Friday 24 July 2020

अभिमानी बापाचे हृदगत !

जीवनाच्या एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात असतांना आपल्याला आशा व विश्वास देणाऱ्या गोष्टी आजूबाजूला घडल्या तर एक वेगळी उभारी येते. परिस्थितीला उत्तरे सापडतात, आव्हानेच संधी देतात, गरज असते काही आवश्यक धोके स्वीकारण्याची व त्यावर प्रत्यक्ष कृती करण्याची... हे सगळं का सांगतोय ? आमच्या कुटुंबाच्यादृष्टीने विशेषतः पालक म्हणून एक आनंदाची गोष्ट घडली. सकाळची घरपोच भाजीपाल्याची गडबड आटोपून घरी गेलो तर " फॉर्च्युन " या ब्रँडचे काही वेगळे प्रॉडक्ट मांडून ठेवले होते. (रवा, मैदा, बासमती व खिचडीचा तांदूळ, साबण अन्य) घरात विचारले कंपनीने पाठवले का ? हो, आणि एक सत्काराचे पत्रही ! - इति सौ... सर्वप्रथम उत्सुकतेने ते पत्र वाचले आणि अतिशय आनंद झाला. अदानी विल्मर कंपनीच्या मानव संसाधन विकास विभागाचे प्रमुख श्री. सिद्धार्थ घोष यांचे ते पत्र होते आणि चि. प्रथमेशच्या निवडीबद्दल पालक म्हणून अभिनंदन करणारे ते पत्र आहे. (सोबत जोडले आहे) त्यामुळेच हे एका अभिमानी बापाचे हृदगत अर्थात हृदयाचे मनोगत !
तसं नेहमी मोकळेपणाने व्यक्त होणारा, इतरांबद्दल लिहिणारा मी मात्र बाप म्हणून व्यक्त होतांना कचरायचो. मात्र अलीकडे मला तसेही व्यक्त होतांना विशेष भावते. चि. प्रथमेशच्या वाढदिवशी "बाप २२ वर्षाचा होत असतांना..." असा ब्लॉग लिहिला होता आणि आज पुन्हा त्याअनुषंगाने लिहितोय... पत्रात म्हटल्याप्रमाणे त्याच्या बालपणापासूनचा अनेक गोष्टी डोळ्यासमोर काल परवा झाल्यासारख्याच भासल्या. ह. भ. प. सद्गुरु सखाराम महाराज यांच्या कृपाशिर्वादाने त्याची प्रगती सुरु आहे. आमच्या एकत्रित परिवारातील लहानमोठ्यांचे आशिर्वाद व सहजीवनाने तो समृद्ध झाला. गुरुजनांमुळे त्याला ज्ञानाबरोबरच जीवन कौशल्याचे धडे मिळालेत. विवेकानंद प्रतिष्ठानच्या काशिनाथ पलोड पब्लिक स्कुलचा विद्यार्थी असलेल्या प्रथमेशच्या आयुष्यात खूप चांगली माणसे आली. त्याच्या मेहनतीला या सर्वांचे मिळालेले आशिर्वाद व सदिच्छा मला खरोखर महत्वाच्या वाटतात. पालकाला आनंद व अभिमान वाटाव्या अशा काही प्रातिनिधिक गोष्टी आपल्यासोबत शेअर करीत आहे.
शालेय जीवनाचा मनमुराद आनंद त्याने घेतला. तसा खोडकर, मस्तीखोर होता. विज्ञानाचे प्रयोग, फुटबॉल, सहली या सर्व गोष्टीत त्याला सहभाग घेता आला याचा आनंद आहे. सर्वच क्षेत्रात आवश्यक असलेला वावर त्याला शाळेने उपलब्ध करुन दिला. त्या त्या काळातील शिक्षक वृंदाने खूप सारे त्याला दिले. त्यांनीही ते घेतले. महाविद्यालयीन जीवनातही समरसून , एक प्रामाणिक विद्यार्थी म्हणून तो वागला. कुठलाही अवास्तव गोष्टीसाठी हट्ट केला नाही. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासारख्या शैक्षणिक संकुलात तो समृद्ध झाला. तेथे त्याला उच्च शिक्षणासाठी विषयक मार्गदर्शन मिळाले. या सर्वांचा परिपाक म्हणजे एक जबाबदार व संवेदनशील नागरिक झाला. (बापासाठी अजून मुलगाच आहे आणि त्याला अजून समज यावी असेच मला वाटते ! )
आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करावा असे त्याने कळत्या वयात ठरविले आणि वयाच्या १८ व्या वर्षी पहिले रक्तदान केले. त्यानंतरच्या वर्षी त्याने आपल्या शाळेतील ९ वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रथमेश खूप चांगल्या प्रगल्भतेने बोलला. कागदावरील सर्व मुद्द्यांचा समावेश करतांना एकदाही कागद उघडून पाहिला नाही. तसा अंतर्मुख स्वरूपाचे व्यक्तिमत्व असलेला प्रथमेश इतकं छान समजावून सांगू शकतो असे वाटले नव्हते. त्याने केलेल्या चुका, शाळेत आलेलं अनुभव, वेगवेगळ्या शिक्षकांच्या वैशिष्ट्यांसह विषयांचा अभ्यास कसा करावा हे समजावून सांगतांना चांगल्या टिप्सही दिल्या.
मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेने स्व. रामभाऊ म्हाळगी यांच्या जयंती निमित्ताने " आर्य चाणक्य " यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वय वर्षे १४ ते ३० या गटातील युवकांनी आर्य चाणक्याच्या जीवनाचा अभ्यास करावा हा स्पर्धेचा उद्देश होता. स्पर्धेसाठी आर्य चाणक्य यांची राष्ट्र उभारणीची संकल्पना, आर्य चाणक्य एक व्यवस्थापन गुरु व आर्यचाणक्यांची लोककल्याण (योगक्षेम) विषयीची संकल्पना असे तीन विषय देण्यात आले होते. सदर स्पर्धेत प्रथमेशने आर्य चाणक्य एक व्यवस्थापन गुरु या विषयावर मराठीतून निबंध लिहिला होता. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत सुमारे २८०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत चि. प्रथमेशला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. प्रथमेशने स्वतः निबंध लिहिला. विशेष कौतुक यामुळे कि प्रथमेशचे शिक्षण सीबीएसई मधून अर्थात इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी त्याने मराठीतून निबंध लिहून हे यश मिळविले आहे. मला आठवते प्रथमेशला " आर्य चाणक्यांच्या " जीवनाबद्दल विशेष आकर्षण आहे. त्यातील अनेक गोष्टी वाचून तो त्याच्या आईला काही गोष्टी सांगत असे.
बी. टेकच्या अंतिम वर्षात प्रोजेक्ट करण्यासाठी त्याने जळगावातील मेरिको कंपनीत विनंती अर्ज केला. येथील व्यवस्थापनाने प्रथमच अशा पद्धतीने संधी दिली. तीन शिफ्टमध्ये प्रामाणिकपणे सर्व प्रकारच्या व्यावसायिक ज्ञान मिळविण्यासाठी आवश्यक ते सर्व केले. कंपनीतील एक सहकारी म्हणून ज्या पद्धतीने काम करावयास हवे तो ते शिकला. कमानीत प्रोजेक्टद्वारे काही नवीन करावयाचे असते आणि ते त्याच्या संघाने खूप छान केले अर्थात तेथील वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार... त्यांनी सुचविलेल्या गोष्टीने कंपनीच्या खर्च मोठी बचत झाली व तीच गोष्ट त्याला "अदानीत" निवडीसाठी उपयुक्त ठरली.
आपल्याच विश्वात मग्न असणारा प्रथमेश, नवीन माणसाशी बोलताना थोडा संकोचणारा, विज्ञान विषयात विशेष रुची असणारा, एकदा मैत्री झाली कि वेळ-काळाचे भान विसरणारा, क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा, गाड्यांचे विशेष आकर्षण असलेला, खाण्यापिण्याची फारशी तक्रार नसलेला, पनीर मसाला व चॉकलेट आनंदाने बनवणारा, तंत्रज्ञानाला सहज आत्मसात करणारा, आपल्या कामाशी काम ठेवणारा, समर्पित, वचनबद्ध व कामावर श्रद्धा ठेवणारा, सर्वांवर प्रेम करणारा, मातृमुखी असलेला, आईला विशेष जीव लावणारा प्रथमेशला आपल्या सर्वांच्या आशिर्वादाची व शुभेच्छांची गरज आहे.
प्रथमेशच्या वाटचालीत ज्यांचे ज्यांचे योगदान आहे, आशिर्वाद आहेत व सदिच्छा आहेत त्यांच्याप्रती मी पालक म्हणून कृतज्ञ आहे. प्रत्येक बापाच्या आपल्या मुलाकडून खूप साऱ्या अपेक्षा असतात. माझ्या नाहीत. मला मात्र त्याने आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे असे वाटते. आपल्या आरोग्याच्याबाबतीत विशेष सजग असले पाहिजे. कारण जीवनात त्याला जे ही मिळवायचे आहे त्यासाठी उत्तम आरोग्य हि महत्वाची गोष्ट आहे.


