Sunday 14 June 2020

"मला कोणी सांगेल का ?"



माणसाच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा प्रश्न ! कोणीही मोकळेपणाने हा प्रश्न वयाने मोठ्या वा अनुभवी व्यक्तीला विचारला तर त्याचे उत्तर मिळू शकते. मुळात आपल्याकडे लहानपणापासून असा प्रश्न विचारण्याची वृत्ती वाढविण्याची प्रचंड आवश्यकता आहे. उत्तर मिळालं तर माणूस प्रगल्भ होतो, त्याची काही समस्या असल्यास ती सुटू शकते, त्याला मार्ग सापडतो, तो त्या विषयात मोठी प्रगती करू शकतो, त्याची जिज्ञासू वृत्ती वाढीस लागते. लहान वयात खरं तर मुलं प्रश्न विचारतात मात्र त्यांना अपेक्षित उत्तर मिळत नाही किंवा सरळ तुला मोठ्या झाल्यावर समजेल असं सांगून त्याची बोळवण केली जाते. मोठा झाल्यावर त्याला प्रश्न विचारण्यास कमीपणा वाटतो आणि प्रश्न तसंच राहतो.

आशा फौंडेशनने या वर्षी उन्हाळ्यात ऑनलाईन शिबिरे घेतलीत. त्याचं शीर्षकच हा प्रश्न होता. इ. ७वी ते १० वीचे विद्यार्थी प्राधान्याने होती. अतिशय चांगला प्रतिसाद लाभला. एक चांगला माणूस घडविणे हे संस्थेचे ध्येय असल्याने नेहमी असे चाकोरीबाहेरचे वा विद्यार्थ्यांना भावतील असे उपक्रम संस्था राबवित असते. यावर्षीचे शिबीर वरील प्रश्नाला धरुन आयोजित केले होते. एकूण तीन शिबिरे झालीत त्यातील तिसऱ्या शिबिराबद्दल काही सांगू इच्छितो. खरं तर आम्ही विद्यार्थ्यांमध्येच काम करीत असल्याने, त्याबाबत काही अभ्यास असल्याने मुलांच्या मनातील प्रश्न आम्हीच ठरविले. ४५ मिनिटे साधन व्यक्ती त्या विषयावर बोलायची आणि पुढील ४५ मिनिटे प्रशोत्तरे असे स्वरूप होते. सर्वच सत्रे सुमारे दोन तास चाललीत. विद्यार्थ्यांना वैचारिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा हा प्रयत्न. संबंधित विषया संदर्भातील त्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करणे हि अपेक्षा होती.

दि. ११ ते १३ जून दरम्यान हे शिबीर झाले. थोडे विचार करण्यासाठी प्रवृत्त ठरणारे आणि सामान्य पालकांना उत्तरे देण्यासाठी कठीण असलेले विषय आम्ही निवडले होते.  त्यातील विषय होते जगणे, मी कोण ?, पैसा, तंत्रज्ञान, आनंद आणि प्रेम. का ? कशासाठी ? व कसा ? यादृष्टीने साधन व्यक्तीला विषय मांडायचा होता. मी पहिला विषय मांडला तर अन्य विषयांसाठी पुणे येथील महेश लोहार, जयप्रकाश काबरा, मुंबई,  डॉ. रविंद्र वैद्य, पुणे सौ. स्मिता वळसंगकर, पुणे व डॉ. विवेक काटदरे यांनी संवाद साधला. मित्रवर्य सुशील नवाल यांनी उदघाटन केले तर संस्थेच्या मार्गदर्शक डॉ. प्रीती अग्रवाल यांनी समारोप केला. विजय कुळकर्णी यांनी निरीक्षकाची भूमिका सांभाळली. संस्थेने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या शिबिराची परंपरा कायम राखत समाजाप्रती आपली वचनबद्धता लॉक डाऊनच्या काळातही पूर्ण केली.

