Sunday 3 May 2020

श्री संत सखाराम महाराजांचा वैशाख उत्सव

२५० वर्षांची समृद्ध परंपरा असलेला सामाजिक
समरसतेचा संदेश देणारा अमळनेरचा यात्रोत्सव


प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेली अमळनेर नागरी श्री संत सखाराम महाराज यांच्या वास्तव्याने पावन  झाली आहे. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुद्ध एकादशीला अर्थात मोहिनी एकादशीला श्री संत सखाराम महाराजांच्या उत्सवात अमळनेरचा रथोत्सव साजरा केला जातो. श्री संत सखाराम महाराज यांच्या परंपरेतील ११ वे विद्यमान सत्पुरुष संत श्री प्रसाद महाराज यांच्या नेतृत्वाखाली संस्थानची हि परंपरा सुरु आहे. दोनशे वर्षांची समृद्ध परंपरा असलेला हा रथोत्सव सामाजिक समरसतेचा संदेश देतो. सामाजिक सद्भाव व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेला हा रथोत्सव म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते. उत्सवाच्या काळात अमळनेरात यात्रोत्सव होत असतो. खान्देशातील हि शेवटची यात्रा असते त्यामुळे तिला विशेष असे महत्व आहे. संपूर्ण उत्सवाच्या कालावधीत सुमारे ३ लाख भाविक सहभागी होतात. यावर्षी कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा होत आहे. 

विद्यमान ११ वे सत्पुरुष ह. भ. प. संत श्री प्रसाद महाराज

संत श्री सखाराम महाराज संस्थानचे विद्यमान गादीपती गुरु संत श्री प्रसाद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३२ वर्षे हा उत्सव साजरा केला जातो. या काळात त्यांनी आपल्या कार्यात, परंपरेत पांडुरंगाची एकनिष्ठ सेवा केली असून भाविक भक्तांना आशिर्वादरुपी मायेची उब दिली आहे. त्यांनी आपल्या जीवनात अनेक उत्सव व नवीन रूढी यात अलौकिक भर घातली आहे. श्रीगुरु महाराजांनी वैशाखातील प्रमुख उत्सवातही मौलिक भर घातली असून या उत्सवास आगळेवेगळे प्रसन्नतेचे रुप दिलेले आहे. संस्थानचे नित्यनेम अतिशय काटेकोरपणे पाळणाऱ्या गुरु संत श्री प्रसाद महाराज यांच्या चेहऱ्यावरील शुद्ध , सात्विक भाव व तेज त्यांच्या पांडुरंच्या निस्सीम सेवेचे, तपश्चर्येचे व साधनेचे फळ आहे. वैशाख उत्सवात येणाऱ्या प्रतिष्ठित मंडळींची श्री गुरु महाराज अगत्याने व आस्थेने विचारपूस करतात. संस्थांच्या उत्सवात येथील पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. श्री गुरु महाराजांच्या शिष्यगणांसह खान्देशातील अनेक जातिधर्मचे लोक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होऊन श्री गुरूंचा आशिर्वाद घेऊन पारमार्थिक आनंद घेतात. 

श्री संत सखाराम महाराजांचा वैशाख उत्सव

वैशाख शु. तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला या उत्सवाला सुरुवात होते. या दिवशी बोरी नदीच्या वाळवंटात श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर स्तंभारोहण केले जाते व यात्रेला सुरुवात होते. चतुर्थी ते नवमी या काळात मंडप उभारणे, यात्रेसाठी लागणारे धान्य, सामान इ. ची व्यवस्था केली जाते. वैशाख शु. दशमीला पंढरपूर येथून बेलापूरकर महाराजांच्या दिंडीचे आगमन होते. त्यांच्यासोबत प्रत्यक्ष पांडुरंग अमळनेरात येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. दिंडीचे आगमन होताच स्वतः गुरु माऊली आपल्या शिष्यास आणण्यासाठी जातात. हरि नामाच्या गजरात व श्री संत सखाराम महाराज यांच्या जय घोषात दिंडीचे आगमन होते. गुरु आपल्या शिष्यासह मेण्यात बसून समाधीस्थळी येतात. येथे श्रीसखाराम महाराज, श्री बाळकृष्ण महाराज, श्री प्रल्हाद महाराज व श्री कृष्णा महाराज यांच्या समाधीपुढे अभंग होतात. दिंडी पुढे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येते. तेथे श्री बेलापूरकर सेवेचा अभंग होऊन आरती होते. दिंडी मुक्कामास "पैलाड" येथे श्री संत सखाराम महाराज यांच्या मळ्यात जाते. दिंडीचा सात दिवस येथेच मुक्काम असतो. रात्री श्री विठ्ठल मंदिरात श्री बेलापूरकर महाराजांचे कीर्तन सेवा होते. 

