Monday 29 June 2020

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली


रामकृष्ण हरि ! 

भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी, तत्वज्ञ, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानविषयक विचार मराठीतीनाही व्यक्त करता येतात असा विश्वास आपल्या ग्रंथ कर्तृत्वातून निर्माण करणारे संत म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, हरिपाठाचे व इतर अभंगातून समाज प्रबोधन करणारे संतश्रेष्ठ. त्यांच्या लोभस व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने अठरापगड जातीतील संतमेला त्यांच्याभोवती जमा झाला. अठरापगड जातीतील सर्वसामान्य जनांना पांडुरंगाच्या भक्तीचे सोपे साधन उपलब्ध करुन देणाऱ्या संताला समाज 'माऊली' म्हणतो. माणसाला सर्वात जवळचे नाते आईचे. आपले दुःख, गाऱ्हाणे आईजवळ सांगायला कोणालाही संकोच वाटत नाही. भागवत संप्रदायाच्या लाखो अनुयायांचे म्हणणे ऐकण्याचे सामर्थ्य कोमल हृदयी ज्ञानेश्वरांमध्येच होते हे ओळखून भक्तांनी त्यांना 'माऊली' या उपाधीने गौरविले. स्त्रीच्या महन्मंगल स्वरूपाच्या नात्याने पुरुषाला संबोधण्याचे जगातील हे एकमेवाद्वितीय  उदाहरण आहे. 

संत ज्ञानेश्वर नाथपंथी, हटयोगी, अद्वैतवादी, निर्गुणोपासक होते. वारकरी (भागावर) संप्रदायाचा पाया रचण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांचे आणि त्यांच्या कार्याचा सर्वच संतांनी केला आहे. ज्ञानेश्वरीबद्दल संत नामदेव म्हणतात 

नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी | एक तरी ओवी अनुभवावी || 

माऊलींचा गौरव करतांना संत एकनाथ म्हणतात 

कैवल्याचा पुतळा | चैतन्याचा जिव्हाळा | ज्ञानोबा माझा || 

संत तुकाराम महाराजांच्या अनुग्रहित शिष्या 'संत बहेणाबाई' यांनी वारकरी संप्रदाय अर्थात भागवत धर्म म्हणजे एक इमारत आहे अशी कल्पना करुन तिची रचना व उभारणी करण्यासाठी योगदान दिलेल्या संतांचा गौरव करणारा अभंग लिहिला आहे. त्या म्हणतात 

संतकृपा जाली | ईमारत फळा आली || 
ज्ञानदेवे घातला पाया | उभारिले देवालया || 
नामा तयाचा किंकर | तेणे रचिले यावर || 
जनार्दन एकनाथ | खांब दिल्हा भागवत || 
तुका जालासे कळस | भजन करा सावकास || 
बहेणी फडकती ध्वजा | निरोपण केले वोजा || 

संत सेना महाराज म्हणतात 

श्री ज्ञानराजे केला उपकार | मार्ग हा दाखविला ||
विटेवरी उभा वैकुंठनायक | आणि पुंडलिक चंद्रभागा ||

तर संत एकनाथ म्हणतात 

कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर | तया नमस्कार वारंवार ||
न पाहे यातीकुळाचा विचार | भक्त करुणाकर ज्ञानाबाई ||

अनेक संतांनी ज्ञानदेवांवर गुणगौरवपर  अभंग रचना केलेल्या आढळतात. त्यांच्या गौरवपर जेवढ्या  रचना आहेत तेवढ्या इतर संतांच्या संदर्भात नाहीत. यावरून माऊलींचे संतमेळ्यातील स्थान, श्रेष्ठत्व व आदरभाव आपल्या लक्षात येईल. 

पुरोगामी विचारधारा असलेल्या विज्ञानयुगातील आजच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनात वारकरी संप्रदायाबाबत आदराची भावना आहे. सहज सोपी आचरण तत्वे यामुळे हा संप्रदाय लोकप्रिय आहे. या संप्रदायाची मूळ बैठक घडविण्यात संत ज्ञानेश्वरांचे मोलाचे योगदान आहे. कापली गोपीचंदनाचा टिळा व बुक्का, गळ्यात तुळशीची माळ, नियमित पंढरीची वारी आणि एकादशी व्रत अशी सहजसाध्य आचारसंहिता या संप्रदायात पाळली जाते. समाजमनात माऊलींचे स्थान मिळालेल्या व 'महाराव' उपाधीने गौरविलेले समन्वयवादी विचारांचे धनी असलेल्या या ज्ञानी, विद्वान व मराठी भाषेवर अतोनात प्रेम करणाऱ्या माऊलींचा समाजाने छळ केला असला तरी त्याबाबत आपल्या साहित्यातून तक्रारीचा एक शब्दही न लिहिता सकल विश्वाच्या कल्याणाचे दान विश्वात्मक देवाकडे मागणारे कोमल हृदयी तत्वज्ञ, कवी म्हणजेच संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर ! 

