Wednesday 26 August 2020

श्रीमंतीचा अनुभव देणाऱ्या मित्रांप्रतीची कृतज्ञता !

लंगोटी यार 

आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० अंतर्गत "कृतज्ञता उत्सवात" सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत एकाच गोष्टीकडे आपण किती वेगवेगळ्या पद्धतीने, अर्थाने  पाहू शकतो याची जाणीव करुन देणारी आहे. प्रत्येक बाबतीत भरभरुन लिहायचे असते असे लक्षात येते. आपल्याला त्या नात्यातलं वेगळपण टिपण्यासाठी ओळींची मर्यादा घातली आहे. हा कृतज्ञता उत्सव रुजतो आहे. मंडळी लिहिते होत आहे आणि वैविध्यता गावते आहे, तीच या उपक्रमाची उपलब्धता. मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना सर्वात जास्त विशेषणे व आदर्श उदाहरणाचे संदर्भ मिळाले. जीवनातील मित्रांचे महत्व अधोरेखित करणारे सर्वांचे अनुभव होते. या सर्वांमध्ये जीवन समृद्ध आणि आयुष्याची श्रीमंती मला दिसली. अगदी मोजकेच वा भरपूर मित्र असले तरी त्यामुळे मिळणारी श्रीमंती मात्र सारखीच ! मंडळींनी व्यक्त केलेल्या भावना माझ्या मित्रांच्या नात्यातून मांडणार आहे. 

लहानपणी अधिक वेळ सोबत असणारा एव्हढा एकमेव निकष असतो. पुढे जाऊन हि मैत्री विचारांनी होते, सामान धाग्यांनी होते. वयाचा, विचारांचा, सोबतीचा कोणताही असो,  तो मित्र अशी एक भावना तयार होते. माणूस प्रगल्भ होत जातो आणि या सर्व गोष्टी पलीकडे जाऊन मैत्री अनुभवता येते. मग कौटुंबिक नात्यांमध्येही आपल्याला मैत्री सापडते. समाज माध्यमाच्या युगात तर एकमेकांना न पाहिलेले मित्र अनुभवतात. त्याला जोड असते निर्व्याज व निरपेक्षपणाची... मला खूप मित्र आहे आणि त्यात वादच होत आहे. या सर्वांबद्दल लिहायला मला आवडते. सहजतेतून आणि स्वभावातून झालेली हि मैत्री कायम हृदयात घर करते याचा आपल्या सर्वांप्रमाणे माझाही अनुभव आहे. त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

माझा लहानपणापासूनचा मित्र म्हणजे प्रशांत मोराणकर ! हि मैत्री अशी आहे कि, कट्टी ने अबोला असला तरी मैत्री कायम होती. म्हणजे एखाद्या गोष्टीवरुन बिनसले असले तरी आम्ही सायकलवरच सोबत जाणार मात्र एकमेकांशी न बोलता कारण कट्टी आहे नं ! मग परत बोलायला कसे लागायचो ते आठवत नाही. पावसाळ्याच्या दिवसात ढग भरुन आले वातावरण मस्त असले आणि दोघांनी ठरवले कि आम्ही सायकलवरुन रोकडोबा हनुमान, नकाणे तलाव, डेडरगाव अशा ठिकाणी जायचो. डेडरगावला त्यांची शेती आहे.  तेथेच मुक्काम आणि मग दुसऱ्या दिवशी घरी. अनेकदा धुळ्याच्या गणपती रोडवरील पुलावर उशिरापर्यंत म्हणजे मध्यरात्रीपर्यंत गप्पा मारत असू. दिवसातला बहुतांश वेळ सोबतच. अनेकदा जेवण त्याच्याच घरी. खेळ, उत्सव, कार्यक्रम सर्व सोबतीने. हा आमचा मित्र लग्न झाल्यानंतर फिरायला गेला नाही. तीन वर्षानंतर आमचा एक मित्र चंद्रशेखर जोशी व माझे लग्न झाल्यानंतर आम्ही तिघे सोबत फिरायला गेलो अशी हि मैत्री जी आजही अबाधित आहे. आमच्या या मैत्रीत टेलीपथीचा (इंद्रियांच्या साहाय्यावाचून एकाच्या मनातील विचार त्याचवेळी दूरवर असलेल्या दुसर्‍या व्यक्तीच्याही मनात उमटणे) अनेकदा आम्ही अनुभव घेतो. 

