या उणिवा मान्य करुन त्या दुरुस्त करण्याची स्वतःची क्षमता वाढवून पूर्णत्वाला न्यायची तयारी.

मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी काही महत्वपूर्ण गोष्टी

- मोकळा संवाद

- सकारात्मक विचार (नकारात्मक गोष्टींपासून दूर राहणे)

- कुटुंबात निरोगी व पोषक वातावरण असावे.

- परस्परांविषयी प्रेम, आदर असावा

- आपले छंद जोपासले पाहिजेत जसे वाचन, लेखन, पोहणे, फिरणे, खेळणे इ.

- तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर

- वास्तवात जगायला शिकले पाहिजे

- जीवनात सर्वच गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत याची खूणगाठ बांधली पाहिजे.

- पुरेशी झोप / झोपे पूर्वी व उठल्यावर सकारात्मक विचार यासाठी आपण सकाळी उठल्यावर माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची ५ वाक्ये स्वत:शी बोलली पाहिजेत - १. मी चांगला व्यक्ती आहे. २. मी हे करु शकतो. ३. मी जिंकणारा आहे. ४. परमेश्वर माझ्यासोबत आहे. ५. आजचा दिवस माझा दिवस आहे.

- नैसर्गिक जीवनशैली - आहार, विहार व आचार

- नियोजनपूर्वक जीवन

- चांगल्या सवयी

- कामातला आनंद (आस्था / श्रद्धा / निष्ठा )

- स्वतःची वैचारिक बैठक

- गांधीजींनी सांगितलेली एकादश व्रत पालन सत्य, अहिंसा, अस्तेय, असंग्रह, स्वदेशी, सर्वधर्मसमभाव, स्पर्श भावना, अभय, ब्रह्मचर्य, शरीरश्रम, आस्वाद

- योग, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार

- शरीर - मन - मेंदू यात योग्य संतुलन

मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची कारणे

- अनुवंशिकता 

- आजची गतिमान व स्पर्धात्मक जीवनशैली

- हवी असलेली गोष्ट लगेच हवी हि वृत्ती

- विभक्त कुटुंबपद्धती

- सामाजिक व्यक्तिमत्त्वाकडे दुर्लक्ष

- संवादाचा अभाव / ताणतणाव

उपाय व उपचार

- मानसिक स्वास्थ्यात Prevention is Better than Cure अर्थात उपचारांपेक्षा प्रतिबंध जास्त प्रभावी हा नियम मानसिक आरोग्य संवर्धनासाठी जास्त लागू पडतो.

- तातडीचे उपचार

- मानसोपचार

- औषधे

- पुनर्वसन इ.

संवादातून संबंध दृढ होतात. या संवादातून होणारे समाज-गैरसमज मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. कसे तो थोडक्यात समजून घेऊ या !

- कोणी व्यक्ती मनाला लागेल असे बोलल्याने त्या माणसाबद्दलची अढी निर्माण होते. त्याचे बोलणे प्रत्येक वेळी मनावर घेतले जाते. त्यातून नकारात्मक विचार येतात. माणूस कोषात जाणे पसंत करतो. शेवटी संबंध तुटतात.

- घनिष्ट नात्यात क्षुल्लक गोष्टही मनाला लागते. अशा गोष्टी विसरता येत नाही. खुलेपणाने संवाद झाल्यास गैरसमज दूर होऊ शकतो अन्यथा संबंध खुंटण्याचा संभव असतो.

- नात्यात ओलावा नसल्यास गैरसमज लवकर होतात. नात्यात घर्षण निर्माण होते व कटुता निर्माण होऊन संबंध ताणले जातात.

- स्वाभिमानी माणसाच्या संवादात गरज नसतांना स्वाभिमान संवादात आल्यास गैरसमज वाढतात.

व्यक्ती संबंधातील स्वास्थ्य दृढ करुन मानसिक स्वास्थ्य लाभण्यासाठी खालील गोष्टी अवश्य कराव्यात...

- गप्पा / खेळ / आनंद

- मोबाईल / टीव्ही व त्यावरील नकारात्मक गोष्टी व चर्चांपासून लांब राहावे.

- वास्तव व आभासी जगावर लहान-मोठ्यांची चर्चा

- ज्यांच्याशी बऱ्याच दिवसात संवाद झाला नाही त्यांच्याशी संवाद साधावा.

- वादविवाद व टीकाटिप्पणी असावी मात्र त्यामागील कार्यकारणभाव स्पष्ट करावा.

- कौतुक व कृतज्ञता याचा नियमित वापर

- संपर्कातील व्यक्तीच्या गुणांकडे विशेष लक्ष

- इतरांना द्या (वेळ, पैसे, मदत इ.)

- हीच आमुची प्रार्थना / तू बुद्धी दे यासारख्या प्रार्थना एकत्रित म्हणा

- आनंद / सुख / प्रेम / यश / जीवन / सकारात्मकता / पैसा / तंत्रज्ञान / जगायचं का ? यासारख्या विषयांवर गप्पा

मानसिक स्वास्थ्यासाठी आपल्या विचारांकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे व ते नेहमी सकारात्मकच असतील याची काळजी घ्यावी.


10 comments:

  1. खुप छान लिहिले आहेस.
    महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती...

    सकारात्मक विचार खुप महत्वाचं आहे..

    ReplyDelete
  2. खूप छान लेख आहे सध्या असे वाचन करण्याची सर्वांना गरज आहे सकारात्मक विचार👌🏻👍🏼

    ReplyDelete
  3. लेख आवडला 😊

    ReplyDelete
  4. छान लेख आहे !
    सकारात्मकतेवर भर दिला आहे !
    सध्या निकोप सामाजिक जाणिवांसाठी याची गरज आहे .

    विजय कुळकर्णी . वाकड , पुणे .

    ReplyDelete
  5. खुप छान लेख आहे

    ReplyDelete
  6. सकारात्मक विचार,चिंतन यासाठी खूप छान
    व विचारांना चालना देणारा लेख, कुलकर्णी सर. शुभेच्छा.

    ReplyDelete
  7. खूप छान... सकारात्मक विचासरणी हीच काळाची गरज आहे.

    ReplyDelete
  8. आजच्या गतिमान आयुष्यात उत्तम मानसिक आरोग्य असणे म्हणजे एक संपत्तीच! पण त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांवर खुप छान लेख!

    - विवेक घाटे, चाळीसगाव

    ReplyDelete