Friday 22 December 2023

आयुष्यातील सुवर्णकाळाची कृतज्ञता : न्यू सिटी हायस्कुल

शाळेचे प्रवेशद्वार...

अल्पानामपि वस्तूनां संहति: कार्यसाधिका। 

तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिन:॥

अनेक छोट्या, क्षुल्लक वस्तुंना योग्य रीतीने एकत्र आणले असता मोठमोठी कार्येही सिद्धीस जाऊ शकतात. जसे की छोट्याछोट्या गवतांना जोडून बनविलेल्या दोरखंडाने शक्तीशाली हत्ती बांधले जाऊ शकतात. आम्हा सारख्या असंख्य विद्यार्थ्यांना एकत्रित बांधून समाजहितैषी समाज निर्माण करण्याचे कार्य करणारी शाळा आणि त्यातील शिक्षक "संहति: कार्यसाधिका!" या युक्तीने कार्यरत आहे. आयुष्यातील सुवर्णकाळ अनुभवण्याची संधी देणाऱ्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा लेख प्रपंच...

‘हि आवडते मज मनापासुनी शाळा... लाविते लळा ही जसा माऊली बाळा’ प्रल्हाद केशव अत्रे यांची ही बालपणीची कविता आठवली कि एका स्वप्नाच्या दुनियेत सफर करुन येतो. आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे शहरात मात्र शिक्षणाची समृद्धता आम्ही अनुभवली आहे. आजही त्या गोष्टी आठविल्या कि छाती अभिमानाने फुलून येते. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू सिटी हायस्कुलला प्रवेश घेतला तेव्हापासून  सुरु झालेला हा प्रवास दहावीनंतर वेगळ्या वळणावर सुरु झाला मात्र न्यू सिटीने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आजही आयुष्यात लाभच होतांना दिसतो. बालवयात शाळेत जाण्यासाठी त्रास देणारा मी न्यू सिटीत आल्यावर मात्र 'शाळेत हो मी जाणार, पाटी घेऊनी, घेऊनी पुस्तक अभ्यास मी करणार...' असे केव्हा म्हणायला लागलो कळलेच नाही. न्यू सिटी असे नाव आलं तरी आयुष्य समृद्ध करणारा हा चित्रपट डोळ्यासमोरुन झर्रकन पुढे जातो. शाळेचा कधी कंटाळा आला नाही किंवा कधी टाळलीही नाही. अभ्यास, खेळ, वाचन यासह अनेक गोष्टी घडत होत्या आणि आम्ही त्या आनंदाने करीत होतो. मराठी माध्यमाची जरी शाळा असली तरी इंग्रजीची अवास्तव भीती वा न्यूनगंड शाळेने कधीही निर्माण होऊ दिला नाही. 

शिक्षक वृंदासह अलीकडचा फोटो...
न्यू सिटीत ५ वीत प्रवेश झाला. वर्गशिक्षक श्री. बी. एन. जोशी सर, विषय इंग्रजी. शाळेची वेळ दररोज दुपारची मात्र शनिवारी सकाळची. त्या दिवशी आमचे सर धोतर आणि पांढरा सदरा आणि कपाळी मस्त गंध. शाळा केवळ मुलांची त्यामुळे दंगामस्तीला कोणतेही बंधन नाही. (असं विधान धारिष्ट्याने करतोय कारण शाळा शिस्तीचीच होती पण आम्ही ? ) जगण्याला लायक बनविणे, माणूस म्हणून घडविणे म्हणूनच तर म्हणतात ना ! शाळा सुरु व्हायची ती "जयोस्तुते जयोस्तुते..." या गीताने अर्थात त्यापूर्वी अन्यही गाणे लागायची त्यात ऋणानुबंधाच्या... आवर्जून आठवते. राष्ट्रगीत झाले कि दिनक्रम सुरु... साधारण ७ वी नंतर हे जरी सुरुच असले तरी आमची कबड्डी जोरात चालायची. पांढर शर्ट आणि खाकी अर्धी चड्डी हा गणवेश. सकाळी आईने मोठ्या कष्टाने धुतलेला पांढरा शर्ट संध्याकाळी पार वाट लागलेली. बटण तुटलेले, कुठेतरी फाटलेले, हातापायाला कायम मलमपट्टी सौभाग्याचं लेणंच ते ! ९ वी पर्यंत पीटीच्या तासाला शिवाजी व्यायामशाळेच्या मैदानावर सर्वांच्या पुढे... मात्र दहावीत काही तरी कारण सांगून वर्गातच. शनिवारी संपूर्ण शाळेची मास ड्रिल अर्थात एकत्रित पिटी ! हात करतांना काय धाक असायचा शिक्षकांचा... एव्हढ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सरांचे लक्ष कुळकर्णी हात सरळ हात सरळ. 

