Saturday 29 August 2020

कृतज्ञता शेजाऱ्यांविषयीची !

कन्येच्या वाढदिवसाला शेजारची मंडळी...


आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० " कृतज्ञता उत्सव " अंतर्गत सातव्या दिवशी आपण आपल्या जीवनात सर्वात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या आपल्या शेजाऱ्यांविषयी व्यक्त करीत आहोत. आज व्यक्त झालेल्या मनोगतांमध्ये प्रत्येकाने आपल्या घराशेजारी राहणाऱ्या शेजारांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य केले तेथील शेजाऱ्यांची आठवण सांगितली आहे. अनेकांनी आपल्या सर्वात जवळचे नातेवाईक असा उल्लेख केला आहे. परस्परांवरील विश्वास, एकमेकांना केलेली मदत, कार्यक्रमांमधला सहभाग या सर्वांबद्दलची कृतज्ञता ! चाळ वा वाडा संस्कृतीपासून अलीकडच्या फ्लॅट संस्कृतीतील शेजारी या सर्वांचा उल्लेख यात आलेला आहे. हा उल्लेख करीत असतांना काळानुरुप अनुभवलेला बदल प्रत्येकाने अधोरेखित केला आहे. अपवादात्मक स्थितीत नकारात्मकतेची झालरही दिसून येते. निमित्ताने आमच्या शेजाऱ्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. 

रुढ अर्थाने "शेजारी" म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला राहणारी मंडळी असली तरी आपले जेथे जेथ अस्तित्व असते आणि तेथे आपल्या आजूबाजूला जो असतो तो शेजारी ! म्हणजे शाळेत आपला बेंच पार्टनर, कार्यालयात आपल्या सोबत व शेजारी बसणारा सहकारी, कुठेतरी प्रवासाला निघाल्या नंतर आपला सहप्रवासी, एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या बाजूला बसलेला शेजारी, अगदी पंगतीत जेवायला बसल्या नंतर आपल्या बाजूला बसलेला शेजारी, चित्रपटगृहात आपल्या बाजूला बसलेला शेजारी हि यादी आपल्याला आणखी मोठी करता येईल. माझा उद्देश या सर्व शेजाऱ्यांची भूमिका बहुतांश वेळेस लाभदायक ठरलेली असते आणि ती लक्षातही राहते त्यामुळेच आजपर्यंत जीवनात ज्यांनी शेजाऱ्याची भूमिका पार पाडली त्या सर्व शेजाऱ्यांविषयीची हि कृतज्ञता ! काही आठवतील काही नाही पण... काही अनुभव चांगले असतील वा काही अनपेक्षितपण... अशा सर्व ! 

लहान असतांना आम्ही धुळ्याच्या पंचवटी भागात चाळीसारख्या ठिकाणी राहायचो अर्थात इतरांप्रमाणे माझेही ते एक विस्तारित कुटुंबच होते. येथे कुणीही कोणाच्या घरात सहज जाऊ शकायचे, ज्येष्ठ मंडळी कोणाला रागावू शकत होते प्रसंगी एखादा धपाटाही देऊ शकत होते. एकमेकांकडे जेवण तर सामान्य गोष्ट होती. या सर्वांमुळे आजच्यासारखी कोणाचीही प्रायव्हसी डिस्टर्ब् होत नसे. आमचे शुक्ल/कुळकर्णी म्हणून शेजारी होते. तसे चार घर सोडून राहणारे चंद्रात्रे व पाठकही शेजारीच होते. यातूनच मानलेले भाऊ, बहीण, मामा, काका, मावशी असे नाते दृढ होत गेले जे आजही तसेच आहे.  मी जवळपास ७ वर्षांचा होईपर्यंत शेजारच्या कुळकर्ण्यांकडे जेवणखाण करीत असे. आईला कुठेही बाहेर जायचे असल्यास ती आम्हा मुलांना शेजारच्यांवर सोपवून जात असे. घर उघडेच असे. एकमेकांच्या मदतीला, कार्याला सर्वजण आपल्या घरचा कार्यक्रम समजून काम करीत असत. 

