Wednesday 1 July 2020

संत शिरोमणी नामदेव महाराज !


रामकृष्ण हरि ! 

विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो । 
तुटला हा संदेहो । भवमूळ व्याधीचा ॥१॥ 
म्हणा नरहरि उच्चार । कृष्ण हरि श्रीधर । 
हेचि नाम आम्हां सार । संसार तरावया ॥२॥ 
एकतत्त्व त्रिभुवनीं । हेंचि आम्हां हरिपर्वणी । 
गाइली जे पुराणीं । वेदशास्त्रांसहित ॥३॥ 
नेघों नामेंविण कांहीं । विठ्ठल कृष्ण लवलाही । 
नामा म्हणे तरलों पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणतांचि ॥४॥

संत शिरोमणी नामदेव महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक होते. मराठी भाषेतील सर्वाधिक जुन्या काळातील एक श्रेष्ठ कवी. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. संत नामदेवांना प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारा श्रीविठ्ठलाच्या जवळचा सखा मानले जाते. समाजातील भावनिक एकात्मता साधण्यासाठी संत नामदेवांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी केले. त्यामुळेच पंजाबी बांधवांना ते आपले वाटतात. आजही शीख बांधव त्यांचे 'नामदेव बाबा' म्हणून गुणगान करतात. पंजाब व महाराष्ट्रातील कीर्तनात आपल्याला साम्य दिसते. पंजाबातील घुमान (अलीकडेच या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले आहे)  येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. त्यांचे अनेक शिष्य पंजाबात होते. राजस्थानातील शीख बांधवांनीही संत नामदेवांची मंदिरे उभारलेली आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे त्यांनी भागवत धर्माचा प्रचार केला व प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड कार्य समर्थपणे केले. यासाठीच त्यांना `संत शिरोमणी' म्हटले जाते. 

८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या संत नामदेवांचा जन्म मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी (आज हे गाव नरसी-नामदेव नावाने प्रसिद्ध आहे) येथे झाला. त्यांचे बालपण पंढरपुरात गेले. त्यांना लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीची गोडी होती. विसोबा खेचर हे संत नामदेवांना आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले. त्यांनी मराठी सोबतच हिंदी व पंजाबी भाषेतही रचना केल्या आहेत. संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) , हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) व त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी विविध गाथांतील अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी त्यांच्या नावाने "पायरीचा दगड' आहे. मंदिरात येणाऱ्या भगवंतांच्या भक्तांचा व साधू संतांच्या चरणधुळीचा स्पर्श व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती. 

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समाजाला समता आणि परमेश्वराच्या भक्तिची शिकवण दिली. संत नामदेवांनी संतांचा महिमा अतिशय रसाळ पद्धतीने वर्णन केला आहे आणि तो एकमेवाद्वितियच आहे. त्याच्या गंगामाहात्म्यातून गंगेचे छान वर्णन केले आहे आणि भक्तांना गंगास्नानच झाल्यासारखे वाटते. पांडुरंगाशी सलगी असलेल्या या संताने समाजातील दैन्य दुःखाप्रसंगी, अन्याय अत्याचारप्रसंगी पांडुरंगाने काही केले नाही तर त्याला अनेक प्रश्न विचारले आहेत. प्रसंगी त्याच्यावर रागावलेले आहेत. असेच एकदा मावळ प्रांतात दुष्काळ पडला त्यावेळेस ते त्याला विचारतात. 

काय तुज देवा आले थोरपण । दाविशी कृपण उणें पुरें ॥
पुरे आतां सांगों नको बा श्रीहरी । गोकुळा भीतरीं खेळ मांडी ॥
हलाहल शांत करी तत्क्षण । अमृत जीवन नाम तुझें ॥
तुझें नाम सर्व सदा गोपाळासी । नामा म्हणे यासी काय जालें ॥

दुष्काळ संपेना आणि माणसांचे कष्ट सुद्धा वाढतच चालले, तेव्हा नामदेव आणखी चिडले आणि म्हंटले... 

निर्गुणपणाच्या घेसी अभिमाना । तुजनारायणा सोडीना मी ॥
काय तुझी भीड धरावी म्यां आतां। कृपाळू अनंता म्हणें नामीं ॥

ज्या भगवंताची आपण निस्सीम सेवा करतो, भक्ती करतो त्याच्यावर प्रेम करतो त्यावरच आपला हक्क असतो आणि प्रसंगी असे बोल लावता येतात हे आपल्या लक्षात येईल. हातात एक तारी आणि चिपळ्या घेऊन फिरतानाचे नामदेवांचे चित्र आपण नेहमीच पाहतो. पण या शांत दिसणाऱ्या चेहऱ्याच्या मागे एक माणूसही आहे. परमेश्वराने आपल्या प्रश्नाला उत्तर दिले नाही किंवा समाजातील अप्रिय गोष्टींना अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिला नाही तर त्याला जाब त्यांनी विचारला आहे. त्यांना समाजातील पीडितांची दुःखे ठाऊक होती आणि म्हणूनच त्या संवेदनशीलतेतूनच अशा रचना तयार झालेल्या आपल्याला पाहता येईल. समाजातील विविध समस्यांना उपाय त्यांनी सुचविला आहे. अनेक रचनांमधून त्यांनी समाजाला कर्मयोगाची शिकवण दिलेली आपल्याला दिसते. एका बाजूला चीड व्यक्त करणारे संत नामदेव दुसऱ्या बाजूला याच परमेश्वरावर भरवसा असल्याचेही म्हणतात. 

संसारी गांजलों म्हणोनि शरण आलों | पाठिसी रिघालों देवराया ||
कळिकाळा वास पाहूं तूं न देसी | भरंवसा मानसीं आहे मज ||
नामा म्हणे देवा स्वामिया तूं एक | आवडता सेवक करीं मज || 

गुरु ग्रंथसाहेबातील एका रचनेतील चरणात ते म्हणतात...

प्रणवै नामा ऐसो हरी ॥
जासु जपत भै अपदा टरी ॥

अशा हरीला नामा विनंती करतो ज्याचे नाम जप करता संकट टळते. संतांचे चरित्र वाचणे हे खरोखर एक वेगळी अनुभूती देणारे आहे. आपले संकट / समस्या सहज पळवून लावण्याची शक्ती व विश्वास ते देतात. काही काळ आपण एका भावविश्वात नक्की जातो. त्यांना एका लेखात बंधने फार कठीण काम आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आपल्याला त्याबाबत गोडी निर्माण करणारे नक्की आहे. आपणही या निमित्ताने त्याचा लाभ घ्यावा यासाठीच हे लेखन.... उद्याच्या लेखात आपण संत मुक्ताबाई, संत जनाबाई आदींबद्दल पाहू या !  (आमचे मित्र श्री. अनिल जोशी यांच्या सूचनेनुसार लेखाची सुरवात अभंगाने केली आहे. त्यांच्या सूचनेबद्दल धन्यवाद )

काल आषाढी एकादशीच्या निमित्ताने माझी कन्या कु. मृण्मयी कुळकर्णी हिने "सुखाचें हें सुख चंद्रभागे तटी..." या अभंगावर कथक नृत्य केले आहे. त्याची लिंक सोबत देत आहे अवश्य पहा, लाईक करा...


रामकृष्ण हरि ! 

2 comments:

  1. चांगली माहिती .
    म्रुण्मयीचे न्रुत्य उत्तम !!
    👌👌👍👍

    ReplyDelete
  2. छानच आहे लेख

    ReplyDelete