Friday 15 May 2020

कुटुंब व्यवस्थेतूनच आत्मनिर्भरता !

कुटुंब व्यवस्थेतूनच आत्मनिर्भरता ! 




१५ मे अर्थात जागतिक कुटुंब दिन ! १९९४ पासून दरवर्षी १५ मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाचे उद्दीष्ट लोकांपर्यंत कौटुंबिक व्यवस्थेच्या फायद्यांविषयी जनजागृती करणे आहे. तसेच जगभरातील समाज आणि संस्कृतींचे महत्त्व साजरा करण्यासाठी देखील हा दिवस पाळला जातो. पाश्चात्यांच्या अंधानुकरणामुळे आपल्यालाही असे दिवस साजरे करावे लागतात.

जागतिक कुटुंब दिनाच्यानिमित्ताने आयोजित आजच्या या व्याख्यानाला व्हर्च्युअली उपस्थित असलेल्या सर्वांचे मी गिरीश कुळकर्णी, आशा फौंडेशनच्यावतीने मनापासून स्वागत करतो.  वेळेची मर्यादा असल्याने विषयाला सुरुवात करतो. स्वविकासासाठी नेहमी चांगलं ते मिळविणारे आपण सर्व विद्यार्थी आहोत. अशा सर्व विद्यार्थ्यांचा मित्र व संवादक अशी ओळख गेल्या १२ वर्षात आशाच्या कार्यातून मिळविली आहे आणि त्याअनुषंगानेच आपल्याशी संवाद साधतोय. विषयाची मांडणी करण्यापूर्वी ३ उदाहरणे मी आपल्याला देऊ इच्छितो.

उदा. १. हे अगदीच कौटुंबिक आहे. आम्ही तसे मूळ धानोरा या एका खेडेगावातील... मोठे कुटुंब व शेती हा व्यवसाय. त्यातील अनिश्चितता लक्षात घेऊन तात्कालिक परिस्थितीत वडिलांचे माध्यमिक शिक्षण झाल्याबरोबर नोकरी लागली व ते धुळे जिल्ह्यात आले. कुटुंब सदस्यांना विशेषतः माझ्या आईला  शिक्षणाचे महत्व असल्याने आपल्या लहान दिरांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी धुळे येथे आपल्यासोबत ठेवले. शिक्षण पूर्ण होऊन ते अगदी चांगल्या पद्धतीने आयुष्यात स्थिरस्थावर झाले. आज तेच काका पुढील पिढ्यांच्या शिक्षणासह अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या आपले कर्तव्य म्हणून करतात. हा वसा पुढे सुरु आहे अर्थात काळानुरुप त्यात मर्यादा आल्यात हे निश्चित...

उदा. २ नुकतेच आमच्या एका मित्राशी बोलत असतांना त्याने एक गोष्ट सांगितली. लहान असतांना त्यांच्या दादांनी एका पारिवारिक संबंध असलेल्या कुटुंबातील महिलेला बहीण मानले. दुर्दैवाने त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले. दोन मुलींचे विवाह झालेले असले तरी मुलगा लहान होता. आर्थिक परिस्थिती बेताचीच ! मित्राच्या वडिलांनी "मामाची" भूमिका पार पाडत असतांना मानलेल्या भाच्याच्या गरजेच्यावेळेस आर्थिक सहकार्य केले. या घटनेला आज ३० वर्षे होऊन गेली. दोन दिवसांपूर्वी मुंबईत राहणाऱ्या मानलेल्या भाच्याचा मामांना फोन आला. मामांनी केलेल्या मदतीचा कृतज्ञता पूर्वक उल्लेख करुन त्याने आजच्या काळात ज्यांना मदतीची गरज आहे अशा २५-३० कुटुंबाची नावे कळवा त्यांच्या  खात्यात मला काही रक्कम मदत म्हणून द्यायची आहे आणि ती केली देखील.

