Monday 22 June 2020

सामाजिक संवेदनांची सतरा मजली उभी राहणार का ?


परवा काही मित्रांसोबत जळगावची शान असलेल्या "सतरा मजली" इमारतीच्या छतावरुन जळगाव शहराचे सुंदर रुप पाहता आले. सर्वत्र सिमेंटचे जंगल दिसत असले तरी त्यात अपेक्षित असलेली हिरवाई दुर्लक्षून चालणार नाही. अनेक इमारती वा छतांवरील सोलर पॅनल नागरिकांमधील अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचे महत्व समजून घेतल्याचे जाणवले. जी. एस. ग्राउंड व क्रीडा संकुल तरुणाईला खुणावतांना दिसले. रस्ते, बाजारपेठ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, निवासी संकुले व घरे यांचा नेटकेपणा समजला. खरं तर निसर्गाने इतकं भरभरून दिलेले असतांना आपण कायम साशंक, तणावात, विवंचनेत का असतो ? लॉक डाऊन व तत्पश्चात निर्माण झालेल्या परिस्थितीत सर्वच जण हतबल झालेले का दिसतात ? हे प्रश्न मात्र सतावत होते. 

"समाजावर आईसारखे निःस्वार्थ प्रेम करु या !" असा संस्कार देणाऱ्या डॉ. अविनाश आचार्य व "सार्थक करु या जन्माचे, रुप पालटू वसुंधरेचे" अशी शिकवण देणाऱ्या पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या जळगाव शहराचे आपण वारसदार आहोत. त्यांच्या पश्चात अनेकविध सामाजिक संस्था फार मोठे काम करीत आहेत. या गावाने येथील सामाजिक कार्याने निश्चितच आपली एक ओळख निर्माण केली आहे. लॉक डाऊनच्या या काळात सामाजिक संस्थांनी ज्यापद्धतीने आपले योगदान दिले आहे ते नक्कीच आदर्श व तमाम जळगावकरांसाठी अभिमानास्पद असेच आहे. ते गरजूंना अन्नदान असो, रक्तदान असो, किराणा सामानाची व्यवस्था करुन देणं असो, मास्क वितरण करणे असो, आयुर्वेदिक काढा वा आर्सेनिकच्या गोळ्यांचे वितरण असो, स्थलांतरित होत असलेल्या लोकांच्या भोजनाची / पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो खूप मोठे काम जळगावात झाले आपण त्याचे साक्षीदार आहोत. वंचितांना / उपेक्षितांना आवश्यक ते सहकार्य, सामाजिक समस्यांना उत्तर शोधून त्यावर काम करणारी मंडळी हि जळगावची जमेची बाजू म्हटली पाहिजे, मात्र समाजातील सामाजिक संवेदनांची सतरा मजली अजून उभी राहायची आहे असे मला वाटते. 



येथील सामाजिक संस्थांच्या कार्याबद्दल व कार्यकर्त्यांबद्दल परस्पर विश्वासाची गरज आहे असे नेहमीच जाणवते. त्यासाठीच्या आवश्यक असलेल्या संवादाची मर्यादा अनेकदा अधोरेखित होते. एकाच वेळी अनेक कार्यक्रमाची योजना हे त्याचे एक उदाहरण म्हणता येईल. त्यामुळेच असे काम करणाऱ्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांबद्दल "चमकोगिरी" असा केलेला उल्लेख मला वेदनादायी वाटतो. प्रत्यक्ष काम करणाऱ्या सामाजिक संस्था व कागदावरील सामाजिक संस्था यामुळेच संभ्रम आढळतो. कधीही नाव न ऐकलेल्या अनेक सामाजिक संस्था येथे आढळतात आणि काम करणाऱ्या सामाजिक संस्थांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करतात. सातत्याने काम करणाऱ्या अनेक संस्था असल्या तरी येथील सामाजिक प्रश्न मात्र अजूनही प्राथमिक अवस्थेतच दिसतात. याचाच अर्थ असा कि सामाजिक संस्थांच्या कार्याची व्याप्ती अधिकाधिक वाढविण्याची गरज आहे. 

हात मजुरी करुन पोट भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपला चरितार्थ चालविणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.  त्यांच्यासोबतच येथील उद्योग व व्यापार जगतातील महत्वाचा कणा असलेल्या नोकरदार मंडळींची संख्या या दोघांच्या बेरजे इतकी आहे. या सर्वांच्याच अस्तित्वाचा प्रश्न महामारीच्या संकटामुळे निर्माण झाला आहे. अलीकडच्या काळात दिसून येणारी वाढती गुन्हेगारी व तरुणांच्या आत्महत्या हे त्याचेच प्रतीक आहे. आगामी काळात सामाजिक संस्थांसाठी या प्रश्नाचे उत्तर शोधणे हे एक मोठे आव्हान ठरणार आहेत.

महामारीच्या या लॉक डाऊनच्या कालखंडात कणखर, खंबीर व दूरदर्शी सामाजिक नेतृत्वाची उणीव शहराला प्रकर्षाने जाणवली नव्हे ती आजही जाणवत आहे. अजूनही शहरातील वाढती रुग्ण संख्या समाजाच्या सक्रियतेची वाट पाहत आहे. समाजाला एकसंघतेने बांधून ठेवून, त्यांच्याकडून कोरोनावर मात करण्याच्या प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य मिळवून देण्यात जळगावकर अपयशी ठरले असे दुर्दैवाने  म्हणावे लागेल. एका बाजूला सामाजिक सौहार्द निर्माण केले पाहिजे तर दुसऱ्या बाजूला समाजाला सामाजिक संवेदनांची जाणीव करुन देत त्यांची सामाजिक प्रगल्भता विकसित होणे अत्यावश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग वाढला पाहिजे. सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे येथील समस्यांचे चिंतन करुन परस्पर सहकार्यातून त्यावर उत्तर शोधले पाहिजे. यातच सामाजिक संवेदनांची सतरा मजली उभी राहणार का ? या प्रश्नाचे उत्तर आहे. "आपण सर्व जळगावकर मिळून लवकरच ती उभारु या !" या विश्वासासह थांबतो. धन्यवाद ! 

4 comments:

  1. फारच वास्तव लिहिले आहे. जळगावमधील सामाजिक क्षेत्रातील चमकोगिरी थांबवावी लागणार आहे. सोशल मीडियामुळे ५/५० रुपयात जनसेवा (केळी वाटप) आणि १ जीबीत प्रसिद्धी (फेबु व व्हाट्सॲप) शक्य झाली आहे. जळगावकरांनी यावर विचारमंथन करणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
  2. यत्न तो देव जाणावा !

    ReplyDelete
  3. गिरीशजी अतिशय चिंतनशील मुद्दा आपण मांडला आहे .सद्यस्तिथीत रचनात्मक कार्य करणाऱ्या कार्यकर्ते एकत्रित येणे गरजेचे आहे .सज्जनशक्ती चा वचकरूपी दबाव दुज्जनशक्ती वर असल्यास गावात शहरांत शांतता व सुव्यवस्था निर्माण होईल ,यासाठी सुजनांचं एकत्रीकरण आवश्यक .

    ReplyDelete
  4. वास्तव आहे सखोल अभ्यास करण्याची गरज चर्चेने प्रश्न सुटू शकतो

    ReplyDelete