Sunday 2 August 2020

मैत्रीचे रक्षासूत्र !

मित्रांनो, आज रक्षाबंधन ! बहीण भावाच्या अतूट व उत्कट प्रेमाची साक्ष देणारा सण ! भावाला दीर्घायुष्य लाभावे, त्याने आपले रक्षण करावे यासाठी बहीण भावाला राखीच्या बंधनात बांधते. हा पौराणिक संदर्भ लक्षात घेतला तरी ज्यांनी आपले रक्षण करावे असे वाटते त्यांनाही रक्षासूत्राने बद्ध केले जाते मग त्या दोन व्यक्ती कोणीही असो. जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवाला, बस ड्रायव्हर, शिक्षक अगदी कोणीही... ज्याच्यामुळे आपले रक्षण होणार आहे त्याला आपण या बंधनात राखीच्या पवित्र धाग्याने बांधतो. अगदी आपण ज्या घरात राहतो त्या घराच्या दरवाजाला, आपण जे वाहन चालवतो त्यालाही...! अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. 

काल आपण मैत्री दिवसही साजरा केला. प्रत्येकाच्या जीवनात अशा काही व्यक्ती असतात ज्यांच्याशी बोलतांना कोणत्याही प्रकारचा किंतु, परंतु वा संदेह नसतो. विषयाचे बंधन नसते. मित्रत्वाचे नाते हे  निखळ मैत्रीचे असले तर तेथे जी सहजता असते ती इतर कोणत्याही नात्यात सहज अनुभवास येत नाही. आपल्या तोंडावर आपल्यातील त्रुटी, दोष, चुका सांगणारा व आपल्या पश्चात आपल्या हिताचाच विचार करणारा मित्र लाभणे हि खरोखर भाग्याची गोष्ट आहे. अलीकडच्या यांत्रिक युगात अशा प्रकारच्या मैत्री निर्माण होणे महत्वाचे ठरते. माणसाच्या जीवनातील आव्हानात्मक प्रसंगात खऱ्या अर्थाने सर्वात जवळ कोण असेल तर तो आपला जिवाभावाचा मित्र ! 

एकूणच सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व अनलॉकच्या काळात मैत्रीच्या धाग्याचे शब्दरूपी रक्षासूत्र बांधण्याचे ठरविले आहे. कोरोना या आजाराने माणसाला माणसापासून दूर नेले हे वास्तव असले तरी याच महामारीने माणसांना अधिक जवळ आणले असे मला वाटते आणि त्यासाठीच हा लेख... गेल्या चार महिन्यात आपण बहुतांश लोकांनी जो अनुभव घेतला असेल तो नकारात्मक अधिक आहे. मात्र त्यामुळे आपण नाउमेद होण्याची अजिबात आवश्यकता नाही. उलट परिस्थिती समजून घेऊन आपल्यात अपेक्षित बदल घडवून आणण्याची नितांत गरज आहे. हाच बदल इतरांपर्यंत संक्रमित करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तीवर, क्षेत्रावर, परिस्थितीवर कोरोनाचा दूरगामी परिणाम झालेला आपल्याला दिसत आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोना पश्चातच्या प्रभावित जीवनाचा अंदाज मांडणारी एक लेखमाला ब्लॉग स्वरुपात लिहिली आणि आज त्यामधील अनेक मुद्दे स्पष्टपणे समोर येतांना दिसत आहे. परस्परांना समजून घेत एक मित्र म्हणून काही रक्षासूत्र आपल्यासमोर मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. 

सूत्र १ - कोणतीही परिस्थिती आली तरी आपण आपली मूल्ये, तत्वे वा विचारधारा यापासून विचलित न होता आपले जीवनक्रमण करणार या पहिल्या सूत्राने आपणास बद्ध करीत आहे. यापूर्वीच्या जीवनात आपण अशी अनेक आव्हाने स्वीकारुन त्यावर मात करुन विजय मिळविला आहे. तो मार्ग यापुढेही आपण अनुसरणार आहोत.

सूत्र २ - "मानवता" हा सर्वश्रेष्ठ धर्म असून त्याद्वारेच आपल्या जीवनाचे सार्थक करणार या दुसऱ्या सूत्राने आपणास बद्ध करीत आहे. अनेक प्रसंगात निर्णय घेतांना भावनिक व व्यावहारिक निर्णयांचे द्वंद्व मनात सुरु राहील. आपला प्राधान्यक्रम निश्चितच व्यवहाराला असला पाहिजे मात्र त्यामुळे कोणाचेही व्यक्तिगत नुकसान आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आवश्यक आहे तो खुला संवाद ! तोच आपल्याला भावनिक व व्यावहारिक यांच्या समन्वयी निर्णयाकडे नेणार आहे. 

