Sunday 4 December 2022

आत्मविश्वास, खिलाडूवृत्ती व फिटनेस देणारी खानदेश रन २०२२

मागील वर्षी खानदेश रनमध्ये उशीर झाल्याने व शेवटच्या मिनिटापर्यंत ओळख व आदी गोष्टींचा वापर करूनही सहभागी होता आले नव्हते. त्यामुळे यावर्षी मॅरेथॉनच्या एक महिना अगोदर (दि. २० ऑक्टोबर) नोंदणी करून सहभाग निश्चित केला. धावण्यापेक्षा चालण्याचा नियमित सराव सुरु होता. शेवटच्या आठवड्यात धावण्याचा सराव केला. बंधू राजेशभाई व तरुण मित्र संदीप यांची उत्तम साथ मिळाली. धावण्यासाठी सर्वात महत्वाचा स्ट्रेचिंगचा धडा त्यांनी दिला. जळगाव रनर ग्रुपने नोंदणी केलेल्या सर्व धावपटूंसाठी आयोजित केलेल्या एकही ट्रेनिंग सत्राचा लाभ घेऊ शकलो नाही. मागच्या दोन मॅरेथॉनचा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी १० किमी धावण्यासाठी ७५ मिनिटे उद्दिष्ट ठेवले होते. 

सामूहिकतेचा आनंद देणाऱ्या व आपल्या स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देणाऱ्या या मॅरेथॉनबद्दल प्रचंड आकर्षण, कुतूहल व आतुरता असते. एक दिवस अगोदर जाऊन BIB अन्य साहित्य घेतले. मानसिक तयारी उत्तम होती. आदल्या दिवशी राजेशभाईंशी बोलून सकाळी ५.३० ला निघायचे ठरल्याप्रमाणे सकाळी घराजवळ भेटलो आणि परिसरातील एक जोडपे तयारीनिशी निघाले येथून सुरु झालेला खानदेश रनचा उत्साह आयोजकांच्या शेवटच्या आनंदोत्सवापर्यंत कायम होता. सागर पार्कवर जातांना वातावरण विश्वास वाढविणारे होते. स्ट्रेचिंग झाले आणि तो थरार अनुभवण्यासाठी आम्ही सिद्ध झालो होतो. थरार हो थरारच कारण विश्वासासोबत १० किमी पूर्ण करू शकू का हि मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी भीती होती. तिला जोड जळगावातील रस्त्यांची स्थिती पाहता पाय लचकणे, मुरगळणे वा अडखळून पडणे अशी धास्ती होती. धावण्यास सुरुवात झाली, मनात काही गणिते आखली जात होती, सुरुवातील वेग थोडा कमी ठेवायचा मात्र जरा जास्त यानंतर धावायचे, रस्त्याचा चढ आला कि चालायचे. एका तरुणी माझी मोटिव्हेशन ठरली. आम्ही पुढे मायेचं होतो. साधारण ५ किमी नतर ती मागे पडली आणि मग मी एक चाळिशीतील तरुण निवडला. आम्ही पुढे मागेच धावत होतो. सरासरी ३०० पावले धावणे मग १०० पावले भरभर चालणे असे सुरु होते. 

संगीत, बँड, पुष्पवृष्टी या गोष्टी उत्साह वाढविणाऱ्या होत्या त्याहीपेक्षा महत्वाचे दोन पायांची जिवंत माणसे प्रोत्साहन देत होती. कम ऑन, बढिया, चलो मत दौडो मध्येच कोणी तरी ओळखीचा सर १० किमी असे आश्चर्याने विचारत होते. कुठे पाणी प्यायचे, किती प्यायचे याचेही मनातल्या मनात गणित मांडत होतो. पहिला टप्पा संपण्यापूर्वी एकाने थोडंच राहिलं असं म्हणून आशा जागवली, तेथून परततांना परीक्षा पाहणारे रस्ते व चढ अधिक होते. मात्र रस्त्यातील १०८ कुंडी यज्ञासाठीची मंडळी व लगबग उभारी देणारी ठरली. मध्येच २१ किमी धावणारे धावपटू पाहून प्रेरणा मिळत होती. कुठे तरी झिफ्फर क्लबचे बायपास झालेले आजोबा पाहून तर आणखीनच आत्मविश्वास वाढत होता. ओळखीची मंडळी भेटून नावानिशी बोलले कि वेग वाढायचा. दुसरा टप्पा पूर्ण करतांना ओळखीच्या राजू उपासनीने व्हिडीओ नंतर पाठवतो असे म्हटले. भारत भ्रमण करणारे DJ Shiva व चैतन्यदायी मित्र ऍड. सागर चित्रे यांना पाहिले आणि ड्रेन होणारी बॅटरी पुन्हा चार्ज झाली, ती संपलीच नाही. 

अंतिम टप्प्याचा माहोल हा जबरदस्त असतो आणि होता, आपणही मानसिकदृष्ट्या विजयी झालेले असतो त्याचाही परिणाम होतो. तेथेही दोन-चार जण वेग वाढविण्यासाठी असतात. कधी कधी तेच अंतिम रेषेजवळ नेऊन सोडतात. ... आणि ८२ मिनिटे व २६ सेकंदात, ३१३ धावपटूत २०९ वा, त्यातील २५४ पुरुषात १८१ वा व वय वर्ष ४१-९९ गटातील ११४ पुरुषात ७७ वा क्रमांक मिळवत १० किमीची मॅरेथॉन पूर्ण केली. प्रेरणास्थान असलेले आदरणीय अशोकभाऊ जैन,  JRG चे किरणदादा बच्छाव, विक्रांत सराफ, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. रवी हिराणी, अन्य परिचित व प्रत्येक धावपटूंमुळे हे अंतर पार झाले. मग इतरांचे अंतर पूर्ण करण्यासाठी त्यांचा मोटिव्हेटर झालो. बंधुवर्य राजेशभाई मागे राहिले होते आणि त्यांची आतुरतेने वाट पाहत होतो. १७ मिनिटांनी ते आले आणि खऱ्या अर्थाने माझ्यासाठी खानदेश रन पूर्ण झाली. 

शारीरिक तंदुरुस्तीबाबत आत्मविश्वास देणारी, इतरांना विजयी करण्यासाठी आवश्यक असणारी खिलाडूवृत्ती देणारी, आदरणीय मोठ्या भाऊंची Leave this world better than you found it ची शिकवण देणारी खानदेश रन २०२२ पूर्ण झाली ती खानदेश रन २०२३ च्या आशेने व ७५ मिनिटांच्या उद्देशाने... जय हिंद ! भारत माता कि जय ! 

गिरीश कुळकर्णी 

Friday 2 December 2022

जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी गीताई - बहिणाईची कविता


जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी गीताई - बहिणाईची कविता 

आज ३ डिसेंबर गीता जयंती आणि बहिणाबाई चौधरींची पुण्यतिथी ! खरं तर हा योगायोग आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते आणि बहिणाबाईंची पुण्यतिथी ३ डिसेंबरला... भगवंताने धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने अखिल विश्वाला जीवन विकासाचे तत्वज्ञान देणारी गीता सांगितली  तर दुसऱ्या बाजूला मानवी जीवनाची गीता  बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून अतिशय सोप्या भाषेत उलगडून  सांगितली. मला कोठेही तुलना करायची नाही कारण या दोनही साहित्यकृती श्रेष्ठतम आहेत. भगवद्गीतेवर टिपण्णी करण्याची माझी पात्रता नाही आणि बहिणाबाईंच्या कवितेवर लिहिण्यासाठी मला शब्दच सापडत नाही. तरीही...

अतिशय प्रतिभासंपन्न असलेल्या सरस्वतीच्या लेकीने जीवनाशी संबंधित असलेल्या अनेक विषयांवर सहजतेने लिहिले आहे. त्यामुळेच खान्देशकन्या वा निसर्गकन्या म्हणून बहिणाबाईंना बंदिस्त वा मर्यादित करणे मला त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे वाटते. त्यांच्या प्रत्येक कवितेतून आपल्याला त्यांच्या प्रज्ञेची (बुद्धीची) प्रचिती येते. ज्ञान प्राप्त करता येते, प्रज्ञा दैवी देणगी असते. कधीही कोणत्याही शाळेत न गेलेल्या बहिणाबाईला एव्हढं सर्व ज्ञान कुठे मिळालं असेल ? त्यांच्या कविता वाचल्यानंतर "हे बावनकशी सोनं आहे ! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे गुन्हा आहे" असं प्र. के. अत्रेंनी म्हटलं आहे. अर्थात बावनकशी सोनं ओळखण्यासाठी त्यांच्यासारखा रत्नपारखी असणे गरजेचे. त्यांच्या व सोपानदेव चौधरी यांच्यामुळे हे सोनं तुम्हा-आम्हा सर्वांपर्यंत पोहोचलं आहे. हे पूर्ण नाही कारण त्याकाळी जेव्हढं लिहिलं गेलं तेव्हढंच आपल्यासमोर आलं आहे. कितीतरी तर त्यांच्याबरोबरच गेलं. असो.

पिढ्यानपिढ्या जिवंत राहील अशी हि काव्यनिर्मिती आहे अगदी भगवद्गीतेसारखीच. बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून सांगितलेलं जीवनाचं तत्वज्ञान उत्स्फूर्त आहे. बोलीभाषेतील या कविता अगदी सहज हृदयाला भिडतात. त्यांच्या कवितेत कधी कल्पनेची भरारी दिसते तर कधी वैधव्याची हृदयभेदक करुणा, कधी संसाराची रहस्ये आहेत तर कधी शेतकरी जीवन आहे. एका बाजूला शुद्ध प्रेमाची शिकवण आहे तर दुसऱ्या बाजूला माणसाच्या स्वार्थीपणातून निर्माण झालेल्या कृतघ्नतेची चीड आहे. कुठे प्रश्न, कुठे विनोद, कुठे उपरोध ! त्यात लय आहे, सूर आहे, ताल आहे, जिव्हाळा आहे, आपलंपण आहे... थक्क करणारं व "चमत्कारा"ची जाणीव करून देणारं हे काव्य. पण हे बहिणाबाईंचं काव्य आहे याची वास्तव जाणीव करून देणारंही आहे. केवळ खाणंच अधाशासारखं करता येतं असं नाही तर वाचनही करता येतं  असे हे महाकाव्य  - बहिणाईच्या कविता - आपल्यासाठी गीताच !