वैशाख शु ११ या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो. वैशाख शु.द्वादशीला सायंकाळी संत श्री प्रसाद महाराजांच्यासमोर खिरापतीचा अभंग होतो व सर्वांना श्री गुरुंच्या हातून खिरापत वाटली जाते. त्रयोदशीच्या दिवशी श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधीला नवस बोलणारी व फेडणारी मंडळी वाजत गाजत येतात. महाराजांच्या समाधीला तोरण बांधतात. नारळ फोडतात. वैशाख शु. चतुर्दशी हा श्री संत सखाराम महाराज यांच्या पुण्यतिथीचा दिवस. या दिवशी गोरगरीब सर्वांना प्रसाद दिला जातो. अन्नछत्र खुले असते. कोणीही उपाशी जाते नाही. भोजन झाल्यावर सर्वांना पुरण व तळलेल्या वड्यांचा प्रसाद वाटला जातो. हा प्रसाद भाविक धन धान्यात ठेवतात. वर्षभर धनधान्याची कमतरता जाणवत अशी भावना आजही दिसून येते. वैशाख शु. पौर्णिमा या दिवशी पालखी सोहोळा असतो. खान्देशातील भाविक भक्त यात सहभागी होतात. सकाळी ७ वाजता मिरवणूक वाडीतून निघते. टाळ, मृदंग यांच्या गजरात बेलापूरकर महाराजांची दिंडी येते. अनेक सेवाधारी ढोल ताशे, भुसावळचा प्रसिद्ध रेल्वे बँड सहभागी होतो. श्रींचे पालखीत श्री लालजींची भरजरी पोशाख व अलंकाराने नटलेली, हातात चांदीची ढाल, तलवार घेतलेली मूर्ती विराजमान असते. "श्री संत सखाराम महाराज कि जय " असा जयघोष करत हि मिरवणूक निघते. पालखीच्या मागे मेणा असतो. त्यात श्री संत सखाराम महाराजांच्या पादुका विराजमान असतात व त्यामागे संत श्री प्रसाद महाराज आपल्या भालदार व चोपदारांसह पायी असतात. वैशाख महिन्यातील भर उन्हाळ्यात, रस्त्यावरील डांबर पाघळलेले असते. श्री गुरुंच्या चरणांकडे पाहिले तर त्यांच्या पायात खडावाही नसतात. दुपारी मिरवणूक वेशीच्या बाहेर पडते. मारुती मंदिरासमोर श्री गुरु येतात अभंग होतो व पालखी पुढे प्रस्थान करते. पुलावरून पळत पळत जावे लागते. पालखी पैलाड पोहोचते व पुढे बोरी नदीच्या पात्रात वाळवंटात येते. येथे हजारो भाविक असतात. सर्वत्र महाराजांचा जयघोष असतो. पालखी समाधी स्थानासमोर येते. तेथे धरणगावकर यांचे अभंगावर निरूपण होते. नंतर श्री सखाराम महाराजांची आरती होऊन मिरवणुकीची सांगता होते. येथे गुलाल उधळला जातो. सर्व मानकऱ्यांना महाराजांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद वाटला जातो व श्री लालजींची मूर्ती वाजत गाजत वाडी मंदिरात आणतात. 

