Monday 26 April 2021

प्रथमेशचे अभिष्टचिंतन !



खरं तर चि. प्रथेमशचा वाढदिवस ११ एप्रिलचा ! मात्र आम्हाला तो लक्षात राहतो हनुमान जयंतीमुळेच... आपल्या मुलाचा २३ वर्षांचा प्रवास पाहून अभिमान वाटणं आणि त्यामुळे सुखावणं यासारखा दुसरा आनंद एका बापाचा असूच शकत नाही. २३ वर्षांचा हा लघुपट सहज डोळ्यासमोरून सर्र्कन पुढे सरकतो. आपल्या मुलासोबत होत असलेली आपली घडण नक्कीच त्यादृष्टीने महत्वाची ठरते. पालक-पाळ्या नात्याचं वय जसं वाढत जातं तसं मुलाच्या घडणीत पालक म्हणून आपली भूमिका क्षुल्लक वाटायला लागते आणि दुसऱ्या बाजूला मुलगा म्हणून आपल्या पालकांची भूमिका सर्वोच्च वाटते. पालक-पाल्य दोघांनी परस्परांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारले, परस्परपूरक भूमिका घेतल्या आणि वाढीच्या या कालखंडात दोघांनी एकमेकांकडून शिकायचे ठरविले तर कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्याच्यादृष्टीने त्याची अपरिहार्यता लक्षात येते. 

प्रथमेशच्या या प्रवासातील हे मर्म आपल्यासमोर मांडण्याचे औचित्य म्हणजे पुढच्या पिढीचे देणं मानतो. विद्यार्थ्यांमध्ये काम करीत असल्याने  पालक-पाल्य नात्याची वीण अधिक दृढ करण्यासाठीच्या प्रयत्नांचाच हा भाग असल्याने यात कुठेही प्रौढी मिळविण्याचा उद्देश नाही. वर म्हटल्याप्रमाणे पालक म्हणूनची भूमिका तात्कालिकच होती. नैसर्गिक वाढ हा सृष्टीच्या नियमाचा भाग अंतर्मनात ठेवला तर अनेक गोष्टी सुलभ होतात. संवादातील मोकळेपणा येथे विशेषत्वाने उपयुक्त ठरतो. आपले मत मांडून निर्णयाचे स्वातंत्र्य पाल्याला दिले तर होणारे परिणाम अधिक मॅच्युअर्ड (प्रगल्भ) ठरतात असा माझा अनुभव आहे. खलील जिब्रान यांच्या पालकत्वासंदर्भातील भावानुवादाचा खूप उपयोग झाला. लेखाच्या शेवटी आपणास तो वाचण्यास मिळेल. गीता परिवाराचे काम करणारे संजय मालपाणी यांच्या "दोन शब्द बाबांसाठी आणि दोन शब्द आईसाठी" या व्याख्यानातील "Don't  Worry that children never listen to you, worry that they are always watching you" या मौलिक मंत्राचाही तेव्हढाच उपयोग झाला. 

जीवन अनुभवातून मिळालेली शिकवण, त्याची कालसुसंगत परिस्थितीशी जुळवणी, त्यात अपेक्षित लवचिकता, थोरामोठ्यांचा विचार, त्यांच्यासोबतची चर्चा, विषयावरील प्रबोधन, वाचन यातून आपली स्वतःची पालकत्वाची भूमिका व तत्वे अधिक सुस्पष्ट होत जातात. पाल्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा कायम  विचार डोक्यात ठेवून पालकत्व निभावल्यास अपराधीपणाची भावना येण्याचा धोका टळतो. पाल्याचा आनंद त्याच्या प्रतिभेतून त्याला मिळणार असून आपण त्यातच आनंद मानणे आपल्या मानसिक समाधानाचे बीज आहे. पालकत्व निभावताना अपेक्षाभंगाचे दुःख येऊ नये यासाठीची आपापली वैचारिक बैठक विकसित करीत राहणे आवश्यक वाटते. त्याच्या यशस्वी वाटचालीसाठी आपण कायम त्याच्यासोबत आहोत हा विश्वास आपल्या कृतीतून दिसल्यास मुले अधिक फुलतात नव्हे त्यांना त्यांच्या वाढीचे सूत्र लवकर सापडतात. एक सुजाण, सजग व संवेदनशील माणूस बनणे एव्हढाच पालकत्वाचा उद्देश असावा असे मला वाटते. शेवटी त्याच्या आयुष्याचे सोने कसे करावे यासाठीची वैचारिक बैठक तयार करण्यास मदत करणे एव्हढीच आपली भूमिका असते. 

