Tuesday 18 August 2020

पोळा : मना मनातला...!


कर्माने नसलो तरी जन्माने शेतकरी आहे... हाडाचा असलो तरी सध्या बांधावरचा शेतकरी आहे... त्यामुळे शेती, शेतकरी, सालदार, शेतमजूर, गाई-म्हशी, गुरे-ढोरे, बैलजोडी, बैलगाडी, नांगर, वखर, पास, पांभर, दुस्सर, मुक्षे , रुम्हणे, उडीद, मूग, कपाशी, ज्वारी, मका, केळी, गहू, पयखाटी, तुरखाटी, टोचणी, निंदणी, सरा, कापणी, काढणी, मळणी, सरकी, ढेप, दान या सर्व गोष्टी विशेष आवडीच्या ! लहानपणी दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे राहिलेलो असल्याने आणि सर्व कामे मनापासून व आनंदाने केल्याने या सर्वांबद्दल विशेष प्रेम वाटते. निसर्ग आणि परमेश्वराचे नाते तेथेच उमगले. गाव, गावातील माणसे, त्यांचे ऋणानुबंध, चालीरीती, अहिराणीतील खास संवाद, नातेसंबंध, माणुसकी यामुळं गावाचे आजही आकर्षण वाटते. गोठा, जनावरे, चारा, शेण, सडा सारवण या गोष्टींची कधी किळस वाटली नाही. व्यायलेल्या म्हशीला पाणी पाजायला नेणे, तिला धुणे, चारा घालणे या गोष्टी आपलेपणाने करीत असे. चोपडा तालुक्यातील धानोरा हे आमचे गाव ! आज पुन्हा एकदा हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आजचा खास दिवस बैलपोळ्याचा ! यावर्षी गावाकडे जाता आले नाही याची खंत आहे मात्र मनातला पोळा आजही जिवंत आहे.   


दिनेश चव्हाण यांनी जलरंगात साकारलेली दोनही चित्रे
गेल्या पाच महिन्याचा कालखंड आठवला कि वरील सर्व गोष्टींबद्दल आपण किती कृतज्ञ असावे हे लक्षात येते. तंत्रज्ञानाने कितीही विकास केला तरी माणसाला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्नधान्य पिकविणारा तो शेतकरी आणि त्याचे सर्व सोबती यांचे महत्व अधोरेखित होते. कृषिप्रधान असलेल्या भारत देशात सर्वात जास्त वाताहत झालेला, दुर्लक्षित असलेला व उपेक्षित घटक म्हणजे शेती, शेतकरी, शेतीमाल  आणि जनावरे ! माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी जागतिक महासत्ता होण्यासाठी शेती या विषयाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आवाहन करुनही आज त्याची अवस्था फारशी चांगली नाही. तरीही परिस्थितीशी दोन हात करीत त्याचे लढणे अव्याहतपणे सुरु आहे. त्याच्या करिता ना वेतन आयोग ना त्याच्या मालाला हमी भाव ! कॉर्पोरेट जगतात प्रोजेक्ट कॉस्ट ठरविताना त्यावर खर्च केलेला मिनिटांचा हिशेब मांडणारा माणूस मात्र प्रामाणिकपणे अंगमेहनतीचे, कष्टाची परिसीमा गाठणाऱ्या शेतकऱ्याच्या कामाचे दाम देत नाही हे वास्तव नाकारता येत नाही. त्यांची ना युनियन, ना असोसिएशन... जमले तर त्याला नाडणारे आणि नागवणारेच अधिक ! कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, कधी लाल्या तर कधी करपा, कधी लोड शेडींग तर कधी मालाला मातीमोल भाव... तरी तो लढतोय, जगतोय आणि जगवतोयही... स्वतःला, कुटुंबाला, त्याच्या जनावरांना आणि समस्त प्राणिमात्राला ! त्याच्यासोबत त्याच्यापेक्षा काकणभर जास्तच राबणारा त्याचा सखा म्हणजे सर्जा - राजाची जोडी... त्यांच्या सणाच्या निमित्ताने हा लेख...

आज सकाळपासूनच समाज माध्यमांमध्ये याबद्दलच्या अतिशय संवेदनशील अनेक पोस्ट वाचण्यात आल्या. त्यांचा सारांश थोडक्यात वरच्या परिच्छेदात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी ते मांडणारे व लिहिणारे मूळ या काळ्या आईची लेकरचं ! जरी गावाकडे जाता आले नाही तरी त्यांच्या सर्वांच्या सोबतीने हा मना मनातला पोळा अनुभवला... त्याचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा हाच यामागील खरा उद्देश...खान्देशातील पोळा म्हटला कि कवयित्री बहिणाबाई चौधरींची कविता आलीच पाहिजे... 