जुन्या जळगावात चौधरी वाड्यात बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात केलेले आहे. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट त्याचे देखभाल करते. या संग्रहालयात बहिणाबाईंच्या रोजच्या वापरातली शेतीची अवजारे, स्वंयपाकाच्या वस्तू, भांडी, पूजेचे साहित्य आहे. संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंचे, आठवणींचेच संग्रहालय नाही तर मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या, कृषी संस्कृती जपणाऱ्या, कष्टकरी मातृशक्तीच्या श्रमाचा ठेवा आहे. येणाऱ्या सर्व पिढ्यांना हे पाहता येणार आहे. गरज आहे त्याचे मोल जाणून घेण्याची आणि पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याची... त्यासाठी आजच्या दिनी आपण या संग्रहालयाला आपल्या कुटुंबियांसह अवश्य भेट द्या ! या पवित्र वास्तूत आपल्याला वेगळी अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. सोबतच दिवसभरात आपल्याला बहिणाबाईंच्या कविता जेथेही मिळतील त्या वाचा, ऐका... वाचून दाखवा ! काही कवितांमधली मला भावलेली कडवी येथे देत आहे. 

येहरीत दोन मोटा ,  दोन्हीमधी पानी एक

मोट हाकलतो एक , जीव पोसतो कितीक ?


अरे वारकऱ्या तुले , नही ऊन वारा थंडी 

झुगारित अवघ्याले , आली पंढरीची दिंडी 


अरे पांडुरंगा, तुझी , कशी भक्ती करू सांग 

तुझ्या रुपाआड येत , सावकराचं रे सोंग 


नको लागू जीवा , सदा मतलबापाठी 

हिरिताचं देनं घेनं , नही पोटासाठी 


जरी फुटल्या बांगड्या, मनगटी करतूत

तुटे मंगयंसुतर, उरे गयाची शपथ 


देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते 

लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते 


लागे पायाला चटके , रस्ता तापीसनी लाल

माझ्या माहेराची वाट , माले वाटे मखमल 


शिलगावली रे काडी , जोत पेटली पेटली 

आंधाऱ्याले ब्याहीसनी , मेली इझीसनी गेली 


मानसापरी मानूस , राहतो रे येडजाना  

अरे होतो छापीसनी , कोरा कागद शहाना


आता फिरली आरती , भजन गेलं सरी

'बह्यना' देवाचिया दारी , उभी क्षनभरी

आपल्याला जर कविता मिळाल्या नाही तर मला ९८२३३३४०८४ या क्रमांकावर जरूर फोन करा. बाहेरगावच्या मंडळींना जळगावात बघण्यासारखे काय आहे असं प्रश्न असेल तर बहिणाबाईंच्या घराला जरूर भेट द्या आणि आयुष्यभरासाठी आठवण घेऊन जा !

गिरीश कुळकर्णी

Saturday 29 October 2022

बिट्स पिलानी , ललित कला केंद्र गुरुकुल आणि सिग्नेचर

 बिट्स पिलानी आणि पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांसाठी ते या संस्थेचे विद्यार्थी आहेत हि सर्वात मोठी सिग्नेचर (ओळख ) आहे असे मला वाटते. आता हे काय नवीन असे आपल्याला वाटू शकते. तरुणांशी बोलणे मला नेहमीच समृद्ध करणारे ठरते आणि त्यातूनच हे समीकरण मला सापडले आहे. 

सध्या दिवाळीच्या निमित्ताने मृण्मयी जळगावात आहे. नेहमीप्रमाणे जळगावातील महत्वाच्या भेटी सुरु आहेत. त्यातील एक भेट मित्रवर्य प्रदीप रस्से यांच्या घरी झाली. त्यांचा परिवार आणि आम्ही दोघे साधारण दीड तास गप्पा मारत होतो. गेल्या गेल्या छानसा फराळ आणि चहा घेत गप्पा सुरु झाल्या. रस्से सरांनी आपल्या सवयीप्रमाणे मृण्मयीकडून काही नवीन मिळते का हा प्रयत्न केला. मृण्मयी सध्या ललित कला केंद्रात कथक विषयाचे शिक्षण घेत आहे. मलाही अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. उत्तरेकडील संस्कृती आणि दक्षिणेककडील संस्कृती यातील फरक त्यातही शास्त्रीय व आधूनिक प्रकारावर हि चर्चा होती. दक्षिणेकडील कला क्षेत्रातील संस्कृती आपली ओळख टिकवून आहे. त्याचे कारण त्यांनी त्यातील सात्विकता जपली. उत्तरेकडे या कलांना 
राजाश्रय मिळाला आणि त्यामुळे त्यांच्या आवडी जोपासताना फर्माईशी, मुजरा यासारख्या गोष्टी आल्यात. त्यामानाने दक्षिणेत त्याचा फारसा प्रभाव पडला नाही आणि त्यामुळे त्या आपल्याला त्यांचा शास्त्रीय बाज सोडलेल्या दिसत नाही. कथक नृत्य शैलीचे साधक त्या कलेचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे असेही ती म्हणाली. संधी निर्माण झाली आणि तिच्या मागे धावायला लागलो अन त्यामुळे जर साधना खंडित झाली तर कलाकार लवकर संपतो अशी ती चर्चा होती. मला आनंद आहे मृण्मयी संधी पेक्षा साधनेला प्राधान्य देईन असे म्हणाली. 


काही वेळानंतर प्रथमेश व पार्थ दोघे आमच्या चर्चेत सामील झाले. प्रथमेश सध्या बिट्स पिलानी या संस्थेत पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत आवश्यक असलेले साहित्य व यंत्रसामग्री याकडे लक्ष देत आहे. प्रसंगी त्याला या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळते आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात ७-८ वर्षे काढलेल्या प्रथमेशला येथे एक महिन्याची सुट्टी मिळणार आहे आणि त्याचे विशेष अप्रूप आहे. खासगी क्षेत्रातील अतिरिक्त ताण येथे नाही व मायक्रोबायोलॉजी क्षेत्रातील अनेक अनुभव संपन्न शास्त्रज्ञांशी त्यामुळे संवाद व सहवासाची त्याला संधी
मिळते आहे. अतिशय आनंदी व समाधानी व्यक्तीचं आपल्या कार्याला न्याय देऊ शकतो व तसे वातावरण वा वर्क कल्चर देण्याची जबाबदारी संस्थांची आहे असे मला वाटते. नोकरी व्यवसायातील त्याचा अनुभव फारच बोलका होता व माझ्यासारख्या तुलनात्मक अभ्यास करणाऱ्याला त्यातून खूप काही नवीन शिकायला मिळाले. बोलता बोलता बिट्स पिलानीतून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या मुलाखतीच्या यांत्रिक प्रक्रियेशिवाय खूप मोठी पॅकेजेस दिली जातात अर्थात त्यासाठीची कॉर्पोरेट हाऊसेसची गणिते ते सांभाळतात. जैन इरिगेशन सिस्टिम्स ली.चे संचालक श्री. अतुलभाऊ जैन यांनी त्याच्या घेतलेल्या मुलाखतीची आठवण त्याला झाली आणि या उद्योग समूहाच्या जडणघडणीचीही चर्चा झाली. 

त्यानंतर वास्तुकला अर्थात आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण केलेल्या व ज्याच्या आराखड्यानुसार रस्से यांनी आपल्या घराचा वरचा मजला बांधला त्या त्यांच्या पार्थकडे चर्चा वळली. त्यासाठी आम्ही सर्वजण वरच्या मजल्यावर गेलो. तसा फारसा न बोलणारा पार्थ प्रश्नांची उत्तरे देत होता. घरात केलेल्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देतांना त्यामागील शास्त्रीय दृष्टिकोनही मांडत होता. घरामध्ये पुरेसा प्रकाश व हवा खेळती राहण्यासाठी पुढे व मागे सोडलेली जागा हे वैशिष्ट्य. पुढच्या गॅलरीत केलेले डिझाईन, संध्याकाळी सूर्य मावळताना त्या डिझाईनची पडणारी छाया, त्यातून निर्माण होणारे दृश्य मोहक असते. त्यांच्या वरच्या मजल्यावर पूर्वीच्या काळात धाब्याच्या घरात आढळणारा झरोका येथेही आढळला. तसा आम्ही तो आमच्या घरातही केला आहे. माझ्यासाठी परंपरा व उजेड हा त्याचा उपयोग. पार्थने त्यात भर घालून घरातील तापलेली उष्ण हवा वरच्या बाजूला जाते
आणि तिला बाहेर जाण्यासाठी हा झरोका विशेष कार्य करतो हि दिलेली माहिती महत्वाची वाटली. माझा आर्किटेक्ट मित्रांना एक प्रश्न असतो कि तुम्ही तयार केलेल्या आराखड्यानुसार बांधलेल्या घराची ओळख कशी सांगता येईल. जसे कि एक विशीष्ट आकार किंवा डिझाईन किंवा विशेष खूण काय सांगशील. मला तशी सिग्नेचर असण्याची आवश्यकता वाटत नाही असे चाकोरीबाहेरचे उत्तर त्याने दिले. त्यातही महत्वाचे माझ्या ग्राहकाला येणाऱ्या समस्या सोडविणे हि माझी ओळख राहील असे म्हणाला. मी म्हटले पण हे लोकांना कळणार कसे ? त्यावर त्याचे उत्तर मला विशेष भावले ते म्हणजे आपल्याकडील लोकांचा अशा डिझाइनकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला घडवावा लागेल. 

मित्रहो आता आपल्याला लक्षात आले असेल माझे वाक्य बिट्स पिलानी व पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र हे सिग्नेचर कसे आहेत ते ! हल्लीच्या युवा पिढीबद्दल अनेक नकारात्मक टिपण्णी ऐकतांना हि सकारात्मकता मला अधिक प्रगल्भ बनविणारी आणि या पिढीबद्दल आशा निर्माण करणारी वाटते.  आपल्या प्रतिक्रिया महत्वाच्या...

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Monday 10 October 2022

जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने...

९ ऑक्टोबर ! जागतिक टपाल दिन... जळगाव पोस्ट ऑफिस व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टपाल तिकिटावरील गांधीजी हि चित्र प्रदर्शनी व केला पाकिटाचे विमोचन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने आजचा हा लेख...

