Sunday 28 June 2020

अर्थपूर्ण जगण्याचा साधा, सोपा व सरळ मार्ग सांगणारे संत...

रामकृष्ण  हरि ! 

मानवी जीवन अनेकविध गोष्टीने भारलेले आहे. त्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद , मत्सर हे मनाचे विकार आहे. यातूनच अहंकार, ममता, चिंता, आसक्ती, असहिष्णुता, असंयम, आळस, हिंसा, चोरी यासारखी मानसिक दोष निर्माण होण्याचा धोका असतो. यामुळे माणूस दुःखी, कष्टी होतो. जीवनातील आनंदाला, सुखाला पारखा होतो. आपल्या धर्म ग्रंथात म्हटल्याप्रमाणे धर्म, अर्थ, काम व मोक्ष प्राप्तीसाठी या विकारांना व मानसिक दोषांचा त्याग करता आला पाहिजे. यासाठी आत्मबोध होण्याची आवश्यकता असते. मानवाने यावर नियंत्रण मिळविले आणि त्या निर्गुण, निराकार परमेश्वराशी एकरुप झाले कि जीवन सफल होते. यासाठीच मानवाचा अट्टाहास सुरु असतो. जीवनाचं हे सार सांगणारे संत या महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेले. आषाढी एकादशी व तत्पश्चात येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या अल्पमतीप्रमाणे काही संत, त्यांचे साहित्य याबद्दल काही लिहिण्याचा हा प्रयत्न...

महाराष्ट्रामध्ये भागवत धर्माची ध्वजा सांभाळणाऱ्या संतांनी समाजात भक्तिभाव रुजवला. संस्कृत भाषेत असलेले ज्ञान प्राकृतात मांडले व सामन्यांच्या आकलनयोग्य झाले. परमेश्वराच्या भक्तीचा सर्वात सोपा मार्ग सांगतांना नामस्मरणाचे महत्व समजावून सांगितले. नामस्मरणानेच परमेश्वर प्राप्ती होईल व मुक्तीचा मार्गही सापडेल. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास, संत नरहरी सोनार, संत सावता माळी, संतसेना महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई आदी संतांनी सामान्य माणसाला अर्थपूर्ण जगण्याचा साधा, सोपा व सुखद मार्ग दाखवून दिला. त्यासाठीच्या मार्गावर चालण्यासाठी मानसिक बाळ देणारे साहित्य निर्माण केले. त्यांच्या स्वानुभवातून निर्माण झालेले अभंग, ओव्या, श्लोक मराठी माणसाच्या हृदयात जाऊन बसतात इतकी अवीट गोडी त्यात आहे. आजही त्यात कुठे कमतरता जाणवत नाही. सध्याच्या काळात माणसाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी, मनाला सावरण्यासाठी, जीवनातील प्रश्नांनाचे उत्तर शोधण्यासाठी हे साहित्य उपयोगी ठरते. समाजभान जपत 'सामाजिक क्रांती' या संतांचे महाराष्ट्राच्या भूमीवर अनंत उपकार आहेत. 

या सर्व संतांनी ईश्वरप्राप्ती व त्यांच्या भजनात विशेष आवड होती. त्यांनी समता, बंधुता, भूतदया, औदार्य
आदींचा पुरस्कारच केला आहे. त्यांनी दाखविलेल्या अध्यात्मिक मार्गाने लोक जागृत झाले. जनतेमध्ये अशा प्रकारची चेतना निर्माण करण्याची गरज जशी त्याकाळी होती तशी ती आजही जाणवते. समाजातील अशांती, संघर्ष, निसर्गाचे शोषण, पर्यावरणाचे होत असलेले नुकसान, अविश्वास, मानसिक तणाव यावर संत साहित्य हेच उत्तर आहे. मर्यादित गरज, नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर, परस्परांवरील प्रेम व विश्वास वाढीची गरज संतांनाही आपल्या प्रेरणादायी विचार व कार्यातून दाखवून दिले आहे. संत समाजात राहून सामाजिक भान राखत समाजासाठी कार्य करतात. आपल्याला त्रास देणाऱ्यांचा प्रतिकार न करता त्यांनी आपले कार्य सुरु ठेवलेले आपल्याला अनेक उदाहरणातून लक्षात येईल. 

