Sunday 15 October 2023

गांधीतीर्थवरील दोन वर्षे : आनंद, अभिमान व प्रगल्भतेची !

२०२१ च्या घटस्थापनेच्या दिवशी सद्गुरु हभप प्रसाद महाराज यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शक आदरणीय अशोकभाऊ व मित्र अनिल जोशी, विरेश्वरप्रसाद भट यांच्या विशेष सहकार्याने जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून व्यावसायिक जीवनाचा एक नवा अध्याय सुरु झाला. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी विचार संस्कार परीक्षा विभागाचा प्रमुख म्हणून प्राथमिक जबाबदारी मिळाली. दोन वर्षाचा हा प्रवास मागे वळून पाहतांना आनंद, अभिमान व प्रगल्भतेचा वाटतो. अनेकांना माझ्या विचारसरणीमुळे व एकूणच व्यक्तिमत्वामुळे प्रश्नचिन्ह होते. माझ्यावरील प्रेमापोटी अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केला मी मात्र 'सर्व काही व्यवस्थित होईल' या विचाराने कार्यरत राहिलो. वेळप्रसंगी अनिल जोशी व दिलीप तिवारी हे पाठीशी होते त्यामुळे अडचण आली नाही. नाही म्हटले तरी मलाही तशी थोडी शंका होतीच परंतु आईवडिलांचे संस्कार, २९ वर्षांचा अनुभव, परिस्थिती व माणसांशी जुळवून घेण्याची वृत्ती, प्रसंगी दोन पाऊले मागे जाण्याची तयारी यामुळेच हे शक्य झाले असे मला प्रामाणिकपणे वाटते.

पहिले वर्ष थोडा चाचपडतच चालत होतो. सुरुवातीचे तीन महिने फारसे जबाबदारीचे काम नव्हते. काम होते ते येथील व्यवस्था, कार्यपद्धती व धोरण समजण्याचे ! ज्येष्ठ सहकारी श्री उदय महाजन यांच्याकडे डोळसपणे पहात अनेक गोष्टी शिकत होतो. सहकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला तीन महिन्यांचा टप्पा मला व सर्व सहकाऱ्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरला. पदव्युत्तर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणातील भाग सुरु होता. परीक्षा विभागातही सहकाऱ्यांकडून अनेक गोष्टी समजून घेतल्या. राज्याच्या विविध भागातील शैक्षणिक संस्था, संस्थाचालक यांच्या भेटीसाठी प्रवास सुरु झाला-होता-आहे. हळूहळू कामाचा आवाका लक्षात येऊ लागला. त्याप्रमाणे स्वतःहून वेगवेगळया गोष्टी सुचवू लागलो. जबाबदारी येऊ लागली. वर्ष पूर्ण झाल्यानंतर संस्थेच्या १३ दिवसांच्या सायकल यात्रेची जबाबदारी मिळाली. ग्रामीण भागातील व्यक्तिमत्व विकास शिबिरे, विविध स्पर्धा, नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्प, How Gandhi Comes Alive ! सारख्या कार्यशाळेतील सहभाग, अनुभूती शाळेच्या प्रवेश प्रक्रियेतील सहभाग, गांधी जयंती निमित्ताने काढण्यात येणारी सद्भावना शांती यात्रा इ. मधील सहभाग वाढू लागला. आणि आता मी या सर्व गोष्टींचा एक भाग झालो याचा मला आनंद व समाधान आहे. 

व्यावसायिक जबाबदारी पार पाडत असतांना आपल्या क्षमतांना व बलस्थानांना संधी मिळते, वाव मिळतो याचा एक वेगळा आनंद असतो. अनुभवी माणसाला अहंगंड वा न्यूनगंड दोघांपैकी काहीही असले तरी अडचणी येतात व आदरणीय अशोकभाऊंच्या भाषेत 'स्टोऱ्या' बनतात. मागील दोन वर्षात आपली एकही स्टोरी बनली नाही याचा आनंद आहे. GVSP (गांधी विचार संस्कार परीक्षा) साठी राज्यस्तरीय कार्यकारी समिती तयार करण्यात येऊन त्यांची एक परिषद गांधीतीर्थवर आयोजित करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेचे आयोजन जैन हिल्सवर करण्यात आले. गांधीतीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता, ग्राम संवाद सायकल यात्रा कार्यान्वित करण्यात प्रमुख भूमिका म्हणून संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. संस्थेचा दशकपूर्तीचा कार्यक्रम, देशभक्तीपर समूहगीत गायन, अनेक गांधीयन कार्यकर्त्यांचा सहवास-संवाद या गोष्टी आनंद द्विगुणित करणाऱ्या ठरल्या.

