Thursday 30 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग १२

सर्वार्थाने "बदल" हाच यशाचा मंत्र ठरेल 


समर्थ भारताच्या उभारणीसाठी... लेखमालेच्या मागील भागाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक नामवंत तज्ज्ञ, जाणकार व हितैषी मान्यवरांनी लेखमालेचे कौतुक करतांना हे सर्व एका चांगल्या पुस्तकाच्या स्वरुपात समाजासमोर यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आज तसा विचार नसला तरी लेखमाला संपतांना त्यासंदर्भात विचार करता येईल. कारण त्यासाठीचे अर्थकारण महत्वाचे ! मात्र मान्यवरांच्या या प्रतिसादामुळे उत्साह वाढला असून अचूक, उपयुक्त व व्यवसायांच्या वृद्धीसाठी अत्यावश्यक गोष्टी लिहिल्या जातील. त्यामुळेच आपण येथील पुढील भाग अवश्य वाचावेच व आपल्या संपर्कातील सर्वांना सुचवावे. यापुढे चाकोरीबाहेरच्या उपाययोजना व मूलभूत विचार देण्याचा प्रयत्न असणार आहे. ,

समर्थ भारताच्या उभारणीचा विचार करताना वेगवेगळ्या क्षेत्रातील काही आव्हानांचा व काही संधींचा आपण विचार केला. महामारीची समस्या आपत्ती आहेच पण त्याने गर्भगळीत होण्याची आवश्यकता नाही. लॉक डाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करुन घेत एका नवीन विश्वात आपल्या कर्माने पदार्पणासाठी सिद्ध व्हावे लागेल. मला सुचलेल्या, वाटणाऱ्या, वाचलेल्या काही गोष्टी येथून पुढच्या लेखांमधून मांडणार आहे.


उपाय योजनेच्या अनुषंगाने लिहिण्यात येत असलेल्या या भागात मला सर्वप्रथम आपणास सांगायचे आहे कि, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी ज्यांची मेहनत करण्याची तयारी आहे, ज्यांना कोणत्याही प्रकारचे काम करण्यास कमीपणा वाटणार नाही व ज्यांच्याकडे नाविन्यपूर्ण , सृजनशील पर्याय आहे अशांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी फारशी अडचण येणार नाही, तसेच ज्यांची तंत्रज्ञान आत्मसात करण्याची, व्यवसायासाठी आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करण्याची तयारी आहे त्यांना परिस्थितीशी जुळवून घेणे लाभदायक ठरु शकेल. जीवनात आवश्यक असलेली जोखीम घेण्याची तयारी असणाऱ्यांना अनेक पर्याय खुले असतील आणि त्यातूनच त्यांना आपल्या अस्तित्वाच्या लढाईचा मार्ग सापडणार आहे. जी गोष्ट यापूर्वी केली नाही किंवा जी गोष्ट करणे आवडत नाही अशा गोष्टी आवडीने करणाऱ्यांना नक्की यश मिळेल अशी मला खात्री आहे. त्यासाठी सुयोग्य नियोजन करता आलेच पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व करीत असतांना आपल्याला अपेक्षित परिणाम मिळाले वा नाही मिळाले तरी त्याचा दोष इतरांना न देता आपण कुठे चुकलो, कमी पडलो याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.

माणसाचे सामान्य जीवन आणि लॉक डाऊन नंतरचे जीवन पूर्णतः वेगळे असणार आहे. जनसामान्यांच्या सध्याच्या वागणुकीवरून त्यांना या गोष्टीची कितपत कल्पना आहे याची मला चिंता वाटते. "काही फरक पडत नाही", "जे व्हायचे ते होईल", "आम्हाला काही प्रॉब्लेम नाही", "इतक्या वर्षांची यशस्वी परंपरा आहे", अशा कोणत्याही भ्रमात वा गृहीतकात कोणीही अडकू नये अन्यथा तो आत्मघात ठरण्याचा धोका ठरू शकेल. लॉक डाऊन पश्चातचे जीवन यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येकाला "बदल" स्वीकारावा लागेल आणि तोही आपल्या विचारांपलीकडचा ! कसं शक्य आहे ? असे न विचारता... मागील चार महिन्यांपासून आम्ही संस्थेच्या एकूणच ध्येयधोरणांचा फेरविचार करण्यास सुरुवात केली होती. ग्राहकाला काय अपेक्षित आहे आणि मला त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळणार आहे का ? हाच प्रश्न सतावतोय. तसा तो पहिल्या दिवसापासूनच होता. आता त्याची तीव्रता अधिक जाणवतेय कारण प्रश्न निर्माण झालाय तो अस्तित्वाचा !  म्हणूनच विश्वासाने सांगू इच्छितो आपल्याला जीवनात सर्वार्थाने बदल स्वीकारावा लागणार आहे आणि "तोच" आगामी काळाचा यशाचा मंत्र ठरणार आहे.

एक दिवस लॉक डाऊनची स्थिती संपणार आहे. त्यानंतर काही व्यवसाय आहे त्या परिस्थितीच स्वतःच्या अस्तित्वाचा लढा लढतील मात्र काही जण लॉक डाऊनच्या काळात तयार केलेल्या योजनांप्रमाणे त्वरित हालचाल करतील आणि अपेक्षित गती साधतील. या आपत्तीच्या येण्यापूर्वी कोणीही अंदाज वा अपेक्षा केली नव्हती मात्र आपत्ती पश्चातचा प्रत्येकाचा जीवनाचा व व्यवसायाचा नकाशा वा संकल्पचित्र तयार असले पाहिजे. तेव्हा आम्हाला माहिती नव्हते असे म्हणून चालणार नाही. हा नकाशा तयार करतांना भविष्यातही अशा प्रकारची समस्या आली तर त्यातही आपले काम सुरु राहिलं याची खबरदारी घ्यावी लागेल. अर्थात दीर्घकालीन व कायम स्वरूपी योजनेचा विचार करावा लागेल.

साथीच्या या आजारामुळे होणारी आर्थिक घसरण ग्राहकांची वागणूक आणि अपेक्षा नाट्यमयरित्या बदललेल्या असतील. "कोरोना"च्या सततच्या अस्तित्वामुळे (किंवा भीतीमुळे) वागणुकीत हे बदल घडून येतील हे वेगळे सांगायला नको. यापूर्वी अनेक छोट्या छोट्या व्यवसायांनी वादळे झेलली आहेत. जाणकार व्यावसायिक मालकही यातून स्वतःला बाहेर निघण्यासाठी विचार करीत असतील. व्यावसायिक वा उद्योजकांना सरकार या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी कसे पाठबळ देतील याची वाट पाहणे परवडणारे नाही. सरकार प्राप्त परिस्थितीची जाणीव ठेऊन नक्कीच चांगली पावले उचलतील अशी अपेक्षा सर्वांचीच आहे. आव्हानाची तीव्रता लक्षात घेता सरकार कितपत वा कसे सहकार्य करेल हे काळच सांगेल. मात्र उद्योजकांनी त्यांच्या परीने उत्तरे शोधण्यास सुरवात केली असेल नव्हे त्यांना ती शोधावी लागतीलच.


मित्रवर्य दिलीप तिवारी यांनी यापूर्वीच्या पोस्टला प्रतिसाद म्हणून हाती घेत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. हा उपक्रम सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्वांना कोरोना पश्चात काळात आपली विश्वासार्हता वाढीसोबतच स्थिरतेचे दालन खुले करेल अशी अपेक्षा आहे.

भविष्यातील पत्रकारिता कशी असावी ? यावर प्रशिक्षणाविषयी प्राथमिक काम करण्याविषयी माहिती संचालक (माजी) श्रद्धा बेलसरे, अभय कुळकर्णी या तज्ञांना प्रशिक्षण विषयक तयारीची विनंती केली आहे. कोरोनाने आळशी पत्रकारितेच्या मर्यादा उघड्या पाडल्या आहेत. अर्धवट बातम्या / चोरलेल्या बातम्या / संदर्भहीन बातम्या / ठोकून दिलेल्या बातम्या / सरकारी बातम्या

ही वैगुण्ये समोर आली. शिवाय मोबाइल ॲप तंत्राविषयी पत्रकारांना फार काही माहिती नाही हे लक्षात आले आहे. प्रिंट, टीव्ही व ऑनलाईन मीडियापेक्षा सोशल जर्नालिझम वा सिटीजन जर्नालिझम अधिक जबाबदार होत आहे, हे ठळक झाले. भाषेची अशुद्धता प्रकर्षाने समोर आली. विषयांचे वैविध्य आणि त्याविषयी जुजबी माहिती नसणे असे अनुभव समोर आले. याचा विचार करुन पत्रकारितेच्या प्रशिक्षणात अनेक नवे विषय घेऊन आम्ही समोर येणार आहोत.

काळाची गरज ओळखून सर्वच क्षेत्रात अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज नक्कीच भासणार आहे. एका बाजूला अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींना व दुसऱ्या बाजूला उदरनिर्वाहासाठी कार्यरत असलेल्यांना हि संधी असणार आहे. 

Wednesday 29 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग ११

आपला प्रतिसाद लाखमोलाचा...!



समर्थ भारताच्या उभारणीसाठी... लेखमालेतील ठरल्याप्रमाणे पुढचा भाग लिहिण्यापूर्वी सर्वसमावेशकता यावी यासाठी मागील दहा लेखांवर आलेल्या प्रतिक्रिया खास आपल्यासाठी देत आहे. एक विषय घेऊन त्यावर वाचन करुन, समस्येचे आपल्या परीने आकलन करुन हे लेख लिहिले आहे. विचार प्रक्रिया निरंतर चालत असते. त्यातून वैचारिक प्रगल्भता येत असते, यावर विश्वास असल्यामुळे सर्व विचार जाणून घेतो. आपली चूक असेल ती स्वीकारतो. लोकांना अपेक्षित लिहिले गेले तर समाधान वाटते इतकेच !  पुस्तक लिहिण्यापासून ते आमच्या मनातील लिहिले आहे इथवर प्रतिक्रिया आहेत. एक अगदी मानसिक फसवणूक अशीही प्रतिक्रिया आहे अर्थात कशी हे सहा दिवस झाले सांगितलेले नाही. सर्वच येथे देणे शक्य होणार नाही आणि ज्या दिल्या आहेत त्या त्यातील महत्वाचे मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचावे यासाठी...

- तुमची लेखमाला आवर्जून वाचतोय. फारच मुद्दे घेऊन लिहित आहात. १०० पानांचे पुस्तक होईल असे लिहा.

- नमस्कार, NGO Federation वर तुमचा सशक्त भारताच्या उभारणीविषयी कोरोनाच्या निमित्ताने लिहिलेले २ लेख वाचले. आम्ही मित्रमंडळी मिळून एक ऑनलाईन पोर्टल चालवतो. त्यात १ मे च्या कोरोना विशेषांकात ते लेख टाकायला आम्हांला आवडेल. तुमची ती सिरीज किती भागांची असेल? तो एक स्वतंत्र लेख होऊ शकतो का? तसे झाल्यास आम्ही तो आमच्या अंकात प्रकाशित करू शकतो का? कळवावे.

- Your blog is highly appreciated. I can imagine the  the effort in reading, understanding and analyzing the topic. Proud to have intelligent friend like you

- TIMELY. APT. DIRECTION GIVING.

- उद्बोधक, माहितीपूर्ण....

- समर्थ लेखणी. समर्थ इच्छा. देव करो आणि सार्वत्रिक सजगता येवो.

- शेती बद्दल जे लिहिलं आहेत, त्यावर स्वतंत्र लेख येऊ द्या ! सुरेख मुद्दा आहे तो.

- दुसरे म्हणजे लेखात जर 2/3 च गोष्टी highlight केल्यात तर उत्तम होईल. तुमच्याकडे सांगण्यासारखे पुष्कळ आहे, तुम्ही खूप छान बोलता.

- मुद्देसूद लेख. आपण अल्पभूधारक शेतकरी,शेतमजूर यांच्याही प्रश्न व इतर येणाऱ्या अडचणी चांगल्या प्रकारे मांडल्या.

 - सर्व काही बदलू शकतं, पण शेतकऱ्यांच्या मानसिकतेचे काय? ती कोरोना बदलवू शकेल ?

- समस्या काय आहेत व काय होण्याची शक्यता आहे हे बहुसंख्यांना माहित असतं. जनसामान्यांना रस असतो तो उपाययोजनांमध्ये.  पुढील लेखांमध्ये अशा योजना तपशिलवार मांडल्या जातील याबद्दल खात्री आहे.

- माणसाने आशावादी असावं, पण लेखातील आशावाद मला आदर्शवादाकडे झुकलेला दिसतो आहे. माणसाचा स्वभाव बदलत नसतो. बदलत असतो तो दृष्टिकोन. सतत मृत्यू होत असूनही लोक बिनदिक्कत नियम मोडत आहेत. कोरोना युगानंतर आश्चर्यकारक बदल होतील की नाही याचं उत्तर मानवीय प्रवृत्ती आणि काळच देईल.

- माणसाने नकारात्मक असू नये. पण त्याने वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून दिवास्वप्ने बघण्यास सुरवात केली की त्याचा चिन्यांना भाईभाई म्हणत  कवटाळून निरपराध भारतीयांना युद्धाच्या खाईत लोटणारा नेहरू होतो. राष्ट्रीय एकात्मतेचे गोडवे गाणाऱ्यांनी सोशल मीडियावर 'एकदा परप्रांतीय त्यांच्या गावी परतले की मराठी तरुणांनी त्यांची जागा घ्यावी' असे अत्यंत हास्यास्पद मॅसेजेस पसरवण्यास सुरवात केली आहे याला काय म्हणायचं?

- काही गोष्टी माझ्या दृष्टितून

१) करोना पश्चात म्हणजे नेमके कधी - केवळ निर्बंध हटले म्हणजे करोना संपला असं होणार नाही. सर्व व्यवहार हे पुढील १-२ वर्ष सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच होतील व कदाचित तसेच अंगवळणीही पडतील.

२) हीच १-२ वर्षे ही  इतर देशांमधील काही कंपन्या त्यांची चीन मधील गुंतवणुक काढून नवीन पर्यायाच्या शोधात घालवतील

३) भारत देश हा एक सक्षम पर्याय म्हणून नक्कीच कसोटीला उतरेल कारण, उत्पादनासाठी आवश्यक वातावरणाची उपलब्धता म्हणजेच उत्पादनाला जसे हवे तसे थंड, उष्ण, समशीतोष्ण वातावरण. इन्फ्रास्ट्रक्चर ची म्हणजेच वीज, पाणी, वाहतुकीची उपलब्धता, तरुण, सुशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सहिष्णुता.

