Tuesday 30 June 2020

जगद्गुरु संत तुकाराम महाराज !

रामकृष्ण हरि ! 


ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस... वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला तर संत तुकाराम महाराज हे त्याचे कळस आहे असे संत बहेणाबाई यांनी एका अभंगात म्हटले आहे व तशी या संप्रदायाची श्रद्धा आहे. या काळातील सर्वच संतांनी समाज प्रबोधन करतांना मानवाला वैचारिक दिशा देण्याचे काम केलेले आपल्याला दिसून येईल. संत तुकाराम महाराज या सर्वांमध्ये शिरोमणी होते. सतराव्या शतकातील या महानुभावाने त्यापूर्वीच्या संतांच्या विचारधनाचे सामान्यजनांच्या दृष्टीने व सोप्या पद्धतीने सादरीकरण केले असे वाटते. त्यांच्या गाथेतील अभंगांमधून मांडलेले अनुभवसंपन्न दृष्टांत आजही अनेक ठिकाणी वापरले जातात आणि चपखलपणे सार्थ ठरतात. समस्त प्राणिमात्रांवर त्यांनी भाष्य केलेले आपल्या लक्षात येईल. संत तुकाराम महाराजांचे चरित्र अध्यात्ममार्गावर वाटचाल करणाऱ्या साधकांना दिशा देणारे आहे. 'आपुलिया बळे नाहीं मी बोलत | बोलविता धनी वाचा त्याची ||' या श्रद्धेतून त्यांनी लिहिलेले अभंग देववाणी मानली जाते. श्री महाराजांच्या सुमारे अडीच हजार अभंगातून भक्तिभाव, व्यवहार, नाममहिमा, संतस्तुती, शरणागती आदी विषय आलेले दिसतात. यावरून त्यांना 'जगद्गुरु' का म्हटले असावे हे ध्यानात येईल. तंत्रज्ञानावर आधारित आजच्या युगातही संत तुकारामांचे विचारधन मार्गदर्शक ठरते. 

संत तुकाराम महाराज सतराव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे संत होत. समाजाच्या तळागाळातील लोकांनाही सहज समाजातील अशा त्यांच्या रचना आहेत. संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. एका सुखवस्तू कुटुंबात व आठ पिढ्यांची वारकरी परंपरा असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पंढरपूरचा विठ्ठल त्यांचे आराध्यदैवत होते. घर-प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना त्यांच्या परिवारावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या. आईवडील गेले, थोरल्याची बायको गेली, तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रखमाबाईही गेली. मोठ्या बंधूंनी कुटुंबात लक्ष न दिल्याने समोर आलेल्या प्रसंगांना सामोरे जाण्याचा प्रसंग तुकोबारायांवर आली. भयंकर पडलेल्या दुष्काळात महाजनकी असलेल्या या कुटुंबाला मानवासह गुराढोरांची व्यवस्था पाहावी लागली. त्यासाठी प्रसंगी सावकाराकडून कर्ज काढून, पत्नीचे सर्व दागिने विकून संत तुकारामांनी केली. सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. अशा आघातांनी सर्वसामान्य माणसे खचून जातात, तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर-संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्यागही करतात. तुकोबांनी यातील कोणताही पर्याय न निवडता "विठ्ठल विठ्ठल' म्हणत या सर्व प्रसंगांना धीराने व खंबीरपणे सामोरे गेले. यातच आपल्याला त्यांचे श्रेष्ठत्व लक्षात येते. हरिचिंतनात कायम निमग्न असणाऱ्या संत तुकारामांनी आपल्या अनुभवातून विविध अभंग शब्दबद्ध केले. भागवत धर्मची पताका आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी जनजागृतीचे कार्य केले. 

संत तुकारामांचे चरित्र व अभंगांचे वाचन करणारा स्तंभित होतो आणि अनेकदा निःशब्दही ! जगरहाटीत अडकलेल्या सामान्य मानवाला त्यांच्या जीवनातून जगण्याचा वेगळा अर्थ प्राप्त होतो. त्यांच्या अभंगातून भाव भक्ती तर जागृत होतेच सोबत व्यवहाराची शिकवणही मिळते. जीवन जगात असतांना येणाऱ्या सुखदुःखाला कसे सामोरे जावे व संसारात असतांनाही परमार्थाचा मार्ग कसा आचरता येतो याचे संत तुकाराम हे आदर्श उदाहरण आहे.  तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व तात्कालिक परिस्थितील अनिष्ट गोष्टींवर प्रहार करणार संत कवी होते. त्यांचे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे.  वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक सर्वांनाच त्यांच्या या विचारधनात विशेष रुची निर्माण करतात. भागवत धर्माचा कळस होण्याचे भाग्य लाभलेले तुकोबाराय महाराष्ट्राच्या हृदयात आपले अढळ स्थान घेऊन आहेत. त्यांच्या अभंगातील गोडवा व भाषेची रसाळता विशेष आहे.  संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगासोबतच गवळणीही रचल्या. समाजातील दांभिक गोष्टींवर प्रचंड चीड असलेल्या या थोर संताने अनेकदा प्रहार केले आहे. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले. देव धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरा तसेच भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजातील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचे काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत.

