Thursday 25 June 2020

स्वप्नाचा पाठलाग करणाऱ्या अक्षयची यशोगाथा !

असू अम्ही सुखाने पत्थर पायातील : आशा फौंडेशन


परिस्थिती चांगली नसतांनाही आपण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करु शकतो. वाटेत चांगल्या संस्था आणि माणसे भेटत जातात. धुळे येथील शास्त्रज्ञ बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व नुकताच आईसर (IISER) भोपाळ येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या धुळे येथील अक्षय भडागे या युवकाची हि यशोगाथा आहे. आशा फौंडेशन व संस्थापक श्री. संजीव दहिवदकर यांच्या आर्थिक पाठबळामुळे माझ्या लक्ष्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करु शकलो असे तो कृतज्ञतेने सांगतो. अक्षयच्या पाच वर्षाच्या BS-MS या अभ्यासक्रमाच्या सात सत्रांची फी व त्याच्या फ्रांस येथे संशोधनासाठी लागणारा सर्व खर्च संस्थेने केला आहे. सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेतूनच संजीव दहिवदकरांनी आशा फौंडेशनचे बीजारोपण केले आणि आज ह्या विशाल वृक्षाला अक्षयरुपी सुंदर फळ लागले आहे. अक्षयसारख्या अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने संस्था सहाय्य्यभुत ठरली आहे व त्याचे आत्मिक समाधान संस्थाचालकांसह तिच्या देणगीदार व हितचिंतकांना आहे. संस्थेच्या या कार्याची मूळ प्रेरणा एका पद्याच्या दोन ओळीत आहे...

असू अम्ही सुखाने पत्थर पायातील  
मंदिर उभविणे हेच आमुचे शील ॥


एक समाजोपयोगी सुंदर सामाजिक संस्था निर्माण करायची हे सर्वच कार्यकर्त्यांचं ध्येय असतं. ध्येय ही भान राखून योजना करण्याची व बेभान होऊन त्यासाठी काम करण्याची गोष्ट असते. ती संस्थेच्या कार्यकर्त्यांसाठी एक प्रकारची बेधुंद करणारी नशा (अर्थातच उदात्त अर्थाने) असते. आपल्या  ध्येयपथावर स्वत:ला झोकून देऊन निरंतर मार्गक्रमण करत राहणं हीच त्यासाठीची अपरिहार्यता ! अक्षयच्या यशोगाथेमागे आशा फौंडेशनची हीच भूमिका होती. जाणून घेऊ या अक्षयची यशोगाथा... 

बालपणी टीव्हीवर एका कार्यक्रमात शास्त्रज्ञ होणं हे एक आव्हानात्मक पण आदराचं स्थान देणारं प्रोफेशन असल्याचे बघितलं होतं आणि तेव्हापासूनच मनात शास्त्रज्ञ होण्याचा विचार रुजला असावा. वडिलांची धुळ्यातच भेळची गाडी होती. कमी वयात कुटुंबाची जबाबदारी घेतल्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण न करु शकलेले अक्षयचे पप्पा कै. सुनील, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मात्र धडपडत होते, प्रामाणिक प्रयत्न करीत होते. लग्न झाल्यावर पत्नी श्रीमती कवितालाही शिक्षणाचा आग्रह करुन एम. ए. बी. एड. केलं. अक्षय नववीत असतांना जुन-२०११ मध्ये वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. अक्षय व त्याची बहीण सोनल यांची जबाबदारी आईवर आली. सुदैवाने त्या धुळ्याच्या नामांकित अशा जयहिंद महाविद्यालयात मराठी विभागात विना-अनुदानित तत्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या मात्र पगार मात्र आजच्या काळात तुटपुंजा असाच होता. अशा विपरीत परिस्थिती भडागे परिवाराचा संघर्ष सुरु झाला.  अक्षयचं शालेय शिक्षण धुळ्यात जयहिंद शाळेत सुरु होतं. हुशार असलेल्या अक्षय चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा व नववीत NMMS ची परीक्षा उत्तीर्ण झाला. परिस्थितीची जाणीव ठेवत दहावीत ९४.१८% तर बारावीत ८६% गुण मिळवले. इकडे आर्थिक गरज भागविण्यासाठी आईने एमपीएससी , पीएसआय व इतर स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घ्यायला सुरवात केली. त्यांचे अनेक विद्यार्थी आज शासनाच्या सेवेत चांगल्या पदांवर कार्यरत असून अनेक जण पीएसआय देखील झाले आहेत. २०१५ ला अक्षय आईसर (Indian Institute of Science Education and Research) ची प्रवेश परीक्षा पास झाला आणि आईसर भोपाळ येथे प्रवेश मिळाला. आईसर हि शास्त्रज्ञ घडविण्यासाठी सरकारने सुरु केलेली एक अत्यावश्यक व उच्च दर्जाची शैक्षणिक संस्था ! फिजिक्स, केमिस्ट्री, गणित, बायोलॉजी, अर्थ सायन्स यासारख्या विज्ञानातील मूलभूत शाखांमध्ये विविध विषयांवर संशोधन कसे करावे हे या आईसर संस्थेत शिकवलं जाते. 