धुळ्यात खूप सारे मित्र होते. प्राथमिक, माध्यमिक शाळेतील, महाविद्यालयातील, गल्लीतील असे सर्व. आम्ही महाविद्यालयात असतांना आमच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित होती ३० ! त्यामुळे या सर्वांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे भावबंध होते यात मैत्रिणीसुद्धा होत्या. सविता बागल हि त्यातील एक. सोबत शिकलो आणि सोबत ४ वर्षे कामही केले. नाटकं, खेळ, गॅदरिंग, सहली, अभ्यास अतिशय समृद्ध करणारा हा मित्रांचा गोतावळा. यासर्वांशी आजही संपर्क आहे. काय योगायोग असतो पहा, आजच्या दिवशीच सकाळी एक दुःखद घटना कानी पडली. आमचा एक मित्र आम्हास सोडून गेला. नरेंद्र कुळकर्णी ! फार लवकर एक्झिट झाली. दिवसभर अस्वस्थ होतो. आठवणी होत्या. एका मित्राने फोन करुन तो अक्षरश: फोनवरती रडला कारण अनपेक्षित व अनाकलनीय जाणे. आमचा महाविद्यालयीन जीवनापासूनचा मित्र नरेंद्र ऊर्फ जया ऊर्फ गुंड्याभाऊ ऊर्फ एनव्हीके सर आज आम्हाला सोडून गेला आणि सर्व कसं कालच घडलं असं आठवलं. खरं तर मी आणि प्रशांत यांनी त्याला भेटीला जायचं ठरवलं होत. लॉक डाऊनमुळे राहून गेलं... भेट होणे नाही हे वास्तव स्वीकारणे तसे जडच... ११ वीपासून आम्ही धुळ्याच्या जयहिंद महाविद्यालयात शिक्षणामुळे संपर्कात आलो. पुढे कॉलेज, अभ्यास आणि काही काळ सोबत नोकरीच्या निमित्ताने मैत्रीचे नाते वृद्धिंगत होत गेले. याचे आईवडील दोन्हीही शिक्षक होते. आम्ही एकत्रित अभ्यास करत असू तो नरेंद्रकडे ! दररोज संध्याकाळी सर्वजण नरेंद्रकडे एकत्र जमणार गप्पाटप्पा तेथून पुढे काय करायचे ते... मग जेवण करायला म्हणा किंवा अन्य काहीही. आजही आम्ही कधीतरी एकटे तर कधी कुटुंबियांसह फिरायला जातो. नरेंद्रच्या घरी रंगपंचमी साजरी करीत असू.  आमच्या मित्राच्या कुटुंबाशीही अतिशय सर्वांचेच जिव्हाळ्याचे संबंध होते. मुल-मुली रात्री उशिरापर्यंत नाटकांची प्रॅक्टिस करत असू सोबत. अनेकदा व्हीसीआर भाड्याने आणून चित्रपट सोबत पाहिलेत. सुवर्णकाळच तो ! असो 

