Saturday 5 December 2020

वॉर अँड पीस



मागील सोमवारी समाजासाठी विशेषतः:समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काही तरी विशेष, भव्य-दिव्य करु इच्छिणाऱ्या, सामाजिक कार्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या आमटे कुटुंबातील शीतलताई आमटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी कळली. मन सुन्न झाले. मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. इतक्या टोकाचे पाऊल एक महत्वाकांक्षी, संवेदनशील, इतरांसाठी प्रेरणादायी व ध्येयनिष्ठ व्यक्ती कसा घेऊ शकते ? या एका प्रश्नाकरिता मन अस्वस्थ होते. स्व. बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी सोहोळ्याचा (२०१४) साक्षीदार असलेल्या माझ्या सारख्या संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्याला प्रश्न पडणे स्वाभाविकच ! मात्र याच संवेदनशीलतेमुळे विषयाचे गांभीर्य, आवाका व व्याप्ती लक्षात घेता कुठलीही घाई न करता विचारपूर्वक व जबाबदारीने व्यक्त होण्याचे ठरविले. गेले ६ दिवस या विषयावरील माध्यमातील मते मतांतरे, टीका टिप्पणी, व्हिडीओ पाहतोय. कोण चूक, कोण बरोबर, कोणावर अन्याय, पुढे काय ? हे प्रश्न आहेतच मात्र माझ्यासाठी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आत्महत्याच का ? 



गेली अनेक वर्षे हा प्रश्न अक्षरश: छळतोय. त्यात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात आमच्याच कुटुंबातील सदस्याने केलेल्या आत्महत्येमुळे याबाबत स्वामी विवेकानंद जयंतीला काही ठोस करण्याची योजना आखली होती. दुर्दैवाने महामारीमुळे तो विषय थांबला. महामारीने निर्माण केलेल्या अनेक सामाजिक समस्यांनी अनलॉकच्या काळात अनेकांना हा पर्याय निवडण्यास बाध्य केले. माध्यमातील या बातम्यांनी मन विषण्ण होते. अनेकदा माध्यमे या बातम्या का देतात असा प्रश्नही पडतो कारण या बातम्या मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तीसाठी नकारात्मक प्रेरणा ठरतात असे मला नक्की वाटते. वैयक्तिक भेटीतून स्थानिक संपादकांना सहज बोललो देखील...या बातम्या टाळता येणार नाही का ? सार्वजनिक कार्यक्रमात, प्रशिक्षणात, व्याख्यानातून या विषयावर तरुणांशी आवर्जून बोलतो हे खरे असले तरी बातमीतील त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही आणि त्याला थांबवू शकलो नाही याचे दुःख मनाला बोचणी देत राहते. असो.

शीतलताईंनी आत्महत्येच्या दिवशी ट्विटर हॅण्डलवर एक चित्र सामायिक केले होते आणि त्याला शीर्षक होते " वॉर अँड पीस ". मला हे वाक्य त्यांच्या मनाची तगमग व परिस्थितीची कल्पना देणारे वाटते. जीवनातील अनेक आव्हानांना, संघर्षांना माणूस सामोरे जातच असतो. रोज मरणाची लढाई ती हिच, अशाच पद्धतीने तो जगत असतो. हि लढाई तो लढत असतो कारण त्याला हवी असते शांतता...मानसिक शांती, आत्मिक समाधान... ताईंना हि मानसिक शांती मिळविण्यासाठी आत्महत्या हा पर्याय योग्य वाटला असेलही पण...  मग प्रश्न येथूनच सुरु होतो. अशी कोणती लढाई होती कि ज्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही ? बाह्य जगतातील लढाईबद्दल बरंच बोललं जातंय... कौटुंबिक वाद, सहकाऱ्यांशी वाद अन्य... पण त्यावर हा पर्याय नक्कीच त्या निवडणार नाही. त्यातील काय योग्य अयोग्य याच्या तपशिलात मी जाणार नाही कारण मी त्यासाठी पात्र नाही वा मला त्याबाबत माध्यमातील गोष्टींशिवाय काहीही माहिती नाही आणि त्याची सत्यता (?)...  