४) या परिस्थितील संधी व आव्हाने -
नवनवीन रोजगाराच्या / व्यवसायाच्या भरपूर संधी उपलब्ध होतील परंतु त्यासाठी आवश्यक कौशल्ये आपल्या जवळ असतीलच असे नाही. यासाठी मंत्र Learn, Unlearn and Relearn. म्हणजेच शिका व काम करा त्या कौशल्याची गरज संपली की विसरून जा, म्हणजेच मला हे येतं मी हेच / एवढंच करीन असा विचार करू नका, समोर आलेल्या नवीन संधीचे स्वागत करा, परत शिका. एकाच कौशल्यावर नोकरी / व्यवसाय करायचे दिवस नाहीत. व्यवसायात दीर्घकालीन गुंतवणुकी टाळा प्रोजेक्ट पुरतीच गुंतवणुक करा.

५) तसेच उद्योजकांच्या गरजेनुसार छोटे छोटे ट्रेनिंग कोर्सेस  (Theory, Practical and online) घेऊन मनुष्यबळ पुरवण्याच्या संधी उपलब्ध होतील.

- गिरिषभाऊ, लेख वाचला, विषयाची मांडणी चांगली आणि भविष्यकालीन उपयोगी.

- गिरीश जी, यापुढील ब्लॉगमध्ये अध्यात्मिक सूत्रांची आणखी विस्तृत मांडणी करणे अपेक्षित आहे.

तसे जर आपण सुक्ष्म निरीक्षण केले तर लक्षात येते की अलीकडे बरेच लाईफ कोच आता पाश्चात्यांच्या थेअरी सोबत अध्यात्मिक सूत्रात दिलेले सिध्दांत शिकवत आहेत. हा एक मोठा आणि चांगला बदल अलीकडे झाला आहे. लाईफ कोचिंग मधे हा एक चांगला बदल होत आहे. वानगी दाखल सांगायचे तर स्नेह देसाई, सोनू शर्मा, डॉ.विवेक बिंद्रा असे अनेक कोच आज सेमिनार मधून अध्यात्मिक सूत्रे सांगत आहेत.भगवद्गीतेवर बोलत आहेत. हे खूप चांगले घडत आहे. कालाय तस्मै नमः | पुनश्च आपले अभिनंदन !

-  आरोग्य सेवेकडून लोकांचे लचके आजही तोडले जात आहेत. भविष्यात हे प्रमाण खुप वाढेल आणि या अमर्याद गळचेपीला संरक्षणाचे कवच पाहिजे. बुद्धी प्रामाण्यवादी माणसं स्मितहास्य करुन लोकांना वेठीला धरणार, यावर विचार गांभिर्याने होणे गरजेचे. जेनेरिक मेडिसिन्स डॉक्टर घेऊ नका म्हणतात. सध्या घसा खवखवणाऱ्या ३ गोळ्यांची किंमत २५०रु. आहे. भिती पोटी लोक खरेदी करतात. सर्वात मोठे क्राईम औषधी क्षेत्र आहे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग फक्त शोषणासाठीच होणार हे जनतेने गृहित धरावे का ? हे अनुत्तरित कोडे आहे. भ्रष्टाचाराचा महामेरु म्हणजे हे औषधी क्षेत्र आहे.

- सकारात्मक विचार , समाजात नैतिक मूल्यांबद्दल एकेकाळी असलेली आदराची भावना पुनर्स्थापित स्थापित झाली पाहिजे. सर्वसामान्य माणसाला दैनंंदिन जीवनात आचरता येईल असा कृतिशील कार्यक्रम पाहिजे. अलिकडील उदाहरण म्हणून आचार्य विनोबा भावे यांनी यशस्वी करून दाखविलेला भूदान यज्ञ  सांगता येईल .

- सुंदर लिखाण. सध्याच्या कोरोनामय वातावरणाचा ज्यांच्यावर निगेटिव्ह परिणाम झालेला आहे.  अशांसाठी तुझे लिखाण संजीवनी ठरेल यात शंका नाही.

लॉक डाऊन सुरू झाल्यापासून बँकेच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकार्‍यांचा एक ग्रुप तयार करण्यात आला असून सदर ग्रुप वर प्रत्येक जण आपापली मते व्यक्त करीत असतो. COVID - 19 चा बँकिंग व्यवस्थेवर होणारा अल्प, मध्यम व दीर्घ कालीन परिणाम असा विषय चर्चेला होता. चांगले विचार मंथन या विषयाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी केले व विस्तृत विश्लेषण तज्ज्ञांच्या माध्यमातून करण्यात आले. तुझा आजचा लेख त्या सर्व अंगांना स्पर्श करणारा असा आहे.

इतर देशांच्या तुलनेत भारताने योग्य वेळी उचललेली प्रतिबंधात्मक पाऊले व उपाय योजना बघता कोविडवर नियंत्रण मिळवण्यात चांगले यश आले आहे. १३० करोड लोकसंख्येचा आपला देश आपल्या कडील रूग्णांची संख्या अजूनही काही हजारांवर आहे हे आपले यशच आहे. कोविडचा बॅंकेवर परीणाम सहा महिन्यापर्यंत जाणवु शकतो त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा भरारी घेईल यात शंका नाही.
छोटे व्यावसायिकांच्या माध्यमातून कर्जवाढीसाठी संधी आहेत परंतु त्यात जोखीम घ्यावी लागेल. तसेच नविन कर्ज वाढीसाठी कर्जाची परतफेडी करिता अवकाश कालावधी कमीत कमी ३ महिने दिल्याने व्यवसायांना सुधारणे साठी पुरेसा कालावधी मिळाला आहे. आपल्यासाठी चिंतनाचा विषय थकबाकी व एनपीए असुन त्यामधे वाढ होऊ शकते किंबहुना विलफुल डिफॉल्टर सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात त्यासाठी उपाययोजना करावी लागेल. हायपो व कॅश क्रेडिट कर्जांना अधिक क्लोज मॉनिटर करावे लागेल.

मुदत ठेवीच्या बाबतीत आपल्या शाखेचा कस्टमर बेस कसा आहे यावर वाढ किंवा घट अवलंबून आहे . मुळात सध्याच्या परिस्थितीचा धडा घेऊन आणीबाणीच्याप्रसंगी सहज उपलब्ध होऊ शकेल अशा बचतीकडे लोकांचा कल राहील त्यासाठी मुदत ठेवीच्या चांगल्या नवीन योजना आणल्यास ठेवींमध्ये वाढ होऊ शकते. बॅंकेचे सध्याचे असलेल्या कर्जदार व ठेवीदार यांच्याशी सतत संपर्कात राहून व्यवसाय टिकवण्यासाठी त्यांना आवश्यक ती आर्थिक मदत केल्यास व्यवसायात निश्चितच वाढ करता येईल. कोविडचा आपल्यावर काय परिणाम होईल याची प्रचिती लॉकडाउन उठवल्यानंतर काही दिवसांनंतर दिसून येईल. आपण येणाऱ्या परिस्थितीस कसे सामोरे जातो यावर ते अवलंबून असणार आहे. भारत जगातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असुन संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत आहे.  या आर्थिक वर्षात आपल्या व्यवसाय वाढीची गती कमी होईल असे वाटत असले तरी येणाऱ्या परिस्थितीस  सकारात्मक दृष्टीने सामोरे गेल्यास चांगले परिणाम दिसून येऊ शकतात.

- खूपच प्रेरणादायी... अर्थात लिहीलेल्या सर्व गोष्टी यशस्वी होण्यासाठी कुठल्याही काळात महत्वाच्याच आहेत. पण कोरोना पश्चात त्या अधिक पणाला लागतील हे मात्र खरं. परिस्थितीचे एक उत्तम विश्लेषण.

- विचार चांगले आहेत. खालील मुद्दे अंतर्भूत करून त्यावर साधक बाधक चर्चा / विचार मंथन करावे
१ ) प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असते, तसेच प्रत्येकाची शक्तीस्थळे व मर्यादा वेगवेगळ्या असतात. त्यांचा समन्वय साधला पाहिजे .
२ ) वरील मुद्दे संस्थानाही लागू आहेत .
३ ) पैशांचे सोंग आणता येत नाही, म्हणून एका कमीत कमी उत्पनाची व्यवहार्य योजना हवी .
४ ) योजना लवचिक हवी .
५ ) नेतृत्वगुण अंगी असणाऱ्या लोकांना संधी द्यावी .
६ ) कुठल्याही परिस्थितीत संधी असते, ती शोधावी व संधीचा उपयोग करावा .

- सर खुप छान मुद्दे आपण उपस्थित केले आहेत. यावर विचार आताच करणे भाग आहे.

- थोडी आवडणार नाही अशी माझी पहिली प्रतिक्रिया आहे. मला तिच्यासाठी माफ कराल. सर, आपण १०० जणांना टॅग केले आहे. ते वाचतील हे खरे पण त्याचा कोणता productive उपयोग होणार ? मी साशंक आहे. केवळ दहा टक्के लोकांची तुम्ही टीम केलीत आणि काही tasks दिलेत तर ते लेखमालेस सार्थकी करणे.

- तुमचे विचार चांगले आहेत, जे विचारवंत आहेत त्यांनी मते दिलीच आहेत फक्त त्याचा वापर चांगल्या रीतीने झाला पाहिजे. एकच एकत्र व्हा. संघटित व्हा.

- माझे विचार

१) खेडयाकडे चला हे इतके दिवस कोणाला  सांगूनही पटले नव्हते पण आता मात्र लोकांनी याचा विचार करायला नक्कीच सुरवात केली असेल. अजून विचारात तेवढे गांभीर्य नसेल पण एक पर्याय म्हणून नक्कीच याचा विचार होईल

२) शहरात रहाणे म्हणजे प्रगती आणि गावात रहाणे हा मागासलेपणा हा विचार नक्कीच मागे पडायला सुरुवात होईल.

३) सरकारही लोकसंख्या विकेंद्रीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात उद्योगांना मोठया सवलती जाहीर करेल  त्यामुळे सध्याच्या उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये फक्त काही मोठे उद्योग ग्रामीण भागाकडे वळतील.

४) ग्रामीण भाग बेसिक सोयी सुविधा जसे पाणी, गटार सांडपाणी व वीज यांनी युक्त झाल्याने ग्रामीण भागात रहाणाऱ्या व ग्रामीण भागाकडे वळलेल्या लोकांमधे शहरात जाऊन २-३ दिवस मजा करून परत येण्याचा कल दिसून येईल

५) या सगळ्या गोष्टींचे प्रमाण हे कमी असेल तरीही ग्रामीण भागाच्या समावून घेण्याच्या क्षमतेच्या तुलनेत पुरेसे असेल

६) या सर्वाचा एकत्रित परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यात होईल व ही आर्थिक चालना नवीन लोकांना ग्रामीण भागाकडे खेचून आणण्याची सायकल सुरू करेल

- थोडी आवडणार नाही अशी माझी प्रतिक्रिया आहे.

मला तिच्यासाठी माफ कराल.
सर, आपण १०० जणांना टॅग केले आहे.
ते वाचतील हे खरे पण त्याचा कोणता productive उपयोग होणार ? मी साशंक आहे.
केवळ दहा टक्के लोकांची तुम्ही टीम केलीत आणि काही tasks दिलेत तर ते लेखमालेस सार्थकी करणे.

यासर्व प्रतिक्रियांशिवाय एक प्रतिक्रिया वेगळीच आहे. अर्थात संबंधितांनी गेले सहा दिवस त्याचे उत्तर मागून दिले नाही. लेख लिहिण्यापूर्वी त्यांना फोन केला तेव्हा मला पुन्हा लेख पाठवा मी उत्तर देईन असे म्हणालेत...

- कृपया काहीतरी अधांतरी बोलू नये व इतरांची मानसिक फसवणूक करु नये. मी गेल्या ६/७ पिढ्यांपासून शेतकरी कुटुंबातील आणि बीझनेस कुटुंबातील आहे.  मला जास्त भाष्य करावयाचे नाही म्हणून येथेच थांबत आहे, अंन्यथा प्रत्यक्ष भेटून बरेच मुद्दे‌ मांडता व खोडता येतील.


हि लेखमाला समृद्ध करणाऱ्या सर्व महानुभावांचे मनापासून धन्यवाद ! आपल्या प्रतिसादाने मला वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले.  लेखनाला एक दिशाही मिळायची. हा विषय अधिक समृद्ध व्हावा यातून किमान आशा फौंडेशनच्या पुढील कार्याची दिशा ठरविण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. आशा सारख्या अनेक संस्था आपल्या अस्तित्वाची लढण्यासाठी सिद्ध आहे.  आपल्या सर्वांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आपणही व्यक्त व्हावे हि अपेक्षा व्यक्त करतो.

Monday 27 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग १०

उठा, जागे व्हा... कारक बना !


अनपेक्षितपणे आलेल्या महामारीच्या संकटाला सामोरे जात असतांना जीवनाच्या विविध क्षेत्रांवर पडणारा प्रभाव माणसाला विचार करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. माझ्या सारख्या अनेक संवेदशील माणसांना पुढे काय ? हि चिंता सतावतेय. आपण सर्वच या परिस्थितीकडे सकारात्मकतेने पाहण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या लेखमालेवर प्रतिक्रिया देतांना बहुतेकांचे म्हणणे आहे तुम्ही सांगता आहेत त्या समस्या व आव्हाने आम्हास माहिती आहेत. याला पर्याय काय ?  उपाय काय ? मागील ९ लेख लिहित असतांना समस्येची गंभीरता लक्षात येते आहे. मात्र त्या समस्येवरील उपायांचा विचार करतांना मती कुंठित होते. विचारांमधील मर्यादा लक्षात येते. आपण हरलो, कसं होणार असे नकारात्मक असले तरी प्रश्न पडतात आणि त्यात काही वावगे आहे असे मला वाटत नाही. समर्थ भारताच्या उभारणीचा विचार करतांना महासत्ता अशा अर्थाने म्हणायचे नाही तर आपल्यासह प्रत्येक भारतीयांच्या समस्यांना योग्य पर्याय निर्माण करणे असा आहे. अर्थात ते झाले म्हणजे आपण महासत्ता होऊच ना !



मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंत व्यक्तींबद्दल फारशी काळजी नाही मात्र खेड्यात राहणारा भारत अर्थात अल्पभूधारक, शेतमजूर, उद्योग क्षेत्रातील असंघटित कामगार, हातावर पोट असणाऱ्यांचे काय ? कोटीत असणारी हि संख्या ! आर्थिक परिणामांचा सर्वात जास्त फटका आर्थिकदृष्ट्या वंचित घटकाला सर्वाधिक सहन करावा लागतो. सरकारच्यासुद्धा क्षमतांच्या पलीकडची हि समस्या आहे. जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा कशा भागणार ? एके ठिकाणी तर 'जेवण' मिळण्यासाठी काही काळानंतर मारामाऱ्या, दंगली होतील अशी रास्त भीती व्यक्त केली आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतील. आर्थिक व जीवनविषयक असुरक्षिततेमुळे मानसिक ताणांचे प्रमाण वाढेल. गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनात वाढ होईल नव्हे लॉक डाऊनच्या या काळात चाइल्डलाइन व राष्ट्रीय महिला आयोगाच्या आकडेवारीवरून ते लक्षात येईल. या सर्वांचा परिणाम म्हणून कुटुंबातील कर्त्या पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याचा सर्वात मोठा धोका आहे. सामान्य स्थितीतील २० ते ४५ वयोगटातील पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण, अस्थिर व असुरक्षित वातावरणात वाढतील हे सांगण्यासाठी ज्योतिषाची आवश्यकता नाही. मानसिक ताण-तणावांमुळे कार्यालयातील अनुपस्थितीचे प्रमाण वाढण्याचा व भावनिकदृष्ट्या बर्नआउट होण्याचे प्रमाण वाढेल असे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे.


"कोरोना" महामारीच्या संकटानंतर मानसिक आरोग्याचे संकट महाभयानक असेल. माणूस समाजप्रिय प्राणी असून त्याला जगण्यासाठी संवादाची आवश्यकता असते. कुटुंब, मित्र व सहकारी यांच्यापासून अलिप्त राहणे बहुतेक लोकांसाठी त्रासदायक असू शकते. यामुळे अल्प किंवा दीर्घकालीन मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. समाजापासून विभक्त ठेवल्यामुळे चिंता, आक्रमकता, नैराश्य, विस्मृती आणि भ्रमांच्या पातळीत वाढ झाल्याचे परिणाम दिसून येतात. अतिसंवेदशील माणसाला या परिस्थितीचा त्रास होतो. वैयक्तिक संबंध माणसाला तणावाचा सामना करण्यास मदत करतात. काही दिवस अलिप्तपणामुळे चिंता आणि नैराश्याच्या पातळीत वाढ होऊ शकते. त्यामध्ये माध्यमांद्वारे वारंवार या भयानक आजाराची चर्चा पाहून भावनिक व मानसिक बदल दिसतो. लॉक डाऊनमध्ये माणसे आळशी  होण्याचा तसेच वजन वाढणे सारख्या समस्या वाढतील, असा अंदाज आहे.

मित्रहो, मला स्वतःला सद्यस्थितीचा असा अंदाज नव्हता. सामान्यपणे आपण जिथे राहतो तेथील आर्थिक, सामाजिक, मानसिक व भावनिक स्थितीवरुन आपण विचार करतो. मात्र आपण एक देश म्हणून जरा व्यापक दृष्टीने या समस्येकडे पाहिले तर आपल्याला तिच्या तीव्रतेची कल्पना येईल. यासाठीच आपण सर्वांनी जागे होण्याची गरज आहे. केवळ आपलेच जीवन महत्वाचे नसून आपल्या सोबतच्या प्रत्येकाचा विचार करावा लागेल. या नकारात्मक परिणामांसोबत काही चांगल्या गोष्टीही घडत आहेत आणि त्या वाढविणे जेणेकरुन उपाययोजना शोधणे शक्य होईल. सर्वात महत्वाचे माणसाला स्वच्छतेचे महत्व समजले. त्यामुळे प्रत्येक माणूस हा आरोग्याच्या बाबतीत जागा झाला आहे. राष्ट्र प्रमुखाच्या आव्हानाला प्रतिसाद देणे म्हणजे संकटाला अमोरी जातांना सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे, जे आपण अनुभवत आहोत. परोपकारी वृत्ती वाढीला लागतांना दिसत आहे. संवेदना वाढीस लागताना आपण भाग्यवान आहोत, अशा परिस्थितीत आपल्याकडे जगण्यासाठी किमान काही गोष्टी आहेत याचे समाधान वाटते आहे.

समुपदेशन व्यवस्था व सर्व सोबत असल्याची भावना आवश्यक

एका बाजूला महामारीला सामोरे जाण्यासाठी सर्व ती उपाययोजना करीत असतांना समाजाचे मानसिक स्वास्थ्य टिकविण्याचे सामूहिक प्रयत्न झाले पाहिजे. सर्वांसाठी समुपदेशनाचे व्यवस्था निर्माण केली पाहिजे. आत्ताच योग्य ती खबरदारी घेतल्यास लॉक डाऊनच्या नकारात्मक परिणामांची तीव्रता कमी करता येईल अन्यथा याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. मला माहिती आहे हे एकट्या सरकारचे वा संस्थेचे वा उद्योग-व्यापाऱ्याचे काम नाही हि आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठीच सर्वांना आवाहन करायचे आहे,

"साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा. मिकर बोझ उठाना"

त्यासाठी उठा, जागे व्हा.... आणि कारक बना ! आपल्याला ज्या काही समस्या दिसतील, समजतील, ज्यावर तुम्ही काही करु शकाल, त्यावर काम करा. हा हेतू ठेवून केलेली प्रत्येक कृती "कारक" ठरणार आहे. शेवटी पद्याच्या दोन ओळी...

भारताचिया महारथा या सारे मिळूनि ओढू या
हाती शक्ती, पायी गती आणि हृदयी प्रीती जोडू या ||

समर्थ भारताची कास धरणाऱ्या प्रत्येक भारतीयाला "हे" अशक्य नाही. मग लक्षात ठेवा... उठा, जागे व्हा... आणि कारक बना ! लेखमालेच्या या पुढील भागात आपण उपाययोजना आणि त्या अनुषंगाने काही उदाहरणे पाहणार आहोत. आपल्या आजूबाजूला समस्येवर मात करणाऱ्या काही गोष्टी घडल्या असतील किंवा आपल्याला काही उपाय सुचवायचे असतील, तर जरुर कळवा त्यांचा अंतर्भाव करता येईल.

(या लेखासाठी बिझिनेस स्टॅंडर्ड, द ट्रिब्यून, लाईव्ह मिंट, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आदी संस्थांच्या वेबसाइट्सचा संदर्भ म्हणून वापर केला आहे.)

Saturday 25 April 2020

अभिनीत संपादक म्हणून जबाबदारी

संपादकीय जबाबदारीची तिसरी इनिंग 


अभिनय मासिकाचे
मागील वर्षातील अंक 
मित्रहो, आपणास सांगतांना विशेष आनंद होतं आहे कि, नवीन आर्थिक वर्षांपासून आशा फौंडेशनच्यावतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या अभिनीत मासिकाचा संपादक म्हणून पुन्हा एकदा संपादक म्हणून जबाबदारी  १ एप्रिलपासून स्वीकारली असून एप्रिल - मे महिन्याचा जोड अंक वितरणासाठी तयार झाला आहे. आशा फौंडेशन या संस्थेच्या अस्तित्वाची लढाई सुरु असतांना संपूर्ण कुटुंबासाठी संग्राह्य मूल्य असलेले हे मासिक तयार करणे आनंददायी ठरले. जळगाव जनता बँकेच्या सेवेत असतांना "सेवा वार्ता" या अंतर्गत गृहपत्रिकेचा कार्यकारी संपादक, त्यानंतर अभिनीतच्या निर्मितीपासून पुढे १० वर्षे संपादक म्हणून जबाबदारी पूर्ण केली आहे. आता पुन्हा एकदा नव्याने आपल्या सर्वांच्या सहकार्याची व पाठबळाची आशा ठेवून हि जबाबदारी स्वीकारली आहे.



अभिनीत मासिकाचा पहिला अंक 
आईकडून लिखाणाचा व वडिलांकडून प्रामाणिकपणे कष्ट करण्याचा वसा मिळालेला आहे. त्यामुळेच संपादकीय जबाबदारीच्या या तिसऱ्या इनिंगमध्ये "अभिनीत" मासिक केवळ स्वबळावर चालेल असे नाही तर संस्थेच्या सामाजिक कामासाठी काही प्रमाणात निधी देईल असे काम करावयाचे आहे. महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत असतांना या क्षेत्राची विशेष आवड निर्माण झाली. जयहिंद महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाच्या विविध कार्यक्रमाचे वृत्त तयार करतांना त्याचा लाभ झाला. जळगाव जनता सहकारी बँकेत ९ वर्षे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करीत असतांना विविध प्रकारच्या माध्यमांशी नियमित संपर्क होता. स्व. डॉ. अविनाश आचार्य अर्थात दादांच्या नेतृत्वाखाली केशव स्मृती प्रतिष्ठानने जळगाव तरुण भारतची दूर सांभाळली आणि तेथेही मोठा काळ अनुभवसंपन्न ठरला. ज्येष्ठ संपादक स्व. मिलिंद गाडगीळ, मा. श्री. लक्ष्मणराव जोशी यांच्या कार्यकाळात विश्वस्ताच्या भूमिकेतून "संपादक" या पदाची जबाबदारी व कर्तव्ये समजली. जळगावच्या वर्तमानपत्र सृष्टीतील भीष्म पितामह स्व. विद्याधर पानट सरांचे पहिल्या अंकापासून मार्गदर्शन लाभले. आपला विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी आर्थिक नुकसानीचे गणित असले तरी आपण तरुण भारत चालविला पाहिजे असे स्व. दादांचे स्पष्ट मत होते. त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील विशेषांकाचे अतिथी संपादकत्व देऊन आदरणीय लक्ष्मणराव जोशींनी माझ्यावर अनंत उपकार केले आहे.

"संपादक" हि माझी नोकरी नसून नोकरीच्या कामाचा एक भाग आहे. या संपूर्ण काळात वाचकांना वैचारिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आणि त्याचे विशेष कौतुकही झाले आहे. मजकुरातील वैविध्य साध्य करण्यासाठी अधिकाधिक लोकांना लिहितं करण्याचा प्रयत्न केला. प्रेरणादायी जीवन जगणाऱ्या व्यक्तींना या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला. अंक प्रकाशित करतांना "कल्पकता" व "नियमितता" याला प्राधान्य दिले आणि त्यामुळेच आपल्या या जबाबदारीचे ओझे न वाटता त्याचा नेहमी आनंद घेऊ शकलो. समाज मनाचा कानोसा घेत त्यांनी वाचले पाहिजे असेच विषय, ते मांडणारे समर्थ लेखक यांचा हि कलाकृती निर्मिती करतांना सहभाग घेतला. त्या त्या वेळेची निर्मिती उच्च दर्जाची निघण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले त्यांच्याप्रती या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करणे माझे कर्तव्य समजतो.


सुरवातीच्या काळातील विशेषांक 
आशा फौंडेशनच्या कामाला सुरुवात केल्यानंतर वर्षभरात म्हणजे २००९च्या गुढीपाडव्याला "अभिनीत" मासिक सुरु केले. सामाजिक संस्थांना व्यावसायिक दराने वर्तमानपत्रातून जाहिरातीच्या माध्यमातून  प्रसिद्धी न परवडणारे आणि संस्थेचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत  पोहोचावे त्यातून संस्था आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे मासिक सुरु करण्यात आले. अर्थात स्थानिक सर्वच वर्तमानपत्रांनी आशा फौंडेशनच्या सर्वच कार्यक्रम व उपक्रमांना भरभरून प्रसिद्धी दिली आहे हे याठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो. माणूस घडविण्याचे व माणूस उभे करण्याचे काम करणाऱ्या संस्थेच्या मासिकाचे नावही त्याला न्याय देणारे असावे म्हणून "परिपूर्ण" असा अर्थ असलेले "अभिनीत" हे नाव ठरविले. तीन वर्षे केवळ खाजगी वितरणासाठी म्हणून चालविण्यात येणाऱ्या मासिकाला नंतर सरकार दरबारी नोंदणी करुन राजमान्यताही मिळविली. आशा फौंडेशन परिवारातील ५ हजार वाचकसंख्या असलेल्या या मासिकाचा खप एक लाखापर्यंत नेण्याची मनापासून इच्छा आहे. आपण सर्वांनी त्यासाठी साहाय्यभूत व्हावे अशी अपेक्षा आहे. लोक डाऊनच्या या काळात अंकाची छपाई करणार नसून तो इ-स्वरुपात वर्गणीदारांसह जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असणार आहे. ज्यांना हा अंक हवा असेल त्यांनी वैयक्तिक माझ्या ९८२३३३४०८४ या व्हाट्सअप क्रमांकावर किंवा girish1811@gmail.com या आपल्या नावासह इमेलवर कळवावे. सोमवारपासून २४ तासाच्या आत अंक आपल्याला मिळालेला असेल.



चार रंगातील विशेषांक 
वर्षभरात या मासिकाचे १० अंक प्रकाशित केले जातात. वर्धापन व दिवाळी हे दोन अंक जोड अंक स्वरुपाचे असतात. विविध विचारसरणींवर चालणाऱ्या संघटनांचे समाजातील महत्व अधोरेखित करणाऱ्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी त्या त्या विचारसणीच्या प्रमुखांना एकाच व्यासपीठावर आणले. तसेच जळगाव शहरातील सर्व वर्तमानपत्रांच्या संपादकांवर "संपादक : एक माणूस" असा विषय घेऊन काढलेला दिवाळी अंक व त्यांना एकाच व्यासपीठावर या माध्यमातून आणू शकलो. विद्यार्थ्यांच्या साहित्यावर आधारित दिवाळी अंक, शैक्षणिक परिषदांच्या निमित्ताने अध्ययन अक्षमता समजून घेतांना, आनंददायी शिक्षण, इमॅजिन इंडिया  यासारख्या अनेक चांगल्या अंकांची निर्मिती करु शकलो. आशाच्या कार्याचा वाढता व्याप लक्षात घेऊन व अंकाची मांडणी अधिकाधिक कुटुंबाभिमुख व व्यावसायिक पद्धतीने करावी या उद्देशाने मागील वर्षभर मुंबई येथील डॉ. सरिता भावे यांनी या मासिकाच्या संपादिका म्हणून जबाबदारी  सेवाभावाने स्वीकारली. दर महिन्याच्या २५ तारखेला ठरल्याप्रमाणे अंक प्रकाशित केला. (मला ते कधीही जमले नाही)  त्यासाठी योग्य नियोजन, पाठपुरावा कसा करावा याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आणि त्याचा मला अभिमान वाटला. मासिकाची योग्य घडी बसवून त्यांनी वैयक्तिक कारणासाठी ३१ मार्चपासून हे काम थांबवले आहे. आशा फौंडेशनचा कार्यकारी संचालक नात्याने व व्यक्तिश: त्यांचे सहकार्याबद्दल ऋण व्यक्त करतो.