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने अवघ्या जगाला ललामभूत ठरावी अशी ग्रंथरचना केली आहे. विपुल अभंग रचनाही केल्या आहेत. त्यांचे वाङ्मय, विचारधन, समाजप्रबोधन, साक्षात्कार अवस्थेतील अनुभूती, त्यांचे समाधान यातच त्यांचे श्रेष्ठत्व आहे. 'ज्ञानेश्वरी' रुपी वाग्यज्ञ पूर्णत्वास गेल्यानंतर त्यांनी जे प्रसादरुपी दान अर्थात 'पसायदान' मागितले आहे ते थेट विश्वात्मक देवाला मागितले आहे. त्यात स्वतःसाठी काहीही न मागता सकल मानव जातीच्या कल्याणासाठी मागितले आहे. दुष्टांचा दुष्टपणा जावा व त्यांच्या अंगी सत्कर्मवृत्ती वाढीस लागावी, जगातून पापाचा नायनाट व्हावा व ज्याला जे हवे ते मिळावे, सर्वत्र सज्जनांचा संचार असावा हि त्यांची मागणी आहे. भूतलावरील मानव जातीच्या कल्याणासाठी मागितलेले व 'जो जे वांछील तो ते लाहो' अशी मागणी करणारे हे दान एकमेवाद्वितीयच. एवढ्या महान ग्रंथाची रचना केल्यानंतर स्वतःसाठी काहीही न मागता इतरांसाठी मागणे हे फक्त ज्ञानेश्वरांसारखे महापुरुषच करु शकतात. ज्ञानेश्वरांची दृष्टी तर्कशुद्ध आणि अंधश्रद्धेला ठार न देणारी होती. त्यांच्या एका ओवीत म्हटल्याप्रमाणे 

जरी मंत्रेंची वैरी मरे | तरी वाया का बांधिली कट्यारे ||
रोग जाय दूधसाखरे | तरी निंब का पियावा ||

अर्थात मंत्र सामर्थ्याने जर शत्रूचा नाश होत असले तर कमरेला कट्यार बांधण्याची आवश्यकता पडली नसती. तसेच दूध किंवा साखरेच्या सेवनाने रोग समूळ नाश होत असेल तर कडुनिंबाचा रस प्यावा लागला नसता.  

पांडुरंगाची प्राप्ती व आपल्या हृदयस्थित श्रीहरिशी एकरूपता कशाने साधता येते ? या प्रश्नाचे उत्तर ज्ञानदेवांच्या हरिपाठात मिळते. हरिपाठ म्हणजे हरीच्या नामाचे पठाण होय. अभंग म्हणजे उत्कट भक्तीचा व मनातील भावनांचा आर्त अविष्कार !हरिपाठाचे अभंग म्हणजे सामान्य जणांच्या हरिप्राप्तीसाठी दाखविलेला सोपा मार्ग. व्रत, वैकल्ये, जप तप, कर्मकांड, तीर्थाटने न करता मुक्ती मिळविण्याचे ते साधन आहे. संत हे खऱ्या अर्थाने सामान्यजनांना मार्ग दाखविणारे वाटाडे असतात. प्रपंचात माणसे कळत नकळत वाट चुकतात. वाईट मार्गाने जातात. त्यांना परमेश्वराचे विस्मरण होते. अशावेळी संतांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. मनुष्य देहाचा उपयोग परमेश्वर प्राप्तीसाठी न करणे हे मूर्खाचेच काम आहे. मेल्यानंतर मोक्ष मिळतो असे समजणाऱ्या भक्तांना माऊली उपदेश करतात 

मोक्ष मेल्यापाठी आम्हांसी होईल | ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख ||
दीप गेल्यावर कैचा जी प्रकाश | झाक झाकी त्यास कासयाची  ||
जंववरी देह आहे तववरी साधना | करुनिया ज्ञान सिद्ध करी ||

सर्वच संतांचे विचार इतक्या तोकड्या लेखात लिहिता येणार नाही. श्रोत्यांची भूक अपूर्ण ठेवल्याबद्दल क्षमायाचना करुन पसायदानच्या अर्थाने हा भाग पूर्ण करतो. उद्याच्या लेखात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांवर लिहिल. 
पसायदानाचा अर्थ 

आता विश्वात्मक देवाने, या माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसायदान ( प्रसाद ) द्यावे. दुष्टांचे दुष्टपणा नाहीसा होवो, त्यांना सत्कर्मे करण्याची बुध्दी होवो. सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होवो. पापी लोकांचा अज्ञानरुपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरुपी सूर्याचा उदय होवो. प्राणिमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत. सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संत पृथ्वीवर अवतरत जावोत आणि प्राणिमात्रांना भेटत जावोत. जे (संत) कल्पतरूंची चालती बोलती उद्याने आहेत, चेतनारुपी चिंतामणी रत्नांची जणू गावेच आहेत, अमृताचे बोलणारे समुद्रच आहे. जे कोणताही डाग नसलेले निर्मळ चंद्रच आहेत, तापहीन सूर्यच आहेत असे संतसज्जन सर्व प्राणिमात्रांचे मित्र होवोत. तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परीपूर्ण होऊन अखंडीतपणे विश्वाच्या आदिपुरुषाची सेवा करावी. हा ग्रंथ ज्यांचे जीवन आहे, त्यांनी या जगातील दृष्य आणि अदृष्य भोगांवर विजयी व्हावे. यावर विश्वेश्वर गुरु श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा प्रसाद तुला लाभेल. या वराने ज्ञानदेव सुखी झाले. 

रामकृष्ण हरि ! 

10 comments:

  1. Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! कृपया प्रतिसाद देतांना आपले नाव लिहावे.

      Delete
  2. खूप छान सर

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! कृपया प्रतिसाद देतांना आपले नाव लिहावे.

      Delete
  3. खुप छान लेख लिहलाय सर

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! कृपया प्रतिसाद देतांना आपले नाव लिहावे.

      Delete
  4. आज मी शब्दरुप विठठल पहिला 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. व्वा ! आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! कृपया प्रतिसाद देतांना आपले नाव लिहावे.

      Delete
  5. Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! कृपया प्रतिसाद देतांना आपले नाव लिहावे.

      Delete