माझ्या मते हि लढाई बाहेरच्या जगापेक्षा अंतर्गत जगाची अधिक असावी. एव्हढा मोठा परिवार सांभाळत असतांना लागणारे आर्थिक पाठबळ... ते उभे करण्याचे आव्हान... भविष्यात करावयाच्या गोष्टींसाठी लागणारे पाठबळ, त्यासाठीचे मार्ग... आव्हानांची मालिका... जीवनात कराव्या लागणाऱ्या वैचारिक तडजोडी, जबाबदारी सांभाळत असतांना आपण कुठेतरी कमी पडतो आहोत हि भावना, एका बाजूला ७० वर्षांची विश्वासार्हता आणि दुसऱ्या बाजूला "लोक काय म्हणतील ?" याची बोचणी... त्यातून निर्माण होणारे मानसिक द्वंद्व. संवेदनशील कार्यकर्त्यांसाठी तसे हे नेहमीचेच असते. त्यामुळे एव्हढा टोकाचा निर्णय ? संस्था संचालन करीत असतांना असे मानसिक द्वंद्व नेहमीचेच असते. आमटे परिवारातील सदस्यांसाठी ते अजिबातच नवीन नाही. काम करीत असतांना समोरील आव्हानाचे उत्तर जवळ असतांनाही "करावे कि न करावे ?", "To be or Not to be..." ची परिस्थिती खूप मानसिक गोंधळ निर्माण करते. एका बाजूला व्यवहार आणि दुसऱ्या बाजूला भावना यांचा समतोल साधणे अनेकदा कार्यकर्त्याला कठीण जाते. 

शीतलताई खरं तर याबाबतीत अनेकांच्या आदर्श होत्या. त्यांनी अनेक प्रकल्प, उपक्रम ज्या पद्धतीने साकारले, चालवले त्यावरून त्यांना हे असे अनुभव नवीन नक्कीच नाही. मग असा कोणत्या विषयावरील अंतर्गत मानसिक वा वैचारिक संघर्ष त्यांना या निर्णयाकडे घेऊन गेला असेल ? आपली हरविलेली मानसिक शांती मिळविण्यासाठी अन्य मार्गाचा अवलंब करावासा का वाटला नसेल ? एका बाजूला आनंदवनात घेतलेले जीवन शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमधून घेतलेले शिक्षण काय कमी पडले ? का या दोहोंच्या ताळमेळातच गडबड झाली. सामाजिक कार्यकर्त्याची हि अशी स्थिती अनेकदा होते. अनेक चांगल्या गोष्टी करण्याची इच्छा असूनही करता न येणे ? त्याठिकाणी आपली मूल्ये, तत्वे, धोरण याबाबत आपल्याच मनात शंका निर्माण होणे हे फार कठीण असते. संस्थेचा मूळ आत्मा सांभाळून त्याला तारुण्य बहाल करण्याचे आव्हान स्वीकारण्यात काही अडचणी होत्या का ? त्यातून निराशा, हतबलता, नैराश्य येते. माणूस अनेक अंगाने, मार्गाने त्यावर मात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. ताईंना यावेळी मात्र तो मार्ग सापडला नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. 

आम्ही एका संवेदनशील, धडाडीच्या, स्वप्नाला कवेत घेणाऱ्या कार्यकर्तीला मुकलो हे नक्की. आमटे परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर देवो हीच प्रार्थना ! 

जाता जाता- लिओ टॉलस्टॉय यांची "वॉर अँड पीस" या विषयावरील एक प्रसिद्ध कादंबरी असल्याचे वाचनात आले. मी ती वाचलेली नाही. मात्र त्या संदर्भातील अधिक माहिती वाचली असता त्याचा संदर्भ ताईंच्या ट्विटशी असावा का असे वाटून गेले ? . 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४


Tuesday 1 December 2020

आपले आयुष्य आपल्या हाती !



सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना आपल्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. खरं तर  आजचीही चिंता आहेच परंतु माणूस नेहमी भविष्याचा जास्त विचार करतो. काही माणसांना काहीतरी मार्ग निघेल असे वाटते, काहींना वाटते जे सर्वांचे होईल ते आपले होईल तर काही जणांना वाटते आता काही खरं नाही संपलं सगळं ! माणसाच्या या विचार करण्याच्या पद्धतीवरुन त्यांचे आचरण ठरते. त्याप्रमाणे त्यांचे प्रकार वा स्वभाव वैशिष्ट्ये ठरतात. कोणी आशावादी, तर कोणी निराशावादी, कोणी हताश तर कोणी बिनधास्त, कोणी गंभीर तर कोणी खुशालचेंडू. मग नक्की माणसाचे भविष्य कसे ? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. आपण त्याचा उत्तर शोधण्याचा या लेखातून प्रयत्न करणार आहोत. 

आपल्या भविष्याबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न माणूस वेगवेगळ्या पद्धतीने करीत असतो. काही जणांना ते वर्तमानपत्राच्या राशी भविष्यातून मिळते तर काही आपली कुंडली तपासून पाहतात तर काही हात दाखवूनही शोधतात. यातील शास्त्रावर आधारित गोष्टींबद्दल मला काही म्हणायचे नाही मात्र भंपक व लोकांना फसविणाऱ्या गोष्टींबाबत नागरिकांनी जागरुक होण्याची गरज आहे. मला असे वाटते कि, आपले आयुष्य आपल्या हातात आहे. कसे ते विस्ताराने समजून घेण्याचा प्रयत्न करु. यासाठी सर्वप्रथम प्रत्येकाने स्वतःला तीन महत्वाचे प्रश्न विचारावे असे मला वाटते. ज्यांना या प्रश्नांची उत्तरे मिळाली त्याला त्याच्या भविष्याची दिशा मिळाली असे समजण्यास हरकत नाही. तसे म्हटले तर अतिशय सोपे प्रश्न आहेत हे. भारतीय तत्वज्ञानात या प्रश्नांची उत्तरे आहेत. हे तत्वज्ञान पुस्तकात नसून आपले आई-वडील व कुटुंबीय सहजपणे ते आपल्या मनावर बिंबवत असतात. मात्र समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा त्यावर परिणाम होतांना आपल्याला दिसतो. अर्थात त्याचे मूळ तीन प्रश्नांमध्ये आहे. काय आहेत प्रश्न ? पाहू या ! 


प्रश्न १ - का जगायचं ? 

आपण जन्माला तर आलोय पण आपल्या जीवनाचे नक्की उद्दिष्ट काय. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, काय मिळवायचे आहे.. आनंद, समाधान, सुख, यश ? पुन्हा प्रश्न नक्की आनंद म्हणजे काय ? सुखी माणूस कोण ? समाधान कशात असते ? ते कुठे मिळते ? यश कशाला म्हणतात ? यशाची आपली व्याख्या काय ? आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये या प्रश्नांची उत्तरे बदलत जातात. हि प्रश्न उलगडत जातात. यांची उत्तरे आपल्याला सापडतात. बऱ्याच वेळेस लोक काय म्हणतील म्हणून अनेक गोष्टी आपण आपल्या मनाविरुद्ध करतो आणि तेथेच गाडी आपला मार्ग बदलते.मागे वळून पहिले तर आपण कुठे होतो ? आपल्याला कुठे जायचे होते ? कशाचेही उत्तर मिळत नाही आणि माणसाची अवस्था संभ्रमाची होते. अशा वेळेस माणूस चुकीच्या मार्गाची निवड करतो आणि फसतो.


प्रश्न २- कसे जगायचे ?

जीवनाचे उद्दिष्ट एकदा निश्चित झाले कि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा ? हे ठरविणे अगत्याचे ठरते. याला आपण धोरण असेही म्हणू शकतो. जीवनाचे मूलभूत तत्व शाळेत मूल्य शिक्षणातून शिकविली जातात. मात्र आपण त्याकडे डोळसपणे पाहतो का ? हा खरा प्रश्न आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी आपण आपल्या अंतर्मनाशी संवाद साधला तर आपल्याला प्रश्नांची वास्तव व योग्य उत्तरे मिळतात. पण आपला स्वतःचा स्वतःशी संवादच हरवला आहे म्हटल्यानंतर उत्तर सापडणे कठीण जाते. यासाठी आदर्श जीवनपद्धती स्वीकारुन तर काही वेळेस आपली स्वतःची जीवनशैली विकसित करुन जगणारी माणसे आपल्या अवतीभोवती असतात. ती आपल्याला परग्रहावरची वाटतात,  तेथेच आपण चुकतो आणि बहुसंख्यांच्या मार्गावरुन चालतो. जीवनात काय करायचे, काय नाही करायचे हे ठरविणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी आपण आपली स्वतःची काही मूलभूत तत्वे समजून उमजून ठरविली पाहिजे व त्यानुसारच आपले आचरण असले पाहिजे.