"संपादक" या भूमिकेने अनेक चांगल्या, मोठ्या व प्रतिष्ठित माणसांशी संपर्क आला. स्थानिक विविध वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे संपादक, संपादकीय व इतर सहकारी मित्र म्हणून लाभले. त्यांच्या सहवासातून खूप काही शिकता आले आणि संपादक पदाची जबाबदारी पार पडत आली. आगामी काळात हे कार्य अधिक गांभीर्याने, जबाबदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. आपण सर्व सोबत राहाल या अपेक्षेसह थांबतो.... धन्यवाद !

Friday 24 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग ९

भारतीयांच्या सकारात्मक मानसिक बदलाची नांदी


मित्रहो, आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद देत असतांनाच आपणास पुन्हा एकदा सांगायचे आहे, या लेखांमधून जे काही मांडत आहे, ते विचार आहेत. या सर्व विषयांचा मी तज्ज्ञ नाही. मात्र जे काही मांडत आहे त्यामागे काही विचार प्रक्रिया आहे. अनेक संदर्भ अभ्यासून माझ्या बौद्धिक  क्षमतेनुसार विषयाचे आकलन करुन ते आपल्या समोर मांडत आहे. आशा फौंडेशनच्या भविष्यकालीन वाटचालीचा विचार करीत असतांना मनात आलेले काही प्रश्न आणि त्याचे उत्तर शोधण्यासाठीचा विचार लेखांमध्ये मांडत आहे. आपल्या प्रतिक्रियारुपी सूचना, मते यांचे स्वागत आहे.

सध्याच्या लॉक डाऊनच्या पश्चात मानवी वर्तनाचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडून येतील असे प्रामाणिकपणे वाटते व तशी अपेक्षा आहेच. परिस्थितीशी जुळवून घेत असतांना अनेकांना अडचणी येऊ शकतील त्यान्चेशी बोलून, मोकळा संवाद साधून त्या सोडविल्या गेल्या पाहिजेत. त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची व समुपदेशनाची गरज आहे. अन्यथा ही मंडळी नकारात्मकतेकडे किंवा वैफल्यग्रस्त अवस्थेकडे जाण्याची शक्यता आहे. प्रत्येकाला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.


भारतीयांच्या मानसिकतेत घडून येणारा महत्वाचा मानसिक बदल म्हणजे आपण आपल्याच तत्वांना बाजूला सारुन पाश्चात्यांच्या ज्या गोष्टींचे अंधानुकरण करीत होतो ते थांबेल. आपल्या भारतीय संस्कृतीत व तत्वज्ञानात सांगितलेले शाश्वत विचारांना स्वीकृती मिळेल, त्याचे अनुकरण केले जाईल. साधारणपणे भारतीयांना अन्य देशांचे विशेष आकर्षण राहिले आहे. अलीकडे त्याचे प्रमाण खूपच वाढलेले होते. त्याबाबत सर्वचजण योग्य विचार करतील. ९० च्या दशकापासून भारतीयांच्या मानसिकतेत खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पना, स्वार्थी व भोगवादी  वृत्तीचा अतिरेकी वापर, माणसापेक्षा पैशाला दिलेले अवास्तव महत्व, स्पर्धेच्या नावाखाली केलेली तत्वांशी तडजोड, नैसर्गिक जीवनशैलीशी केलेली फारकत, आहार विहाराच्या बदललेल्या संकल्पना यातून आजचा समाज व त्यातील माणसाची मानसिकता तयार झाली आहे. लॉक डाऊनने या सर्व गोष्टींचा फोलपणा सिद्ध केला आहे. अर्थात त्यासाठी आवश्यक असलेली डोळस वृत्ती व विवेकी विचार मानवाच्या ठायी असावा लागेल. आर्थिक उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण यांचे हे दुष्परिणाम म्हणता येईल. या गोष्टींचा अंगीकार करीत असतांना "वसुधैव कुटुंबकम", "जोडोनिया धन उत्तम वेव्हारे...", "असाध्य ते साध्य करीत सायास...", "निर्माणों के पावन युग में..."   यासारख्या भारतीय तत्वज्ञानाला सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याचाही हा परिणाम म्हणता येईल. तत्व आणि व्यवहार यांच्यात योग्य सांगड न घातल्याने या गोष्टी घडल्या असे नक्की म्हणता येईल.

लॉक डाऊनच्या या काळात खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावणाऱ्या लोकांना अंतर्मुख होण्याची संधी मिळाली आहे. जीवनाचा उद्देश काय ? सुख म्हणजे काय ? यश म्हणजे काय ? पैसा किती ? कसा ? कशासाठी ? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या काळाचा नक्कीच उपयोग झाला असेल. त्याची योग्य उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांना ती सापडली असतील आणि म्हणूनच सकारात्मक बदल घडेल असे म्हणण्याचे धारिष्ट्य दाखविले आहे. जीवनात किती गोष्टी निरर्थक करीत होतो आणि ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्याकडे कसे दुर्लक्ष होत होते ते पण नक्कीच लक्षात आले असेल. आपणच आपल्या गरजा किती अमर्यादपणे वाढवून ठेवल्या होत्या आणि त्या मिळविण्यासाठी आपले जीवनच पणाला लावले होते. कोणे एकेकाळी आहे त्यात समाधान मानणारे व त्यातूनही इतरांचा विचार करणारी भारतीयांची वृत्ती कुठेतरी हरविली होती याची नक्कीच जाणीव झाली असेल. जीवनात काही गोष्टी बदल म्हणून अपवादात्मक स्थितीत कराव्या लागतात मात्र अपवाद हाच जेव्हा नियम होतो त्यावेळेस आजची परिस्थिती निर्माण होते. खरेदी आणि शॉपिंग यामधील मानसिकतेचा बदल कळून आला असेल. काटकसर आणि कंजूषपणा यातील फरकही समाजाला असेल.


यासर्व गोष्टींचा विचार करता मानवाच्या वर्तनात सकारात्मक बदल घडेल असे मला ठामपणे वाटते. "कोरोना" पश्चात माणसाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झालेला दिसेल असे वाटते. आरोग्याला विशेष महत्व येईल त्यामुळे आहार, विहार आणि व्यायाम यावर माणूस स्वतःच बंधने घालून घेईल अशी अपेक्षा आहे. मर्यादित साधनांमध्ये आनंदी जीवन जगता येते ही सांगणारी भारतीय संस्कृतीचा अंगीकार केला जाईल अशी अपेक्षा आहे. निसर्गानुकूल जीवनशैलीचा स्वीकार केला जाईल. चाळीशीच्या पुढच्या मंडळींना तसे हे सोपे जाईल कारण त्यांनी जीवनातील असा कल अनुभवाला आहे,  त्यातही प्रवाहपतीत झालेल्यांना थोडे कठीण जाईल. अर्थात ही एकच बाजू आहे. तिशीच्या आत असलेल्यांना याची जाणीव करुन द्यावी लागेल. त्यांच्या हे सर्व पचनी पडणे कठीण आहे मात्र अशक्य नाही. भारतीय अध्यात्मात याची ताकद आहे, ती सांगणारी अनेक कृतिशील मंडळी समाजात आहेत आणि अलीकडच्या पिढीचे ते आदर्श आहेत.

लेखाची मर्यादा लक्षात घेऊन केवळ विचार आपल्यासमोर ठेवला आहे. हा विचार आला त्याची अनेक उदाहरणे देता येतील तो मोह टाळला आहे. थोडक्यात भगवान श्रीकृष्णांनी म्हटल्याप्रमाणे

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते।
सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥

याचा अर्थ माणूस वस्तूंच्या बाबतीत विचार करीत राहिला कि त्याबद्दल प्रेम निर्माण होते. त्यामुळे त्या वस्तूबद्दल त्यांच्या मनात इच्छा निर्माण होते आणि वासनेतून राग उत्पन्न होतो. त्याच्या पुढच्या श्लोकात भगवान म्हणतात

क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥

याचा अर्थ रागामुळे माणसाची मेंदू भ्रष्ट होतो आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. स्मृतिभ्रंश झाला कि माणसाची बुद्धी नष्ट होतो आणि बुद्धी नष्ट झाली तर माणूस स्वतःचाच नाश करतो.

भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलेले आज आपण अनुभवत आहोत. आपण सर्व सुज्ञ वाचक आहात. आपण माझ्याशी सहमत व्हाल याची खात्री आहे. "कोरोना" पश्चात माणसाच्या वर्तनात वाटणारा बदल लेखाच्या पुढच्या भागात वाचण्यास विसरु नका.

Thursday 23 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग ८

मला बाहेर पडायची भीती वाटते !


आपल्या लेखमालेचाच भाग असलेल्या मात्र अंतिम टप्प्यात ज्या विषयावर लिहिणार होतो तो अगोदर लिहावा लागतोय. त्याला कारणही तसेच झाले. सध्या रोज ५-६ परिचितांना आवर्जून फोन लावून बोलत असतो. त्यातील बहुतांश लोकांच्या मनात एक अनामिक भीती आहे आणि ते ती बोलून दाखवतात ती म्हणजे "मला बाहेर पडायची भीती वाटते !" लॉक डाऊनमुळे माणसाला अनेक गोष्टी अशा कराव्या लागत आहे ज्याची त्याला कधी सवय नव्हती किंवा ज्याची कल्पनाही केली नव्हती. या सर्व गोष्टींचा प्रत्येक माणसावर शारीरिक, मानसिक व भावनिक परिणाम होत आहे. याच क्षेत्रात काम करीत असल्याने त्याची गरज लक्षात घेऊन पहिल्याच टप्प्यात त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी "आशा मदत गटाची" रचना समाजासाठी निर्माण केली. अशा मदत गटांची मदत घेण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक तयारी करण्याची आवश्यकता आहे. मोठ्या शहरांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेतला जातो.

सोशल मीडियाच्या माध्यमातून लॉक डाऊनच्या या काळात प्रत्येक घरात काय चालू असेल याची कल्पना येऊ शकेल. पहिल्या लॉक डाऊन नंतर अनेकांनी अनेक प्रकारे समाजाला जागृत करीत अनेक गोष्टी सुचविल्या, अनेक गोष्टी करून घेतल्या. आता या गोष्टीची सवय झाल्याने जो तो आपापल्या पद्धतीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. माणसाच्या मानसिक स्थितीचा विचार केल्यास त्याला बाहेर पडण्याची जी भीती वाटते आहे त्याची काही कारणे असावीत असे वाटते. (त्याने बाहेर पडणे अपेक्षित नाहीच आहे. मात्र अशा प्रकारची भीती निर्माण होणे मानसिक स्वास्थ्याच्यादृष्टीने घटक आहे.)  माणसे घरातच असल्याने बहुतांश वेळ टीव्ही पाहण्यात (विशेषतः बातम्या) वा मोबाईल वापरण्यात घालवला जात आहे. सर्वत्र केवळ आणि केवळ "कोरोना" या व्हायरसचीच चर्चा होते आहे. रुग्णांची वाढती संख्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकविणारी आहे. लॉक डाऊन अजून किती दिवस चालेल ? मला जर या व्हायरसची लागण झाली तर ? माझ्या नोकरी व्यवसायाचे काय होईल ? अन्य गावात काम करणाऱ्यांना तिथे जाता येईल का ? आर्थिक नियोजन कसे करावे ? मुलांच्या परीक्षांचे काय ? या सारखे अनेक प्रश्नांची योग्य उत्तरे न मिळाल्याने संभ्रम निर्माण होतो आणि भीती उत्पन्न होते.

ही जशी घरातल्या मंडळींची स्थिती आहे तशीच ती नोकरी - व्यवसायात असलेल्यांचीही आहे. विशेषतः डॉक्टर, परिचारिका, त्यांना साहाय्य करणारा कर्मचारी वर्ग, पोलीस अधिकारी कर्मचारी, बँकेत काम करणारे अधिकारी कर्मचारी, औषधी दुकानदार, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, स्वच्छता राखणारे सफाई सैनिक अर्थात अत्यावश्यक सेवा म्हणून घराबाहेर पडणाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची विवंचना वेगळी आहे. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टर व पोलिसांवर होणारे हल्ले, त्यांना संसर्ग होण्याचा असलेला सर्वात मोठा धोका याचाही परिणाम होतो. सर्वांच्याच दिनचर्येवर लोक डाऊनचा परिणाम झालेला आपण पाहू शकतो. त्यामुळे प्रत्येलकाला आपल्या जीवनावरील आपले नियंत्रण नाही असे वाटत राहते आणि त्यातूनच भीती निर्माण होते.


अशा प्रकारची भीती वाटणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचा वारंवार विचार केल्याने वाटणारी काळजीचे रूपांतर चिंतेत होते. आजूबाजूला घडणाऱ्या नकारात्मकतेतून अस्वस्थता वाढते. आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून माणूस उदासीनतेकडे (डिप्रेशन) वळण्याचा धोका असतो. यासर्व गोष्टींना सामोरे जाणयासाठी मनाची एक तयारी केली पाहिजे. विशेषतः वास्तव स्वीकारले पाहिजे आणि आपल्या जीवनात सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीला आपण जबाबदार नाही मात्र जी परिस्थिती आहे ती वास्तव आहे तिला आपल्याला जुळवून घेता आले पाहिजे. आपले मान प्रसन्न राहील, सकारात्मक राहील व यावर लवकरच मार्ग निघेल असा विश्वास ठेवला पाहिजे. संसर्ग झालेले अनेक रुग्ण बरे होऊन घराकडे परत जात आहेत आपण त्याच्या कडे लक्ष दिले पाहिजे. स्वतःला व्यस्त ठेवले पाहिजे. मनाला लागणारी शांती मिळण्यासाठी आपलाआपल्या सोईनुसार, श्रद्धेनुसार मार्ग अवलंबले पाहिजे. कुटुंबातील, परिसरातील, संपर्कातील सर्वांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे.


अनेक मंडळींनी आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केलेला आपल्या लक्षात येईल.काहीजण आपले छंद जोपासत आहेत तर काही जण आपले अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले घरातील, कार्यालयातील कामे आटोपत आहेत. चांगले वाचन, गाणे ऐकणे यासारख्या गोष्टींवरही भर दिला जात आहे. काही धार्मिक ग्रंथांचे वाचन व पारायणेही  होते आहेत. भविष्याचा अन्दाज घेत आपल्यलाला आवश्यक असलेली कौशल्ये विकास करण्याकडेही भर आहे. शरीर सुदृढ राहावे यासाठीही घरातली घरात प्रयत्न करणारे अनेकजण आहेत. ऑनलाईन प्रशिक्षण, व्याख्याने, वेबिनार्स यांचा लाभ घेणाऱ्याची संख्या लक्षणीय आहे. घराच्या कामात मदत करणे, घरगुती खेळ खेळणे, पाल्यांशी गप्पा मारणे यासारख्या गोष्टीही केल्या जात आहेत. गरीब, गरजू व निराधार मंडळींना मदत करण्याकडेही अनेकांचा कल आहे. आत्मविश्वासू माणूस इतरांनाही आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.

