Monday 10 October 2022

जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने...

९ ऑक्टोबर ! जागतिक टपाल दिन... जळगाव पोस्ट ऑफिस व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टपाल तिकिटावरील गांधीजी हि चित्र प्रदर्शनी व केला पाकिटाचे विमोचन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने आजचा हा लेख...

आमच्या कुटुंबासाठी पोस्ट ऑफिस हा नेहमीच हृदयाजवळचा विषय राहिला आहे. माझे वडील स्व. विष्णू काशिनाथ कुळकर्णी पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीला होते. सुरुवात मेल-ओव्हरसिअर म्हणून धडगाव येथे झाली. त्यानंतर धुळे पोस्ट ऑफिसमध्ये बराच मोठा काळ ट्रेझरर होते. त्यानंतर शहादा तालुक्यातील म्हसावद येथे सब-पोस्ट मास्तर म्हणून पदोन्नतीने सेवा दिली. त्यानंतर धुळ्याच्या देवपूर व विद्यानगरी पोस्ट ऑफिसमध्ये सब-पोस्ट मास्तर म्हणून सुमारे ३ दशकांहून अधिक काळ नोकरी करून १९९५ मध्ये सेवानिवृत्त झाले. 

मला या खात्याचा नेहमीच अभिमान वाटला आहे. वडिलांच्या नोकरीमुळे अनेकदा पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याचा योग आला. तात्कालिक परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचे ग्राहक भांडार धुळे येथे होते. त्यामुळे अनेकदा किराणा सामान घेण्यासाठी आम्ही कार्यालयात जात असू. पोस्टातील कर्मचाऱ्यांना फार पगार नव्हता. त्यांच्याबद्दलची एक विशेष प्रतिमा समाजमनात होती. वडिलांनी आपल्या नोकरीच्या जोरावर आपला परिवार वाढविला. अनेकदा अतिरिक्त कामामुळे त्यांना ओव्हरटाइमही मिळत होता. ट्रेझरर या कामात त्यांनी कौशल्य अवगत केल्यामुळे आपल्या ब्रँचचे काम झाल्यानंतर ते मुख्य कार्यालयात अतिरिक्त वेळ देत असत. आम्हा तिघंही भावांचे शिक्षण, घर, लग्नकार्ये, आजारपण, परिवारातील अन्य सदस्यांची जबाबदारी स्वतःहून घेऊन या सर्व गोष्टी पोस्ट ऑफिसच्या भरवश्यावर केल्या. उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नव्हते. केवळ प्रामाणिक काम व कष्ट हि त्यांची बलस्थाने होती व ती त्यांनी आयुष्यभर सांभाळली. स्व. अमृत देशपांडे यांच्यासारखे आयुष्यभराचे मित्र मिळाले. वडिलांच्या निधनापश्चात काकांनी आपला मित्रत्वाचा धर्म शेवटपर्यंत पाळला. आजही त्यांच्या परिवाराशी आमचे संबंध आहे. पिंगळे काका, जग्गू काका हे मित्र तर अग्निहोत्री व बदामे यासारखे सहकारी त्यांना लाभले. या सर्वांप्रती आजच्या या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करतो. 

प्रशिक्षण क्षेत्रात काम करीत असल्याने जळगाव, भुसावळ, चाळीसगाव व नाशिक इ. ठिकाणी पोस्टातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची संधी अनेकदा मिळाली. दळणवळण / संवाद क्षेत्रात पोस्ट ऑफिसचे काम महत्वपूर्ण ठरते. त्याकाळी बचतीची सवय सामान्यजनांना पोस्ट ऑफिसने लावली. राष्ट्रीय बचत पत्र (NSC) किसान विकास पत्र (KVP), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आवर्त ठेव योजना(RD), मुदत ठेव योजना (FD), मासिक व्याज योजना (MIS) यासारख्या अनेक योजना पोस्ट ऑफिसने राबविल्या. पोस्टाची एजन्सी घेऊन अनेक कुटुंबे उभी राहिली. विशेषतः महिलांनी एजंसी घेतल्यास त्यांना ४ टक्के कमिशन मिळत असे, पुरुष एजंटास मात्र १ टक्का कमिशन मिळत असे. सेवा क्षेत्रातील सर्वात मोठी व विश्वासार्ह सेवा म्हणून पोस्ट ऑफिसकडे पहिले जाते. अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत पोस्ट ऑफिसने कात टाकली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .बँकिंग क्षेत्रातही पोस्ट ऑफिसने आपले पाऊल टाकले आहे. टपाल हि संवादाची जीवनरेखा म्हणून काम करते. आज संवादाची इतकी साधने उपलब्ध असतांनाही पोस्ट ऑफिस आपले स्थान टिकवून आहे. प्रसंगी तोटा सहन करीत सरकारही जनतेच्या हितासाठी हि सेवा सुरु ठेवत आहे हे विशेष म्हटले पाहिजे. 

कधीतरी नोकरीची खास बातमी तर कधी तरी ताईची राखी, कधी कुलदेवीचा प्रसाद तर कधी गीतादर्शन मासिक, कधी शुभ कार्याची बातमी तर कधी शोक संदेशही, कधी मनिऑर्डर तर कधी VPP , कधी पोस्ट कार्ड, कधी अंतर्देशीय पत्र, कधी पाकीट, कधी भेट कार्ड, कधी लग्नपत्रिका या सर्व गोष्टींकरिता गल्लीत टपाल वाटपासाठी येणारे पोस्टमन काका हे आपल्या घरातील एक सदस्यच होते. मुलीच्या वडिलांनी संपर्क करतांना जोडकार्ड पाठविण्याची पद्धत होती जेणेकरून उलटटपाली उत्तराची अपेक्षा असायची. ऊन , वारा व पाऊस याची कधी तमा त्यांनी बाळगली नाही. सायकलला लावलेली पोस्टाची बॅग, त्यात सॉर्टींग करून लावलेले टपाल, पोस्टाचा खाकी गणवेश घातलेला... कधी राग नाही कधी चिडचिड नाही... आपलं काम इमानेइतबारे करणारे पोस्टमन काका !


उन्हाळ्यात सहज काका पाणी घेता का किंवा दिवाळीत फराळाला आवर्जून बोलवली जाणारी व्यक्ती म्हणजे पोस्टमन काका ! टपाल तिकीट हा मुलांसाठीचा तर एक छंदच. प्रत्येक मुलाने त्याकाळी अशी अनेक तिकिटे गोळा केलेली मला आठवतात. 

पोस्ट ऑफिस म्हटले कि , काउंटर, लाल टपाल पेटी, तेथील विशिष्ट प्रकारचा वास असलेला डिंक, तो वापरण्यासाठी ठेवलेली काडी, गोपनीय कागदपत्रे पाठविताना पाकिटे सील बंद करण्याची विशिष्ट पद्धती, पोस्ट कार्ड वा तिकिटे घेण्यासाठी गेले असता एका विशिष्ट प्रकारच्या सुरक्षा जाळीच्या आत बसलेली व्यक्ती, वाटप करावयाच्या टपालावर शिक्के मारण्याची एक विशिष्ट पद्धत आणि त्यामुळे निर्माण होणारा तालबद्ध आवाज... टपाल इप्सितस्थळी लवकर पोहोचावे यासाठी अनेकदा RMS मध्ये जाऊन टपाल दिलेले मला आठवते. एक टिपिकल मध्यमवर्गीय अवतार असलेले कर्मचारी हि पोस्टाची ओळख. अलीकडे रूप बदललेली ऑफिसेस व माणसे काही ठिकाणी दिसत असली तरी अपुरी जागा, अपुरा स्टाफ, त्यामुळे स्वाभाविकपणे मिळणारा प्रतिसाद या सर्व गोष्टी आता बऱ्याच प्रमाणात बदलल्या आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी करावी लागणारी तडजोड तरुण पिढी सहज स्वीकारतांना दिसत असली तरी दोन-चार वर्षाची सेवा राहिलेल्यांची मानसिकता सर्व ठिकाणी आढळते तशीच आहे. ज्याप्रमाणे बस , रेल्वे यांना पर्याय म्हणून उभी राहिलेली खासगी बस सेवा त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसला पर्याय देणारी कुरिअर सेवा ज्याप्रमाणे वाढली तशी बस, रेल्वे वा पोस्ट ऑफिसेस या सरकारी सेवा सक्षम व फायदेशीर का ठरत नाही हा प्रश्न अनुत्तरित राहतो. असो आजच्या जागतिक टपाल दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा ! नवीन पिढीला या सेवेची ओळख करून देणे अगत्याचे ठरते. 

काही विशेष घटना...

- १७६६ मध्ये वॉरन हेस्टिंग्ज यांच्या पुढाकाराने ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पोस्टल सेवा सुरु केली. 

- १८५४ मध्ये लॉर्ड डलहौसी यांच्या पुढाकाराने भारतीय पोस्टल कायदा १८५४  अस्तित्वात आला. 

- १,५४,९६५ पोस्ट ऑफिसेसद्वारे सेवा देणारी जगातील सर्वात मोठे नेटवर्क असलेली संस्था म्हणजे पोस्ट ऑफिस.

- ४,१६ ,०८३ कर्मचारी वृंद

- पहिले तिकीट जुलै १८५२ मध्ये इश्यू केले गेले. सिंदे डाक असे त्या तिकिटाचे नाव होते व त्याची किंमत अर्धा आणा होती.

- २१ नोव्हेंबर १९४७ रोजी स्वतंत्न भारताने आपले पहिले डाक तिकीट इश्यू केले. त्याचे किंमत ३ आणि अर्धा आणा होती. 

- १५ ऑगस्ट १९७२ श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी तयार केलेली पिन कोड सिस्टीम लागू करण्यात आली. 

- आजपर्यंत ३००० हुन अधिक तिकिटे विभागाने मार्केटमध्ये आणली.  

- १३५ वर्षांची मनी ऑर्डर सेवा २०१५ मध्ये बंद करण्यात आली. 

- १६० वर्षांची टेलिग्राफ सेवा २०१३ मध्ये बंद करण्यात आली.

- सध्या उपलब्ध असलेले पोस्ट तिकिटे ३१ जानेवारी २०२३ नंतर बंद करण्यात येणार आहेत व बारकोड असलेले तिकिटे वापरात येणार आहे. 

- सध्या पोस्टकार्डची किंमत ५० पैसे असून इनलँड लेटरची किंमत रु. २.५० आहे. 


गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

3 comments:

  1. खूप छान माहिती...

    ReplyDelete
  2. छान लेख. चांगली माहिती !!

    ReplyDelete
  3. खरंच, एका सर्वस्पर्शी संस्थेची माहिती देणारा लेख. प्रदर्शनाची चित्रफीत बघायला आवडेल.

    ReplyDelete