Thursday 16 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग ३

"कोरोना" पश्चात व्यवसायातील संधी व भारतीय विचार



समर्थ भारताच्या उभारणीसाठी या लेखमालेतील भाग तिसरा कोरोना पश्चात उपलब्ध संधी असा पाहणार आहोत. तत्पूर्वी आर्थिक विषयाबाबतचे भारतीय तत्वज्ञान व विचार याचाही विचार करणार आहोत. कारण ते समजून घेतल्याशिवाय संधींचा विचार करुन उपयोग नाही. "सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग्भवेत् ॥" सर्वजण सुखी होवोत, सर्वजण निरोगी राहो, सर्वजण मंगल व आनंददायी घटनांचे साक्षीदार होवोत आणि कोणालाही कोणतेही दुःख लाभू नये. या दृष्टिकोनातून विचार करूनच संधींचा विचार व्हावयास हवा.

मित्रहो, आशा फौंडेशन व संस्थेतील कर्मचाऱ्यांचे लॉक डाऊन नंतरचे भविष्य या दृष्टीने विचार करीत असतांना मला पडलेले प्रश्न, त्यावर मनात आलेले विचार आपल्यासमोर मांडत आहे. मी अर्थ विषयातला तज्ज्ञ नाही. जीवन जगतांना ज्या गोष्टींचे जसे आकलन झाले त्यानुसार मांडणी करीत आहे. दुसऱ्या भागाला चांगला प्रतिसाद मिळाला. आनंद या गोष्टीचा आहे, उपलब्ध वेळेचा सदुपयोग करुन पुढील वाटचाल योग्य दिशेने व आशादायी व्हावी यासाठी आपले विचार नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. त्याबद्दल मनापासून धन्यवाद ! आपण जसे व ज्या गोष्टीचा विचार करतो तशी स्पंदने आपल्या आजूबाजूला निर्माण होतात असा अनुभव घेत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे याबाबतचे विचार ऐकले. अर्थतज्ज्ञ डॉ. गिरीश जाखोटिया यांनीही त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला. तसेच मित्र प्रसाद भट यांनी विस्ताराने आपले मत मांडले. हा लेख छापण्यासाठी वापरता येईल का अशीही विचारणा झाली. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या निमित्ताने घडलेल्या सकारात्मक गोष्टी...


आर्थिक उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरणाचा स्वीकार करीत असतांना नकळतपणे आपण आपल्या भारतीय मूळ विचारधारेपासून दूर जाऊ लागलो होतो. मा. गांधींनी म्हटल्याप्रमाणे खेडी समृद्ध होण्याऐवजी शहरीकरणाला प्राधान्य अधिक मिळाले. सुखाची कल्पना ही केवळ शारीरिक सुखाचा विचार करणारी झाली. त्यामुळे एक गरज पूर्ण झाल्यावर दुसरी उत्पन्न झाली. त्याचा हव्यास वाढला त्यातून गळेकापू व खिसेकापू स्पर्धा निर्माण झाली. पैसा आला तरी आनंदाबरोबर मानसिक ताणाची एक किनारही सोबत आली. या सर्वांचा परिणाम म्हणून सर्वत्र भोगवाद पसरला. त्यामुळे शोषण वाढले, निसर्गाचे ओरबाडणे वाढले आणि " सर्वे भवन्तु सुखिनः " चा आम्हाला विसर पडला. स्वार्थी व आत्मकेंद्रित समाज निर्माण झाला. त्यामुळे कोणीही सुखी समाधानी होऊ शकले नाही.

ज्या स्वदेशीचा अंगीकार करीत आम्ही स्वातंत्र्य मिळविले, खुल्या अर्थव्यवस्थेमुळे आम्ही स्वतःहून त्या स्वदेशीला दूर लोटले. उत्पादनाचा दर्जा आणि किंमत याचा अधिक विचार न करता आम्ही चिनी वस्तूंकडे, ऑनलाईन शॉपिंग, मॉल यासारख्या गोष्टीकडे अधिक आकर्षित झालो. पैसे कमविणे, संपत्ती निर्माण करण्यासाठीच्या साधनांचा शोध लावणे, निर्माण केलेल्या साधनांचे संरक्षण करण्यासाठी सत्ता मिळविणे यात वावगे असे काहीही नाही. मात्र त्याचा अतिरेक झाला कि सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचा धोका निर्माण होतो. अमर्याद संपत्ती निर्मिती, तिचा उपभोग व त्यातून निर्माण झालेली सत्ता शोषितच असते. त्यामुळे सोबत असणाऱ्या समाज बांधवांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येतातच. भांडवलदारांना पूरक वर्तनाने आम्हीच पं. दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलेल्या एकात्म मानववादाला हरताळ फासला.