आमच्या कुटुंबासाठी पोस्ट ऑफिस हा नेहमीच हृदयाजवळचा विषय राहिला आहे. माझे वडील स्व. विष्णू काशिनाथ कुळकर्णी पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीला होते. सुरुवात मेल-ओव्हरसिअर म्हणून धडगाव येथे झाली. त्यानंतर धुळे पोस्ट ऑफिसमध्ये बराच मोठा काळ ट्रेझरर होते. त्यानंतर शहादा तालुक्यातील म्हसावद येथे सब-पोस्ट मास्तर म्हणून पदोन्नतीने सेवा दिली. त्यानंतर धुळ्याच्या देवपूर व विद्यानगरी पोस्ट ऑफिसमध्ये सब-पोस्ट मास्तर म्हणून सुमारे ३ दशकांहून अधिक काळ नोकरी करून १९९५ मध्ये सेवानिवृत्त झाले. 

मला या खात्याचा नेहमीच अभिमान वाटला आहे. वडिलांच्या नोकरीमुळे अनेकदा पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याचा योग आला. तात्कालिक परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचे ग्राहक भांडार धुळे येथे होते. त्यामुळे अनेकदा किराणा सामान घेण्यासाठी आम्ही कार्यालयात जात असू. पोस्टातील कर्मचाऱ्यांना फार पगार नव्हता. त्यांच्याबद्दलची एक विशेष प्रतिमा समाजमनात होती. वडिलांनी आपल्या नोकरीच्या जोरावर आपला परिवार वाढविला. अनेकदा अतिरिक्त कामामुळे त्यांना ओव्हरटाइमही मिळत होता. ट्रेझरर या कामात त्यांनी कौशल्य अवगत केल्यामुळे आपल्या ब्रँचचे काम झाल्यानंतर ते मुख्य कार्यालयात अतिरिक्त वेळ देत असत. आम्हा तिघंही भावांचे शिक्षण, घर, लग्नकार्ये, आजारपण, परिवारातील अन्य सदस्यांची जबाबदारी स्वतःहून घेऊन या सर्व गोष्टी पोस्ट ऑफिसच्या भरवश्यावर केल्या. उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नव्हते. केवळ प्रामाणिक काम व कष्ट हि त्यांची बलस्थाने होती व ती त्यांनी आयुष्यभर सांभाळली. स्व. अमृत देशपांडे यांच्यासारखे आयुष्यभराचे मित्र मिळाले. वडिलांच्या निधनापश्चात काकांनी आपला मित्रत्वाचा धर्म शेवटपर्यंत पाळला. आजही त्यांच्या परिवाराशी आमचे संबंध आहे. पिंगळे काका, जग्गू काका हे मित्र तर अग्निहोत्री व बदामे यासारखे सहकारी त्यांना लाभले. या सर्वांप्रती आजच्या या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करतो. 

प्रशिक्षण क्षेत्रात काम करीत असल्याने जळगाव, भुसावळ, चाळीसगाव व नाशिक इ. ठिकाणी पोस्टातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची संधी अनेकदा मिळाली. दळणवळण / संवाद क्षेत्रात पोस्ट ऑफिसचे काम महत्वपूर्ण ठरते. त्याकाळी बचतीची सवय सामान्यजनांना पोस्ट ऑफिसने लावली. राष्ट्रीय बचत पत्र (NSC) किसान विकास पत्र (KVP), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आवर्त ठेव योजना(RD), मुदत ठेव योजना (FD), मासिक व्याज योजना (MIS) यासारख्या अनेक योजना पोस्ट ऑफिसने राबविल्या. पोस्टाची एजन्सी घेऊन अनेक कुटुंबे उभी राहिली. विशेषतः महिलांनी एजंसी घेतल्यास त्यांना ४ टक्के कमिशन मिळत असे, पुरुष एजंटास मात्र १ टक्का कमिशन मिळत असे. सेवा क्षेत्रातील सर्वात मोठी व विश्वासार्ह सेवा म्हणून पोस्ट ऑफिसकडे पहिले जाते. अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत पोस्ट ऑफिसने कात टाकली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .बँकिंग क्षेत्रातही पोस्ट ऑफिसने आपले पाऊल टाकले आहे. टपाल हि संवादाची जीवनरेखा म्हणून काम करते. आज संवादाची इतकी साधने उपलब्ध असतांनाही पोस्ट ऑफिस आपले स्थान टिकवून आहे. प्रसंगी तोटा सहन करीत सरकारही जनतेच्या हितासाठी हि सेवा सुरु ठेवत आहे हे विशेष म्हटले पाहिजे. 

कधीतरी नोकरीची खास बातमी तर कधी तरी ताईची राखी, कधी कुलदेवीचा प्रसाद तर कधी गीतादर्शन मासिक, कधी शुभ कार्याची बातमी तर कधी शोक संदेशही, कधी मनिऑर्डर तर कधी VPP , कधी पोस्ट कार्ड, कधी अंतर्देशीय पत्र, कधी पाकीट, कधी भेट कार्ड, कधी लग्नपत्रिका या सर्व गोष्टींकरिता गल्लीत टपाल वाटपासाठी येणारे पोस्टमन काका हे आपल्या घरातील एक सदस्यच होते. मुलीच्या वडिलांनी संपर्क करतांना जोडकार्ड पाठविण्याची पद्धत होती जेणेकरून उलटटपाली उत्तराची अपेक्षा असायची. ऊन , वारा व पाऊस याची कधी तमा त्यांनी बाळगली नाही. सायकलला लावलेली पोस्टाची बॅग, त्यात सॉर्टींग करून लावलेले टपाल, पोस्टाचा खाकी गणवेश घातलेला... कधी राग नाही कधी चिडचिड नाही... आपलं काम इमानेइतबारे करणारे पोस्टमन काका !


उन्हाळ्यात सहज काका पाणी घेता का किंवा दिवाळीत फराळाला आवर्जून बोलवली जाणारी व्यक्ती म्हणजे पोस्टमन काका ! टपाल तिकीट हा मुलांसाठीचा तर एक छंदच. प्रत्येक मुलाने त्याकाळी अशी अनेक तिकिटे गोळा केलेली मला आठवतात. 

पोस्ट ऑफिस म्हटले कि , काउंटर, लाल टपाल पेटी, तेथील विशिष्ट प्रकारचा वास असलेला डिंक, तो वापरण्यासाठी ठेवलेली काडी, गोपनीय कागदपत्रे पाठविताना पाकिटे सील बंद करण्याची विशिष्ट पद्धती, पोस्ट कार्ड वा तिकिटे घेण्यासाठी गेले असता एका विशिष्ट प्रकारच्या सुरक्षा जाळीच्या आत बसलेली व्यक्ती, वाटप करावयाच्या टपालावर शिक्के मारण्याची एक विशिष्ट पद्धत आणि त्यामुळे निर्माण होणारा तालबद्ध आवाज... टपाल इप्सितस्थळी लवकर पोहोचावे यासाठी अनेकदा RMS मध्ये जाऊन टपाल दिलेले मला आठवते. एक टिपिकल मध्यमवर्गीय अवतार असलेले कर्मचारी हि पोस्टाची ओळख. अलीकडे रूप बदललेली ऑफिसेस व माणसे काही ठिकाणी दिसत असली तरी अपुरी जागा, अपुरा स्टाफ, त्यामुळे स्वाभाविकपणे मिळणारा प्रतिसाद या सर्व गोष्टी आता बऱ्याच प्रमाणात बदलल्या आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी करावी लागणारी तडजोड तरुण पिढी सहज स्वीकारतांना दिसत असली तरी दोन-चार वर्षाची सेवा राहिलेल्यांची मानसिकता सर्व ठिकाणी आढळते तशीच आहे. ज्याप्रमाणे बस , रेल्वे यांना पर्याय म्हणून उभी राहिलेली खासगी बस सेवा त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसला पर्याय देणारी कुरिअर सेवा ज्याप्रमाणे वाढली तशी बस, रेल्वे वा पोस्ट ऑफिसेस या सरकारी सेवा सक्षम व फायदेशीर का ठरत नाही हा प्रश्न अनुत्तरित राहतो. असो आजच्या जागतिक टपाल दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा ! नवीन पिढीला या सेवेची ओळख करून देणे अगत्याचे ठरते. 

काही विशेष घटना...

- १७६६ मध्ये वॉरन हेस्टिंग्ज यांच्या पुढाकाराने ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पोस्टल सेवा सुरु केली. 

- १८५४ मध्ये लॉर्ड डलहौसी यांच्या पुढाकाराने भारतीय पोस्टल कायदा १८५४  अस्तित्वात आला. 

- १,५४,९६५ पोस्ट ऑफिसेसद्वारे सेवा देणारी जगातील सर्वात मोठे नेटवर्क असलेली संस्था म्हणजे पोस्ट ऑफिस.

- ४,१६ ,०८३ कर्मचारी वृंद

- पहिले तिकीट जुलै १८५२ मध्ये इश्यू केले गेले. सिंदे डाक असे त्या तिकिटाचे नाव होते व त्याची किंमत अर्धा आणा होती.

- २१ नोव्हेंबर १९४७ रोजी स्वतंत्न भारताने आपले पहिले डाक तिकीट इश्यू केले. त्याचे किंमत ३ आणि अर्धा आणा होती. 

- १५ ऑगस्ट १९७२ श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी तयार केलेली पिन कोड सिस्टीम लागू करण्यात आली. 

- आजपर्यंत ३००० हुन अधिक तिकिटे विभागाने मार्केटमध्ये आणली.  

- १३५ वर्षांची मनी ऑर्डर सेवा २०१५ मध्ये बंद करण्यात आली. 

- १६० वर्षांची टेलिग्राफ सेवा २०१३ मध्ये बंद करण्यात आली.

- सध्या उपलब्ध असलेले पोस्ट तिकिटे ३१ जानेवारी २०२३ नंतर बंद करण्यात येणार आहेत व बारकोड असलेले तिकिटे वापरात येणार आहे. 

- सध्या पोस्टकार्डची किंमत ५० पैसे असून इनलँड लेटरची किंमत रु. २.५० आहे. 


गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Saturday 10 September 2022

आधारवड दादा !