उदा. ३ सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. समाजातील अनेक जण आपापल्या परीने या आपल्या बांधवांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यात भोजन वाटप असेल, किंवा किराणा वाटप असेल. मुंबई, पुणे, सुरत आदी ठिकाणांहून स्थलांतरितांचे जत्थेच्या जत्थे रस्त्यांनी जातांना दिसत आहेत, मिळेल त्या वाहनाने, अतिशय विपरीत व प्रतिकूल परिस्थिती आपल्या घरी जाण्यासाठी हि मंडळी अस्वस्थ आहे.   काही जण रस्त्यावरून तर काही रेल्वे रुळावरून पायी जात आहेत. या मंडळींना चहा, नाश्ता, बिस्किटेम पाणी, भोजन इ. चे वाटप केले जात आहे. संख्या अगणित आहे. वेगवेगळ्या संस्था संघटनांच्या माध्यमातून हे कार्य अव्याहतपणे सुरु आहे. काही ठिकाणी मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन केले जात आहे.

वरील तीनही उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल कि याच्या मुळाशी आहे ते म्हणजे कुटुंब व्यवस्था... भारतीय संस्कृती "वसुधैव कुटुंबकम" मानणारी आहे, आपल्या प्रतिज्ञेत म्हणतो त्याप्रमाणे भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. पहिल्या उदाहरणात एका कुटुंबातील सदस्याची  घेतलेली काळजी आहे तर दुसऱ्या उदाहरणात आपल्या परिचयातील व्यक्तीची घेतलेली काळजी आहे आणि तिसऱ्या उदाहरणात एक भारतीय नागरिक या अदृश्य नात्यातून काळजी घेतली जात आहे. हि अशी काळजी घ्यावी असे व्यक्तीला, समाज घटकाला वा समाजाला का वाटते तर त्याचे कारण आहे "आत्मनिर्भरता" "स्वयंपूर्णता". प्रत्येक व्यक्ती जीवनात आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी झटत असतो. त्याच्या आत्मनिर्भर वा स्वयंपूर्ण होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ लागते ते कुटुंब सदस्यांचे !  यासाठीच आपण आजचा विषय घेतला आहे "कुटुंब व्यवस्थेतून आत्मनिर्भरता"

मात्र वर दिलेल्या पहिल्या उदाहरणाप्रमाणे आज कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आहे का असा आपला प्रश्न असेल. पूर्वीप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धती आपल्याला अभावानेच पाहायला मिळते जेथे कुटुंब सदस्यांची संख्या २५ - ३० वा त्यापेक्षा अधिक असते. नोकरी व्यवसाय वा उदरनिर्वाहाच्या निमित्ताने अनेकांना आपली गवे सोडली. ते एकाच गावात आलीत असेही नाही आणि अपत्य संख्याही १ किंवा २ वर मर्यादित झाली. यासाठीच आपण विस्तारित कुटुंबाची संकल्पना समजून घेतली पाहिजे व स्वीकारली पाहिजे. यासाठी आपल्या वसाहतीतील वा कॉलनीतील वा कार्यालयातील वा मित्र परिवाराचे एक गट बनवावा. महिन्यातून किमान एक दिवस सर्वांनी एकत्र जमावे. हळूहळू सर्व सदस्यांचे स्वभाव जुळले कि एक कुटुंब तयार होते.

मित्रहो, गेली दोन हजार वर्षे आपला देश अत्यंत खडतर अशा काळातून जात आहे. कितीतरी आक्रमक आले. आपण या सर्वांशी निरंतर व निकराने संघर्ष केला. काळाच्या ओघात आपल्या संस्कृतीला पोषक असलेले स्वतःचे शासन लुप्त झाले. त्यानंतर आपल्या संस्कृतीचे रक्षण, पोषण व संवर्धन करणाऱ्या गुरुकुल परंपरेचाही लोप झाला. दीर्घकाळ अत्यंत कठीण परिस्थितून जाऊनही आपली संस्कृती आजही जिवंत आहे याचे एकमेव कारण म्हणजे आपली परिवार विशेषता ! आपले कुटुंब हे भारतीय संस्कृतीचे प्राथमिक शाळा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपली परिवार व्यवस्था टिकली आणि म्हणूनच हा देश आजही 'भारत" आहे.

