Saturday 13 March 2021

महिला दिन का ? कशासाठी ?




नेहमीच चाकोरी बाहेरील उपक्रम राबविणाऱ्या आशा फाऊंडेशनने यावर्षी महिला दिनानिमित्त महिला दिन साजरा करण्याबद्दल समाजमनाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. समाज प्रबोधन व जनजागृतीसाठी अशा प्रकारचे दिन साजरे करण्याची परंपरा सर्वत्र आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी, त्यांचे हक्क, अधिकार याबद्दल जागरुकता करण्यासाठी, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करीत असतांना योग्य सन्मान केला पाहिजे यासाठी समाजमन तयार करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. महिला दिनाचा हा उद्देश सफल होत नसला तरी तो साजरा केला पाहिजे अशी भावना संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून लक्षात येते. महिलांना केवळ महिला दिनी सन्मान न देता त्यांच्याप्रती वर्षभर कृतज्ञता व्यक्त करण्याची व योग्य सन्मान देण्याची अपेक्षा सर्वांनीच व्यक्त केलेली आहे. 

आशा फाऊंडेशनच्या या सर्वेक्षणात जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, मुंबई, लातूर, सोलापूर, अकोला. अमरावती येथील स्त्री-पुरुषांनी सहभाग नोंदवला. सर्वेक्षणात महिलांपेक्षा पुरुषांचा सहभाग अधिक होता तर ऑनलाईन कार्यक्रमात ९० टक्के महिलांचा सहभाग होता. ८४ टक्के मंडळींना महिला दिन साजरा करावा असे वाटते तर ४२ टक्के लोकांनी महिला दिनाचा मुख्य उद्देश सफल होत नसल्याचे म्हटले आहे. यातही महिला पुरुष असा विचार केला तर ३३ टक्के पुरुषांनी व ६७ टक्के महिलांनी महिला दिनाचा उद्देश साध्य होत नसून तो साजरा केला पाहिजे असे म्हटले आहे. 

महिला दिनाचा उद्देश साध्य करण्यासाठी तुम्हाला भावलेला उपक्रम सांगा या प्रश्नाला उत्तर देतांना अनेकांनी समाजातील कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा समाजासमोर आणून त्यांचा गौरव, मॅगसेसे पुरस्कारप्राप्त नीलिमा मिश्रांसारख्यांनी उभारलेल्या कार्याला प्रत्यक्ष भेट, कुटुंबासाठी व समाजासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांना समाजासमोर आणणे, दुर्गम भागातील महिलांचे प्रबोधन, आरोग्याच्यादृष्टीने त्यांच्यासाठी सामूहिक योगा, त्यांची आरोग्य तपासणी, रक्तदान, महिलांसाठीच्या कायद्यांबाबत प्रबोधन, बचतगटाद्वारे महिला सबलीकरण आदी उपक्रमांचा उल्लेख अनेकांनी केला आहे. 

कर्तृत्ववान व प्रभावी महिलांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सुधा मूर्ती, प्रतिभाताई पाटील, पी. व्ही. संधू, इंदिरा गांधी, इंद्रा नुयी, कल्पना चावला,अरुणिमा सिन्हा, अनिमा पाटील-साबळे, किरण बेदी, कविता राऊत, गुंजन सक्सेना, स्वाती मोहन, अनुराधा टोके यासह विविध क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या महिलांची नावे समोर आली. अनेकांनी नाव न सांगता सर्वच क्षेत्रात महिलांची कामगिरी अलौकिक आहे. त्यातही मोनोरेल, बस, रिक्षा चालविणाऱ्या महिला, संरक्षण दलातील सहभाग, पायलट, मेकॅनिक आदी चाकोरीबाहेरच्या क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांचा आवर्जून उल्लेख केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाची महिला दिनासासाठीची यावर्षीची संकल्पना #choosetochallenge केवळ २० टक्के लोकांनाच सांगता आली. 

असाही महिला दिन... पेट्रोल पंपावरील भगिनींना भेटवस्तू ! 

