Saturday 13 March 2021

महिला दिन का ? कशासाठी ?




नेहमीच चाकोरी बाहेरील उपक्रम राबविणाऱ्या आशा फाऊंडेशनने यावर्षी महिला दिनानिमित्त महिला दिन साजरा करण्याबद्दल समाजमनाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. समाज प्रबोधन व जनजागृतीसाठी अशा प्रकारचे दिन साजरे करण्याची परंपरा सर्वत्र आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी, त्यांचे हक्क, अधिकार याबद्दल जागरुकता करण्यासाठी, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करीत असतांना योग्य सन्मान केला पाहिजे यासाठी समाजमन तयार करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. महिला दिनाचा हा उद्देश सफल होत नसला तरी तो साजरा केला पाहिजे अशी भावना संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून लक्षात येते. महिलांना केवळ महिला दिनी सन्मान न देता त्यांच्याप्रती वर्षभर कृतज्ञता व्यक्त करण्याची व योग्य सन्मान देण्याची अपेक्षा सर्वांनीच व्यक्त केलेली आहे. 

आशा फाऊंडेशनच्या या सर्वेक्षणात जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, मुंबई, लातूर, सोलापूर, अकोला. अमरावती येथील स्त्री-पुरुषांनी सहभाग नोंदवला. सर्वेक्षणात महिलांपेक्षा पुरुषांचा सहभाग अधिक होता तर ऑनलाईन कार्यक्रमात ९० टक्के महिलांचा सहभाग होता. ८४ टक्के मंडळींना महिला दिन साजरा करावा असे वाटते तर ४२ टक्के लोकांनी महिला दिनाचा मुख्य उद्देश सफल होत नसल्याचे म्हटले आहे. यातही महिला पुरुष असा विचार केला तर ३३ टक्के पुरुषांनी व ६७ टक्के महिलांनी महिला दिनाचा उद्देश साध्य होत नसून तो साजरा केला पाहिजे असे म्हटले आहे. 

महिला दिनाचा उद्देश साध्य करण्यासाठी तुम्हाला भावलेला उपक्रम सांगा या प्रश्नाला उत्तर देतांना अनेकांनी समाजातील कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा समाजासमोर आणून त्यांचा गौरव, मॅगसेसे पुरस्कारप्राप्त नीलिमा मिश्रांसारख्यांनी उभारलेल्या कार्याला प्रत्यक्ष भेट, कुटुंबासाठी व समाजासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांना समाजासमोर आणणे, दुर्गम भागातील महिलांचे प्रबोधन, आरोग्याच्यादृष्टीने त्यांच्यासाठी सामूहिक योगा, त्यांची आरोग्य तपासणी, रक्तदान, महिलांसाठीच्या कायद्यांबाबत प्रबोधन, बचतगटाद्वारे महिला सबलीकरण आदी उपक्रमांचा उल्लेख अनेकांनी केला आहे. 

कर्तृत्ववान व प्रभावी महिलांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सुधा मूर्ती, प्रतिभाताई पाटील, पी. व्ही. संधू, इंदिरा गांधी, इंद्रा नुयी, कल्पना चावला,अरुणिमा सिन्हा, अनिमा पाटील-साबळे, किरण बेदी, कविता राऊत, गुंजन सक्सेना, स्वाती मोहन, अनुराधा टोके यासह विविध क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या महिलांची नावे समोर आली. अनेकांनी नाव न सांगता सर्वच क्षेत्रात महिलांची कामगिरी अलौकिक आहे. त्यातही मोनोरेल, बस, रिक्षा चालविणाऱ्या महिला, संरक्षण दलातील सहभाग, पायलट, मेकॅनिक आदी चाकोरीबाहेरच्या क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांचा आवर्जून उल्लेख केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाची महिला दिनासासाठीची यावर्षीची संकल्पना #choosetochallenge केवळ २० टक्के लोकांनाच सांगता आली. 

असाही महिला दिन... पेट्रोल पंपावरील भगिनींना भेटवस्तू ! 

यानिमित्ताने ऑनलाईन कार्यक्रमातही महिलांनी या अनुषंगाने आपली मते मांडली. मुळात महिला सक्षमीकरण वा सबलीकरण हि संकल्पनाच चुकीची आहे. कारण महिला जन्मतः सबळ आहे. स्त्री-पुरुष हि निसर्गाचीच रूपे असून त्यात कुठलाही भेद निसर्गाने केलेला नसतांना आपण का करतो. हा भेद संपुष्टात यावा यासाठीच महिला दिन साजरा करण्याची परंपरा सुरु झाली आणि ती अव्याहतपणे सुरु आहे. "डे" साजरा करणे हि पाश्चात्य संस्कृती असून भारतीय संस्कृतीत "कृतज्ञता" व्यक्त करण्याची व तीही एक दिवस नाही तर दैनंदिन जीवनात आचरण्याची गोष्ट आहे. एक महिलाच दुसऱ्या महिलेला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकते, त्यामुळे परस्पर सहकार्यातून अनेक गोष्टी साधता येऊ शकतील. महिलांनी एक व्यक्ती म्हणून घर सांभाळावं, सामाजिक भान जपावं, आपले विचार चांगले  ठेवावे, आपलं काम करीत राहावे समाज त्याची योग्य दखल घेतो. यासह अनेक विचार सहभागी महिलांनी व्यक्त केले. 

महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, महिलांचे शोषण, महिला सुरक्षा या सारखे विषय आजही समाज जीवनात आढळतात यावर काम करण्याची आवश्यकता अनेकांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली. या समस्या संपुष्टात येण्यासाठी केवळ कायदे करुन चालणार नाही तर त्यासाठी घरातूनच योग्य संस्कार होण्याची व  समाजमन तयार करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. समारोपात पुणे येथील स्मिता वळसंगकर यांनी महिला दिनाला "इव्हेन्ट"चे स्वरुप दिले गेले आहे. महिलांचे समाजातील स्थान व मान देण्यासाठी कोणत्याही निकषांची गरज नाही. तो तिला सहजभावाने व नैसर्गिकरित्या दिला  पाहिजे असे म्हटले. "कन्यादान ", "मुलगी दिली" वा "मुलगी बघायला येणार आहेत" यासारखे शब्दप्रयोग करतांना विचार केला पाहिजे कारण मुलगी हि वस्तू नाही. महिलांचे वस्तूकरण थांबले पाहिजे. "पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून" वा "पुरुषांच्या बरोबरीने" तसेच "बांगड्यांचा आहेर" वा "बायल्यासारखा काय करतो" यासारख्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजे कारण यातून महिलांना कनिष्ठ दर्जाची भावना निर्माण होते, असे आवाहनही त्यांनी केले. . 

ऑनलाईन कार्यक्रमात शशिकला खाडीलकर, डॉ. मधुबाला जोशी-चिंचाळकर, डॉ. नयना कासखेडीकर, सुलभा कुळकर्णी, अपर्णा महाशब्दे-पाटील, सविता भोळे, विंदा नाईक, प्रणाली महाशब्दे, वैदेही नाखरे, स्वाती ढाके, संगिता पाटील, सुवर्णा चव्हाण, रुपाली पाटील, पयोष्णी कुळकर्णी, यामिनी सुतार, गायत्री सोनार यांचेसह पंकज कुंटे व पत्रकार दिलीप तिवारी यांनी सहभाग घेतला व आपली मते मांडली. 


गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 




3 comments:

  1. अगदी बरोबर आहे,वर्षातील ३६५ दिवसांपैकी केवळ एकच दिवस महिलेचा असतो आणि ३६४ दिवस पुरुषांचे असतात काय?एका बाजूनं असं म्हटलं जातं की नवरा-बायको म्हणजे संसाररुपी रथाची दोन चाकं मग दोघं सारखी असतील तरच रथ नीट चालेल की नाही,याचाच अर्थ दोघांचं महत्व सारखंच! मुळात प्रत्येक दिवस नव्हे दिवसाची सुरुवातच घरातील महिलेपासून होते कारण सकाळी लवकर जाग येणारी व सर्वांना वेळेवर जागं करणारी तीच असते.तीच वेळेवर जागली नाही तर चहा/नाश्ता/जेवणाच्या डब्याची सोय होणार नाही,मुलं वेळेत शाळेत/कॉलेजात आणि नवरा व ती स्वतःही कामावर जाऊ शकणार नाही आणि इतकंच नाही तर सायंकाळी मुलं,नवरा घरी आल्यावर पुन्हा तीच स्वयंपाक करणार तेव्हाच तर सर्व जण जेवण करुन रात्री शांत झोपून दुसऱ्या दिवशी कामाला जातील आणि हे काही एक दिवसापुरतेच मर्यादित नाही.मग हे जर वर्षभर चालतंय तर एकच दिवस तिचा कसा? शिवाय,'महिलादिना'लाही तिला कुठे विश्रांती असते? आज कोणत्याही क्षेत्रात पुरुषांसारखीच,पुरुषांचीही आणि पुरुषांच्याच खांद्याला खांदा लावून किंबहुना अधिक प्रामाणिकपणे व एकाग्रतेने काम करणाऱ्या महिलेचा एकच दिवस कसा असू शकतो?हा नावापुरताच दिवस आहे,जो केवळ एकच दिवस नसावा.भलेही 'महिला दिन'असेल पण माझ्या मते तरी महिला 'दीन'नाहीत हे ही तेवढंच खरं!

    ReplyDelete
  2. अनिल रामभाऊ पाटील,विवेकानंदनगर,जळगाव
    ७८७५९१०७८५

    ReplyDelete
  3. खूप छान सर्वेक्षण आणि त्याची मांडणी... आतापर्यंतच्या महिलांकडे बघण्याच्या समाज मानसिकतेमध्ये थोडा जाणीवपूर्वक आणि बराचसा परिस्थितीवशात बदल घडून येत आहे. घरातले निर्णय घेतांना तिच्या मताचा विचार व्हायला हवा. आणि ती निर्णय घेण्यास सक्षम होईल असं करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ती करत असलेल्या घरातल्या कामात - ती नोकरी करत असली व नसली तरीही - तिला मदत करण्याची तयारी घरातल्या पुरुषांनी दाखवली तरच खरी समानता निर्माण होईल. समाजात वावरतांना तिच्या स्त्रीत्वाचा उल्लेखही न होता तिच्याकडे केवळ "माणूस" म्हणून बघितलं जाईल तरच हा फरक पडेल. (सहज बोलतांनासुद्धा अनेकजण "माणूस" हा शब्द फक्त पुरुषासाठीच वापरतात स्त्रीसाठी नाही.) सुधारणा घडते आहे यात प्रश्न नाही पण त्याचा वेग आणि खोली अधिक होणे आवश्यक आहे एव्हढं खरं. डॉ. मुकुंद करंबेळकर, चाळीसगाव.

    ReplyDelete