नंतर आम्ही काही काल नेहरुनगरमध्ये व त्यानंतर आमच्या स्वतःच्या वास्तूत राहायला गेलो. येथेही आम्हाला खूप शेजारी मिळाले. त्यातील अमृत देशपांडे हे आमच्या वडिलांचे जिगरी दोस्त होते. नवरात्रात सोबत एकविरा देवीला जायचे. रोज संध्याकाळी आमच्या घरी यायचे आणि दोन दोन तास अंगणात आराम खुर्ची टाकून बसत असत. वडील गेल्यानंतरही त्यांनी त्याचा हा शिरस्ता कधीही सोडला नाही. त्यांची पत्नी म्हणजे आमच्या देशपांडे काकू ह्या आईच्या मोठ्या जाऊबाईच होत्या. त्या काही वेळेस  आईला अगदी हक्काने रागवायच्याही आणि त्यात कोणी बोलण्याचे कारण नसे. आजही या परिवाराशी आमचे ऋणानुबंध आहे. इतरही अनेक शेजारी होते. हरतालिका, गणेशोत्सव, संक्रांत, होळी, रंगपंचमी  आदी कार्यक्रम सर्वजण एकत्रित साजरे करीत असू. मला आठवते कोजागिरी पौर्णिमेला आम्ही सर्व मुले एकमेकांच्या घरी जात असू आणि तेथे ज्येष्ठ अपत्य पूजन अर्थात औक्षणाचा कार्यक्रम होत असे. सुट्टयांमध्ये तर धमाल असायची. खेळ, गमतीजमती, भांडणे हे होत असे तेव्हढ्यापुरतेच.


नोकरीच्या निमित्ताने जळगावला आलो. प्रथम नांदेडकर वाड्यात राहत असू.येथे शिवाजी पाटील, विजय लोढा, नंदलाल काबरा, हेमंत अलोने, किरण काळे, येवले, कुळकर्णी परिवार असे अनेकजण लाभले. येथेही आम्ही अनेक गोष्टी एकत्र करीत असू. स्वतः नांदेडकर परिवार सर्वांना घेऊन चालणार होता. या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील भाडेकरु स्वतःच्या घरातच राहायला गेले. सध्या आदर्श नगरमध्ये राहत असतांना अजय गुरव, सुहास कोल्हे, ऍड. हेमंत मेंडकी, अनिल चौधरी, लखोटिया ऑंटी, हेमंत पाटील.  प्रा. मोहरीर, जहागीरदार, विजयकुमार कोसोदे आदी राहतात. या सर्वांशी अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. मी अनेक वेळा बाहेरगावी असल्याने या सर्व शेजाऱ्यांचा नक्कीच आम्हाला आधार वाटतो. असे हे सर्व शेजारी म्हणजे आमचे विस्तारित कुटुंबच ! परिवाराच्या सुखदुःखात समरस होणारा शेजार मिळणे हि महत्वाची गोष्ट आहे आणि त्याबाबतीत आम्ही खरोखर भाग्यवान आहोत. जीवनाच्या वाटचालीत शेजाऱ्यांचे स्थान महत्वपूर्ण आहे. परस्पर सहकार्य व सौहार्दाचा हा वसा आणि वारसा पुढील पिढीकडे संक्रमित करणे हि आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे. या सर्व कायम व तात्कालिक शेजाऱ्यांच्या प्रेमाबद्दल, सहकार्याबद्दल जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त करतांना आनंद व समाधान होत आहे. परस्पर सहकार्याची हि शृंखला अखंडपणे विस्तारित होत राहो व भारतीय संस्कृतीचा मूलाधार असलेली कुटूंब व्यवस्था अधिकाधिक बळकट होत राहो... हिच त्या बा  गणरायाचरणी मनापासून प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

5 comments:

  1. गिरीषजी....
    आपण आपल्या लेखनात विचारांचा परीघ विस्तारत नेतात.
    एखादा विषय मर्यादीत न ठेवता त्याच्या संभावनांचे विविध पदर उलगडतात.
    शेजार म्हणजे फक्त घरांपुरताच मर्यादीत रहात नाही तर बेंचवर बसणारा, एसटी-रेल्वेत काही भेटलेला, थिएटर-नाटकात काही तास बसलेलाही शेजारीच असतो की ! यांनी दिलेला अनुभव, आनंद हा ही संस्मरणीयच असतो. छान व्यक्त झालात.

    ReplyDelete
  2. धन्यवाद. खूप छान लिहीले आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

    ReplyDelete
  3. धन्यवाद. खूप छान लिहीले आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

    ReplyDelete
  4. धन्यवाद. खूप छान लिहीले आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

    ReplyDelete
  5. धन्यवाद, खुपचं छान लिहिले आहे. शेजारधर्म दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे. तरच आठवणी ह्या चिरकालीन राहतात.

    ReplyDelete