यानिमित्ताने ऑनलाईन कार्यक्रमातही महिलांनी या अनुषंगाने आपली मते मांडली. मुळात महिला सक्षमीकरण वा सबलीकरण हि संकल्पनाच चुकीची आहे. कारण महिला जन्मतः सबळ आहे. स्त्री-पुरुष हि निसर्गाचीच रूपे असून त्यात कुठलाही भेद निसर्गाने केलेला नसतांना आपण का करतो. हा भेद संपुष्टात यावा यासाठीच महिला दिन साजरा करण्याची परंपरा सुरु झाली आणि ती अव्याहतपणे सुरु आहे. "डे" साजरा करणे हि पाश्चात्य संस्कृती असून भारतीय संस्कृतीत "कृतज्ञता" व्यक्त करण्याची व तीही एक दिवस नाही तर दैनंदिन जीवनात आचरण्याची गोष्ट आहे. एक महिलाच दुसऱ्या महिलेला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकते, त्यामुळे परस्पर सहकार्यातून अनेक गोष्टी साधता येऊ शकतील. महिलांनी एक व्यक्ती म्हणून घर सांभाळावं, सामाजिक भान जपावं, आपले विचार चांगले  ठेवावे, आपलं काम करीत राहावे समाज त्याची योग्य दखल घेतो. यासह अनेक विचार सहभागी महिलांनी व्यक्त केले. 

महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, महिलांचे शोषण, महिला सुरक्षा या सारखे विषय आजही समाज जीवनात आढळतात यावर काम करण्याची आवश्यकता अनेकांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली. या समस्या संपुष्टात येण्यासाठी केवळ कायदे करुन चालणार नाही तर त्यासाठी घरातूनच योग्य संस्कार होण्याची व  समाजमन तयार करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. समारोपात पुणे येथील स्मिता वळसंगकर यांनी महिला दिनाला "इव्हेन्ट"चे स्वरुप दिले गेले आहे. महिलांचे समाजातील स्थान व मान देण्यासाठी कोणत्याही निकषांची गरज नाही. तो तिला सहजभावाने व नैसर्गिकरित्या दिला  पाहिजे असे म्हटले. "कन्यादान ", "मुलगी दिली" वा "मुलगी बघायला येणार आहेत" यासारखे शब्दप्रयोग करतांना विचार केला पाहिजे कारण मुलगी हि वस्तू नाही. महिलांचे वस्तूकरण थांबले पाहिजे. "पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून" वा "पुरुषांच्या बरोबरीने" तसेच "बांगड्यांचा आहेर" वा "बायल्यासारखा काय करतो" यासारख्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजे कारण यातून महिलांना कनिष्ठ दर्जाची भावना निर्माण होते, असे आवाहनही त्यांनी केले. . 

ऑनलाईन कार्यक्रमात शशिकला खाडीलकर, डॉ. मधुबाला जोशी-चिंचाळकर, डॉ. नयना कासखेडीकर, सुलभा कुळकर्णी, अपर्णा महाशब्दे-पाटील, सविता भोळे, विंदा नाईक, प्रणाली महाशब्दे, वैदेही नाखरे, स्वाती ढाके, संगिता पाटील, सुवर्णा चव्हाण, रुपाली पाटील, पयोष्णी कुळकर्णी, यामिनी सुतार, गायत्री सोनार यांचेसह पंकज कुंटे व पत्रकार दिलीप तिवारी यांनी सहभाग घेतला व आपली मते मांडली. 


गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 




Thursday 4 March 2021

समाजपुरुषा होई जागृत !


 

देश, राज्य व जळगावातील सद्यस्थितीवर भाष्य करतांना मला या काव्यपंक्तींची विशेष आठवण होते. कोणाला व्यक्तिगत दोष देण्यापूर्वी समस्त जनतेला जागे होण्याची हि वेळ आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कोरोना महामारीने प्रत्येकासमोर एक आव्हान उभे केलेले असतांना समाज घटकांची कृती विपरीत ठरताना दिसत आहे. परिस्थितीचे योग्य आकलन करुन विवेकी वृत्तीने प्रतिसाद देण्याची हि वेळ आहे. देश, राज्य व स्थानिक पातळीवर अपेक्षित असलेला परस्परांवरील विश्वास हरविलेला दिसतो आहे. त्याची परिणीती आजच्या परिस्थितीत भरलेली व भारलेली दिसत आहे. सर्वच पातळीवरील नेतृत्वाला हा विश्वास सार्थ ठरविण्यात अपयश येतांना दिसत आहे. आपण सर्वच एका संक्रमण अवस्थेतून जात असतांना तटस्थ व त्रयस्थपणे गांभीर्याने वर्तन घडणे अपेक्षित आहे. स्वातंत्र्यानंतरचा ७ दशकांहून अधिक काळ लोटला असतांना स्थित्यंतराच्या एका मोठ्या लाटेवर आपण सर्व स्वार आहोत. त्यामुळे अपेक्षित असलेला आंतर्बाह्य वैचारिक संघर्ष होणे स्वाभाविक आहे. मात्र तो स्वीकारण्यासाठीची वैचारिक प्रगल्भता नेतृत्वासह जनतेने दाखविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच लेखाचे शीर्षक दिले आहे समाज पुरुषा होई जागृत !