15 comments:

  1. छान लेख !
    प्रथमेश , तुझे व आदितीचे हार्दिक अभिनंदन !!
    प्रथमेशला शुभ आशिर्वाद व शुभेच्छा !!!
    👍👍👍

    विजय कुळकर्णी . ( बंगलोर ) 💐💐

    ReplyDelete
  2. खूप खूप अभिनंदन सर्वांचे.प्रशमेशला भावी वाटचाली साठी खूप शुभेच्छा व आशीर्वाद

    ReplyDelete
  3. चि.प्रथमेशला त्याच्या जीवनात जे जे काही मिळवायचे आहे,त्यासाठी त्याला उत्तमोत्तम आरोग्य लाभो हेच शुभाशीर्वाद आणि शुभेच्छाही! ््य््््य्््य््््य््य््््य्््य््य््््््य््््य्््य््््य््य््््य्््य्

    ReplyDelete
  4. खूपच प्रेरणादायी!💐💐💐👌👌

    ReplyDelete
  5. खूपच प्रेरणादायी!💐💐💐👌👌

    ReplyDelete
  6. खुपच छान🌹🌹🌹अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.
    प्रथमेश ला त्याच्या भावी आयुष्याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा.
    व आशिर्वाद💐💐💐💐👌👌🎉

    ReplyDelete
  7. खूप छान नेमकं व्यक्तिचित्रण. तुम्ही आणि तुमच्या विस्तीर्ण विस्तारित कुटुंबानं त्याच्यासमोर ठेवलेले अनेक आदर्श त्यानं नेमके
    विनम्र हुशारीने वेचले आहेर...आत्मसात केले आहेत..त्यामुळे तो चांगला माणूस म्हणून तो तयार झाला आहे. तो कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होणारच. त्याला भवी समाधानी समृद्ध आयुष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा..

    ReplyDelete
    Replies
    1. सर, आपणा सर्वांचे अभिनंदन, प्रथमेश बरोबरच आपल्या मार्गदर्शनाखाली विविध व नावीन्यपूर्ण प्रकल्पात शिकत असलेल्या आपल्या असंख्य विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी, पुनश्च अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

      Delete
  8. चिरंजीव प्रथमेश व आईं बाबांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
    भविष्यातील वाटचाल सूकर व उत्तुंग भरारीसाठी प्रार्थना व लाख-लाख शुभेच्छा.

    ReplyDelete
  9. खरच कौतुकास्पद आहे, मनपूर्वक अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा

    ReplyDelete
  10. प्रथमेश व पालकांचे मनापासून अभिनंदन!💐🌹💝👍

    ReplyDelete
  11. अतिशय हृदय मनोगत ,सद्य स्थितीत तरुण मुलांचं पालकत्व निभावणे ही तारेवरची कसरत असते .आपले हे मनोगत अनेक पालकांना दिशादर्शक ठरेल .आपल्या सुजाण पालकत्वा बद्दल आपले व चि .प्रथमेशचे मनःपूर्वक अभिनंदन !!!

    ReplyDelete
  12. अभिनंदन!! प्रथमेश, आदिती वहिनी व गिरीश भाऊजी. प्रथमेश पुढील आयुष्यासाठी तुला शुभेच्छा.

    ReplyDelete
  13. खुपच छान🌹🌹🌹अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.
    प्रथमेश ला त्याच्या भावी आयुष्याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा.
    व आशिर्वाद💐💐💐💐👌👌🎉

    ReplyDelete