पोया (पोळा)

आला आला शेतकर्‍या, पोयाचा रे सन मोठा

हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा

आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार

करा आंघोयी बैलाच्या, लावा शिंगाले शेंदुर

लावा शेंदूर शिंगाले, शेंव्या घुंगराच्या लावा

गयामधीं बांधा जीला, घंट्या घुंगरू मिरवा

बांधा कवड्याचा गेठा, आंगावर्‍हे झूल छान

माथां रेसमाचे गोंडे, चारी पायांत पैंजन

उठा उठा बह्यनाई,, चुल्हे पेटवा पेटवा

आज बैलाले नीवद, पुरनाच्या पोया ठेवा

वढे नागर वखर, नहीं कष्टाले गनती

पीक शेतकर्‍या हातीं, याच्या जीवावर शेतीं

उभे कामाचे ढिगारे, बैल कामदार बंदा

याले कहीनाथे झूल, दानचार्‍याचाज मिंधा

चुल्हा पेटवा पेटवा, उठा उठा आयाबाया

आज बैलाले खुराक, रांधा पुरनाच्या पोया

खाऊं द्या रे पोटभरी, होऊं द्यारे मगदूल

बशीसनी यायभरी, आज करूं या बागूल

आतां ऐक मनांतलं, माझं येळीचं सांगन

आज पोयाच्या सनाले, माझं येवढं मांगन

कसे बैल कुदाळता, आदाबादीची आवड

वझं शिंगाले बांधतां, बाशिंगाचं डोईजड

नका हेंडालूं बैलाले, माझं ऐका रे जरासं

व्हते आपली हाऊस, आन बैलाले तरास

आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देनं

बैला, खरा तुझा सन, शेतकर्‍या तुझं रीन !

कवयित्री बहिणाबाई चौधरी

बळीराजाच्या या साथीदाराच्या सणाची तयारी कशी करावी हे सांगतांना, हौशी उत्साही मंडळींना आपल्या हौसेसाठी बैलांना त्रास देऊ नका असंही अक्षिशित कवयित्री बहिणाबाई सांगतात... दिवसाची सुरुवात श्री. मनोहर पाटील यांच्या शब्द प्रवासाने झाला. कष्टाशिवाय मातीला आणि बैला शिवाय शेतीला पर्याय नाही... प्रा. डॉ. किसन पाटील यांनी त्यांची २०१७ मध्ये लिहिलेली व आकर्षक पद्धतीने सजविलेली कविता पाठविली. सौ. विशाखा देशमुख यांनी मातृदिनासोबतच बैलपोळ्याच्या आठवणी सांगितल्या. मो. का. भामरे यांनी बळीचे राज्य कुठे आहे ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला आहे. चाळीसगाव येथील कवी मनोहर आंधळे आपल्या कवितेत ढवळ्या-पवळ्याच्या जोडीला जिवलग सखे म्हणतात...


जिवलग सखे||

अन्न-धान्याच्या या राशी

ढवळ्या-पवळ्या वाहती

उन्हा पावसात नित्य

शेती मातीत राबती

                                 शिंग बाकदार उंच

                                 रंग पांढरा दुधाळ

                                 हंबरता कानी येई

                                 नाद मधाळ,मधाळ

घरादाराला सदैव

त्यांच्या घुंगरांचा लळा

माझ्या उंबऱ्याला कधी

नाही आली अवकळा

                                 करती वैरण चर्वण

                                 औत पांभर ओढती...

                                 माझ्या शेता-मळ्यामध्ये

                                 कित्ती केल्या मशागती!

शेता शिवाराला माझ्या

त्यांचा सार्थ अभिमान

हाक देता साथ देती

जगा शिकवी इमान

                                  त्यांच्या श्रमानं घामानं

                                  मी होतो  कृतकृत्त्य....

                                  ढवळ्या-पवळ्यामुळे

                                  सुखी-समाधानी चित्त..!

येवो यंत्र तंत्र युग

सारे वाटे मला फिके

ढवळ्या-पवळ्याच माझे

खरे जिवलग सखे!

                                  सण वर्षातून एक....   

                                  लोकं म्हणती बैलपोळा

                                  शेतकरी मैतराचा...

                                  हाच सन्मान सोहळा!

              मनोहर ना.आंधळे,  चाळीसगाव-९४२१५१२५७०.


