Sunday 10 May 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग १४

नाविन्यता व सृजनशीलता अस्तित्वाच्या लढाईसाठी संजीवनी ! 


समर्थ भारताच्या उभारणीसाठी या लेखमालेच्या शेवटच्या टप्प्यात आपण "कोरोना" पश्चातच्या समस्यांना उत्तर / उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. येथून पुढे एक दिवसाआड विषय मांडून साधारणपणे लेखमालेला पूर्ण विराम देण्याचा मानस आहे. लेख लिहिण्याचा एक फायदा नक्की झाला खूप सारे विचार ऐकायला मिळाले व सुचलेही. बांधकाम क्षेत्रातील एका मित्राने तंत्रज्ञानाबद्दल मत मांडतांना आधुनिक काळातील तंत्रज्ञानाबद्दल काही लिहावे असे सुचविले तसेच कामगारवर्गासाठी एखाद तंत्रज्ञान हे त्यांच्या रोजगारालाच पर्याय असतो, हि समस्या कशी हाताळता येईल याबाबत लिहावे असेही सुचविले आहे. शेवटच्या भागात अशा सर्व सूचनांवर लिहीन.  मागील दोन भागात आपण सर्वार्थाने बदल व तंत्रज्ञान हे दोन उपाय पाहिले. हि लेखमाला माझ्यासारख्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्यांसाठी आहे. त्यामुळे वरील दोन उपायांसोबत संस्था वा व्यक्तीच्या अस्तित्वाला संजीवनी देणारी गोष्ट म्हणजे नाविन्यता व सृजनशीलता !


तसं पाहायला गेलं तर इनोव्हेशन व क्रिएटिव्हिटी हे तसे गुळगुळीत होत असलेले शब्द. कारण भारतीयांच्या मूळ स्वभावात आपल्याला ते पाहायला मिळतात आणि ज्याच्याजवळ असते त्यालाच किंमत नसते. व्यक्ती व संस्थांच्या उन्नतीसाठी या दोनही गोष्टी अपरिहार्य आहेत. ज्यांनी याची कास धरली ते नेहमीच आपली नौका पार करतात अगदी सामान्य माणसेही ! लेखाची मांडणी करतांना एक संकल्पना वाचण्यात आली ती आवर्जून सांगावीशी वाटते. सद्यस्थिती हि "इनोव्हेशन" साठी अतिशय पूरक आहे नव्हे त्यावरच पुढील सर्व अवलंबून आहे. त्या संकल्पनेचे नाव आहे "ब्लॅक स्वान इव्हेन्ट" !  याचा अर्थ हि एक अशी घटना असते जी अनपेक्षित असते, ती कोणाच्याही आकलनापलीकडची असते आणि तिचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. या घटनेचे वैशिट्य म्हणजे ती अतिशय दुर्मिळ असते, ती सर्वव्यापी असते आणि सर्वांनाच तिच्यामुळे क्षती पोहोचते. महामारी वा मंदीच्या अशा घटना क्रांती घडवून आणतात असा इतिहास आहे.

मागील सुमारे ७ आठवड्यांचा काळ आपण आठवून पहा. प्राप्त परिस्थितीला स्वीकारून त्याप्रमाणे आपल्या स्वतःत बदल करुन कित्येक गोष्टी आपण वेगळ्या पद्धतीने करतोय. आपल्या सामान्य दिनचर्येलाही आपण मोल्ड केले. काही मार्ग आपल्याला सुचले, काही इतरांचे पाहून अनुकरण केले तर काही आपल्याला कोणीतरी सुचविले. अर्थात "कर के देखो" हा त्यासाठीचा मंत्र ठरला. एखाद्या विषाणूचा सामना करण्यासाठी घरात बसून राहणे हाही एक वेगळाच पर्याय आपल्या समोर आला. प्रत्येकालाच काही ना काही सुचत असते मात्र ते कल्पना या पातळीवरच संपते. कारण असं शक्य आहे का ? हि अनिश्चितताच त्या कल्पनेला मारक ठरते. स्व. पदमश्री भवरलाल जैन यांनी शेतात नळी अंथरून झाडाला जेव्हढं आवश्यक आहे तेव्हढं पाणी दिल पाहिजे अशी कल्पना मांडतांना कोणालाही कसं शक्य आहे ", असेच वाटले असणार मात्र त्यांनी ते प्रत्यक्ष करून दाखवले आणि ठिबक सिंचनाच्या क्षेत्रातील जगातील पहिल्या पाचात स्थान मिळविले.