आधारवड दादा अर्थात राजाभाऊ याज्ञीक ! आज ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या निरामय आयुष्यासाठी व शतायुषी वाटचालीसाठी आमच्या धानोरकर कुळकर्णी परिवाराच्यावतीने मनापासून शुभेच्छा ! मागील महिन्यात अतिशय भावपूर्ण व हृदयस्पर्शी असा दादांचा सहस्रचंद्र दर्शन सोहोळा त्यांच्या परिवाराने आयोजित केला होता. तेव्हापासून दादांविषयी लिहावे असे सुरु होते. मात्र त्याला आजचा दिवसच सुयोग्य वाटला. दादांबद्दल लिहितांना सहस्रचंद्र दर्शन सोहोळ्यात अनेकांच्या भावना ऐकल्यावर त्यांचा उल्लेख आधारवड म्हणून करावासा वाटला. कारण ज्याप्रमाणे वडाच्या महाकाय वृक्षाच्या आश्रयाला सर्वच पशु-पक्षी येत असतात. त्याच्या छत्रछायेखाली निर्धोकपणे, आश्वस्ततेने व निर्भीडपणे सर्वच जीवजंतू आश्रय घेतांना दिसतात. त्याचप्रमाणे याज्ञीक दादांच्या आयुष्यात आलेला प्रत्येक व्यक्ती त्यांचाच झाला. भारतीय संस्कृतीत कुटुंबव्यवस्थेचे मोल सर्वाधिकआहे. संयुक्त पितृसत्ताक कुटुंबपद्धतीत त्या कुटुंबाचा चालक वयस्क, समजदार, विवेकी, दांडगा अनुभवी, सगळ्यांना आपलंस करणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा, सर्वांची काळजी घेणारा असतो. त्याच्या कर्माने त्याला हि भूमिका प्राप्त होत असे. त्यातून त्याचे आधारवडाचे रूप साकारले जाते. तीर्थरुप राजाभाऊ याज्ञीक अर्थात दादा केवळ याज्ञीक परिवारासाठीच नव्हे तर संपर्कातील सर्वांसाठी आधार ठरलेले अनुभवास येते आणि म्हणून ते एका विस्तारित याज्ञीक परिवाराचे आधारवड आहेत असे मला वाटते. 

दादा... या नावात एक जादू आहे. माझ्या आयुष्यावर एक वेगळाच प्रभाव या शब्दाचा कायम राहिला. आम्ही वडिलांना दादा म्हणत असू... त्यांच्या पश्चात आयुष्यात त्यांची जागा आपल्या कर्तृत्वाने मिळविलेले दोन दादा आले. एक म्हणजे डॉ. अविनाश आचार्य आणि दुसरे श्री. राजाभाऊ याज्ञीक... खरोखर या दोघांनी पुत्रवत प्रेम केले. आज श्री राजाभाऊ याज्ञीक ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत... आम्ही सर्व भाग्यवान आहोत आम्हाला त्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या निरामय दीर्घायुष्याची परमेश्वराजवळ प्रार्थना करीत असतांना त्यांचा संस्कारित वारसा जपण्याची सुबुद्धी आम्हास देवो हीच प्रार्थना ! वर म्हटल्याप्रमाणे भारतीय संस्कृती कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व सांगते आणि याज्ञीक परिवार त्याचा आदर्श समाजासमोर ठेवतो. आजच्या भौतिक व व्यावहारिक जगात प्रत्येक गोष्ट पैशात मोजली जात असतांना याज्ञीक परिवार ती श्रीमंती माणसांमध्ये शोधतांना आपल्याला दिसतो. नातेसंबंधासोबत समाजाचा याज्ञीक परिवाराचा एक गोतावळा आहे आणि तो सांभाळण्याचा व जोपासण्याचा वसा दादांनी आम्हा सर्वांना दिला आहे. प्रयेकाच्या वाढदिवसाच्या दिवशी , दसरा आणि संक्रांतीचा नमस्कार चुकला तर आणि महिन्याभरात भेट झाली नाही तर आठवणीने फोन करणारे दादा कौटुंबिक ऋणानुबंध घट्ट करतात. 

दादा हे खरोखर एक अजब रसायन आहे. अशी माणसे अपवादाने घडतात. त्यात कुटुंबाचे संस्कार, समाज व्यवस्थेचे भान याचा प्रभाव असतोच मात्र त्यापलीकडे जाऊन विचार करण्याची, प्रत्यक्ष कृती करण्याची त्यांची तयारी त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख ठरते. आज दादानाच्या संपर्कातील व्यक्ती ज्या पद्धतीने भरभरून आपलेपणाने बोलतात त्याचे मूळ दादांनी केलेल्या बीजारोपणात सापडतात. मी, माझं या पलीकडे जाऊन आपलं म्हणून सतत कार्यरत राहण्याची किमया सर्वांना साधतेच असे नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या परिवार सदस्यांची साथ तेव्हढीच महत्वाची ठरते. माणसाने आपला भूतकाळ कधीही विसरू नये असे म्हणतात याचा अर्थ आपले दिवस, तात्कालिक परिस्थितीची जाण विसरू नये. माणसाची संवेदनशीलता जागरूक ठेवण्याचे काम हा भूतकाळ करीत असतो. या संवेदनशीलतेचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता करत येणं याला माणुसकी असे म्हणतात. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी, कौटुंबिक व सामाजिक काम करीत असतांना या मानवतेची अनुभूती देण्याची संधी प्रत्येकालाच लाभत असते. दादांनी वेळोवेळी हि संधी घेतल्याचे लक्षात येते. त्यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाला झळाळी आल्याचे दिसते.  

अशा एका विलक्षण व्यक्तिमत्वाच्या परिवाराचा एकदा का आपल्याला स्पर्श झाला कि तुम्ही त्या परिवाराचे होऊन जातात.  याज्ञीकांच्या संगे तुम्ही बिघडला , तुम्ही बिघडला याज्ञीकमय झाला... याची आपल्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. हे बिघडणं कुटुंबातील आनंद, समाधान, परस्परातील संवाद, निःस्वार्थ सेवा, निर्व्याज प्रेम याच प्रतीक आहे. कुणाच्याही सुखदुःखात सहभागी होणारे दादा, अन्नपूर्णेचा प्रसाद देण्यात कायम सर्वांच्या पुढे असतात. भावना आणि व्यवहार यातील समन्वय दादांनी फार छान साधलाय. स्व. सौ. अपेक्षा या आपल्या सहधर्मचारीणीची भूमिका त्यांच्या पश्चात दादा समर्थपणे सांभाळत आहेत. सहजपणाने जीवन जगात असतांना परहितदक्षतेला प्राधान्य देणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात सात्विकता अधिक असते. दादांच्या जीवनातील असे अनेक प्रसंग मला माहिती आहे जे याची प्रचिती देतात. भारतीय संस्कृतीत सांगितलेल्या चार आश्रमाचे पालन दादांच्या जीवनात दिसते. भावना आणि व्यवहार यातील समतोल साधत आपल्या पुढच्या पिढीला जबाबदारी देत निर्णय क्षमता विकसित  करण्याचे काम दादांनी सहज केल्याचे लक्षात येते. 

याज्ञीक परिवाराने ति. दादांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहोळ्याचे आयोजन त्यांच्याप्रतीची आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक संस्कार आहे आणि त्यात आम्हाला सहभागी करून घेतले याचा विशेष आनंद आहे. दादांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल मला नेहमीच आदर वाटला आहे. त्यांची एकूणच जीवनी अंतर्मुख करणारी असून मनात काही प्रश्न निर्माण करते. या प्रश्नाच्या माध्यमातूनच आपल्यासमोर दादांचे स्वभाव वैशिष्ट्ये आपल्यासमोर मांडणार आहे. 

पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे दादांसारखी माणसे आजच्या जगात कशी घडतात ? मला या प्रश्नाचे उत्तर तुकाराम महाराजांच्या एका अभंगात मिळते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी... तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे शुद्ध बीजापासून चांगल्या आणि रसाळ फळांची उत्पत्ती होते तसेच संसारात जे शुद्ध व पवित्र अशी मंडळी आहेत त्यांच्या पासून चांगल्या आणि उच्च दर्जाच्या संततीची निर्मिती होते. ते पुढे म्हणतात अशा लोकांची वाणी ही मधुर असून अमृतासमान असते आणि हे लोक स्वतःचा देह देवाची अखंड सेवा करण्यात खर्ची घालवतात. अशी माणसे सर्वांगाने निर्मळ असून त्यांचे मन गंगेप्रमाणे निर्मळ आणि पवित्र असते. तुकोबाराय म्हणतात अशा ह्या लोकांच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा लोकांचे त्रिविध ताप जाऊन त्यांच्या मनाला तात्काळ विश्रांती मिळते. आपण सर्वजण या मताशी सहमत व्हाल कि दादांच्या पालकांचा संस्कार आणि तोच संस्कार संक्रमित करून त्यांची पुढची पिढी दादांनी घडविली आहे. 

तुमच्या पैकी किती जणांची ६० वर्षांची मैत्री आहे ? जाऊ देत आपल्या वयाच्या किमान निम्म्या  वयाची  मैत्री किती जणांची आहे ? याज्ञीक दादांची मैत्री आहे आणि ती पण दोन-चार जणांशी नाही. मला चांगले आठवते आणि मी त्याचा साक्षीदारही आहे. दादांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यातील मैत्रीदिन दादांच्या पुढाकारातून साजरा करण्यात आला होता आणि त्यासाठी दादांच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. बालपणापासूनचे अर्थात १९५४ पासूनचे गल्लीतील, शाळेतील, बाहेरचे, नोकरीच्या ठिकाणचे, सामाजिक कामातील असे सुमारे ६०-६५ मित्र एकत्र आले होते. आजही हि मैत्री टिकून आहे.

पुढचा प्रश्न आहे सामाजिक जबाबदारी पार पाडतांना तुम्हाला परत मिळणारे प्रतिष्ठेचे अध्यक्षपद तुम्ही तुमच्या सहकाऱ्याला द्याल ? नाही ना... दादांनी ती किमया साधली आहे. मुळात एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या व सरकारी नोकरीत असलेल्या चाकोरीबद्ध जीवन असलेल्या व्यक्तीला समाजाशी फारसे घेणे-देणे नसते. ति. दादा मात्र याला अपवाद ठरले व ठरतात. समाजमान्यतेने समाजातील ब्राहमण सभेसारख्या एका नावाजलेल्या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात अध्यक्षपद सर्वानुमते मिळणे हि त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची पावती ठरते. ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने दादांनी ब्राह्मण सभेची अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. मात्र परत पुढच्या वेळी तीच संधी मिळत असतांना त्यांनी ती आपल्या सहकाऱ्याला देत एक आदर्श वस्तुपाठ समाजासमोर ठेवला आहे, समाजाचे नेतृत्व करण्याची प्रत्येकाची इच्छा असते आणि ती योग्य वेळी मिळाली तर तिला न्याय देता येतो यासाठीच तर त्यांनी हे पाऊल उचलले नसेल ? याचप्रमाणे कर्मचारी संघटनेच्या कामातील त्यांचा पुढाकार व सहभाग अनेकांच्या जीवनासाठी उपकारकच ठरला आहे आणि त्याची जाणीव या बांधवांना आहे.  