 जीवन मूल्यांची रुजुवात योग्य वयात व्हावी यासाठी संस्था दरवर्षी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करीत असते. यावर्षी कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शिबीर होईल कि नाही अशी शंका होती. मात्र नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत ऑनलाईन पद्धतीने हे शिबीर घेण्यात आले. तिसऱ्या शिबिराचा कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व रायसोनी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल, संस्थेचे मार्गदर्शक डॉ. विवेक काटदरे व निरीक्षक विजय कुळकर्णी यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. 

सर्वच वक्त्यांनी विषयाची मांडणी खूप छान केली. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची  संबंधितांनी समर्पक उत्तरे दिली. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांनी न लाजता, इतर जण हसतील का ? असा कोणताही विचार मनात येऊ देता मोकळेपणाने प्रश्न विचारलीत. प्रत्येक सत्रानंतर व समारोपातही अनेकांनी आपला अभिप्राय नोंदवला. विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक व आम्हास प्रोत्साहन देणारा आहे. आयोजक म्हणून मागील शिबिरांप्रमाणेच या शिबीराने उद्देश सफल झाला असे वाटते अर्थात मुलांना जीवन कौशल्ये दिलीत, विचार दिला, संकल्पना दिली, 

विषय १ - जगायचं का ? कशासाठी ? आणि कसं ? - गिरीश कुळकर्णी 

१. आपण जगायचं कशावर ?
२. आपलं ध्येय कसं ठरवायचं ? 
३. कोणत्या जगात जगायचे ? 
४. जगात कसं जगावं हे कसं ठरवावं ?
५. ब्रह्मचर्याश्रम म्हणजे काय ?
६. संन्यासाश्रम आजच्या युगात कसा ?
७. जग कसं जिंकावं ?

मी कोण ? - श्री. महेश लोहार, पुणे 

१. मन स्थिर करणे याचा अर्थ काय ?
२. कधी कधी कळतं पण वळत नाही, असं का होत ?
३. आपला मेंदू कसा नियंत्रित करावा ?
४. "सेन्सरी इंटिग्रेशन ' म्हणजे काय ?
५. 'मी कोण आहे" आपल्याला स्वतःला कसं कळणार ?
६. 'मो कोण आहे ?' असं ठरवतांना जर आपल्याला योग्य वातावरण नाही मिळालं तर काय करायचं ?
७. मी माझ्यामधील चांगल्या क्वालिटीज कशा ओळखू ?
८. स्वतःच ऍनालिसिस कसे करावे ?
९. मला जर्नालिस्ट व्हायचे आहे, मी स्वतःमध्ये कोणते इंटेलिजन्स डेव्हलप करु ?
१०. ब्रेन चांगला करायला काय करावं ?
११. डोक्यातील नकारात्मक विचार कसे घालवावे ?
१२. डोक्यात चांगले विचार आणण्यासाठी काय करावे ?
१३. एक गोष्ट पूर्ण झाली नाही आणि दुसरी गोष्ट करायला घेतली तर त्यात मन का लागत नाही ?
१४. डिस्ट्रॅक्शन असावे कि नसावे ?

पैसा का ? कशासाठी ? कसा ? व किती ? - श्री. जयप्रकाश काबरा 

१. पैसा कोणत्या वयापर्यंत कमवावा ?
२. पैसा कमवायची मर्यादा असते का ?
३. श्रीमंत मानाने असावे कि पैशाने ?
४. पैसे कुठे वाया जातात ?
५. पैसे वाया घालवावे का?
६. पैसा लहानपणापासून साठवून ठेवावा का ?
७. एखाद्या माणसाला मदत केली आणि त्याला नेहमीच त्याची सवय झाली तर ?
८. शालेय जीवनापासून मेहनतीचा पैसा कसा कमवावा ?
९. स्किल आधारित शिक्षण म्हणजे काय ?
१०. पैसा आला कि माणसाला गर्व येतो. हा गर्व कसा दूर करावा ?
११. पैसा कोणता असावा ?
१२. श्रीमंतांना पैशांची किंमत का नसते आणि गरिबांना पैशांची किंमत का असते ?
१३. पैसा कसा साठवून ठेवावा ?