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशातील चार प्रमुख स्तंभांच्या भूमिका, जबाबदारी, त्यामधील एकतानता, परस्पर विश्वासार्हता हरवलेली दिसत आहे. त्याला मुख्य कारण आहे ते म्हणजे आपल्या हातात असलेले तंत्रज्ञान ! तंत्रज्ञानाचे फायदे नक्कीच आहे मात्र ते वापरण्यासाठीची सिद्धता नसली तर निर्माण होणार गोंधळ आपण अनुभवत आहोत. १९४८ मध्ये आईन्स्टाईन या जगद्विख्यात शास्त्रज्ञाने म्हटल्याप्रमाणे जीवनातील तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे व नैराश्यामुळे मानवी जीवनमूल्यांची घसरण होईल असा मला विश्वास आहे. त्याचा विपर्यास असाही करण्यात आला कि मला भीती वाटते कि ज्या दिवशी तंत्रज्ञान मानवी सुसंवादाला ओलांडेल त्या दिवशी या जगात मूर्खांची पिढी असेल. जरी हा आईन्स्टाईन यांच्या वाक्याचा विपर्यास असला तरी आज ते वाक्य परिस्थितीची वास्तविकता मांडणारे आहे असे म्हणता येईल. मोबाईलच्या माध्यमातून लोकांच्या हातातले बाहुले झालेला मीडिया मानवतेवर कसा उलटत आहे त्याचे उदाहरण आपण रोज अनुभवत आहोत. याची काही उदाहरणे पाहू या ! 

देशातील जळगावसारख्या एका छोट्या शहरात अलीकडे घडलेल्या केवळ दोन-तीन घटनांचा उल्लेख येथे करणार आहे. शितावरून भाताची परीक्षा या उक्तीनुसार जगात आणि देशात अशा घटनांच्या सुळसुळाटामुळे किती गोंधळ मजला आहे याची कल्पना येईल. 

पहिली घटना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत जळगावात चालविण्यात येणाऱ्या शासकीय आशादीप महिला वसतिगृहात न घडलेल्या कथित घटनेने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. असे होण्याचे कारण काय तर आपण काय करीत आहोत हे करणाऱ्याला समजत नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. सामान्य माणसाच्या हातातील "सोशल मीडिया" या खेळण्याने ईर्षा, स्पर्धा, मत्सर किती टोकाला नेली आहे याचाच तर हा परिणाम म्हणता येईल अशी स्थिती आहे. कोणीतरी आपला स्वार्थ साधण्यासाठी केलेल्या कृतीचा अर्थ समजून न घेता केवळ "कॉपी पेस्ट" या वृत्तीने हे झाले असे ठामपणे म्हणता येईल. त्यात भर म्हणून प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया, समाज धुरीण, राजकारणी यातील कोणीही विषयाचे गांभीर्य समजून न घेता केवळ आणि केवळ आपल्या स्वार्थासाठी केलेली हि अविचारी कृती म्हणता येईल. 

दुसरी घटना एका सुपरशॉपमध्ये मानसिक संतुलन गमावलेल्या महिलेच्या कथित चोरीबद्दलच्या समाज माध्यमातील व्हिडीओचे आहे. घडलेल्या घटनेला हाताळायचे कसे याचे शिक्षण नसलेल्या उथळ व उतावीळ लोकांनी आपण काय करीत आहोत याचे भानच ठेवले नाही. अशा प्रकारचा व्हिडीओ समाज माध्यमात पसरवून आपण नक्की काय साध्य केले याचा विचार कोणीही केला नाही. एका समूहात हे व्हिडीओ आल्यावर हा फेक आहे असे सांगितल्यावरही पुन्हा दोनदा पाठविण्यात आला याला काय म्हणायचे ?  