आणखी एक प्रश्न तुमच्याकडे संपर्कातील किती लोकांचे फोन नंबर आहेत ? त्यातील किती जणांच्या जन्मदिनाच्या वा व्यवसायाच्या वर्धापनदिनाच्या तारखा तुम्हाला माहिती आहेत ? आणि त्यातील किती जणांना तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी फोन करता ? दादा हे असे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे त्यांच्या संपर्कातील हजारो लोकांचे फोन नंबर व जन्म तारीख आहे. प्रत्येकाला न चुकता ते फोन करतात. हा फोन कधीही उपचार नसतो कारण त्यात शुभेच्छांसोबत इतर गोष्टींची, कुटुंब सदस्यांची चौकशी असते. संबंधित व्यक्तीच्या जीवनाशी गोष्टींवर चर्चाही असते. त्यातील किती जण आठवणीने त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी फोन करत असतील ? तरी दादा त्यांचे हे माणसे जोडण्याचे व्रत अव्याहतपणे सुरु ठेवतात. आत्मीयता व आपलेपणा कसा जोपासावा याचे दादा एक उदाहरण आहे. मला यातील निरलस, निरपेक्ष, निःस्वार्थ व निरागस भाव अधिक महत्त्वाचा असतो. 

तसे खूप सारे प्रश्न आहेत पण एक शेवटचा प्रश्न... तुम्ही तुमच्या संपर्कातील कोणाकडे दुःखद घटना घडली तर पूर्ण १३ दिवसांची काळजी घेतात ? ति. दादा हि जबाबदारी समर्थपणे पाळत आलेत. अलीकडच्या काळात त्यांची पुढची पिढी तितक्याच तन्मयतेने, आपलेपणाने हे कार्य करतांना दिसतात. केवळ दुःखद प्रसंगी नव्हे तर सुखाच्या वेळी, अडीअडचणीला कोणी बोलावेल, सांगेल अशी वाट न पाहता आपण केले पाहिजे या कर्तव्यबुद्धीने याज्ञीक परिवार हे कार्य करतांना दिसतात. जीवनाचं वास्तव स्वीकारत आनंदी व समाधानी जीवनाचे धनी असलेल्या दादांना परमेश्वर कायम आनंदी व समाधानी ठेवो हि सद्गुरू सखाराम महाराजांच्याचरणी प्रार्थना !

आपण ति. राजाभाऊ याज्ञीकांचे अर्थात दादांचे अभिष्टचिंतन करू शकता त्यासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक देत आहे. ९४२१०८३६२२

(या लेखाच्या निर्मितीत मित्रवर्य मिलिंद पुराणिक यांच्याशी दादांबाबत केलेल्या संवादाचा मोठा हात आहे.)

गिरीश कुळकर्णी 

Monday 29 August 2022

छंद कलाकार सहकारी मित्र अनिल पाटील

जळगाव जनता सहकारी बँकेच्या कारकिर्दीत ज्याचे अनमोल असे सहकार्य लाभले अशा माझ्या सहकारी मित्राची एक वेगळी ओळख अलीकडेच झाली. केवळ ओळखच नाही तर या छंद कलाकाराने साकारलेल्या स्केचेसचे जळगावातील मे. पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सच्या कलादालनात १६ ऑगस्टपासून प्रदर्शन लावण्यात आले आहे. हि गोष्ट कळल्यावर ऊर अभिमानाने भरुन आला होता. त्याच्याबद्दल लिहायला घेतले अर्धे लिहून पण झाले आणि आजारी पडलो. तब्येत व्यवस्थित झाल्याबरोबर प्रदर्शनाला दोन दिवस राहिले असले तरी आवर्जून लिहितोय कारण अपेक्षा आहे कि माझ्या ह्या मित्राबद्दल वाचल्यावर आपण वेळ काढून आपल्या कुटुंबियांसह आवर्जून भेट द्याल. प्रदर्शन पाहून झाल्यावर आपला प्रतिसाद लेखी स्वरुपात देण्यास विसरु नका.  

मुक्ताईनगर जवळील चिखली या गावातुन आलेला एका सामान्य कुटुंबातून आलेला हा सहकारी जळगाव जनता सहकारी बँकेत प्रथम भेटला. कामाशी प्रामाणिक, प्रत्येक कामासाठी तयार असे. बऱ्याच गोष्टी आपण सांगायच्या अगोदर पूर्ण केलेल्या असत. कारण कामाची गरज व मिळालेल्या नोकरीची  जाणीव ! जनसंपर्क विभागात सुयोग्य असलेल्या या सहकाऱ्याने आपल्या कामाला कायमच न्याय दिला. सुंदर अक्षर, उत्कृष्ट लेखनशैली, कामातील व्यवस्थितपणा, उत्साही असलेला सहकारी लाभणे हे खरोखर भाग्यच ! एम. कॉम.पर्यंत शिक्षण झालेल्या अनिल पाटील यांनी वृत्तपत्रविद्या प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केलेला होता. त्यांना जनशक्ति, जळगाव टाइम्स, जनसेवक या दैनिकातील उपसंपादक काम करण्याचा अनुभव होता. १९९६ साली साधारण दोन महिन्यांच्या अंतरांनी आम्ही वेगवेगळ्या पदावर जळगाव जनता बँकेत रुजू झालो होतो. २००८ मध्ये मी वेगळी वाट निवडली तरी अनिल पाटील आजही उपमहाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. 

अनिल पाटलांच्या स्केचेस रेखाटण्याचा छंदाची त्याकाळात कधी बोलणे झालेले आठवत नाही. मात्र रंगीत पेन्सिलींद्वारे स्केचेस रेखाटण्याचा छंद महाविद्यालयीन जीवनापासूनच असला तरी नोकरीच्या बरीच वर्षे त्यात खंड पडला. कोरोना टाळेबंदीच्या काळात पुण्यात असलेली धाकटी कन्या घरी आली होती. तिला चित्रकलेची आवड असल्याने अभ्यासाबरोबरच फावल्या वेळात ती चित्रं रेखाटत असे. तिला पाहून आमच्या या सहकारी मित्राला आपला जुना छंद जोपाण्यासाठीचे निमित्त मिळाले. अन हा मित्र आपल्या छंदासाठी वेडा झाला असेच म्हटले पाहिजे. स्केचेस काढण्याच्या कामातील सातत्य कायम राखत त्यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील ४० ते ४५ मान्यवरांचे स्केचेस त्यांचे वाढदिवस, जयंती वा पुण्यतिथीनिमित्त रेखाटलेले आहेत. या स्केचेसला जळगावातील स्थानिक वर्तमानपत्रांनी प्रसंगानुरुप दाखल घेत वेळोवेळी यथोचित प्रसिद्धी दिली आहे. त्यात जळगाव तरुण भारत, सकाळ, दिव्य मराठी आणि लोकमत या दैनिकांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. 

वर्तमानपत्रांसह विविध समाज माध्यमातून हि चित्रे जनसामान्यांपर्यंत पोहोचली. अनेकांनी त्यांच्या स्केचेसचे भरभरुन कौतुक केले. पं.भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रेखाटलेल्या स्केचेससंदर्भात त्यांचे सुपुत्र श्रीयुत जयंतजी जोशी, पं. भीमसेन जोशी यांच्या देश-विदेशातील मैफिलीनिमित्त कायम त्यांच्यासोबत असणारे पुण्यातील प्रख्यात छायाचित्रकार श्रीयुत सतीशजी पाकणीकर, पंडितजींशी कौटुंबिक संबंध असलेले निवृत्त प्राचार्य, साहित्यिक, संग्राहक श्रीयुत प्रकाश महाजन सर, सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक-गायक सचिन पिळगावकर, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि कलारसिक श्रीयुत अशोकभाऊ जैन, श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी आदींनी कौतुक केल्याचे ते अभिमानाने सांगतात, चित्रकलेविषयी कोणताही अभ्यासक्रम  वा कोर्स त्यांनी केलेला नाही. दिवंगत कलाध्यापक असलेल्या आपल्या वडिलांकडून हा अनुवंशिक वारसा त्यांना मिळालेला आहे. अनिल पाटील ८ वर्षांचे असतांना दूर्दैवाने त्यांच्या वडिलांच्या निधनामुळे त्यांना वडिलांकडून फारसे मार्गदर्शन मिळू शकले नाही. 

चित्र प्रदर्शन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कालखंडात होत असल्याने देशातील ४८ भारतरत्नांमधील सर्वाधिक ९ भारतरत्नांसह इतर ६ अशा १५ सन्मानार्थीचा समावेश करण्याचा निर्णय अनिल पाटील यांनी घेतला. एकत्रित ४० ते ४५ स्केचेसचं 'हा छंद जिवाला लावी पिसे...' हे अनिल पाटील यांच्यासारख्या सहकारी मित्राचे, एका छंद कलाकाराचं (हॉबी आर्टिस्टचं) पहिलं वहिलं चित्रप्रदर्शन सध्या मे. पु. ना. गाडगीळ यांच्या कलादालनात (बहिणाबाई उद्यानाजवळ) सुरु आहे. सकाळी ११ ते सायं. ७ या वेळात (बुधवार वगळून) सर्व चित्रकलारसिकांनी पाल्यांसह तसेच शालेय विद्यार्थ्यांनीही प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या या मित्राला खूप साऱ्या शुभेच्छा देतो ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Tuesday 16 August 2022

भारतीय स्वतंत्रता कि गाथा !


भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभरात एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शासकीय, सामाजिक, संस्थात्मक व वैयक्तिक पातळीवर हा महोत्सव अनुभवताना अनेकदा अंगावर रोमांच उठत होते. स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांप्रती मनात अभिमान जगात असतांना त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना जाणवत होती. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्याचा जागर केला व समाजानेही त्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याचे लक्षात आले. शासकीय पातळीवर "घर घर तिरंगा, हर घर तिरंगा" मोहीम राबविण्यात आली. अमृत दौड, तिरंगा यात्रा यासारखे उपक्रमही राबविण्यात आले. संस्थात्मक पातळीवर विविध स्पर्धा, एक शाम देश के नाम, शोभायात्रा,  विभाजन विभीषीका, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, रस्त्यावरील खड्डे बुजवणे इ. गोष्टींचा समावेश होता. 