जैन उद्योग समुहासारख्या जागतिक व कार्पोरेट ब्रॅण्डसोबत काम करण्याची संधी मिळणे, त्याला उंचीवर नेण्यासाठी आवश्यक असणारे नेतृत्व देणारे जैन परिवारातील आदरणीय अशोकभाऊ, अनिलभाऊ, अजितभाऊ, अतुलभाऊ, सौ. निशाभाभी, सौ. अंबिका भाभी या व्यक्तींसोबत काम करणे हि अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांशीच नियमित संबंध येतो असे नाही मात्र व्यावसायिक जबाबदारी पार पाडत असतांना त्याचा अनुभव येतोच येतो. या सर्व कर्तृत्ववान मंडळींचा सहकाऱ्यांसोबतचा व्यवहार, त्यांची कार्यपद्धती, कामाप्रतीची निष्ठा आपसूकच खालपर्यंत पोहोचल्याचा अनुभव येतो त्यामुळे अभिमानाची गोडी अधिक वाढते. बाहेरच्या जगतातील जळगावकर नागरिकांची कंपनीवरील टीका-टिपण्णी आणि प्रत्यक्षातील स्थिती यात तफावत जाणवते मात्र या परिवाराची उदार अंतःकरणाने आपली समाजप्रतीची व गावाप्रतीची कटिबद्धता पाहिल्यानंतर खरोखरच अभिमान वाटतो. गावातील अनुभूती शाळेतील उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेली व्यवस्था तसेच भाऊंचे उद्यान व गांधी उद्यान हि त्याची उदाहरणे होत. 

हि दोन वर्षे प्रगल्भतेचीही ठरली. गांधींच्या नावाने चालणाऱ्या संस्थेतील आपला व्यवहार कसा असावा याची मनाच्या एका कोपऱ्यात कायम जाण राहते. माझ्यासारखा प्रतिक्रियावादी माणूस या दोन वर्षाच्या कालखंडात प्रतिसादवादी झाल्याचा मी अनुभव घेत आहे. समाजमाध्यमातून येणारी माहिती तपासून त्याची चिकित्सा करण्याची वृत्ती वाढीस लागत असल्याचे मला माझेच जाणवते. संघाच्या शाखेत, राष्ट्रीय परिषदांमध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून आजपर्यंत मी कधीही महात्मा गांधींबद्दलची अनादरयुक्त टिपण्णी ऐकलेली नाही मात्र गांधीवादी मंडळी मात्र संघाबद्दलची एक अढी मनात ठेवूनच बोलतो असे मला जाणवते. त्यासाठीही संयमितपणे परस्पर विचारांचा आदर करुन किमान चांगल्या कामांसाठी मैत्री निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करतोय. हे एक वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण आहे असे मला वाटते. वैचारिक मतभेदांच्या विषयावर Healthy Discussion वादविवाद करुन ते शक्य नसल्यास वादाचे मुद्दे बाजूला ठेवून एकमेकांमधील चांगल्या गोष्टींचा अभ्यास करीत सर्व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचे निर्माण झाले पाहिजे असे मला वाटते. काल्पनिक, गृहीतके व वास्तव याचा विवेकी विचार करण्याची शिकवण दोन वर्षात सहजपणाने मिळाली. 

आनंद, अभिमान व प्रगल्भता वाढीसाठी आगामी काळात अधिक कार्य करण्याची प्रेरणा या दोन वर्षांनी नक्कीच दिली. संख्यात्मक व गुणात्मक विकासाच्या दृष्टीने अजून योगदान दिले पाहिजे असे वाटते. प्रशिक्षण, समुपदेशन गरज लक्षात घेऊन यावर ठळकपणे काम करण्याची मला संधी आहे असे जाणवते. हा प्रवास असाच बहरत राहो व त्यासाठी आपल्या सर्वांच्या सदिच्छा लाभो हीच अपेक्षा ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Tuesday 10 October 2023

मानसिक आरोग्याचा मंत्र : आनंदी जगणं !