तिसरी घटना हि आत्महत्येसंदर्भातील आहे. घटना एक नसून दररोज घडणाऱ्या किमान दोन घटना आहे. सध्याच्या सर्वच प्रकारचे (आर्थिक, सामाजिक, मानसिक इ.) संतुलन बिघडलेल्या स्थितीत वय वर्षे १३ पासून ते पन्नाशीच्या पुढील व्यक्ती अप्रिय गोष्टी करतांना दिसतात. सर्वच प्रकारच्या माध्यमांमध्ये या घटनांचे उद्दात्तीकरण होतांना दिसते आहे. घटना घडली हे वास्तव मी नाकारत नाही मात्र त्याला महत्व किती द्यावे ? याचा विचार करणार कि नाही ? पुन्हा यातून साध्य होणार तरी काय ? आणखी आत्महत्या दुसरे काय ? आपल्याला हे अपेक्षित आहे काय ?   

देवा, त्यांना माफ कर, ते काय करताहेत हे त्यांना समजत नाही असे म्हणायचे दिवस संपलेत. वरील सर्व घटनांच्या परिणामांची जबाबदारी कोण घेणार ? त्याने समाज मनात कलुषितता निर्माण झालेल्या संस्थेचे काय ? शहराची अब्रू वेशीला टांगली जातेय याची जबाबदारी कोणाची ? समाज मनात परस्परांबद्दल संशयीवृत्ती बळावण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांना शिक्षा कोण, केव्हा व काय करणार ? असे पुन्हा घडू नये यासाठीची आचारसंहिता निर्माण होणार कि नाही ? केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार होत असतांना समाज हतबलतेने पाहत राहणार ? काहीही दोष नसतांना त्याची फळे भोगत राहणार ? वसतिगृहातील अधिकाऱ्यांसह तेथील महिला ज्या ताणतणावात आहेत त्यांच्या मानसिकतेचे काय ? समाजातील  संवेदनशील नागरिकांचे काय ? वाढत्या आत्महत्या थांबवायच्या कशा ? असे एक ना अनेक प्रश्न अस्वस्थ करीत आहेत. याचे प्रामाणिकपणे उत्तर शोधण्याचा प्रयत्न एक संवेदनशील माणूस म्हणून करीत आहे. मिळालेले उत्तर आहे समाज पुरुषा होई जागृत ! 

प्रजासत्ताक देशात आपण स्वीकारलेली घटना त्याद्वारे आपल्याला मिळालेले अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदारी याचे भान कायम ठेवणे आवश्यक आहे असे वाटते. संसद, कार्यपालिका, न्यायपालिका व सर्व प्रकारची माध्यमे यांचेसाठी आदर्श आचारसंहिता कायद्याच्या स्वरुपात स्थित आहे. मात्र सामान्यजनांच्या हातातील खेळण्याचे(!) गांभीर्य, त्याला हाताळण्याचे कौशल्य व जबाबदारी याबाबत सजग होण्याची नक्कीच आवश्यकता आहे. "कॉपी - पेस्ट" वा "फॉरवर्ड" या आजारापासून स्वतःला रोखले पाहिजे. समाज मनातील सकारात्मकता वाढीस लागावी यासाठी त्याचा योग्य वापर करण्याचे धोरण प्रत्येकाने अंगिकारले पाहिजे. कविवर्य ग. दि. माडगूळकरांच्या यंत्र युगातील ऋचा समाजाला त्याची शक्ती जाणवून देणाऱ्या व जागृत करणाऱ्या आहेत...


तुझ्या कृपेचे जे भस्मासूर

सिद्ध जाहले तुज जाळाया

तूच निर्मुनी नव मोहिनी 

जाळ तयांच्या कृतांत काया ||


सहस्त्रशीर्षा, सहस्रपादा

तूच वार या तुझ्या आपदा 

उपभोगाया आण पदाशी 

तूच निर्मिली तुझी संपदा ||


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४