गांधी रिसर्च फाऊंडेशनने "भारतीय स्वतंत्रता कि गाथा" असा विषय घेऊन एक प्रदर्शनी तयार केली व त्याचे प्रदर्शन जळगावच्या मध्यवर्ती असलेल्या महात्मा गांधी उद्यानात लावण्यात आले. स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यांचा संक्षिप्त रुपात घेतलेला आढावा व त्याचे सादरीकरण खरोखरच कौतुकास्पद आहे. सोन्याचा धूर निघणारा भारत ब्रिटिशांच्या राज्यात पारतंत्र्यात गेला. १८५७ च्या उठावाने सुरु झालेली स्वातंत्र्याची लढाई वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या पद्धतीने लढली गेली. त्याचे नेतृत्व अनेकांनी केले. भारतीय काँग्रेसची स्थापना, बंगालचे विभाजन, होमरूल चळवळीचे लोकमान्य टिळकांनी केलेले नेतृत्व, १९१७ मध्ये महात्मा गांधीजींच्या पर्वाचा प्रारंभ, चंपारण सत्याग्रह, १९१९ मंधील जालियनवाला बाग हत्याकांड, १९२० चे असहकार आंदोलन, १९२२ चौरीचारा हत्याकांड,  क्रांतिकारी दलाची स्थापना, सविनय कायदेभंगाची चळवळ, आझाद हिंद सेनेची स्थापना, चले जाव आंदोलन, विभाजन, भारतीय स्वातंत्र्य. दि. १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या होते ध्वजारोहण व केलेले भाषण. त्यानंतरची संविधानाची निर्मिती, अखंड भारतासाठी संस्थानांचे विलीनीकरण यासारख्या गोष्टी आपल्याला पाहावयास मिळेल. भारतीय स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास अतिशय समर्थपणे मांडण्यात आला आहे. भारतीय ध्वजाचा प्रवास चित्ररूपाने मांडण्यात आला आहे.















जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. अशोकभाऊ जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, योगेश संदानशिवे, विजय जैन परिश्रमपूर्वक हि प्रदर्शनी अतिशय कमी कालावधीत तयार केली आहे. अशोक चौधरी, चंद्रशेखर पाटील, निवृत्ती वाघ आदींनी प्रदर्शनाच्या उभारणीत आपले योगदान दिले आहे. प्रदर्शनात वापरलेली त्या त्या काळातील छायाचित्रे प्रदर्शनाची गुणवत्ता वाढवतात. मजकुरापेक्षा प्रदर्शनातील छायाचित्रे अधिक बोलकी वाटतात, मोठ्यांसाठी शालेय जीवनात शिक्षकांच्या माध्यमातून समजून घेतलेल्या इतिहासाची उजळणी, विद्यार्थी व तरुणांसाठी अधिकृत माहितीस्रोत, इतरांसाठी विस्मृतीत गेलेल्या घटना पुन्हा ताज्या करणारी हि प्रदर्शनी प्रत्येक जळगावकरांनी पाहिली पाहिजे. आपल्या मुलांना , विद्यार्थ्यांना दाखविली पाहिजे. त्यासाठी आपण संस्थेशी संपर्क करू शकता. बाहेरगावातील माझ्या मित्रांना हि प्रदर्शनी आपल्या गावात / शाळा - महाविद्यालयात लावायची असल्यासही आपण माझ्याशी संपर्क करू शकता... प्रदर्शन पाहिल्यानंतर आपला अभिप्राय नोंदविण्यास विसरू नका ! 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 


Wednesday 10 August 2022

प्रवास मेहनतीचा... आव्हानांचा... यशाचा... आनंदाचा... !

लाडकी लेक मृण्मयी ! मेहनती, सृजनशील, एकाच वेळेस अनेक गोष्टी करण्यासाठी धडपडणारी, उत्साही जोडीला हट्टी, मनाप्रमाणे करणारी, स्वतःचा निर्णय स्वतः घेणारी. कथक विषयासाठी कोणतीही तडजोड म्हणजे अगदी घरचं लग्न सोडणारीही. कथक विशारद पूर्ण झाली. काल तिचा गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेचा निकाल कळला आणि ती प्रथम श्रेणीत कथक विशारद पूर्ण झाली. अनेकांचा शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. आम्हाला मात्र तिचा तो प्रवास डोळ्यासमोर दिसतोय. 

यशाचा आनंद तर आहेच पण हा प्रवास तितका सहज घडलेला नाही. तिच्या यशाच्या सर्वात मोठ्या हक्कदार सर्व काही करून घेणाऱ्या तिच्या गुरु डॉ. अपर्णा भट-कासार आहेत. त्यानंतर ती स्वतः आणि तिची आई आहे. माझाही वाटा आहेच मात्र फारच मर्यादीत. कथक विषयाची कुठलीही


कौटुंबिक पार्श्वभूमी नसतांना तिने मिळविलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. सुरवातीच्या तीन परीक्षा उत्तीर्ण होतांना कुठलाही ताण न येता नव्या नवलाईने सर्वांनाच सोप्प गेलं. हळूहळू साधना / सराव काय असतो ते कळायला लागलं. शाळा, ट्युशन याचा मेळ घालणे कठीण होऊ लागलं. वेळेची कसरत करतांना सर्वांनाच अडचणी येऊ लागल्या. काळावर सोडल्यावर मार्ग निघाला, काही वेळेस बोलणंही खाल्लीत. दहावीत तर फारच तारांबळ उडत होती. भंबेरी काय म्हणतात ते. शांतपणे परिस्थितीचा अंदाज घेत माझे मत सांगत असे. हव्याहव्याशा वाटणाऱ्या अनेक गोष्टी सोडून द्याव्या लागल्या. "तडजोड' हा विषय तिच्या गुरुंजवळ अपवादात्मकच चालला. 

कुठलाही क्लास मिस झाला तर बोलणे ठरलेले. त्यातही कथक मध्ये तासनतास करावी लागणारी मेहनत, त्यात चूक झाली तर ऐकावे लागणारे कठोर बोल या सर्व गोष्टी डोळ्यासमोर आहेत. प्रचंड  थकवा आणि पुन्हा सकाळी उठल्यावर सुरु... त्याचाच परिपाक आज आनंदात झालेला दिसतो. गुरु-शिष्य नात्यात आम्ही दोघे कधी फारसे पडलो नाही कारण  प्रश्न आणि उत्तरे दोघेही अपर्णा दीदींकडेच मिळणार हे माहिती असे. मृण्मयीच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल जाणीव करून देत असत. तुम्ही गुरूंवर विश्वास ठेवला कि खूप गोष्टी साध्य होतात मात्र त्यात हस्तक्षेप केला कि उद्देशापासून दूर जाणे आलेच. समोरच्याच्या भूमिकेत गेलं कि प्रश्न सुटले म्हणून समजा. अनेक विद्यार्थी व पालक अभ्यास का कथक यात प्राधान्यक्रम ठरवितांना गडबडतात आणि तेथेच अशा प्रकारच्या परीक्षांमधील प्रवास थांबतो. मुलांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करुन त्याला निर्णय घेण्यासाठी साहाय्यभूत होऊन कायम सोबत असणं महत्वाचं. वर्षभरातून एकदा होणारा जाहीर कार्यक्रम खूप छान व्हायचा मात्र त्यासाठी संबंधित सर्वांची मेहनत याला तोड नाही. 

या प्रवासात वर्षभरात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधील सहभाग कथकसाठी अतिरिक्त वेळ

देणारा असे. कधीतरी अतिरिक्त ज्ञान, माहिती मिळविण्यासाठी बाहेरगावी जाण्याची संधी घेतल्याने त्या क्षेत्रातील प्रगल्भता येते. डॉ. अपर्णा दीदी यासाठी विशेष प्रयत्न करतात. दीदींचे या क्षेत्रासाठीचे समर्पण प्रेरणादायी आणि त्यामुळेच इतक्या साऱ्या शिष्या विशारद होऊ शकल्या. यावर्षीही ४ मुली प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन विशारद झाल्या. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये मिळणारे यश ज्याप्रमाणे अनमोल तर असतेच पण तो प्रवास थक्क करणारा व म्हणून प्रेरणादायी ठरतो. तसेच काहीसे मृण्मयीच्या कथक विशारद प्रवासाबाबत म्हणता येईल. मृण्मयीने तटस्थपणे या प्रवासाकडे पहावे. तात्कालिक परिस्थितीत प्रत्येकाने मांडलेले विचार तपासावे. तिचे हे यश सर्वांच्या एकत्रित परिणामांचाच परिपाक असल्याचे लक्षात येईल. तिच्या गुरुंबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतांना मृण्मयीचे व तिच्या आईचे सौ अदितीचे विशेष  अभिनंदन ! मृण्मयी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कथक विषयात एमएचे शिक्षण घेत आहे. तेथेही तिला शमाताई भाटेंसारख्या गुरु लाभल्या आहेत. तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा ! 

Tuesday 31 May 2022

सहजीवनाची रौप्य महोत्सवी वाटचाल (भाग २)


मानवी आयुष्य हे अनुभव आणि त्या अनुभवातून शिक्षण घेऊन विकसित होण्याची निरंतर चालणारी प्रक्रिया असते. हे मिळालेले शिक्षण मानवी जीवनात कोणताही अभ्यास न करता पूर्णतः उतरते. थिअरी (पुस्तकी) आणि प्रॅक्टिकल (व्यावहारिक) शिक्षणात ज्या प्रमाणे फरक आढळतो त्याचप्रमाणे वास्तव आणि आभासी व काल्पनिक जगातही आढळतो. विवाहातून निर्माण झालेल्या संबंधांमध्ये याची जाणीव पदोपदी होत असते. विवाहापूर्वीचे जीवन हे नाही म्हटले तरी कल्पना विलासी व बहुतांश वेळेस आभासी असते. विवाहानंतरचे मात्र पूर्णतः वास्तव असते. माझ्या बाबतीतही हे लागू पडते. मात्र व्यावसायिक  आयुष्यातील अनेक प्रशिक्षणांनी, थोरा-मोठ्यांच्या सहवासाने, समविचारी व्यक्तींच्या चर्चेने यातील मेळ घालणे खूप सोपे झाले. एका बाजूला येणारी वैचारिक प्रगल्भता व दुसऱ्या बाजूला संसारातून घ्यावयाची वा येत असलेली निवृत्ती यामुळेही हे काम अधिक सोपे होते. अर्थात यासाठी आपली एक वैचारिक बैठक आपणच तयार करावयाची असते. त्यासाठी अध्यात्मिक गुरु लाभणे अधिक फायद्याचे ठरते. प्रसंगी जीवन जगणे म्हणजे नक्की काय हे शिकणे अगत्याचे ठरते मार्ग ज्याचा त्याच्या सोयीचा असतो. 