नोकरीच्या निमित्ताने जळगावात आलो आणि येथेही अनेक मित्र झालेत. त्यांचे नियमित एकत्रीकरण होतात. कधी भिशीचे निमित्त तर कधी अथर्वशीर्ष आवर्तनाचे. नितीन चौधरी हा कार्यालयातील सर्वात जवळचा मित्र. सामाजिक कामात असल्याने अनेक मित्र. धागा एक परस्पर प्रेमाचा. व्यावसायिक जीवनात वेगळी वाट निवडल्यावर मला अनेक मित्र जोडता आले. संस्थेची उभारणी करत असतांना अनेकदा आपल्याला विचारांचे आदानप्रदान करण्याची गरज असते प्रदीप रस्से, चंद्रशेखर संत, शेखर नांदेडकर, बाळासाहेब पाटील कितीतरी नावे सांगता येतील. क्रिएटिव्ह ग्रुप हि संस्थाच वेगवेगळ्या क्षेत्रात  काम करणारे मात्र समविचारी व समवयस्क मित्रांनी एकत्र येऊन सुरु केलेली संस्था. विद्यार्थी परिषदेचे काम करीत असल्याने तेथेही अनेक मित्र मिळाले. माध्यम जगतानेही अनेक मित्र दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातूनही अनेक मैत्र जोडले गेले. विचारांपलीकडची व वयापलीकडच्या मैत्रीचा समृद्ध काळ सध्या अनुभवत आहे. अंतिम टप्प्यात नियमित संपर्कात असलेल्या मित्रांविषयी...

मैत्र जीवांचे... एका कार्यक्रमानंतर...


अनिल जोशी, दिलीप तिवारी, सुशील नवाल, सुनील याज्ञीक या चार मित्रांशी व त्यांच्या परिवाराशी नियमित संपर्क, संवाद असतो. अनेक गोष्टींवर चर्चा होते. प्रत्येकाचे विचार स्पष्ट आणि ते बोलण्यात येणार विरोधी असले तरी मागे भावना योग्य सल्ला आणि मित्राचं भले अन्य काहीही नाही. अनेकदा पलीकडे जाऊन काळजी घेणारी हि मैत्री. अनेक मित्रांचा उल्लेख मी टाळला आहे. कारण इतरांची मला नाराजी ओढून घ्यावयाची नाही. ज्यांचा उल्लेख केला आहे त्यांची जिवलगता सर्व जगाला माहिती आहे. माणसाने जीवनात उभे राहावे यासाठीची एकमेव अपरिहार्यता म्हणजे मित्र ! मैत्रीचा हा वसा आणि वारसा पुढील पिढीत संक्रमित होत आहे याचा विशेष आनंद आहे. त्यासाठीच हि मित्रांप्रतीची कृतज्ञता ... वसुधैव कुटुंबकमची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या विस्तारित कुटुंबाचा मैत्रीचा हा धागा अधिकाधिक विस्तारित जावो... हिच बा गणरायाचरणी प्रार्थना ! गणपती बाप्पा मोरया ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

5 comments:

  1. अशा आदर्शवत मैत्रीला मनःपूर्वक सलाम !!!
    'कुछ भी नही रहता दुनियामें लोगो रह जाती हैं दोस्ती,जिंदगी की नाम दोस्ती दोस्ती की नाम जिंदगी।'

    ReplyDelete
  2. तुमच्या मैत्रीला सलाम

    ReplyDelete
  3. मैत्री म्हणजे श्वास आणि श्वास म्हणजे मैञी....

    ReplyDelete
  4. गिरीषजी,
    खरंय, ओळींची मर्यादा हा आता अडथळा वाटायला लागलाय. तुम्ही छान व्यक्त झालात मैत्र मांडताना. कितीही ठरवलं तरी काही नांव टाळताच येत नाही हा अनुभव मलाही येतोय. तुम्ही खूप व्यापक स्तरावर विचार करणात हेच यातून स्पष्ट होते. मित्र हा एकाच आईच्या पोटी जन्माला न आलेला बंधूच असतो.

    ReplyDelete
  5. कृतज्ञतेतून उतराई होण्याची संधी ...

