Thursday 27 August 2020

कृतज्ञता जीवनादर्शांप्रतीची !

आदर्शांचा आदर्श राम !

आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० " कृतज्ञता उत्सव " अंतर्गत सहाव्या दिवशी आपण आपल्या जीवनातील आदर्शांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आज व्यक्त झालेल्या मनोगतांमध्ये प्रत्येकाने अनेक आदर्शांचा उल्लेख केला आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्विता मिळवायची असेल तर त्या त्या क्षेत्रातील आदर्शांचा विचार करावा लागेल. आपण ज्याच्याकडून काही तरी शिकतो त्याला आदर्श म्हणू शकतो मात्र म्हटलेच पाहिजे असे बंधन नाही. त्यामुळे चांगलं कुणाकडूनही घ्यावे त्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे मात्र तो आदर्श आहे असे नाही. कारण आजच्या युगात प्रभू रामचंद्रांप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम दिसत नाही. जीवन जगात असतांना समाजातील व्यक्तींना अपेक्षित असलेली उक्तीप्रमाणे कृती तसेच आचार, विचार आणि कृती यात योग्य मेळ दिसून येतं नाही. आई-वडील हेच सामान्यपणे प्रत्येकाचे आदर्श असल्याचे लक्षात येते. असो... माझ्या आदर्शांबद्दल यानिमित्ताने कृतज्ञता व्यक्त करतो. 

आपल्या विचारांबाबत ठाम मात्र इतरांच्या विचारांबाबत व भावनांचा आदर, काम करतांना अपेक्षित सर्वसमावेशकता, दूरदृष्टी, आधी केले मग सांगितले हि वृत्ती, द्रष्टेपणा, निःस्वार्थ भावनेने केलेली सेवा, वेळेचे भान, कामाचा दर्जा आदी गोष्टींबाबत आग्रही  हे आदर्शांचे परिमाण ठरु शकतात. अजूनही वाढविता येतील. या सर्व गुणांचा एकत्रित मिलाप जेथे सापडेल ती व्यक्ती आदर्श ठरु शकते. तरीही त्या व्यक्तीच्या स्वभावातील दोषांकडे आपल्याला दुर्लक्ष करावे लागेल. आपण प्रभू रामचंद्रांना आदर्शांचा आदर्श असे म्हणत असलो तरी त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो हे लक्षात घ्यावे लागेल. ज्या व्यक्तीच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल, कार्याबद्दल, जीवनातील समर्पित वृत्तीबद्दल अभिमान वाटतो अशा व्यक्ती आदर्श ठरतात. त्यांचे अनुसरण करणारे अनेक व्यक्ती असतात. अशा आदर्शांचा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वावर व जीवनावर प्रभाव दिसून येतो आणि त्याबाबत ते जाहीरपणे सांगतात. 

माझ्या जीवनावर अशा अनेक लोकांचा प्रभाव असल्याचे मला जाणवते. यात अग्रक्रमाने माझे वडीलच आहेत. पोस्टासारख्या विभागात व्यावसायिक जीवनाची वर्षे व्यतीत करतांना प्रामाणिकपणे कष्ट हि गोष्ट माझ्यावर प्रभाव करुन जाते व मी त्याचे अनुसरण करतो. जीवनाचे तत्व घेऊन जगणारे माझे वडील त्यादृष्टीने मला आदर्श वाटतात. आपल्या दाराशी कोणी माणूस त्याचे पैसे मागायला आला नाही पाहिजे. (याचाच अर्थ आपले अंथरुण पाहून पाय पसरवावे) दुसऱ्यामुळे आपल्याला त्रास झाला तरी चालेल मात्र आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको, कष्टाने माणूस मरत नाही, मर्यादित उत्पन्नातही चांगले, आनंदी व समाधानी आयुष्य जगता येते. आईनेही अशाच प्रकारे जीवनावश्यक काही मूलभूत तत्वज्ञान आपल्या जीवनातून सांगितले. घरात कायम चांगलेच बोलावे कारण वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतो. स्वयंपाक करतांना प्रसन्न व आनंदी असावे कारण बनविणाऱ्याची वृत्ती त्या अन्नात येते आणि नंतर खाणाऱ्यातही ! साधे बाळबोध वाटत असले तरी तेच शाश्वत विचार आहे, असे मला वाटते. यासर्व गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. ज्या मला आदर्श वाटतात. या माझ्या आदर्शांबद्दल कृतज्ञता ! 