प्रथमेशचे महाविद्यालयीन शिक्षण जळगावातच पूर्ण झाले असून सध्या एका चांगल्या कंपनीत प्रशिक्षणार्थी इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. नोव्हेंबर महिन्यात घरातून बाहेर पडल्यापासून त्याचे निर्णय तो स्वतः घेतो आणि तशी त्याला पूर्ण मुभा आहे. आवश्यकता वाटल्यास अपेक्षित मदत कायम उपलब्ध आहे. मागील पाच महिन्यात तीन राज्यातील तीन शहरांमध्ये त्याचे वास्तव्य राहिले. त्या त्या ठिकाणाचा प्रवास, निवास, भोजन आदी सर्व व्यवस्था त्याने त्याच्या निर्माण केल्या. अर्थात त्यासाठी त्या त्या ठिकाणच्या कंपनीतील सहकाऱ्यांनी त्याला सहकार्य केले. आज त्याच्या जन्मदिनी अभिष्टचिंतन करतांना नक्कीच अभिमान वाटतो. त्याची मेहनत, सद्गुरुंचे आशिर्वाद आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा त्याची मनोकामना पूर्ण करतील अर्थात पालक म्हणून त्याचा सर्वाधिक आनंद आम्हास असेल. बाळा, खुप मोठा हो.... सुखी राहा... आनंदी राहा..!

खलील जिब्रान यांच्या मुलांवरील कवितेचा इंग्रजी भावानुवाद आपल्यासाठी ! 

तुमची लेकरं ही "तुमची" नसतात.

जीवनाच्या अतितीव्र आकांक्षेची मुलं आणि मुली असतात ती

ती तुमच्याद्वारे जन्मतात तुमच्यापासून नाही,

आणि ती तुमच्याजवळ असली तरी तुम्ही मालक नसता त्यांचे.


कदाचित तुम्ही त्यांना तुमचं प्रेम देऊ शकाल पण तुमचे विचार नाही देऊ शकत,

कारण त्यांच्याजवळ त्यांचे स्वत:चे विचार आहेत.

त्यांच्या शरीरांना तुम्ही घरकुल देऊही शकाल कदाचित पण त्यांच्या आत्म्यांना कदापी नाही,

कारण त्यांच्या अत्म्यांचा वास उद्याच्या गर्भात आहे.

त्यांच्या "उद्या"ला तुम्ही भेट देऊ शकतच नाही, अगदी स्वप्नातही नाही!

तुम्ही त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करु शकाल कदाचित

पण त्यांना तुमच्यासारखं बनवण्याचा विचारही करु नका.

आयुष्य कधीही भूतकाळात जात नाही आणि थांबूनही रहात नाही बदलाच्या प्रतीक्षेत.


तुम्ही एका धनुष्यासारखे असता ज्यावर स्वार झालेली तुमची मुलं

जणू एखाद्या जिवंत बाणासारखी भविष्याचा वेध घेणार असतात.

"तो" जगन्नियंता धनुर्धारी अनादि अनंत काळाच्या पटावर वेध घेतो एका दूरच्या लक्ष्याचा

आणि सर्वशक्तीने "तो" आकर्ण ताणतो प्रत्यंचा, तुम्ही, त्याचं धनुष्य, वाकेपर्यंत

कारण त्याचे ते बाण अतिजलद गतीने जावेत अतिशय दूरवर म्हणून.

तेव्हा आपलं ते धनुर्धार्‍याच्या हातातलं वाकणं आनंदाने स्वीकारा,

कारण "त्यालाही" जसे हे दूरवर जाणारे बाण आपलेसे वाटतात,

तशीच प्यारी असतात त्याला स्थिर असलेली धनुष्यही!


गिरीश कुळकर्णी

मित्र, समुपदेशक व संवादक

Tuesday 13 April 2021

वर्षारंभ आणि नवीन कार्याची दिशा !

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा ! वर्षारंभाचा दिवस हा नवीन कार्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा दिवस... आपल्या सर्वांच्या सहकार्याने व सहभागाने सामाजिक जीवनात एका नवीन कार्याचा आरंभ करीत आहे. आपणा सर्वांना नवीन कार्याची दिशा स्पष्ट करणारा...त्याअनुषंगाने विचारप्रवृत्त करणारा आहे. प्रत्येक व्यक्तीला उपयुक्त ठरणारा हा लेख आपल्या विशेष पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे... प्रत्येक वाचकाच्या प्रतिसादाची प्रतीक्षा राहील... 

माणूस जन्माला आल्यानंतर तो ज्या कुटुंबात, समाजात, परिस्थितीत आणि वातावरणात वाढतो त्या प्रमाणे त्याची जीवनविषयक धारणा तयार होत असते आणि कालांतराने जगण्याचा मार्गही...! यालाच आपण विश्वास (बिलीफ) म्हणतो दुर्दैवाने स्थळ, काळ, वेळ आणि परिस्थिती बदलते मात्र वरील मर्यादांवर आधारित धारणा बदलल्या नाहीत तर मोठा गोंधळ होण्याची शक्यता असते. प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने असे मर्यादांवर आधारित धारणा बदलण्याची मानसिकता तयार झाली आणि प्रवास सुखकर झाला. या प्रवासाने एक सूत्र नक्की गवसले आणि ते म्हणजे "Developing belief..." हेच आगामी काळातील मिशन असणार आहे. 