कोरोना पश्चात समर्थ भारताचा विचार करीत असतांना माणसाच्या वृत्तीवर व वर्तणुकीवर होणारा परिणाम समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आवश्यक असलेली पूर्वपीठिका या लेखात मांडणायचा प्रयत्न केला आहे. पुढच्या भागात माणसाच्या वागणुकीत होणारा बदल आणि त्यामुळे निर्माण होणारी संधी व आव्हाने यांचा आपण विचार करणार आहोत. आपल्यापैकी कोणालाही या संबंधाने काही मार्दर्शन हवे असल्यास आपण माझ्या वैयक्तिक मोबाईलवर संपर्क करावा ही विनंती..,,

Wednesday 22 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग ७

"कोरोना" पश्चात माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील संधी व आव्हाने


आपण कोरोना पश्चात सेवा क्षेत्रातील संधी व आव्हाने पाहात आहोत. वाचकांच्या प्रतिक्रिया व सूचना उत्साहवर्धक आहेत. काही सुहृदांनी मध्ये एक ब्रेक घ्यावा असे सुचविल्याने आणि अन्य महत्वाचे काम सुरु असल्याने मध्ये दोन दिवस लिहिले नाही. साधारणपणे विषयाची मांडणी करतांना विविध क्षेत्रातील सद्यस्थिती व लॉक डाऊन नंतर संभाव्य गोष्टींची, आव्हानांची चर्चा करीत आहोत. शक्य असल्यास सुचेल त्याप्रमाणे संधीही मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेकांनी उपाययोजनांवरही भर द्यावा असे आवाहन केले आहे. साधारणपणे शेवटच्या दोन लेखात ते करणारच आहोत आणि त्यावरच समारोपही ! 


आज आपण दृश्य स्वरुपात ज्या क्षेत्रावर मोठा परिणाम झालेला दिसत आहे ते म्हणजे माध्यम व मनोरंजन क्षेत्र. भारतीय अर्थव्यवस्थेत मीडिया व मनोरंजन क्षेत्र हे फार मोठे आशा स्थान होते. ग्राहकांची वाढती मागणी आणि जाहिरातीचे वाढते महसूल यामुळे हे क्षेत्र वाढीच्या उच्च टप्प्यावर होते. मागील दशकात या क्षेत्रातील डिजिटायझेशन व इंटरनेटच्या प्रभावी वापराने हा उद्योग वेगाने वाढत होता. बऱ्याच लोकांच्या मनोरंजनासाठी इंटरनेट हा मुख्य प्रवाहातील मीडिया बनला आहे. भारतीय जाहिरात बाजारपेठ ही चीननंतर आशिया खंडातील दुसरी वेगाने वाढणारी जाहिरात बाजारपेठ ठरत आहे.


माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व चित्रपट सृष्टीचा विचार करावा लागेल. सर्वात जास्त फायदा इलेक्ट्रॉनिक मीडियाला झाला आहे आणि तो स्वाभाविक आहे. कारण लॉक डाऊनच्या काळात घराबाहेर पडणे धोकादायक असल्याने वेळ घालविण्यासाठी साधन म्हणून त्याकडे पहिले जाते. यातही टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया यांचा समावेश आहे. सर्वात जास्त फटका फिल्म इंडस्ट्रीला व काही प्रमाणात मुद्रित माध्यमांनाही पडलेला दिसतो आहे. त्यातही व्यवसायाच्या उलाढालीवर त्यांचे अस्तित्व अवलंबून आहे. काही वर्तमानपत्रांची कार्यालये बंद करून वा कर्मचाऱ्यांचा पगार ५० टक्के देऊन खर्चाची जुळवणी करण्याचा प्रयत्न झाला आहे. या क्षेत्रातील सर्वांनाच तोशिष पोहोचली आहे  ती त्यांच्या जाहिरातीच्या उत्पन्नावर. वर्तमानपत्रांची विक्रीही होत नसल्याने त्याचाही परिणाम दिसतो आहे. लॉक डाऊन पश्चात स्थितीचा विचार करतांना तो किती काळ चालेल, पुन्हा येणार का ? या गोष्टींवर अवलंबून असेल. विविध राष्ट्रीय संस्थांच्या सर्वेक्षणातून फिल्म इंडस्ट्रीला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी अपार कष्ट व नाविन्यता तसेच अधिक काळ लागेल असे लक्षात येते. त्या मानाने सोशल व इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी हा काळ सुवर्ण काळ ठरत आहे. मुद्रित माध्यमाला सामान्य होण्यासाठी काही काळ लागेल मात्र विश्वासार्हता व तटस्थता या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे स्थिरस्थावर होण्याची आशा अधिक आहे. या सर्वच क्षेत्रात डिजिटलायझेशन स्वीकारणाऱ्यांना अधिकाधिक फायदा होईल असे दिसते आहे. 

लॉक डाऊनच्या काळात सर्वच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा एकत्रित वापर सुमारे ५० पटीने वाढला आहे. तसेच लोकांचा स्क्रीन टाइमही वाढलेला आहे. न्यूज ऍपचा वापर ५७ टक्क्यांनी वाढलेला आहे. विद्यार्थ्यांचे टीव्ही पाहण्याचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढलेले दिसते. गेमिंगसाठीचा वेळ ११ टक्क्यांनी वाढला असून चॅटिंगचा वापरही २५ टक्क्यांनी वाढलेला आहे. 

ही सर्व स्थिती पाहता प्रिंट माध्यमे व फिल्म इंडस्ट्रीला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामानाने इलेक्ट्रॉनिक मीडियाला फायदा होत असतांना तो टिकविण्यासाठीचे आव्हान आहेच. मीडिया व मनोरंजन क्षेत्राला डिजिटायजेशनचा स्वीकार करावा लागेल. त्याचप्रमाणे मजकूर देण्यासाठी हटके मार्ग निवडावे लागेल. ग्राहकांची बदलणारी अभिरुची लक्षात घेऊन त्याप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करावी लागेल. जाहिरातींसाठीही नवीन आयाम शोधावे लागतील. त्यासाठी आर्टिफिशल इंटीलिजन्स व मशीन लर्निंग सारख्या गोष्टींची मदत घ्यावी लागेल. त्यातून लोकांचा कल लक्षात येईल. माध्यमे व करमणूक हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्याने नक्कीच आशा आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमात अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होतील. आधुनिक काळाची तंत्रे शिकून  घेणाऱ्यांसाठी आगामी काळ नक्कीच अनुकूल आहे. 

Sunday 19 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग ६

"कोरोना" पश्चात परिस्थिती सेवा क्षेत्रातील संधी व आव्हाने

शेती क्षेत्रातील संधींबाबतच्या कालच्या लेखाच्या अनुषंगाने अनेकांनी आपली मते मांडतांना ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व खेड्याकडे चला हे अशक्य वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात यायला सुरवात होईल असे मत व्यक्त केले.  अर्थात त्यासाठी शासनाकडून ग्रामीण भागातील उद्योग उभारणीसाठी विशेष सहकार्य व प्रोत्साहन दिले गेलं पाहिजे असेही बोलून दाखविले. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मधील एकाने तर आपण या क्षेत्राकडे वळण्याचा गांभीर्याने विचार करतोय असेही बोलून दाखविले आपल्या गावाकडे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरु करण्याचे सांगितले. आजच्या भागात आपण सेवा क्षेत्रातील काही प्रमुख गोष्टींचा विचार करणार आहोत.


"कोरोनाचा" सर्वाधिक फटका आर्थिक क्षेत्राला आणि त्यातही सेवा क्षेत्राला बसणार आहे. सेवा क्षेत्रातही अधिकाधिक संधी असलेले क्षेत्र म्हणजे शेती आणि म्हणुनच आपण त्याबद्दल सुरवातीला बोललो. शेती सोबतच विमा, हेल्थ केअर, औषध निर्माण व ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात अधिक संधी दिसतील. मात्र ऑटोमोबाईल, रेल्वे, विमान वाहतूक, ट्रॅव्हल्स व पर्यटन आदी क्षेत्रांवर फार मोठा परिणाम जाणवेल. तो किती काळ असेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. बँकिंग क्षेत्राला यातून बाहेर निघणे कठीण आहे मात्र अशक्य नाही. रोजगाराच्या दृष्टीने सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसेल. अनेक सर्वेक्षणातून व शिखर संस्थांच्या प्रमुखांनी भयाची स्थिती व्यक्त केली आहे. ऑटो , टेक्सटाईल, चैनीच्या वस्तू उत्पादकांना मोठे आव्हान असेल. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मानव संसाधन कमी होईल. या क्षेत्रातील धुरिणांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची अपेक्षा व्यक्त केली असून वेगवेगळ्या प्रकारे सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांना पगार वाढीसाठी किमान दोन वर्षे वाट पाहावी लागेल असे आजच्या स्थितीवरून वाटते आहे. यावर्षी बोनस व सानुग्रह अनुदान केवळ अशक्य आहे.


बँकिंग क्षेत्रात एनपीएत वाढ होण्याचा धोका व्यक्त केला जात असतांना त्याचा बँकांच्या नफाक्षमतेवर मोठा परिणाम होईल. रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यातील कर्जाच्या परतफेडीला स्थगिती दिल्याने त्याचा हि परिणाम बँकांच्या उत्पन्नावर होईल. छोट्या व माध्यम उद्योगांना वेळेवर पतपुरवठा उपलब्ध करून दिल्यास त्याचा काही प्रमाणात बँकांना लाभ होऊ शकेल अर्थात त्यासाठी किमान वर्षभर वाट पाहावी लागेल. "जोखीम" हा बँकिंग क्षेत्राचा परवलीचा शब्द कोरोना पश्चात कळीचा शब्द ठरेल. त्याच्या कसोटीला उतरणाऱ्यांनाच भविष्य आहे.



विमा क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येईल. त्यासाठी शासनाने लाईफ प्रोटेक्टेड विमा प्रकारांना कर सवलतींद्वारे आकर्षित करता येईल. आगामी काळात विमा क्षेत्राकडे गुंतवणूक म्हणून न पाहता संरक्षण दृष्टिकोनातून पहिले जाईल. साथीच्या रोगाच्या अनिश्चिततेमुळे विमा क्षेत्राला मागणी वाढेल असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या क्षेत्रात व्यवसायाची अधिक चांगल्या संधी उपलब्ध राहतील मात्र त्यासाठी अपेक्षित पूर्व तयारी व अभ्यास महत्वाचा ठरेल. दीर्घकाळासाठी या क्षेत्राला फायदा झालेला दिसेल.

कापड उद्योगात १ रोजगार कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिखर संस्थेने आपल्या सभासदांचा सर्व्हे घेतला ज्यात २० टक्के कंपन्या लॉक डाऊन नंतर आपला व्यवसाय बंद करणार असल्याचे नमूद केले आहे. ६० टक्के कंपन्यांनी आपल्या उत्पन्नात ४० टक्क्याची कमी होईल असे म्हटले आहे. सरकारने वेतन सबसिडी, कर भरण्यासाठी सवलत या सारख्या उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रावरही लॉक डाऊनचा मोठा नकारात्मक परिणाम होईल.

सेवा क्षेत्रात ग्राहक सर्वात महत्वाचा घटक असतो. त्याची क्रयशक्ती वाढेल अशी बाजारातील स्थिती नाही. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवांकडे ग्राहक वळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आपल्या गरजा मर्यादित करुन धनसंचय करण्याकडेही त्याचा कल असेल. अर्थात या सर्व गोष्टींवर शिक्कामोर्तब करण्यासाठी किमान ४ महिने "वेट अँड वॉच" करावे लागेल. 

Saturday 18 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग ५

"कोरोना" पश्चात परिस्थिती आणि व्यवसायातील संधी 



या विषयावर माझ्या परिघातील मित्रमंडळींना आता विषयात रस येऊ लागला आहे असे लक्षात येते. अनेक जण आवर्जून त्यावर लिहीत आहे, काही जण बोलत आहेत तर काही त्यांच्या सूचना, मत व मुद्देही सांगत आहे. खरं ती सामान्य माणसाची चर्चा आहे ही, त्यांची मते तशी ती माझीही... सर्वचजण त्यातील तज्ज्ञ नाही मात्र अनुभवी नक्की आहेत, त्यावरुन त्यांना वाटणारी ही मते आहेत. दोन महत्वाच्या सूचना आल्यात त्यातील एक म्हणजे मनात सर्वच क्षेत्रांचा विचार असल्याने स्वाभाविकपणे एकाच लेखात अनेक गोष्टी सामावण्याचा प्रयत्न असतो, तो टाळला पाहिजे. कारण यामुळे लेख थोडा मोठा होतो. दोन मुद्दे घेऊन ते जरा विस्ताराने मांडले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काही मुद्द्यांची पुनरावृत्ती होतेय. दोनही सूचनांचे स्वागत आहे. त्याप्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न करेन. कालच्या भागात भारतीय व्यवस्थापनाचा विचार पाहू असे म्हटले होते ते जरा नंतर घेऊ. कारण संधी आणि आव्हाने मोठी आहेत क्षेत्र अनेक आहेत.

कोणीही व्यक्ती शेती, सेवा क्षेत्र, उत्पादन क्षेत्र व असंघटित क्षेत्र  यामध्ये कार्यरत असतो. यात व्यवसायाच्या तीन वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतात. या प्रमुख तीन गोष्टी म्हणजे सार्वजनिक व्यवस्था, एसएमईज (लहान व मध्यम उद्योग) आणि खासगी क्षेत्र. या सर्वच क्षेत्रांची काही बलस्थाने आहेत व काही मर्यादाही. मात्र या सर्वांची एकूण अर्थकारणातील भूमिका अनन्यसाधारण आहे. कोरोनामुळे सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र हे सेवा व उत्पादन क्षेत्र असणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचे योगदान ५४ टक्के असून २०१८च्या आकडेवारीनुसार ३१.४५ टक्के नोकरदारवर्ग सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. सेवा क्षेत्रात अनेक गोष्टी येत असल्याने एखाद्या गोष्टीवर त्याचा मोठा परिणाम झाला तरी अन्य क्षेत्रात त्याला विशेष मागणी वाढेल असेही म्हणता येईल. आज यातील सर्वात मोठे सेवा क्षेत्र असलेल्या कृषी व कृषी पूरक व्यवसायाकडे पाहू या.