भारताने यशस्वीपणे आपल्या संस्कृतीचे रक्षण केले आहे. भारताचा मानव कल्याणकारक संदेश दूरदूरच्या देशांमध्ये निनादत आहे. जगासमोरच्या अनेक समस्यांची उत्तरे भारतीय चिंतन व अध्यात्मात आहे. योग्य, ध्यान व प्रकृतीला अनुसरून जीवन आता वैचारिक जगतात स्थान मिळवू लागले आहे. जागतिक पातळीवरील या परिस्थितीत आपली जबाबदारी अधिक वाढते कारण आपली परिवार वा कुटुंब संकल्पना हिच आपल्या भारतीय संस्कृतीची वाहक आहे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या अतिरेकामुळे आज व्यक्ती ताणतणावात आहे. एकटेपणामुळे सुन्न आहार. याचा परिणाम कौटुंबिक हिंसा व मादक पदार्थांचे सेवन यासारख्या विकृती समोर येत आहेत. या वातावरणात कुटुंब व्यवस्थेचे महत्व निश्चितच मोठे आहे. आत्मकल्याण व जगत कल्याण परस्परपूरक असे या व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. वरील तीनही उदाहरणात तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

आपला विषय कुटुंब व्यवस्थेतून आत्मनिर्भरता असा आहे. पहिल्या टप्प्यात आपण कुटुंब व्यवस्था आणि तिचे महत्व समजून घेतले. आत्मनिर्भरता म्हणजे जो दुसऱ्यावर अवलंबून नाही. याचे अनेक फायदे आहेत. व्यक्ती स्वतःच्या अडी-अडचणी स्वतःच सोडवू शकतो व निर्णय घेऊ शकतो. आपण एखादी गोष्ट स्वतंत्रपणे केली तर त्याचा विशेष आनंद होतो. आत्मनिर्भरतेमुळे आत्मस्वीकृती(self Acceptance) वाढते. यामुळे माणसाची ज्ञान मिळविण्याची इच्छा जागृत होते. आत्मनिर्भरता जीवनाला दिशा देते व दृष्टिकोन विकसित करते.

कुटुंब सदस्यांना आत्मनिर्भरतेचे महत्त्व समजणे आपल्यासाठी महत्वाचे आहे कारण यामुळे कुटुंबातील विविध कार्ये कार्यक्षमतेने हाताळण्यास, एक व्यक्ती म्हणून वाढण्यास आणि स्वतंत्रपणे गोष्टी कशा हाताळायच्या हे जाणून घेण्यास मदत होते. सुरूवातीस हे कठिण असू शकते, मात्र आत्मनिर्भरतेसाठी गरजेचे आहे. कुटुंबातील

सदस्यांमधील आत्मनिर्भरता वाढावी / विकसित व्हावी यासाठी खालील दहा गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे.

१. आत्मनिर्भर होण्यासाठी सर्वप्रथम संयम शिकला पाहिजे - कारण एखदी गोष्ट करीत असतांना ती प्रथम केल्यावर लगेच येईल असे नाही. एखाद्या वेळेस ती वारंवारही करावी लागेल. अशा वेळेस संयम हा गुण महत्वाचा ठरतो.

२. स्वतंत्रपणे काम करु या - कुटुंबातील एखादी गोष्ट करण्यासाठी ती त्याला स्वतंत्रपणे करु द्या. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. काम करीत असतांनाच खऱ्या अर्थाने शिकण्याची / विकासाची खरी प्रक्रिया होत असते. अलीकडे पालक आपल्या पाल्याला केवळ अभ्यास करायला लावतात. अशा वेळी मुलगा कितीही हुशार झाला तरी त्याला व्यावहारिक ज्ञान नसेल तर हुशारी कामात कशी येणार ?

