Friday 5 June 2020

हिंदू साम्राज्य दिन आणि आक्रमकांच्या स्मृती संपविणारी अमेरिका


गुरुवार, दि. ४ जून रोजी संपूर्ण भारत वर्षात हिंदू साम्राज्य दिन (शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसार)  साजरा केला जात असतांना तिकडे अमेरिकेत आक्रमकांच्या स्मृती संपविण्यासाठी पहिले पाऊल टाकले गेले. "हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा" या ध्यासाने अखंड जीवन समर्पित करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही समस्त भारतीयांसाठी अभिमानाची घटना आहे. आजही हा दिवस हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी छत्रपती शिवरायांचा पराक्रमी इतिहास आठवून त्यांना मानाचा मुजरा केला जातो. महाराजांच्या काळात समाजाला एका खंबीर नेतृत्वाची गरज होती. त्या काळात परकीय सत्तांची जुलमी राजवट होती, येथील उन्मत्त मुघल जनतेचे हाल करीत होते. संपूर्ण हिंदुस्थानात हाहाकार माजला होता. अत्याचारी मुघल शासकांमुळे सर्वत्र अराजकता माजली होती. आपसात भांडणे लावून सत्ता उपभोगण्याचे धोरण सर्व परकीय सत्तांनी अवलंबिली. येथील जनतेवर अनन्वित अत्याचार करुन त्यांना गुलाम केले होते. त्यानंतरच्या ब्रिटिश राजवटीतही हेच घडले. 


समाजाला एकत्रित करुन या आक्रमकांच्या विरोधात लढण्यासाठी जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या साक्षीने रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याचे तोरण बांधण्याची शपथ बाल शिवबाने घेतली. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी अभेद्य असा तोरणा किल्ला जिंकून भगवा फडकावला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. वाढत्या वयासोबत त्यांनी आपल्या पराक्रमाची शिकस्त करीत, जिवाभावाच्या मावळ्यांच्या मदतीने सह्याद्रीच्या कुशीतील अनेक गड-किल्ले स्वराज्यात सामील केले.  त्यांच्या पराक्रमाची कीर्ती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. अखंड पराक्रम गाजवित शत्रूंवर तुटून पडत त्यांनी आपली विजयी घोडदौड अखंडपणे सुरु ठेवली. त्यांचा हा पराक्रम पाहून जनतेने भक्कम साथ दिली आणि हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारले गेले. सार्वभौमत्वाचा साक्षात्कार व्हावा व रयतेचा राजा म्हणून मान्यता मिळावी यासाठी राज्याभिषेक झालाच पाहिजे. राज्याभिषेक संस्काराखेरीज तुमच्या बहुमोल कार्यास मान्यता नाही हे धर्मशास्त्रातील विद्वान अधिकारी व प्रख्यात पंडित गागाभट्ट यांनी समजावून सांगितल्यावर काशिविश्वेश्वराची धर्माज्ञा महाराजांनी मान्य केली. राज्याभिषेक झाला तो दिवस म्हणजेच हिंदू साम्राज्य दिवस ! छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे स्मरण या हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्ताने दरवर्षी होत असते. राष्ट्रकार्य व स्वधर्म पालनाची प्रेरणा समाज जागृतीसाठी आवश्यक ठरते. भारताचा अतिशय गौरवशाली इतिहास आजच्या युवापिढीला कळणे आवश्यक आहे. 

दुसऱ्या बाजूला हिंदू साम्राज्य दिनी, अमेरिकेतील व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम (डी) यांनी कॉन्फेडरेट जनरल रॉबर्ट ई. ली यांचा पुतळा काढण्याची योजना जाहीर केली. ५० फुटांचा पाया असलेला व त्यावर १४ फूट उंचीच्या या पुतळ्याचे १८९० मध्ये अनावरण करण्यात आले होते आणि तेव्हापासून तो रिचमंडच्या वांशिक विभाजनाचे उत्कट चिन्ह म्हणून भावनिक केंद्र आहे. अमेरिकेत सुरु असलेल्या आफ्रिकी अमेरिकन लोकांवरील पाशवी क्रौर्याचा निषेध करण्यासाठी व जातीय न्यायासाठी आंदोलकांनी या स्मारकाचा आधार घेतला आहे. सलग सहाव्या दिवशी हजारोंच्या संख्येने निषेध कर्ते येथे जमले होते. 