योगी अरविंदानी म्हटल्याप्रमाणे समाजातील प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे सुख मिळावे, त्याच्या कामाचा आनंद मिळावा, मिळविले ते उपभोगण्यासाठी फुरसतीचा वेळ मिळावा आणि साधे, सोपे , समृद्ध व सुंदर जीवन जगता यावे हे उद्दिष्ट आहे. भारतीय विचारात भौतिक सुख आवश्यक मानतांनाच ते अपुरे आहे हे अधोरेखित केले आहे. त्यातच अडकून पडणे म्हणजे संपूर्ण सुखापासून वंचित राहणे आहे. सुख वस्तुनिष्ठ नसून त्याचा माणसाच्या भावभावनांशी जवळचा संबंध आहे. माणसाच्या शरीराबरोबरच मन, बुद्धी व आत्मा याचीही भूक असते. या सर्वांच्या एकत्रित सुखातूनच माणूस विकसित होतो. "आहार निद्रा भय मैथुनं च, सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् । धर्मो हि तेषामधिको विशेष:, धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥ " अर्थात आहार, निद्रा, मैथुन आदींमुळे जी सुखानुभूती होते ती मनुष्यप्राणी व पशुपक्षी या दोहोंमध्ये सारखीच असते. मानवी जीवनातील विशेषतः आहे ती म्हणजे धर्म. धर्माशिवाय वागणारी व्यक्ती पशुसमान असते. माणूस आणि प्राणी यांच्यात मूलभूत फरक आहे तो म्हणजे माणसासमोर काही ना काही ध्येय असते. ते ध्येय साकारणे हे माणसाचे मनुष्यत्व होय.

"कोरोना"च्या निमित्ताने लागू केलेल्या लॉक डाऊनने आपल्या जीवनशैली बद्दलचा विचार करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या जीवनाचा नक्की उद्देश काय ? सुख म्हणजे काय ? विकास म्हणजे काय ? का जगायचं ? कसं जगायचं ? आणि आनंदी कसं राहायचं ?  या मूलभूत गोष्टी समजून घेतल्यात, ज्याची जाणीव या फुरसतीच्या वेळात कळून घेतल्यास पुढील काळ आपला असेल. आपण ज्या गोष्टींसाठी पळत होतो, त्याची आवश्यकता होती का ? आहे का ? याचा विचार आगामी काळातील संधीचा विचार करतांना केला पाहिजे. ते अधिक हेतुपूर्ण व सुखी समाधानी जीवनाकडे घेऊन जाईल.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या निर्माण झालेल्या संधींचे काही उदाहरणे येथे देतो. अर्थात आपल्या मूळ विषयाशी संबंधित असलेल्या संधी निर्माण करतांना त्यांचा वापर करता येईल. "कोरोना"च्या लढाईत घराबाहेर पडतांना तोंडावर मास्क लावणे अनिवार्य आहे. आता एव्हढे मास्क कसे निर्माण करणार आणि येथेच ती संधी होती. जळगावातील हरी विठ्ठल नगरातील सेवावस्ती भागातील महिलांनी हजारो मास्कची निर्मिती केली. यापुढील काळात किमान वर्षभर तरी सोशल डिस्टंसिंग व मास्कचा अवलंब करावा लागणार आहे. येथे आपल्याला संधी अवश्य दिसेल. चांगल्या दर्जाचे व कमीत कमी किमतीचे मास्क बनवून त्याद्वारे चांगला रोजगार निर्माण होऊ शकतो. दुसरे उदाहरण वाचण्यात आले. सध्या उच्च दर्जाच्या व्हेन्टिलेटर्सची फार मोठी आवश्यकता भासणार आहे. जळगावातील एका इलेक्ट्रॉनिक इंजिनियरने आपण ते बनवू शकतो त्यासाठी काही मदत मिळावी अशी अपेक्षा सोशल मिडीयातून जाहीरपणे मा. जिल्हाधिकारी साहेबांकडे केली. जैन उद्योग समूहाने तात्काळ त्यासाठी आवश्यक असलेली जागा व कार्यशाळा उपलब्ध करुन दिले. तिसरे उदाहरण हे शेतीमालाशी संबंधित आहे. एक्स्पोर्ट क्वालिटीची ढोबळी मिरची, द्राक्षे, मोसंबी यासारख्या वस्तू बाहेर जाऊ शकत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार होते. त्यांनी येथे संधी शोधत आपल्या मालाला मागणी निर्माण केली व तसे राज्यभरात अनेक ठिकाणी पुरवठा केला.

"कोरोना"मुळे निर्माण झालेल्या या संधी लॉक डाऊन पश्चातच्या अनेक संधींना दिशा देणाऱ्या ठरणार आहे. आपण आपल्याला अशा काही संधी दिसत असतील, वाटत असतील तर त्या अवश्य सुचवा. पुढील भागात माझ्या कल्पनेतील संधींसह आपल्याही संधींचा समावेश करता येईल.

No comments:

Post a Comment