दि. १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. आपले मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी अतिशय साध्या साध्या व छोट्या छोट्या गोष्टीतूनही हे शक्य आहे. वास्तव स्वीकारुन व कोणाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जीवन जगणे यासाठी लाभदायक ठरु शकते. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले मात्र सोबत अनेक गोष्टींचा ताण सोबत घेऊन आले. तंत्रज्ञान व जीवन यात योग्य समतोल राखणे आजच्या काळात कठीण होत चालले आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वापर कालांतराने मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण करतो. लॉकडाऊनच्या काळात मोबाईलच्या आहारी गेलेला समाज अजूनही स्वतःला सावरु शकत नाही हे वास्तव नाकारता येणार नाही. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम झाला आहे. 

टीव्ही व समाज माध्यमही मानसिक गोंधळातच भर घालतांना दिसत आहे. सावधानता बाळगणे व संयमित राहणे या दोन गोष्टी आपल्याला काही बंधने घालण्यासाठी प्रवृत्त करु शकतात अर्थात त्यासाठी आपणच आपल्या जीवनाकडे डोळसपणे पाहणे अगत्याचे ठरते. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हि या निमित्ताने एक संधी आहे. आपण आनंदी असणे हे कुटुंबीय, सहकारी व मित्रपरिवार यासाठी आवश्यक आहे. समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो. कोवळ्या वयातील मुलांच्या आत्महत्या असो वा इस्रायल मधील युद्ध, कार्यालयातील कामाचा ताण असो वा कुटुंबातील आव्हाने असोत या सर्वांचा परिणाम आपल्यावर होतो व स्वाभाविकपणे तो आपल्या परिघातील प्रत्येकावर जाणते-अजाणतेपणी होत असतो. आपण कितपत आनंदी आहोत हे जाणून घेण्यासाठी खालील प्रश्न स्वतःला विचारुन पहा. 


Courtsey: Swapneela Sethia


१. आपल्याला आपले आयुष्य हे बक्षीस आहे असे वाटते का ?

२. आपण स्वतःमधील व इतरांमधील चांगुलपणा शोधण्यासाठी सक्षम आहोत का ?

३. आपण आपल्या भविष्याबद्दल आशादायी आहात का ?

४. आपण आपल्या रोजच्या कामातून आनंद मिळवतो का ?

५. आपणास पदोपदी व क्षणोक्षणी आनंद वाटतो का ?

६. आपणास आपल्या जीवनात काहीतरी उद्देश व अर्थ आहे असे वाटते का ?

७. आपण कायम उत्साही असतात का ?

८. आपण इतरांना काही देतो त्यावेळेस आनंद मिळतो का ?

९. विपरीत परिस्थितीतही मी चांगले शोधू शकतो का ?

१०. दिवसभरातील भावनांचा स्वीकार व स्वागत करतो का ?

११. कुटुंबियांच्या व मित्रपरिवाराच्या नियमित संपर्कात असतो का ? 

१२. जेव्हा परिस्थिती गंभीर असते त्यावेळेस पुढाकार घेऊन सहाय्य्यभुत होतो का ?

१३. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपल्याला कृतज्ञ वाटते का ?

१४. भूतकाळातील निराशा व दुःख विसरु शकतो का ?


आनंदी जीवन हे मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे व त्यादृष्टीने वरील काही प्रश्न आहेत. असे मानवी भावनांच्या बाबतीत आपल्याला पडणाऱ्या प्रश्नाचा विचार केल्यास आपल्याला मार्ग सापडू शकतात व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त जीवन जगता येऊ शकते. जेव्हा आपल्याला आपल्याच प्रश्नांची उत्तरे सापडत नाही तेव्हा स्नेहीजनांची मदत घ्या. आपले मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे असे लक्षात आल्यास समुपदेशकाची मदत घ्या. मोकळा संवाद अनेक प्रश्नांची सहज उकल करतो. त्यासाठी एक जिवाभावाचा सखा असावा. निसर्गाच्या जितके जवळ जाल तेव्हढे प्रश्न लवकर निकालात निघतील. शारीरिक तंदुरुस्ती कडे लक्ष द्या. त्यासाठी आपल्या सोईनुसार व आवडीनुसार व्यायाम करा. ताजे, पौष्टिक व सकस अन्न हे शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यासाठीचे मूळ आहे. प्राणिमात्रांवर व भोवतालच्या जगावर प्रेम करा. गरजूंना मदत करा. आपल्याकडे जे आहे ते उदारहस्ते मुक्तपणाने देत रहा. 

पहा... विचार करा... बदल करा... आपल्या निरामय दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा ! 


गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४