कोण होता कॉन्फेडरेट जनरल रॉबर्ट ई. ली ? त्याचा पुतळा हटविण्याची योजना का ? हे समजण्यासाठी प्रथम आपल्याला थोडा इतिहास विशेषतः १८६१ ते १८६५ दरम्यान अमेरिकेत झालेल्या सिव्हिल वॉर  (गृहयुद्ध) बद्दल जाणून घ्यावे लागेल. हे युद्ध उत्तर अमेरिकेतील (युनियनशी निष्ठावंत) आणि दक्षिणी युनायटेड स्टेट्स (जे युनियनमधून बाहेर पडून स्थापित झालेले होते) यांच्यात झाले. मुख्यतः काळ्या लोकांच्या गुलामगिरीच्या दीर्घकालीन वादाचा परिणाम या गृहयुद्धात झाला होता. एप्रिल १८६१ मध्ये अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या काही काळानंतर अलगाववादी सैन्याने दक्षिण कॅरोलिनामधील फोर्ट सम्टरवर हल्ला केला आणि युद्धाची ठिणगी पडली. उत्तरेकडील युनियनच्या निष्ठावंतांनी, ज्यात काही पश्चिमी व दक्षिणी राज्यांचा समावेश होता त्यांना दक्षिणेतील कॉन्फेडरेट स्टेट्सच्या अलगाववाद्यांचा सामना करावा लागला ज्यांनी गुलामी पाळण्याच्या राज्यांच्या अधिकाराची बाजू मांडली होती. 


फेब्रुवारी १८६१ मध्ये अमेरिकेच्या ३४ राज्यांपैकी दक्षिणेतील ७ गुलामधारक राज्यांच्या सरकारांनी देशाबाहेर गेल्याचे जाहीर केले. कॉन्फेडरेट स्टेट्स ऑफ अमेरिका यांनी घटनात्मक सरकारविरुद्ध बंडखोरी केली. कन्फेडरसीने जवळपास ११ राज्यांमधील बहुसंख्य प्रदेशावर ताबा मिळविला होता. केंटकी व मिसूरी या अतिरिक्त राज्यांचाही त्यांनी दावा केला होता आणि त्यांना संपूर्ण गृहयुद्धात कॉन्फेडरेट कॉंग्रेसमध्ये पूर्ण प्रतिनिधित्व देण्यात आले होते. या राज्यांना युनायटेड स्टेट्स सरकारने राजनैतिकदृष्ट्या मान्यता दिली नव्हती. अमेरिकेशी निष्ठावंत असलेली राज्ये संघ (युनियन) म्हणून ओळखली जात. संघ आणि कन्फेडरसीने चार वर्षे दक्षिणेत चाललेल्या या युद्धासाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक व सैन्य भरती केली. या घनघोर युद्धात ६,२०,००० व ७,५०,००० लोक मारली गेली. हे गृहयुद्ध अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा प्राणघातक लष्करी संघर्ष आहे. ९ एप्रिल १८६५ रोजी कॉन्फेडरेट जनरल रॉबर्ट ई. ली ने अप्पॉमॅटोक्स कोर्ट हाऊसच्या युद्धालयात युनियन जनरल युलिसिस एस. ग्रांट यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आणि युद्धाचा शेवट झाला. कॉन्फेडरेट जनरलांनी आत्मसमर्पणाचा पाठपुरावा करत २३ जून रोजी दक्षिणेकडील राज्यांमधील शेवटचे आत्मसमर्पण झाले. दक्षिणेच्या बहुतेक पायाभूत सुविधांची विशेषतः रेल्वे मार्गाची खूप मोठी हानी झाली होती. कन्फेडरसी कोलमडली आणि दक्षिणेतील गुलामगिरी संपली. चार दशलक्ष काळे गुलाम मुक्त झाले. 