बैल पोळा

बैलजोडी एक मनातील स्वप्न असते

मनात बसते तीच शेतकरी विकत घेतो

घरी आणली की लक्ष्मी पुजा करते

घरात आई बाबा सर्व जण तीच चर्चा

दुसऱ्या दिवशी चांगली केवढी महाग

कामात पाहिजे अशी चर्चा सुरू होते

शेतकामात मालक जुंपतो कामे करतो

बैलांचे चारापाणी ढेप,दाळ खाऊ घालतो

मुलांना सारखं सर्जा राजावर लक्ष ठेवतो

मुलीकडे गावाला जावून मुक्काम नाही

बैलजोडीला चारापाणी नाही केले तर 

मुलां मुलींना बोलतो,कधी मारतो पण...

बैलजोडीचा पोळा सण हौसीने करतो

तो आपला अन्न दाता म्हणजे शेतकरी असतो..

@. गोविंद पाटील सर, पाथरी जळगाव.


नंदी पुजावा पोळ्याला....... 

लागे सोन्याचं कणीस 

काळ्या मातीच्या गोळ्याला  ! 

खरा रानाचा मैतर , 

नंदी पूजावा पोळ्याला ....!! 

त्याच्या घामानेच येते

दाण्या, दाण्याला चकाकी  ! 

त्याच्या पुरणपोळीची, 

आज चूकवारे बाकी ...!! 

नांगरतो,,वखरतो,,

देतो वावर पेरून   ! 

नाही फिटणार कधी ,

त्याच्या राबण्याचं रूण  !! 

बैला शिवाय शेताचं 

रूप म्हसनासमान, ! 

सजवून मिरवावा

बैल पोळ्याला डौलानं  !! 

नंदी राजाला सजवा 

हिंगोळीने शिंग चोळा, ! 

अरे वर्षाकाठी येतो

एकदाच बैलपोळा    !! 

करा करा त्याची सेवा

त्याला चढवा रे साज  ! 

गोडधोड खाऊ घाला 

पण जूंपु  नका आज   !! 

-- गो.शि.म्हसकर, नगरदेवळा जिल्हा जळगाव


ढवळ्या-पवळ्या

हिरवी श्यामल 

माय धरित्री 

उचंबळोनी आली..

मातीमधले 

तृप्त शहारे 

मिरवत आहे गाली..

कलून गेली 

मावळतीला 

एकल तेजल ज्योती..

क्षितिजावरती 

साय पसरली 

सावल्यांतुनी वरती..

सांजकोवळ्या 

मधु किरणांचा 

सडा शिंपला भवती..

आणिक आहे 

ओसरलेली 

पाण्यामधली भरती..

ढवळ्या पवळ्या 

चला घराला 

उद्या नांगरू शेती..

सांज वितळली 

पाण्यामध्ये 

लहरी झोका देती

अशोक बागवे 


गेल्या परक्या गावाला...

कोण आपलं परकं

नाती उरली नावाला

साऱ्या ओळखीच्या वाटा

गेल्या परक्या गावाला

दुःख उतू आल्यावर

कसं झेलावं मनाला

सावलीनं द्यावा आता

थोडा विसावा उन्हाला

जत्रा स्वप्नांची भरे

गर्दी उसनी शिवाला

साऱ्या ओळखीच्या वाटा

गेल्या परक्या गावाला...

गोठा सोडून निघाल्या

गाई चुकल्या रानात

खोटया मातीच्या बैलाला

माय पूजते सणात

माझं माझं म्हणताना

द्यावा रक्ताचा हवाला

साऱ्या ओळखीच्या वाटा

गेल्या परक्या गावाला...

कळा सोसल्या मातीनं

झळा उन्हाच्या सोसून

किती गिरवावे तरी

पाढे जातात पुसून

कवितेच्या ओळीतला

थोडा गारवा जीवाला

साऱ्या ओळखीच्या वाटा

गेल्या परक्या गावाला...

-विष्णू थोरे,चांदवड.