३. स्वतःचे निर्णय घेऊ द्या.- काय करावे, काय खावे, काय प्यावे, कोणत्या रंगाचा शर्ट घालावा, कुठे फिरायला जायचे अशा सर्व प्रकारच्या निर्णय प्रक्रियेत सर्वांचा सहभाग घ्या. त्यामुळे प्रत्येकाचा आत्मसन्मान वाढेल.

४. घरगुती कामाचा परिचय करुन द्या - घरातील कामांचा सर्वांना परिचय व्हायला पाहिजे. ते काम करीत असतांना ते कसे करावे याचे स्वातंत्र्यही दिले पाहिजे. अनेकदा दुसऱ्याने काम केल्याची पद्धत वेगळी असली तरी त्यातून आपल्यालाही अनेक गोष्टी शिकता येतात.

५. साफसफाई व स्वच्छतेला वेळ द्या - काम झाल्यानंतरच्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करा. खेळणी खेळून झाल्यावर उचलायला लावा. जेवण झाल्यावर आपली ताट वाटी उचलण्याला लावा. कचरा व स्वच्छतेचे महत्व समजावून सांगा.

६. पैशांचे मोल समजून घ्या - पैशांबद्दल बोला. पैशाचे महत्व समजावून सांगा.

७. सदस्यांना वाचा व त्यांना स्वतःला एकट्याला वाचण्यासाठी प्रोत्साहित करा -काम करतांना सुरु असलेली विचार प्रक्रिया समजून घ्या. ती चुकीची असली तरी करुन पाहू द्या.  एकटेच वाचन असतील तर ते आकलन व स्वातंत्र्य कार्य व्यवस्थित व सुरळीतपणे होण्यास मदत होईल.


८. त्यांनी प्रामाणिकपणे केले प्रयत्न लक्षात आले याची जाणीव करुन द्या - आपण त्यांना अधिक स्वावलंबी कसे व्हावे हे शिकवत आहात, परंतु त्यांना नेहमीच हे माहित असले पाहिजे की ते किती प्रेम करतात. हे केवळ त्यांना अधिक परिश्रम करण्यासाठी प्रेरणा देईल.

९.त्यांना परिस्थितीबाबत बोलत करा - त्यांनी काहीतरी का केले, त्यांनी चांगले काय केले आणि पुढील वेळी ते काय करतील याबद्दल. समस्या असो किंवा काहीतरी सकारात्मक, चर्चा करणे खूप चांगले आहे कारण मुले जेव्हा गोष्टींबद्दल बोलू शकतात तेव्हा चांगले शिकतात.

१०. वास्तवाचे भान द्या - काम करणाऱ्याला वास्तव समजणे. त्यांना दररोजच्या वास्तविकतेबद्दल विचार करायला लावा. लहान मुले कधीकधी प्रौढांपेक्षा चांगले आणि चुकीचे फरक सांगू शकतात आणि यामुळे ते नेहमीच एकमेकांशी चांगले वागतात. चांगल्या नैतिकतेची जाणीव असणे आणि निर्णय न घेणे ही अधिक स्वावलंबी होण्याची एक मोठी पायरी आहे.

कुटुंबातील सदस्य आत्मनिर्भर होण्यासाठी वरील गोष्टींचा विचार व वापर करणे हितकारक ठरते. आजच्या विषयाला पूरक असलेली विमल लिमये यांच्या घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती... या कवितेने समारोप केला. 

कुटुंब हेच आपल्या प्रगती व आनंदाचा खरा आधार आहे. कुटुंब आपल्या संस्कृतीची पाठशाळा आहे. कुटुंब हेच आपले व आपल्या राष्ट्राचे संरक्षक कवच आहे.
कुटुंब रक्षति रक्षित: |

वेबिनारला उपस्थित सर्वांचे मनापासून आभार मानले व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साहाय्य करणारे मल्टी मिडीया फीचर्स प्रा. लि.चे सुशील नवाल व पारितोष नवाल यांचे विशेष आभार.