संत तुकाराम गाथा म्हणजे बहुजनांची गीता आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची पवित्र सांस्कृतिक विद्यापीठे म्हटली पाहिजेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. संत तुकारामांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म-कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण त्यांनी जगाला  दिली. सामाजिक परिवर्तनाची एक चळवळ त्यांनी सहजभावाने निर्माण केली. समाजातील जातीभेद नष्ट करण्याचे व गुलामगिरीची चौकट त्यांनी मोडली. बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला. संघर्षमय जीवन जगूनही अध्यात्म, भागवत भक्ती, उपदेशाची कास त्यांनी कधीही सोडली नाही.  आपल्या दैनंदिन जीवनात येणारे अनुभव आणि त्यासाठीची वचने संत तुकाराम महाराजांच्या अभंगात आढळून येतात. त्यांनी अनेक जीवन व्यवहार सूत्रे आपल्या अभंगातून मांडलेले दिसतात. त्यामुळेच ती सामान्यजनांच्या मुखात सहज बसली आहेत. अनेकदा ती संत तुकारामांची आहेत हे त्यांना माहिती नसते. हि वचने मानवी जीवनाशी एकरुप झालेली दिसतात आणि म्हणूनच ती मानवाच्या विचारपद्धतीची व जीवनशैलीची अविभाज्य अंगे आहेत. 

'आलिया भोगासी असावे सादर'

'आले देवाजीच्या मना, तेथे कुणाचे काही चालेना', 

'ठेविले अनंते तैसेचि राहावे | चित्ती असू द्यावे समाधान ||' हि वचने आपण अनेकदा वापरतो. मानवी मनाची एक चौकटच यातून निर्माण झालेली दिसते आणि त्याचे श्रेय महाराजांकडे जाते. 

'एकमेकां साह्य करू। अवघे धरू सुपंथ'

'शुध्द बीजापोटी। फळे  रसाळ गोमटी' 

'असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे' 

'जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ॥ तोचि साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा'

'तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे । येरा गबाळाचे काम नोहे '

'नाही निर्मळ जीवन । काय करील साबण' 

'पोट लागले पाठीशी । हिंडविते देशोदेशी '

'तुका म्हणे ऐशा नरा । मोजूनी माराव्या पैजारो'  या प्रकारची वचने जीवनामधील कठोर वास्तविकतेची जाणीव करून देतात. 

'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी '

'तुका म्हणे जिणे । शर्तिविण लाजिरवाणे '

'मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास । कठीण वज्रास भेदू ऐसे'

'भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे काठी देऊ माथा' हि वचने एक जीवन विषयक दृष्टिकोन देतात. तुकोबारायांच्या अनेक गोष्टी मराठी मनाने स्वाभाविकपणे आत्मसात केलेल्या आहेत. त्यामुळे जीवन संघर्षात तुकोबांकडून नेहमीच मार्गदर्शन मिळत असते. 

दुष्काळ संपुष्टात यावा यासाठी घरापासून दूर जाऊन डोंगरावरच्या एक गुहेत जाऊन त्यांना पांडुरंगाचे आर्त आळवणी केली. मंडळी त्यांचा शोध घेत तेथे पोहोचले. लहान बंधू म्हणाले "दादा, अरे या गुहेत वाघ, लांडगे असतात. त्यांनी तुला खाल्लं असतं तर ?" त्यावर तुकोबा म्हणतात "अरे माझ्यासंगे माझा पांडुरंग होता. माझ्याजवळ माझा पांडुरंग असल्यावर मला रे भय कोणाचं ? आपलं मन शुद्ध निर्भय असेल ना, तर कोणाचाही भय उरात नाही बघ." यावेळचा त्यांचा अभंग आपल्याला खूप काही सांगून जातो. 

जन्ममरणांची कायसी चिंता | तुझ्या शरणागती पंढरीराया ||
वदनीं तुझे नाम अमृतसंजीवनी | असतां चक्रपाणी भय काय (कवणा) ||
हृदयी तुझें रूप बिंबले साकार | तेथें कोण पार (पाड) संसाराचा ||
तुका म्हणे तुझ्या नामाची (चरणांची) पाखर | असतां कळिकाळ पायांतळी ||



फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले. या दिवशी तुकाराम बीज साजरी करण्याची परमपरा आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. जीवनाची इतिकर्तव्यता सांगणारा अभंग आपण कायम हृदयी जपावा या अपेक्षेसह थांबतो. उद्या आपण संत  नामदेव यांना समजून घेऊ या ! 

याजसाठी केला होता अट्टाहास | शेवटचा दिस गोड व्हावा ||
आतां निश्चितीने पावलों विसांवा | खुंटलिया धांवा तृष्णेचिया ||
कवतुक वाटे जालिया वेंचावे | नांव मंगळाचे तेणें गुणें ||
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी | आतां दिवस चारी खेळीमेळीं ||


फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले. या दिवशी तुकाराम बीज साजरी करण्याची परमपरा आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. जीवनाची इतिकर्तव्यता सांगणारा अभंग आपण कायम हृदयी जपावा या अपेक्षेसह थांबतो. उद्या आपण संत  नामदेव यांना समजून घेऊ या ! 

रामकृष्ण हरि ! 

2 comments:

  1. खूप छान .
    तुकाराम महाराज व त्यांच्या शिकवणुकीचे यथार्थ वर्णन.
    👌👌👍👍

    विजय कुळकर्णी .

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

      Delete