भारतातील एकूण लोकसंख्येच्या ५८ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. या क्षेत्रात सरकार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत असून या क्षेत्राला विशेष मागणी होती आणि कोरोना पश्चात ती अधिक वाढेल असे वाटते. त्यामुळे या क्षेत्रात अनेक चांगले प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. खेडी व विशेषतः स्थानिक अर्थ व्यवस्था मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न झाल्यास कोरोनाचा अर्थ व्यवस्थेवरील प्रभाव कमी होण्यास मदत होईल असे वाटते. ग्राम विकास, कंत्राटी पद्धतीने शेती, ऑरगॅनिक शेती, फळबाग विकास, शेती पूरक व अन्न प्रक्रिया उद्योगावर युवकांनी आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोरोनामुळे भारतीय नागरिक आरोग्य बाबत जागरूक होतील व आपली प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी आरोग्यदायी अन्नाकडे त्यांचा कल वाढेल असा अंदाज आहे. तसेच कोरोनाचा हॉटेल / पर्यटन व्यवसायावरही मोठा परिणाम होईल असा अंदाज आहे. हे क्षेत्र त्याच्या मूळ पदावर येण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागेल असाअंदाज आहे. यासर्वांचा एकत्रित परिणाम हा शेतीसाठी अधिक लाभदायक राहील असे वाटते.

कालच्या लेखातही शेती, शेती पूरक व अन्न प्रक्रिया उद्योगाला चांगले दिवस येतील असा अंदाज मांडला होता. मात्र या क्षेत्रातील अनिश्चिततेची विशेष काळजी घेतली पाहिजे व त्या अनुषंगाने पुढील काळाचे नियोजन केले पाहिजे. भारताचा अन्नधान्याच्या जागतिक व्यापारात सहावा क्रमांक लागतो. फलोत्पादनातही भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. येत्या काही वर्षात डाळींच्या उत्पादनात भारत स्वयंपूर्ण होईल असा प्रयत्न आहे, त्यासाठी संशोधन सुरु आहे. शेतीच्या अनुषंगाने काही गोष्टी विशेषत्वाने नमूद कराव्याश्या वाटतात.

१. लॉक डाऊनच्या काळात स्थानिक पातळीवर टरबूज, खरबूज, द्राक्षे, मोसंबी व भाजीपाला मुबलक प्रमाणात ग्राहकाला परवडेल अशा भावात उपलब्ध आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार वाढल्यास दोघांचाही फायदा होईल असे लक्षात येते.

२. जळगाव जिल्ह्यात अलीकडच्या काळात जिल्ह्यांतर्गत वाहतुकीच्या रस्त्यांच्या बाजूला केळी वेफर्स तयार करुन विकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. येथेही वेफर्स उत्पादक व ग्राहक यांच्यातील व्यवहार दोघांच्या फायद्याचा ठरताना दिसतो.

३. अन्नधान्याच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असलेले दिसून येते.

४. औषधी वनस्पतींची शेती या क्षेत्रातही चांगल्या संधी निर्माण होतील. रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी आयुर्वेदाला लागणाऱ्या विविध औषधी वनस्पतींची लागवड करणाऱ्यांना यातून चांगले दिवस येतील असे म्हणता येईल.

५. शेती व शेती पूरक व्यवसायांना योग्य ते पाठबळ मिळाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण, शेतीत यशस्वी प्रयोग करणाऱ्या स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांच्या शेतावर शिवार फेरी, त्यांना प्रोत्साहन आदी गोष्टी या क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. जलस्वराज्य, नदी खोलीकरण व रुंदीकरण, शेततळे तसेच जलयुक्त शिवार यासारख्या योजनांनी शेतकऱ्याला नवसंजीवनी दिलेली लक्षात येते.




६. फळ, फुल शेती याचे अनेक यशस्वी प्रयोग राज्यात व देशभरात अनेक ठिकाणी होत असतांना. या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू इच्छिणाऱ्यांनी यशस्वी शेतकऱ्यांना भेटून त्यांचे मॉडेल (आदर्श उदाहरण) समजून घेतले पाहिजे. केवळ शेती परवडत नाही अशी नकारात्मक चर्चा न करता या क्षेत्रात प्रयोग करणाऱ्या तरुणांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. गट शेती सारखे प्रयोगही यशस्वी झालेले आपण पाहतो.



७. बारीपाडा, हिवरे बाजार व राळेगण सिद्धी सारखी ग्राम विकासाची उदाहरणे यशस्वी होऊ शकली त्यामागे स्थानिकांची एकी महत्वाची ठरली. शेती विषयक गावाचे धोरण ठरवून त्याप्रमाणे अंमलबजावणी केल्यास किती मोठा बदल घडू शकते याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसतील.


८. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करुन शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ निर्माण करता येते याचे उदाहरण लॉक डाऊनच्या काळात अनुभवले. उच्च दर्जाची ढोबळी मिरची लॉक दौंमुळे बाहेरच्या मार्केटमध्ये पाठविता येत नव्हती. मित्राने आपलॆ वास्तव स्थिती फेसबुकच्या माध्यमातून मांडली. सोशल मीडियावर मित्रांनीच विशेष प्रयत्न करुन त्याला चांगले मार्केट उपलब्ध करुन दिले.

९. शेती पूरक उद्योगात पशुपालनातूनही चांगल्या व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. तसेच शेती उत्पादित माळावर प्रक्रिया करणारे उद्योगही विकसित करता येतील.

१०. एरंड, जट्रोफा यासारख्या वनस्पतींची लागवड करुन अपारंपरिक ऊर्जास्रोतांची निर्मिती करणारे उद्योगही विकसित करता येतील असे वाटते.

शेती या अतिशय मोठ्या क्षेत्रातील मला उमजलेले काही प्रातिनिधिक उदाहरणे संधीच्या रूपाने आपल्या समोर ठेवली आहे. आपणही आपल्या भागातील अशा यशस्वी शेतकऱ्यांची उदाहरणे सांगितल्यास त्यावरही काम करता येईल. या क्षेत्रात मेहनत लागते, हवामानातील अनियमिततेने मोठा धोका असतो. मात्र यावर मत करीत यशस्वी झालेल्यांची यशोगाथा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नक्कीच मदत करतील. अन्य काही क्षेत्रातील संधींबाबत पुढील लेखात नक्की वाचू...

Friday 17 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग ४

"कोरोना" पश्चात परिस्थिती आणि व्यवसायातील संधी 


समर्थ भारताच्या उभारणीसाठी या लेखमालेतील भाग तिसरा भारतीय विचार व कोरोना पश्चात उपलब्ध संधी असा पाहिला. व्यवसाय करीत असतांना ज्या देशात आपण व्यवसायाचा विचार करतोय तेथील संस्कृती आणि कार्यपद्धतीचा विचार करणे आवश्यक असते. पैसा कमवित असतांना सेवेलाही तेव्हढेच महत्व देणारा आपला देश आहे. आज आपण संधींचा विचार करतांना कोरोना पश्चात स्थिती काय असेल त्याचाही विचार करणार आहोत. आपल्याला स्पून फिडींगची सवय असली तरी हा व्यवसाय करा यात संधी असे सांगता येणार नाही. पर्याय सांगता येतील मात्र तो आपल्या स्थळ व काळाशी सुसंगत आहे का ? याचाही विचार करावा लागणार आहे. परिस्थितीचे अवलोकन करुन यॊग्य पर्यायाची निवड हिच यशाची नांदी ठरणार आहे.

कोरोना पश्चात लॉक डाऊन उठविल्यानंतर मार्केट स्थिर होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. जरी लॉक डाऊन संपले तरी किमान वर्ष ते ६ महिने सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर करावाच लागेल असे वाटते किंवा सामान्य माणसे स्वतःच्या काळजीसाठी त्याचा अवलंब करतील. या गोष्टीचा सर्वात जास्त परिणाम शैक्षणिक संस्था, हॉटेल, मंदिरे, शिबिरे, पर्यटन व्यवसाय, यात्रा, मेळा, व्याख्याने /  प्रशिक्षण / परिसंवाद /  परिषदांचे आयोजन करणारे व धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अर्थात ज्या ठिकाणी लोकांचा सहभाग असतो अशा गोष्टींवर खूप साऱ्या मर्यादा येणार आहे. त्यासाठी या  गोष्टींसाठी तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक कसा करता येईल याचा विचार करावा लागेल.


सद्यस्थितीमुळे प्रत्येकजण आपली प्रतिकार शक्ती वाढविण्याबाबत जागरुक होतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रथिनयुक्त आहार, व्यायाम, योगासने, जिम यासारख्या शारीरिक व मानसिक सबलीकरणासाठीच्या व्यवसायांना अधिकाधिक मागणी निर्माण होईल. काळाची ही चाहूल लक्षात घेऊन या क्षेत्रात काय करता येईल याचा विचार करुन त्यासाठीची पूर्व तयारी नक्कीच लाभदायक ठरेल. आपल्याकडील आजीचा बटवा किंवा त्याकाळातील विविध खाद्य पदार्थांना विशेष मागणी निर्माण करता येईल. फास्ट फूडला समर्थ पर्याय देणाऱ्या व्यवसायांसोबतच शारीरिक सामर्थ्य वाढविणाऱ्या गोष्टींना चांगले दिवस असतील.

मध्ये एक मुद्दा आवर्जून सांगितला पाहिजे आगामी काळात प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्या व्यक्तींना विशेष मागणी असेल व खरं तर त्यांचे जीवन अधिक सुखकर होणार आहे. कमी श्रमात अधिकाधिक पॆसा मिळविण्याची अलीकडच्या काळातील माणसाची वृत्त्ती कमी होईल असे मला वाटते. "जिथे राबती  हात तेथे हरी" याचा प्रत्यय आगामी काळात येतील याचा अर्थ शेती व शेती पूरक व्यवसायांना चांगले दिवस येतील. लॉक डाऊनच्या या काळात सर्वात जास्त मागणी शेती व संबंधित गोष्टींनाच होती. आपल्या देशाची अर्थ व्यवस्था शेतीवर अवलंबून आहे आणि त्याकडे आपण अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे लक्षात येते. आगामी काळात श्रमाला प्रतिष्ठा मिळेल व मिळावी हिच अपेक्षा आहे.

संधींचा विचार करतांना आणखी एका गोष्टीचा विशेषत्वाने विचार करावा लागणार आहे तो म्हणजे आपण करीत असलेल्या नोकरी व्यवसायात नावीन्य व सृजनशीलतेचा अवलंब कसा करतो. इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी हे परवलीचे शब्द असतील. त्यामुळे पूर्वी ज्याप्रमाणे एका ठिकाणी नोकरीला लागलो कि तेथेच निवृत्ती ही वृत्ती अलीकडच्या काळात कमी होऊन अधिक पॅकेज देणारी त्याच क्षेत्रात नवीन संधी शोधली जात असे. आगामी काळात रोजगाराच्या व व्यवसायाच्या अनेक चांगल्या संधी सर्वांनाच उपलब्ध राहतील मात्र त्यासाठी आवश्यक कौशल्ये आपल्याजवळ असतील असे नाही. यासाठी Learn , Unlearn आणि Relearn अर्थात शिका, काम करा आणि त्या कौशल्याची गरज संपली कि विसरून जा म्हणजेच मला हे येतं मी हेच / एव्हढंच करिन असा विचार करुन चालणार नाही. समोर आलेल्या नवीन संधीचे स्वागत करा, परत शिका. एकाच कौशल्यावर नोकरी / व्यवसायात दीर्घकालीन गुंतवणुकी टाळून त्या प्रकल्पापुरता मर्यादित गुंतवणुक करणे शहाणपणाचे ठरेल.




स्वदेशीला सर्वच देशात चांगले दिवस येतील असा विश्वास वाटतो कारण देशांची इतर देशांवरील परावलंबित्व कमी करण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करणार त्यामुळे ज्या देशांमध्ये मनुष्यबळाची मर्यादा आहे त्यादेशांमध्ये भारतीयांना नक्कीच चांगल्या संधी निर्माण होतील. काही देश चीनमधील आपले प्रकल्प अन्य देशात हलविण्याचा विचार करीत आहेत. त्यांच्यासाठी भारतासारखा अन्य सक्षम पर्याय आज तरी दिसत नाही. उत्पादन निर्मितीसाठी आवश्यक वातावरणाची उपलब्धता म्हणजेच उत्पादनाला जसे हवे तसे थंड, उष्ण, समशीतोष्ण वातावरण, इन्फ्रास्ट्रक्चर अर्थात वीज, पाणी, वाहतुकीची व्यवस्था, तरुण, सुशिक्षित मनुष्यबळ भारतात उपलब्ध आहे. सर्वात महत्वाचे भारतीयांची सहिष्णुता अन्य कुठेही  नाही. या सर्वांच्या जोडीला उत्पादनाला आवश्यक असलेले मार्केटही येथे आहे.


भारत सरकारने या गोष्टीचे महत्व लक्षात घेऊन स्किल इंडिया व मेक इन इंडिया या दोन गोष्टींना प्राधान्य दिलेले आपल्याला दिसेल. रोजगार निर्मिती हा प्रत्येक सरकारचा कळीचा मुद्दा राहिला आहे. दुर्दैवाने  सरकारी नोकऱ्यांची मर्यादा जनतेने समजून घेतली पाहिजे. सरकार आवश्यक असलेल्या संधी देईल. त्याचा लाभ घेऊन समाजाने सिद्ध होण्याची गरज आहे. सरकारच्या योजना केवळ कागदावर न राहता त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आगामी काळात अपेक्षित फलनिष्पत्ती देणारी ठरेल.

यासर्व गोष्टींचा अर्थ असा कि आगामी काळात खूप साऱ्या चांगल्या संधी भारतीयांना नक्कीच असतील मात्र त्या संधी स्वीकारण्याची शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता आपण हेतूपुरस्सर विकसित करणार आहोत कि नाही ? अलीकडच्या काळातही आपणास अनेक संधी उपलब्ध होत्याच मात्र आपल्यातील काही मर्यादा व नकारात्मक वृत्तीमुळे आपण त्या घेत नव्हतो. मेहनती, कल्पक, नाविन्याचा ध्यास घेतलेल्यांना आगामी काळ अनुकूल असेल याची शंका नाही अर्थात तेच त्रिकालाबाधित सत्य आहे असे म्हणेन. लॉक डाऊनने नक्कीच त्याची जाणीव आपल्याला करुन दिली असणार आणि म्हणूनच येणारा काळ सुवर्णकाळ ठरेल असा मला विश्वास वाटतो.

आपल्या या लेखमालेच्या पुढच्या भागात आपण भारतीय व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब आपल्याला कसे समृद्ध करेल ते समजून घेऊ. लेखाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देत असतांना वेगवेगळ्या संधींचा उल्लेख नक्कीच असेल. आपणही आपले या विषयातील विचार अवश्य मांडावे ही विनंती...