माटीचे बैल

 मीनं पुसलं बोयले

   पोया तं बैलांचा सन

 मंग माटीच्या बैलांले

   काब्र पुजतो आपन ?ll

  धुरकरीबी माटीचा

    नही रंग दोन्हींलेबी 

  बैलांपह्यले निवद

     मान मिये दोन्हींलेबी ll

  बोय सांगे मंग माले

     बैलाकन व्हये शेती

  शेतमजूर रंघत

     गाये ,पीक येये हाती ll

  शेतमजूर नं बैल

     दोन्ही माटीत राबता

  आटीयीसन रंघत

      माटीमधी माटी व्हता ll

   सालदार नं मजूर

      घाम शेतात गायती

   त्याच घामाच्या थेंबांनं

      वलावते शेतमाटी ll

   माटीमधी माटी व्हयी

      माटीमधी जो मियला

   त्याच माटीतून बैल

      आनं धुरकरी बनवला ll

   अंग त्यांचे त्या माटीचे

       रंग माटीचाच त्यांचा

    मिये माटीत म्हनून

        मान माटीच्या बैलांचा ll

    बैलांसंग बैल झाले

        बैलासंग माटी झाले

    माटीच्या मजुरालेबी

        मान पोयाच्या सनाले ll

     पुरनपोयी बैलांले

         ढोरक्यांलेबी जेवन

     झूल बैलांले ,मजूर

         नया सद्र्यात मिरनं ll

 प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे,जळगाव,  ९७३०२२११५५


पोया

सन वर्साचा आला आला रे आज पोया

पोरंसोरं पहा सर्वी झाली रे आज गोया

धव्व्यापव्वया जोडीले तू खावाडं रे पुरनपोया

जोडी राबते रे तुही सालभर वावरात

हिरवं सोनं पिकोयते तुह्यासंग शिवारात

एक दिस पोयाले रे त्याची दृष्ट काढ तू दारात

न्हाऊमाखू त्याह्यले घालं टाक पाठीवर झुलां

शिंग रंगवून गयातं बांध घुंगरायच्या माला

काढ ढोल वाजवत मिरनूक घालूनिया पुष्पमाला

सखा सोबती जीवाचा तुह्या जल्माचा मैतर

फोड नारय पायाशी अन् वाट तू साखर

वर मांगा आबादानीचा मंग सारं घरदारं

झाला शांत नंदी आता गो-हा होता जो अवखड

नको जुपू आज गाडी नको घालू रे जोखड

एक दिस हा मानाचा त्याले फिरवं निखड

खिर,वडा,पुरनपोयीच त्याले वाहाड रे पान

घरोघरी निवदाचा त्याले घिऊ दे रे मान

मंग सालभरी कष्टुनिया तो तुही वाढविन शान

आला आला बैल पोया जमल्या सर्व्या बाया

पुजा नंदीची करून त्या सांगती माऊल्या

नंदीदेवा आम्हावरी ठेवा कृपेच्या सावल्या

प्रा.संध्या महाजन


कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा .!

आमच्यासाठी ज्यानं बनवलाय हा पोळा 

त्याच्याच आयुष्याचा झालाय चोळामोळा 

मग कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा 


शिंगांना रंग आहे पाठीवरती झुल आहे 

साजरा करतोय सण कसाबसा 

सगळं सगळं कबूल आहे 

तरी वाटत नाही पाहिजे तसा पुर्वीसारखा सोहळा 

मग कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा 


महागाईनं आभाळ पेटलं, अवघं जग जागेवरच गोठलं 

काम नाही धंदा नाही खिशात रुपया बंधा नाही 

घालून ठेवलाय सर्वत्र कोरोनानं वेढा 

मग कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा 


वैर्याची ही वेळ आहे नियतीचा हा खेळ आहे 

कुणीच कुणाचं राहिलं नाही 

लेकरानंही मरताना मायचं तोंड पाहिलं नाही 

परस्पर दफन केला जातोय एकुलता एक पोटचा गोळा 

मग कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा..?

रत्नाकर खंडू कोळी मु पो खामखेडा ता शिरपूर, जि धुळे ह मु जळगाव मो ८३२९६४६५०५


बैल....आणि बाजार

बाजार भरला आहे

खचाखच....

व्यापाऱ्याची गर्दीच गर्दी

विकणारे उभे आहेत

जशी भर बाजारात 

काढलेली हक्काची वर्दी 

विक्रीच्या बैलांच्या डोळ्यात

मात्र,काळाच्या लाटाच लाटा

जंगली, पाळीव,घरसदस्य,अन

मालकाचा दोस्त होत

गेलेल्या वाटा...

मालक.. हतबल उभा..

दुबार,तिबार पेरणी करून

अकाली करपलेल्या धांड्यासारखा..

बैल.. डोळ्यात कणव घेऊन

ऐन युद्धसमई गोळ्या लागून

धारातीर्थी पडणाऱ्या जवानासारखा....

गिऱ्हाईक मात्र उभे आहेत

व्यापाऱ्याच्या वेशात...

लचके तोडायला...

मालकाच्या अन बैलांच्या जीवाचे

हिशोब काढायला...

मालक आणि बैल

मूकपणे बोलताहेत

राज्या.. धन्या....!

कधीतरी पुन्हा एकत्र येऊ

अन ही धरणी पुन्हा

सुपीक उत्कर्षाला नेऊ...

बाजार संपला...