आदरणीय मु. कृ. पाध्ये सर 

मुख्याध्यापक मु. कृ. पाध्ये सर...
आमच्या शाळेचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे मुख्याध्यापक स्व. मुकुंद कृष्णाजी पाध्ये !  शनिवारी सकाळची शाळा उशिरा येणाऱ्या मुलांना चढ्या क्रमाने शिक्षा... पहिल्यांदा २५ , ५० उठबशा, त्यानंतर आलेल्यांना हातावर वेताच्या छडीचे फटके ३, ५, १० त्यानंतर आल्यावर दोन्ही आणि वरुन कोंबडा करुन उभे राहा ! तास सुरु असतांना मुख्याध्यापकांचा राउंड असायचा खिडकीतून लक्ष आणि पुन्हा लक्ष नाही किंवा काही रिकामे काम करतांना दिसला कि आहेच... १०० मीटर रनिंग, लांब उडी, उंच उडी, खो खो, क्रिकेट... याच्या जोडीला नाटके, गीत गायन, वेगवेगळ्या स्पर्धा ! अभ्यास तो पण होताच कि.... या सगळ्या गोष्टींची तयारी भूतो न भविष्यती ! तुम्हाला कितीही चांगले झाले वाटले तरी गुरुजींचे समाधान कुठे ? परत सुरु... मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा... जीवनात जिद्द, मेहनत, सातत्य, वचनबद्धता, समर्पण, संयम, सातत्य हे सर्व आले येथून अर्थात तेव्हा हे शब्द गावी पण नव्हते. म्हणून तर हा सुवर्णकाळ ! एव्हढे सर्व असल्यावर कोणाला हवी सुट्टी ? जीवावर यायचे सुट्टी असली कि... हेच शाळेचं यश आणि उद्देशही आणि म्हणूनच कृतज्ञता !

या जोडीला अजून इतर परीक्षा असायच्या त्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी आणि गणिताच्या ४ परीक्षा दरवर्षी एक एक करीत ९ वी पर्यंत बहुतांश मुले द्यायचीच... तर्खडकर इंग्रजी ग्रामर तेथे कळालं. ज्यांना चित्रकलेची आवड त्यांच्यासाठी एलिमेंटरी, इंटरमिजीएट. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, गीता पठण, कणकवलीची राज्य बाल्य नाट्य स्पर्धा, मनाचे श्लोक, जोडीला लक्ष लक्ष सूर्य नमस्कारासारखे उपक्रम, एनसीसी कॅम्प... स्पोर्ट मीट / वीक वगैरे भाग नव्हता कारण तो रोजचा भाग होता. सर्वच मुले हुशार आणि प्रत्येकामुळे शाळेला एक वेगळी ओळख. अर्थात हुशार म्हणजे ज्याच्या त्याच्या विषयात म्हणजे अभ्यास, खेळ, वक्तृत्व, वादविवाद, नाटक, गाणे... काही ना काही तर प्रत्येकात आहेच नं ! तेच शोधून त्यावर काम करणे हेच शाळेचे ध्येय. 

शाळेची खरी श्रीमंती म्हणजे आमच्या शाळेचा शिक्षकवृंद !