प्रश्न ३- आनंदी कसे राहायचे ?

सर्वात महत्वाचा प्रश्न आहे हा.जीवनात सर्व काही मिळवायचे असते त्याला कारण असते जीवनाची कृतार्थता ! आपण जे काही करतो त्यातून आनंद मिळविण्यासाठी... पण आपण आनंदी होतो का ? एखादी गोष्ट ठरविली आणि आपण ती मिळविली तर आपण संतुष्ट होतो का ? आपल्याला आनंद होतो का ? मुळात आनंदाची आपली स्वतःची संकल्पना स्पष्ट आहे का ? आनंद देण्यात असतो ना कि मिळविण्यात. पण हे समजण्यासाठी खूप मोठा काळ जाऊ द्यावा लागतो. त्याची सवय लावावी लागते. त्यासाठी आवश्यक असणारा संयम व सातत्य अंगी बाणावे लागते. तात्काळच्या (इंस्टंटच्या) या युगात या दोनही गोष्टी माणसापासून दूर जाऊ लागल्या आहेत. त्यावर खूप सारे काम करण्याची गरज आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून माणसाला अपेक्षित असलेला आनंद मिळू शकतो. दुर्दैवाने आपली परिमाणे आपल्या समाधानावर अवलंबून नसतात तर समाजातील इतर घटकांवर व खोट्या प्रतिष्ठेवर अवलंबून असतात. त्यामुळेच आपला मार्ग चुकतो आणि आपल्याला आनंद होण्याऐवजी दुःखच अधिक होते. 

मी ज्या वेळेस आपले भविष्य आपल्या हाती म्हणतो त्यावेळेस वरील संकल्पना आपल्या स्पष्ट आहेत असे गृहीत धरले आहे. तसेच सोबतीला अन्य काही गोष्टींची माहिती व कल्पना आपल्याला आहे असे गृहीत धरलेले आहे. आपल्या जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी मला माझी स्वतःची ओळख आहे का ? ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य माझ्यामध्ये आहे का ? आपल्याला अपेक्षित असलेले ज्ञान आहे का ? आपण कोण आहोत ? आपल्यामध्ये काय आहे जे इतरांमध्ये दुर्मिळ आहे, हे सांगता येईल का ? वास्तव स्वीकारण्याची व अपयशाला सामोरे जाण्याची जिद्द माझ्यात आहे का ? जीवनात आव्हानांना स्वीकारायची माझी तयारी असते का ? मेहनत करण्याची व स्वतःत बदल करण्याची माझी तयारी आहे का ? जीवनात आवश्यक असणारी जोखीम स्वीकारण्याची माझी तयारी आहे का ? मिळालेल्या अपयशाची जबाबदारी मी घेतो का कि अन्य कोणावर तरी त्याचे खापर फोडून मोकळे होतो  

अतिशय छोट्या वाटणाऱ्या या गोष्टी आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन देणाऱ्या आहेत. समाजातील अनेक यशस्वी व कर्तृत्ववान लोकांना आपण आदर्श मानतो मात्र त्यांची एकतरी गोष्ट आपण आपल्या जीवनात अंगिकारतो का ?  कुठे अडचणी येतात, त्यावर मात कशी करतो ? एखाद्या गोष्टीसाठी आवश्यक असणारे बदल करण्यासाठी मी स्वतःहून पुढाकार घेतो का ? सद्यस्थितीतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण या प्रश्नांचा विचार करायला सुरुवात करु या ... आणि सिद्ध करु या ! आपले आयुष्य आपल्या हातातच असते. 


गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४