Sunday 16 August 2020

देश आणि आपण स्वतंत्र झालोत पण आत्मनिर्भर व स्वावलंबी कधी ?


भारताचा ७४ वा स्वातंत्र्य दिन आपण काल साजरा केला. अनेक वर्षांच्या आक्रमकांच्या जुलमी राजवटीतून व परकीयांच्या गुलामगिरीतून देश स्वतंत्र झाला. त्यासाठी देशातील अनेक थोर विभूतींनी   आपल्या जीवनाची आहुती दिली. यातील देशभक्त, क्रांतिकारक व स्वातंत्र्यवीरांची गणना करणे केवळ अशक्य ! त्यानंतरही अनेक सैनिकांनी, पोलिसांनी, शिक्षकांनी, डॉक्टरांनी, समाजसुधारकांनी, आपल्या पूर्वजांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी आपले आयुष्य / जीवन वेचले. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा आजचा हा दिवस... अतिशय अभिमानाचा, आनंदाचा , उत्साहाचा आणि कृतिशील संकल्पाचाही ! २६ जानेवारी १९५० ला देशाने आपली स्वतंत्र राज्यघटना स्वीकारली आणि देश सार्वभौम / प्रजासत्ताक राष्ट्र बनले अर्थात स्वतंत्र देशाला व देशातील नागरिकांना घटनेच्या चौकटीचे बंधन आले. अशा पद्धतीने परम पवित्र भारत माता व भारतीय नागरिक स्वतंत्र झालेत. 

देश स्वतंत्र झाला याचा अर्थच देशातील जनता स्वतंत्र झाली. खरंय ते... पण देश स्वतंत्र झाला म्हणजे आत्मनिर्भर झाला का ? आपण व्यक्तिगत पातळीवर खरोखर स्वतंत्र झालो पण स्वावलंबी झालोत का ? असा प्रश्न मला वारंवार भेडसावतोय आणि त्यासाठीच हा लेख ! आपण जीवनात स्वतंत्रपणे आचार, विचार आणि कृती करतो का ? आपली मानसिकता स्वतंत्रपणे विचार करणारी आहे का ? का आपण कोणावर तरी अवलंबून आहोत ? कोरोनाच्या या काळात अशा प्रकारचा विचार करण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि वेळही... लॉक डाऊनमध्ये आपण बऱ्यापैकी स्वावलंबी व्हायला शिकलो अर्थात स्वतंत्र व्हायला सुरवात केली आहे. मला व्यक्तिगत पातळीवर जे स्वातंत्र्य अपेक्षित आहे त्याकडे वळतो.  

आपण सकाळी जाग आल्यावर उठतो का ? कि आपल्याला कोणी तरी उठवावे लागते ? उठल्यावर आपण आपल्या अंथरुण व पांघरुणाची घडी घालतो का ? सकाळी आपले आन्हिक आटोपल्यावर किमान आपले अंतर्वस्त्र आपण धुतो का ? जेवण झाल्यावर किमान आपले ताट वाटी उचलून ठेवतो का ? समृद्ध जीवनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी महत्वाच्या आहेतच पण आपण पूर्णतः त्यावरच निर्भर राहतोय का ? मग ते वाहन असो, तंत्रज्ञान असो, मशीन असो, माध्यम असो वा काहीही... आपण त्यांचे तर गुलाम झालो नाहीत ना ? आपण आपल्या सवयीचे, परिस्थितीचे गुलाम तर झालो नाहीत ना ? म्हणजे आपण आपल्या आनंदासाठीही कोणावर तरी अवलंबून आहोत. मग तो टीव्ही असो, इंटरनेट असो वा मोबाईल ! 

थोडा चाकोरीबाहेर जाऊन विचार करतो का ? तात्कालिक परिस्थितीत निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या आपण किती लवकर अधीन होतो आणि काही काळात त्याचे गुलामही ! उत्पादक व ग्राहक यांच्यातील दुवा सांधणारी यंत्रणा तात्कालिक परिस्थितीत स्वीकारण्यात आली आणि आज आपण तिचे गुलाम झाल्यासारखेच वागतो आहोत. त्या गोष्टीकडे स्वतंत्रपणाने पाहण्याची आमची तयारी नाही. तसे कोणी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर आपल्याला तो परग्रहावरील वाटायला लागतो इतके आपण गुलाम झालो आहोत. बघा पटतंय का ? अलीकडच्या काळात लोकं विचार करायला लागलीत असे प्रकर्षाने जाणवतंय आणि ते चांगलेही आहे. मात्र विचार आतून येतोय का ? प्रतिभेतून ? अनुभवातून ? विवेकी ? पूर्वग्रह विरहित ? आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींना नानाविध पर्याय उपलब्ध असतांना आपण केवळ सवयीमुळे वा अंगवळणी पडल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करतो ? 

आपला देश स्वतंत्र आहेच पण आत्मनिर्भर आहे का ? किती गोष्टींसाठी आपण इतरांवर अवलंबून आहोत. आत्मनिर्भर होण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता आपण निर्माण करतोय का ? त्यासाठी आवश्यक असलेले पूरक वातावरण, परिस्थिती, शिक्षण, संशोधन  होतेय का ? अशा प्रकारच्या प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती वा संस्था यांना प्रोत्साहित करण्यासाठी काही विशेष प्रयत्न होतांना दिसताय का ? समाजाची आत्मकेंद्रित भोगवादी वृत्ती, हव्यास, भौतिकता यामुळे तर देशाला आत्मनिर्भर होण्यासाठी बाधा येत नसेल ना ? स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मनात आलेले विचार आपल्या समोर मांडलेत. यापुढील भागात वैयक्तिक पातळीवर आपण काय करु शकतो याचा विचार करणार आहोत. भारतीयांनी स्वावलंबी व्हावे व देशाने आत्मनिर्भर यासाठीच... आपणास काय वाटते ? जरुर व्यक्त व्हा ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४

 

2 comments:

  1. समता, सय्यम,ह्या बाबी आत्म निर्भर व्हायला आवश्यक आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. शिरीष जी, खरंय... आपण जरा सविस्तर या विषयावर लिहावे हि विनंती !

      Delete