२०१५ मध्ये एनएलपी विषयावरील चार दिवसांच्या कार्यशाळेत सहभागी झालो होतो आणि अलीकडे डॉ. विवेक काटदरे सरांच्या "सिक्रेट ऑफ सक्सेस" या विषयावरील कार्यशाळांनी मानवाच्या जीवनविषयक धारणांचे महत्व जाणवले. आपले संपूर्ण जीवन आपण काही मर्यादित धारणांवर (Limiting belief) जगत असतो, त्यामुळेच जीवनातील अनेक चांगल्या सुखद अनुभवांना मुकत असतो आणि "हे शक्य नाही..." किंवा " मला जमणार नाही..." या नकारात्मक भावनांमध्ये अडकून पडतो. व्यावसायिक जीवनाचा सुमारे तीन दशकांचा कालखंड अशा अनेक मर्यादित धारणांना मोडून काढण्यात आणि नवीन धारणा विकसित करण्यात गेला. व्यावसायिक जीवनासोबतच जीवनातील विविध क्षेत्रातील धारणा बदलण्याची वा चिरंतन व शाश्वत धारणा विकसित करण्याची आवश्यकता वाटते. आगामी काळात त्यादृष्टीने कार्य करण्याचे निश्चित करीत आहे. 

आपल्या जीवनाबद्दल सतर्क असणं आणि त्यासंदर्भांतील जाणिवा प्रगल्भ करणे म्हणजेच स्वतःबद्दल जागरुक होणे होय. आपल्या आंतरीक उर्मीने, नाविन्याचा ध्यास घेऊन स्वतःच्या कौशल्याने बदल स्वीकारणे, बदल घडविणे म्हणजे खऱ्या अर्थाने सजग होणे होय. जीवनातील अनेक गोष्टी करीत असतांना जाणीवपूर्वक बुद्धी, मन व चित्त स्थिर ठेवून सावधपणाने कृती करणं माणसाला शहाणपण बहाल करतं. वास्तविकतेची कास धरत, उपलब्ध साधनांची जाणीव ठेवत आपल्या कामाचे सुयोग्य नियोजन करणे यासाठी अत्यावश्यक आहे. आपल्या आचार, विचार व कृतीला, संयम आणि सातत्याने तटस्थपणे जोखत (तपासात) राहणे साक्षात्कारी ठरते आणि त्यातूनच आत्मज्ञान होत नवीन धारणा विकसित होतात असे मला वाटते. 

 यशस्वी जीवनासाठी आपल्या मर्यादित धारणांविषयीचा अनाठायी आग्रह सोडण्याची गरज आहे. "लोक काय म्हणतील ?" या समस्येवर मात केली पाहिजे. त्यासाठी मी जे पण करेल ते योग्यच अशा विश्वासाने व उत्साहाने कार्यरत राहणे म्हणजेच धारणा विकसित करणे होय. कामाच्या सुरवातीचा आपला उत्साह कायम टिकवून ठेवणे हि यशस्वीतेसाठीची पूर्वअट आहे. यासाठी आपण करीत असलेल्या प्रत्येक कार्यात आपली भावनिक गुंतवणूक असली पाहिजे. केवळ भावनिक गुंतवणूक पुरेशी नसून त्यासाठी कार्याप्रतीची आपली बांधिलकी तेव्हढीच महत्वाची आहे. उत्साह टिकून राहण्यासाठी केवळ बांधिलकी पुरेशी नसून आपण करीत असलेल्या कार्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. कार्यावरची निष्ठा, अनुभवातून आलेले शहाणपण व स्वीकारलेली जीवनावश्यक मूल्ये यावरच श्रद्धा जोपासली जाते. काम कोणतेही असो छोटे वा मोठे, कंटाळवाणे वा आनंददायी, अंतिम लक्ष्य ठरलेले असलं तर आपण करीत असलेली कार्ये अर्थपूर्ण वाटतात. त्यातूनच मोठे उद्दिष्ट साकारले जाते. उद्दिष्ट साकारणाऱ्या व्यक्तीच लौकिक अर्थाने यशस्वी ठरतात. 

 जीवनाला अर्थ प्राप्त करुन देण्याच्या क्षेत्रात यापुढे कार्य करायचे आहे. अर्थात आम्ही फक्त साधन राहणार आहोत. ज्याला त्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागते, आणि ती तो लढत असतोच. हि लढाई लढत असतांना अनेक अडचणी येतात. या अडचणीच आपल्या वाटचालीतील अडथळे असतात ते दूर करण्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची आवश्यकता असते, त्यासाठीच हि धडपड नव्याने सुरु करावयाची आहे. आपण सोबत आहेत या खात्रीसह थांबतो... 

आपणा सर्वांना प्लव नाम संवत्सराचा मनापासून शुभेच्छा व निरामय दीर्घायुष्यासाठी कामना ! 

गिरीश कुळकर्णी 
९८२३३३४०८४