लग्नापूर्वी माझ्या आयुष्याच्या जोडीदाराच्या निश्चित अशा काही कल्पना होत्या, त्या कालसुसंगत होत्या. मात्र आजच्या सारख्या खूप स्पष्ट व आग्रही नव्हत्या. "तडजोड" हे यशस्वी वैवाहिक जीवनाचे मूल तत्त्व आहे, हे पक्क माहिती होतं व त्यामुळे तशी मानसिक, भावनिक व शारीरिक पातळीवर तयारीही होती. लग्नापूर्वी जोडीदार एकत्रित कुटुंबात सहज मिळून मिसळून वागणारी असावी, त्यातही आपल्या जातीची व पोट जातीचीही असावी अशी अपेक्षा होती. एका कर्मठ व कर्मकांड करणाऱ्या परंपरावादी ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेला असल्याने त्याचा पगडा नक्की होता त्यामुळे हि अपेक्षा सहजी होती. तसेच जोडीदार शक्यतो विज्ञान शाखेचा पदवीधर असावा अशीही अपेक्षा होती. कारण विज्ञानाचे विद्यार्थी सृजनशील, काळाबरोबर चालणारी असतात असा एक समज होता. वाणिज्य शाखेचे पदवीधर व्यावहारिक असतात तर कला शाखेचे विद्यार्थी इतिहासात रमणारी थोडी वैचारिकदृष्ट्या मागास असा काही तरी समज होता. (कुठून आला सांगता येणार नाही) आज अशा प्रकारचे कोणतेही समज नाही कारण अनुभवातून त्याचे शिक्षण मिळाले. धारणा बदलल्या. माझी पत्नी वाणिज्य शाखेची पदवीधर आहे. (त्यावेळी हि तडजोड होतीच) 

घरात पंजाबी ड्रेस , गाऊन इथपर्यंत पुढारलेली मात्र प्रसंगानुरूप साडीच नेसणारी असावी अशीही अपेक्षा होती आणि आजही आहे. मात्र जीन्स वा तत्सम कपडे कधीही घालू नये असेच वाटते कारण तो आपल्याकडील वातावरणासाठीचा पोशाख नाही व शारीरिक दृष्टीने योग्य नाही अशी धारणा होती व आजही आहे. अर्थात या सर्व बाबतीत मी आज फारसा आग्रही नाही. शेवटी ज्याला त्याला ज्याचे त्याचे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे असे वाटते मात्र माझे मत म्हणून मला विचारले असो वा नसो मी ते मोकळेपणाने सौ. आदितीशी व इतरांशीही बोलतो. गाण्याची आवड असावी हि अपेक्षा होती सौ. गाण्याच्या चार परीक्षा उत्तीर्ण आहे. लग्नापूर्वी सार्वजनिक अपेक्षा एव्हढ्याच होत्या. मात्र मनातून पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेला असल्याने व तेव्हढी वैचारिक प्रगल्भता नसल्याने आपल्याला सहन करणारी, विरुद्ध मत व्यक्त न करणारी, सांगेल तेच ऐकणारी, माझं वर्चस्व मानणारी अशा काही खुळचट वेडसर कल्पनाही होत्या. आज तर तशा त्या अजिबात नाही. "सोनं", साडी, कपडे, गाडी वगैरे भौतिक साधनांबद्दल मला फार कधी आकर्षण वाटले नाही व आजही नाही. मात्र एक स्त्री म्हणून "सोनं" व "साडी" हे पत्नीचे कच्चे दुवे आहेत. मी आयुष्यात अंगावर कधीही सोनं घालणार नाही यावर ठाम मात्र सौ.नी खरेदी करण्यास माझी कधीही ना नाही. साडे तीन मुहूर्ताला व विशेष प्रसंगी एखादा ग्रॅम हा तिचा आग्रह अपवादानेच मोडला असेल. असो.

आणखी एक गोष्ट एका चाकोरीबद्ध कुटुंबात वाढलेले आम्ही दोघेही असलो व कुटुंब हेच प्राधान्य मानणाऱ्या कुटुंबातून आलेलो असलो तरी त्याच पद्धतीने जगावे असे मला कधी वाटले नाही. मात्र सौंची ति कायम अपेक्षा असते. त्यामुळे तुम्ही लग्न का केले ? त्या ऐवजी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे ब्रह्मचारी राहिला असतात अशा शेरा अनेकदा ऐकायला मिळतो. बँकेत नोकरी करणारा नवरा म्हणजे संध्याकाळी ६ वाजता घरी... टीव्ही, एक चक्कर, कुटुंबातील अनावश्यक गोष्टींवर चर्चा, एक मध्यमवर्गीय जगणे मला फारसे न मानवणारे ! खरं यातील काही आवश्यक गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे होते असे मला आज वाटते मात्र त्यामुळे फारसे नुकसान झाले असे मला वाटत नाही. एक जबाबदार पती व पिता यासाठी न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असला तरी कधी तरी त्यात कमी राहिली हे स्वीकारले पाहिजे त्यासाठीच स्व-मूल्यांकनात स्वतःला १०० पैकी ७० गुण देतो. स्वतः स्वाभिमानी असल्याने आपलं म्हणणं बरोबर आहे त्यासाठीचा तिचा अट्टाहास आणि समोरच्याने झोपेचं सोंग घेतलेलं असल्याने फारसा भानगडीत न पडता तू मोठ्या बापाचा असं मानणारा मी !  

लग्नापूर्वी पत्रिका जुळली पाहिजे अशी अपेक्षा होती त्यामुळे पत्रिका पाहिली आणि सौ. आदितीचे व माझे ३६ गुण पत्रिकेत जुळले मात्र रौप्य महोत्सवी वर्षाचे सिंहावलोकन करतांना आयुष्यात वास्तवात फारसे जुळत नाहीत असे लक्षात येऊ शकेल. माझ्यादृष्टीने एकाच बाबतीत आमचे ३६ गुण जुळतात आणि ती गोष्ट म्हणजे माझ्याशिवाय ती आणि तिच्याशिवाय मी पूर्ण होऊ शकत नाही. तसे हे चांगले आहेत व तशी हि पण चांगलीच आहे. त्यामुळेच रौप्य महोत्सवी प्रवासात आम्ही केवळ समाधानी नव्हे तर आनंदी  आहोत. अनेकदा वैचारिक मतभेदांमुळे वाद-विवाद होतात मात्र आता एक दुजे के लिए असल्याने ते विषय बाजूला ठेवणे मी पसंत करतो मात्र सौ त्यांचे म्हणणे ठासून खरे ठरविण्याचा नेहमी प्रयत्न करतात. आपल्याकडे इतरांपेक्षा भरपूर असल्याने आपण न्यून असलेल्यांसाठी काही केले पाहिजे मात्र त्यात वाहवत न जाता व्यावहारिक विचार करुन आपलंही पाहिले पाहिजे हि सौ. अदितीची माफक अपेक्षा असते. मी माणसे ओळखू शकतो असे जरी मला वाटत असले तरी लोकं माझा वापर करुन घेतात हे तिला लवकर समजते, ती त्याची जाणीवही करुन देते मात्र पुरुषी अहंकारी मनुष्यस्वभावानुसार मला अनुभवातून ते कळते. अर्थात त्याबाबतीतही मी जरा बेफिकीरच आहे. 

मुलांचे शिक्षण, काही तरी करुन पैसे कमविण्याची इच्छा, कुटुंबातील नातेवाईकांची वास्तपुस्त, देवाणघेवाण यासारख्या गोष्टी मी फारशा पाहत नाही मला त्यात फारसा रस वा स्वारस्य नाही. त्याबाबतीत सौ. आदितीला १०० पैकी १०० गुण दिले पाहिजे. व्यावहारिक जगात या गोष्टींना महत्व असले तरी ऋणानुबंध परस्पर सहकार्यावर व विशेषतः आपण थोडी तोशिष पत्करून इतरांसाठी काही केले पाहिजे हि माझी मनोभूमिका ! जीवनातील अनेक प्रसंगामध्ये आम्ही आमच्या ठिकाणी बरोबरच असतो असे मला वाटते. त्यामुळे "हम नही सुधरेंगे !" या उक्तीप्रमाणे आम्ही एक दुसऱ्याला स्वीकारले आहे असे मला वाटते. प्रसंगांची शृंखला खूप वाढविता येईल कारण २५ वर्षांचा कालावधी सोबत घालविला आहे.   वैवाहिक व खाजगी जीवनातील असे अनेक प्रसंग मला याठिकाणी सांगावेसे वाटतात याचे एकमेव कारण नवीन पिढीने हे आयुष्य आहे हे समजून घेतले पाहिजे. जीवनाचा आनंद घेता व देता आला पाहिजे. त्यासाठी पैसे लागत नाही तर वृत्ती लागते. हि वृत्ती व संसारीक जीवन जगण्याची कला याबाबतीत प्रकाश टाकण्यासाठी आणखी एक भाग लिहीन. पहिला भाग अनेकांनी वाचून त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया नक्कीच उत्साहवर्धक होत्या त्यामुळेच लिहिण्याचे धारिष्ट्य केले. आजचा दुसरा भाग वाचून त्यावर आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहे. येणाऱ्या पिढ्यांचे जीवन समृद्ध होण्यासाठी किमान असेही असते हे समजण्यासाठी तरी आपण लिहावे, त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे, त्यांचे विचार जाणून घ्यावे आपण समृद्ध व्हावे व त्यांनाही समृद्ध करावे हीच अपेक्षा ! 