    माझे मित्र गिरीशराव कुळकर्णी अत्यंत कल्पक आणि धडपड्या माणूस. विविध विषयांवर लिहू व बोलू शकणारा मित्र. कधी वाटते हा माणूस शिक्षक हवा होता. कधी वाटते समुपदेशक हवा होता. मानसोपचार तज्ज्ञही झाला असता. विविध कौशल्ये शिकवणारा प्रशिक्षकही झाला असता. एक मात्र चांगले झाले, क्लासेस चालवणाऱ्या अपवादात्मक लोकांसारखी दुकानदारी गिरीशरावांनी केली नाही. आशा फौंडेशनचा व्याप विस्तारला. लोकसहभाग, प्रायोजकत्त्व घेऊन तर कधी सशुल्क असे अनेक लोकपयोगी प्रकल्प आशा फौंडेशनने दिले. गिरीशराव सतत मेंदूला चालना देणारे आणि इतरांना कामाला लावणारे प्रयोग शोधत असतात. यावर्षी गणेशोत्सवापूर्वी कृतज्ञता हा विषय घेऊन अनेकांना लेखनास प्रवृत्त करण्याचा यशस्वी प्रकल्प गिरीशरावांनी पूर्ण केला.

    मी सहसा भारंभार लेखन करीत नाही. गिरीशरावांनी जेव्हा कृतज्ञता उत्सवात लेखन करा असे सांगितले तेव्हा मी फार तर सुरुवातीच्या २ विषयांवर लिहितो असे म्हणालो. पण जेव्हा विषय निहाय लेखनाचा विचार केला तर मला जाणवले, अनेकांच्या विषयी लिहून कृतज्ञता व्यक्त करायची ही अनोखी संधी आहे. पालक, शिक्षक, मित्र, गाव, आदर्श, निसर्ग हे विषय जुन्या आठवणींना समोर आणणारे होतेच पण अनेकांच्या चांगुलपणाचे संदर्भ मांडण्याची सुसंधी होती. मी ती संधी पूरेपूर घेतली. सुदैवाने माझी स्मरणशक्ती अद्याप दगा देत नाही. विषयावर लेखन करताना आठवणींच्या कड्या एकात एक अडकत गेल्या. तेव्हा गिरीशरावांनी घातलेली शब्द मर्यादा बाजूला सारली. विषयाच्या जवळपासचे सर्वच संदर्भ व संबंध लिहून काढले.

    या लेखनाचा व्यक्तिगत लाभ हा झाला की, आपल्याला किती आठवते हे लक्षात आले. जुन्या काळातील अनेक घटना घडामोडींचे अर्थ नव्याने लावता आले. अनेकांच्या व्यक्तिमत्वांमधला चांगुलपणा शोधता आला. केवळ एका लेखापुरता नव्हे तर अनेकांची व्यक्तिचित्रे रेखाटू शकतो हे लक्षात आले. गिरीशरावांनी 'कृतज्ञता उत्सव' या अंक स्वरुपात केलेल्या मांडणीमुळे एकत्रित मजकूर फेसबुकवर शेअर करू शकलो. फेसबुकवर पीडीएफ फाईल कशी शेअर करता येईल ? हे अवघ्या ६ तासात शिकलो. सौ. सरोज हिचे प्रशिक्षणाचे वेबसेमिनार सुरू असतात. त्यातील एक प्रशिक्षक माहिती देत होता. ती ऐकून 'कृतज्ञता अंक' पुस्तक रुपात फेसबुकवर शेअर केला. हे आणखी आनंददायी ठरले.

    कृतज्ञता उत्सवाचे लेखही शेअर केले. त्यावर मित्र मंडळी व गावातील अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. बहुतेकांच्या जुन्या आठवणी चाळवल्या. दोघा तिघांनी आठवणीत भर घातली. गिरीशरावांचा हा प्रकल्प माझ्यासाठी केवळ एक लेख थातूर मातूर काही तरी लिहिण्यापुरता नव्हता. अनेकांच्या आठवणींना जोडणारा तो बुस्टर डोस होता. माझ्यासाठी रिफ्रेशर डोस होता. म्हणून १० च्या १० विषयांवर लेखन केले. अनेकांचे उल्लेख करताना कृतज्ञतेतून उतराई होण्याचे मानसिक समाधान मिळले. गिरीशराव यांच्या कृतज्ञता प्रकल्पाचे फलित यातच आहे.

    गिरीशराव या प्रकल्पात मला सहभागी केले त्याबद्दल धन्यवाद ...

    दिलीप तिवारी, जळगाव
    9552585088

    ReplyDelete