9 comments:

  1. वेबीनारचा कार्यक्रम छान झाला .
    सहभागी लोकांना सहभाग नोंदविण्यासाठी थोडा जास्त वेळ मिळायला हवा .

    ReplyDelete
    Replies
    1. आपण म्हणताय ते खरंच आहे. पहिलाच प्रयत्न होता. पुढील सत्रात काळजी घेईन. धन्यवाद !

      Delete
  2. छानच वेबिनारवर भाषण केलेत गिरीश सर

    ReplyDelete
    Replies
    1. अतुल जी धन्यवाद ! प्रयत्न आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने नक्कीच यश लाभेल.

      Delete
  3. गिरीषजी अभिनंदन !
    सद्य परीस्थिती ही अतिशय गंभीर आणि अस्वसथता पसरवणारी आहे. विज्ञानाच्या, संपत्तीच्या आणि प्रगतीच्या गप्पा मारणाऱ्या माणसाला नियतीने जमिनीवर आणले आहे. साध्या डोळ्यांना न दिसणाऱ्या एका सुक्ष्म विषाणूने जगाला त्याचं क्षणभंगूरत्व दाखवून दिलं आहे. यामुळे तो सैरभैर झाला आहे. अश्या परीस्थितीत त्याला स्वतःला घरात कोंडून घ्यावं लागलं आहे.
    घरात रहा, सुरक्षित रहा हा मंत्र पाठकरतांना तो कुटुंबियांशी जुळला आहे. अशी संधी त्याला यापुर्वी साधता आली नव्हती. याचं त्याला आता वैषम्य वाटत आहे. हीच ती वेळ आहे जी माणसाला कुटुंब व्यवस्थेचं महत्व पुन्हा एकदा पटवून देवू शकते. जे या व्यवस्थेशी जुळले आहेत ते धीराने, संयमाने या संकटाला सामोरे जात आहेत. मात्र, जे कुटुंबपासून तुटलेले आहेत त्यांना आता कुटुंबाची गरज पटली आहे.
    कुटुंब सुरक्षित, स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर झालं तर गाव, राज्य, देश आत्मनिर्भर होवू शकेल. कुटुंबाची व्याख्या विस्तारली तर वसुधैव कुटुबकम ही संकल्पना दूर नाही. आपण या चर्चेतून मांडलेले मुद्दे व्यक्ती स्वातंत्र्य आणि विकासालाच प्रोत्साहन देतात. जे पुढे त्यांना आत्मनिर्भर करु शकतील. हीच काळाची खरी गरज आहे. आपले पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन !
    प्रा.बी.एन.चौधरी.
    (९४२३४९२५९३)
    धरणगाव.

    ReplyDelete
    Replies
    1. आदरणीय नाना, आपल्या सारख्या संवेदनशील सुहृदाची विस्ताराने दिलेली प्रतिक्रिया नक्कीच सुखावह व प्रोत्साहित करणारी आहे. धन्यवाद !

      Delete
  4. प्रशंसनीय ऊपक्रम आजच्या घडीला ऊपयोगी ऊपयुक्त स्वंयम प्रेरणा आत्मनिर्भरता निर्णय क्षमता एकत्रकुटुंब व्यवस्था या समाजाला व्यक्तीला विकसित करतात त्या बरोबर जिव्हाळा प्रेम आत्मियता असण गरजेच आहे पुढिल वेबिनार कळवा सामील होऊ , जिथ आशा सुरेख भाषा तिथच आम्हा अभिलाषा छान गिरीषभाऊ��

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, नक्की कळवीन !

      Delete
  5. सर, आपण कुटुंबाची व्याप्ती मोठी केलीत. सध्या ही संकल्पना फारच संकुचित झालेली दिसते. आपण या निमित्ताने आपल्या संस्कृतीची परत जाणीव किंवा ओळख करून दिली असे वाटते.

    ReplyDelete