दोघेही रिकामे रिकामे....

डॉ विशाल इंगोले, लोणार(*सरोवर), ९९२२२८४०५५ 


बैल

बैल श्रमाचे गा देव

बैल सुगीची आरती

बैल शेतीचा जिव्हाळा 

बैल गुंतलेली नाती !

बैल मृगाचा संदेश

बैल पावशाचे बोल

बैल आषाढ लाडका

बैल ढगांचेही ढोल !

बैल पीक मोतीयांचे

बैल पिकांचा सोहळा 

बैल तरारले रान

बैल शिवाराचा डोळा.

बैल धन्याची पुण्याई

बैल मातीचेच पुण्य

बैल उभा वनवास

बैल दुःखाचे अरण्य !

बैल शोषीत-पीडीत 

बैल मौनातला शब्द

बैल जन्माचा उन्हाळा

बैल फाटके प्रारब्ध !

बैल शिवाराची वाट

बैल परतीचा रस्ता

बैल कनवाळू मित्र

बैल श्रमाचा शिरस्ता.

बैल पायासाठी जोडा

बैल वाघाची हिंमत 

बैल जगणेच न्यारे

बैल मृत्यूची किंमत.

बैल रुसले आयुष्य

बैल चूकलेला ताळा

बैल एक प्रथापूजा

बैल कधीमधी पोळा !

रवींद्र जवादे


मागील वर्षी सातारा- सांगली -कोल्हापूर येथे पुराच्या पाण्याने मृत झालेल्या बैलांचा आक्रोश.. पोळ्याच्या पूर्वसंध्येला ..

काळजाचा पोळा.. 

मालक ..

तुम्हीं काळजाचा कासरा

करा जरा सैल..

पोरांप्रमाणे जीव लावला

जरी होतो आम्ही बैल..

आपल्या घरादाराच्या

सुखासाठी दिवसरात्र चालत

होतो मैलोनमैल..

पुराच्या पाण्यात आमचा

जीव गेला पण.. 

तोडून गेलो नाही दावण

अन सोडूनही गेलो नाही अंगण..

फक्त मालक तुमच्यासाठी.

तुम्ही आम्हांला कधीच समजले

नाही जनावर..

आज पोळा आहे म्हणून 

आमची खूप आठवण येईल

तेव्हा अश्रू होईल अनावर..

मालक स्वतःला अन घरातल्या

सर्वांना सावरा..

पडलेलं घर, गोठा हळूहळू आवरा..

मालक ,आज फक्त एकच मागणं आहे..

जेव्हा तुम्ही सर्व मातीच्या घरातून

सिमेंटच्या घरात जाल ना

तेव्हा फक्त आमची आठवण 

म्हणून जमलंच तर आपल्या तिघांचा मागच्या पोळ्याला काढलेला फोटो

फ्रेम करून भिंतीवर टांगा..

अन पुराच्या पाण्यात माझ्या सर्जा- राजाचा जीव गेला असं येणाऱ्या जाणाऱ्याला सांगा..

आता आम्ही खूप दूर निघून आलोय..

देवाला सोडून ..देवाच्या घरी..

तेवढी फक्त आमची आठवण ठेवा..

तुमच्या सिमेंटच्या किंवा काळजाच्या भिंतीवर सदैव टांगून..

बस्स एवढंच ...जमलं तर करा मालक...

 ©संदीप विकास गुजराथी, चांदवड जि. नासिक,  ९६० ४५० २७१५

वरील सर्वच कवितांमध्ये मांडलेले वास्तव, त्यातून कवीच्या मनातील आर्तता त्यांच्या मना मनातील पोळा आपल्याला सांगतोय. शेवटच्या कवितेत पुरात वाहून गेलेल्या व दोन जिवलगांमधील ताटातूट झालेल्या एकाने आपले मनोगत दुसऱ्याला अतिशय चपखल पद्धतीने सांगितले आहे. ब्लॉग वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात या लाखच्या पोशिंद्याबद्दल आणि त्याला तेव्हढीच तोलामोलाची साथ देणाऱ्या त्याच्या सर्वांबद्दल कृतज्ञतेचा भाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. साहित्यातून साजरा करण्यात आलेला हा पोळा या साहित्यिकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या कलाकृतीला मनापासून अभिवादन करतो व आजचा पोळा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे भाग्य मला दिले याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. 

गिरीश कुळकर्णी 

4 comments:

  1. ऊत्क्रुष्ट लेख !
    सर्वच कविता खूप चांगल्या व अतिशय चपखल .

    विजय कुळकर्णी .

    ReplyDelete
  2. सुंदर लिहिले आहेस.

    ReplyDelete