Tuesday 11 April 2023

प्रभू रे खेळ तुझा न्यारा !


मागील शुक्रवारी ( दि. ७ एप्रिल ) सकाळी ५.१५ ला बाबांचा (सुनील) फोन आला होता. मी उठल्यावर पाहिला आणि त्यांना फोन लावला. "काय म्हणता बाबा ?" 

"... गिरीशभाऊ भेट राहून गेली !" 

"कोणाची ?"

"भाऊ... दादा गेले !"

मी मोठ्याने ओरडलोच "काय ?"

"रात्री दादांना अडीच वाजता सीव्हीयर हार्ट अटॅक आला... आणि संपलं."

पुढे काहीही न बोलता फोन कट केला. घरात आई व सौ. आदितीला सांगितले. त्यांनाही धक्काच बसला. आदल्या दिवशी पौर्णिमेच्या कुळधर्माच्या निमित्ताने सौ. ना याज्ञीकांकडे सवाष्ण म्हणून बोलावले होते. छान बोलणे झालेलं. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशीच चि. प्रथमेशचा वाढदिवस असल्याने त्याची आठवणही याज्ञीक दादांनी काढली. फोन लावला मात्र बोलणे झाले नाही. जे नंतर रात्री झाले होते. दादांनी सौंना निरोप दिला होता संक्रांतीपासून गिरीशभाऊंची भेट नाही. बोलवले आहे सांगशील. त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत बाबांच्या घरी आम्ही बसलो होतो. तेथेही सर्व गप्पा झाल्या. आणि सकाळी असा निरोप... बलीयसी केवलमीश्वरेच्छा॥ अर्थात प्रभू रे खेळ तुझा न्यारा...

... ती भेट राहिली !

तशी माझी आणि दादांची वरचेवर भेट होत असे. फोनवर बोलणेही होत असे. दसरा आणि संक्रांतीचा नमस्कार चुकला नाही. दादांचा रात्री उशिरा आशीर्वाद घेणारा मी आणि माझी वाट पाहणारे दादा !  कधी वाट पाहून दादा त्यांच्या खोलीत गेलेले असायचे. यावेळी संक्रांतीनंतर दादांचे दोन वेळा फोन आलेला... २२ मार्चचा शेवटचा फोन... विषय तसे सामान्यच पण आपलेपणाचे... परिवार, करिअर, व्यवसाय चौकशी... केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक... कधी वारीचे प्रकाशित केलेले पुस्तक तर कधी रोटरीचे इतिहास सांगणारे पुस्तक... आई, घर, गाव, शेती, मुले, बंधू, धुळे येथील हालहवाल इ. यांची चौकशी... कधी ऋषीच्या करिअरबद्दल तर कधी त्याच्या अल्लडपणाबद्दल... मनमोकळ्या गप्पा... त्यातून काही मार्गदर्शन तर काही जाणून घेण्याची इच्छा ! 

मोकळं होण्याची हमखास जागा म्हणजे दादा... वैयक्तिक, सार्वजनिक सर्वच विषय सहज बोलले जात. एका बाजूला काळजी तर दुसऱ्या बाजूला अभिमान ! तास - दीड तास कुठे निघून जायचा कळायचे नाही. आता केवळ आठवणी आणि राहिलेल्या त्या भेटीबद्दलची मनातील खंत. मला, माझ्या कामाच्या स्वरुपाला समजून घेणारे दादा... यावेळी समजून घेतील का ? मनातील घालमेल आणि तळमळ कशी शांत करावी हा माझा मलाच पडलेला प्रश्न... उत्तर नसलेला ! 

नातेसंबंधापलीकडील नाते जपणारे दादा ! 

अलीकडे कुटुंबाशिवाय अन्य ठिकाणी फारसे बाहेर न जाणाऱ्या दादांनी आपला गोतावळा आणि त्यांचे संबंध इतक्या अफलातून आणि पवित्र अश्या नात्याने बांधून ठेवले होते कि त्याला कोणतीही उपमा वा अलंकार देता येणार नाही. कुटुंब, परिवार आणि समाजामधील स्नेहीजनांसाठीचा एक सेतुबंध त्यांनी निर्माण केला होता. त्याला त्यांनी कधी तडा जाऊ दिला नाही वा ओरखडाही पडू दिला नाही. शुभेच्छारुपी आशीर्वादाच्या धाग्याने त्यांनी ऋणानुबंधाचे वस्त्र घट्ट विणले होते. ते कधी जीर्ण होऊ दिले नाही वा फाटूही दिले नाही. त्यामुळे दादांच्या संपर्कात आलेला प्रत्येक व्यक्ती त्यांच्या स्नेहबंधनात अडकल्याशिवाय राहिला नाही. 

आधारवड दादा ! 

