Monday 17 August 2020

भारतीय संगीताचे उपासक पंडित जसराज !


विठ्ठलं... विठ्ठलं... विठ्ठलं... जळगावच्या सागर पार्क मैदानावर एकाच वेळेस १५ हजार जळगावकर विठ्ठल नामात देहभान विसरुन तल्लीन होऊन अक्षरश: डोलत होते. दिवस होता... शनिवार, १३ डिसेंबर २००३ आणि वेळ होती रात्री साधारण १० वाजेची... हि किमया केली होती संगीत मार्तंड, पदमविभूषण, तपस्वी कलासाधक पंडित जसराज यांनी... जळगाव जनता सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्वर रजनी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आदरणीय डॉ. अविनाश आचार्य यांच्या संकल्पनेला वास्तवात आणण्याचे काम केले होते बँकेचे तात्कालिक संचालक श्री. रघुजी रारावीकर यांनी... एव्हढ्या मोठ्या संख्येने जळगावकरांना एकाच वेळी भारतीय संगीताचे वेड लावण्याचे काम पंडित शिवकुमार शर्मा, उस्ताद झाकीर हुसेन व वीणाताई सहस्रबुद्धे यांनी... असे स्वप्न पाहण्याची दूरदृष्टी होती आदरणीय दादांची ! 

पं. शिवकुमार शर्मा यांच्या अप्रतिम अशा संतूर वादनानंतर पंडित जसराजजींचे गायन होते. जागतिक किर्तीच्या या कलावंतांनी वयाच्या ७३ व्या वर्षी शास्त्रीय रागातील एक रचना सादर केल्यानंतर सुमधुर आवाजाची ईश्वरी देणगी लाभलेल्या या गानभास्कराने आपली सर्वोत्कृष्ट रचना गायला सुरवात केली. "ॐ नमो भागवत वासुदेवाय !..."  साधारण अर्ध्या तासाने संपूर्ण श्रोत्यांना आपल्या स्वर्गीय स्वरांनी पंडितजींनी अक्षरश: न्हाऊ घातले. संत कबीरांच्या भजनात चार ओळी येथे समर्पक ठरतात 

हरि सेती हरिजन बडे 

समझी देखु मन मांहि |

कह कबीर जग हरि विषे,

सो हरिजन मांहि |

जसे हे विश्व (जग) हरीमध्ये सामावले आहे. तसेच हरि हरीच्या भक्तांमध्ये सामावला आहे... याचीच ती अनुभूती होती. बँकेचा जनसंपर्क अधिकारी म्हणून या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करण्याचे भाग्य लाभले आणि या महान विभूतीला अतिशय जवळून पाहता आले. तेव्हापासून त्यांच्या या गाण्याने विशेष वेड लावले. सोबत मधुराष्टकम, गोविंद दामोदर माधवेति, राधाकृष्ण स्तुती, शिवाष्टकम , माता कालिका भजन, शिव स्तुती यासारखे अनेक भजन नियमितपणे ऐकत असतो. भारतीय संगीत समजण्यासाठी आवश्यक असलेले शुद्ध मन आणि निरागसता पंडितजींकडे होती. त्यामुळे त्यांना ऐकणारा नास्तिक माणूसही आस्तिक झाल्याशिवाय राहणार नाही अशी ताकद त्यांच्या या साधनेमध्ये होती. त्यांचे कोणतेही भजन डोळे बंद करुन ऐकत राहावे आपल्याला वेगळी अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. 

आता हा आवाज प्रत्यक्ष ऐकायला मिळाला नाही तरी त्यांच्या या रचना नक्कीच भारतीयांचे मने रिझवल्याशिवाय राहणार नाही. अशा या महान कलावंताच्या अविरत साधनेला विनम्र अभिवादन ! ज्यांनी अनेकांना परमेश्वराची भेट घालून दिली त्यांना परमेश्वर सद्गती देईलच... पंडित जसराजजींना  भावपूर्ण आदरांजली ॐ शांती शांती शांती. 

गिरीश कुळकर्णी 

15 comments:

  1. पंडितजीच्या गायनाने प्रत्यक्ष इश्वराच ी भेट घडते

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय राजेश ! आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

      Delete
  2. स्वर्गीय अनुभूती
    मी पण साक्षीदार आहे या कार्यक्रमाचा...
    शब्दशः खरंय आपण जे मांडलंय ते🙏

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय अक्षय ! आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

      Delete
  3. पंडीतजींना श्रध्दांजली .
    ओम शांती .

    छान लेख . स्वानुभव सुंदर शब्दबध्द केला आहे .
    विजय कुळकर्णी .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद काका ! हि पंडितजींची कृपा !

      Delete
  4. श्री गिरीशजी,जय श्रीराम
    कै पंडितजी ना भावपूर्ण श्रद्धांसुमन
    अतिशय सुंदर लेख व पंडितजी च्या आठवणी ना उजाळा दिल्याबद्दल जळगांवकर म्हणून मनःपूर्वक धन्यवाद
    श्याम कोठावदे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद शामराव ! कसे आहेत ? काळजी घ्या...

      Delete
  5. अभुतपूर्व दिवस होता .....
    पंडितजींना श्रध्दांजली.
    ओम शांती.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय ! आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद... प्रतिसादात नाव लिहावे...

      Delete
  6. खरोखर अविस्मरणीय कार्यक्रम होता. खुल्या मैदानात इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षक शास्त्रीय संगीत ऐकतात हे खूपच नविन होते. पंडितजींनी, प्रेक्षकांची दिलेली दाद दिसण्यासाठी प्रेक्षकांसमोर ची लाईट व्यवस्था वाढविण्याची सूचना केलेली आठवते.

    ReplyDelete
    Replies
    1. हो खरंय आमापन म्हणतात ते... मला आपण लिहिल्यावर आठवले. धन्यवाद ! कृपया प्रतिसाद देतांना आपले नाव लिहावे.

      Delete
  7. छान लेख दादा
    खरच अविस्मरणीय कार्यक्रम होता.

    ReplyDelete
    Replies
    1. हं ! धन्यवाद... कृपया प्रतिसादात आपले नाव लिहावे...

      Delete
  8. जळगाव शहराच्चा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला तो एक अविस्मरणीय कार्यक्रम होय.-अनिल रा, पाटील

    ReplyDelete