शाळेचा समृद्ध शिक्षकवृंद...
मधल्या सुट्टीतही कबड्डी, क्रिकेटच्या मॅचेस चालू असतील स्कोर पाहायला बाहेर जाणार खास स्कोर लिहिले जायचे परतीला वेळ झाला कि आहेच पुन्हा... बाहेर गाडीवर मिळणाऱ्या गोळ्या, अमुन्या, वाळलेली बोर असो. शाळे शेजारीच स्वस्तिक चित्र मंदिर (थिएटर) काही वेळेस टॉकीजमधील पिक्चरचे डायलॉग गाणे स्पष्ट ऐकू यायचे. मस्ती केली तरी पाय वाकडे पडणार नाही याची काळजी... विचारांची पक्की बैठक अर्थात त्यामागे होती शाळेतील शिक्षकांची मेहनत. शाळा म्हणजे खरे तर शिक्षक ६ वीला श्री. एस. एस. मुसळे सर, ७ वीला श्री. ह. म. भंडारी, ८ वी श्री. आर. एस. जहागीरदार, ९ वीला एन. एन. शाह आणि दहावीला श्री. शा. रा. नाईक प्रत्येकाचे एक वेगळेपण , वैशिष्ट्य... असेच गणिताचे श्री. व्ही. वाय. दाबके, इतिहासाचे श्री. मदनलाल मिश्रा, संगीत कलाचे श्री. रत्नाकर रानडे, चित्रकलेचे श्री. पंचभाई व श्री. उपासनी, हस्तकलेचे श्री. एम. डी. धारणे, आणि एनसीसीचे श्री. आर. एस. पाटील. सर्व नररत्नांची खाणच... नाही याच्यापुढे त्यांच्याबद्दल लिहिण्यासाठी शब्दच नाहीत. माणूस घडणं, माणूस उभा राहणं इतकी सोपी गोष्ट नाही मात्र ते करु शकते ती समाजजीवनातील शाळा नावाची व्यवस्था ! अशा शाळा आणि अशी व्यवस्था भारतीय संस्कृतीची धरोहर आहे. त्यातूनच निर्माण होणारा वसा आणि वारसाही ! त्यासाठीच शाळेप्रती कृतज्ञता... तमाम विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची हि कृतज्ञता अशीच कायम संक्रमित होत राहो ज्यामुळे संस्कृती व राष्ट्र चिरकाल टिकेल... 

शाळेचे अंतरंग...
माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो मग शिक्षकाची भूमिका महत्वपूर्ण ठरतेच आणि ती देखील आयुष्यभरासाठी... म्हणूनच आपण त्यांच्याप्रती कायम कृतज्ञ असणे हेच खऱ्या अर्थाने माणूसपणाचे लक्षण आहे. पहिले गुरु माता-पिता, तदनंतर शालेय शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षण, व्यावसायिक शिक्षण देणारे वरिष्ठ सहकारी, आध्यात्मिक जीवनाची दिशा दर्शन करणारे अशा एका व्यक्ती सोबतच आपला जीवनप्रवास सुरु असतो. हा प्रवास जेव्हढा समृद्ध तेव्हढा माणूस अधिक प्रगल्भ ! हि प्रगल्भताच माणसाला एक संवेदनशील व जागरुक नागरिक बनवितो. 

विषय शिक्षणाबरोबरच जीवन विषयक दृष्टिकोन देणारे, व्यावहारिक जगाची ओळख करुन देणारे, आपल्यातील कला कौशल्याला विकसित करीत सर्वांगीण विकास साधणाऱ्या न्यू सिटीच्या शिक्षकांनी आयुष्यभराची जी शिदोरी दिली आहे त्याबद्दल कायम कृतज्ञ राहू. अर्थात हि कोणत्याही शिक्षकाची मागणी नव्हे तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या हृदयात आपल्या कृतीने निर्माण केलेली ती जागा आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे मिळविलेला तो सन्मान आहे. 