दशमी ते पौर्णिमा या कालावधीत वाडीत व समाधीपुढे भागवत वाचन, भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम अखंडपणे सुरु असतात. त्यासाठी परंपरागत मानकरी ठरलेले असतात. त्यांचे कार्यक्रम त्यांच्या ठरलेल्या वेळीच होतात. वैशाख वाद्य प्रतिपदा हा उत्सवाचा सांगता दिवस. सकाळी १० ते १२ वेळात समाधी मंदिरात श्री बेलापूरकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होते. श्री गुरुंच्या उपस्थितीत सर्वांना काला वाटला जातो व यात्रोत्सवाची सांगता होते. यात्रोत्सवाच्या १५ दिवसाच्या काळात नदीपात्रात विविध पाळणे, खेळण्यांची दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली जातात. यात्रोत्सवाच्या काळात डोळ्यांचे शिबिर, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. शहरातील सर्व डॉक्टर मोफत सेवा देतात. औषधीही मोफत देत असतात,

२०० वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव

वैशाख शु ११ या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो. सायंकाळी ७ वाजता वाडी मंदिरापासून रथोत्सवास सुरुवात होते. दोन लाकडी घोडे व सारथ्य करणारा अर्जुन यांची लाकडी प्रतिमा असेलेले रथ उत्तम प्रकारे सजविला जातो. भरजरी पोशाखात व सुवर्ण अलंकार घातलेली, हाती चांदीचा धनुष्य धारण केलेली श्री. लालजींची मूर्ती रथात ठेवतात. पुजारी दाम्पत्याकडून रथाची विधिवत पूजा होते. रथाच्या पुढे मान्यवर मंडळी, बेलापूरकर महाराजांची दिंडी तसेच श्री गुरु महाराज व त्यांची दिंडी आल्याशिवाय रथ हालत नाही. रथास ओटी लावण्याचा मान आहे. सर्व धर्मांना व जातींना एकत्र करुन हा श्री पांडुरंगाचा रथोत्सव टाळ मृदंगाच्या गजरात, सनई चौघडे यांच्या वाद्यात मार्गक्रमण करतो. प्रदक्षिणा रस्त्यावर भाविक भक्त आरत्या घेऊन बाहेर थांबतात. रथाच्या पाठीमागे मेणा असतो. त्यामध्ये श्री संत सखाराम महाराज यांच्या पादुका असतात व त्यामागे संत श्री प्रसाद महाराज पायी असतात. हि मिरवणूक मारुती मंदिराच्यापुढे  पुलावर थांबते. त्या ठिकाणी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिरणारी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. नंतर रथ पैलाड मार्गे वाळवंटातून सकाळच्या वेळी पुन्हा वाडी चौकात पोहोचतो. तेथे पांडुरंची आरती होऊन रथोत्सवाची सांगता होते. 