आता आपल्याला प्रश्न पडला असेल या दोन घटनांचा संबंध काय ? त्यासाठीच हा लेख प्रपंच आहे. मित्रानो, हिंदू साम्राज्य दिन साजरा करण्याचे मुख्य प्रयोजन हेच आहे. आपल्या परम पवित्र भारत मातेचा वैभवशाली इतिहास जाणून घेतला पाहिजे. भारतीय परंपरा व संस्कृतीचा केवळ अभिमान बाळगून चालणार नाही तर ती समजून घेतली पाहिजे व तिचा प्रसार समस्त जगतात केला पाहिजे. आत्म विस्मृतीचे षडयंत्र ओळखून आत्मभान जागे केले पाहिजे. तुष्टीकरणातून होत असलेले आपल्या इतिहासाचे विकृतीकरण थांबले पाहिजे त्यासाठीच आपल्या गौरवशाली इतिहास, परंपरा व संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे. राष्ट्रीय महापुरुष व आक्रमक शत्रू यातील भेद समजून घेतला पाहिजे. भारतीय मानबिंदूंच्या बाबतीतही होत असलेली तडजोड हाणून पाडली पाहिजे. यासाठीच अमेरिकेतील घटना आपल्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त करते. आपणही यापासून बोध घेऊ या ! आक्रमकांच्या काळ्याकुट्ट इतिहासाच्या स्मृती जागविणाऱ्या गोष्टी संपविण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे. आजही आपल्या देशातील अनेक शहरे, गावे, रस्ते ही आक्रमकांच्या नावाने ओळखली जातात त्यांच्या या खुणा संपविल्या पाहिजेत. लेखाच्या शेवटी हिंदू धर्माची पताका जगात घेऊन जाणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या एका अमृत वाचनाने करीत आहे...





आपले पहिले कार्य हे आहे कि, आपली उपनिषदे, आपली पुराणे व आपली अन्य शास्त्रे यांच्यामध्ये पडून राहिलेली आश्चर्यकारक सत्ये या ग्रंथांतून बाहेर काढून, मठांमधून, अरण्यांमधून, विशिष्ट संप्रदायांमधून बाहेर काढून सर्व देशभर पसरली पाहिजेत; मगच ती एखाद्या वणव्याप्रमाणे देशाच्या चारही दिशांना पसरतील; हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत व सिंधूपासून ब्रह्मपुत्रेपर्यंत अखिल देश भरुन टाकतील. पाश्चात्य देशात जाण्यापूर्वी मी भारतावर प्रेम करीत असे. आता तर भारतातील धूळही मला पवित्र वाटते, तेथील हवा देखील मला पवित्र वाटते. भारत आता मला परमपवित्र धाम वाटतो, तो माझ्यासाठी आता तीर्थस्थान आहे. उठा, या भारतमातेला जागे करा आणि नवजागृतीच्या  संजीवनीने तिला पूर्वीपेक्षाही अधिक गौरवान्वित करुन भक्तिभावाने तिची तिच्या चिरंतन सिंहासनावर स्थापना करा. 

गिरीश कुळकर्णी 
९८२३३३४०८४ 
दि. ६ जून २०२० 

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. रंजक माहिती आहे.

    गिरीशराव ...

    हिंदुस्तानवर आक्रमक येत राहिले. १००० वर्षांचा त्यांचा इतिहास आहे. आक्रमक आले आणि ते राज्यकर्ते झाले. त्यांनी स्मारके उभारली. ती सुद्धा शासकांचीच होती व आहेत. जे पुरोगामी अभ्यासक आर्य, द्रविड किंवा मूल निवासी याची मांडणी करीत आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत मांडत होते आता ते सुध्दा आर्य मूलनिवासी असेच म्हणतात, पण पृथ्वीवरील मानवाच्या स्थलांतराचा विचार करताना पर्शियन वा युरोपीयन जत्थे भारताकडे आले असेही मानले गेले पण हरियानातील राखीगड येतेल अती अती प्राचीन सांगाडा हा मूळ भायतीय निवासीचा आढळला. तो सुमारे २० लाख वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजेच युरोप व पर्शियात मानव अस्तित्वात होता तेव्हाच भारतातही जमात होती. आपल्या शरीराची व जनुकाची ठेवण म्हणून वेगळी आहे. अशावेळी तुर्की, पर्शियन, अफगाणी, मंगोलियन आदींची आक्रमणे आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करीत होती. चंगेजखान, घौरी, बाबर, अब्दाली ही त्याची उदाहरणे. हे १००० वर्षांचे जनुकीय मिश्रण दूर करणार कसे ?

    https://www.esakal.com/desh/dravidians-are-real-indian-hot-aryans-deccan-college-pune-dr-vasant-shinde-research-213668

    ReplyDelete