तंत्रज्ञान का ? कशासाठी ? कोणते ? - डॉ. रविंद्र वैद्य 

१. तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय ?
२. साध्य तंत्रज्ञानात हॅकिंगचा वापर जास्त होत आहे. त्यापासून आपण कसे सुरक्षित राहावे ?
३. भविष्यात कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान येऊ शकते ?
४. मोबाईल फोन किती वर्षानंतर वापरावा ?
५. तंत्रज्ञान शाप आहे कि वरदान ?
६. तंत्रज्ञान कोणत्या प्रकारचे माध्यम आहे ?
७. तंत्रज्ञानातील स्पर्धा चांगली कि वाईट ?
८. तंत्रज्ञान कशासाठी वापरावं ?
९. तंत्रज्ञानाचा गैरवापर कसा थांबवावा ?
१०. रोबोट माणसांवर राज्य करेल असे घडू शकते का ?
११. तंत्रज्ञानाचा अति वापर केल्याने डोळे व मनावर काय परिणाम होतो ?
१२. गेमिंग इंडस्ट्रीबद्दल आपले मत काय ?
१३. कोणत्या वयापासून सोशल मीडिया वापरावा ?

आनंद का ? कशासाठी ? व कसा ? - सौ. स्मिता वळसंगकर 

१. आपलं दुःख कसं दूर करावं ?
२. राग येऊ नये यासाठी काय करावे ?
३. आपल्याला झालेला आनंद टिकवून ठेवला पाहिजे यासाठी काय करावे ?
४. आपल्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो ती गोष्ट सारखी सारखी केली कि कंटाळा येतो , असं का ?
५. नकारात्मकता कशी दूर करावी ?
६. आजास्त आनंद झाला पाहिजे कि जास्त राग यायला पाहिजे ?
७. आपण कधी विचार करतो कि मला एखादी गोष्ट येत नाही; ती नकारात्मकता असते का ?
८. सुखात आणि आनंदात काय फरक आहे ?
९. समाधान आणि आनंद यात फरक काय ?
१०. आनंद कसा कंट्रोल करावा ?
११. आपला आनंद इतरांना पाहवत नसेल तर काय करावे ?
१२. राग कसा कंट्रोल करावा ?
१३. कोणी पडलं तर आपण हसतो, ते कसं कंट्रोल करावं ?

प्रेम का ? कशासाठी ? कसं ? आणि कोणावर ? - डॉ. विवेक काटदरे 

१. प्रेम डेव्हलप करायला काय करावं ? 
२. प्रेम हि गोष्ट मनाने केली पाहिजे का ?
३. मला झाडे लावायला फार आवडते, त्यांना इजा झाली तर दुःख होतं तर ते प्रेम आहे का ?
४. प्रेम निर्व्याज असणे म्हणजे काय ?
५. प्रेम हा आनंदच भाग आहे का ? असेल तर कसा ?
६. प्रेमाची फ्रिक्वेन्सी ५२८ असते म्हणजे काय ?
७. प्रेमाचा अर्थ कसा समजावा ?
८. मन कुठे असते ?
९. समोरच्या व्यक्तीला प्रेम कसं पटवून द्यायचं ?
१०. लव इज मॅटर ऑफ बॅलन्स अँड ऑर्डर म्हणजे काय ?

हे सर्व प्रश्न आपल्या घरातील आपली मुले कसा विचार करतात ? त्यांच्या मनात कोणते प्रश्न असतात ? हे लक्षात येण्यासाठी दिले आहेत. आपण वरील प्रश्न आपल्या मुलांना विचारु शकतात ? व त्यांची योग्य उत्तरे सांगून त्यांची वैचारिक बैठक तयार करु शकतात. आपण शिबीर करु शकला नाही तरी याचा उपयोग आपणास होईल. आपण मुलांना त्यांचे प्रश्न काय हे विचारु शकतात. असे प्रश्न आमच्यासोबत शेअर करावे एव्हढीच अपेक्षा !

गिरीश कुळकर्णी 
कार्यकारी संचालक 
आशा फौंडेशन.

No comments:

Post a Comment