याच शीर्षकाचा एक लेख ११ सप्टेम्बर २०२२ रोजी लिहिला होता. त्याची लिंक येथे देत आहे. https://rb.gy/u7jmc विषयाची पुनरावृत्ती टाळून ते कसे आधारवड ठरले हे समजून घेऊ. दादांचा अमृत महोत्सव, सहस्रचंद्र दर्शन व अंतिम यात्रा मानवी श्रीमंतीचा आदर्श नमुनाच ! माणसे त्यांच्या भेटीसाठी आतुर असायचे. ७५ वर्षांचे मैत्रीसंबंध त्यांनी जपले. यासर्वांच्या मुळाशी असलेली संवेदना समजून घेतली पाहिजे. निर्हेतुक, निर्व्याज, निरपेक्ष, निरलस प्रेम कसं करावं याचा वस्तुपाठ त्यांनी आपल्या कृतिशील जीवनातून घालून दिला. हि सर्व आपली माणसे आहेत, आपण त्यांचे पालकत्व स्वीकारले पाहिजे, आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना समजावलं पाहिजे, आपण त्यांना मार्ग दाखवला पाहिजे हि नैतिक जबाबदारी त्यांनी स्वतःहून स्वीकारली होती आणि ती आयुष्यभर जपली. कधी कोणावर रागावले नाही, चिडले नाही, ओरडले नाही, अबोला नाही... जीवनाचा एकच उद्देश बंधुत्वाचा फिरवित चरखा, एकत्वाचे सूत्र धरु या, धागा धागा अखंड विणूया... या उक्ती सार्थ करणारा स्वभाव त्यांनी शेवटपर्यंत जोपासला. स्वाभाविकपणे त्यांनी जोडलेल्या या माणसांसाठी ते आधारवड ठरले. 

कर्तव्याने घडतो माणूस...

प्रत्येक माणसामध्ये उपजत अशी सेवावृत्ती असते. इतरांच्या विकासात आपलाही हातभार लागावा, त्यासाठी आवश्यक असलेली मदत मग ती आर्थिक असो अथवा नसो, समस्याग्रस्त व्यक्तीला दिलेला मानसिक, बौद्धिक व भावनिक आधार हि देखील सेवाच होय. याज्ञीक दादांनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजातील विविध घटकांची सेवा केली असे आपल्याला नक्की म्हणता येईल. नोकरी मध्ये नोकरदारांची संघटना असो वा ब्राह्मण सभा, दादांनी समर्थ असे नेतृत्व दिले. इतरांना आपलेसे करून त्याला सेवेसाठी प्रवृत्त करण्यात त्यांचा हातखंडा होता. अगदी समाजातील बांधवांना त्यांच्या कुटुंबातील विवाह जुळवत असतांना अनेकदा धोका पत्करत त्यांनी आश्वासक शब्द दिला आणि अनेकांच्या घरात मंगल कार्ये घडवून आणली. आमच्या परिवारातही (आमच्या चुलत बहिणीच्या विवाहासाठी) असेच मंगल कार्यात त्यांनी घेतलेला पुढाकार कधीही विसरता येणार नाही. नेतृत्वाची / मानाची पदे भूषवित असतांना त्याचा लोभ न करता कुठे थांबायचे याची त्यांना जाणीव होती. ब्राह्मण सभेतील पदाधिकाऱ्यांच्या व सहकाऱ्यांच्या आग्रहाला बळी न पडत त्यांनी दुसरी टर्म न घेता इतरांनाही संधी दिली पाहिजे असा आग्रह धरला. त्यामुळेच दादांना अनेक सन्मित्र लाभलेले व त्यांच्या सोबत अनेक कार्ये पूर्णत्वास नेलीत. कर्तृत्वाला कृतज्ञतेची जोड देत केलेले कार्य माणसाला कृतार्थतेचा अनुभव देतात आणि त्यातूनच माणूस समाधानी व आनंदी होत असतो. याज्ञीक दादांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात असे समाधान लाभल्याचे आपण अनुभवले असेल.  

याज्ञीक दादा असो वा आमचे पिताश्री दादा असो... ते पुण्यात्माच होते असे मला वाटते. त्यांना आलेलं मरण हे शोक करण्यासाठी नाही तर त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन कार्य करण्याचा संदेश देणारे आहे. असं चटकन आलेलं मरण धक्का देणारं असतं मात्र त्याला स्वीकारणं हे आपलं काम आहे. कारण प्रत्येकाला एक दिवस जायचे आहे हे नक्की... वेळ हि नक्की... माहिती नसलेली ! दवाखाना नाही, अंथरुणात खिळून पडणं नाही, इतरांना आपल्यामुळे त्रास नाही, इतरांवर अवलंबून राहणं नाही यासारखं दुसरं चांगलं मरण असू शकत नाही. याज्ञीक दादांच्या निधनातून आपण एक संदेश नक्की घेतला पाहिजे. आजचा दिवस आनंदाने जगा. त्यासाठी भौतिक साधनांपेक्षाही माणूस अधिक महत्वाचा ठरतो. माणसे जोडली पाहिजेत, सांभाळली पाहिजेत, उभी केली पाहिजेत आणि असं करुनही आपल्या बोलण्यात "मी केलं" येऊ देऊ नये. ज्यांना जोडलं, सांभाळलं वा उभं केलं त्यांनी ते म्हटलं तर म्हणू दे... नाही तर नाही ! कारण हि सर्व त्या जगनियंत्याची रचना आहे. मीच घडवितो मीच मोडितो उमज आता परमार्था... कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था !

ति. याज्ञीक दादांच्या पवित्र आत्म्यास परमेश्वर सद्गती देईलच, त्यानेच हे दुःख सहन करण्याचे बळ याज्ञीक परिवारासह दादांच्या गोतावळ्यातील स्नेहीजनांना देवो हीच प्रार्थना ! ति. याज्ञीक दादांचा समृद्ध असा वारसा आपण पुढे नेऊ या हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.  ॐ शांती, शांती, शांती !


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

2 comments:

  1. ती.स्व . याज्ञिक दादांना अंत:करणपूर्वक श्रध्दांजली.
    ओम शांती: शांती.
    नमस्कार.

    विजय कुळकर्णी

    ReplyDelete
  2. अंत: करणापासून अर्पण केलेली आदरांजली!!!

    ReplyDelete