आईसर जरी शिक्षणासाठी उत्तम जागा असली तरीही तिथे मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत फी व तसेच इतर खर्च भागवणे फार कठीण जात होते. पहिले तीन सत्र आईने हि तारेवरची कसरत आपल्या सहकारी व संबंधितांकडून केली. मात्र प्रत्येक वेळी पैसे मागतांना त्यांना ओशाळल्यासारखे व्हायचे. महाविद्यालयातील सहकारी सौ. अस्मिता कापसे आणि प्रा. गिरीश देसले सरांना परिस्थिती सांगितली. त्यांनी आशा फौंडेशन व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संजीव दहिवदकरांबद्दल सांगितले. संस्थेच्या जळगाव कार्यालयाच्या माध्यमातून संजीव दहिवदकरांशी संपर्क झाला आणि उर्वरित पूर्ण शिक्षणाची जबाबदारी संस्था घेईल असे तात्काळ सांगितले आणि तशी व्यवस्थाही केली. आर्थिक अडचणी कमी झाल्यामुळे अक्षय अभ्यासात चांगल्याप्रकारे लक्ष देऊ लागला. दुसऱ्या वर्षानंतर अक्षय कोलकाता मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिकस येथे क्वांटम इन्फॉर्मेशन थेअरी (Quantum Information Theory ) या विषयात इंटर्नशिप केली. यात भविष्यातील क्वांटम कॉम्प्युटर्स (Quantum Computers) बद्दल अभ्यास केला. 


प्रोफेसर कार्लो रोवेली ह्या जगद्विख्यात नामांकित शास्त्रज्ञाबरोबर
 आईसरला तिसऱ्या वर्षी अक्षयने फिजिक्स   हा  विषय निवडला. ग्रहाताऱ्यांबद्दल त्याला   अगदी लहापणापासून कुतूहल होते आणि   आता ते प्रत्यक्षपणे त्याला शिकायला मिळत   होते. फिजिक्समधील एक फार सुप्रसिद्ध प्रश्न   आहे.तो म्हणजे आइन्स्टाईनच्या गुरुत्वाकर्षण  थियरीला क्वांटम थेअरी जोडणे. ह्याचा एक   उपाय म्हणजेच लूप क्वांटम ग्रॅव्हिटी (Loop   Quantum Gravity) फ्रान्समधील प्रा. कार्लो   रोवेल्ली ह्यांनी  प्रा. ली स्मोलीन यांच्यासोबत   स्वतः ही थियरी शोधून काढली आहे. पुढे   चौथ्या वर्षी अक्षयला प्रोफेसर कार्लो रोवेली   ह्या जगद्विख्यात नामांकित शास्त्रज्ञाबरोबर   संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यासाठी   मे २०१९ ते जुलै २०१९ मध्ये फ्रान्सला गेला   होता. तेथे University of Aix-Marseille येथे Loop Quantum Gravity चा अभ्यास केला. ह्यावेळी सुद्धा आशा फौंडेशनने अक्षयचा संपूर्ण खर्च केला. पुढे पाचव्या वर्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ब्लॅक होलवर संशोधन केले. ब्लॅक होल थर्मोडायनॅमिक्स (Black Hole Thermodynamics) (MS Thesis) मध्ये विविध प्रकारच्या ब्लॅक होल्सचा त्याने सखोल अभ्यास केला. त्यात फिजिक्सच्या एंट्रोपी (एंट्रोपी) नावाच्या एका कॉन्सेप्टचा अभ्यास केला. एका विशिष्ट ब्लॅक होलसाठी त्याने एंट्रोपी कॅल्क्युलेशन्स केले जे ह्यापूर्वी कोणीही केलेले नव्हते. त्याच्या या थेसिसला "A" ग्रेड मिळाली आहे. त्यानंतर जून २०२० ला अक्षयने BS-MS हा ५ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उत्तमरित्या पूर्ण केला. शेवटच्या सेमिस्टरचा त्याचा पॉईंटर ९.६४ / १० आहे तर अभ्यासक्रमाचा एकत्रित पॉईंटर ८.२१ / १० आहे. यापुढे अक्षयने सैद्धांतिक भौतिकशास्त्रात  (Theoretical Physics) मध्ये पीएच. डी. करण्याचा निश्चय केला असून सध्या प्रगत भौतिकशास्त्रासाठी (Advanced Physics) एक ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म तयार करीत आहे.

