Saturday 14 August 2021

स्वातंत्र्यातील बंधनं (!) कुठे हरवलीत ?

स्वातंत्र्यातील बंधनं (!) कुठे हरवलीत ?

संपूर्ण देश आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. आपल्या सर्वांना या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा ! "स्वातंत्र्य माझ्या मनातील" या विषयावर एका माध्यमाने मला माझे विचार ध्वनिमुद्रित करून पाठविण्यास सांगितले आणि त्या विषयावर काही लिहावे असा विचारही तेथूनच आला. लेखाच्या शीर्षकातील परस्परविरोधी दोन शब्द वाचून आश्चर्य वाटेल मात्र संपूर्ण लेख वाचल्यावर माझे म्हणणे आपणास नक्कीच पटेल व त्याअनुषंगाने किमान वैयक्तिक जीवनात बदल घडवून आणल्यास स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने आनंद आपण उपभोगू शकू असा मला विश्वास आहे. 

देश स्वतंत्र झाला याचा अर्थ गुलामगिरी संपली, दुसऱ्याने घातलेली जाचक बंधने संपलीत, आम्ही  परकीयांच्या व आक्रमकांच्या अमलातून मुक्त झालो. त्यासाठी या देशातील क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने स्वातंत्र्याचा लढा लढला गेला. मार्ग, पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचे अंतिम ध्येय देशाला स्वातंत्र्य मिळविणे हाच होता. तत्पश्चात देशाने संसदीय लोकशाही स्वीकारीत आपली स्वतंत्र अशी राज्यघटना स्वीकारली. या संविधानाने  नागरिकांना आपल्या हक्क व कर्तव्यांसोबतच एक जागरुक नागरिक म्हणून त्यांच्या जबाबदारीची जाणीव दिली. "संविधान" म्हणजेच स्वतःच स्वतःवर घालून घेतलेली घटनात्मक बंधनांची चौकट स्वीकारली. स्वातंत्र्याला बंधनांची लाभलेली चौकट नागरिकाला स्वैराचारापासून वा अतिरेकी वागण्यापासून परावृत्त करते. 

मानवी जीवनात बंधनांना विशिष्ट स्थान असून त्यामुळेच त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. भारतीय तत्वज्ञानात "बंधनाला" विशेष महत्व दिलेले आहे. निसर्गतःच प्रत्येक जीवमात्राला काही बंधने घालून दिली आहेत. त्याचा योग्य आदर करीतच जीवन जगणे सर्व प्राणिमात्रांच्या हिताचे आहे. अलीकडच्या तंत्रज्ञानाच्या युगात व भौतिक सुखसोयींच्या मागे लागलेल्या मनुष्य प्राण्याने निसर्गाची हि बंधने झुगारलेली आपण पाहतो आहोत आणि त्याचे परिणामही भोगत आहोत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा स्वातंत्र्याचा संकोच करणारा ठरतो. परकीयांनी व आक्रमकांनी अशाच पद्धतीने केलेल्या अतिरेकाचा परिपाक स्वातंत्र्य लढ्यात पाहायला मिळतो. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी आपण आपल्या बंधनांना झुगारत स्वातंत्र्याचा अतिरेक करीत आहोत का ? असा विचार करण्याची गरज आहे. एका लेखात "स्वातंत्र्य" म्हणजे काय ? हे सांगत असतांना लेखकाने मुक्ती, हक्क व जबाबदारी या जाणिवांचा संगम असल्याचे म्हटले आहे. राजकीय दृष्ट्या आपण १९४७ साली स्वतंत्र झालो मात्र आपण आपली स्वतःवर स्वतःचं नियंत्रण असणारी सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, कौटुंबिक व्यवस्था गत ७५ वर्षात निर्माण करू शकलो का ? हा खरा प्रश्न आहे. 

आम्हीच निर्माण केलेले व स्वीकारलेले कायदे आम्ही पाळतो का ? सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना अपेक्षित असलेली साधनशुचिता अंगिकारली का ? भ्रष्टाचाराच्या, लाचखोरीच्या, हुंडाबळीच्या, फसवणुकीच्या, आपल्या कर्तव्यात कसूर करण्याच्या, चोरीच्या, दरोडेखोरीच्या घटना काय सांगतात ? मुलांनी आपल्या आईवडिलांना वागवावे यासाठी कायदा करावा लागतो याचा अर्थ काय ? आंदोलनाप्रसंगी केलेली सार्वजनिक मालमत्तेची नासधूस वा जाळपोळ काय सांगते ? विरोधी विचारांच्या व्यक्तींना ज्या पद्धतीने "टार्गेट" केले जाते, त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर शिंतोडे उडविले जातात याला काय म्हणायचे ? वाहन चालवीत असतानाच्या नियमांचे आपण किती सहज उल्लंघन करतो. यासर्व गोष्टी आपल्या स्वातंत्र्याचा अतिरेक नाही का ? 

लेखाच्या शीर्षकात म्हटलेले "स्वातंत्र्यातील बंधनं (!) कुठे हरवलीत ?" याचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल. "बंधनं" हा मानवी जीवनाचा अलंकार आहे. आपल्या घरातील व समाजातील ज्येष्ठ मंडळी बंधनांचा हा संस्कार आपल्या आचरणातून देण्याचा प्रयत्न करीत असतात. बंधन हे स्नेहबंधाचं प्रतीक आहे. बंधनांतच मानवाच्या हितांचे संरक्षण आहे. बंधनातच परस्पर कल्याण आहे, सामर्थ्य आहे, समृद्धी आहे, यश आहे. अभ्यासाचे बंधन पाळले तरच ज्ञान व कौशल्य मिळते, टीव्ही पाहण्याचे बंधन पाळले तरच मनोरंजन व विरंगुळा होईल, व्यायामाचे बंधन पाळले तरच शरीर निरोगी राहील, खाण्यापिण्याचे बंधन पाळले तरच आरोग्य टिकविता येईल. आधुनिकतेचा स्वीकार करीत असतांना आपल्या परंपरांचा विसर पडता कामा नये. तंत्रज्ञानाच्या मर्यादित वापरानेच त्याचा लाभ आपल्याला मिळेल. अशा प्रकारच्या बंधनातच आपले स्वसंरक्षण आहे. जेथे बंधन आहे तेथेच स्वातंत्र्य आहे आणि जेथे स्वातंत्र्य आहे तेथेच बंधन आहे. हे बंधनच आपल्याला एकत्रित करतात, बांधतात. बंधनांमुळेच परस्परातील विश्वास दृढ होतो. या विश्वासावरच बंध घट्ट होतात. असे घट्ट बंधच कालांतराने मानवी जीवनाला अर्थ प्राप्त करुन देतात आणि संरक्षणही करतात. बंधनातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे. त्यातच समाधान आणि आनंद आहे. 

चला तर मग अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी हक्क व कर्तव्यांची कास धरत स्वतःवर स्वतःच निर्माण केलेल्या बंधनांचा अंगीकार करत स्वातंत्र्याचा आनंद लुटू या ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४