Thursday 16 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग ३

"कोरोना" पश्चात व्यवसायातील संधी व भारतीय विचार



समर्थ भारताच्या उभारणीसाठी या लेखमालेतील भाग तिसरा कोरोना पश्चात उपलब्ध संधी असा पाहणार आहोत. तत्पूर्वी आर्थिक विषयाबाबतचे भारतीय तत्वज्ञान व विचार याचाही विचार करणार आहोत. कारण ते समजून घेतल्याशिवाय संधींचा विचार करुन उपयोग नाही. "सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग्भवेत् ॥" सर्वजण सुखी होवोत, सर्वजण निरोगी राहो, सर्वजण मंगल व आनंददायी घटनांचे साक्षीदार होवोत आणि कोणालाही कोणतेही दुःख लाभू नये. या दृष्टिकोनातून विचार करूनच संधींचा विचार व्हावयास हवा.

मित्रहो, आशा फौंडेशन व संस्थेतील कर्मचाऱ्यांचे लॉक डाऊन नंतरचे भविष्य या दृष्टीने विचार करीत असतांना मला पडलेले प्रश्न, त्यावर मनात आलेले विचार आपल्यासमोर मांडत आहे. मी अर्थ विषयातला तज्ज्ञ नाही. जीवन जगतांना ज्या गोष्टींचे जसे आकलन झाले त्यानुसार मांडणी करीत आहे. दुसऱ्या भागाला चांगला प्रतिसाद मिळाला. आनंद या गोष्टीचा आहे, उपलब्ध वेळेचा सदुपयोग करुन पुढील वाटचाल योग्य दिशेने व आशादायी व्हावी यासाठी आपले विचार नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. त्याबद्दल मनापासून धन्यवाद ! आपण जसे व ज्या गोष्टीचा विचार करतो तशी स्पंदने आपल्या आजूबाजूला निर्माण होतात असा अनुभव घेत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे याबाबतचे विचार ऐकले. अर्थतज्ज्ञ डॉ. गिरीश जाखोटिया यांनीही त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला. तसेच मित्र प्रसाद भट यांनी विस्ताराने आपले मत मांडले. हा लेख छापण्यासाठी वापरता येईल का अशीही विचारणा झाली. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या निमित्ताने घडलेल्या सकारात्मक गोष्टी...


आर्थिक उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरणाचा स्वीकार करीत असतांना नकळतपणे आपण आपल्या भारतीय मूळ विचारधारेपासून दूर जाऊ लागलो होतो. मा. गांधींनी म्हटल्याप्रमाणे खेडी समृद्ध होण्याऐवजी शहरीकरणाला प्राधान्य अधिक मिळाले. सुखाची कल्पना ही केवळ शारीरिक सुखाचा विचार करणारी झाली. त्यामुळे एक गरज पूर्ण झाल्यावर दुसरी उत्पन्न झाली. त्याचा हव्यास वाढला त्यातून गळेकापू व खिसेकापू स्पर्धा निर्माण झाली. पैसा आला तरी आनंदाबरोबर मानसिक ताणाची एक किनारही सोबत आली. या सर्वांचा परिणाम म्हणून सर्वत्र भोगवाद पसरला. त्यामुळे शोषण वाढले, निसर्गाचे ओरबाडणे वाढले आणि " सर्वे भवन्तु सुखिनः " चा आम्हाला विसर पडला. स्वार्थी व आत्मकेंद्रित समाज निर्माण झाला. त्यामुळे कोणीही सुखी समाधानी होऊ शकले नाही.

ज्या स्वदेशीचा अंगीकार करीत आम्ही स्वातंत्र्य मिळविले, खुल्या अर्थव्यवस्थेमुळे आम्ही स्वतःहून त्या स्वदेशीला दूर लोटले. उत्पादनाचा दर्जा आणि किंमत याचा अधिक विचार न करता आम्ही चिनी वस्तूंकडे, ऑनलाईन शॉपिंग, मॉल यासारख्या गोष्टीकडे अधिक आकर्षित झालो. पैसे कमविणे, संपत्ती निर्माण करण्यासाठीच्या साधनांचा शोध लावणे, निर्माण केलेल्या साधनांचे संरक्षण करण्यासाठी सत्ता मिळविणे यात वावगे असे काहीही नाही. मात्र त्याचा अतिरेक झाला कि सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचा धोका निर्माण होतो. अमर्याद संपत्ती निर्मिती, तिचा उपभोग व त्यातून निर्माण झालेली सत्ता शोषितच असते. त्यामुळे सोबत असणाऱ्या समाज बांधवांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येतातच. भांडवलदारांना पूरक वर्तनाने आम्हीच पं. दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलेल्या एकात्म मानववादाला हरताळ फासला.


योगी अरविंदानी म्हटल्याप्रमाणे समाजातील प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे सुख मिळावे, त्याच्या कामाचा आनंद मिळावा, मिळविले ते उपभोगण्यासाठी फुरसतीचा वेळ मिळावा आणि साधे, सोपे , समृद्ध व सुंदर जीवन जगता यावे हे उद्दिष्ट आहे. भारतीय विचारात भौतिक सुख आवश्यक मानतांनाच ते अपुरे आहे हे अधोरेखित केले आहे. त्यातच अडकून पडणे म्हणजे संपूर्ण सुखापासून वंचित राहणे आहे. सुख वस्तुनिष्ठ नसून त्याचा माणसाच्या भावभावनांशी जवळचा संबंध आहे. माणसाच्या शरीराबरोबरच मन, बुद्धी व आत्मा याचीही भूक असते. या सर्वांच्या एकत्रित सुखातूनच माणूस विकसित होतो. "आहार निद्रा भय मैथुनं च, सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् । धर्मो हि तेषामधिको विशेष:, धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥ " अर्थात आहार, निद्रा, मैथुन आदींमुळे जी सुखानुभूती होते ती मनुष्यप्राणी व पशुपक्षी या दोहोंमध्ये सारखीच असते. मानवी जीवनातील विशेषतः आहे ती म्हणजे धर्म. धर्माशिवाय वागणारी व्यक्ती पशुसमान असते. माणूस आणि प्राणी यांच्यात मूलभूत फरक आहे तो म्हणजे माणसासमोर काही ना काही ध्येय असते. ते ध्येय साकारणे हे माणसाचे मनुष्यत्व होय.

"कोरोना"च्या निमित्ताने लागू केलेल्या लॉक डाऊनने आपल्या जीवनशैली बद्दलचा विचार करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या जीवनाचा नक्की उद्देश काय ? सुख म्हणजे काय ? विकास म्हणजे काय ? का जगायचं ? कसं जगायचं ? आणि आनंदी कसं राहायचं ?  या मूलभूत गोष्टी समजून घेतल्यात, ज्याची जाणीव या फुरसतीच्या वेळात कळून घेतल्यास पुढील काळ आपला असेल. आपण ज्या गोष्टींसाठी पळत होतो, त्याची आवश्यकता होती का ? आहे का ? याचा विचार आगामी काळातील संधीचा विचार करतांना केला पाहिजे. ते अधिक हेतुपूर्ण व सुखी समाधानी जीवनाकडे घेऊन जाईल.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या निर्माण झालेल्या संधींचे काही उदाहरणे येथे देतो. अर्थात आपल्या मूळ विषयाशी संबंधित असलेल्या संधी निर्माण करतांना त्यांचा वापर करता येईल. "कोरोना"च्या लढाईत घराबाहेर पडतांना तोंडावर मास्क लावणे अनिवार्य आहे. आता एव्हढे मास्क कसे निर्माण करणार आणि येथेच ती संधी होती. जळगावातील हरी विठ्ठल नगरातील सेवावस्ती भागातील महिलांनी हजारो मास्कची निर्मिती केली. यापुढील काळात किमान वर्षभर तरी सोशल डिस्टंसिंग व मास्कचा अवलंब करावा लागणार आहे. येथे आपल्याला संधी अवश्य दिसेल. चांगल्या दर्जाचे व कमीत कमी किमतीचे मास्क बनवून त्याद्वारे चांगला रोजगार निर्माण होऊ शकतो. दुसरे उदाहरण वाचण्यात आले. सध्या उच्च दर्जाच्या व्हेन्टिलेटर्सची फार मोठी आवश्यकता भासणार आहे. जळगावातील एका इलेक्ट्रॉनिक इंजिनियरने आपण ते बनवू शकतो त्यासाठी काही मदत मिळावी अशी अपेक्षा सोशल मिडीयातून जाहीरपणे मा. जिल्हाधिकारी साहेबांकडे केली. जैन उद्योग समूहाने तात्काळ त्यासाठी आवश्यक असलेली जागा व कार्यशाळा उपलब्ध करुन दिले. तिसरे उदाहरण हे शेतीमालाशी संबंधित आहे. एक्स्पोर्ट क्वालिटीची ढोबळी मिरची, द्राक्षे, मोसंबी यासारख्या वस्तू बाहेर जाऊ शकत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार होते. त्यांनी येथे संधी शोधत आपल्या मालाला मागणी निर्माण केली व तसे राज्यभरात अनेक ठिकाणी पुरवठा केला.

"कोरोना"मुळे निर्माण झालेल्या या संधी लॉक डाऊन पश्चातच्या अनेक संधींना दिशा देणाऱ्या ठरणार आहे. आपण आपल्याला अशा काही संधी दिसत असतील, वाटत असतील तर त्या अवश्य सुचवा. पुढील भागात माझ्या कल्पनेतील संधींसह आपल्याही संधींचा समावेश करता येईल.

Wednesday 15 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग २

व्यक्तिगत व संस्थात्मक जीवनातील आत्मपरीक्षण 


"कोरोना"च्या या महाभयंकर संकटातून देश बाहेर निघेल अशी आता सर्वांना खात्री आहे. केवळ त्यातून बाहेर निघू असे नाही तर सर्व पूर्ववत होईल अशी पण अपेक्षा दिसते. कालच्या पहिल्या भागावर आलेल्या मर्यादित प्रतिक्रियांवरुन असे म्हणता येईल. शेवटी जे सर्वांचे होईल ते आपले होईल अशा मनोभूमिकेतून असे होण्याची शक्यता आहे. मला वैयक्तिक तसे वाटत नाहीआणि त्यासाठीच हा लेख प्रपंच आहे.

याविषयावर जगभरातील मंडळी काय म्हणतात, ते याचा कसा विचार करतात याचा आढावा घेता आपण अधिक जागरूक होण्याची गरज आहे असे वाटते. ज्यांना या संकटाची झळ पहिल्या टप्प्यात पोहोचली त्यांनी त्यावर विचार करणे नक्कीच सुरु केले असेल. मी व माझे सहकारी त्यातीलच आहोत. त्यामुळेच आम्हाला संभाव्य धोक्यांची जाणीव झाली आहे. आपल्यासोबत सर्वानीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे असे वाटते. अर्थात हे लिहीत असतांना मी फार हुशार आहे आणि मला या मांडलेल्या विषयातलं खूप काही समजतं असा माझा दावा नाही. यासाठीच आपल्या प्रतिक्रियांची अपेक्षा ठेवून आहे. या विषयातील तज्ज्ञांनी नक्कीच मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे.

काल विविध व्यवसायांच्या अनुषंगाने माही मुद्दे मांडले होते. आज व्यक्तिगत पातळीवर काही गोष्टींचा विचार मांडणार आहे.

१) कोरोना पश्चात माझे अस्तित्व काय ? मी जेथे नोकरी करतो, ती असेल का ? असली तर आजचे कामाचे स्वरुप तसेच असेल का ? नसेल तर नव्या स्वरुपात मी टिकाव धरु शकेल का ? त्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात केली आहे का ?

जर आजची नोकरी नसेल तर माझ्या समोर अन्य कोणते पर्याय उपलब्ध आहेत. त्या पर्यायांपैकी मला सोयीचा कोणता ? नोकरीच करायची नसेल तर उत्पन्नाचे अन्य मार्ग कोणते ? माझ्या अनुभवाचा फायदा घेऊन मी स्वयंरोजगाराकडे वळू शकतो का ? त्यासाठी लागणारे भांडवल आदी आहे का ? नसले तर ते कसे उभारणार ?

थॊडक्यत आपण आपल्या बलस्थानांचा व मर्यादांचा विचार करुन आपल्या स्वतःच्या कार्यपद्धतीचा विचार करणे क्रमप्राप्त होणार आहे. समाजाच्या मूलभूत गरजांशी संबंधित असलेल्या व्यवसायांवर फारसा फरक पडणार नाही मात्र अन्य सर्वच क्षेत्रात नव्याने विचार करावा लागेलच. आपल्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमतांचा विचार करीत असतांनाच त्यांच्या मर्यादांचा विचार करावा लागेल. त्यामध्ये अपेक्षित क्षमता विकासालाही विचार करावा लागेल.

आपल्या वार्षिक उत्पन्नावर काही परिणाम झाल्यास त्यातून मार्ग काढण्याची व्यवस्था काय ? कुटुंबाचे उत्पन्न वाढीसाठीचे अन्य मार्ग कोणते ? कारण आजच्या उत्पन्नावर निर्माण केलेला खर्च (गृह कर्ज, वाहन कर्ज, लाईफ स्टाईल इ.) कसा भागविणारं ? कोणता खर्च कमी करता येईल, कोणत्या खर्चावर नियंत्रण आणता येईल ?



२) मी छोटा-मोठा व्यवसाय करीत असेल तर त्यालाही असाच पद्धतीने विचार करावा लागेल. येथे त्याला स्वतःसह त्याच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचाही विचार करावा लागेल. कालच्या लेखात याबद्दल आपण अधिक विस्ताराने लिहिले आहे. माझ्या व्यवसायातील मनुष्यबळ सोबत असणार आहे का ? कारण ते जर अन्य प्रांतातून असतील अगदी अन्य जिल्ह्यातून असले तरी त्यांचा ओढा आता आपल्या मूळ गावाकडे होऊ शकतो. अशा वेळी आपल्याला नव्याने लागणारे मनुष्यबळ आपल्या परिसरातून निर्माण करता येईल का ? व्यवसायासाठी लागणारे कौशल्ये त्यांच्याकडे आहे का ? त्यांना तयार करण्यासाठी पुरेसा वेळ व गुंतवणूक करण्याची माझी क्षमता आहे का याचाही विचार करावा लागेल.

येथेही आपल्या व्यवसायाची गती व वृद्धी आजच्या सारखी राहील का ? त्यासाठी काय करावे लागेल ? काही व्यवसाय पूरक व्यवसायांचा विचार करता येईल का ? ज्यामुळे लॉक डाऊनमुळे निर्माण झालेली गॅप (फरक) कमी करता येईल. उत्पन्नवाढीसोबतच कॉस्ट कटिंगचे मार्ग कोणते ?