अक्षयला लहानपणापासून पुस्तकांची खूप आवड आहे. पैसे जमवून पुस्तक घेण्यात त्याला आजही मजा वाटते. चित्रकलेचीही त्याला आवड आहे. अक्षय एखाद्या व्यक्तीचे, गोष्टीचे हुबेहूब चित्र काढू शकतो. क्रिकेट, फुटबॉल, बुद्धिबळ तसेच Clash Royale ह्या ऑनलाईन गेम्स खेळतो. लहान बहीण सोनल सध्या नाशिक येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयात  बी. एससी. करीत आहे.  तिला देखील विज्ञानाची गोडी आहे. वनस्पती जीवशास्त्र (Plant Biology) ह्या विषयात संशोधन करण्याचे ध्येय तिने नक्की केले आहे. आई प्रा. कविता भडागे मागील १४ वर्षांपासून विनाअनुदानित तत्त्वावर जयहिंद शैक्षणिक संस्थेत मराठी विषयाची प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. अक्षयच्या शिक्षणाचा मार्ग पूर्णतः वेगळा आहे. अभियांत्रिकी वा वैद्यकीय क्षेत्राकडे न जात मूलभूत विज्ञानाचा मार्ग त्याने निवडला आहे. कुटुंबाची परिस्थिती अशी असतांनाही "नोकरी कर" असा अट्टाहास न करता आईने माझी आवड जपायला सांगितली आहे. नातेवाईक, शेजारी-पाजारी व समाज यांचं न ऐकता माझे कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे याचा मला अभिमान आहे, असे अक्षय म्हणतो. आपल्या या शैक्षणिक वाटचालीत आशा फौंडेशनच्या आर्थिक पाठबळाबद्दल अक्षय संजीव दहिवदकर, सुजाता बोरकर, सौ. वसुधा सराफ व संपूर्ण टीमचे मनापासून ऋण व्यक्त करतो. भविष्यात आशा फौंडेशनच्या वाटचालीत माझा सर्वात मोठा वाटा राहील असे कृतज्ञतेने सांगतो. अक्षयच्या उत्तुंग यशाबद्दल अभिनंदन व त्याच्या उज्ज्वल भावी वाटचालीसाठी माझ्या व आशा फौंडेशन परिवाराच्या मनापासून शुभेच्छा ! 


आशा फौंडेशन मागील १२ वर्षांपासून जळगाव येथील इंडीया (INDEEA) या शैक्षणिक प्रकल्पाच्या माध्यमातून कार्यरत आहे. आतापर्यंत ७ लाखांहून अधिक विद्यार्थी, पालक, उद्योजक, व्यावसायिक यांच्या जीवनात बदल घडविण्यात माध्यम ठरला आहे. संस्था प्रशिक्षण, कार्यशाळा, व्याख्याने, समुपदेशन, शिबिरे, अनौपचारिक शिक्षण, विविध प्रकल्प व उपक्रमांद्वारे आपले कार्य करीत आहे. (अधिक माहितीसाठी www.indiaasha.org या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या) आशा फौंडेशनचे हे कार्य पद्यातील पहिल्या कडव्यानुसार चालूच राहील या विश्वासासह थांबतो. त्यासाठी आपल्या सर्वांची साथ आम्हाला अपेक्षित आहे. 

आम्हास नको मुळी मान मरातब काही
कीर्तीची आम्हा हाव मुळीही नाहि
सर्वस्व अर्पिले मातृभूमिचे ठायी
हे दैवत अमुचे ध्येयमंदिरातील ॥


गिरीश कुळकर्णी
कार्यकारी संचालक  
आशा फौंडेशन इंडीया 

(यानिमित्ताने आशा फौंडेशनच्या लाभार्थींना विनंती आहे त्यांनी त्यांचा अनुभव येथे 
जरुर सांगावा किंवा माझेशी (९८२३३३४०८४) या क्रमांकावर संपर्क करावा)


15 comments:

  1. Great ! Hearty Congratulations !!
    Aasha Foundation is becoming successful in it's mission .
    Keep it up !
    👌👌👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. अक्षयची चिकाटी, जिद्द, मेहनत या गुणांचा फायदा त्याला त्याच्या मनात असलेल्या शिखरावर पोहचण्यास निश्चित मदत होईल. त्याला त्याच्या भावी शैक्षणिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा

      Delete
    2. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! कृपया प्रतिसाद देतांना आपल्या नावाचा उल्लेख करावा.

      Delete
  2. अक्षयची यशोगाथा खूप छान सर

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! कृपया प्रतिसाद देतांना आपल्या नावाचा उल्लेख करावा.

      Delete
  3. सर अक्षय वर विश्वास होताच त्याने पण तो सार्थ केला केला. अक्षय तुझे खुप खुप अभिनंदन.आशा फाऊंडेशन या संस्थेची मी आभारी आहे.धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! कृपया प्रतिसाद देतांना आपल्या नावाचा उल्लेख करावा.

      Delete
  4. आशा फाऊंडेशनचे आभार व शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! कृपया प्रतिसाद देतांना आपल्या नावाचा उल्लेख करावा.

      Delete
  5. Congratulations akshay,thanks to aasha foundation

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

      Delete
  6. Congratulations Akshay.. Really Proud of you..👍 Best wishes for your bright future🤗

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

      Delete
  7. आशा फौंडेशन च्या कार्याला सलाम.अक्षय सारख्या अनेक मुलांना खूप खूप शुभेच्छा.
    आमचाही आपल्या या कार्यात खारीचा वाटा नक्कीच असेल.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! कृपया प्रतिसाद देतांना आपल्या नावाचा उल्लेख करावा.

      Delete