सूत्र ३ - आपल्या समस्यांपेक्षा इतरांच्या समस्यांचा प्रथम विचार करेल या तिसऱ्या मुख्य सूत्राने आपण बद्ध आहात. नोकरी करीत असेल तर व्यवसाय क्षेत्रासमोरील व प्रमुखासमोरील आव्हानांचा, संकटांचा, समस्यांचा प्रथम विचार करेल. प्रामाणिकपणा, सचोटी व निष्ठा दाखविण्याची आपल्याला हि संधी आहे असाच आपण विचार केला पाहिजे. त्यासाठी आर्थिक पातळीवर चार पाऊले मागे जाण्याची स्वतःहून तयारी दाखविली पाहिजे. प्रमुख वा मालक असेल तर सहकाऱ्याच्या गत काळातील समर्पणाचा, वचनबद्धतेचा प्रथम विचार करेल. व्यवसायाची सद्यस्थिती त्याला मोकळेपणाने सांगून आपण परस्पर सहकार्याने यावर एकनिष्ठेने मात करु, त्यासाठी लागणारी पराकोटीची शर्थ लढण्याची आपली तयारी आहे त्यासाठीचे विविध समर्थ व आश्वासक मार्ग त्याला सांगा. वैयक्तिक स्वार्थाच्या चार गोष्टीला बाजूला ठेवून त्याच्यासाठी दोन पाऊले पुढे जाण्याची तयारी ठेवा. 

सूत्र ४ - नैसर्गिक जीवनशैलीचा अंगीकार करुन निसर्गदत्त देणगीच्या चौथ्या बंधनात आपणास बांधत आहे. जगण्यासाठी गरजेइतके निर्माण करण्याची क्षमता आपल्यात निसर्गतः आहे. लोभ, लालसा वा हाव यामुळे गरजेचा बिघडलेला समतोल पुनर्स्थापित करण्याची आवश्यकता आहे. कर्तृत्वाने गरजेपेक्षा अधिक निर्माण करण्याची क्षमता ठेवत असतांना त्यातील अधिकचे इतरांना सहज देण्याचे औदार्य ठेवू या. येणारे उत्पन्न शून्य झाले तर जगायचे कसे याचा विचार केला तर गरजेचे उत्तर मिळेल आणि ते कमविणे हे कोणासाठीही अवघड नाही. थोडक्यात समाधानी वृत्ती बाळगण्याचे आवाहन करणारे हे सूत्र आहे. 

सूत्र ५ - मिळेल ते व पडेल ते काम करण्याच्या पाचव्या सूत्राने जगण्याची लढाई जिंकण्याचे सामर्थ्य संपादित करु या ! स्वतःबद्दलच्या अवास्तव, खुळ्या व भंपक कल्पनांना तिलांजली देऊन जीवनाचे वास्तव स्वीकारा. तेच तुम्हाला जगण्याचे हजारो मार्ग दाखवतील. आपल्या आजूबाजूला पाहिले तरी त्यातील अनेक मार्ग आपल्याला दिसतील मात्र तेथे अडचण असेल ती स्वप्रतिमेची ! या सूत्राने ती अडचण संपून जाईल व पडेल ते काम माझेच आहे हा विश्वास अनेक संधी आपल्याकडे घेऊन येईल. या संधीच जिंकण्याचे सामर्थ्य बहाल करतील. 

सूत्र ६ - जीवनात सर्व गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही, हे वास्तव स्वीकारण्याचे सूत्र जीवनातील नैराश्य, उदासीनता, हतबलता दूर केल्याशिवाय राहणार नाही. कायम काही ना काही अपेक्षांनी जगणारा माणूस अपेक्षाभंगाच्या दुःखाने अनेकदा नाउमेद होतो. तेथेच वैफल्याचा जन्म होतो. चहूबाजूंनी घडणाऱ्या अपेक्षाभंगाच्या घटनांनी वैफल्यग्रस्त होतो. तात्कालिक मलमपट्टीने ते दुरुस्त होतंच नाही आणि जीवनातील आनंद संपून जाण्याचा धोका निर्माण होतो. यासाठीच " मा फलेषु कदाचन !" सांगितले आहे. 
 
सूत्र ७ - संवेदनशीलता, कार्यप्रवणता व सकारात्मक वैचारिक दृष्टिकोनाचे सूत्र जीवनाची कृतार्थता बहाल करेल. परिस्थितीचे गांभीर्य, ते बदलण्याची दृष्टी व आवश्यक कृतिशीलता वरील सर्व सूत्रांची महत्ता अधोरेखित करेल असा मला विश्वास आहे. निर्माण झालेल्या परिस्थितीने आपल्याला दिलेली हि सूत्रे, त्यांची शाश्वतता पटवून देईल. त्यातच जीवनातील आनंद व समाधान आहे.  तेच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. 

सूत्र ८ - आपल्यातील मैत्रीचे हे अंतिम रक्षासूत्र सृजनशील, नाविन्यपूर्ण संवादासाठी बांधत आहे. या संवादात समज असेल, प्रगल्भता असेल, हेतूची शुद्धता असेल. परस्पर सहकार्य असेल. हि सर्व रक्षासूत्रे आपले सर्वार्थाने संरक्षण करेल. प्राप्त परिस्थिती हेच खरे मैत्रीचे रक्षाबंधन ! 

गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४ 

4 comments:

  1. खूप सुंदर संकल्पना.... खूप छान लेख

    ReplyDelete
  2. गिरीष सर, मला एक शंका विचाराविशी वाटते...
    मूल्ये शाश्वत असतात का?

    ReplyDelete
  3. आपली सूत्र बंधन समाज घडणी साठी अनुकरणीय आहेत.

    ReplyDelete
  4. छान कल्पना .
    सुंदर लेख .

    विजय कुळकर्णी .
    👍👍

    ReplyDelete