३) लॉक डाऊनच्या काळातील विस्कटलेली आर्थिक घडी पुनर्स्थापित करण्यासाठी लागणारा कालावधी किती ? त्यासाठीची आर्थिक तरतूद आहे का ? नसल्यास त्याची उभारणी कशी ? उत्पन्न मिळाले नाही तरी आवश्यक व मूलभूत खर्च करावा लागणार त्यामुळे निर्माण होणाऱ्या कसरतीचा सामना कसा करणार त्याचा कृती कार्यक्रम तयार आहे का ?

४) व्यवसायाची नव्याने पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता असल्यास त्यासाठीचे आवश्यक नियोजन केलं आहे केले आहे का ? त्यासाठीचे कुशल व अकुशल मनुष्यबळ, मशिनरी, मार्केटिंग व आर्थिक उभारणी याचा विचार केला आहे का ?

५) लॉक डाऊन नंतरच्या काळातील आव्हानांना सामोरे जात असतांना आपल्यासह सहकाऱ्यांचे मनोधैर्य राहावे यासाठीची योजना काय ? कारण व्यावसायिक व कौटुंबिक पातळीवर कराव्या लागणाऱ्या तडजोडींमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचा मनावर होणारा परिणाम मोठ्या प्रमाणात ताण निर्माण करणार. त्यावर मात करण्यासाठी स्वतःची सकारात्मक वृत्ती व इतरांसाठीची योजना याचाही विचार करावा लागेल.

६) सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या जीवनात तंत्रज्ञानाचे वाढलेले महत्व लक्षात घेता आपण कुठे आहोत ? जर तीच काळाची गरज असेल आणि त्याला पर्याय नसेल तर आपण ते कसे आत्मसात करणार आहोत ? लॉक डाउनच कालावधी अशा प्रकारच्या तयारीसाठी वापरता येईल का ?

एक उदाहरण आज आपण पाहू..

सध्या चर्चेत असलेले मोठमोठ्या मीडिया हाऊसेस मधील स्थिती... व्यवसाय म्हणून विचार केला तर जाहिरातीच्या माध्यमातून, वर्तमानपत्र विक्रीतून अपेक्षित उत्पन्न निर्माण न झाल्याने कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतन देण्यात आले. परिस्थिती बदलली नाही तर पुढे जाऊन २५ टक्के वेतनात काम करावे लागणार. पगारातून होणारी कपात वजा जाता उदरनिर्वाहासाठी ३५ टक्के रक्कम हातात मिळाली पाहिजे. जर पगारच २५ टक्के मिळाला तर ६५% खर्चाचे काय ? आपण या गोष्टीचा विचार करतांना केवळ नोकर असा भावनिक विचार करुन चालणार नाही. व्यवसायांचे मालक म्हणून व्यावहारिक विचार करावाच लागेल. येथे रोजगाराचाच प्रश्न निर्माण झाला. हा जसा एका क्षेत्राबद्दल आहे तसे ज्या ज्या व्यवसायांवर परिणाम झाला तेथे तेथे या समस्या असणार.

मित्रहो, वैयक्तिक मनुष्यपातळीवरची ही यादीही खूप मोठी होईल. ती त्या त्या व्यवसायाच्या स्वरूपावर अवलंबून असेल. प्रश्नांची यादी मोठी असली याचा अर्थ समस्या गंभीर आहे, आव्हान मोठे आहे. या सर्व प्रश्नांचा आपण नकारात्मक विचार न करता वास्तव स्वीकारून आवश्यक ते बदल करणे क्रमप्राप्त आहे व त्यातच भविष्यातील यासाची बीजे आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टीत कुटुंब सदस्यांसह व्यवसायातील सहकाऱ्यांना विश्वासाने सहभागी करुन घेतले पाहिजे. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तसेच आत्मपरीक्षण करण्यासाठी संधी या लॉक डाऊनमुळे मिळाली आहे. या उपलब्ध वेळेचा हुशारीने वापर करीत काळाची पावले ओळखत सिद्ध व्हावे लागेल. भारत समर्थ होण्यासाठी समाज समर्थ होण्याची गरज आहे. समाज समर्थ होण्यासाठी त्यातील घटक अर्थात माणूस समर्थ झाला पाहिजे. पुढच्या भागात उपलब्ध संधींचा आपण विचार करु. (क्रमश:)

कृपया मी मांडलेले विचार वाचून त्यातून सुटलेले महत्वाचे विषय लक्षात आणून द्या. या विषयाचा सर्वार्थाने व साकल्याने विचारच पुढील वाटचाल समृद्ध करेल.

Tuesday 14 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग १

"कोरोना" पश्चात व्यवसायातील आव्हाने 

देशासमोर "कोरोना" सारखे महाभयानक संकट उभे असतांना समर्थ भारताची उभारणी जरा हास्यास्पद वाटतेय ना ? स्वाभाविक आहे कारण आपण सर्वजण पुढील काळाचे नकारात्मक चित्रच आपल्या मन:चक्षुसमोर पाहतोय. कारण आपण चर्चा तशीच करतो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी तशा आहेतही हे मी नाकारत नाही. म्हणजे वास्तव तसे असले तरी गर्भगळीत होण्याची वेळ नाही. भारतीयांची  मेहनती, पडेल ते काम करण्याची, काटकसरी, मर्यादित साधनामध्ये काम करण्याची तसेच आहे त्यात समाधान व आनंदी राहण्याची वृत्तीच ही नकारात्मकता खोटी ठरवतील असा मला विश्वास आहे.  "कोरोना" सारख्या अकल्पित संकटाला आपण ज्या समर्थपणे तोंड देत आहोत ते याचेच द्योतक आहे.

मा. पंतप्रधानांनी अपेक्षेप्रमाणे लॉकडाऊन ३ मी पर्यंत वाढविला आहे. या काळात दि. २० एप्रिल पर्यंत विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यानंतर परिस्थितीनुसार काही गोष्टींमध्ये सूट मिळू शकते. अर्थात हि सूट आहे लॉक डाऊन असणारच आहे. सोबतीला या काळात सप्तपदीचे आवाहन करीत परिस्थिती अधिकाधिक नियंत्रणात आणण्यासाठीचे उपायही सांगितला आहे. मला या काळाचा सदुपयोग लॉक डाऊन नंतरच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी करावा असे आवाहन करायचे आहे. कारण या लॉक डाऊनने अनेक प्रश्न निर्माण केले आहे. दि. ४ एप्रिल रोजी सोशल माध्यमांमध्ये याबद्दल लिहिले होते.

समर्थ भारताचा विचार करतांना सर्वच क्षेत्रातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक व नोकरदार मंडळींनी खालील गोष्टींचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. यावरच वैयक्तिक, व्यावसायिक, उद्योजकीय व संस्थात्मक यशस्विता अवलंबून आहे.

१) आपल्या व्यवसायाचे स्वरुपात काय बदल होईल ?
२) व्यवसायाचे आर्थिक नियोजन कसे करणार ?
३) व्यवसायाची कार्यपद्धती कशी असेल ?
४) आपली उत्पादनांची मागणी राहील का ?
५) व्यवसायाचे अस्तित्व टिकविण्यासाठी काही नवीन उत्पादनांचा विचार केला आहे का ?
६) आपल्या व्यवसायातील मनुष्यबळाचे मनोधैर्य वाढीसाठी काय करावे लागेल ?
७) व्यवसायाचे मार्केटिंग (विपणन) कसे करणार ?
८) आपल्या ग्राहकाच्या क्रय शक्तीचा (purchasing power) व्यवसायावर काय परिणाम होईल ?
९) व्यवसायाच्या खर्चावर नियंत्रण कसे मिळविणार ?
१०) मनुष्यबळाला घरुनच काम करुन घेता येईल का ?
११) व्यवसायात तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवून अपेक्षित उद्दिष्ट्ये साधता येतील का ?
१२) व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी सृजनशीलता व नाविन्यता वापरावी लागेल.
१३) काळानुरुप व्यवस्थापकीय व तांत्रिक कौशल्ये असे विकसित करणार आहोत ?

मित्रहो, ही यादी खूप मोठी करता येईल.  कारण व्यवसायाच्या विविध क्षेत्रात वेगवेगळया विषयांचा विचार करावा लागणार आहे. आपण सर्व भारतीय आपत्तीतही संधी शोधणारी मंडळी आहोत त्यातूनच आपली अस्तित्वाची लढाई जिंकणार आहोत. यात केवळ आपण आणि आपले सहकारी इतकाच मर्यादित विचार न करता आपल्या समव्यावसायिकांचाही विचार करावा. आपण एकत्रितपणे येणाऱ्या आव्हानांवर सहज मात करु शकू. चला, मग भविष्याची सकारात्मक कल्पना करा आणि सिद्ध व्हा,,, यातूनच नवीन समर्थ भारताची उभारणी होणार आहे.

                                                                                                                                                (क्रमश:)

Sunday 12 April 2020

बाप २२ वर्षाचा होत असतांना...



११ एप्रिल १९९८ रोजी हनुमान जयंती दिनी पुत्ररत्न झाले आणि बाप झालो. अर्थात प्रथमेश २२ वर्षांचा झाला आणि मी २२ वर्षांचा बापही !  मागील २२ वर्षांचा अनुभव समृद्ध करणारा होता. आपण मुलगा म्हणून मोठे होत असतांना आणि आपला मुलगा मोठा होत असतांना पाहणं यात फार मोठे अंतर दिसते. काळ ज्या झपाट्याने बदलतो आहे त्या गतीने पालक म्हणून आपली जबाबदारी ओळखणं, तिला स्वीकारणं, त्याप्रमाणे स्वतःत बदल घडवणं हि तशी कठीण गोष्ट म्हणता येईल. आपण ज्या वातावरणात वाढलो आणि ज्याप्रमाणे आपल्याला वाढवलं ते मनाच्या एका कोपऱ्यात असू द्यावे मात्र ते साधन म्हणून वापरले तर पालक म्हणून अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे.  त्यासाठी परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी आपल्या जोडीदाराची भूमिका महत्वाची ठरते. दोघांमधील सामंजस्य खूप उपयोगी ठरते. मी त्याच्याबाबतीत स्वतःला भाग्यवान समजतो.

पालकत्व हि संकल्पना स्पष्ट असली तर अडचणी येण्याची शक्यता कमी होते. आपल्या मुलाला संपन्न व्यक्तिमत्वाचा माणूस होण्यासाठी आवश्यक असलेल्या संधी व वातावरण देणं महत्वाचं ठरतं. बाप होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात हे समजून घेतले पाहिजे. मुलाची शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढ होत असतांना आपल्याही शरीराची, मनाची आणि बुद्धीची नव्याने मशागत करावी लागते. बाप  'होणं' आणि बाप 'बनणं' यातला फरक समजून घेतला पाहिजे त्यासाठी आवश्यक तेथे समुपदेशन करुन घेण्यात कुठलाही कमीपणा वाटू देऊ नये. लग्न होण्यापूर्वीच गीता परिवाराचे संजय मालपाणी यांचे "दोन शब्द आईसाठी... दोन शब्द बाबांसाठी" हा कार्यक्रम ऐकला होता. त्यात एक गोष्ट शिकलो जी मुलाला वाढवताना खूप उपयुक्त ठरली. ती म्हणजे "Don't worry that children never listen you , worry that they are always watching you" इ. ४ थीत असतांना मानसोपचार तज्ज्ञाकडून करुन घेतलेले समुदेशन उपयुक्त ठरले. बाप बनण्याच्या प्रक्रियेत अनेक व्याख्यानांचा उपयोग झाला. डोळसपणे शिकलो, समजलो.


मुलगा मोठा होत असतांना त्याला विविध परीक्षांना सामोरे जावे लागते तसेच बाप बनतांनाही अनेक परीक्षा द्याव्या लागतात. अनेक तडजोडी कराव्या लागतात. मनाची घालमेल होते. आपला 'अहं' आडवा येतो. आपली गृहीतके आडवी येतात. मोकळा संवाद असणं, त्याला स्वतंत्र विचार असतो, त्याचेही काही म्हणणे असते हे सर्व समजतं ते उमजणं कठीण असतं. मला ते उमजलं असं आजही म्हणता येत नाही. त्या मार्गावरचा एक पांथस्थ नक्की होतो. अनेक वेळा आपण चुकतो अर्थात ते स्वीकारणं आणि तसे मोकळेपणाने मान्य करणं कठीण असते. हा सर्व प्रवास हुकूमशाही पालकाकडून लोकशाही पालकाकडचा होता. मुलगा मोठा होणं हे जस त्याच्या कर्तृत्वावर अवलंवून असते तसे बाप होणे हे बापाच्या कर्तृत्वावर अवलंबून असते हे मोकळेपणाने स्वीकारावे लागेल. आज प्रथमेश जो काही आहे तो त्याच्या कर्तृत्वावर आहे. मी मात्र बाप झालो का याच उत्तर मलाच देणं कठीण आहे. माझे प्रयत्न प्रामाणिक होते एव्हढेच म्हणू शकतो. कारण प्रत्येकवेळी निर्णय घेतला असे ठामपणे म्हणता येणार नाही. कधी ते त्याच्या आईवर तर कधी काळावर सोडून दिले.



प्रथमेश आज बी. टेकच्या अंतिम वर्षाला विद्यापीठात शिकत आहे. त्याने अतिशय मेहनतीने सहा महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केली आहे. रात्रपाळीतही काम केले. त्याची कॅम्पसमध्ये निवडही झाली आहे. त्याने जे मिळविले आहे त्याबाबतीत आनंद आहे. त्याचे वाचन चांगले आहे. मुलगा म्हणून त्याच्या अनेक गोष्टी सांगता येतील अर्थात त्यामागे आमच्या कुटुंबियांसह त्याचे शिक्षक, जीवनात भेटलेले मार्गदर्शक, आपल्यासारखे सुहृद यांचा वाटा मोठा आणि महत्वाचा आहे. मात्र बाप म्हणून माझ्या... टीव्ही बंद, मोबाईल योग्य वेळी, वाहन आजपर्यंत नाही, " मागणी आणि पुरवठा " याचे प्रमाण मागणीच्या गरजेवर अधिक ना की आपली पुरवठा करण्याच्या आपल्या आर्थिक क्षमतेवर !

शिकण्याचा हा प्रवास निरंतर सुरु असतो त्याप्रमाणे बाप बनण्याचाही ! त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सद्गुरुंचे आशिर्वाद आहे. त्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा व आशिर्वाद ! आपल्या सर्वांचे आशिर्वाद व शुभेच्छा त्याला मिळाव्यात हीच अपेक्षा... त्याला वाढवत असतांना एक बाप म्हणून आलेला अनुभव मुलीला वाढवताना नक्कीच उपयुक्त ठरत आहे. २२ वर्षाच्या बाप बनण्याच्या प्रवासातील काही गोष्टी इतरांना उपयुक्त ठराव्यात केवळ या हेतूने लिहिला आहे.