Saturday 22 August 2020

कृतज्ञता पालकांप्रतीची...!

कृतज्ञता पालकांप्रतीची...! 


बा गणराया ! आजच्या पहिल्या दिवशी आम्ही तुझे आभार मानत आहोत तू आम्हास हे सुंदर जग दाखविणारे, आम्हास घडविणारे, आमचे पालनपोषण करणारे. आम्हाला माणूस बनविणारे पालक दिलेत. ते आज आमच्यात आहेत किंवा नाहीत... पण ते आमच्या हृदयात आहेत. आम्ही त्यांच्यारुपाने आहोत. आमच्यात त्यांना शोधतो आहोत. त्यांचा आनंद आणि समाधान हिच आमची श्रीमंती अन त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यताही ! आम्ही कृतज्ञ आहोत त्या सर्व पालकांचे कारण आम्हीच त्यांचे आधुनिक काळातील रुपे आहोत...

आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० च्या कृतज्ञता उत्सवाच्या निमित्ताने आज पालकांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करतांना आनंद होत आहे. जन्मदात्या आई-वडिलांसह आपल्याला घडविणाऱ्या इतरही पालकांसाठी हि कृतज्ञता आहे. आजच्या या पहिल्या भागात ऐंशीच्या घरात असलेल्या श्रीमती शशिकला खाडिलकर यांचेसह सौ. वैदेही नाखरे, ऍड. प्रदीप कुळकर्णी, श्री. अतुल तांदळीकर, श्री. दिलीप तिवारी, रेवती ठिपसे,, सुजाता बोरकर, संध्या किशोर व प्रा. बी. एन. चौधरी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्री. प्रदीप रस्से यांना विनंती केल्याप्रमाणे त्यांनी यासाठी दररोज सुंदर असे समर्पक चित्र काढून द्यायचे मान्य केले आहे. आपल्या सर्वांच्याच भावना या मंडळींनी व्यक्त केल्या आहेत. आशा फौंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल या सर्वांचा शतश:ऋणी  आहे. 

पालक शिक्षित असो वा अशिक्षित आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे हिच त्यांची इच्छा आणि त्यासाठीच त्यांची धडपड व कष्ट ! जन्मदात्या पित्याला जन्मदात्या मातेचीही तेव्हढीच सक्षम साथ... संस्कार देण्याचे काम आईचे तर मूल्ये रुजविण्याचे काम पित्याचे ! सर्वतोपरी सहकार्य करणे हे काम नैतिक जबाबदारी स्वीकारलेल्या पालकांचे... पाढे, श्लोक, स्तोत्र पाठांतरापासून, अभ्यास, गोष्टी सांगणे, चांगल्या गोष्टींची सवय लावण्यापर्यंत पालकत्वाचे बाह्य रुप. मात्र घरादारापासून व्यवसायापर्यंतच्या त्यांच्या कृतीतून आदर्शांचा वस्तुपाठ मुलांना होणे हा त्यांच्या अंतरिक स्वभावाचा बाह्य परिणाम ! चांगल्या - वाईटाची प्रचिती येतांना ठामपणे योग्य निर्णय घेण्याची ताकद पालकांच्या शिकवणीतूनच  मिळते. उच्च ध्येय, त्याला कर्तव्य कठोरपणाची जोड, परिस्थितीशी दोन हात करण्याची सिद्धता यांचे बाळकडू घरातूनच आणि पालकांकडूनच मिळते. कष्ट, प्रामाणिकपणा, स्वाभिमान हि पित्याची देन तर सोशिकता, काटकसर, समाधानी व आनंदी वृत्ती हि आईची... सहजीवन, परस्परपूरकता, प्रथम जे काही ते मुलांसाठी व नंतर स्वतःसाठी हि दोघांची ! 

संवेदनशीलता, माणुसकी, परोपकारी वृत्ती, भावना आणि व्यवहार यातील समतोल, सामाजिक जाण व कर्तव्याची नीव रचणारे पालक आपल्या पाल्याच्या कृतीतून एक वेगळा अविष्कार ज्यावेळेस अनुभवतात त्यावेळेस त्यांना "पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा !" या युक्तीची सार्थकता वाटते. शिक्षित, समंजस व प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या आपल्या पाल्यांकडे पाहिल्यावर त्यांना होणारे आत्मिक समाधान लाख मोलाचे ठरते. पिढीमधील अंतर कितीही मोठे असले तरी वैचारिक समानता पालक-पाल्य नात्याला मैत्रीचे कोंदण देते. भारतीय संस्कृतीत वसा आणि वारसा यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. पालकांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करतांना त्यांनी दिलेला वसा आणि वारसा आपले जीवन समृद्ध करणारा ठरतो. पालक हे कुटुंबव्यवस्थेची बलस्थाने असून वसुधैव कुटुंबकम समाजात हि भूमिका निभावणारे अनेक आहेत. आधुनिक पालकांनी आपल्या पालकांप्रतीची व्यक्त केलेली कृतज्ञता पुढे संक्रमित होत राहो हिच बा गणराया चरणी प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

9823334084 

10 comments:

  1. अगदी सर्वांच्या मनात याच भावना आहेत..
    आयुष्यात पहिल्या श्वासापासून - प्रत्येक अनुभव पहिल्यांदा येतो तेव्हा प्रत्यक्ष अथवा संस्कार रूपाने सोबत असणारे पालक.
    अतिशय समर्पक सार मांडले आहे, तुमच्या शब्दांतून व रस्से काकांच्या बोधचित्रातूनही...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अक्षय ! आपण नियमित लिहावे हि अपेक्षा...

      Delete
  2. खूप छान आणि समर्पक असे उपक्रम राबविण्यात गिरीश कुलकर्णीचा हातखंडा आहे. हा उपक्रम आणि लेख दोन्ही अतिशय सुंदर झाले आहेत. त्यापेक्षाही आनंदाची गोष्ट म्हणजे या उपक्रम सगळ्यांच्या साथीतून उभा राहतोय. अत्यंत उत्तम विचार आणि हेच आज समाजाला तरुन नेणारे ठरले आहेत.

    पालकांच्या विषयीचां हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा उपक्रम भन्नाट आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. कॅप्टन धन्यवाद ! मी तुझ्याकडून जोडी तुझी माझी सदरासाठी लेखाची वाट पाहतोय...

      Delete
  3. क्रुतज्ञता व्यक्त करून उत्सव साजरा करणे ही चांगली कल्पना आहे .
    लेख चांगला आहे .

    विजय कुळकर्णी .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद काका ! आपण नेहमी प्रतिसाद देऊन प्रोत्साहित करतात.

      Delete
  4. अप्रतिम कल्पना....

    ReplyDelete
  5. धन्यवाद ! कृपया प्रतिसादात आपले नाव लिहिल्यास लक्षात येईल...

    ReplyDelete