इ. ७ वीत असतांनाच वर्गाचा फोटो...
मुळात शाळा या विषयाची भीती घालविणारे शिक्षक, विषयांची व खेळाची गोडी लावणारे शिक्षक, आपल्यातील उपजत गुणांना ओळखून त्याद्वारे व्यावसायिक जगतात आपली जागा निर्माण करणारे शिक्षक या सर्वांचेच जीवनात एक वेगळे स्थान आहे. चांगले वळण लावण्यासोबतच प्रेरणा, जिद्द, नवीन काहीतरी करण्याचे बळ, कर्तव्याची जाणीव, दातृत्व व नैतिकता देणारे हे सारे शिक्षक. कधी कौतुक करुन तर कधी रागावून सारासार विवेकाने जीवन जगण्याची गुरुकिल्ली देणारे शिक्षक. आपुलकी व आत्मीयतेने शिस्त, क्षमा व करुणा उत्पन्न करणारे शिक्षक. कर्तव्यापलीकडे व चाकोरीबाहेर जाऊन एक माणूस घडविण्यासाठी, राष्ट्रप्रेमी नागरिक घडविण्यासाठी चाललेली हि धडपड अविरत, अविश्रांत आणि निश्चयाने चालू होती.  

ज्या वर्गात शिकलो त्यात पुन्हा एकदा...
कुणाला मातीच्या गोळ्याला दिलेला आकार तर कोणाला सुरवंटाचे फुलपाखरातील परिवर्तन वाटते. एका बाजूला नव्या जगाची ओळख करुन देणारे तर दुसऱ्या बाजूला त्याला सामोरे जाण्यासाठीची सिद्धता करणारे हे शिक्षक. वयाच्या एका विशिष्ट मर्यादेनंतर तटस्थपणाने सिंहावलोकन केले तर त्यांच्यातील या सर्वांमध्ये एक सामान धागा दिसतो तो म्हणजे आपला विद्यार्थी घडविण्यासाठी त्याच्यातील गुणग्राहकता शोधण्याचे सर्वात अवघड काम... विद्यार्थ्याने आपल्या यशाचे दिलेले संपूर्ण श्रेय हिच त्याची कर्तव्य परायणता ! शिक्षकाला विद्यार्थ्यांची आई तर आईला बाळाची शिक्षिका होता आले पाहिजे असे म्हणत असतांनाच शिक्षकाला विद्यार्थ्यांतील शिक्षक जागा करता आला पाहिले तर वसा आणि वारसाची हि संस्कृती चिरकाल टिकून राहील आणि त्याप्रतीची कृतज्ञताही ! शिक्षक हेच राष्ट्रजीवनाचे बलस्थान असून विद्यार्थ्यांनी त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता अशीच संक्रमित होत राहो हिच परमेश्वरचरणी विनम्र प्रार्थना !  

अशा कितीतरी आठवणी आहेत पण तेवढ्या वेळ व शब्द मर्यादेमुळे लिहिणं शक्यही नाही. पण शाळेविषयी आणि शाळेतील आठवणींविषयी एवढंच सांगावसं वाटतं...

माझी शाळा जीवनाचा सुवर्णकाळ 

निरागस, निष्पाप जीवांचा सुकाळ ॥  

तेथेच झाली नांदी गमभनची 

अन समृद्ध संस्कारित जीवनाची ॥

दंगा आणि मस्तीसाठी होते सखे-सोबती 

त्यातूनच निर्मिली परमेश्वररुपी नाती ॥

त्याला नव्हत्या जाती-पातीच्या भिंती 

जळती अखंड संस्काराच्या वाती 

उजळती समृद्ध जीवनाच्या ज्योती ॥ 

स्वओळख आणि प्रगतीचा पाया 

देई आत्मविश्वास ठाया ॥

ज्ञानमंदिरातील पूज्यनीय व्यक्ती

यशोमंदिरे उभविती ॥

अशी आमची शाळा होती....

अशी आमची शाळा होती... आहे... ॥


गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४