लॉक डाऊनच्या स्थितीत अनेक अशा गोष्टी आपण अनुभवल्या असतील ज्यांची आपण कल्पनाही केली  नसेल. घराबाहेर न पडता आपला दिवस वेगळ्या पद्धतीने जगता येतो हे अनेकांच्या समाज माध्यमातून वाचनात आले असेल. पुढील काळात अस्तित्व टिकविण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण व सृजनशील मार्गांची प्रत्येकालाच कास धरावी लागेल. कोरोना पश्चात व्यवसायांना टिकण्यासाठी आमूलाग्र बदल करावे लागतील. यामुळे अनेक नवीन व्यावसायिक मॉडेल निर्माण होतील. त्यांना गती मिळेल. ज्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण विविध इनोव्हेशन पाहतो आहोत, अनुभवतो आहोत, वापरात आहोत, त्याच पद्धतीने आगामी काळात आपण अपेक्षाही केल्या नसतील अशा गोष्टी करू. हा मूळ विचार लक्षात घेतला तर काही उदाहरणे ते सिद्ध करतील.

अन्नधान्याचा पुरवठा करणाऱ्या व्यवसायाने टाकलेली कात आणि त्यातून गरजू माणसापर्यंत आवश्यक वस्तू पोहोचविण्याचे काम हे इनोव्हेशनच म्हणता येईल. अतिशय मर्यादित कालावधीत उभे राहिलेले कोविद साथीच्या रुग्णालयाचे उदाहरणंही नावीन्यतेचे मापदंड ठरलेत. व्यवसायांमध्ये काळानुरुप घडणारे बदल, त्याचा मानसिक स्वास्थ्यावर होणार परिणाम, त्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना हा कल्पतेचे उदाहरण ठरतील. शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षणाची भूमिका महत्वपूर्ण ठरेल. समस्येची गंभीरता आणि प्राधान्याने त्यावर उपाय शोधण्याची इच्छा इनोव्हेशनला चालना देईल.

8 comments:

  1. good efforts .basically man is creative and research minded and will keep innovating .it is said that ancestors imagine the concept of 'amrit' nectar so that we keep innovating to get it .
    coming to the financial black swan ,many refer 2008 crisis .the innovation done by prime minster narsinha rao during that period is still useful to us and we have excellent opportunity where as the actions against this current situation have great positive effect on improving atmosphere ,
    simultaneously creating strong lungs,low price fuel etc.
    business men always faces problems but by innovation he survives and continues and he will do it .but when there is mass involved he needs governance and not government

    ReplyDelete
  2. सगळे लेख खुप प्रगल्भ व मार्गदर्शक होते. आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाचकांना विचारांच्या नवनवीन दिशा लाभते असे मला अनुभवास आले. असेच लेखन आपल्या हातून सतत घडो हिच सदिच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर ! आपले नाव कळाल्यास आनंद होईल.

      Delete
  3. आपण या लॉक डाऊन चा अतिशय छान उपयोग करून घेतला. छान लेखमाला सुरू केली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. नंदकिशोर जी, धन्यवाद !

      Delete
  4. मा.गिरिश भाऊ आपण लाॅक डाऊन काळात काळाची पाऊले ओळखून अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन केले असुन त्याचा सर्वांना नक्की उपयोग होवुन अनेक क्षेत्रात नाविन्यपूर्ण विचार करण्यास यातुन प्रेरणा मिळणार आहे.आपले सर्वांना नियमित मार्गदर्शन मिळावे हि अपेक्षा......नितीन वाणी,पुणे.

    ReplyDelete
    Replies
    1. नितीन भाऊ, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

      Delete