व्यावसायिक, शैक्षणिक व सामाजिक जीवनात अनेकांचा प्रभाव मला जाणवला. तो जीवनात आणण्याचा कायम प्रयत्न असतो. आमचे प्राचार्य प्रा. एन. के. पाटील, प्राचार्य डॉ. के. बी. पाटील, डॉ. अविनाश आचार्य, पद्मश्री भवरलाल जैन, ऍड. अच्युतराव अत्रे, स्नेहालयचे डॉ. गिरीश कुळकर्णी, संजीव दहिवदकर, श्री. लक्ष्मणराव जोशी हि त्यातील काही नावे. या सर्वांसोबत संपर्क संवाद होता, आहे. जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असतांना या सर्वांच्या जीवनाचा, त्यांच्या विचारांचा, साधनशुचितेचा प्रभाव कायम राहिला. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, चाणक्य, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम , महाराष्ट्रातील विविध संत, क्रांतिकारक, परमवीरचक्र विजेते जवान यांच्या जीवनातून कायम प्रेरणा मिळते. या सर्वांप्रती आज कृतज्ञता व्यक्त करतांना मला विशेष आनंद होत आहे. माणसाच्या जीवनात आचार, विचार व कृतीचे दिशा दर्शन व मार्गदर्शन करणाऱ्या प्रेरणादायी आदर्शांचे महत्व आहे. कृतिशील विचारांचा वसा आणि वारसा अनेक पिढ्या घडवितात. त्यासाठीच हि जीवनादर्शांची कृतज्ञता ! पुण्यभूमी भारतमातेला परमवैभवाला नेणाऱ्या आदर्शांची हि शृखंला अखंडपणे सुरु राहो... हिच बा गणरायाचरणी प्रार्थना ! गणपती बाप्पा मोरया ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

5 comments:

  1. आपल्या आदर्शांंविषयी सर्वच आदर्श घेतील हे निश्चित!
    -अनिल रामभाऊ पाटील

    ReplyDelete
  2. गिरीषजी.....
    जीवनात जगण्यासाठी एक आदर्श लागतोच प्रभूश्रीरामांचा आदर्श आपण सर्वच मानतो. मात्र, त्यांच्या आदर्शावर चालणं किती कठीण आहे याचा प्रत्ययही पावलोपावली येतो. आपल्या अवतीभवतीचे हाडामासाचे आदर्श किमान अनुकरण करायला आपल्याला बळ देतात. जे काल्पनिक नसतात आणि वास्तवात येवू शकतात. खरंय तुमचं म्हणणं आई वडिलांचे बाळबोध आदर्श आपल्यासाठी गीता-ज्ञानेश्वरीच असतात. शिवाय विविध क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तीमत्व जे आपल्या जगण्याला बदलवून टाकतात त्याचं ऋण व्यक्त करणारा हा लेखन प्रपंच अभिनंदनीय आहे.

    ReplyDelete
  3. छान लेख .
    आदर्श म्हणजे दीपस्तंभच !
    जीवनातील कठीण प्रसंगात , अडचणीत , योग्य मार्ग आदर्शच दाखवतात .

    विजय कुळकर्णी .

    ReplyDelete
  4. खरंच संजीव दहिवदकर यांच्याबद्दल आयकॉन पुस्तकात वाचण्यात आले आहे.

    ReplyDelete
  5. नेहमी प्रमाणे अप्रतिम कार्य व तुमचे विविध उपक्रम।म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा आई विना ... ह्या म्हणी प्रमाणे व जीवनात वेगवेगळ्या स्तरावर खूपच आदर्श वादी व्यक्ती भेटतात व एक छाप सोडून जातात। माझ्या मिलिटरी च्या जीवनात फिल्ड मार्शल करिअप्पा, प्रथम जनरल माणेक् शॉ, हे होते आणि कायम आदर्श राहतील। कॉलेज जीवनात वर्धमान विद्यालय वालचंदनगर जिल्हा पुणे चे अवधानी सर, इंजिनिअरिंग कॉलेज सातारा मध्ये प्रिन्सिपॉल रानडे सर, प्राध्यापक मिसाळ सर , जळगांव मधील बालाजी मंदिर चे राधे सरकार महाराज, माझी मुलगी व मुलगा असे बरेच आदर्श आहेत ज्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाऊ शकते व व्यक्त करीत आहे। म्हणतात की मुलगी जन्माला आली तर तिला काही शिकवावे लागत नाही तीच वडिलांना शिकवते। गिरीष जी तुमच्या महान कार्यास खूप खूप शुभेच्छा।। राधे राधे।

    ReplyDelete