अखिल विश्वाच्या कल्याणाचीच प्रार्थना त्यांनी केलेली दिसते. संतांनी समाजात ज्ञानप्रसाराचे कार्य केले. त्यांनी आपली काळजी न करता कृपाळूपणाने समाजाचे दुःख दूर करण्याचा व त्यांना सुख देण्याचाच प्रयत्न करतांना दिसतात. संतांनी समाजातील अनेक दुष्ट व अनिष्ट परंपरांवर कोरडे ओढलेले दिसतात. त्यांनी अध्यात्मिक व पारमार्थिक कार्यासोबत सर्वव्यापी व सर्वसमावेशक समाज कार्य केलेले दिसते. संतांनी आपल्या वाणीने, लेखणीने, कर्तृत्वाने वैदिक धर्माचे, गीता धर्माचे पुनरुज्जीवन केले. आपली कर्मे करत राहणे हीच खरी भक्ती आहे. सर्वांमध्ये परमेश्वर असल्याने त्यांचे दुःख दूर करणे हीच भक्तीची संकल्पना संतांनी मंडळी आहे. संत तुकोरायांनी म्हटल्याप्रमाणे "जे का रंजले गाजली त्यासी म्हणे जो आपलुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा."  माणूस उभा राहिला तरच देश उभा राहील याभावनेने त्यांनी समाज जागृतीचे काम केले आहे. 

प्रस्तावनेचा हा लेख तेव्हढा उत्साहवर्धक वाटला नाही तरी पुढील भागात नक्की वाटेल कारण यापुढे आपण संत आणि त्यांचे साहित्य यावर विशेष प्रकाश टाकणार आहोत. आजही घराघरात संतांचे अभंग म्हटले जातात. ऐकले जातात. त्यावेळेस आपण सर्वचजण त्यात रमून जातो. नामाचा गजर करतांना आणि भजन , कीर्तन सुरु असतांना माणूस त्यात तल्लीन होतो. एकरुप होणे, तादात्म्य पावणे, ब्रह्मानंदी टाळी लागणे, देहभान विसरणे यासारख्या गोष्टींची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. रामकृष्ण हरि, पुंडलिका वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम हा गजर माणसात चैतन्य निर्माण करतो. अनेक असाध्य गोष्टी करण्याचे धाडस या चैतन्यातून मिळते. दर दिवशी २५ किलोमीटरचा सलग ५५ दिवस पायी प्रवास करीत आपल्या त्या पांडुरंगाला भेटण्याची आस घेऊन तो ते सहज पार करतो. प्रत्येकात परमेश्वर पाहण्याचा संदेश संत देतात. वारी मध्ये त्याची प्रचिती हमखास येते. प्रत्येकजण एक दुसरीला माऊली म्हणतो आणि विनम्रतेने अभिवादन करतो. हम सब एक है !  अशी घोषणा देण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. हि सर्व त्या पांडुरंगाचाच लेकरे आहेत या भावनेने या गोष्टी घडत असतात. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस ! असे म्हणत असतांना जो जे वांच्छिल तो ते लाहो अशी आर्त प्रार्थना पसायदानातून केलेली दिसते. चला तर मग पुढील भागात संत ज्ञानेश्वर यांच्या अभन्गातून शिकवण घेत जीवनाचे काय सार मिळते ते पाहू या  ! 

रामकृष्ण हरि ! 

4 comments:

  1. चांगली सुरुवात .
    पुढील लेखांसाठी शुभेच्छा !!

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान सुरुवात.
      एक लक्ष समोर ठेवले की आपोआप रस्ता सापडतो.

      Delete
  2. खूप छान सुरुवात
    लक्ष्य निश्चित केले की रस्ता आपोआप सापडतो.

    ReplyDelete
  3. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! कृपया प्रतिसाद देतांना आपल्या नावाचा उल्लेख करावा.

    ReplyDelete