महाराष्ट्रात थोर संत परंपरेचा पाया रचणाऱ्या संत सखाराम महाराजांचा रथोत्सव म्हणजे सामाजिक समरसता व सद्भावाचे प्रतीक आहे. रथोत्सवात सर्व जाती बांधवांचा समावेश असतो. गेल्या २००  वर्षांपासून अखंडपणे साजऱ्या होणाऱ्या या रथोत्सवात एकतेचे दर्शन घडत असते. गुण्यागोविंदाने राहण्याचा संदेश रथोत्सवातून दिला जातो.  या रथोत्सवाच्या निमित्ताने सर्व सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येतात. वर्षानुवर्षे परंपरेप्रमाणे प्रत्येक समाजातील व्यक्ती आपापली जबाबदारी पार पाडतो.  त्यामुळेचं हा सोहोळा सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवतो. हा सोहळा पार पाडण्यासाठी शहरातील प्रत्येक समाजावर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. अक्षय्यतृतीयेला स्तंभ व ध्वजारोहण आणि सभामंडप उभारण्यासाठी लाकडी खांबाची आवश्यकता असते. ते वाडीतून बोरी नदीच्या वाळवंटातील श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर आणून टाकण्याची जबाबदारी महाजन-माळी समाजावर आहे. हे साहित्य आणल्यावर मांडव उभारण्याचे काम पाटील समाजाकडे आहे. मांडव उभारल्यावर त्यावर गोणपाट टाकण्याचे काम वाणी समाजाकडे, तर कनात लावण्याचे काम शिंपी समाजाकडे आहे. रथ सजावट - रथ सजावटीचे काम धनगर बांधव, तसेच भालदार-चोपदार करीत असतात. रथावर देव ठेवण्याची व देव पूजेची जबाबदारी देव घराण्याकडे आहे. रथावर दक्षिणा घेण्याची जबाबदारी ब्राह्मण बंगाली समाजाकडे आहे, रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लीम समाजाला दिला जातो. त्यानंतर शहरातून मार्गस्थ होत असलेल्या रथाला ठिकठिकाणी दिशा देण्याचे काम धनगर समाज बांधव करीत असतात. वाटेतच रथाला आक लागला, रस्त्यात रथाचे चाक अडकले तर ते घणाद्वारे यशस्वीपणे काढण्याची जबाबदारी बेलदार समाज पार पाडतो. रथोत्सवाचा मार्ग मशालीद्वारे प्रकाशमान करण्याची जबाबदारी न्हावी बांधवांची असते. लहान रथाची सेवा भोई समाजाकडे आहे. अशा रीतीने सर्व जातीधर्माचा सहभाग असलेला हा सोहळा मोठय़ा हर्षोल्हासात पार पाडला जातो. बारा बलुतेदारांच्या सहभागामुळे सर्वधर्मसमभाव, सामाजिक एकोपा वृद्धिंगत होत असतो. हा उत्सव सर्वसमावेशक असल्याने दरवर्षी मोठय़ा उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 

श्री संत सखाराम महाराजांच्या वैशाख उत्सवाला २५० वर्षांची परंपरा असून रथोत्सवाला २०० वर्षांची वर्षांची परंपरा आहे. हा रथ अतिशय उंच असून, तो मलबार सागाच्या लाकडापासून बनविलेला आहे. संस्थानचे दुसरे गादी पुरुष संत श्री गोविंद महाराज यांनी १८१९ मध्ये रथोत्सवाची परंपरा सुरू केली. त्यावेळी पहिला रथ तयार करण्यात आला होता. त्यानंतर वाडी संस्थानचे गादी पुरुष संत श्री बाळकृष्ण महाराज यांनी नवीन रथ तयार केला. हा रथ मलबार सागाच्या लाकडापासून तयार केलेला आहे. दोन चाकांच्या मधील आख अंजनाच्या लाकडापासून बनविलेले आहे. रथावर श्री गणेश, मारुती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. रथ निघण्याच्या काही दिवस अगोदरच रथाची दुरुस्ती केली जाते. हे काम दरवर्षी होत असते.  या रथाला पूर्वीपासूनच नाड्याने ओढण्याची परंपरा आहे.  गेल्या दोनशे वर्षात रथाच्या  मार्गात एकदाही बदल झालेला नाही. रस्त्यावर दुतर्फा भाविकांना श्रीफळ,केळी, खडीसाखरेचा प्रसाद देण्यात येतो. रस्त्यावर ठिकठिकाणी गुरु श्री प्रसाद महाराजांवर व रथावर पुष्पवृष्टी करण्यात येते. ठिकठिकाणी आरत्याही होतात. वाडी संस्थानातून निघणारा रथ सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशीपूल पैलाडमार्गे वाडीत येतो. पूर्वी पहाटे अडीच-तीन वाजताच रथ वाडीत यायचा. मात्र आता आरत्या वाढल्याने, रथ संस्थानात पोहचण्यास सकाळ उजाडत असते.

विश्व संवाद केंद्राने श्री संत सखाराम महाराजांचा वैशाख उत्सवाची माहिती लेख स्वरुपात लिहिण्याची संधी देऊन संत श्री सखाराम महाराजांची सेवा करण्याचे भाग्य मला दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद !

जय हरी ! रामकृष्ण हरि !!

2 comments:

  1. अतिशय माहितीपूर्ण व ऊत्क्रुष्ट लेख .
    अभिनंदन !!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! आपल्या प्रतिक्रियेबद्दल !

      Delete