Monday 30 May 2022

सहजीवनाची रौप्य महोत्सवी वाटचाल ! (भाग १)

सहजीवनाची सुरुवात ३१ मे १९९७ 

आज जगात भारतीय संस्कृती महान समजली जाते याचे एकमेव कारण म्हणजे कुटुंब व्यवस्था ! हि कुटुंब व्यवस्था निर्माण करण्याचे व विस्तारण्याचे काम विवाह संस्था करीत असते. पत्नी सौ. अदिती सोबतची सहजीवनाची रौप्य महोत्सवी वाटचाल समृद्ध करणारी व आनंददायी आहे. त्या निमित्ताने...

भारतीय संस्कृतीतील वेदांमध्ये मानवी जीवन चार आश्रमात मांडले आहे. आश्रम व्यवस्थेत मानवाच्या कर्माची जाणीव करून दिलेली असून ऋणमुक्तीची ती व्यवस्था आहे. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ आणि देवऋण, ऋषिऋण व पितृऋण ही त्रिविध ऋणे यांचे आश्रमव्यवस्थेस अधिष्ठान आहे.  त्यातील गृहस्थाश्रम ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मानला जातो. जो माणूस मोक्ष आणि संसारातील सुखाची अभिलाषा करतो त्यानेच या आश्रमात प्रवेश करावा असेही म्हटले जाते. गृहस्थाश्रम हि एक तपश्चर्या मानली जाते. जीवनातील दुःख, हानी, पराजय, अपमान इ. सामोरे जाण्याने माणसाच्या तपश्चर्येची प्रचिती येते. गृहस्थाश्रमामुळेच नातेसंबंध निर्माण होत असतात. आई-वडील, आजी-आजोबा, सासू - सासरे यामुळे हि सर्व नाती मानवाला प्राप्त होत असतात. मानवी जीवनातील उत्तम व्यवहारांची प्राप्ती येथे होते. नैतिकतेचे प्रशिक्षण केंद्र म्हणजे गृहस्थाश्रम म्हणता येईल. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार यासारख्या मानवी विकारांची परीक्षा या आश्रमात होत असते. या आश्रमात वात्सल्याची पूर्ती होत असते. माता-पिता आपल्या मुलांप्रती प्रेम भावना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मानवाला शारीरिकतेकडून आत्मिकतेकडे नेणारा हा आश्रम आहे. हि पूर्वपीठिका समजून घेतली तर आपल्याकडील विवाह संस्था, तिची उद्दिष्ट्ये सफल होतील असे मला वाटते. असो. आमच्या विवाहाच्या रौप्य महोत्सवीपूर्तीच्या निमित्ताने मला आपल्याला काही सांगायचे आहे. खास करून जे उपवर-वधू आहेत किंवा ज्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला असून खऱ्या अर्थाने संसाराला लागले आहेत त्यांनाही...

१९९२-९६ कालखंडात धुळ्याच्या जयहिंद महाविद्यालयातील नोकरी सोडून जळगाव जनता बँकेच्या आर्थिक स्थिरतेच्या नोकरीला लागलो होतो. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची क्षमता प्राप्त झाल्यावर कुटुंबीयांनी विवाह करण्याचे ठरविले. श्री. अनिल व सौ. अंजली तारे यांच्या मध्यस्थीने अहमदनगर येथील श्री रंगनाथ कुलकर्णी यांची कन्या कु. संगीता हिचे स्थळ आले. हे चौथे स्थळ होते. पूर्वीच्या दोन ठिकाणांना माझी नापसंती होती तर एका ठिकाणी नकार मिळाला होता. श्री. तारे यांचेकडे आई-वडील व काका-काकूंसह मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी पसंत असल्याचा निरोप लगेच दुसऱ्या दिवशी दिला. त्यांनीही पसंती कळविली. नगरच्या परतीच्या प्रवासात धुळे मार्गे जाऊन मोठे बंधू व वहिनींनी मुलगी पाहिली. नगरला दोन वाहने नातेवाईक घेऊन साखरपुडा झाला. तशी विवाहाची फारशी बोलणी नव्हती कारण हुंडा वा सोने-नाणे याबाबत कुठलीही अपेक्षा नव्हती. दि. ३१ मे विवाहाची तारीख ठरली. कपडा खरेदी वस्त्रांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नगरलाच झाली. त्यावेळी प्रथम मुलीचे घर पाहिले. माळी वाड्यात स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ एका वाड्यात एक खोली होती. मुलीला एक भाऊ व एक बहीण. आईला पक्षाघाताचा झटका येऊन गेलेला. 

कापड खरेदी नंतर एका आईस्क्रीमच्या दुकानात लस्सी घेतली आणि तेथून निघतांना होणाऱ्या बायकोचा हात प्रथम हातात घेतला. मनात भीती होतीच. दोन-चार वाक्यांपलीकडे फार काही बोलणे झाले नाही मात्र नजरेने खूप काही समजले होते. लग्न नेहमीप्रमाणे एका सामान्य कुटुंबातील विवाहासारखे झाले. कुठे तरी रुसवे-फुगवेही... कुलस्वामिनी कृपेने व थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने, सर्व नातेवाईक व मित्र परिवाराच्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला. दोन्ही कुटुंबातील पहिलाच विवाह असल्याने नातेवाईकांची चांगली उपस्थिती होती. विवाहाच्या वेळेस माझ्या आई-वडिलांनी पूर्व अनुभवानुसार त्यांच्या शिस्तीत विवाहाची संपूर्ण आखणी केली होती. आमची बाजू सांभाळून घेण्यासाठी स्व. मोरु काळे व स्व. अंजूवहिनी (माझा मावसभाऊ व त्याची पत्नी) आवर्जून खास अकोल्याहून आले होते. लग्नातील संपूर्ण चार्म त्यांनी टिकवून ठेवला होता. श्री. सुनीलराव गोरकर (सौ.च्या आत्येबहीणींचे यजमान) यांनी मुलीकडच्या विवाहाची धुरा सांभाळली होती. त्यांच्याच घराजवळील एका घरात साखरपुडा झाला होता. सौ. क्षमा कुलकर्णी (सौं.च्या काकू) यांनी महिला आघाडी सांभाळली होती. सीमंती पूजन, वरात सर्व सोपस्कार आटोपून मंगलाष्टक सुरु झाले. "कुर्यात सदा मंगलम !" म्हणत माळ जेव्हा घातली तेव्हा आयुष्यात प्रथमच वेगळी जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. त्यानंतरचे सर्व विधी आटोपून धुळ्याचा परतीचा प्रवास सुरु झाला. 

दुसऱ्या दिवशी गावातल्या मंडळींसाठी धुळ्यातील सुप्रसिद्ध अशा नवग्रही मंगल कार्यालयात स्वागत समारंभ झाला. आयुष्य घडविणारी अनेक मंडळी याप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी आले होते. केमिस्ट्री विषयाचे स्व. प्रा. पी. डी. खैरनार यांनी "तुला हिरा मिळाला आहे" असे बायकोला सांगितले. त्यांचे शब्द आजही जसेच्या तसे कानात घुमतात. ऋतुशांती व अन्य विधी यथासांग पार पडले. मांडव परतणीसाठी एक दिवस नगरला जाऊन आलो. समवयस्क तीन मित्रांचे पंचमढी, जबलपूर, भेडाघाट असे फिरणे (हनिमून) झाले. विवाहासाठी एक महिन्याची सुट्टी काढली होती. तीन आठवड्यानंतरच कामावर हजर झालो. काही दिवस धुळ्यात राहिल्यावर आमचा संसार जळगावच्या इंडिया गॅरेज जवळील नांदेडकर वाड्याच्या दोन खोल्यांमध्ये सुरु झाला. प्रेम, रोमांच व कधी तरी जबाबदारी पार पडू शकू किंवा नाही या दृष्टीने भीतीही वाटत असे. फार वाद-विवाद किंवा भांडणे झालेली फारशी आठवत नाही. आजूबाजूच्या माताभगिनी व गावातील नातेवाईकांमुळे नेहमीच आधार वाटत असे. गाडी व्यवस्थित सुरु होती. संतती निर्मितीच्या अनुषंगाने प्लॅनिंग वगैरे अशी काही भानगड नव्हती. आपल्या सेवानिवृत्तीपर्यंत संसारातील जबाबदारी पूर्ण व्हावी या त्यामागील उद्देश होता. (आज तो बहुतांशपणे पूर्णत्वास जातांना दिसत आहे) 

एक वर्षाच्या आत म्हणजे ११ एप्रिल ९८ (हनुमान जयंतीच्या दिवशी) प्रथमेशचा जन्म झाला. एक आनंदाची लहर या संपूर्ण काळात अनुभवत होतो. दुर्दैवाने १४ ऑगस्ट ९८ ला वडील गमावले आणि मुलांनी आपले आजोबा ! जीवनातील एका अवघड प्रसंगातून संपूर्ण कुटुंब जात होते. अर्थात श्री. विजय कुळकर्णी (काका) यानंतरच्या संपूर्ण कालखंडात व आजही सोबत आहेत याचा आनंद व अभिमान आहे. साधारण ५ वर्षानंतर १३ फेब्रुवारी २००३ रोजी मृण्मयीचा जन्म झाला आणि कुटुंबाचा चौकोन पूर्ण झाला. तिचा जन्म ति. आईसह सर्वांसाठी एक शुभशकुन ठरला. आज प्रथमेश त्याचे शिक्षण पूर्ण करुन नोकरीला लागला आहे, मृण्मयी तिच्या आवडीच्या क्षेत्रात (कथक नृत्य) शिक्षण घेत आहे. अनेक चढ-उत्तर, सुख-दुःखाचे प्रसंग जीवनात आले. सौ. आदितीची संपूर्ण साथ असते. माझ्यासारख्या एका वेगळ्या धाटणीतल्या (भावनिक, वाहवत जाणारा, भौतिक गोष्टींची फारशी अभिलाषा नसलेला, अल्पसंतुष्ट, आपल्या मस्तीत जगणारा, कुटुंब, व्यवसाय व सामाजिक काम यात कुठेही मेळ नसणारा, अव्यवहारी ) माणसाशी जुळवून घेत असतांना अनेकदा तिची कुचंबणा होते अर्थात ति माझीही होतेच. महिलांच्या वर्तनातून , बोलण्यातून त्याची जाणीव होते पुरुष ते खुलेपणाने दाखवीत नाही एव्हढेच... आमच्या सहजीवनातील माझ्या भूमिकेला गुण द्यायचे ठरल्यास १०० पैकी ७० तर सौ. आदितीच्या भूमिकेला १०० पैकी ७० गुण देईल ! हे अशा प्रकारचे मूल्यांकन कशासाठी याचे उत्तर जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा....