Sunday 4 December 2022

आत्मविश्वास, खिलाडूवृत्ती व फिटनेस देणारी खानदेश रन २०२२

मागील वर्षी खानदेश रनमध्ये उशीर झाल्याने व शेवटच्या मिनिटापर्यंत ओळख व आदी गोष्टींचा वापर करूनही सहभागी होता आले नव्हते. त्यामुळे यावर्षी मॅरेथॉनच्या एक महिना अगोदर (दि. २० ऑक्टोबर) नोंदणी करून सहभाग निश्चित केला. धावण्यापेक्षा चालण्याचा नियमित सराव सुरु होता. शेवटच्या आठवड्यात धावण्याचा सराव केला. बंधू राजेशभाई व तरुण मित्र संदीप यांची उत्तम साथ मिळाली. धावण्यासाठी सर्वात महत्वाचा स्ट्रेचिंगचा धडा त्यांनी दिला. जळगाव रनर ग्रुपने नोंदणी केलेल्या सर्व धावपटूंसाठी आयोजित केलेल्या एकही ट्रेनिंग सत्राचा लाभ घेऊ शकलो नाही. मागच्या दोन मॅरेथॉनचा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी १० किमी धावण्यासाठी ७५ मिनिटे उद्दिष्ट ठेवले होते. 

सामूहिकतेचा आनंद देणाऱ्या व आपल्या स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देणाऱ्या या मॅरेथॉनबद्दल प्रचंड आकर्षण, कुतूहल व आतुरता असते. एक दिवस अगोदर जाऊन BIB अन्य साहित्य घेतले. मानसिक तयारी उत्तम होती. आदल्या दिवशी राजेशभाईंशी बोलून सकाळी ५.३० ला निघायचे ठरल्याप्रमाणे सकाळी घराजवळ भेटलो आणि परिसरातील एक जोडपे तयारीनिशी निघाले येथून सुरु झालेला खानदेश रनचा उत्साह आयोजकांच्या शेवटच्या आनंदोत्सवापर्यंत कायम होता. सागर पार्कवर जातांना वातावरण विश्वास वाढविणारे होते. स्ट्रेचिंग झाले आणि तो थरार अनुभवण्यासाठी आम्ही सिद्ध झालो होतो. थरार हो थरारच कारण विश्वासासोबत १० किमी पूर्ण करू शकू का हि मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी भीती होती. तिला जोड जळगावातील रस्त्यांची स्थिती पाहता पाय लचकणे, मुरगळणे वा अडखळून पडणे अशी धास्ती होती. धावण्यास सुरुवात झाली, मनात काही गणिते आखली जात होती, सुरुवातील वेग थोडा कमी ठेवायचा मात्र जरा जास्त यानंतर धावायचे, रस्त्याचा चढ आला कि चालायचे. एका तरुणी माझी मोटिव्हेशन ठरली. आम्ही पुढे मायेचं होतो. साधारण ५ किमी नतर ती मागे पडली आणि मग मी एक चाळिशीतील तरुण निवडला. आम्ही पुढे मागेच धावत होतो. सरासरी ३०० पावले धावणे मग १०० पावले भरभर चालणे असे सुरु होते. 

संगीत, बँड, पुष्पवृष्टी या गोष्टी उत्साह वाढविणाऱ्या होत्या त्याहीपेक्षा महत्वाचे दोन पायांची जिवंत माणसे प्रोत्साहन देत होती. कम ऑन, बढिया, चलो मत दौडो मध्येच कोणी तरी ओळखीचा सर १० किमी असे आश्चर्याने विचारत होते. कुठे पाणी प्यायचे, किती प्यायचे याचेही मनातल्या मनात गणित मांडत होतो. पहिला टप्पा संपण्यापूर्वी एकाने थोडंच राहिलं असं म्हणून आशा जागवली, तेथून परततांना परीक्षा पाहणारे रस्ते व चढ अधिक होते. मात्र रस्त्यातील १०८ कुंडी यज्ञासाठीची मंडळी व लगबग उभारी देणारी ठरली. मध्येच २१ किमी धावणारे धावपटू पाहून प्रेरणा मिळत होती. कुठे तरी झिफ्फर क्लबचे बायपास झालेले आजोबा पाहून तर आणखीनच आत्मविश्वास वाढत होता. ओळखीची मंडळी भेटून नावानिशी बोलले कि वेग वाढायचा. दुसरा टप्पा पूर्ण करतांना ओळखीच्या राजू उपासनीने व्हिडीओ नंतर पाठवतो असे म्हटले. भारत भ्रमण करणारे DJ Shiva व चैतन्यदायी मित्र ऍड. सागर चित्रे यांना पाहिले आणि ड्रेन होणारी बॅटरी पुन्हा चार्ज झाली, ती संपलीच नाही. 

अंतिम टप्प्याचा माहोल हा जबरदस्त असतो आणि होता, आपणही मानसिकदृष्ट्या विजयी झालेले असतो त्याचाही परिणाम होतो. तेथेही दोन-चार जण वेग वाढविण्यासाठी असतात. कधी कधी तेच अंतिम रेषेजवळ नेऊन सोडतात. ... आणि ८२ मिनिटे व २६ सेकंदात, ३१३ धावपटूत २०९ वा, त्यातील २५४ पुरुषात १८१ वा व वय वर्ष ४१-९९ गटातील ११४ पुरुषात ७७ वा क्रमांक मिळवत १० किमीची मॅरेथॉन पूर्ण केली. प्रेरणास्थान असलेले आदरणीय अशोकभाऊ जैन,  JRG चे किरणदादा बच्छाव, विक्रांत सराफ, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. रवी हिराणी, अन्य परिचित व प्रत्येक धावपटूंमुळे हे अंतर पार झाले. मग इतरांचे अंतर पूर्ण करण्यासाठी त्यांचा मोटिव्हेटर झालो. बंधुवर्य राजेशभाई मागे राहिले होते आणि त्यांची आतुरतेने वाट पाहत होतो. १७ मिनिटांनी ते आले आणि खऱ्या अर्थाने माझ्यासाठी खानदेश रन पूर्ण झाली. 

शारीरिक तंदुरुस्तीबाबत आत्मविश्वास देणारी, इतरांना विजयी करण्यासाठी आवश्यक असणारी खिलाडूवृत्ती देणारी, आदरणीय मोठ्या भाऊंची Leave this world better than you found it ची शिकवण देणारी खानदेश रन २०२२ पूर्ण झाली ती खानदेश रन २०२३ च्या आशेने व ७५ मिनिटांच्या उद्देशाने... जय हिंद ! भारत माता कि जय ! 

गिरीश कुळकर्णी 

Friday 2 December 2022

जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी गीताई - बहिणाईची कविता


जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी गीताई - बहिणाईची कविता 

आज ३ डिसेंबर गीता जयंती आणि बहिणाबाई चौधरींची पुण्यतिथी ! खरं तर हा योगायोग आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते आणि बहिणाबाईंची पुण्यतिथी ३ डिसेंबरला... भगवंताने धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने अखिल विश्वाला जीवन विकासाचे तत्वज्ञान देणारी गीता सांगितली  तर दुसऱ्या बाजूला मानवी जीवनाची गीता  बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून अतिशय सोप्या भाषेत उलगडून  सांगितली. मला कोठेही तुलना करायची नाही कारण या दोनही साहित्यकृती श्रेष्ठतम आहेत. भगवद्गीतेवर टिपण्णी करण्याची माझी पात्रता नाही आणि बहिणाबाईंच्या कवितेवर लिहिण्यासाठी मला शब्दच सापडत नाही. तरीही...

अतिशय प्रतिभासंपन्न असलेल्या सरस्वतीच्या लेकीने जीवनाशी संबंधित असलेल्या अनेक विषयांवर सहजतेने लिहिले आहे. त्यामुळेच खान्देशकन्या वा निसर्गकन्या म्हणून बहिणाबाईंना बंदिस्त वा मर्यादित करणे मला त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे वाटते. त्यांच्या प्रत्येक कवितेतून आपल्याला त्यांच्या प्रज्ञेची (बुद्धीची) प्रचिती येते. ज्ञान प्राप्त करता येते, प्रज्ञा दैवी देणगी असते. कधीही कोणत्याही शाळेत न गेलेल्या बहिणाबाईला एव्हढं सर्व ज्ञान कुठे मिळालं असेल ? त्यांच्या कविता वाचल्यानंतर "हे बावनकशी सोनं आहे ! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे गुन्हा आहे" असं प्र. के. अत्रेंनी म्हटलं आहे. अर्थात बावनकशी सोनं ओळखण्यासाठी त्यांच्यासारखा रत्नपारखी असणे गरजेचे. त्यांच्या व सोपानदेव चौधरी यांच्यामुळे हे सोनं तुम्हा-आम्हा सर्वांपर्यंत पोहोचलं आहे. हे पूर्ण नाही कारण त्याकाळी जेव्हढं लिहिलं गेलं तेव्हढंच आपल्यासमोर आलं आहे. कितीतरी तर त्यांच्याबरोबरच गेलं. असो.

पिढ्यानपिढ्या जिवंत राहील अशी हि काव्यनिर्मिती आहे अगदी भगवद्गीतेसारखीच. बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून सांगितलेलं जीवनाचं तत्वज्ञान उत्स्फूर्त आहे. बोलीभाषेतील या कविता अगदी सहज हृदयाला भिडतात. त्यांच्या कवितेत कधी कल्पनेची भरारी दिसते तर कधी वैधव्याची हृदयभेदक करुणा, कधी संसाराची रहस्ये आहेत तर कधी शेतकरी जीवन आहे. एका बाजूला शुद्ध प्रेमाची शिकवण आहे तर दुसऱ्या बाजूला माणसाच्या स्वार्थीपणातून निर्माण झालेल्या कृतघ्नतेची चीड आहे. कुठे प्रश्न, कुठे विनोद, कुठे उपरोध ! त्यात लय आहे, सूर आहे, ताल आहे, जिव्हाळा आहे, आपलंपण आहे... थक्क करणारं व "चमत्कारा"ची जाणीव करून देणारं हे काव्य. पण हे बहिणाबाईंचं काव्य आहे याची वास्तव जाणीव करून देणारंही आहे. केवळ खाणंच अधाशासारखं करता येतं असं नाही तर वाचनही करता येतं  असे हे महाकाव्य  - बहिणाईच्या कविता - आपल्यासाठी गीताच !


जुन्या जळगावात चौधरी वाड्यात बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात केलेले आहे. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट त्याचे देखभाल करते. या संग्रहालयात बहिणाबाईंच्या रोजच्या वापरातली शेतीची अवजारे, स्वंयपाकाच्या वस्तू, भांडी, पूजेचे साहित्य आहे. संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंचे, आठवणींचेच संग्रहालय नाही तर मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या, कृषी संस्कृती जपणाऱ्या, कष्टकरी मातृशक्तीच्या श्रमाचा ठेवा आहे. येणाऱ्या सर्व पिढ्यांना हे पाहता येणार आहे. गरज आहे त्याचे मोल जाणून घेण्याची आणि पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याची... त्यासाठी आजच्या दिनी आपण या संग्रहालयाला आपल्या कुटुंबियांसह अवश्य भेट द्या ! या पवित्र वास्तूत आपल्याला वेगळी अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. सोबतच दिवसभरात आपल्याला बहिणाबाईंच्या कविता जेथेही मिळतील त्या वाचा, ऐका... वाचून दाखवा ! काही कवितांमधली मला भावलेली कडवी येथे देत आहे. 

येहरीत दोन मोटा ,  दोन्हीमधी पानी एक

मोट हाकलतो एक , जीव पोसतो कितीक ?


अरे वारकऱ्या तुले , नही ऊन वारा थंडी 

झुगारित अवघ्याले , आली पंढरीची दिंडी 


अरे पांडुरंगा, तुझी , कशी भक्ती करू सांग 

तुझ्या रुपाआड येत , सावकराचं रे सोंग 


नको लागू जीवा , सदा मतलबापाठी 

हिरिताचं देनं घेनं , नही पोटासाठी 


जरी फुटल्या बांगड्या, मनगटी करतूत

तुटे मंगयंसुतर, उरे गयाची शपथ 


देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते 

लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते 


लागे पायाला चटके , रस्ता तापीसनी लाल

माझ्या माहेराची वाट , माले वाटे मखमल 


शिलगावली रे काडी , जोत पेटली पेटली 

आंधाऱ्याले ब्याहीसनी , मेली इझीसनी गेली 


मानसापरी मानूस , राहतो रे येडजाना  

अरे होतो छापीसनी , कोरा कागद शहाना


आता फिरली आरती , भजन गेलं सरी

'बह्यना' देवाचिया दारी , उभी क्षनभरी

आपल्याला जर कविता मिळाल्या नाही तर मला ९८२३३३४०८४ या क्रमांकावर जरूर फोन करा. बाहेरगावच्या मंडळींना जळगावात बघण्यासारखे काय आहे असं प्रश्न असेल तर बहिणाबाईंच्या घराला जरूर भेट द्या आणि आयुष्यभरासाठी आठवण घेऊन जा !

गिरीश कुळकर्णी